हे घे ते घे

उपयोजक's picture
उपयोजक in जनातलं, मनातलं
23 Feb 2021 - 9:01 am

हे घे, ते घे

हे घे,ते घे
हे जमव, ते जमव.
अरे लागेल कधी तरी म्हणत,
घरात मोठ्ठं भांडार वसव.

भिंतीवर घड्याळे, हँगिंग्ज, चित्रे,
लटकलेली आहेत जागोजागी.
तरीही आणखी म्युरल्स हवीत,
जुनी फोटोफ्रेमही थोडी जागा मागी.
इंच नि इंच जागा लढवतो
तरी आम्ही नवीन वस्तू खरीदतो.

सागर किनारीचे शंख शिंपले,
डोंगरमाथ्यावरचे दगडधोंडे,
संमेलनातली असंख्य पुस्तके,
मासिके-वर्तमानपत्रातील कात्रणे,
हवीत यंत्र, तंत्र, विद्युत उपकरणे,
हवीत देखभाली साठी मग अवजारे.
त्यांच्या पावत्या, गॅरंटी, वॉरंटी
ताप डोक्याला,
हव्यात कशाला इतक्या कटकटी?

लुटून आलेल्या वस्तू,
लुटल्यावर उरलेल्या वस्तू,
आहेरातल्या आलेल्या वस्तू,
सहलींच्या आठवणी वस्तू,
हौशीच्या, सोसाच्या भारंभार वस्तू,
वस्तू, वस्तू, वस्तू आणि वस्तू
वस्तूंसाठी हवी मग नवीन वास्तू.

स्वयंपाक घर म्हणजे तर
अलिबाबाची विशाल गुहा.
खाणारी जरी चार तोंडे
तरी इथल्या वस्तूंची जंत्री पहा.
लहान आवृत्ती, मोठी आवृत्ती,
रोजच्या साठी, पाहूण्यांसाठी,
एक खराब झाली तर राखीव दुसरी
किती हो लागतं टीचभर पोटासाठी?

भांडीकुंडी, कपडालत्ता
घरात माझ्या वस्तूंची सत्ता
कशाचाही मेळ कशाला नाही
वेळेला काहीच सापडत नाही.
घर किती ही तुडुंब भरलं तरी
सुतळीचा तुकडाही टाकवत नाही.
कशासाठी, केंव्हा, काय घेतलं
वर्ष गेलं की काही आठवत नाही.

हे सारं आठवण्यात, शोधण्यात
म्हणे आमचा जीव खूप रमतो.
आता साफसफाईत तो थोडा दमतो,
पण खरेदी म्हंटली की पुन्हा विसरतो.
नविन वस्तू ठेवण्या साठी म्हणे
आता हवं आणखी एक नवं कपाट
काँप्युटरमध्ये मांडूया का वस्तुंच्या
ग्रह,स्थान, जन्म, कुंडलीचा थाट?

तरीही हे घे, अन् ते तर, घेच घे.
आज उधार आहे, उद्या नगद
दुकान, मॉल आहे, फुटपाथही आहे
आणि हो ऑनलाईन वेबसाईटही आहे.
उगाच नाही म्हणू नका दादा
एका वर आहेत दोन फुकट
येण्याचा ही त्रास घेऊ नका
घरपोच आणून देतो सरसकट.

निर्जीव असणार्‍या ह्या वस्तूंत
माझा जीव दडलेला आहे
आताशा खरंतर त्यांच्या लोभाने
ह्या वस्तू सांभाळतच मी जगत आहे.
त्यांच्या मालकीचा का जाणे
मला उगाचच माज आहे.
घरातल्या वस्तुंच्या गर्दीत
मी ही वस्तू म्हणूनच जगत आहे.
माझ्या स्वत:च्या लेखी ही
माझी किंमत ह्यांच्यापुढे शून्य आहे.

शेवटी बरोबर नेता काहीच येत नाही
तरी घेण्याचा सोस काही सुटत नाही.
तरीही हे घे, अन् ते तर, घेच घे.
हे जमव, ते जमव.
घराचं फक्त संग्रहालय बनव.

- शिरीष थत्ते
---------------------------------------------------
ही कविता WhatsApp वर बरीच व्हायरल झालीय.
काय वाटलं वाचून? तुम्हीही याच अवस्थेतून जात आहात का? :) सतत काही ना काही खरेदी करण्याच्या,संग्रह करण्याच्या वृत्तीवरची (की किक?) ही कविता.

काहीजणांना यातला विचार पटतो तर काहींना नाही. "ज्यांची भरपूर पैसे कमावण्याची औकात नसते ते loser माईंडसेटचे लोक अशा कविता करतात" किंवा "लोक बघतील त्यांचा पैसा कसा खर्चायचा ते.या कवीने चिंता करण्याची गरज नाही लोकांच्या पैशाची!" वगैरे प्रतिसादही आलेत.

भारंभार खरेदीऐवजी ज्यामुळे स्वत:मधे काही कौशल्य निर्माण होईल, ज्ञानात भर पडेल असा एखादा अल्पमोली छंद जोपासला तर?

आवश्यक खरेदीला कवीची ना नसावी.

मुक्तकजीवनमानप्रकटनविचार

प्रतिक्रिया

तुषार काळभोर's picture

23 Feb 2021 - 10:28 am | तुषार काळभोर

या दोन जीवनशैली एकीकडे.
आणि केवळ पैसे आहेत म्हणून ज्याची गरज नाही किंवा वापर होणार नाही अशा गोष्टी विकत घेणे - हौस असते, वेळ जात नाही म्हणून शॉपिंग करतात, माझ्याकडे अमुक ब्रँड ची तमुक गोष्ट पाहिजे म्हणून शॉपिंग करतात, त्याच्याकडे आहे म्हणून माझ्याकडे पाहिजे म्हणून करतात, कुणाला तरी दाखवायचे असते की आम्हाला पण ही गोष्ट परवडते/आमच्याकडे पण क्ष क्ष आहे म्हटलं, अशी शॉपिंग करतात.

उदाहरणार्थ. हातातलं घड्याळ. दोनशे पाचशे रुपयाचं असू शकतं. टायटन च पाहिजे म्हणून दोन तीन हजार रुपयांचे असू शकतं. दहा पंधरा हजारांच Casio जी शॉक किंवा एडिफिस असू शकतं. किंवा दोन तीन हजाराचे फिटनेस बँड. किंवा मग मोबाईल मध्ये वेळ बघता येतो.
फिटनेस बँड वापरणारे किती लोक त्याचा योग्य उपयोग करत असतील?
क्रोनोग्रफ वापरणारे किती लोक त्यातल्या वेळ सोडून इतर डायल चा उपयोग करत असतील?

रतन टाटा, बिल गेट्स, मार्क झुकरबर्ग, वॉरन बफे, हे सगळे frugal जीवनशैली साठी प्रसिद्ध आहेत. कारण त्यांना मी किती मोठा आहे, माझ्याकडे किती पैसा आहे हे दाखवायची गरजच नाहीये.

ज्यांना तशी गरज असते ते फॉरच्युनर, दीडशे तोळ्याचे ब्रेसलेट अन गोफ, गुच्ची चा गॉगल, राडो चं घड्याळ असल्या गोष्टी करतात. आणि हे फक्त इकडे नाहीये. पाश्चात्य देशात सुद्धा असे अनेक नवश्रीमंत असतात ज्यांना पैशाचं काय करायचं हेच माहिती नसतं. मग उगीच मोठ्या गाड्या, अजून जास्त पैसे असतील तर yacht, पार्ट्या असे अनेक मार्ग असतात. आपल्याकडच्या नवश्रीमंत लोकांचं (New Money!) सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे जमिनी विकून आलेला पैसा. किंवा आय पी एल मध्ये करोडो रुपयांची किंमत मिळवणारे खेळाडू.

नव उच्च मध्यमवर्ग मध्ये असा उदाहरण म्हणजे अचानक हातात आलेला मोठ्ठा पगार, विशेषतः जी मुले गरीब, ग्रामीण, शेतकरी पार्श्वभूमी कडून आलेली असतात. यात बऱ्याच जणांना परिस्थिती ची जाणीव असते पण एक मोठा भाग असा असतो ज्यांना इतक्या पैशाचं काय करायचं ते न सुचल्याने लेखात लिहिल्या प्रमाणे अनावश्यक खरेदी होत राहते.

खेडूत's picture

23 Feb 2021 - 10:48 am | खेडूत

थत्तेची!
मला वाटलं तुमचीच रचना... :)

बाकी कविता वाचून वाटलं जरा बरी, मीटर मध्ये बसणारी लिहिता आली असती.

वस्तू संग्रह आणि खरेदी म्हणाल तर करायची त्यानं ती करत राहावी, नाहीतर आपण सल्ले, धडे देणार कुणाला?
त्यांनी घ्यावं
कडकी यावी
कडकीची कारणे त्यांनीच शोधावीत..
मग प्रकाश दिसेल ज्ञानाचा. तेही थांबतील.

किंवा

काहीच न जमवता
पैसे साठवावेत. अकाऊंट फुगावे.
मग सायबर चोरांची भीती
किंवा बँकाच बुडतील का काय?
आणि पाचच लाखाची जबाबदारी घेतील...
बाकीची पुंजी?
त्यापेक्षा एखादा प्लॉट घेऊन ठेवू.

अशी द्विधा मनस्थिती सगळ्यांची असते. पैसे असोत की नसोत.
पण त्यातच तर मजा आहे ना!! काय बोलता.

(मिनिमलीश्ट्) खेडूत.

उपयोजक's picture

23 Feb 2021 - 12:11 pm | उपयोजक

छान प्रतिसाद.

@खेडूत: कधी कधी हे खरेदीत वाहवत जाणं पाहिलं की वाटतं ही ऊर्जा एखाद्या छंदाला दिली तर हीच व्यक्ती इतरांसाठी काही प्रेरणा ठरु शकते,त्या क्षेत्रात काही भरीव योगदान देऊ शकेल.नुसतंच गॅजेट,गाड्या,कपडे खरेदी करत सुटण्यातून व्यक्तिमत्वाच्या विकासाला फारसा काहीच उपयोग होत नाही.पण तुम्ही म्हणता तसे 'सल्ले देणारे आपण कोण?' ठेच लागू द्यावी हे ही खरेच.

गवि's picture

23 Feb 2021 - 12:32 pm | गवि

रोचक विषय.

उंची ब्रँडस "शो ऑफ" ऊर्फ झगमगणे ही मनुष्याची गरज आहे. तगणे हे प्राथमिक झालं. त्याच्या पुढे पोचलं की झगमगणे येतंच. तसं नसेल तर सगळं थिजून जाईल. आपण केवळ "प्राणी" बनून राहू शकत नाही.

अर्थात, हे सर्व सोडून केवळ मनोरंजन या कारणासाठी खरेदी हाही प्रकार आहेच. विशेषत: ट्रॉली घेऊन आपल्या हाताने वस्तू उचलून घेण्याची सोय गेल्या पंचवीस वर्षात भारतात जास्त रुढ झाल्यापासून. पूर्वी हा इफेक्ट फक्त भाजी खरेदीपुरता होता.

खरेदी केल्यावर एक तात्कालिक आनंद मिळतो म्हणून दीर्घकालीन दृष्टीने अनावश्यक अशी खरेदी केली जाते हे सत्यच. अर्थव्यवस्था वाढत्या आकाराची राहण्यासाठी कदाचित हे पोषक असू शकेल. जे होतेय ते दुरित आहे असा विचार करत बसल्यास जगण्यात काय अर्थ उरेल?

इच्छुकांनी शनाया ट्वेनचं ka ching (क चिंग) हे गाणं अवश्य शोधून ऐकाव्ं. सोबत लिरिक्स वाचत वाचत ऐकाव्ं.

हे गाणं चायनीज नाही हे उगीच आपलं नोंदवतो. तो सुपरमार्केटमधे असणार्या कॅश रजिस्टरच्या आवाजाचा तत्कालीन संदर्भ आहे.