गावाच्या गोष्टी : सांदिपनी मामा

साहना's picture
साहना in काथ्याकूट
22 Feb 2021 - 12:42 pm
गाभा: 

सांदिपनी मामा हे तसे माझे मामा नव्हते. आईचे ते मानलेले भाऊ. पण सक्ख्या भावापेक्षा त्यांचे अधिक प्रेम असावे. काहीही सण, वार असो सांदिपनी मामा नेहमीच आमच्या घरी हक्काने यायचे. त्यांचे हृदय कवीचे होते आणि मन थोडे स्वच्छंद. लिहिणे वाचणे ह्यांच्या प्रचंड नाद आणि एका पायाने ते अधू होते. त्यांना पण स्वप्न होते पोलिस व्हायचे पण अधू असल्याने ते शक्य नव्हते. मग ते झाले छायाचित्रकार आणि लग्न मुंजी पेक्षा खून, बलात्कार, आत्महत्या ह्यांचे छायाचित्रण (पोलिसांसाठी) ते जास्त करत. पोलीस मंडळींना ह्यांच्या बद्दल प्रचंड आदर निर्माण झाला कारण ह्यांची आपल्या कामाप्रती श्रद्धा बेजोड होती. केंव्हाही ह्यांना फोन करा आणि काहीही गुन्हा असो हे तात्काळ आपली स्कुटर घेऊन हजर.

हे काम सोपे नाही. कारण अपघात, खून, आत्महत्या, इत्यादी पाहून भल्या मोठ्या पोलिसांना उलट्या यायच्या. पण सांदिपनी मामाला नाही. त्या काली इंटरनेट वगैरे नव्हता पण ते स्वतःहून देश विदेशांतून पुस्तके, मॅगझीन वगैरे आणून फॉरेन्सिक हि कला कुठे पोचली आहे ह्यावर अभ्यास करायचे. मग आपले काम निव्वळ फोटोग्राफी विषयापुरते न ठेवता काय पुरावे मिळतील, कुणाच्या जबान्या घेतलाय पाहिजेत काय प्रश्न विचारले पाहिजेत, कुठली कलमे कुठे लागतील ह्याची इत्यंभूत ज्ञान ह्यांना असायचे मग पोलीस अधिकारी ह्यांची मदत हमखास घेत. नाही चिरा नाही पणती ह्या प्रमाणे ह्यांचे काम. केस संपली कि त्यांतच आनंद. ह्यांच्या जीवावर अनेकांनी मेडल्स घेतली असावीत. पण पोलीस ह्या विषयावर काहीही काम असले तर सांदिपनी मामाच्या शब्दाला जे वजन होते ते कदाचित गृहमंत्र्याला नसेल.

आमच्या कुटुंबातील एका व्यक्तीला कँसर झाला. दुर्धर प्रकारचा होता आणि बॉन मॅरो डोनेशन पाहिजे होते. सांदिपनी मामाच्या एका शब्दावर पोलीस खात्याने चक्रे फिरवून ५ लोक हजर केले.

सांदिपनी मामा संध्याकाळी पोलिसांबरोबर "बसायचे". ह्याचा अर्थ बहुतेक करून दारू पिणे असा असावा कारण त्या काळी आणि त्या भागांत डान्स बार वगैरे नसावेत. मग विविध विषयांवर चर्चा व्हायची. कुठ्याला पैलवाणापेक्षा ह्याला पोलीस अधिकारी व्हायची जास्त लायकी आहे असे वरिष्ठ अधिकारी सुद्धा म्हणत. कधी कधी ह्याला विविध भागांतून फोन यायचे मदत मागायला आणि हा मदत करत सुद्धा असे.

अपेक्षा ह्याची एकच. इतर पोलीस अधिकाऱ्यांनी स्तुती करावी. आणि ती पूर्ण सुद्धा होत असे. पेपरांत फोटो, सत्कार वगैरे करण्याचे अनेकांनी प्रयत्न केले पण ह्यांनी नेहमीच त्याला सरळ नकार दिला.

सांदिपनी मामाचे वडील ह्यांना हे अजिबात पसंद नव्हते. मोठा भाऊ मोठया सरकारी हुद्द्यावर होता, मधला भाऊ वकील होता. सर्वांची आपली घरे, बायको मुलं होती. हा अधू असल्याने बायको मिळणे कठीण होते पण माझी आई आणि सांदिपनी मामा ह्यांचे वडील ह्यांचे प्रयत्न सुरु होते. लग्न वगैरे नकोच असा ह्यांचा आग्रह. शेवटी साधारण ४० वर्षांच्या वयावर ह्यांचे लग्न वडिलांनी जबरदस्तीने एका महिलेशी करून दिले. ह्या महिलेला म्हस म्हटले तर वावगे ठरू नये कारण इतकी निर्बुद्ध आणि कुरूप महिला मी आयुष्यांत पहिली नसावी. हिला स्टेट बँकेत नोकरी असली तरी कुणीही हेच पाणिग्रहण करायला तयार होत नव्हता ह्यांतच सर्व काही आले. माझ्या आईच्या मते ह्या मुलीच्या वडिलांनी सांदिपनी मामाच्या वडिलांना २ लाख रुपये दिले होते.

पण इथे सांदिपनी मामांचे दिवस फिरले. बायको खूपच कजाग होती. सौंदर्याप्रमाणे मन सुद्धा प्रचंड कुरूप होते. एकदा लग्न झाल्यावर संपूर्ण परिवाराने हात वर केले. बापाला समाधान पोराचे लग्न झाले. भावांना वाटले ह्याची काळजी बायकोने घ्यायची. बायकोचा स्वभाव आणि रूप पाहून इतर भावजया हिला जवळ करत नसत. हिचा पगार लठ्ठ आणि सांदिपनी मामाची मिळकत बेताची. तिने भांडून सांदिपनी मामाचे वाचन बंद केले, मग मित्रांना भेटणे आणि "बसणे". रात्री अपरात्री काम आल्यास ह्यांना जायला मनाई. मग पत्नीने फ्लॅट घेतला आणि ह्याला मुंडू प्रमाणे ठेवले. घरांत झाडू मारणे पासून हिला सकाळी तिच्या गाडीने ऑफिस मध्ये सोडणे पर्यंत सर्व कामे हे बिचारे घाबरून करत. फायदा नाही म्हटल्यावर पोलीस मित्रांचे येणे जाणे बोलणे कमी झाले. जे काही रिटायर वगैरे झाले होते ते अधिकारी फक्त ह्यांना महत्व देत.

अनेक लोकांना ह्या सर्व गोष्टींची कल्पना नव्हती. कारण बायको वाईट आहे म्हटल्यावर लोकांच्या डोळ्यासमोर चित्र येते ते काही तरी अतिरंजित असते. प्रत्यक्षांत ह्या गोष्टी सूक्ष्म पातळीवर घडतात. मानसिक दृष्ट्या पुरुषाचे खच्चीकरण करणे हि प्रक्रिया हाणामारी वगैरेने होत नाही. छोटे छोटे टोमणे, चार चौघांत अपमान, आपल्या कुटुंबाचे छान वर्णन पण आपल्या पतीच्या कुटुंबा बद्दल वाईट बोलणे इत्यादी. अधू आहे म्हणून पुन्हा पुन्हा टोमणे. आपल्या पैश्यांचा माज. मोठयाने ओरडणे, किंचाळणे वगैरे अनेक अवतार ह्यांच्या पत्नी घेत असत.

मला हे तेंव्हा लक्षांत आले जेंव्हा पोलीस कामाविषयी सांदिपनी मामा जास्त बोलणे बंद झाले. मी ह्यांना सिरीयल किलर वगैरेची माहिती विचारली तर ते तासन तास बोलत. त्यांनी मला एक मराठी पुस्तक दिले होते ज्यांत "भटक्या" नावाने एक माणूस सत्यकथा लिहीत असे. ह्या माणसाची कनेक्शन अंडरवर्ल्ड वगैरेत होती आणि त्याचे सत्य अनुभव तो टोपण नावाने लिहायचा. पुस्तक होते कि मासिक होते आठवत नाही. पण सांदिपनी मामांचे काही तरी बिनसले आहे हे मला समाजत होते. बहुतेक मंडळी "लग्न म्हटल्यावर हे सर्व चालायचेच" असे म्हणून वेळ मारून नेत. काही मंडळी अनाहूत सल्ले देत. पण हे सर्व काही शेवटी बंद झाले. मामा आमच्या घरी येणे सुद्धा बंद झाले. कधी कधी कुठे भेट झाली तरी बिचारे खंगलेले आणि हताश वाटायचे. पण हि हताशता, ते नैराश्य जे मला दिसत होते ते कुणालाच दिसत नव्हते.

शेवटी मग एक दिवस ह्यांनी आपल्या जीवनाचा अंत केला. त्यादिवशी मी त्यांच्या घरी गेले तर तिथे पोलीस होते. बहुतेक लोक नवीन असल्याने कुणालाच ह्यांची ओळख अशी नव्हती. एक फोटोग्राफर पोलिसांसोबत आला होता. मला त्या खोलीत जायचे धाडस झाले नाही. दुसऱ्या बेडरूम मध्ये प्रचंड प्रमाणांत कागदपत्रे होती, आणि बाहेरून आणलेलया जेवणाच्या प्लास्टिक च्या डब्यांचा पिशव्यांचा ढीग होता. त्यावर बुरशी वगैरे येऊन घाण वास पसरला होता.

त्यांच्या रिटायर्ड मित्राने नंतर खुलासा केला कि सांदिपनी मामाला एक दुखणे झाले होते. बायको खर्च करायला तयार नसावी आणि ह्याला सुद्धा जगण्यात इच्छा राहिली नव्हती. दुखण्याने बिचार्याला काम करणे जमत नव्हते. बायको बाहेरून डबा आणून रिकामे डबे ह्याच्या खोलीत फेकायची. दुखण्याने वेदना वाढत चालल्या होत्या आणि जगणे अशक्यप्राय झाले होते. त्यांच्या मित्राने मला पहिले नव्हते पण सांदीपनी मामा अनेक वेळा माझ्याबद्दल प्रेमाने आणि आपुलकीने बोलत असे आणि कशी मला लहानपणापासून त्यांच्या कामांत रुची आणि त्याचे ऍप्रिसिएशन होते ह्याबद्दल ते बोलत असत असे त्यांनी मला सांगितले.

चाकोरी बाहेर जगणाऱ्या माणसांना अनेकदा अशी प्रताडना सहन करावी लागते. वरून सध्या वाटणार्या महिला अनेकदा दुष्ट आणि कजाग असतात. पुरुषांना कदाचित वरून भांडणे शक्य होते पण महिलांच्या छुप्प्या अब्युस ला नक्की कसे सामोरे जावे हे त्यांना समजत नाही. कविमनाचे सांदिपनी मामा हे ह्याच गोष्टीला बळी पडले. माझ्या वडिलांचे म्हणणे होते कि त्यांना अश्या प्रकारे लग्न करून देणे मुळांतच चुकीचे होते. ह्यांची बायको काही वर्ष मागे रिटायर झाली. काहींच्या मते तिला hoarding हा मानसिक रोग झाला आहे. तिच्या घरांतील कुठलीही वस्तू ती फेकून देत नाही. (हा एक मानसिक रोग असून ह्यावर अमेरिकेत एक रिऍलिटी शो आहे. चित्रे सर्च करताना सावध राहा, उलटी येण्याची शक्यता आहे)

माझे ह्या मालिकेतील लेख मी इतरत्र प्रकाशित करणार आहे. पण त्यासाठी त्यावर संपादकीय सोपस्कार वगैरे करावे लागतील. बुक्सट्रक माझे लेखन आधीपासून प्रकाशित करत आहे आणि त्यांच्या सबस्टॅक वर माझी मालिका प्रसिद्ध केली जाणार आहे. ज्यांना इमेल द्वारे हि मालिका हवी असेल त्यांनी सबस्क्राईब करण्यात हरकत नाही. https://mrbookstruck.substack.com/

प्रतिक्रिया

तुषार काळभोर's picture

22 Feb 2021 - 1:13 pm | तुषार काळभोर

बायकोच असं नाही, पण असे सूक्ष्म अत्याचार सगळीकडे होतात. काही जण झुगारून देतात, काही जण सहन करतात, काही जण दुर्लक्ष करतात.

hoarding विषयी कधीतरी वरवर वाचले होते. पण फार कॉमन असेल असे वाटले नव्हते.

अवांतर: थोडफार मानसिक, भौतिक होर्डिंग् आपण सगळेच करतो. गरज नसलेल्या वस्तू, आठवणी, भावना यात जीव अडकून राहतो.

मुक्त विहारि's picture

22 Feb 2021 - 1:24 pm | मुक्त विहारि

सहमत आहे

मुक्त विहारि's picture

22 Feb 2021 - 1:25 pm | मुक्त विहारि

व्यक्तिचित्रण छान जमले आहे

साहना ताई, एक सल्ला देतो, जर हे माणसे खरेच अस्तित्वात असतील, आणि त्याच नावाने तुम्ही व्यक्तिचित्रण करत असाल तर मला वाटते हा खासगी पानाच्या अधिकाराचा भंग होऊ शकतो.

तेव्हा एकंदर नावे बदला, किंवा काल्पनिक आहे, उत्तरदायित्वास नकार लागू म्हणून खाली डिस्क्लेमर टाका, अधिक महितीसाठी माहितगारांचे धागे बघा.

या धाग्यावर अब्रुनुकसानीचा दावा attract होऊ शकतो असे माझे तरी मत आहे.. बाकी कायदेतज्ज्ञ आपले मत देतीलच. थोडी माहिती खरेच घ्या असे सुचवेन.

बाकी वाचत आहे, छान चालू आहे. हे वे सा न ल.

कुणाचीही आयडेंटिटी समजू नये म्हणून योग्य ते बदल करण्यात आलेले आहेत.

सौंदाळा's picture

22 Feb 2021 - 8:55 pm | सौंदाळा

हा लेख पण सुंदरच झालाय पण शेवट फारच दुःखी. दोघांचेही शेवटी हालच झाले. लग्न केले नसते किंवा लगेच घटस्फोट घेतला असता तरी मामांचे पुढचे आयुष्य छान गेले असते असे वाटते.

योगेश कोलेश्वर's picture

22 Feb 2021 - 11:01 pm | योगेश कोलेश्वर

मस्त

योगेश कोलेश्वर's picture

22 Feb 2021 - 11:04 pm | योगेश कोलेश्वर

सुंदर लेख आहे..आपली लेखनाची श्यालि फारच चांगली असते. Very good..