पन्हाळ्याचा वेढा आणि पावनखिंडीचा रणसंग्राम- अभ्यासकाच्या नजरेतून

दुर्गविहारी's picture
दुर्गविहारी in काथ्याकूट
31 Jul 2020 - 1:53 pm
गाभा: 

छत्रपती शिवाजी ! अखिल मराठी मनाचा अभिमानाचा विषय, महाराष्ट्राचा मानबिंदू आणि भारतवर्षाचे प्रेरणास्थान ! महाराजांचे चरित्र वाचायचे म्हणजे वेगळी मॅनेजमेंटची पुस्तक वाचायची गरज नाही, प्रेरणादायी पुस्तकांचे सार, अभियंत्यासाठी संशोधनाचा विषय आणि लष्करीदृष्ट्या थक्क करणारे साधन. या एकाच चरित्राचा अभ्यास करायचा म्हणजे विविध अंगाने त्याच्याकडे बघावे लागते.विशेष म्हणजे आपण जस जसे शिवचरित्राचे पारायण करावे तसे दरवेळी काहीतरी नवीन सापडते. सर्वसामान्य वाचकांना अभ्यासु नजरेने शिवचरित्रकडे बघणे शक्य होतेच असे नाही.पण बहुसंख्य लोकांना आकर्षण असते, ते महाराजांच्या आयुष्यातील थरारक घटनांचे. अफझलखानाचा वध असो, कि पन्हाळ्याचा वेढा, त्यातून सुटका आणि अंगावर रोमांच उभे करणारा पावनखिंडीचा संग्राम, लालमहालात मोजक्या लोकानिशी घुसून शास्ताखाना धडा शिकवणारा जगातील पहिला सर्जिकल स्ट्राईक असो किंवा आग्राहून मृत्युच्या दाढेतून सुटका, राज्याभिषेकाचा सर्वोच्च, सोन्याच्या शाईने लिहावा असा क्षण किंवा दुरदृष्टीचा दक्षीण दिग्विजय. ह्या सर्व घटनांचा अभ्यास करायचा तर उभे आयुष्य कमी पडावे.
यातील पन्हाळ्याचा वेढा आणि पावनखिंडीचा, स्वामीनिष्ठेची कमाल दाखवणार्‍या प्रसंगाचा आढावा आजच्या लेखात घेणार आहोत.
एकेक प्रसंगाचा विचार करुन या संपुर्ण घटनाक्रमाचा आढावा घेउया.
१) अस्सल साधनातील संदर्भः-
कोणत्याही एतिहासिक घटनेचा अभ्यास करायचा तर अस्सल साधनांचा संदर्भ घ्यावा लागतो. शिवचरित्र अभ्यासायचे तर कविंद्र परमानंद लिखीत शिवभारत, जेधे करिना, जेधे शकावली यांचा अभ्यास करावा लागतो. परमानंद तर शहाजी राजांच्या सेवेत होते, शिवाय शिवाजी राजांच्या सानिध्यात होते, त्यामुळे त्यांनी दिलेले संदर्भ फार मह्त्वाचे आणि बरेचसे अधिकृत म्हणता येतील. याशिवाय बखरी हे आणखी एक साधन संदर्भग्रंथ म्हणून वापरले जाते. मात्र बखरी लिहीणारे लेखक समकालीन असतील असे नसते, शिवाय त्यांना मिळालेले अस्सल पुरावे यांचा मेळ घालणे, ते योग्य प्रकारे शब्दबध्द करणे हा मुद्दा महत्वाचा ठरतो. शिवाय बर्‍याचदा बखरी लिहीणे हे द्रव्य मिळवणे या हेतूने केले असल्याने ज्याने बखर लिहायला सांगितली आहे, त्याला खुष करण्यासाठी चुकीचा मजकूर घातला जाणे शक्य असते. त्यामुळे बखर हे दुय्यम साधन मानले जाते.
शिवाजी महाराजांच्या कारकीर्दीचा आढावा सभासदाची बखर, ९१ कलमी बखर, चित्रगुप्ताची बखर, चिटणीसाची बखर, शिवापुर देशपांडे बखर ईत्यादी बखरीत घेतला आहे.याशिवाय आदिलशाही पत्रव्यवहार बघावा लागतो. मुख्य या घडामोडीत ईंग्रजांसारख्या परकिय शासकांचाही संबंध आलेला दिसतो.त्यामुळे ग्रँट डफ याने लिहीलेला हा "History of Maratha " ग्रंथ आणि राजापुरच्या ईंग्रज वखारीचा पत्रव्यवहार तपासावा लागला.
बखरीचा विचार केला तर त्यातला त्यात "सभासदाची बखर" विश्वसनीय आहे.कारण या बखरीचा लेखक कृष्णाजी अनंत सभासद हा शिवाजी महाराजांच्या पदरी मजालसी म्हणजे सल्लागार मंडळात होता.याचा अर्थ शिवछत्रपतींच्या आयुष्यातील अनेक घटनांचा तो प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होता, शिवाय राजाराम महाराजांच्या आज्ञेनेच त्याने हि बखर लिहीली असल्यामुळे ईतर बखरीच्या तुलनेत हीच बखर विश्वासार्ह आहे.पण विशेष म्हणजे हि बखर या संपुर्ण घटनेबध्दल मौन बाळगते.याचे कारण मला तरी समजले नाही.
बाकी बखरींच्या तुलनेत एकान्नव कलमी बखरीत या प्रसंगाचे वर्णन सविस्तर आलेले आहे.
p1

p2
ज्या दोन पानांवर पन्हाळ्यावरुन सुटका आणि पावनखिंडीच्या युध्दाचा उल्लेख आहे, त्या दोन पृष्टांचा फोटो
या दोन्ही पॄष्टांवरची माहिती वाचली असता, पन्हाळ्यावरुन शिवाजी महाराजांनी सुटका करुन घेताना काय युक्ती वापरली याचा उल्लेख येत नाही, शिवाय फौजेचा आकडाही चुकीचा दिला आहे. मात्र बाजीप्रभुंच्या या युध्दप्रसंगातील योगदानाबध्दल स्पष्ट उल्लेख आहे. घोडखिंडीच्या युध्दाचाही उल्लेख वाचू शकतो.
p3

p4

p5

महाराजांचे अधिकृत चरित्र म्हणता येईल अश्या शिवभारतातही या संपुर्ण घटनेचा स्पष्ट उल्लेख आहे. यात महाराजांनी त्रिंबक भास्कर यांच्याकडे गड सोपवला आणि ते बरोबर सहाशे मावळे घेउन गेले हे स्पष्ट लिहीले आहे. शिवाय शत्रुना आंधळे करुन महाराज वेढ्यातून निसटले आणि हि बातमी जोहरला हेरांनी सांगितली असेही वर्णन दिसते. विशाळगडाच्या पायथ्याशी झालेल्या युध्दाचा समरप्रसंग रंगवून सांगितला आहे. मात्र यात देखील पावनखिंडीच्या युध्दाचा उल्लेख नाही.शिवाय महाराज घोडे, खजिना बरोबर घेउन वेढ्यातून सुटले असेही अविश्वसनीय वर्णन दिसते. महाराजांनी पन्हाळगड ते विशाळगड हा मार्ग पालखीतून आक्रमिला हे ही समजते.
p31

p31

p32

p35
शकावली म्हणजे आजच्या भाषेत सांगायचे तर ईयरबुक. जसे ईयरबुकमध्ये त्या त्या वर्षी कोणकोणत्या घटना झाल्या त्याचे थोडक्यात उल्लेख असतात, तसे शकावलीमध्ये त्या त्या हिंदु वर्षात म्हणजे शकात कोणकोणत्या घटना झाल्या, त्याची माहिती दिलेली असते. प्रत्येक घराण्याची अशी शकावली असते.
p6
अशीच एक शकावली,जेधे घराण्याची शकावली उपलब्ध आहे.यामध्ये शिवाजी महाराज पन्हाळ्यावरुन सुटले आणि विशाळगडाला गेले, त्यावेळी बाजीप्रभु देशपांडे यांना वीरमरण आले, याचा उल्लेख आहे.
एखाद्या घराण्यातील पराक्रमी वीरांची गाथा म्हणजे करिना. जेधे घराण्याचा करिना वाचला तर यामध्ये या झुंजीचे आणखी व्यवस्थित संदर्भ दिलेले दिसतात.
p7
यामध्ये देखील शिवाजी महाराज बांदल सेनेला घेउन विशाळगडाच्या दिशेने गेले आणि बाजीप्रभु देशपांडे ( देश कुलकर्णी असा मुळ उल्लेख ) दिसतो. यामध्ये दोन वाक्य फार महत्वाची आहेत, "गजापुरचे घाटी" आणि "गनीम चढो दिल्हा नाही".
करिना आणि शकावली अस्सल साधने मानली जातात, कारण त्यांचे लिखाण करताना कोणताही आर्थिक मोबदला किंवा इतर पाल्हाळ नसतो.तसेच चुकीचे संदर्भ वापरलेले नसता. हि दोन्ही अस्सल साधने या घटनेची पुष्ट्ता करतात.
परकीय साधने हा अभ्यास करण्याचा आणखी एक पैलू आहेत.मात्र यातून काही निष्कर्श काढताना जपून काढावा लागतो. एकतर लिखाण करणार्‍या व्यक्तीचे काही पुर्वग्रहदोषीत दृष्टीकोण असु शकतो.
या घटनेचा उल्लेख ग्रँट डफ याच्या "हिस्टरी ऑफ मराठा" मध्ये कसा आला आहे ते पाहू.
p8

p10
यामध्ये ह्या युध्दात बाजीप्रभु देशपांडेनी प्राणाचे बलिदान केले, युध्द खिंडीत झाले आणि तोफेच्या पाच बारांचा स्पष्ट उल्लेख दिसतो. मात्र ग्रँट डफने खेळणा ( विशाळगड) याच्याएवजी रांगणा असा उल्लेख केलेला दिसतो. हि चुक का झालेली आहे ते समजत नाही.
महत्वाचे म्हणजे या सर्व साधनांमध्ये कोठेही शिवा काशिद यांवा उल्लेख आढळत नाही.
या सर्व साधनांमधील संदर्भ एकत्र करुन, बिंदू जोडून पुर्ण चित्र तयार होते.म्हणजेच शिवाजी राजांची पन्हाळगडावरुन सुटका कशी झाली आणि पावनखिंडीचा रणसंग्राम कसा झाला असेल याचे एक कल्पनाचित्र रंगवता येते.
२) पन्हाळगडाचा वेढा:-
ई.स. १६४९ मध्ये पुरंदरच्या उतारावर फत्तेखानाला मात दिल्यानंतर शहाजी महाराजांची विजापुरच्या तावडीतून मुक्तता झाली आणि शिवाजी महाराजांनी आदिलशाहीविरुध्द काही हालचाल करायचे पुढची पाच वर्ष टाळले.मात्र इ.स. १६५६ पासून पुन्हा मुलुखगिरी सुरु केली. जावळीकर चंद्रराव मोर्‍यांना मात देउन जावळीचा दुर्गम प्रदेश ताब्यात घेउन पाठोपाठ दक्षीण कोकणचा शिवाजी महाराजांनी ताबा घेतला. सहाजिकच आदिलशाही राज्याचा मोठा भाग मुक्त झाला. त्याचवेळी औरंगजेब कल्याणी, बिदर्,औसा हा भाग ताब्यात घेत असल्यामुळे विजापुरच्या फौजांना दोन आघाड्यावर युध्द करणे भाग होते. सहाजिकच शिवाजी महाराजांना स्वराज्याचा विस्तार करणे सोपे गेले. मात्र शहाजहानच्या मृत्युनंतर दिल्लीचे तख्त ताब्यात घेण्यासाठी इ.स. १६५६ मध्ये औरंगजेब दिल्लीला निघून गेला.मात्र जाताना त्याने विजापुर दरबाराला पत्र लिहून शिवाजी महाराजांवर चाल करायचा सल्ला दिला आणि जर शिवाजी राजांना नोकरीत ठेवायचे असेल तर मावळच्या मुलुखात न ठेवता लांब कर्नाटकात पाठविण्यास सांगितले.
p11
विजापुरचा किल्ला

औरंगजेबाचा मुख्य दडपण निघून गेल्याने विजापुर दरबारालाही शिवाजी राजांविरुध्द हालचाल करायला अवसर मिळाला आणि सगळे लक्ष त्यांनी शिवाजी राजांचे स्वराज्य बुडवण्याकडे देणे शक्य झाले. यामुळे इ.स. १६५९ ते १६६० या काळात आदिलशाहीने शिवाजी राजांविरुध्द लागोपाठ तीन हल्ले केलेले दिसतात. आधी अफझलखानाला पाठविले, त्याला मारल्यानंतर फाझलखान, रुस्तमेजमान चालून आले.त्यांनी कोल्हापुरपाशी मार खाल्यानंतर कर्नुलचा सरदार सिद्दी जोहरला पाठविण्याची योजना आखली गेली.
यामध्ये विजापुर दरबाराने थोडा आपल्याच फौजेचा आणि सरदारांच्या मानसिकतेचा विचार केला असावा असे दिसते. एकतर अफझलखानासारख्या प्रबळ सरदार मारला जातो, हि विजापुर दरबाराने कल्पनाही केली नव्हती अशी घटना होती. याचा त्यांच्या मनोधैर्यावर ईतका परिणाम झाला कि १० नोव्हेंबर १६५९ शिवाजी राजांनी अफझलखानाला मारल्यानंतर मोठी धडक देउन २८ नोव्हेंबर १६५९ या दिवशी महाराजांनी पन्हाळ्यासारखा बुलंद गड ताब्यात घेतला. अफझलखानासारखा मातबर सरदार स्वराज्यावर चालून गेल्यामुळे सध्याच्या सातारा, सांगली, कोल्हापुर या भागातील मुलुख आणि त्यावर लक्ष ठेवणारे किल्ले बरेच निर्धास्त, गाफील राहीले.अर्थात त्याला कारण अफझलखानाची किर्तीच तशी होती. याच अफझलखानाने बसवकल्याणच्या म्हणजेच कल्याणीच्या किल्ल्यात वेढा घालून औरंगजेबाला अडकवले होते.तिथे तो त्याला मारायचाच पण खान महमदच्या कृपेने तो सुटला. मोघलांसारख्या प्रबळ शत्रुला अंगावर घ्यायला जो अफझलखान घाबरला नाही, त्यालाच शिवाजी महाराजांनी मारल्यामुळे लष्करीदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या आदिलशाही सल्तनत बॅक फूटवर गेली.
प्रतापगडच्या विजयाचा शिवाजी महाराजांना एक कायमस्वरुपी फायदा असा झाला, कि विजापुर दरबाराला त्यांच्याविरुध्द हालचाली करताना दहा वेळा विचार करावा लागला. फाझलखानाने वैयक्तीत रागापोटी लगेच पुढची स्वारी केली असली तर त्यात फक्त तात्कालीक रागाचा भाग होता. त्यामुळे पुरेसा अभ्यास न करता त्याने केलेला हल्ला मोडून काढायला महाराजांना फार जड गेले नाही. ( १६ जानेवारी १६६०)
विजापुर दरबारातील सरदारांच्या एकंदरीत मनोधैर्यावर परिणाम झाल्यामुळे काहीतरी वेगळा मार्ग काढण्याशिवाय अलि आदिलशहा आणि बडी बेगमेला पर्याय नव्हता.
p11
सध्याच्या आंध्र प्रदेशातील कर्नुलचा किल्ला

नेमका त्याचवेळी कर्नुलचा सरदार सिद्दी जोहर याचा अर्ज विजापुर दरबारात आला होता.जोहर पराक्रमी असला तरी शिया आदिलशाही सल्तनीसाठी तो परकाच होता.कारण मुळात आदिलशाही दरबारात दुफळी होती. बहलोलखान, खवासखान हा पठाणी गट दख्खनी मुसलमान म्हणजे दक्षीण भारतात जन्म झालेल्या मुसलमान सरदारांना दुय्यम मानत. त्यांच्या दृष्टीने लांब आफ्रिकेतून हबसान म्हणजे अ‍ॅबिसानियातून म्हणजेच सध्याच्या ईथियोपियातून आलेले हबशी हे कायम परकेच राहिले. त्यांचा पराक्रमाचा फायदा या शाह्यांनी करुन घेतला मात्र वागणूक कायम दुय्यम दिली. त्यातच सिद्दी जोहरने स्वताच्या मालकाची कर्नुल हि जहागिरी बळकावल्यामुळे विजापुर दरबाराचा तो नावडता होता.
p12
सिद्दी जोहरचे चित्र

आता वेळच अशी आली कि या सिद्दी जोहरला बोलवण्याशिवाय पर्याय नव्हता. एकतर कर्नुळ हे मराठी मुलुखापासून लांब होते शिवाय जोहर विजापुर दरबारात हजर नसल्यामुळे त्याच्या शिवाजी राजांकडून झालेल्या पराभवाचा थेट परिणाम होण्याची शक्यता नव्हती. बंडखोर हा लागलेला ठप्पा पुसण्याची जोहरला सुध्दा चांगली संधी आल्यामुळे सहाजिकच त्याने बहुधा फाझलखान, रुस्तमेजमान यासारख्या आधी पराभुत झालेल्या सरदारांकडून हा शिवाजी कोण ? आणि त्यांची युध्दनीती कशी आहे याचा बारकाईने अभ्यास केलेला दिसतो. पन्हाळ्याला वेढा घालताना पावसाळ्यात छावणीला झडी लावण्याची दक्षता, नेतोजी पालकरांना वेढ्याबाहेर रोखण्याची धुर्तता, विशाळगडाला मोर्चे लावण्याची दुरदृष्टी, ईंग्रजाना भरीला घालून त्यांच्याकडून लांब पल्ल्याच्या तोफा आणने, पावनगडावर तोफा चढवून पन्हाळ्यावर मारा करणे ( पुढे पन्हाळा ताब्यात आल्यानंतर शिवाजी राजांनी काली बुरुजाच्या पुढे परकोट बांधून हि कमजोर बाजू बळकट केली) या सर्व गोष्टी त्याच्या लष्करी कौशल्याची ओळख करुन देतात.
आता विचार करुया, शिवाजी महाराजांनी जोहरशी दोन हात करण्यासाठी पन्हाळगडाचीच निवड का केली ?
शिवाजी महाराजांच्या युध्दनितीचा अभ्यास केला तर एक गोष्ट आपल्याला ठळक दिसून येते, दरवेळी महाराजांनी शत्रुला तोंड देण्यासाठी नवीन युक्ती वापरली.त्यामुळे शत्रुंना त्यांच्यावर चाल करताना समोरुन महाराज नेमकी कोणती चाल करतील याचा अंदाज बांधता आला नाही.स्वराज्य स्थापनेनंतर लगेच झालेले पहिले आक्रमण म्हणजे फत्तेखानाचा हल्ला. यावेळी स्वराज्याचा आकार फार थोडा होता. सहाजिकच आपल्या प्रदेशाला उपद्रव होउ नये यासाठी महाराजांनी स्वराज्याचा हद्दीवरच्या पुरंदरची निवड केली. आदिलशाहीच्याच ताब्यातील किल्ला त्यांच्याचविरुध्द युध्दासाठी वापरणे हे अनोखे उदाहरण आहे.
याउलट अफझलखानाच्या स्वारीच्या वेळी प्रतापगडाची निवड केली. वास्तविक वाई हि अफझलखानाची जहागिर.त्या मुलुखाशी अफझलखान चांगलाच परिचित होता, तरीही फार मोठ्या सैन्याला हरवायचे तर जावळीसारख्या दुर्गम प्रदेशाशिवाय पर्याय नव्हता.
p12
पन्हाळ्याचा सज्जाकोठी

मग पुन्हा जोहरविरुध्द याच प्रतापगडाच्या परिसराचा का विचार केला नाही ? एकतर वाईपासून ते कोल्हापुरपर्यंतचा मुलुख शिवाजी राजांच्या राज्याला नव्याने जोडला गेला होता. अफझलखान पंढरपुरमार्गे आल्यामुळे त्यावेळी फक्त स्वराज्याच्या भुमीचे थोडे नुकसान झाले होते.मात्र जोहर मिरजेच्या दिशेने निघाल्यामुळे तो मिरज-कराड-सातारा-वाई असा आला असता.सहाजिकच ह्या सर्व मुलुखाची राखरांगोळी झाली असती. शिवाय शत्रुला स्वराज्याच्या सीमेवर रोखणे हे केव्हाही फायद्याचे होते. प्रतापगडाखाली जोहरला बोलावले असते तर अफझलखानासाठी वापरलेली युक्ती पुन्हा वापरता आली नसती. पन्हाळ्यावर पुरेशी रसद भरुन जोहरचा मुकाबला करणे फायद्याचे होते. शिवाय कोल्हापुर भागातील पावसात आदिलशाही फौजा फार काळ उभ्या राहू शकणार नाहीत, असा शिवाजी राजांनी अंदाज केला होता.जो अर्थातच चुकला.
सिद्दी जोहरने पन्हाळ्याला वेढा घातल्यावर नेतोजी बाहेरुन हल्ला करतील आणि पन्हाळ्यावरुन फौजा सोडून वेढा तोडता येईल हि शक्यताही यशस्वी ठरु शकली नाही. त्यानुसार निवडक फौजफाटा घेऊन नेताजी पन्हाळ्यास आले परंतु यावेळी सिद्दी जौहर हा लष्करीदृष्ट्या हुशार निघाला. मूळ वेढ्याला जराही धक्का लागू न देता त्याने नेताजीची वेढ्याबाहेरच पराभुत केले. या झटापटीत सिद्दी हिलालचा पुत्र जखमी होऊन शत्रू हाती कैद झाला.
अर्थात आधी नेतोजींनी गदगसारखी आदिलशाहीची संपन्न पेठ लिटुन बरीच संपत्ती जमवली. विजापुरावर दड्पण आणण्यासाठी त्यांनी विजापुरजवळची शहापुर हि संपन्न पेठ लुटली. थेट विजापुरवर हल्ला झाल्यानंतर आदिलशहा कचाट्यात सापडला. सिद्दीला बोलवण्याची तयारी त्याने सुरु केली.मात्र खवासखानाला नेतोजींकडे फार फौज नाही याची खबर लागली होती. त्याने मुल्ला महमदला पाठवून नेतोजींना रोखण्यात यश मिळाले आणि आदिलशाहीने सुटकेचा निश्वास टाकला. अन्यथा पन्हाळगडाचा वेढा त्याचवेळी उठायचा.
p13
सिद्दी जोहरने पन्हाळ्याला घातलेला वेढा

मिरजेचा वेढा उठवून शिवाजी राजे ज्यावेळी पन्हाळ्यास आले त्यावेळी त्याच्यासोबत आठ हजार पायदळ व साठ घोडेस्वार असल्याचे पसासं ले. क्र. ८२६ मध्ये नमूद आहे. शिवाजीन महाराजांनी पन्हाळ्याचा आश्रय घेताच जौहरनेही त्या किल्ल्यास वेढा घालून मोर्चेबंदी केली.त्यावेळी मोर्चेबंदी कशी केली होती याचे सविस्तर वर्णन शिवभारतात दिलेले आहे. पश्चिमेकडून बाजीराव घोरपडे, कर्नाटकी पीडनाईक, वल्लीखानचा पुत्र अजिंक्य भाई खान, सिद्दी मसूद, फाजलखान यांनी आपले सरदार व पायदळ घेवून पूर्वेकडून पन्हाळगडास वेढा दिला. जोहरच्या आज्ञेवरून इतर अनेक मातब्बर सरदारांनी उत्तर व दक्षिणेस वेढा दिला. चार महिने हा वेढा चोख चालला. पन्हाळा जेरीस आणण्याकरता सिद्दीने इंग्रजांकडे तोफा व दारूगोळ्याची मागणी केली. यावेळी राजापूरकर इंग्रजांनी आर्थिक फायद्याची संधी सोडली नाही. त्यांनी जौहरला शक्य तितका तोफखाना व दारुगोळा तर उपलब्ध करून दिलाच परंतु वर तोफ डागण्याकरता प्रशिक्षित गोलंदाजही सोबत दिला. ( स. १६६०, मार्च - एप्रिल )
नेमका त्याचवेळी स्वराज्यावर शाहीस्तेखानाचा हल्ला झाला.औरंगजेबाने शाहिस्तेखानाला स्वराज्यावर का पाठविले याचा आढावा स्वतंत्र लेखात घेउया. पण त्यामुळे आता महाराजांना पन्हाळ्याच्या वेढ्यात फार काळ रहाणे शक्य नव्हते.
p14
पन्हाळ्याच्या वेढ्यातून सुटका कशी करुन घ्यायची हा मोठा प्रश्न होता.अंतस्थ बोलाचाली करून महाराजांनी जौहरला वश करण्याचा प्रयत्नही करून पाहिला. पण जौहर आपल्या सेवेशी एकनिष्ठ राहिला. पन्हाळ्याच्या चारही बाजूने पसरलेल्या फौजा पाहिल्या तर फक्त पन्हाळा आणि मसाईचे पठार यांना जोडणार्‍या डोंगरधारेवर फार मोठ्या प्रमाणात सैन्य असण्याची शक्यता नव्हती.तसेच ईथल्या उंचसखल भागामुळे छावणी उभारणेही अवघड होते.याचा अर्थ सुटकेसाठी हि एकच जागा होती. पण तरीही बरोबर सैन्य घेउन जायचे तर इथल्या पहार्‍याला चुकवणे आवश्यक होते. त्यासाठी महाराजांनी वेढ्यातील कोणत्यातरी सरदाराला फितूर करुन घेण्याशिवाय मार्ग नव्हता. अर्थात सबळ पुरावा नसला तरी वेढ्याच्या प्रसंगी हजर असलेला रुस्तमजमा याचेच नाव पुढे येते. एकतर शहाजी राजांचा मित्र असलेल्या रणदुल्लाखानाचा हा मुलगा. कदाचित लहानपणापासून शिवाजी राजे आणि रुस्तम एकमेकांना ओळखत असावेत. शिवाजी राजांनी रुस्तमेजमानच्या कोल्हापुर,राजापुर, कुडाळ या मुलुखावर हल्ला करुन तो ताब्यात घेतला तरी त्याने कोणताही प्रतिकार केला नाही हे लक्षणीय आहे. कोल्हापुरजवळ झालेल्या फाझलखान, रुस्तमेजमानशी झालेल्या युध्दात शिवाजी राजांसमोरुन रुस्तम अवघ्या पाच-सहा स्वारानिशी पळून गेला तरी राजांनी त्याला सोडून दिला.या सर्व गोष्टी लक्षात घेतल्या तर पन्हाळ्याच्या वेढ्यातून सुटून जायला रुस्तमेजमान यानेच महाराजांना मदत केली असावी असा निष्कर्ष काढता येतो.
पन्हाळ्यावरुन सुटका करुन घ्यायची तर दुसर्‍या एखाद्या बळकट गडाचा आश्रय घ्यायला पाहिजे. सहाजिकच विशाळगडाचा पर्याय पुढे आला. यावेळी महाराजांपुढे काही शक्यता उभ्या ठाकल्या होत्या.
१) पन्हाळ्यावरुन यशस्वी सुटका होउन थेट विशाळगडाला सुखरुप पोहचणे.
२) पन्हाळगडावरुन सुटका होत असतानाच शत्रुला सुगावा सापडणे.
३) पन्हाळा ते विशाळगड या दरम्यान शत्रुने कोठेतरी गाठणे.
४) विशाळगडाच्या पायथ्याशी सुर्वे-पालवणीकर यांच्या फौजेकडून प्रतिकार होणे
पहिला पर्याय सर्वोत्तम असला तरी धोक्याचा विचार केला तर इतर दोन पर्यायावर काम करणे गरजेचे होते.सुर्वे-पालवणीकर यांच्या फौजेच्या पराक्रमाचा महाराजांना अंदाज असणारच ,कारण त्यांना आधी पराभुत केले होते.
p15
पन्हाळा ते विशाळगड अंतर परमानंदानी पाच योजन तथा ४० मैल ( १ योजन = ८ मैल ; १ मैल = १.६ किमी ) असं दिलेलं आहे. सध्याच्या गाडीरस्त्याने देखील जवळपास इतकेच ( ६० - ६५ किमी ) अंतर पडते. पन्हाळ्यावरुन सुटकेसाठी मुळात मसाई पठाराच्या डोंगररांगेवरचा पहारा दूर होणे गरजेचे होते.कारण सहाशे मावळे, ते ही पावसाने निसरड्या झालेल्या वाटेने प्रवास करणार तो ही रात्रीच्या अंधारात म्हणजे किमान आजच्या हिशेबाने एक ते दोन तास वेळ आवश्यक होता. इतका वेळ पहारेकरी त्या परिसरात फिरकायला नको. यासाठी महाराजांनी बहुधा रुस्तमजम्याला आपल्या बाजूने सुटकेच्या दिवशी म्हणजे आषाढ पौर्णिमेला १३ जुलै १६६० ला पहारा मागून घेण्यास सुचवले असेल. त्याने त्या दिवशी आपले पहारेकरी मुद्दामच दुसरीकडे गुंतवून हा परिसर मोकळा ठेवला असेल.
याशिवाय महाराजांनी सिद्दी जोहरशी तहाचे आणि शरणागतीचे बोलणे करुन सतत चार महिने उन आणि पावसाला कंटाळलेल्या आदिलशाही फौजेत शिथीलता निर्माण केली होती.त्याचा ही या प्रसंगी फायदा झाला.
p16
पन्हाळगड ते विशाळगड वाटा, शिवाजी महाराजांचा मार्ग केशरी रंगाने दाखवलेला आहे तर मसुदचा मार्ग पिवळ्या रंगात दाखवलेला आहे तर पांढरपाण्यापासून पुढचा रस्ता लाल रंगात दाखवलेला आहे.
आता पहार्‍यातून बाहेर पडल्यावर विशाळगडाकडे जायचे कोणत्या मार्गाने ? कारण रुढ रस्ता पन्हाळा-मलकापुरमार्गे असा लांब वळसा घालून जातो,सापडण्याचा धोका होता. म्हणून महाराजांनी कुंभारवाडी-चाफ्याची वाडी-मांडलाईवाडी-सुकामाचा धनगरवाडा अशी फार वापरात आणि परिचित नसलेली वाट निवडली. यामार्गे आदिलशाही फौजेला पाठलाग करणे कठीण गेले असते.शिवाय हा जवळचा मार्ग होता, त्यामुळे इथे लवकर गजापुर परिसरात पोहचायचा फायदा महाराजांना मिळाला.याशिवाय मसाई पठार ते पांढरपाणी हा मार्ग उंच डोंगरातून असल्यामुळे महाराज थेट पांढरपाण्याला पोहचले तर मसुदचा मार्ग सपाटीवरुन पन्हाळगड ते मलकापुर असा असल्यामुळे मलकापुरानंतर घाट चढून त्याला पांढरपाणी गाव गाठायचे होते. यामध्ये त्याचा वेळ वाया गेल्यामुळे शिवाजी महाराजांना पोहचण्याच्या वेळेमध्ये आघाडी घेता आली.
त्याच्या आधी या वाटेने जायला कितीवेळ लागतो, कोठे अडचणीच्या जागा आहेत, कोठे उघडा माळ आहे, पावसाळी ओढे हा सर्व अंदाज घेण्यासाठी महाराजांनी हेरांना या मार्गाने दोन ते तीन वेळा जायला लावले असेल.त्याचवेळी विशाळगडाला सुर्वे आणि पालवणीकर यांचे मोर्चे आहेत याचीही माहिती मिळाली असणार.म्हणजे जर खबर लागली तर पाठलागावर आदिलशाही फौजा आणि विशाळगडाच्या पायथ्याशी सुर्वे, पालवणीकर यांच्या फौजा असा दुहेरी पेच होता.
३) शिवा काशिदचे सत्य :-
आता येउ या आणखी एका पारंपारिक प्रसंगाकडे शिवा काशिदचे बलीदान ! पाच पातशाह्यांशी तोंड देउन स्वराज्य स्थापन करायचे म्हणजे अनेकांना आपल्या प्राणाचे बलिदान द्यावे लागणार होते आणि तसे ते अनेक शुर वीरांनी दिलेही. मात्र एक लक्षात घेणे गरजेचे आहे, कोणत्याही मावळ्याला शिवाजी महाराजांनी स्वतःहून मृत्युमुखात ढकलले नाही.ज्याला आपले मानले, त्याच्या केसालाही धक्क लागणार नाही याची काळजी महाराज घेत.जेव्हा जेव्हा जीवावर बेतायचा प्रसंग आला तेव्हा महाराजांनी तो स्वताच्या शिरावर घेतला आहे, मग ती अफझलखानाशी भेट असो, शाहिस्तेखानाला मारण्यासाठी लालमहालात शिरणे असो किंवा आग्राला जाणे असो.महाराजांनी केव्हाही डुप्लिकेट वापरल्याची नोंद नाही.शिवाय प्रत्येक युध्दात कमीतकमी मनुष्यहानी होईल हे कायम पाहीले. गनिमीकावा युध्दाचे ते वैशिष्ट्यच, युध्द हरतो असे वाटले तर पळून येण्यात गैर नाही हे ही त्यांनी मावळ्यांच्या मनावर बिंबवले होते. प्राणहानी होते आहे म्हणून केलेला पुरंदरचा तह, आग्राहून सुटका होताना प्रत्येक माणुस यशस्वीपणे माघारी आणणे, अगदी त्यावेळी औरंगजेबाच्या तावडीत सापडलेले वकील पत्र लिहून सोडवले, तानाजीच्या घरी कार्य असल्यामुळे स्वतः सिंहगड ताब्यात घेण्यासाठी मोहीम आखणे, कोंडाजी फर्जंद पन्हाळ्यावर हल्ला करण्याच्या मोहीमेवर निघाल्यावर आधीच सोन्याच कडे घालून त्याचा सत्कार करणे या सर्व उदाहरणावरुन शिवाजी महाराज शिवा काशिद यांना अशी मरणाच्या मुखात जाणारी कामगिरी सोपवतील असे वाटत नाही.
p17
शिवा काशिद यांच्या बलिदानाच्या प्रसंगाचा उल्लेख वर दिलेली अस्सल साधने करत नाहीत.मग प्रश्न येतो हि घटना कशी काय जोडली गेली ?याचे उत्तर डच साधनात आहे. इतिहासाच्या पाउलखुणा भाग १ मध्ये शिवा काशीदच्या अख्यायिकेच्या उगमाबद्दलही माहिती दिली आहे. यातही हे काल्पनीक पात्र आहे असेच म्हटले आहे.
त्यात लिहीले आहे कि, 'पन्हाळ्याच्या वेढ्यामध्ये एक व्यापारी होता.ज्याने आपल्या दुसर्‍या व्यापार्‍याला वेंगुर्ल्याला पत्र लिहीले.' शिवाजीने शिवा नावाचा आपला दुसरा माणुस सोंग घेउन पाठविला, त्यामुळे छावणी गाफील राहिली.' आणि या दुसर्‍या व्यापार्‍याकडून हि गोष्ट डचाना कळाली.त्यांनी ती एकीव बातमी डाग रजिस्टरमध्ये नोंदवून ठेवली. पण इतिहासातील दुसर्‍या कोणत्याही साधनात शिवा काशिदचा उल्लेख सापडत नाही. त्याच्या वंशजांना दिलेले एकही वर्षासन, भोगवटापत्र,जहागीर्,वतनपत्र किंवा त्यांनी केलेली मागणी आढळत नाही.'
बाकी कोणतेही मराठ्यांचे साधन, आदिलशाही कागदपत्र या घट्नेला दुजोरा देत नाहीत. शिवाय याच पन्हाळ्याच्या वेढ्यात ईंग्रजांनीही भाग घेतला होता,त्यांच्याकडेही काही नोंद नाही.
शिवाय एकंदरीत शिवचरीत्राचा अभ्यास केला तर महाराजांसाठी आणि स्वराज्यासाठी ज्या ज्या लोकांनी प्राणांचे बलिदान केले किंवा मोठ्या कामगिऱ्या बजावल्या अश्या सर्वांचाच महाराजांनी यथोचित सन्मान केला आहे. त्यांना पालखीचा मान देणं, किल्लेदारी देणं, एखादा गाव देणं या मार्गांनी नेहमीच महाराजांनी त्यांच्या बलिदानाची दखल घेतलेली दिसते.
p18
जेधे शकावलीप्रमाणे बाजी प्रभूंच्या बलिदानानंतर त्यांच्या मुलाला बाजींची सरदारी आणि बाकीच्या मुलांना पालखीचा मान राजांनी दिला. एव्हढाच काय तर पहिल्या पानाचा मानही राजांनी या कुटुंबाला दिला. असा कोणताच उल्लेख शिवा काशीदबद्दल दिसत नाही. आणि महाराजांची कृतघ्न वागणूक कधीच नव्हती. शत्रूला अनेकदा राजांनी दगा दिलाय पण मित्रांच्या बाबतीत दगा किंवा कृतघनपणा त्यांनी कधीच केलेला दिसत नाही.
महाराजांसाठी बऱ्याच मावळ्यांनी युद्धात लढताना आपल्या प्राणाचा त्याग केला तो महाराजांवरच्या प्रेमासाठी, स्वराज्यासाठी. पण यात कधीच महाराजांनी आपलीच माणसं पकडून दिली आहेत त्यांचे प्राण स्वतःहून धोक्यात घातले आहेत असं दिसून येत नाही. आपल्या माणसांचा इतका विचार करणारा 'जाणता राजा' शिवा काशीद याला आपणहून मृत्यूच्या दाढेत ढकलेल हे मनास पटत नाही.
अर्थात शिवा काशिद अजिबातच नव्हते किंवा त्यांनी या समरप्रसंगात कोणतीच भुमिका बजावली असे नाही.कदाचित ते या परिसराचे स्थानिक असल्यामुळे त्यांना येथल्या वाटा ठावूक असणार.महाराजांनी पर्यायी वाट शोधायची कामगिरी त्यांच्यावर सोपवली असेल, किंवा खुद्द वेढ्यात रुस्तमजम्याला भेटायला देखील शिवा काशिद गेले असावेत. मात्र या सर्व बाबी पुराव्यांनी सिध्द होणार्‍या आहेत.आज तरी असा पुरावा मिळत नाहीत तोवर काहीही ठाम निष्कर्श काढणे कठीण आहे. कारण इतिहास शेवटी पुराव्यांच्या आधारावर लिहितात, भावना आणि लोककथांवरून चित्रपट, कादंबऱ्या आणि नाटक बनतात.
४) पावनखिंडीचे नेमके स्थान:-
p19
आता येउ या घटनाक्रमातील अंतिम मुद्द्याकडे.पावनखिंडीची नेमकी लढाई कशी झाली आणि पावनखिंडीचे नेमके स्थान !यासाठी आधी मुळ वर्णन काय आहे ते पाहु.
" .. राजश्री स्वामी किलियावरून उतरून खिलणीयास येऊ लागले तेव्हा सिदी जोहार पाठीवरी आला ते समई बादलाचा जमाव व बाजी परभुदेशपांडे गजापूरचे घाटी ठेवून राजश्री खिलणीयास गेले व बाजी परभु यांणी व लोकानी युध्याची शर्ती केली बाजी परभु व कांही लोक पडिले गनीम चढो दिल्हा नाही सिदी जोहार माघारा गेला. "
p20
सध्या भाततळी नावाच्या गावाजवळ एक जागा पावनखिंड म्हणून दाखवली जाते. मुळात भाततळी हे गाव कासारी धरण बांधताना पुर्नवसीत आहे. त्याच्याजवळ ओढा वहात खाली जातो.नकाशा नीट पाहीला तर या परिसरातून असे दोन-ओढे एकत्र वहात कासारी नदीचे पात्र तयार होते.म्हणजे एकप्रकारे हा कासारी नदीचा उगम आहे.
p21
म्हणजे हि जागा उताराची आणि मुळ वाटेपासून एका बाजुला आहे.
p25
या जागेचा शोध पन्हाळ्यावरील इतिहास संशोधक श्री.मु.गो.गुळवणी यांनी घेतला.तर पुढे शिवशाहीर श्री. बाबासाहेब पुरंदरे आणी प्रख्यात साहित्यिक श्री. गो.नि.दांडेकर यांनी हे स्थान उजेडात आणले.अर्थात त्याकाळी गुगल मॅप, जि.पि.एस. हि अत्याधुनिक साधने व इतर संदर्भ नसल्यामुळे पावनखिंडीचे स्थाननिश्चिती करताना गोंधळ होणे स्वाभाविक होते. त्यामुळे स्थानिकांनी सांगितलेली जागा हिच पावनखिंड मानली गेली.
p22
त्यावेळी ह्या जागी उतरण्यासाठी झाडाच्या मुळीचा आधार घ्यावा लागत होता. मात्र जस जसे शिवप्रेमी या जागेला भेट देउ लागले तसतसे ईथे सुविधा केल्या जाउ लागल्या.आज खाली उतरण्यासाठी शिड्या बसविल्या आहेत.
मात्र हे सर्व असले तरी मुलतः हा ओढा आहे हे विसरुन चालणार नाही. कोणतेही रुळवाट अशी थेट ओढ्यातून असणार नाही.एकतर वाट ओढ्याला छेद देउन जाते किंवा ओढ्याच्या कडेकडेने जाते. कारण विशाळगडासारख्या जुन्या गडाकडे जाणारी वाट अशी ओढ्यातून असेल याची अजिबात शक्यता वाटत नाही. कारण गडाकडे जाणारी वाट सैनिक हालचालीसाठी, रसद पोहचविण्यासाठी, तोफा वैगरे अवजड वस्तुंची ने-आण करण्यासाठी असते. ती अशी अडचणीची असेल ? सह्याद्रीच्या अनेक घाटवाटा आणि नाळा अश्या ओढ्यामुळे बनल्या आहेत हे मान्य, पण विशाळगडासारख्या महत्वाच्या किल्ल्याकडे जाणारी वाट, पर्यायी जागा असताना मुद्दाम ओढ्यातून काढली जाणार नाही.
याशिवाय भाततळी गावाजवळ एक खिंडीसारखी जागा दाखवून काहीजण तीला पावनखिंड म्हणतात.मुदलात पांढरपाणी ते भाततळी हा सपाटीचा प्रदेश आहे.शत्रुला बाजूने जायची वाट असेल तर तो त्या खिंडीच्या बाजुला कशाला जाईल ? या परिसरात एक फरसबंदी आहे , हिच काय ती या दाव्याची पुष्टता करणारा पुरावा. फरसबंदी म्हणजे दगडी फरश्यांनी बनवलेली वाट. मात्र महामुर पावसाच्या प्रदेशात अशी फरसबंदी नवीन असणे नवीन नाही, कोकणात जांभ्या दगडापासून बनवलेल्या अश्या फरसबंद्या आपण प्रत्येक गावात पाहू शकतो.शिवाय ती फरसबंदीची वाट त्या ओढ्यात उतरत नाही.
आणखी एक प्रमेय मांडले जाते कि खरी पावनखिंड कासारी धरणाच्या पाण्यात बुडाली.अत्यंत तथ्यहीन असा हा दावा आहे.मगाचाच तर्क ईथेही लागू होतो.एखाद्या गडाकडे जाणरी वाट अशी नदीपात्रातून असेल कि नदीपात्राच्या बाजूने ?
आणखी एका कसोटीवर सध्याची पावनखिंड योग्य ठरत नाही.विशाळगड ते सध्याची पावनखिंड हे थेट हवेतील अंतर ( Arial Distance ) ७.५ कि.मी. भरते. पावनखिंडीचा रणसंग्रान पावसाळ्यात झाला.या काळात हवेतील बाष्पामुळे आवाज लांब अंतरापर्यंत जात नाही. शिवाय विशाळगडाचे स्थान आणि सभोवताली असलेल्या दर्‍या लक्षात घेता ईथे फार मोठ्या तोफा नसाव्यात, ज्या काही असतील त्या रणमंडळ आणि मुंढा दरवाज्याच्या आसपास असाव्यात.याचा अर्थ ईथे उडवलेल्या तोफांचा आवाज सध्याच्या पावनखिंडीपर्यंत पोहचणे शक्यच नाही.
p24
आता येउया खिंडीच्या वर्णनाच्या जवळपास असणार्‍या जागेकडे.
मुळ कागदपत्रात स्पष्टपणे "गजापुरची घाटी" असे स्पष्ट लिहीलेले आहे. याचा सरळ अर्थ खिंड हि गजापुरच्या परिसरात आणि गजापुर ते विशाळगड या मार्गावर असणार हे नक्की. गजापुरनंतर विशाळगडाच्या वाटेवर सतत घाट आहे. गजापुरपासून काही अंतर गेले की मध्येच खिंडीसारखी जागा दिसते. सध्याचा डांबरी रस्ता हि खिंड फोडून तयार केला आहे.
p62
हि जागा खरी पावनखिंड असावी

खिंड याचा अर्थच मुळी दोन्ही बाजुला उंच भाग आणि मध्ये जाणारी चिंचोळी वाट असा आहे. आजुबाजुला दाट झाडी आणि वाटेला वळण असल्यामुळे हा सर्व परिसर गनिमी काव्याच्या युध्दासाठी आदर्श जागा आहे. कदाचित शिवकालात ईथली वाट थोडी उंचावर असावी, मात्र डांबरी रस्ता करताना मुळ रचना बदलली गेली असावी. शिवाय ईथून विशाळगडाचे हवेतील अंतर अवघे एक कि.मी. असल्यामुळे तोफेचे बार सहज एकू येउ शकतात. शिवाय ईथून विशाळगडाकडे जाण्यासाठी हि एकच वाट आहे, पर्यायी वाट नाही.
सर्वच कसोट्यांना हि जागा उतरत असल्यामुळे हिचा घोडखिंड उर्फ पावनखिंड असावी.
p25
विशाळगडासमोरचा वाहनतळ.या ठिकाणी अत्यंत मर्यादित जागा आहे.

आणखी एका शक्यतेचा विचार करुन हा लेख थांबवतो. काही अभ्यासकांच्या मते हे युध्द पावनखिंडीत झाले नसून विशाळगडाच्या पायथ्याशी झाले आणि त्यात बाजीप्रभुना वीरमरण आले असावे. मात्र हे गृहीतक खरे मानायचे तर दोन अडचणी आहेत, एक जेधे करिना आणि शकावली गजापुर घाटीचा स्पष्ट उल्लेख करतात, शिवाय 'चढो दिल्ही नाही' असे वाक्यही आहे. जर युध्द खेळण्याच्या पायथ्याशी झाले असते तर तसा उल्लेख यायला हवा होता.शिवाय दुसरी शक्यता म्हणजे जर युध्द विशाळगडाच्या पायथ्याशी झाले असते, तर रात्रभर पळून दमलेल्या फौजेला हे युध्द करायचे कारण नव्हते. वरील फोटोत आपण पाहु शकता कि विशाळगडासमोर अत्यंत तोकडी जागा आहे. इथे शत्रु सैन्याचा तळ असला तरी फार मोठी फौज तैनात करणे अशक्य आहे. विशाळगडाचे हे हवाई दृष्य पाहिले तर विशाळगडाला सर्व बाजूने वेढा घालणे अशक्य आहे. म्हणजे शत्रु सैन्य विशाळगडासमोर फक्त सध्या वाहनतळ आहे , तिथेच असणार. म्हणजे शिवाजी महाराज आणि बाजीप्रभुना ईथून निसटून विशाळगडावर जाणे सहज शक्य होते.शिवाय विशाळगडावर महाराजांचे ताज्या दमाचे सैन्य होतेच, त्या फौजेला युध्दात उतरवणे सहज शक्य होते, त्यासाठी बाजीप्रभुंचे बलिदान देण्याची गरज नव्हती.
p30
अर्थातच या संपुर्ण घटनाक्रमाचा उलगडा मी माझ्या समजानुसार केला आहे, जो कदाचित चुकीचा असू शकेल.ईतर अभ्यासकांनी त्यांच्या दृष्टीकोणातून यामध्ये भर घालून आणखी शक्यतांचा अभ्यास करावा हि विनंती !
संदर्भग्रंथ :-
१) शिवभारत- कविंद्र परमानंद
२) एकन्नव कलमी बखर
३) जेधे करिना
४) जेधे शकावली
५) मराठ्यांची बखर- ग्रँट डफ
६) राजा शिवछत्रपती- बाबासाहेब पुरंदरे
७) इतिहासाच्या पाउलखुणा- कौस्तुभ कस्तुरे
८) छत्रपती शिवाजी महाराज- सेतु माधवराव पगडी
९) दुर्गभ्रमणगाथा- गो.नि.दांडेकर
१०) डोंगरयात्रा- आनंद पाळंदे
११) साद सह्याद्रीची ! भटकंती किल्ल्यांची !!- प्र.के.घाणेकर

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

31 Jul 2020 - 3:53 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लेख वाचायला सुरुवात केली की लक्षात आले, फोटो दिसत नै ये.

-दिलीप बिरुटे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Aug 2020 - 8:19 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आभार....!

-दिलीप बिरुटे

रीडर's picture

31 Jul 2020 - 4:43 pm | रीडर

खूप छान माहिती

फोटो दिसत नाहीयेत

दुर्गविहारी's picture

31 Jul 2020 - 9:21 pm | दुर्गविहारी

या धाग्यतील फोटो दिसत नाहीत. बहुधा गुगल फोटोचा अल्बमचे सेटींग प्रायव्हेट झाले असावे. साहित्य संपादकांनी काय करता येईल ते सुचवावे. कृपया मदत करा.

तुषार काळभोर's picture

1 Aug 2020 - 7:19 am | तुषार काळभोर

मोबाईल क्रोम अन क्रोमचा इन कॉग्निटो मोड, दोन्ही मध्ये फोटो दिसताहेत.
म्हणजे फोटोंचे दुवे अन शेअरिंग योग्य आहेत.

ज्यांना दिसत नाहीत, त्यांनी कृपया क्रोम / इंटरनेट एक्सप्लोरर वर पाहता का?

बऱ्याचदा काही ब्रँड्सच्या मोबाईल्सचे ब्राउजर गुगलशी वाकडे घेतात.

आता फोटो मोबाइल app वरून ही दिसत आहेत.

दुर्गविहारी साहेब, एक चूक झालेली आहे. ते चित्र मलिक अंबरच्या मुलाचे म्हणजे फतहखान याचे आहे, सिद्दी जौहर याचे नाही.

https://commons.m.wikimedia.org/wiki/File:Malik_Ambar_of_Ahmadnagar.jpg

दुर्गविहारी's picture

2 Aug 2020 - 10:57 pm | दुर्गविहारी

हो ! गुगलबाबाने माझी गुगली घेतलेली दिसते आहे. ;-)

> जेधे शकावलीप्रमाणे बाजी प्रभूंच्या बलिदानानंतर त्यांच्या मुलाला बाजींची सरदारी आणि बाकीच्या मुलांना पालखीचा मान राजांनी दिला. एव्हढाच काय तर पहिल्या पानाचा मानही राजांनी या कुटुंबाला दिला.

जेधे करीना यातील जे पान तुम्ही वर दिले आहे त्यात 'पाहिले पान' जेधे यांच्या ऐवजी बांदल याना दिले असे लिहिले आहे, बाजीप्रभूंच्या कुटुंबाला नव्हे. ही हकीगत समकालीन नाही, आणि त्यात जेधे यांचा मोठेपणा वाढवून सांगितला आहे अशीही शक्यता आहे. त्यामुळे निष्कर्ष काढताना फार सावध राहावे लागते.

दुर्गविहारी's picture

2 Aug 2020 - 11:01 pm | दुर्गविहारी

पण जेधे आणि बांदल यांचे एकंदरीत बरे नव्हते, ते पहाता जेधे यांच्या कागदपत्रात बांदल यांचा महत्व देणारा उल्लेख येत असेल तर तो गृहीत धरायला हरकत नाही. आपल्या वितुष्ट असणार्‍या घराण्याला महत्व मिळत असेल तर निदान ते खरे असावे.
दुसरे ज्या घटनेविषयी आपण या धाग्यात चर्चा करतो आहोत, त्याचा विचार केला तर फक्त या घटनेला पुष्टी देणारी कागदे या अर्थाने मी त्याच्याकडे बघतो आहे. मुदलात या समरप्रसंगात बांदलांचा सहभाग होता, इतकेच मला अपेक्षित आहे.

गामा पैलवान's picture

31 Jul 2020 - 11:05 pm | गामा पैलवान

दुर्गविहारी,

हि जागा खरी पावनखिंड असावी

हिच्याबद्दल कृपया थोडी अधिक माहिती मिळेल काय? म्हणजे गुगल नकाशावर ही नेमकी कुठे आहे, हिची काही प्रकाशचित्रं आहेत का, इत्यादि.

मी ऐकलंय की जौहरचा एक बंदूकधरी नेमबाज खिंडीच्या डगरीवर चढला. लढाईच्या धामधुमीत मावळ्यांच्या लक्षात आलं नाही (, की निरुपाय झाला). टेमक्यावरनं नेम साधून त्याने बाजींना टिपलं. ही गोष्ट खरी असेल तर खिंडीला गजापूरच्या बाजूने उल्लंघनीय डगर हवी.

आ.न.,
-गा.पै.

दुर्गविहारी's picture

2 Aug 2020 - 10:56 pm | दुर्गविहारी

गा.पै. साहेब, खाली गुगल मॅपची लिंक देत आहे, तुम्ही हि जागा नकाशावर पाहू शकता.
पावनखिंडीची जागा

मी ऐकलंय की जौहरचा एक बंदूकधरी नेमबाज खिंडीच्या डगरीवर चढला. लढाईच्या धामधुमीत मावळ्यांच्या लक्षात आलं नाही (, की निरुपाय झाला). टेमक्यावरनं नेम साधून त्याने बाजींना टिपलं. ही गोष्ट खरी असेल तर खिंडीला गजापूरच्या बाजूने उल्लंघनीय डगर हवी.

या एकुणच घटनेविषयी अपुरी माहिती उपलब्ध आहे. जे काही आहेत ते अंदाज. त्यामुळे सैनिकांच्या गर्दीतून कोणीतरी गोळी झाडली असावी असा अंदाज.

हिची काही प्रकाशचित्रं आहेत का, इत्यादि.

वर धाग्यात त्या जागेचा फोटो दिलेला आहे.
pawankhind
हा त्या आणखी एक फोटो

प्रचेतस's picture

1 Aug 2020 - 8:42 am | प्रचेतस

उत्कृष्ट लेख.
विविध संदर्भ तपशीलांसह वापरले असल्याने लेख खूप अभ्यासपूर्ण झालाय.

सध्या प्रचलित असलेली पावनखिंड पाहिलेली असल्याने मूळची घोडखिंड ही नसावीच असे वाटते. ह्या पावनखिंडीतून थोडे पुढे जायचा प्रयत्नही करुन झालाय. खिंडीत पुढे खोल डोह आहेत अगदी भर उन्हाळ्यातही ते पाण्याने भरलेले असतात तर ऐन आषाढातल्या पावसात ही खिंड पार करणे अनुल्लंघनीयच ठरावे. दुसरे असे की ह्या अडचणीच्या आणि दरीत असलेल्या आणि त्यामुळे वेळखाउ झालेल्या झालेल्या ह्या वाटेने जायच्याऐवजी मावळे साहजिकच वरच्या बाजूची जलद वाटच निवडणार.

शा वि कु's picture

1 Aug 2020 - 4:51 pm | शा वि कु

संपूर्ण लेखमाला खूप आवडली. पहिले भाग ललित वर्णनामध्ये पण सरस आहेत आणि हा भाग अतिशय तपशीलवार ऐतिहासिक/भौगोलिक माहिती पण देतो.
पुलेप्र.

जव्हेरगंज's picture

2 Aug 2020 - 11:46 am | जव्हेरगंज

माहितीपूर्ण लेख!!

झिंगाट's picture

2 Aug 2020 - 5:15 pm | झिंगाट
झिंगाट's picture

2 Aug 2020 - 5:15 pm | झिंगाट
झिंगाट's picture

2 Aug 2020 - 5:15 pm | झिंगाट
झिंगाट's picture

2 Aug 2020 - 5:16 pm | झिंगाट
Gk's picture

2 Aug 2020 - 9:26 pm | Gk

छान

दुर्गविहारी's picture

2 Aug 2020 - 11:03 pm | दुर्गविहारी

सर्वच वाचकांचे आणि प्रतिसादकांचे मनापासून आभार. या धाग्याचा संदर्भ म्हणून उपयोग केला जाउन भविष्यात आणखी काही संशोधन होईल हि अपेक्षा आहे.

दुर्गविहारीसाहेब, तुम्ही खरी पावनखिंड म्हणून जो फोटो वरती दिला आहे ती जागा रस्त्यासाठी आधुनिक काळात दगड फोडून केली आहे. ती काही प्राचीन खिंड नाही. मोटरगाड्यांसाठी एक ठराविक चढणीचा रस्ता बनवला जातो, त्यासाठी बरीच वळणे घेऊन alignment करतात, तसेच ते वळण आधुनिक काळातले आहे, असे नकाशा पहिला की दिसते.

गामा पैलवान's picture

3 Aug 2020 - 6:22 pm | गामा पैलवान

मनो,

तुमच्याशी साधारणत: सहमत आहे. रस्त्याचं वळण आधुनिक दिसतंय. पण बाजूला जुनी पाउलवाट असावीशी वाटतेय.

हे जरी खरं धरलं तरी दुसरा एक प्रश्न उपस्थित होतो. खिंडीची जागा विशाळगडाच्या बरीच जवळ दिसते आहे. खिंडीहून गडाच्या वाटेवर सूर्यराव सुरवे आणि जसवंतराव दळवी यांचे मोर्चे होते. तर मग ते नेमके कुठे होते? पुलाजवळच्या सोंडेवर? पण अशा ठिकाणी मोर्चे लावणं व ते ही भर पावसाळ्यात म्हणजे एक प्रकारचा आत्मघातच नव्हे काय?

यापुढे आजून एक प्रश्न आहे. तो पावनखिंडीनंतरच्या लढाईशी संबंधित आहे. पुरंदरे यांच्या शिवचरित्रात लिहिलंय की बाजीप्रभू पडल्यावर सिद्दी मसूद खिंडीतून पुढे घुसला. तो विशाळगडास भिडू नये म्हणून महाराजांनी ताज्या दमाचे हजारेक राखीव गडी वरून सोडले. त्यांची मसूदशी जोरदार लढाई झाली. कदाचित सुरवे व दळवींचे सैनिकही मसूदला सामील असावेत. शेवटी शिवाजीचे गडी मसूदला भारी पडले. विशाळगडाचा वेढा उधळला गेला. तर ही लढाई खरोखर झाली होती का? तशी झालेली असल्यास ती विशाळगड व पावनखिंड यांच्या दरम्यान कुठेतरी झालेली असणार. ते सुरवे व दळवींच्या मोर्च्याचं ठिकाण असावं अशी दाट शक्यता आहे. अशा रीतीने आपण परत पावनखिंडीच्या नेमक्या जागेच्या प्रश्नापाशी येऊन पोहोचतो.

आ.न.,
-गा.पै.

आनन्दा's picture

3 Aug 2020 - 6:22 pm | आनन्दा

2-3 गोष्टी या संदर्भात बोलव्याश्या वाटतात..

आपण ज्याला खिंड म्हणतो तश्या खिंडी बऱ्याच ठिकाणी असतील.. परंतु त्या वेळेस ते सगळे डोंगर उघडे असतीलच असे नाही.. त्यावेळेस जिथे खिंड होती त्या जागी सध्या घनदाट जंगल देखील असू शकेल.

पावनखिंडीत शत्रूला यावे लागले कारण बाकीचे डोंगर चढण्यासारखे नव्हते असे नसावे. पण तिथे कदाचित घनदाट जंगल असेल, ज्यामुळे डोंगर साधा असेल तरी तिथे वाट नसेल..

या सगळ्या गोष्टी पहिल्या तर आजच्या दिवशी आपण कुठेही *हीच ती पावनखिंड* असे सांगणे हा केवळ कल्पनाविलास असेल.

काळाच्या ओघात अनेक नवीन वाटा बनतात, जुन्या वाटा नष्ट होतात जंगल वाढते, त्यामुळे सगळा भूगोल बदलतो. अश्यावेळी अस्सल कागदपत्रांशिवाय आपण बोलण्यात अर्थ नाही. त्यामुळे आपण केवळ कल्पना करू शकतो..

दुर्गविहारी's picture

4 Aug 2020 - 7:37 pm | दुर्गविहारी

सर्वप्रथम अपेक्षित पावनखिंडीच्या जागेचे दोन उपग्रहीय नकाशे देतो.

pawan 1
हा नकाशा थेट हा परिसर आकाशातून कसा दिसतो त्याचा आहे.

pawan 2
हा टेरीयन मॅप आहे.

हे दोन्ही नकाशे एकाच जागेचे पण वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. टेरीयन मॅप बारकाईने नीट पाहीला तर साधारण ७०० मीटरच्या कंटुर लाईनच्या रेषेत सध्याचा गजापुर- विशाळगड रस्ता आहे. या रस्त्याच्या डाव्या बाजुला सातत्याने दरी आहे.हि दरी ७०० ते ५०० मीटरपर्यंतचा उतार दिसतो आहे.तर रस्त्याच्या उजव्या बाजुला साधारण ८०० मीटरचे पठार आहे, जिथे घनदाट जंगल आहे.हे जंगल थेट आंबा, मलकापुर गाव आणि त्यानंतर चांदोलीपर्यंत आहे.
vishal

वरील फोटो विशाळगडाचा पश्चिमेकडून घेतला असून त्यात विशाळगडाकडे येणारा रस्ता पिवळ्या रंगात आणि मागे कासारी धरणाचे बॅक वॉटर आणि गजापुरचा परिसर दिसतो आहे. जिथे या रस्त्याला शार्प वळण आहे तिथे अपेक्षित पावनखिंड आहे. त्या परिसराचा झाडीभरला माथा असलेला डोंगर दिसतो आहे. विशाळगडासमोर या डोंगराला मोठा उतार आहे.अर्थात विशाळगडाकडे येणारी वाट या डोंगरावरुन येणार नाही. म्हणजे गजापुरकडून येणारी एकच वाट आहे.
vishal 2
त्याच परिसराचा थेट फोटो, ज्यामध्ये आपण वाहनतळ असलेली सपाटी जेथे दळवी, सुर्वे यांचे तळ होते ते पाहु शकता. मागे दाट झाडी असलेली उंच डोंगर पाहू शकता.अर्थातच तिथून विशाळगडाकडे येणारी स्पष्ट वाट असणे शक्य नाही.

आता येउ या दुसर्‍या शंकेकडे. जर कोणी या परिसराला प्रत्यक्ष भेट दिली असेल तर मी ईथेच खिंड असण्याची शक्यता का म्हणतो आहे ते कळेल. एकतर सध्या वाहन जाण्याच्या सोयीसाठी तिथला मुळ रस्ता फोडून ती जागा प्रशस्त केली असली तरी त्यावेळी ईथे थोडा चढ असणे शक्य आहे. विशाळगडावर कोकणातून चढणारी माचाळची वाट बिकट आहे.म्हणजे विशाळगडाची बहुतेक वर्दळ ( रसद, दारुगोळा वगैरे ) गजापुरकडूनच असणार.म्हणजे हा रस्ता वर्दळीचा असणार. त्यामुळे केवळ पायवाट असणे शक्य नाही. किमान बैल्,गाढव असे ओझे वाहणारे प्राणि जातील ईतपत वाट रुंद पाहिजे. मी निर्देशीत करत असलेली जागा बारकाईने बघीतली तर दरी काठावरुन अशी रुंद वाट शक्य नाही. सहाजिकच त्याकाळीही ईथे खिंड असायलाच पाहिजे. इथून विशाळगडाकडे जाणारी पर्यायी वाट नाही. शिवाय तोफांचे बार ईथेच एकू येउ शकतात. म्हणजेच सर्व कसोटीवर हि जागा उतरते.
आता येउया भौगोलिक बदलावर. सध्याच्या रस्त्यांची जागा बघीतली तर बहुतेक रस्ते जुन्या वाटांचा परिसरात आहे.पुणे-मुंबई रस्त्यावरचा बोरघाट असो किंवा महाबळेश्वर - प्रतापगड रस्त्यावरचा आंबेनळी घाट असो.थोडा मुळ वाटेपासून बाजुला असला तरी साधारण त्याच परिसरात आहे. मात्र पुणे-बेंगलोर महामार्ग आजही त्याच मुळ वाटेला धरुन आहे. या महामार्गावर कात्रज, खंबाटकी किंवा सातारा-कराड रस्त्यावर अजिंक्यतारा-पाटेश्वरची डोंगररांग याठिकाणी मुळ रस्त्यावर आपल्याला खिंड दिसतात.सतराव्या शतकातही त्याच जागी खिंड असणार हे ठामपणे सांगु शकतो, कारण पर्यायी वाटा नाहीत.( कात्रजच्या घाटात बोगदा असला तरी मुळ वाट बोगद्यावरुन होती ) म्हणजे हेच गजापुर-विशाळगड रस्त्याच्या बाबतीत लागु होईल. ईथे पर्यायी वाट नाही. एकमेव वाट आहे आणि या वाटेवर जिथे मी निर्देशीत करतो आहे, तिथे खिंड आहे. हिच अस्सल पावनखिंड असण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे.

गामा पैलवान's picture

5 Aug 2020 - 5:16 pm | गामा पैलवान

दुर्गविहारी,

सविस्तर प्रतिसादाबद्दल आभार! :-)

फोटो दिसंत नाहीयेत. (केवळ मलाच का इतरांनाही?)

आ.न.,
-गा.पै.

लोकहो,

मला केवळ याच प्रतिसादातले फोटो दिसंत नाहीयेत. बाकी सर्व फोटो दिसताहेत. तुम्हालाही असंच दिसतंय का?

आ.न.,
-गा.पै.

याच प्रतिसादातले फोटो मलाही दिसत नाहीयेत.

गामा पैलवान's picture

11 Aug 2020 - 2:27 pm | गामा पैलवान

मनो, धन्यवाद.

दुर्गविहारी, जरा मनावर घ्याच. खूप महत्त्वाचा युक्तिवाद व माहिती आहे या प्रतिसादात.

आ.न.,
-गा.पै.

सिरुसेरि's picture

3 Aug 2020 - 7:44 pm | सिरुसेरि

अभ्यासपुर्ण माहिती . +१

Gk's picture

3 Aug 2020 - 9:54 pm | Gk

छान

अर्धवटराव's picture

4 Aug 2020 - 12:33 am | अर्धवटराव

अस्सल साधन संदर्भ जंत्री तर कमाल आहे.

अवांतरः
तु-नळी वर निनाद बेडेकरांचे काहि भाषणं आहेत. त्यातल्या एका भाषणात त्यांनी म्हटलय कि बाजीप्रभूंना पावनखिंडीत वीर-मरण आले नसुन विषाळगडाच्या पायथ्याशी असलेला वेढा मोडुन काढताना ते मरण पावले. अर्थात, त्यामुळे त्यांच्या वीरश्रीवर यत्किंचीतही बाधा येत नाहि. पण बेडेकर साहेब अकारण असले दावे करणार नाहि हे नक्की.

टीपीके's picture

4 Aug 2020 - 11:48 am | टीपीके

अगदी हेच लिहिणार होतो. पण त्यात त्यांनी फार खोलात विवेचन केले नाही त्या मुळे फार काही सांगता येणार नाही.

सुंदर लेख मालिका आणि त्यातून संदर्भ पण

दुर्गविहारी's picture

4 Aug 2020 - 7:48 pm | दुर्गविहारी

श्री. शिवभुषण निनाद बेडेकरांनी हा दावा केल्यानंतर त्याच्या पुष्ट्यर्थ काही लिहीले आहे का, हे शोधले पण सापडले नाही. वाचक किंवा सद्स्य यापैकी कोणाला काही माहिती असेल तर जरुर कळवा. कारण हा दावा कशाच्या आधारे केला, त्याचा अभ्यास होणे गरजेचे आहे. वैयक्तिक मला पटत नाही. एकतर सर्व अस्सल साधने "गजापुरची घाटी" असे स्पष्ट लिहीतात. हि लढाई विशाळगडाच्या पायथ्याशी झाली असती तर एतिहासिक साधनात "खेळण्याच्या खाली" असा स्पष्ट उल्लेख असता. ( सिद्दी जोहरचा उल्लेख "पन्हाळ्याच्या खाली" असा स्पष्ट आहे ). शिवाय बाजीप्रभु आणि बांदल सेना विशाळगडाच्या पायथ्याशी पोहचले असते तर त्यांना युध्द करायची गरज नव्हती. विशाळगडावर ताज्या दमाचे सैन्य होतेच. थोडीफार चकमक करुन बाजी आणि सैन्य विशाळगडाच्या पायथ्याशी पोहचले तरी त्यांना गडावर सुखरुप पोहचता आले असते.

शशिकांत ओक's picture

4 Aug 2020 - 1:38 pm | शशिकांत ओक

दुर्ग विहारींनी अत्यंत कष्ट पुर्वक संदर्भ जमवून तयार केलेल्या लेखनासाठी मनःपूर्वक अभिनंदन.
काही काळापुर्वी मिलिटरी कमांडरच्या दृष्टीने अभ्यास करून शिवाजी महाराजांच्या विशाळगडाच्या मोहिमेची मांडणी केली होती.
तीच खरी असे म्हणणे अयोग्य आहे. मात्र त्यामुळे प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली असता मार्ग व त्यांच्या भौगोलिक रचना, चढउतारांचा विचार, रात्रीची वेळ, महाराजांच्या कल्पक युक्त्या यातून एक चित्र सादर केले होते.
इतिहासकार कागदावरील पुराव्यानिशी घटना पाहतात. मिलिटरी कमांडर ती घडवून आणायची असेल तर ते नियोजन कसे करता येईल या अंगाने प्रस्तूती करायचा प्रयत्न करतील. एकंदरीत या विषयावर लेखन करायची उर्मी येत राहो. ही सदिच्छा.

शशिकांत ओक's picture

4 Aug 2020 - 2:18 pm | शशिकांत ओक

दुर्ग विहारींनी अत्यंत कष्ट पुर्वक संदर्भ जमवून तयार केलेल्या लेखनासाठी मनःपूर्वक अभिनंदन.
काही काळापुर्वी मिलिटरी कमांडरच्या दृष्टीने अभ्यास करून शिवाजी महाराजांच्या विशाळगडाच्या मोहिमेची मांडणी केली होती.
तीच खरी असे म्हणणे अयोग्य आहे. मात्र त्यामुळे प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली असता मार्ग व त्यांच्या भौगोलिक रचना, चढउतारांचा विचार, रात्रीची वेळ, महाराजांच्या कल्पक युक्त्या यातून एक चित्र सादर केले होते.
इतिहासकार कागदावरील पुराव्यानिशी घटना पाहतात. मिलिटरी कमांडर ती घडवून आणायची असेल तर ते नियोजन कसे करता येईल या अंगाने प्रस्तूती करायचा प्रयत्न करतील. एकंदरीत या विषयावर लेखन करायची उर्मी येत राहो. ही सदिच्छा.

माझा हा लेख तुम्ही खालील लिंकवर वाचु शकता.ईथे फोटो दिसण्यात काही अडचण आली तर पर्यायी लिंक देत आहे.
पन्हाळ्याचा वेढा आणि पावनखिंडीचा रणसंग्राम- अभ्यासकाच्या नजरेतून