अलिबाग राईड..

अन्या बुद्धे's picture
अन्या बुद्धे in भटकंती
12 Sep 2020 - 2:16 pm

घर ते अलिबाग

मार्च 13 ला शेवटली शतकी राईड झालेली. नंतर करोनाने छळ मांडलेला. हपिस बंद असल्याने सक्तीची विश्रांती. पण तरी कुठेही जाता येत नव्हतं. पावसात एकतरी मोठी राईड करायची होती पण रहाणार कुठे आणि खायचं काय? या प्रश्नाने हरवलं होतं. कारण हॉटेल सेफ नव्हती राहिली. छोट्या 40-50 km च्या राईड्सवरच समाधान मानत होतो. सहज मोगलीला कॉल केला की तो इकडे यायचा होता त्याचं काय झालं? तर तो म्हणाला अलिबागला जायचा विचार सुरुए. तिथे काही झाडं लावायचीत. एखाद्या चित्यासारखी या ऑफरवर झडप घातली. रहायचा प्रश्न सुटला. खाणं सोबत घेतलं की तो प्रश्न मिटला. लॉकडाऊनला कंटाळलेला बंड्या तिसरा भिडू आला. आणि तारखा मागेपुढे करत 7 ते 9 हे दिवस ठरले. ते दोघे कार आणि मी सायकल.

मी सकाळी 6 ला आणि ते दुपारी इथून जेऊन निघतील म्हणजे साधारण एकावेळी मुक्कामी पोचू असं ठरलेलं. आदल्या रात्रीच सगळी तयारी झाली करून. तयारी कसली म्हणा. 2 कपडे अंगावर दोन धोपटीत. तीही आता कारमधेच. माझ्यासोबत 8 बटर चीज लावलेले ब्रेड स्लाइस आणि 4 उकडलेली अंडी. सकाळी साडेपाचला पहिल्या गजरात उठलो. बाहेर जोरदार गडगडाटी पाऊस. घरातून निघून लगेच पावसात जायला बरं वाटेना. त्यात 'एवढ्या पावसात नाही जायचं' अशी सौची भुणभुण सुरू झालीच. पाऊस थांबू दे अशा माझ्या प्रार्थनेला साडेसहा ला यश आलं. लगेच आवरून सव्वासातला घर सोडलं.
1
नुकताच पाऊस कोसळून गेल्याने स्वच्छ आकाश, हवेत गारवा अशी सुंदर सुरवात झाली. अपेक्षेप्रमाणे भिवपुरीला एकच halt करून साडेनऊ ला चौक गाठलं. या प्रत्येक थांब्यावर पार्लेचा 5 चा पुडा ग्लासभर पाण्यात बुडवून खात होतो. आत्तापर्यंत प्रवास मस्त झाला. 32 (कर्जत) 9 (चौक) असं 42 km पार झाले. अडीच तासात हे अंतर उत्तम होतं. सकाळची वेळ, फ्रेशनेस, आणि कमी ऊन, तुलनेने सरळ रस्ता म्हणून हे जमलंय पण पेणचे चढ आणि नंतर कार्ले खिंड जीव खाणार याची कल्पना होतीच. म्हणून फार वेळ न काढता दांड फाटा मार्गे रसायनीकडे मोर्चा वळवला.

2 दिवसामागे सीट नवी बसवलेली पण नंतर बऱ्यापैकी राईड नव्हती झाली. बाईक फिट नसल्याची चूक जाणवायला लागली होती. रसायनीत एका गॅरेजवाल्याकडून अॅलन की घेऊन सीट थोडी मागे सरकवून घेतली आणि हँडल बार टर्न केला. लगेच कम्फर्टमध्ये फरक पडला. खांद्यावरचा गुडघ्यावरचा ताण गेलाच. हे वेळेत करता आलं हे बरं नाहीतर पेणच्या चढांनी जीव काढला असता.

इथून कोकण जाणवायला सुरवात झाली. दुतर्फा मस्त झाडी, मधल्या मोकळ्या जागांमध्ये दुधावर येऊ लागलेली भातशेती, वळणदार रस्ते. आपटा स्टेशन नंतर उजवीकडे डोंगर आणि डाव्या हाताला सतत नदीची सोबत. पाण्यात उतरायचा मोह कष्टाने आवरत होतो. साडेदहा झाले. गावातले हिरवी सावली धरणारे रस्ते संपले. आता धरमतर ओलांडून जाईपर्यंत सगळं भगभगीत असणार होतं. थंडगार पाणी घेऊन त्यात जवळचं लिंबू मीठ साखर वापरून मीच सरबत करून घेतलं. आजकाल यासाठी हॉटेलवाल्यावर अवलंबून न रहायला शिकलोय. ही सरबत नाकारून कोकाकोला लिम्का पिणारी जमात कधी कशी वाढली कोण जाणे. हॉटेलमध्ये लिंबूसरबत मिळेना झालंय आजकाल. असो.
2 3
फार त्रास न देता चढ पार होत गेले आणि जसजसं पेण जवळ येऊ लागलं तसतशी रस्त्याची अवस्था वाईट होत चालली. 20 पुढे असलेला सरासरी वेग घसरून 16वर उतरला. धूळ आणि वर तळपणारं ऊन यांनी छळ केला तो वेगळाच. थांबुया म्हणणाऱ्या मनाकडे साफ दुर्लक्ष करत धर हँडल मार पेडल सुरू ठेवलं. अचानक एका exit वरून खालचा रस्ता पुलापेक्षा बरा असेल या अपेक्षेने उतरलो आणि तिथे राईट होता. सहज विचारलं अलिबाग? तर तोच रस्ता समजलं. म्हणजे हा exit आता वडखळ टाळून सरळ अलिबाग रस्त्यावरच उतरला! हे बेस्टच. वडखळची गर्दी, ट्राफिक सगळं बायपास. मास्क बांधायची गरजही नाही. वा! याच आनंदात खाडी पार केली आणि खराब रस्त्याचं नष्टचर्य संपलं.

आता साडेबारा होऊन गेले होते आणि भूक चांगलीच कडाडलेली. एक गार पाण्याची बाटली घेतली आणि बंद दुकानाच्या पायरीवर सावलीत बसून सोबतच जेवण संपवलं. पण तिकडे झोप काढता येईल इतकी जागा नव्हती. आणि ऐन वाहत्या रस्त्याशेजारी झोपून गेलो तर सायकल कोण बघेल? थोडी आडबाजूची निवांत जागा बघितली पाहिजे. पेण ने वेगाची वाट लावलीच होती. हळूहळू तशी जागा शोधत निघालो. तशी उत्तम जागा पोयनाडमध्ये सापडली. तिथे 4चा गजर लावून एक हात सायकलच्या स्पोक्समधून टाकून तत्काळ गुडूप झालो. प्रत्येक टप्प्यावर सायकल गृपात, घरी, मित्र वगैरेशी बोलणं रिपोर्टिंग सुरू होतंच. साडेतीनला मोगलीच्या कॉलने जाग आली. रसायनी रस्ता सोडून ते पेणकडे निघाले होते. त्यांना exit सांगितली. अलमोस्ट तासभर झोप झालीच होती. हे आता पोचतीलच लगेच. एकत्र अलिबागमध्ये यायचं आणि त्यांना फार रखडवायच नाही तर त्यांनी मला गाठण्यापूर्वी कार्ले खिंड पार व्हायला हवी होती. आळस झटकून थोडं स्ट्रेचिंग करत निघालोच.

पोयनाड नंतर 3km सततच्या चढानंतर 5 km चा घाट. गुमान 1-3वर गियर ठेवले आणि निघालो. भर्गच्च जंगल. आणि रस्ता सुंदर. बिलकुल त्रास न होता खिंड पार झाली. तिथे डोंगरातून खडकाळ कड्यातून पाणी वहात होतं. कावळ्यासारखी डोक्यावर अंघोळ केली. ते सुंदर थंड चवदार पाणी सोबत भरून घेतलं. मोगली बंड्या वडखळ ओलांडून आले होते. त्यांना कळवलं.. मध्ये भेटलो नाही तर थेट समुद्रावर भेटू. चेहऱ्यावर गार हवा घेत, तरंगत पलीकडे उतरलो आणि थांबलो तो थेट समुद्रावरच. मागोमाग 5 मिनिटात हे दोघे आलेच.
4
5

सकाळी सव्वासात ते संध्याकाळी पावणेपाच या वेळात (रायडिंग टाइम पावणेसहा तास) 105 km ची राईड पूर्ण झाली होती. उद्या सकाळी झाडं लावली की आराम करणे, गप्पा, मासे खेकडे यावर ताव मारणे, गप्पा, समुद्रावर वगैरे भटकणे, गप्पा याशिवाय काहीच काम नव्हते. परतीचा प्रवास परवा.

-अनुप
07.09.2020

अलिबाग ते घरी परतीचा प्रवास..

काल दिवसभर रट्टाऊन मासे हादडणे, झोपा काढणे, गप्पा मारणे या पलीकडे काहीच केलं नव्हतं. नाही म्हणायला संध्याकाळी नागावपलीकडेपर्यंत सायकलवर जाऊन आलो. अलिबाग आसपास आलो आणि फफे पेढे न आणले तर मला घरात घेतलं नसतं. मी सायकलने पुढे आलो आणि कार थोड्या वेळानंतर निघाली. नागाव नंतर डाव्या हाताला एक मस्त तळं आणि किनाऱ्यावर सुंदर शंकर मंदिर. हे म्हणजे माझा वीक पॉईंट. सोबत कार असल्याचा फायदा घेत मी तिथेच तळ्याकाठी थांबलो आणि पेढे मोहिमेवर मित्रांना पाठवलं. नंतर ते परत आल्यावर नागाव बीचवर मनसोक्त सायकल चालवली. तो आनंद काही वेगळाच.
1
या सर्व मजेचा कळसाध्याय म्हणजे रात्री ओरपलेला खेकडा! त्याला आमचा दुवा लागला असणार आणि मोक्ष मिळाला असणार याबद्दल मला बिलकुल शंका नाही. आता परतीचा प्रवास म्हणून रात्री फार न जागता विकेट फेकली.
2
सकाळी सगळं आटपून बाहेर पडायला पावणेसात झाले. ते दोघे साडेआठ आसपास अलिबाग सोडणार होते. त्यांनी मला गाठेपर्यंत रसायनी फाटा क्रॉस झालेला असावा अशी माझी इच्छा होती. टार्गेट साडेदहा. त्यामुळे फार न रेंगाळता झपझप वेग घेतला. अगदीच टाळता येऊ नयेत असे 2 स्नॅप वगळता कुठे न थांबता कार्ले खिंड पार करून पहिला पाणी थांबा घेतला. साडेसात. आता छळ वडखळ नंतरचे पुढले 8 km असणार. त्यासाठी मनाची तयारी करत निघालो. येताना आराम केलेला ती जागा पार झाली. जेवणाची जागा मागे पडली आणि समोर नजरेला चरे देत उभी असलेली JSW दिसली खाडीपुलाच्या उजव्या हाताला. तिथे न थांबायला कारणच झालं. ते दृश्य झटक्यात नजरेआड व्हावं म्हणून पेडल हाणत राहिलो. पेण च्या दिशेने जात असताना मित्रांशी बोलून घेतलं. त्यांनी खिंड पार केली होती. म्हणजे ते मला न बघता ओलांडून जाण्याची शक्यता उरली नव्हती. कारण घाण रस्ता टाळायला मी अनेकदा पुलाखालून जात होतो. पेण मागे पडलं आणि आमची चुकामुक होणार नाही हे नक्की झालं.

ठरवल्याप्रमाणे रसायनी फाट्यावर 9:40 ला पोचलो. फ्रेश असल्याने आणि ऊन नसल्याने वेग छान मिळाला होता. आता प्रवास परत हिरवाईतून असणार होता. सो खुश होतो. गुळसुंदला एकेठिकाणी आम्ही तिघे थांबलो. चहा पाणी करून मला अच्छा करून ते निघून गेले. 52 km अंतर बाकी होतं आणि साडेदहा होऊन गेलेले. इथून 12 km चौक आणि बाकी 40 km. हायवे सहज गाठला पण आता ऊन तळपायाला लागलं होतं. सकाळपासून खाणं शून्य आणि दीड लीटर आसपास पाणी एवढंच. चौक पार करून न थांबता तसाच निघालो. अजून भूक नव्हती पण थकायला होत होतं. आणि नशिबाने एक टपरी दिसली जिथे शहाळी होती. That saved the day! त्या शहाळ्याने नेरळ पर्यंत जायची एनर्जी पुरवली.
2

आता जेवलो तर तासभर आराम करावा लागणार. बाकी अंतर 20 km. तेवढ्यासाठी जेवण आराम यात 2 तास घालवायचे? नेरळ पलीकडे डाव्या हाताला एक छोटं मंदिर आहे. म्हटलं तिथे अर्धातास आराम करू मग ठरवू. न खाता जर घरी पोचलो तर उपाशी सेंच्युरी होऊन जाईल. अशक्यच झालं तर कुठेही झाडाखाली बसून जेवता येईलच. मंदिरात छान सावली. मागल्या बाजूने येणाऱ्या गार झुळका, भगभगीत ऊन असलं बाहेर तरी सर्वत्र हरवया रंगांच्या अनंत छटा, मागे पेबचा किल्ला, आसपास झाडावर पक्षांचे मंजुळ आवाज.. सुख! अर्धातास आराम करून बऱ्यापैकी फ्रेश वाटू लागलं. सव्वा दोनला मंदिर सोडून निघालो. नॉर्मली इथून 3 वाजता घरी पोचायला हवा होतो. पण मला पावणेचार वाजले घरी पोचायला. घराच्या 2 km अलीकडे अर्धालीटर पाणी प्यायला आणि परत 10 मिनिट पाठ टेकायला थांबावं लागलं. पण शेवटी घरी पोचलोच. पहिली उपाशी सेंच्युरी! थकलेलो पण मनाने एकदम खुश! भारी सेन्स ऑफ आचिवमेंट!

गेले काही महिने रोज फक्त अर्धातास साधा व्यायाम घरीच करतोय. त्याचा प्रचंड फायदा दिसला. या आधीही सेंच्युरी केल्यात. रायडिंग टाइम साडेसहा तास आणि टोटल टाइम 12 तास आसपास लागायचे. पण यंदा पावणे सहा तास रायडिंग आणि टोटल 9 तासात सेंच्युरी पूर्ण झाली. थँक्स टू डॉक श्रीहास आणि 'सासा' ग्रुप.

तरुण असताना लांब पल्ल्याचं सायकलिंग केलेलं आहे पण ते कधीच एन्जॉय करू शकलो नव्हतो. कुणी सोबत नाही, कुणाशी बोलायचं नाही, जाम बोरिंग वाटायचं. तसं वाटण्याची ही जी कारणं होती त्याच कारणासाठी आता सायकलिंग मला बेहद्द आवडतंय. गम्मतच आहे! किती बदलतो आपण! एकटेपणातली मजा आता घेता येऊ लागलीय. शांतता मोहात पाडायला लागलीय. आपण एकटे आहोत पण तुटलेले नाहीत कुणापासून.. ही भावना फार भारी. आपल्या माणसांशी संपर्क करताना खूप छान वाटतं. कारच्या प्रवासात खिडकीतून बाहेर बघत राहणं म्हणजे tv बघितल्यागत. सायकलवर तसं नाही. निसर्ग आपल्याला थेट भिडतो. वेग अति नाही. सोबत काहीकाळ पक्षी वा फुलपाखरू उडत जातं तो सहवास एन्जॉय होतो. गवतात सरडा जीभ लांब करून चतुर मटकावतो ते स्वच्छ दिसतं! आपण अगदी मुक्त मुक्त स्वतंत्र असतो. इतके की झाडं, पाऊस, पक्षी, मित्र, सगळ्यांशी जोडलेले असतो. (हे वाचताना विचित्र वाटेल पण ही खरी आणि अनुभवायची गोष्ट आहे.) मन स्वच्छ मोकळं हलकं होतं. मेंदूचं सर्विसिंग केल्यागत.

चला, आता या मिळालेल्या ताजेपणावर पुढले काही महिने शहरी आयुष्य जगता येईल. मग परत वेध लागतील पुढल्या लांबच्या प्रवासाचे..

-अनुप
09.09.2020

प्रतिक्रिया

महासंग्राम's picture

12 Sep 2020 - 3:06 pm | महासंग्राम

भारी लिवलंय, तो समुद्राचा फोटो मस्त आलाय

इजा डॉ.श्रीहास यांचा औरंगाबाद-पुणे धागा
बिजा : तुमच्या राईडच वर्णन
आता देशपांडे मामांचा BRM चा धागा वाचून हॅट्ट्रिक पूर्ण करतो

पुले आणि पुरासाशु

आळशी
महासंग्राम

अन्या बुद्धे's picture

12 Sep 2020 - 7:58 pm | अन्या बुद्धे

धन्यवाद! डॉक आणि मामा यांच्यासोबत माझं नाव आल्याचा आनंद आहे. ते महारथी आहेत.. मी तसा हौशी गडी..

डॉ श्रीहास's picture

13 Sep 2020 - 8:24 am | डॉ श्रीहास

काय तरलतेनी लिहीता राव, असं लिहीणं आणि सायकलींग दोन्ही जमायला हवं. लेखात तुमच्यासोबत सफर घडत असते.असेच राहा , अजिबात बदलू नका. _/\_

अन्या बुद्धे's picture

13 Sep 2020 - 2:14 pm | अन्या बुद्धे

_/\_:)

कंजूस's picture

12 Sep 2020 - 3:20 pm | कंजूस

आवडलं.
सायकल सांभाळणे ( चोरीला जाऊ नये म्हणून) हे दिव्यच आहे.

अलिबाग ते मुरुड या वाटेने कित्येक घरांना पुढे ओसरी आहे. कोकणी घराचे वैशिष्ट्य असलेली लाकडाची जाळी आणि आत मोकळी जागा झोपाळ्यासह. ती जागा आसरा म्हणून सायकलवाल्यांना दिल्यास स्वस्तात मस्त काम होईल. शिवाय घराच्या मागे वळसा घालून गेल्यास टॉइलेटकडे जाता येते. विहिरीचे पाणी.

मुंबई कडच्या सायकलवाल्यांनी गेटवे ते रेवस/मांडवा जायचे.तिथून सफर करून परत यायचे.

अन्या बुद्धे's picture

12 Sep 2020 - 7:59 pm | अन्या बुद्धे

कल्पना खरोखर चांगली आहे..

संजय क्षीरसागर's picture

12 Sep 2020 - 3:33 pm | संजय क्षीरसागर

सकाळी सव्वासात ते संध्याकाळी पावणेपाच या वेळात (रायडिंग टाइम पावणेसहा तास) 105 km ची राईड पूर्ण झाली होती.

भारी !

अन्या बुद्धे's picture

12 Sep 2020 - 8:00 pm | अन्या बुद्धे

धन्यवाद! :)

सुंदर राइड! सुंदर वर्णन!!

अन्या बुद्धे's picture

13 Sep 2020 - 8:19 am | अन्या बुद्धे

धन्यवाद!

लंबूटांग's picture

13 Sep 2020 - 4:09 am | लंबूटांग

मी सुद्धा हल्लीच परत बाइक रायडिंग सुरू केले आहे. गेल्या विकांतास ३५ किमी आणि १७०० फूट elevation gain अशी राईड झाली. कच्च्या रस्त्यावर बाईक चढवताना चांगलीच दमछाक झाली. आज सकाळी ४२ किमी आणि १२०० फूट elevation gain अशी राईड झाली.

अमेरिकेत बर्‍याच ठिकाणी जुन्या रेल्वे ट्रॅक्सना walking/ biking trail मधे बदलले आहे. आज तशाच एका trail वर चालवल्याने चढ फारसे अंगावर येणारे नव्हते. त्यामुळे तुलनेने कमी दमणूक झाली. हे काही गेल्या वेळेसचे फोटू https://imgur.com/a/BCvcoA1

तुम्ही Strava नावाचे अ‍ॅप वापरता का? त्यावर ग्रुप्स तयार करता येतात. आमच्या ऑफिसमधल्यांचा ग्रुप आहे. इतरांच्या राइड्स बघून motivation मिळते आहे सध्या.

अन्या बुद्धे's picture

13 Sep 2020 - 8:22 am | अन्या बुद्धे

हौ.. स्ट्रवा वापरतोय मी..

कंजूस's picture

13 Sep 2020 - 11:04 am | कंजूस

स्ट्रवा मध्ये walking नाही.
Endomondo वापरतो. त्यातही कनेक्ट टु फ्रेंडस आहे.

रातराणी's picture

13 Sep 2020 - 5:06 am | रातराणी

तरुण असताना लांब पल्ल्याचं सायकलिंग केलेलं आहे पण ते कधीच एन्जॉय करू शकलो नव्हतो. कुणी सोबत नाही, कुणाशी बोलायचं नाही, जाम बोरिंग वाटायचं. तसं वाटण्याची ही जी कारणं होती त्याच कारणासाठी आता सायकलिंग मला बेहद्द आवडतंय. गम्मतच आहे! किती बदलतो आपण! एकटेपणातली मजा आता घेता येऊ लागलीय. शांतता मोहात पाडायला लागलीय. आपण एकटे आहोत पण तुटलेले नाहीत कुणापासून.. ही भावना फार भारी.

मस्त लिहिलंय! आवडलं! आपण पण अस एखाद वेड लावून घ्याव अस वाटतंय आता.

अन्या बुद्धे's picture

13 Sep 2020 - 8:23 am | अन्या बुद्धे

जरूर.. व्हा सुरू..

बेकार तरुण's picture

13 Sep 2020 - 3:42 pm | बेकार तरुण

लेख आवडला...

अन्या बुद्धे's picture

13 Sep 2020 - 11:12 pm | अन्या बुद्धे

धन्यवाद!

जगप्रवासी's picture

15 Sep 2020 - 2:33 pm | जगप्रवासी

लेख आवडला. वाचत असताना स्वतः राईड करत असल्याची फिलिंग येत होती.

माझ्यादेखील मनात आहे की भाऊच्या धक्क्यावरून बोटीने रेवसला जाऊन अलिबाग सायकलवर हिंडायचं.

अन्या बुद्धे's picture

15 Sep 2020 - 3:25 pm | अन्या बुद्धे

रेवस ते मुख्य रस्ता येईतो 4एक km रस्ता बकवास आहे पण नंतर नो प्रॉब्ज. थेट मुरुड पर्यंत भटकता येईल मस्त..

अर्धवटराव's picture

16 Sep 2020 - 8:30 am | अर्धवटराव

गवतात सरडा जीभ लांब करून चतुर मटकावतो ते स्वच्छ दिसतं! आपण अगदी मुक्त मुक्त स्वतंत्र असतो. इतके की झाडं, पाऊस, पक्षी, मित्र, सगळ्यांशी जोडलेले असतो. (हे वाचताना विचित्र वाटेल पण ही खरी आणि अनुभवायची गोष्ट आहे.) मन स्वच्छ मोकळं हलकं होतं. मेंदूचं सर्विसिंग केल्यागत.

हे तर एकदम भारी

अन्या बुद्धे's picture

16 Sep 2020 - 6:10 pm | अन्या बुद्धे

हौ! अनुभवायचीच गोष्ट..

निनाद's picture

16 Sep 2020 - 9:22 am | निनाद

खुप छान मस्त भटकंती केली. फोटो पण आवडले. तुमच्या बरोबर आम्ही ही फिरून आलो.

तरुण असताना लांब पल्ल्याचं सायकलिंग केलेलं आहे पण ते कधीच एन्जॉय करू शकलो नव्हतो. कुणी सोबत नाही, कुणाशी बोलायचं नाही, जाम बोरिंग वाटायचं. तसं वाटण्याची ही जी कारणं होती त्याच कारणासाठी आता सायकलिंग मला बेहद्द आवडतंय. गम्मतच आहे! किती बदलतो आपण! एकटेपणातली मजा आता घेता येऊ लागलीय. शांतता मोहात पाडायला लागलीय. आपण एकटे आहोत पण तुटलेले नाहीत कुणापासून.. ही भावना फार भारी. आपल्या माणसांशी संपर्क करताना खूप छान वाटतं. कारच्या प्रवासात खिडकीतून बाहेर बघत राहणं म्हणजे tv बघितल्यागत. सायकलवर तसं नाही. निसर्ग आपल्याला थेट भिडतो. वेग अति नाही. सोबत काहीकाळ पक्षी वा फुलपाखरू उडत जातं तो सहवास एन्जॉय होतो. गवतात सरडा जीभ लांब करून चतुर मटकावतो ते स्वच्छ दिसतं! आपण अगदी मुक्त मुक्त स्वतंत्र असतो. इतके की झाडं, पाऊस, पक्षी, मित्र, सगळ्यांशी जोडलेले असतो. (हे वाचताना विचित्र वाटेल पण ही खरी आणि अनुभवायची गोष्ट आहे.) मन स्वच्छ मोकळं हलकं होतं. मेंदूचं सर्विसिंग केल्यागत.

या सगळ्या वाक्यांसाठी अगदी मनातले बोलताय असे वाटले.

अन्या बुद्धे's picture

16 Sep 2020 - 6:11 pm | अन्या बुद्धे

धन्यवाद! :)

Gk's picture

16 Sep 2020 - 1:40 pm | Gk

छान

अन्या बुद्धे's picture

16 Sep 2020 - 6:12 pm | अन्या बुद्धे

थांकू! :)

दुर्गविहारी's picture

16 Sep 2020 - 6:15 pm | दुर्गविहारी

खुपच छान !

अन्या बुद्धे's picture

17 Sep 2020 - 11:16 am | अन्या बुद्धे

धन्यवाद!

मालविका's picture

23 Sep 2020 - 1:07 pm | मालविका

एकदम भारी . मस्त वाटलं वाचून .