तिळाचे लाडू
सौ सरिता सुभाष बांदेकर
ही तिळाच्या लाडवाची पाककृती नाहीय, पण तुमच्या बाबतीत असं कधी झालंय का???
याचा फोटो काढावा असे त्यावेळी वाटलं नाही कारण त्यावेळी सेल्फीची हवा नव्हती.म्हणजे मोबाईलच्या जन्मा आधीची ही खरीखुरी घडलेली गोष्ट आहे.
मी नेहमीप्रमाणे जानेवारी महिन्याच्या वाण सामानाबरोबरच तिळाच्या लाडवाचे सामान भरले होते.पण नेमकं संक्रातीच्या २ दिवस आधी मला फ्लू झाला.शेजारच्या काकू लोकांची स्वैपाकाची कामं करून द्यायच्या त्या म्हणाल्या “ काय गं, या वर्षी तिळाचे लाडू करणार नाहीस का?”
मी म्हटलं “अहो काकू , मी सामान आणलंय, तीळ निवडून ठेवलेत पण नेमका या फ्लू मुळे भयंकर वीकनेस् आलाय. नंतर करीन लाडू जरा बरं वाटलं की. नाहितर काही तरी गडबड व्हायची आणि लाडू बिघडायचे.”
तेव्हा काकू म्हणाल्या,” अगं एव्हढंच ना. दे सगळं सामान माझ्याकडे. मी देते करून तुला .”
मी सगळं सामान त्यांच्याकडे दिलं आणि निश्चिंत झाले.
दुसर्या दिवशी ॲाफीसमधून घरी आले तर लाडवाचा डबा दिसला.
डबा उघडून बघितला तर त्यात एक मोठ्ठा गोळा होता.मला वाटलं काकूंनी लाडू वळायचं काम माझ्यासाठी ठेवलंय वाटतं.काकूंना त्यांची मजूरी द्यावी म्हणून त्यांच्या घरी गेले.
पैसे दिल्यावर काकूंनी विचारलं “ कसे झालेत लाडू??”
“अहो, ऊद्या लाडू वळेन मग नैवेद्य दाखवून चव बघेन.”
“ अगं पण मी लाडू वळूनच दिलेत.”
मग मी त्यांना डबा नेऊन दाखवला.तेव्हा त्यांनी कपाळाला हात लावला.”अरे देवा पाक कच्चा राहिला वाटतं. असू देत, ठेव तो डबा इथेच मी तुला ऊद्या सगळं नीट करून देते.”
मी त्यांना म्हटलं “एक काम करा वीस लाडू या छोट्या डब्यात भरा मी तोच डबा ॲाफीसला नेईन.”
मी थोडं मिश्रण नैवेद्य दाखवायला ठेवलं.
नंतर काकूंनी दिलेला डबा मी डायरेक्ट ॲाफीसमध्येच उघडला.आणि मला धक्काच बसला परत तेच एक मोठ्ठा गोळा.... आता मी लाडू आणलेत म्हणून सगळेच जमले होते.
मी डबा लपवायचा प्रयत्न केला पण मैत्रीणीनी माझ्या हातातून डबा घेतला आणि सगळ्यांना दाखवला. सगळे जोरात हसत होते.आणि मी खजील झाले होते.
आमचे एक मॅनेजर मिस्कील होते ते म्हणाले” हसू नका कुणी. आज आपण वेगळ्या पद्धतीने तिळगूळ घेऊया.एकेकानी माझ्या मागे या.”
ते माझ्या जवळ आले, डब्यातल्या गोळ्यातून थोडं मिश्रण घेतलं त्याचा लाडू वळला आणि खाल्ला.
“काळजी नसावी. आम्ही गोड बोलणारच.”
असा तो तिळगूळ देण्याचा आगळा वेगळा कार्यक्रम पार पडला.
पण अजूनही तो तिळगूळ सगळ्यांना आठवतो आणि सगळे मला सांगतात
त्या लाडवाची चव अवर्णनीय होती. पण परत तसे लाडू तू कधीच केले नाहीस.
सौ सरिता सुभाष बांदेकर
प्रतिक्रिया
14 Jan 2021 - 6:09 pm | NAKSHATRA
अतिशय सुंदर
15 Jan 2021 - 9:58 am | सरिता बांदेकर
धन्यवाद
14 Jan 2021 - 9:17 pm | मुक्त विहारि
आवडला
15 Jan 2021 - 9:59 am | सरिता बांदेकर
धन्यवाद
15 Jan 2021 - 1:16 pm | Bhakti
छान किस्सा!
15 Jan 2021 - 5:55 pm | सरिता बांदेकर
धन्यवाद