मराठी राजभाषा दिनाच्या सर्वांना शुभेच्छा!

उपयोजक's picture
उपयोजक in जनातलं, मनातलं
27 Feb 2021 - 11:24 am

मराठी राजभाषा दिनाच्या सर्वांना शुभेच्छा!

लॅटीन लिपीतून मराठी मजकूर लिहिणार्‍यांनाही मराठी दिनाच्या शुभेच्छा!

माझ्या फोनमधे मराठी/देवनागरी किबोर्ड इन्स्टॉल होत नाही, फोनमधे देवनागरीत कसं लिहायचं ते मला माहित नाही अशा थापा मारणार्‍यांनाही मराठी दिनाच्या शुभेच्छा!

फोनमधे देवनागरीत लिहायला फार वेळ लागतो म्हणणार्‍यांनाही मराठी दिनाच्या शुभेच्छा!

मित्र, छत्रपती हे शब्द 'मिञ', 'छञपती' असे टंकणार्‍यांनाही मराठी दिनाच्या शुभेच्छा!

'हिंदी' शब्द मराठीत घुसवणार्‍यांनाही मराठी दिनाच्या शुभेच्छा!

आताच्या 'घडीची' सर्वात मोठी 'बातमी देणार्‍यांना' मराठी दिनाच्या शुभेच्छा!

मराठीची लक्तरं करणार्‍या जाहिरातदारांनाही मराठी दिनाच्या शुभेच्छा!

महाराष्ट्रात बरेच वर्षे राहणार्‍या हिंदीभाषिकाशी हिंदीत बोलून त्याची मदत करणार्‍या मराठी माणसालाही शुभेच्छा!

'या भाषिक अस्मितांमुळे देशाचे तुकडे होतायत.' असे म्हणणार्‍यांनाही मराठी दिनाच्या शुभेच्छा!

मराठी ही काय इंग्रजीसारखी ज्ञानभाषा आहे काय? इतकं महत्त्व द्यायला? असे विचारणार्‍यांनाही मराठी दिनाच्या शुभेच्छा!

कशाला करता ही मराठीची नसती उठाठेव? काय फायदा याचा? असे विचारणार्‍यांनाही मराठी दिनाच्या शुभेच्छा!

मुक्तकभाषाविचारअनुभव

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

27 Feb 2021 - 11:47 am | मुक्त विहारि

मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...

मराठी_माणूस's picture

27 Feb 2021 - 3:19 pm | मराठी_माणूस

उपहासात्मक शुभेच्छा आवडल्या.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

27 Feb 2021 - 3:35 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

राजभाषा दिनाच्या सर्वाना शुभेच्छा..
ह्या दिवशी नेमके काय करायचे असते? असा प्रश्न पडणार्यानाही शुभेच्छा.

गामा पैलवान's picture

27 Feb 2021 - 6:20 pm | गामा पैलवान

घाटी भाषेमंदी बोलनाऱ्या लोकान्लाबी येक दिन भ्येटला पायजेल सरकारकडनं.
-गा.पै.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

27 Feb 2021 - 9:32 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मराठी राजभाषा दिनाच्या सर्वांना शुभेच्छा...! मराठी भाषेवर लेखन स्पर्धा वगैरे काही तरी उपक्रम व्हायला पाहिजे होता.
कोण पाहतं हल्ली हे सर्व उपक्रम वगैरे....! :)

-दिलीप बिरुटे

अरविंद कोल्हटकर's picture

28 Feb 2021 - 9:52 am | अरविंद कोल्हटकर

वरील विषय मधूनमधून चर्चेमध्ये येत असतो. ह्यावर ऐसीमध्ये ९-१० वर्षांपूर्वी मी एक लेख लिहिला होता. तो येथे पुनः चिकटवत आहे.

भारतीय अभिजात भाषा - राजकारण्यांचा खेळ

आजपर्यंत भारत सरकारने तमिळ (२००४), संस्कृत (२००५), कन्नड आणि तेलुगु (२००८) अशा चार भाषांना अधिकृत रीत्या ’अभिजात भाषा असा दर्जा दिलेला आहे. (पैकी कन्नडच्या बाबतीतील निर्णयास आह्वान देणारा अर्ज मद्रास उच्च न्यायालयामध्ये प्रलंबित असल्याने त्या भाषेबाबतचा निर्णय अमलात आलेला नाही.) मराठीलाहि असा दर्जा मिळावा अशी मागणी सुरू झालेली आहे. अद्यापि तिने जनमानसामध्ये मूळ धरल्याचे जाणवत नाही पण मराठी अस्मितेचा मुद्दा पुढे करून एखाद्या पक्षाने तिचा पाठपुरावा करण्यास प्रारंभ केला तर ती मागणीहि ऐरणीवर येऊ शकेल इतका ’मसाला’ तिच्यामध्ये निश्चित आहे.

ही वा ती भाषा ’अभिजात’ असल्याचे सरकारी पातळीवर घोषित करण्याचा सरकारला अधिकार आहे काय, असल्यास कोणत्या घटनाकलमाखाली वा कायद्याखाली आणि तसे करण्यामुळे ती भाषा बोलणार्‍या जनतेला निश्चित काय लाभ होतो काय अशी चर्चा ह्यपुढे केली आहे.

सर्वप्रथम ’अभिजात भाषा’ म्हणजे काय ह्याकडे नजर टाकू. पाश्चात्य संस्कृतीत जुनी ग्रीक आणि लॅटिन ह्या दोन भाषांना सर्वानुमताने ’अभिजात भाषा’ (Classical languages) असे मानले जाते. Classical Tripos in Cambridge, reading classics at Oxford ह्या सर्वपरिचित इंग्रजी शब्दांमागे हाच अर्थ आहे. ह्या दोन भाषांना ’अभिजात भाषा’ मानणे हा केवळ विद्वन्मान्यतेचा भाग आहे. त्यासाठी कोठल्याहि देशाच्या शासनापुढे कोणीहि अर्जी केलेली नाही आणि कोणत्याहि सरकारने हे काम आपणहून अंगावर घेतलेले नाही. विरुद्ध बाजूस फ्रेंच, जर्मन, इंग्लिश इत्यादि सध्याच्या समृद्ध भाषांपैकी कोणाच्याहि अभिमान्याने आमची भाषा ’अभिजात’ आहे असे जाहीर करावे असे मागणे आपल्या देशाच्या सरकारपुढे मांडलेले नाही.

अशाच विद्वन्मान्यतेवर आधारून भारतातील संस्कृत भाषा हीहि ’अभिजात’ भाषा मानली जाते आणि त्यास जगभर मान्यता आहे.

आता वस्तुस्थिति अशी आहे की भारतातीलच तमिळ ही भाषाहि स्वतःच्या प्राचीन वाङ्मयामुळे संस्कृतइतकीच संपन्न, इतकीच जुनी भाषा आहे. असे असताहि तिला ’अभिजात’ असे कोणी मानत नाही ही गोष्ट तामिळनाडूच्या DMK गटाला डाचत असावी. ह्यावर योग्य उपाय म्हणजे तमिळचेहि महत्त्व सर्व जगाच्या नजरेस आणून तिच्याबाबत योग्य आदर निर्माण करणे आणि जेणेकरून जगातील, वा विशेषतः भारतातील अधिकाधिक लोक तमिळ शिकतील असे वातावरण निर्माण करणे. पण हा मार्ग खूप लांबचा झाला. तो चोखाळण्याऐवजी DMK गटाने आपली राजकीय शक्ति त्यासाठी वापरायचे ठरविले, त्यासाठी योग्य ते fielding लावले आणि संधि येताच तिचा वापर करून केन्द्र सरकारकडून तमिळ भाषा ’अभिजात’ असल्याची घोषणा करविली. हे कसे झाले ते पाहू.

डॉ. जॉर्ज हार्ट हे कॅलिफोर्निया विद्यापीठ बर्कली येथे १९७५ सालापासून तमिळ विभागाचे प्रमुख आहेत. तमिळप्रमाणेच संस्कृतमध्येहि त्यांचा गाढा व्यासंग आहे. प्रा. मराइमलाइ ह्यांनी डॉ.हार्ट ह्यांना अशी विनन्ति केली की तमिळ भाषा अभिजात आहे किंवा कसे ह्यावर डॉ.हार्ट ह्यांनी मत व्यक्त करावे. तदनुसार डॉ.हार्ट ह्यांनी ११ एप्रिल २००० ह्यादिवशी आपले खालील प्रदीर्घ मत दिले. ते विद्यापीठाच्या संस्थळावर http://tamil.berkeley.edu/tamil-chair/letter-on-tamil-as-a-classical-lan... येथे उपलब्ध आहे आणि मी ते येथे खाली दर्शवीत आहे.

(येथे मूळ लेखामध्ये डॉ. जॉर्ज हार्ट ह्यांच्या मूल लिखाणाचे चित्र होते पण आता ते मूल स्रोतावरून हलविल्यामुळे आता येथे दिसत नाही. अरविंद कोल्हटकर)

डॉ.हार्ट ह्यांनी आपले मत नोंदविताना तमिळला अभिजात भाषा का म्हणावे ह्याबद्दल काही मार्गदर्शक तत्त्वे दिग्दर्शित केली आहेत. त्यापलीकडे जाऊन इतर भारतीय भाषांच्या पाठिराख्यांकडून अशाच मागण्या निर्माण होतील हे ओळखून त्या अन्य भाषा ’अभिजात’ असे का म्हणता येणार नाहीत हेहि नोंदवून ठेवले आहे. राजकारणावर एक डोळा ठेवून हा सिद्धसाधक प्रकार केला गेला आहे हे मला तरी स्पष्ट दिसते.

२००४ साली ह्या प्रकरणाचा नवी गति मिळाली. त्या वर्षीच्या निवडणुकीनंतरचे UPA (United Progressive Alliance) ज्या पक्षांच्या पाठिंब्यावर उभे होते त्यामध्ये DMK हाहि पक्ष होता. आपल्या पाठिंब्याची किंमत म्हणून त्यांनी Common Minimum Program चा भाग अशा ज्या मागण्य़ा मांडल्या होत्या त्यांमध्ये तमिळ भाषेला ’अभिजात’ भाषा असे केन्द्र सरकारने घोषित करावे हीहि एक मागणी होती.

सत्तेवर आल्यावर केन्द्राने हा प्रश्न सल्ल्यासाठी साहित्य अकादमीच्या समितीपुढे ठेवला. एकाच भाषेला असा दर्जा देणे युक्त ठरणार नाही, असे करण्याची आवश्यकताच नाही, ह्यामुळे चुकीचा पायंडा पडेल असे अनेक आक्षेप समितीने सरकारपुढे ठेवले. अखेरीस समितीने तमिळबद्दल काहीच स्पष्ट मत दिले नाही पण एखादी भाषा ’अभिजात’ असे घोषित करण्यापूर्वी कोणत्या कसोटया लावल्या जाव्यात ते घालून दिले. त्या कसोट्या अशा:
१) ती भाषा १५०० ते २००० वर्षांहून जुनी असावी आणि इतके जुने वाङ्मय त्या भाषेत असावे.
२) मौल्यवान् वारसा असे म्हणता यावे इतके प्राचीन वाङ्मय त्या भाषेत असावे.
३) त्या भाषेला स्वतन्त्र आणि दुसर्‍या भाषेवर अवलंबून नसलेली वाङ्मयीन परंपरा असावी.
४) जुनी भाषा आणि तिची नंतरची रूपे ह्यांमध्ये अंतर असावे.
(पहा Classic case of politics of language, The Telegraph, April 28, 2004.
http://www.telegraphindia.com/1040928/asp/frontpage/story_3813391.asp )

ह्यानंतर केन्द्र सरकारने १७ सप्टेंबर २००४ ह्या दिवशी तमिळ भाषा ’अभिजात’ असल्याचे घोषित केले. पहा http://www.hindu.com/2004/09/18/stories/2004091806530100.htm

येथे विशेष लक्षात घेण्याची गोष्ट अशी आहे की ही वा ती भाषा ’अभिजात’ आहे असे ठरविण्याचा कोणताच अधिकार केन्द्र सरकारकडे घटनेनुसार वा कायद्यानुसार नाही आणि कोणत्याहि सरकारी घोषणेमध्ये अशा अधिकाराचा स्पष्ट उल्लेख नाही. ही घोषणा Constitutional decree खाली केली जात आहे एव्हढा मोघम उल्लेख काय तो कोठेकोठे दिसून येतो. घटनेच्या ३४१ व्या कलमानुसार हिंदी भाषा समृद्ध करण्यासाठी प्रामुख्याने संस्कृतचा आधार घेण्यात यावा इतकाच संस्कृतचा विशेष उल्लेख आहे. ह्या पलीकडे जाऊन कोठल्याच भाषेला कसलाच वेगळा दर्जा घटनेने दर्शविलेला नाही.

ह्यानंतर अशी परिस्थिति निर्माण झाली की तमिळ भाषा ’अभिजात’ घोषित झाली पण मूळ अभिजात भाषा संस्कृतचे काय? हा अन्तर्विरोध दूर करण्यासाठी केन्द्राने संस्कृतलाहि हा दर्जा २७ ऑक्टोबर २००५ ह्या दिवशी घोषित केला. तसे करतांना भाषा २००० ते १५०० वर्षे जुनी असल्याची अट सैल करून ती १५०० वरच आणली. पहा http://www.hindu.com/2005/10/28/stories/2005102809281200.htm

कालान्तराने २००८ मध्ये कन्नड आणि तेलुगु ह्याहि भाषा अभिजात असल्याचे केन्द्राने घोषित केले, यद्यपि कन्नडचा हा दर्जा त्याविरुद्ध मद्रास उच्च न्यायालयापुढे प्रलंबित असलेला अर्ज निकालात निघेपर्यंत स्थगित आहे. पहा http://pib.nic.in/newsite/erelease.aspx?relid=44340
http://asiantribune.com/node/22180 आणि
http://www.thehindu.com/news/national/article75642.ece

अपेक्षेनुसार आता मराठीचे पाठीराखेहि मराठी ही अभिजात भाषा म्हणून घोषित केली जावी अशी मागणी करू लागले आहेत आणि त्यासाठी मोर्चेबांधणी सुरू आहे. पहा http://news.in.msn.com/national/article.aspx?cp-documentid=5334470. शिवसेनेनेहि आपले वजन ह्या मागणीमागे टाकले आहे. पहा http://www.dnaindia.com/mumbai/report_give-marathi-classical-language-ta...

क्रमाक्रमाने बंगाली, हिन्दी आणि अन्य भाषाहि हीच मागणी करतील आणि त्यांच्यापुढे गुढघे टेकण्याशिवाय प्रत्यवाय राहणार नाही. अरबी आणि फारसीचे पाठीराखे सज्जच आहेत.

अशा रीतीने ह्या गरीब देशात डझन-दीड डझन ’अभिजात’ भाषा असल्याचे मनोरंजक चित्र जगापुढे उभे राहील. ”आम्ही दरिद्री असलो म्हणून काय झाले, आमची भाषा तरी ’अभिजात’ आहे" असे त्या त्या भाषा बोलणारे लोक जगाला गर्वाने सांगू शकतील. राजकारणी लोकांनाहि आपण काही भरीव कार्य केल्याचे समाधान मिळेल.

’बोलाचीच कढी, बोलाचाच भात...’

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 Feb 2021 - 10:42 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रति्साद माहितीपूर्ण आहे, आभार. एकापेक्षा अधिक भाषांना अभिजात भाषेचा दर्जा द्यावा लागेल म्हणून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी टाळाटाळ होत असेल तर ते योग्य नाही असे वाटते. दुसरी गोष्ट अशी की, केंद्र सरकारला असे अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा अधिकार नसला तरी आता पर्यंत सहा भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे, त्यामुळे आपल्याही मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला मिळाला पाहिजे असे एक मराठी भाषिक म्हणून वाटते.

-दिलीप बिरुटे

सुक्या's picture

28 Feb 2021 - 12:08 pm | सुक्या

माहीतीपुर्ण प्रतीसाद.
एक प्रश्न आहे ... जर एखाद्या भाषेला "अभिजात भाषेचा" दर्जा मिळाला तर त्याने नक्की काय मिळते? सरकार कडुन काही ठोस उपाय होतात का? म्हणजे मराठी सक्तीची होइल वगेरे. मला ही मागणी अस्मिता जागवुन पोळी भाजणे या पलीकडे जास्त काही नाही असे वाटते. कदाचीत माझी माहीती चुकीची असु शकते म्हणुन विचारले.

नक्की काय फायदा होतो?

श्रीगुरुजी's picture

28 Feb 2021 - 12:21 pm | श्रीगुरुजी

अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर भाषाप्रसारासाठी व अध्ययनासाठी जास्त निधी मिळतो. केंद्राकडूनही निधी मिळतो. भाषेला स्वतंत्रपणे महत्त्व मिळण्यास प्रारंभ होतो (सध्या समान लिपीमुळे हिंदीच्या तुलनेत मराठीकडे दुर्लक्ष होते).

सुक्या's picture

1 Mar 2021 - 12:51 am | सुक्या

माहितीबद्दल धन्यवाद.

श्रीगुरुजी's picture

28 Feb 2021 - 10:55 am | श्रीगुरुजी

सुप्रभात
जागतिक मराठी राजभाषा दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

चौथा कोनाडा's picture

1 Mar 2021 - 1:05 pm | चौथा कोनाडा

आमी शुभेच्छा देत बसण्यापेक्षा उपलब्ध संधीत जवळच्या मंडळात अभिवाचनात सहभागी होऊन मायबोलीअवरील प्रेम व्यक्त केले !