नमस्कार मंडळी
मिपावर पहिल्यांदाच माझे प्रवासाचे अनुभव लिहित आहे. सांभाळुन घ्यावे.
गेल्या 7-8 वर्षात उत्तर भारतात खुप वेळा फ़िरणे झाले. पण जिथुन या प्रवासांची सुरुवात झाली तो सर्वात पहिला अनुभव इथे लिहीत आहे.
2010 साली आमच्या शेजारचे वैष्णोदेवी यात्रेसाठी चालले होते तेव्हा माझ्या मनातही आले कि आपणही जावे पण त्यावर्षी काही कारणांमुळे नाही जाता आले.
घरातील देवीसमोर नेहमी हात जोडुन प्रार्थना करायचे की माता राणी आम्हाला ही बोलव तुझ्या दर्शनाला.
शेवटी 2012 साली हा योग जुळुन आला. जानेवारी 2012 मधे आमच्या बाबांच्या ओळ्खीचे एक काका आमच्या घरी आले होते तेव्हा बोलता बोलता त्यांनी विचारले की अमरनाथ यात्रेला येणार का? हे काका दरवर्षी अमरनाथ यात्रेला जातात आणी ह्या वेळेला ते 7 व्यांदा जात होते. ह्या वर्षी ते अमरनाथ-वैष्णोदेवी-अम्रुतसर जाणार होते. घरी आम्ही सर्वांनी विचार करुन मग मी , माझी बहीण आणि आई अस आमच 3 जणांच जाण ठरल.
22 जुन ते 31 जुन अशी 10 दिवसांची सहल होती.
तयारी व प्रस्थान
अमरनाथ भारतातील जम्मू आणि काश्मीर राज्यातील पवित्र तीर्थस्थळ असून येथे नैसर्गिक गुहा आहे. ही गुहा जम्मू-काश्मीर राज्यामध्ये असून श्रीनगर पासून साधारणपणे १३५ किमी वर समुद्रसपाटी पासून १३६०० फूट उंचीवर आहे. येथील गुहेमध्ये बर्फाचे शिवलिंग तयार होते. ते पहायला दरवर्षी उन्हाळ्यात हजारो- लाखो भाविक येथे भेट देतात. हे शिवलिंग साधारणपणे ८ ते १० फूट उंचीचे असते परंतु लिंगाचा आकार हवामानाप्रमाणे कमी जास्त होत असतो. असेही मानले जाते की शिवलिंगाचा आकार चंद्राच्या कलेप्रमाणे कमी जास्त होत असतो. गुहे मध्ये अजून काही लहान हिमखंड आहेत त्यांना गणेश -पार्वतीचे रुप समजले जाते. मुख्य लिंगाच्या वर नैसर्गिक पाण्याची घळ आहे, त्या घळीमधून पाणी टपकत असते व त्यामुळे हे शिवलिंग तयार होते. (माहिती जालावरुन साभार)
गुहेकडे जाण्यासाठी मुख्यत्वे दोन रस्ते आहेत. पहिला मार्ग सोनमर्ग - बालताल- अमरनाथ च्या बाजूने आहे. हा रस्ता फक्त १३ किमी चा असून बहुंताशी भाविक याच मार्गाने येणे पसंत करतात.
दुसरा मार्ग पहेलगाम - चंदनवाडी- पिस्सुटॉप- शेषनाग-पंचतरणी- अमरनाथ असा आहे. हा मार्ग ४५-५० किमीचा असून जास्त खडतर आहे.
अमरनाथ यात्रेला जाण्यासाठी आपल्याला आधी जम्मु काश्मीर बॆक मधुन फॊर्म आणुन आपली नोंद्णी करावी लागते व त्यासोबत डॊक्टरांचा आपण या यात्रेसाठी फिट असल्याचा दाखला ही जोडावा लागतो. आम्ही हे सर्व देउन आलो व आम्हाला दर्शन करण्यासाठी 25 जुनची तारीख त्यांनी दिली. 25 जुन सोमवार असल्यामुळे आम्ही ही खुश झालो.
नोंद्णी झाल्यावर मग त्या काकांनीच रेल्वे बुकिंग, राह्ण्याची सोय या सर्वांची व्यवस्था केली.
आम्ही बालताल (13 कि.मी) मार्गे जाणार होतो. एवढा लांबीचा ट्रेक आम्ही कधी केला नव्ह्ता. त्या काकांनी आम्हाला सांगितल तुम्ही रोज थोडे शुज घालुन चालण्याचा सराव करा. त्याप्रमाणे आम्ही जुहु चौपाटी वर रोज सकाळी चालण्याचा सराव करण्यासाठी जाउ लागलो. हळुहळु दिवस सरत होते व सोबत आमची तयारी ही सुरु होती.
जम्मु काश्मीर मधे थंडी खुप असल्याने आम्हाला थर्मल घ्यावे लागले. शुज आम्ही बालताल ला जाउन घेतले तिथे स्वस्त आणि मस्त मिळ्तील अस आम्हाला काकांनी सांगितल होत आणि ते खरेच ठरले ते शुज माझ्याजवळ अजुन हि आहेत. लहान-मोठ्या अशा सर्व सामानाची खरेदी करुन आम्ही एकदाच्या बॆगा भरुन ठेवल्या.
शेवटी 21 जुन उजाड्ला. उद्या निघायचे होते. रेल्वे प्रवासात खाण्यासाठी आई सर्व पदार्थांची तयारी करत होती. नंतर आम्ही आमच्या घराजवळ असलेल्या शिवमंदीरात गेलो व तिथे शिवशंभोला आमचा प्रवास सुखकर होवो अशी प्रार्थना केली.
22 जुनला सकाळी 7.55 ची आमची स्वराज एक्स्प्रेस ही गाडी होती. आम्ही 7.15 पर्यंत वांद्रे टर्मीनसला पोहोचलो. काकांनी आमची सर्व इतर प्रवाशांसी ओळख करुन दिली. आम्ही एकुण 22 जण होतो या यात्रेसाठी.
गाडीची वेळ झाली आणी आम्ही आमच्या जागेवर जाउन बसलो. गाडीमधे 70% प्रवासी तरी अमरनाथ ला जाणारेच होते.
बम बम भोले च्या गजरात गाडीने वांद्रे टर्मीनस वरुन प्रस्थान केले.
क्रमश:
प्रतिक्रिया
24 Sep 2020 - 8:10 pm | प्रसाद_१९८२
छान लिहिलेय. पुढील भाग टाका लवकर.
त्याबरोबर फोटे असतील तर ते ही टाका.
25 Sep 2020 - 5:57 pm | नयना माबदी
फोटो कसे टाकावे समजत नाहीये. मदत हवी. गुगल ड्राइव मधे आहेत फोटोज.
26 Sep 2020 - 11:04 am | शाम भागवत
मदत येथे तयार आहे.
कंकाकांचा विजय असो.
24 Sep 2020 - 8:23 pm | दुर्गविहारी
छान सुरवात ! पुढील भागाची उत्सुकता लागली आहे. भरपूर फोटो मात्र टाका. :-)
24 Sep 2020 - 8:45 pm | चौथा कोनाडा
छान लिहिलंय ! उत्सुकता निर्माण झालीय.
वाट पहात आहे पुढील भागाची.
24 Sep 2020 - 9:53 pm | कंजूस
विडियो पाहिलेत अमरनाथ यात्रेचे, आता तुमच्या बरोबर जाऊन येऊ. चांगले वाईट दोन्ही अनुभव लिहा.
(( विडिओ - https://youtu.be/8NJQ8aSzEvA ))
25 Sep 2020 - 10:35 am | नयना माबदी
हो नक्की.
25 Sep 2020 - 10:40 am | श्वेता२४
फोटो जरुर टाका. पु.भा.प्र.
25 Sep 2020 - 2:39 pm | नयना माबदी
खुप छान माहिति .......आगे बढो....