लाक्कुंदी आणि दांडेली - भाग ३ (अंतिम)

एक_वात्रट's picture
एक_वात्रट in भटकंती
9 Jan 2021 - 10:43 am

दिवस तिसरा:
कर्नाटकातील दांडेली मुख्यत्वे प्रसिद्ध आहे तिथल्या रिव्हर राफ्टिंगसाठी. आम्ही मात्र ते करणार नव्हतो. दांडेलीत जाऊन तिथला निसर्ग अनुभवणे आणि जमले तर तिथल्या अभयारण्याला भेट देणे एवढाच आमचा कार्यक्रम होता.
खोल्यांमधले सगळे सामान आवरून आम्ही गाडीत टाकले, नाश्ता उरकला आणि निघालो. साधारण तीनेक तासात आम्ही दांडेलीला पोहोचलो. हॉटेलात जाऊन पहातो तर ते छायाचित्रांमधे दिसत होते त्यापेक्षा फारच जास्त भयानक निघाले. आता काय करावे? दुसरे हॉटेल शोधण्यासाठी लागणारा वेळ आमच्याकडे नव्हता, शिवाय हे पैसे परत मिळणार नव्हते आणि एकाच रात्रीचा तर प्रश्न होता, तेव्हा इथेच राहण्याचे ठरले. अरुंद, अंधारा जिना आणि लहानशा, एकही खिडकी नसलेल्या खोल्या - हॉटेलचा मालक बहुधा आधी मुंबईत रहात असावा.
खोल्यांमधे सामान टाकून आम्ही बाहेर पडलो आणि शेजारच्या कामत हॉटेलात जेवणे उरकली. थोडी वामकुक्षी घेऊन आम्ही तीनला बाहेर पडलो - आमचा पहिला थांबा होता सिंथेरी रॉक्स. वनखात्याच्या चौकीवर गाडीची नोंद केली, तिकीटे घेतली आणि आत शिरलो. आत जाण्याचा रस्ता कच्चा आणि अरुंद आहे. एके ठिकाणी गाडी लावल्यावर आत साधारण दोन-तीनशे मीटर दगडी रस्त्याने उतरून जावे लागते.
सिंथेरी रॉक्स म्हणजे एक नदी आणि तिच्या अवतीभोवती असलेले मोठमोठे दगड. खरं सांगायचं तर ना या नदीत काही खास आहे ना त्या दगडांमधे. आणि गंमत म्हणजे त्या नदीत जायची परवानगी नाही. साधारण १०० फूट दुरूनच या अलौकिक दृश्याचा आनंद घ्यावा लागतो. कारण विचारल्यावर कळले की काही लोक हुल्लडबाजी करतात म्हणून. काहीही. असं आपल्या महाराष्ट्रात करायचं म्हटलं तर निम्मी प्रेक्षणीय ठिकाणे पावसाळ्यात बंद करावी लागतील. एकूणच आजकाल इंटरनेटवर प्रदर्शित होणा-या चित्रपटांसारखे हे ठिकाण आहे - अगदीच सपक आणि बेचव.



पण गाडीकडे परत येत असताना मात्र एक गोष्ट चांगली घडली - महाराष्ट्राचा राज्यप्राणी शेकरूनं आम्हाला दर्शन दिलं. महाराष्ट्रात जंग जंग पछाडूनही जो आम्हाला कधीच दिसला नाही, त्या ह्या प्राण्यानं आम्हाला कर्नाटकात दर्शन द्यावं यापेक्षा मोठा विनोद काय असू शकतो?




जगप्रसिद्ध सिंथेरी रॉक्स पाहून आम्ही निघालो दांडेली अभयारण्याकडे. एका वनरक्षकाकडे चौकशी केल्यावर कळले की सकाळी सहा ते साडेआठ एक जंगल सफारी असते - मोजक्याच जागा असतात - उद्या पहाटे पाचला पोचलात तर तिकीटे मिळतील म्हणून. थोडा विचार केल्यावर असे वाटले की पहाटे सगळे सामान घेऊनच इथे यावे, पुन्हा खोलीवर जाऊन करणार काय? तेव्हा, उद्या पहाटेच खोली सोडून सगळे सामान गाडीत टाकावे आणि अभयारण्याला भेट देऊन झाल्यावर थेट पुण्याला निघावे असे ठरले.
दिवस चौथा:
पहाटे साडेचारला निघून आम्ही पाच वाजेपर्यंत अभयारण्यात पोचलो. अभयारण्याच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे जाणारा रस्ताही दाट जंगलातून जातो. या अरुंद रस्त्याने मिट्ट अंधारात गाडी चालवण्याचा अनुभव रोमांचकारी होता. या रस्त्यावर आपल्याला काहीतरी दिसेल असं आम्हाला वाटलं खरं, पण तसं काही झालं नाही. थोड्याच वेळात कार्यालय उघडले आणि तिकीटे द्यायला सुरुवात झाली. एव्हाना ब-यापैकी गर्दीही झाली होती. हे अभयारण्य कर्नाटकात असले तरी इथल्या बहुतेक कर्मचा-यांना मराठी येत होते. ४ लोकांचे १८०० रुपये देऊन आम्ही तिकीटे घेतली आणि बाहेर पडलो.
कार्यालयात कुठला प्राणी शेवटचा कधी दिसला याची नोंद असलेला एक बोर्ड होता. त्यात बिबट्या, काळा बिबट्या, एवढंच काय पट्टेदार वाघही दिसल्याची नोंद होती. तो बोर्ड पाहून आपल्यालाही काहीतरी दिसेल अशी एक भाबडी आशा आमच्या मनात जागली.

सहाच्या आसपास गाड्या निघाल्या. गाडीत बसताना एक विनोद घडला. आमच्या बरोबर असलेल्या दुस-या कुटुंबातल्या एक आज्जी आपल्या नातवाला म्हणाल्या, "अरे तू मागेच बस. पुढून तुला काही दिसणार नाही." यावर आमचा ड्रायव्हर कम गाईड म्हणाला, "कुठेही बसा, तसंही आपल्याला काही दिसायची शक्यता खूपच कमी आहे." चालकसाहेबांचा हा विनोद ऐकून आमचे चेहरे फोटो काढण्यासारखे झाले, पण सुदैव असे की अजूनही अंधार असल्यामुळे ते कुणाला दिसले नाहीत.
थोड्याच वेळात आम्ही निघालो. आधीच अंधार आणि वर धुके. त्यात पीएमपीएमएलचा चालक शेवटची फेरी पूर्ण करताना बस हाणतो तशी हा चालक जीप हाणत होता. काय बिशाद काय दिसेल याची? पण थोड्याच वेळात उजाडले, धुके निवळले आणि थोडेसे दिसू लागले. सुदैवाने चालकसाहेबांचे भाकीत खोटे ठरेल असे काहीही सफारीत घडले नाही. दूरवर चरणारी काही हरणे सोडली तर कुठलाच प्राणी आमच्या वाटेला गेला नाही (की वाटेला आला नाही?). हो, पक्षी मात्र खूप दिसले. नंतर वाचल्यावर कळले की हे अभयारण्य प्राण्यांपेक्षा पक्षांसाठीच जास्त प्रसिद्ध आहे ते.
खंड्या/धीवर (White breasted kingfisher)

निखार (Orange minivet)

मलबार धनेश (Malabar pied hornbill)

टोई पोपट (Plum headed parakeet)

कुणी काहीही म्हणो, पण मी म्हणेन की हे अडीच तास मस्त गेले म्हणून. मला जंगलात फिरायला आवडतं. आणि जंगलात गेल्यावर झाडे पहावीत, फुले पहावीत, पाने पहावीत, जंगलाचा तो विशिष्ट वास नाकात भरून घ्यावा, जंगल अनुभवावे. वाघ किंवा बिबट्याच दिसायला हवा असं थोडंच आहे?
अभयारण्यातून घरी परत जाताना काही विशेष घडले नाही. बेंगलुरू-पुणे या रस्त्याबाबत एक चांगली गोष्ट अशी आहे की साता-यानंतर जी वाहनांची भयानक गर्दी तुम्हाला लागते त्यामुळे पुण्यात तुमच्यापुढे काय ताट वाढून ठेवले आहे याची एक चुणूक तुम्हाला मिळते. त्यामुळे पुण्यात आल्यानंतर तिथल्या बेशिस्त वाहतुकीचा दु:खद धक्का तुम्हाला बसत नाही. असो. दु:खात सुख एवढेच की २५ डिसेंबरला सुट्टी होती; त्यामुळे पुन्हा कामाला लागण्याआधी आम्हाला एक दिवस आराम करता येणार होता.

प्रतिक्रिया

कंजूस's picture

9 Jan 2021 - 6:46 pm | कंजूस

जे आहे, अनुभवले ते सर्व लिहिल्याने पुढच्यांना फायदा होतो. यासाठी धन्यवाद.
दांडेली टाऊन ते अभयारण्य गेट अंतर किती आहे आणि स्वत:चे वाहन नसल्यास काय अडचण येईल?
युट्यूबवरचे विडिओ पाहून मी ठरवतो की कुठे जायचे का नाही ते. पहिल्या ट्रिपमध्ये गोकर्ण आणि सिरसी परिसर विडिओ पाहिल्यावर ठरवले की 'याना', सोंडे आणि सहस्रलिंग इथे नाही गेलं तरी चालेल.

माहिती आणि फोटो आवडले.

एक_वात्रट's picture

9 Jan 2021 - 7:32 pm | एक_वात्रट

आता आठवत नाही, पण दांडेली टाऊन ते अभयारण्य गेट हे अंतर १५ ते २० किमी असावे. स्वतःचे वाहन असल्यास ते फारच अडचणीचे ठरेल कारण मुख्य रस्त्यापासून अभयारण्य गेट ५ ते ६ किमी तरी आत आहे.

एक_वात्रट's picture

9 Jan 2021 - 7:47 pm | एक_वात्रट

स्वतःचे वाहन नसल्यास

चौथा कोनाडा's picture

9 Jan 2021 - 8:34 pm | चौथा कोनाडा

हा ही भाग मस्तच !
प्रचितल्या शेकरू दर्शनाने सुखावलो !

जंगलात गेल्यावर झाडे पहावीत, फुले पहावीत, पाने पहावीत,
जंगलाचा तो विशिष्ट वास नाकात भरून घ्यावा, जंगल अनुभवावे.
वाघ किंवा बिबट्याच दिसायला हवा असं थोडंच आहे?

हे मात्र अगदी सही !

मुक्त विहारि's picture

15 Jan 2021 - 9:00 pm | मुक्त विहारि

सहमत आहे

चौकटराजा's picture

9 Jan 2021 - 8:51 pm | चौकटराजा

फोटो मस्त आलेत सर्वच !!

शेकरु इगतपुरी ते भीमाशंकर, महाबळेश्वर, आंबोलीपर्यंत सह्याद्री माथ्यावर (भीमाशंकरी खारही म्हणतात) सापडते. माथेरानसारख्या सुट्ट्या डोंगरावरही आहेत. पिवळसर,सोनेरी,केस असतात.
काळी,पिवळी,पांढरी खार मलबारी असते ती गोव्यापासून खाली दक्षिणेकडे दिसू लागते. ती आहे ही.

मुक्त विहारि's picture

15 Jan 2021 - 9:01 pm | मुक्त विहारि

छान लिहिले आहे...