पावनखिंडीचा रणसंग्राम ( भाग ५ )

दुर्गविहारी's picture
दुर्गविहारी in जनातलं, मनातलं
31 Jul 2020 - 1:58 pm

या आधीचा भाग आपण येथे वाचु शकता
पावनखिंडीचा रणसंग्राम ( भाग ४ )

बाजीनी तातडीने खिंड गाठली आणि मोर्चे लावायला प्रारंभ केला. खिंडीच्या दोन्ही उतारावर घनदाट झाडी होती. काही मावळ्यांना गोफणगुंडे घेउन वाटेच्या थोड्या ऊंचीवर बसवले.गोफणीसाठी दगड ? ते तर भरपुर होते. जरा पुढे धनुष्यबाण घेतलेले मावळे थोड्या जास्त उंचीवर बसले.इथून गनीम आरामात बाणाच्या ट्प्प्यात येणार होता. खिंड जेमतेम रुंदीची आणि चिंचोळी होती, एकदोन जण उभारले की प्रत्यक्ष यमही पलीकडे जायचा नाही. इथे बाजी, फुलाजी हातात पट्टे घेउन उभारले. खिंडीच्या अलिकडच्या वळणावर रायजी, शंभुसिंह दबा धरुन बसले. घोडखिंडीचा परिसर आता मृत्युचा सापळा झाला होता.आता गनीम कितीही संख्येने येउ दे, एकही परत जाणार नव्हता. तितक्याच घोड्याच्या खिंकाळण्याचा आवाज येउ लागले, दीन,दीनची ओरड कानावर येती आहे तोपर्यंत पावस, धुक्यातून गनीम दिसु लागला. प्रचंड पावसाने घसरड्या झालेल्या वाटेवर घोड्यांच्या टापाही ठरत नव्हत्या. आले, आले म्हणेपर्यंत विजापुर सैन्याची पहिली फळी खिंडीच्या नजीक आली.ईथे कोणी उभे आहे याची कल्पनाच मसुद आणि त्याच्या फौजेने केली नव्हती.तडाखेबंद पाउस आणि धुक्याने दहा हातापलीकडे धड दिसत नव्हते.वेगाने आलेली शाही फौजेची पहिली फळी अलगद बांदल सेनेच्या तडख्यात सापडली. काही कळायच्या आतच बर्याच जणांच्या मेंदुचा बाणांनी वेध घेतला होता, जरा पुढे गेलेल्यांना दगडाचा सडकून मार पडला, काही समजायच्या आतच जवळपास पहिली गारद झाली. पुढे मराठे उभे आहेत, हे लक्षात आल्यानंतर जे गनीम मागे पळायला लागले त्यांना रायाजी, शंभुसिंहानी आल्लद वरच्या वाटेला लावले.
"पुढे मरहट्टे है, हुजुर " एक वाचलेला, पण रक्तबंबाळ झालेला हशम घाईघाईने मसुदजवळ जाउन म्हणाला.
"क्या ? ये तो गजब हुआ.या खुदा ये मरहट्टे किस मिट्टीसे बने है. उधर सिवाभी मौजुद है क्या ?" मसुदला एक क्षणभर काय करावे समजेना.
त्याने सावधपणे दुसरी फळी पाठवली. आता आदिलशाही सैन्याला अंदाज आल्याने ते चौकसपणे ईकडे तिकडे पहात पुढे सरकत होते, पण अचानक झाडीतून सटासट बाण येउ लागले. पावसाच्या थेंबाशी स्पर्धा करणारा तो बाणांचा मारा होता. धडाधड हशम घोड्यावरुन पडू लागले.
"भागो"
एकच गलका करुन शाही फौजा माघारी पळू लागल्या.इतक्यात _ _ _ _
बाजूच्या कड्यावरुन मोठ मोठे दगड धड धड आवाज करीत येउन डोक्यात आपटु लागले. कित्येक सैनिक काय होते आहे, हे समजायच्या आतच खुदाला प्यारे झाले होते.रडत्,पडत जेमतेम दोनचार सैनिक मसुदपाशी पोहचले.
आता मात्र मसुदला विचार करणे भाग होते.बरोबर पंधरा हजाराची फौज असली, तरी प्रत्येक हल्ल्याला सैनिकांची एक तुकडी जायची आणि हाताच्या बोटावर मोजण्याइतके हशम परत यायचे. त्यातच परत आलेल्या एका सैनिकाने पुढे सिवा नाही, तो निसटून विशाळगडाकडे गेला आहे, हि बातमी दिली होती.आता या घोडखिंडीपाशी फार वेळ घालवून चालणार नव्हता. त्याने थोडे सैनिक गजापुरला पाठवून विशाळगडाकडे जाणारी पर्यायी वाट आहे का, याची विचारण्या करण्यास सांगितले, पण अशी कोणतीही वाट नव्हती. आता घोडखिंडीवर धडक मारण्याखेरीज मार्ग नव्हता.अखेरीस त्याने एक मोठी तुकडी पाठवली.बरोबर बंदुकबाज दिले. एखाद्या पाण्याचा लोंढा यावा तसे हे सैन्य खिंडीवर येउन आदळले. वरुन अर्थातच दगडांचा आणि बाणांचा मारा झाला. अर्थात फौज मोठ्या संख्येने असल्याने बरेच सैनिक कामी आले तरी बर्‍यापैकी हशम खिंडीच्या तोंडापर्यंत पोहचले. बंदुकबाजांनी बेभान मारा चालु केला. अंधाधुंद अश्या त्या फैरींनी काही बांदल सैन्याला टिपले. मात्र बंदुका ठासणीच्या असल्याने एक बार उडवला कि दारु भरायला वेळ लागायचा, शिवाय पावसाच्या मार्‍याने दारु ओली व्हायची, त्यामुळे थोडे मावळे मारले गेले तरी तिखट प्रतिकार मात्र चालुच राहीला. वर उभ्या असलेल्या मराठ्यांनी पुन्हा दगड लोटून दिले. बरेच बंदुकबाज त्याखाली चिरडून मेले. जे विजापुरी सैन्य कसेबसे खिंडीपर्यंत पोहचले होते, त्यांना काकडी कापावी तसे बाजी, फुलाजींनी कापून काढले. रात्रभर पळून थकलेले मराठे प्राण पणाला लावून शाही सैन्याला घोडखिंडीत अडकवले होते. मसुदने पाठवलेल्या मोठ्या तुकडीचा जवळपास फडश्या उडाला. अर्थात या हल्ल्यात मराठ्यांचेही थोडे नुकसान झाले. मसुदला अजूनही समजत नव्हते, नेमके किती मराठे खिंडीच्या परिसरात आहेत. पण मोठी तुकडी पाठवली तरच निभाव लागणार आणि जस जसे ते सैतान मराठे मरणार तरच आपल्याला पुढे जायची वाट मिळणार हे नक्की झाले.बर खिंडीच्या अरुंद वाटेमुळे मोठी फौज पुढे नेता येत नव्हती. पुन्हा मनाचा हिय्या करुन मसुदने बरेच बंदुकबाज आणि भालाईत पुढे पाठवले. त्याचाही नतिजा तोच झाला.बरेच जण स्वर्गाच्या वाटेला लागले, मात्र त्यांनी मराठ्यांचीही हानी केली.त्यामुळे मसुदने पाठवलेली पुढची तुकडी बर्‍याच वेगाने खिंडीच्या जवळ जाउ शकली. अर्थात खिंड ओलांडणे त्यांना या जन्मी तरी शक्य नव्हते.दोन्ही हातात पट्टे घेउन उभारलेले बाजी, फुलाजी अगदी काळभैरव आणि मार्तंडभैरवाचे अवतार वाटत होते.दोन्ही हातांनी पट्टे फिरवणारे बाजी एखाद्या चक्रासारखे फिरत होते. थेट त्या पट्ट्याखाली आलेले हशम निदान सुटले तरी, त्यांना थेट मुक्ती मिळाली, मात्र ज्याचा एखादा हात्,पाय गेला त्याला वेदना सहन करत निमुटपणे मृत्युची वाट बघण्याशिवाय पर्याय नव्हता.
ईतक्या तुकड्या पाठवूनही विजापुरची फौज खिंड पार करु शकत नव्हती.हे मराठे आदमी आहेत कि शैतान
? स्वराज्यावर आक्रमण करुन मराठ्यांच्या तलवारीचा तडाखा खालेल्या बहुतेक पातशाही सरदाराला पडलेला प्रश्न आज मसुदला पडला. जवळपास पाच घटका हाच प्रकार सुरु होता. मसुदने आपली स्वताची सिद्द्यांची फौज खिंडीवर रवाना केली. काळेकभिन्न, जाड ओठांचे,आडव्या अंगाचे दैत्यासारखे भासणारे सिद्दी खस्सु! खस्सु ! अशी त्यांची युध्दगर्जना करित पुढे चालून गेले.अर्थात पुढे असलेल्या बर्‍याच जणांना काही समजायच्या आत मुंडकी हवेत उडाली. रायाजी,शंभुसिंह झाडी, दगडाच्या आडोश्याने चोख काम करत होते, त्यातून वाचून चढ चढून कसेबसे खिंडीपाशी पोहचावे तो बाजींचा पट्टा सपकन हवेत फिरायचा आणि काही समजायचा आतच वार कारिगर झालेला असायचा. पण __ _ _ _ _ _
साक्षात चित्रगुप्ताने लिहीता लिहीता थांबावे, कळीकाळाच्या काळजाचाही ठोका चुकावा असा क्षण आला. एका बंदुकबाजाने दुसर्‍या हशमाच्या आडून झालेल्या गोळीने आपले काम चोख केले होते.थेट वज्रासारख्या बाजींच्या छातीचा वेध घेतला होता. रक्ताची चिळकांडी उडाली.बेभान वेगाने घोडखिंडीच्या तोंडावर फिरणारे सुदर्शन चक्र थांबले. बाजी त्या धडाक्याने मागे कोसळले. बाजी पडले तरी प्रतिकार संपला नव्हता, फुलांजीनी तातडीने त्यांची जागा घेतली. बाजींच्या पतनामुळे डोळ्यात रक्त उतरलेल्या आणि एन आषाढाच्या पावसात डोक्यात बदल्याचा वडवानल पेटलेल्या फुलांजीसमोर एकही सिद्दी सैनिक उभा राहू शकला नाही. मावळ्यांनी बाजींना घाईघाईने मागे एका झाडीखाली नेले. थोडे क्षण बाजी बेहोश होते.बाजींचा पुर्ण अंगरखा रक्ताने भरला होता. आजुबाजुच्या भागात थारोळे जमले होते. इतक्यात बाजींनी डोळे उघडले आणि विचारले, "तोफांचे बार झाले का ?"
"अजून नाही" खालमानेने एका मावळ्याने उत्तर दिले.
"अजून नाही ? मग हा बाजी पडतो कसा ? स्वामीकार्य अजून पुरे झाले नाही.आता काळ समोर ठाकला तरी आम्ही एकणार नाही. तोफेचे बार एकेपर्यंत या बाजीच्या कुडीतील प्राणालाही बाहेर जाता येणार नाही" बाजी कसेबसे उठून बसले.
"बाजी, तुम्ही विश्रांती घ्या. खिंडीची तुम्ही काळजी करु नका. शेवटचा मावळा पडेपर्यंत एकही गनीम या खिंडीपलीकडे यायचा नाही" मावळ्यांनी बाजीना थांबवायचा प्रयत्न केला.
"नाही ! आम्ही स्वामीनां वचन दिले आहे, तोफेचे बार एकेपर्यंत या बाजीला उसंत नाही." कसाबसा झाडाचा आधार घेउन बाजी उठले, शेजारी मावळ्यांनी काढून ठेवलेले पट्टे पुन्हा चढवले आणि झाडाचा, कड्याचा आधार घेत कसेबसे खिंडीच्या तोंडाशी आले, तोच बर्‍याच गनीमांनी फुलाजींना वेढलेले दिसले. फुलाजी रक्ताचा अभिषेक केल्यासारखे दिसत होते, पण बेभानपणे पट्टा चालवत होते.काळ्या दैत्यासारखे दिसणारे सिद्दी हशम जवळ यायचे धाडस करित नव्हते.पण अचानक हवा चिरत आलेल्या एका भाल्याने नेमका वेध घेतला आणि फुलाजी पडले. डोळ्यासमोर सख्खा भाउ पडलेला, अजून तोफेचे बार नाहीत.अंगातील सर्व त्राण एकवटून बाजी वीजेच्या चपळाईने पुढे आले.पट्ट्याच्या पहिल्या केलेल्या हातात तीन सिद्दी सैनिक धाराशायी झाले. अचानक बाजींनी केलेल्या मार्‍याला बिचकून खिंडीपर्यंत पोहचलेल्या सैनिकांनी मागे पळ काढला. बंदुकीच्या गोळीने पडलेला हा मराठा पुन्हा लढायला उभा रहातो ? या खुदा ये मराठे किस मिट्टीसे बने है ? मसुदने पाठवलेल्या सैन्याची पुढची फळी तोपर्यंत धडकली. मसुदची जेमतेम एक चतुर्थांश फौज शिल्लक राहीली होती.हि खिंड आज पार करणार कि नाही ? मसुदला काहीच समजत नव्हते. मावळ्यांचा तडाखा जबर बसला होता, भरीला या मुलुखातला हा पाउसही गनीम झाला होता.चिखलाने भरलेल्या घसरड्या आणि निसरड्या वाटावर धड चालणे जमत नव्हते तिथे झुंज कशी द्यायची ?
ईतक्यात _ _ _ _ _
"धाड ! धाड !! धाड !!!
तोफांचे पाच बार एकू आले. विजापुर फौजेला हे बार कशासाठी हे समजेना. पण हेच बार बाजीच्या कानी पडले आणि ईतक्यावेळ धरुन ठेवलेले पंचप्राण आता उडून जायला आतूर झाले. बाजींच्या डोळ्यासमोर अंधारी आली.अचानक बाजी खाली पडले, कसेबसे त्यांनी हात जोडले "राजे ! येतो. आपण सुखरुप पोहचलात, या बाजीच्या जीवाचे सोने झाले. आता कोणतीही चिंता नाही, निशंक मनाने आम्ही डोळे मिटायला मोकळे झालो" शांतपणे त्यांनी डोळे मिटले आणि क्षणभरात बाजींची मान कलंडली. मावळ्यांना हुंदका अनावर झाला, पण शोक करायला वेळ नव्हता.गनीमांची पुढची तुकडी खिंड चढताना दिसत होती.घाईघाईने बाजी,फुलाजी यांचे देह उचलून मावळे जंगलात गडप झाले.
मसुदची हि तुकडी बिचकत खिंड चढली, पण त्यांना कोणताही प्रतिकार झाला नाही. बहुतेक मरहट्टे पळाले वाटतं. चटकन काही हशम हि खबर द्यायला मसुदकडे गेले.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------
राजांची पालखी विद्युत वेगाने विशाळगडाकडे निघाली होती. बाजींना घोडखिंडीत गनीमाच्या तावडीत सोडून जाताना राजांचा जीव वरखाली होत होता. केव्हा एकदा विशाळगडावर पोहचतो आणि तोफेचे बार करतो असे त्यांना झाले होते.पण अजून चार कोस वाटचाल करायची होती.त्यात विशाळगडाच्या पायथ्याशी सुर्यराव सुर्वे आणि जसवंतरावांनी दिलेला वेढा फोडायचा होता.विजापुरी सैन्य बोलून चालून परके, पण हे सुर्वे,पालवणीकर तर आपलेच लोक, तरीही हे आपल्याविरुध्द नेटाने लढतात.कधी या लोकांच्या डोक्यातील हि गुलामगिरीची धुळ धुतली जाणार ? इतक्यात वळणावरुन विशाळगड डोकावला आणि राजांना हायसे वाटले. थोडे अंतर काटल्यावर सुर्वे,पालवणीकर यांनी घातलेला वेढा दिसायला लागला, त्यांच्या तंबुवरची ती आदिलशाही निशाने पावसाने भिजली होती. तातडीने राजे पालखीतून खाली उतरले आणि सप्पकन म्यानातून जगदंबा बाहेर आली. स्वतः राजे मोहरा घेत आहेत हे पाहिल्यावर तीनशे बांदलांच्या फौजेला आगळाच जोष चढला, प्रत्येक मावळा जणु रुद्राची सावली झाला.तो मार सुर्वे , पालवणीकराच्या फौजेला आवरेना.विशाळगडासमोर जिथे या दोघांनी छावणी केली होती ती जागा आधीच तोकडी होती, त्यात हा बेभान मारा. प्रत्येक मावळ्याच्या तलवारीतून राग बाहेर निघत होता, सिद्दी, जोहरवरचा राग, मसुदवरचा राग, फाझलवरचा राग आणि मुख्य म्हणजे या दोन गद्दारांवरचा राग. हा मारा दोन्ही फौजेला अजिबात झेपला नाही, सगळ्या फौजा आजुबाजुच्या रानात पळाल्या. मोठा अडथळा दुर केल्यानंतर राजे घाइघाईने गडाच्या मुंढा दरवाज्याकडे गेले.पहारेकर्‍याने दरवाजा उघडून मुजरा घातला.पण तिकडे अजिबात लक्ष न देता राजे घाइत तोफा तैनात केल्या होत्या तिकडे गेले आणि तोफा उडवायचा हुकुम सोडला. आणि मग महाराज शांतपणे गडाच्या सदरेकडे चालु लागले.
सदरेवर महाराजांच्या गडकरी वाट बघत उभा होता. "महाराज, आपला संगावा होता,त्याप्रमाणे गडावर फौजा तयार आहेत. आपण थोडी विश्रांती घ्यावी."
"नाही किल्लेदार, आम्हाला बाजींची प्रतिक्षा आहे,ते आल्याशिवाय आमचे चित्त थार्‍यावर लागायचे नाही" राजे सदरेत बसुन राहीले.
विशाळगडाखाली भीषण शांतता पसरली होती.गेली दोन महिने वेढा घालून बसलेल्या सुर्वे, पालवणीकरांच्या छावणीत कोणीही नव्हते.पण दोन घटका गेल्या,अचानक घोड्यांच्या टापांचा आवाज एकू येउ लागला.आदिलशाही चांदतारा फडकवत फौज येताना दिसत होती.हि तुकडी झाडीतून सुर्व्यांच्या फौजेने पाहीली असेल.घाईघाइने दोन्हीकडचे सैन्य खाली उतरले. इतक्यात मसुदची तुकडी थेट खाली येउन पोहचली. पुन्हा एकदा लगबग सुरु झाली.विशाळगडाला नव्याने वेढा घालायची तयारी शाही फौजेने पुन्हा केली.आता मात्र विशाळगडाच्या किल्लेदाराच्या कपाळीची शीर ताडताड उडू लागली, त्याची भिवई चढली, त्याने आपली ताज्या दमाची फौज बाहेर काढली आणि या विजापुरच्या सैनिकांवर सोडली. प्रचंड दमलेल्या आणि पराभवाचे तडाके खालेल्या विजापुरी फौजेला दम निघालाच नाही. पहिल्याच दणक्यात फौज अर्धा कोस मागे हटली. मराठे जोशात आहेत असे बघून शाही फौजा पाठ दाखवून पळत सुटल्या.काही मावळे हि विजयाची खबर महाराजांना द्यायला गडावर परत गेले.
राजांना मसुदच्या फौजेला मार दिल्याचे एकून आनंद झाला, पण अजून त्यांचे लक्ष बाजी आणि बाकी बांदलसेना कधी येते, याकडेच होते. दिवस मावळत आला होता. इतक्यात समोरच्या झाडीतून राहिलेले बांदल सैनिक गडाच्या दिशेन उतरले आणि गड चढू लागले.
काही मावळे सदरेवर राजांसमोर जाउन उभारले. राजांनी मोठ्या आतूरतेने विचारले, "बाजी,फुलाजी,रायाजी कोठे आहेत ?आम्हाला त्यांना लगेच भेटायचे आहे"
"राजे बाजी, फुलाजी आणि रायाजी तिघेही घोडखिंडीत गनीमाला तोंड देताना धारातिर्थी पडले.बाजीना बंदुकीचा बार लागला, पण तरीही उठून त्यांनी झुंज दिली.फुलाजी गनीमाने केलेल्या दग्याने गेले" खालमानेने मावळा म्हणाला.
"काय ? बाजी गेले ? आम्हाला संध्याकाळी विशाळगडावर भेटायचा शब्द देउन वचन मोडून बाजी गेले" राजांच्या मुखावर विषाद दाटून आला.भावना तीव्र झाल्याने राजे महालात निघून गेले.
किल्लेदार पुढे झाला आणि त्याने बाजी,फुलाजी प्रभूंच्या अंत्यसंस्काराची तयारी केली. अग्नी द्यायला राजांना बोलावले गेले. शेवटी राजेच या प्रत्येकाचे मायबाप होते. 'रायरेश्वरावर शपथ घेतल्यानंतर आम्ही संघर्षाला सुरवात केली. हि वाटचाल सोपी नाही याची आम्हाला कल्पना होतीच. वतनदारीची फुले असलेली वाट सोडून आम्ही हि काटेरी वाट पकडली तेव्हाच आम्हाला त्याग करायला लागणार याची कल्पना होतीच. स्वराज्य स्थापना करायची म्हणजे रुद्राला रुधीराभिषेक करावा लागतो. नुसत्या फुले वहाण्याने तो प्रसन्न होत नाही. हे कार्य करताना अपेक्षेप्रमाणे पातशाह्यांनी सरदार पाठविले. प्रत्येक झुंजीत आमचे असंख्य मावळे पडले, जीवाभावाचे सखे गेले. बाजी पासलकर, सुर्यराव जेधे किती सांगावे.स्वातंत्र्यसुर्य प्रसन्न करायचा तर ही आहुती द्यावी लागते. आम्हाला अजून किती जणांना कायमचे मुकावे लागणार आहे ?'
राजांच्या मनातील प्रश्न संपायला तयार नव्हते.जड अंतकरणाने त्यांनी मशाल पुढे करुन दोन्ही चितांना अग्नी दिला आणि शांतपणे एका बाजुला उभारले.आषाढाच्या सरी अजून कोसळत होत्या, त्या राजांच्या चेहर्‍यावरुन वहाताना अश्रूंना सोबत घेउन विशाळगडाच्या भुमीत मिसळत होत्या.
समाप्त

( मह्त्वाचे निवेदनः- वरील कथानक हे खाली दिलेल्या संदर्भाचा आधार घेउन लिहीले आहे. कथानक पुढे नेण्याच्या दृष्टीने काही लेखनस्वातंत्र्यही घेतले आहे. यामध्ये वेढ्यातून सुटून जाताना शिवा काशिद यांचा प्रसंग का नाही ? असा वाचकांना प्रश्न पडेल. शिवभारत, एकन्नव कलमी बखर, जेधे शकावली अश्या कोणत्याच ग्रंथात या प्रसंगाचा उल्लेख नाही, पण याचा अर्थ या समरप्रसंगात शिवा काशिद यांचा सहभाग नव्हताच असे म्हणणे चुकीचे होईल. पन्हाळ्याच्या सावलीत शिवा मोठे झाले, याचा अर्थ पन्हाळा आणि परिसराची त्यांना खडानखडा माहिती असणार. याचा महाराजांनी नक्कीच वापर केला असणार. समोरच्याशी उत्तम संवाद साधने ह्या त्यांच्या गुणाचाही यथोचित वापर या प्रसंगी झाला असणे शक्य आहे.वेढ्यात महाराजांचे हेर म्हणून शिवा काशिद वावरले असावेत.स्थानिक असल्यामुळे त्यांना वेढ्यातील कमजोरी सहजगत्या समजली असेल. म्हणजे शिवा काशिदांनी पन्हाळ्याच्या वेढयातून शिवाजी महाराजांच्या सुटकेच्या प्रसंगी महत्वाची कामगिरी बजावली असणार. शिवा काशिद दुसर्‍या पालखीत बसुन जोहरच्या वेढ्यात गेले हि शक्यता यासाठी कथानकातून वगळली आहे कि इतक्या मोलाचा माणसाला शिवाजी महाराज स्वतःसाठी प्राणार्पण करायला लावणार नाहीत. सिंहगडाच्या मोहीमेवर तानाजी मालुसरे यांच्या एवजी स्वत महराज जाणार होते, आग्र्याहून सुटकेच्या प्रसंगी महाराजांनी स्वताची एकुण एक माणसे सुरक्षित परत आणली, मागे औरंगजेबाच्या तावडीत सापडलेल्या वकीलांना सोडवण्यासाठी पत्रव्यवहार केला, कोंडाजी फर्जंदसारख्या वीराचा तर मोहीम सुरु होण्यापुर्वीच सत्कार केला, पुरंदरावर मोलाची माणसे बळी जात आहेत हे लक्षात आल्यावर तह पत्करला.यावरुन महाराज एकाही पदरच्या व्यक्तीला जीवावरच्या प्रसंगाला सामोरे जाउ देणार नाहीत. उलट शिवा काशिद या गुणी हिर्‍याचा त्यांनी आणखी उपयोग केला असणे शक्य आहे. कदाचित एखाद्या समरप्रसंगात त्यांना वीरमरण आले असणे शक्य आहे. वीर शिवा काशिद यांचा अनवधानाने सुध्दा अपमान होउ नये अशी भावना आहे. पुढे काही अस्सल कागदपत्रे उप्लब्ध झाली तर शिवा काशिद यांच्यासारख्या स्वराज्यावर प्राणपुष्प अर्पण करणार्‍या वीराच्या पराक्रमाची गाथा समोर येईल.कृपया कोणताही गैरसमज नसावा हि विनंती. आपल्या प्रतिक्रीया जरुर कळवा. )

इतिहासलेख

प्रतिक्रिया

दुर्गविहारी's picture

31 Jul 2020 - 2:05 pm | दुर्गविहारी

मी गेले चार वर्ष मिसळपावच्या मंचावर माझे लिखाण प्रकाशित करत आहे. आजपर्यंत केलेले लिखाण बर्‍यापैकी तांत्रिक स्वरुपाचे म्हणजे माहिती देणारे होते. ललित स्वरुपाचे लिखाण कधी केले नव्हते. माझ्या आयुष्यातील या पहिल्याच प्रयत्नाचे मि.पा.करांनी भरभरुन कौतुक केले त्याबध्दल मनापासून सर्वांचा आभारी आहे.
अर्थात हि कथा वाचल्यानंतर अनेकांच्या मनात खुप प्रश्न आलेले आहेत आणि ते स्वाभाविकच आहेत. कारण आजपर्यंत आपण सर्वांनी जो इतिहास वाचला त्याला छेद देणारे काहीतरी मी लिहीलेले आहे.अर्थात त्यासाठी मी कसे संदर्भ घेतले आणि नेमका काय विचार केला हे स्पष्ट व्हावे यासाठी चर्चा विभागात एक वेगळा धागा काढला आहे. तिथे सर्व सदस्य आपल्या शंका उपस्थित करतील किंवा एकंदर घटनेचे नवे पैलू समोर येतील अशी आशा करतो.
धाग्याची लिंक
पन्हाळ्याचा वेढा आणि पावनखिंडीचा रणसंग्राम- अभ्यासकाच्या नजरेतून

आज शेवटचा भाव वाचून, परत सगळे भाग सलग वाचून काढले!

ह्या मालिकेसाठी माझा तुम्हाला मानाचा मुजरा!

- (मुजरा करणारा मावळा) सोकाजी

अभ्या..'s picture

31 Jul 2020 - 3:39 pm | अभ्या..

राजे सदरेत बसून राहीले
वाचलं की डोळ्यात पाणी आले.
असा राजा असला की असे बाजी असतात.
.
सुंदर लेखमाला दुर्गविहारी. जागलात नावाला.

प्रचेतस's picture

31 Jul 2020 - 3:50 pm | प्रचेतस

अत्यंत सुरेख लेखन.
लिहित राहा.
अजूनही अशा रोमहर्षक प्रसंगांवरही लेखन येऊ द्यात.

ज्ञानोबाचे पैजार's picture

31 Jul 2020 - 5:28 pm | ज्ञानोबाचे पैजार

लेखमाला मस्त झाली,
राजांचे चरित्र तोंडपाठ असले तरी ते परत परत ऐकावेसे वाटते आणि तुम्ही तर त्यातले बारकावे यथासांग टिपले आहेत त्याने फारच मजा आली.
तुम्ही जरुर अशा प्रकारचे लेखन करा वाचायला नक्की आवडेल.
पैजारबुवा,

भीमराव's picture

31 Jul 2020 - 9:32 pm | भीमराव

नमन, दंडवत परिणाम, शिरसाष्टांग नमस्कार.

विजुभाऊ's picture

31 Jul 2020 - 11:23 pm | विजुभाऊ

शिवाजी महाराजांच्या आयुष्यातले प्रसंग पाठ असले तरिही पुन्हा पुन्हा प्रत्यय घ्यायला नेहमीच आवडते. अंगी स्फुरंण चढते. हे खरेच.
छान लिहीलय. चित्तथरारक .
शिवा काशिद यांच्या बद्दलचे निवेदन पटले

तुषार काळभोर's picture

31 Jul 2020 - 11:44 pm | तुषार काळभोर

जबरदस्त प्रसंगाचं तितकंच उत्कट रेखाटन..

पण प्रत्येकवेळी सारखाच रोमांचकारी वाटतो. शिवकार्यच ते.
कसदार लिहीलय दुर्गविहारीजी.

सुमो's picture

1 Aug 2020 - 5:36 am | सुमो

सुरेख झाली आहे. ललितलेखनात दमदार पाऊल टाकले आहे. असेच उत्तम लेखन आपल्याकडून लिहिल्या जावो.

रोमांचक, काळजाचा ठाव घेणारी लेखनमाला.

अत्यंत अभ्यासपूर्ण आणि रोचक लिखाण.

शिवा काशिद यांच्याबद्दलचे स्पष्टीकरण पटले.

आपल्याकडून अशाच अनेक लेखमालांच्या प्रतिक्षेत.

टवाळ कार्टा's picture

1 Aug 2020 - 6:50 pm | टवाळ कार्टा

भारी लिहिली आहे अख्खी लेखमाला

बबन ताम्बे's picture

1 Aug 2020 - 11:31 pm | बबन ताम्बे

पावनखिंडीतील रणसंग्रामाचे अदभुत वर्णन !
अंगावर क्षणोक्षणी रोमांच उभे राहिले. भालजी पेंढारकरांच्या राजा शिवछत्रपती या चित्रपटातील पावनखिंडीतील लढाई यानिमित्ताने आठवली. त्यात बाजीप्रभूंचे काम करणाऱ्या कलाकाराने आपल्या अभिनयातून त्या प्रसंगात अक्षरशः जीव ओतलाय. तुमची ही मालिका वाचून हेच म्हणावेसे वाटतेय

आता शाईस्तेखानावर सर्जिकल स्ट्राईक यावर पण अशीच रोमांचकारी लेखमाला तुमच्याकडून येवो ही विनंती.

अप्रतिम! संपूर्ण लेखमाला पुनःपुन्हा वाचून काढली. फारच छान. अभ्यासाला कलात्मकतेची जोड देत ऐतिहासिक तथ्यांना धरून आणि दंतकथांचा मोह टाळून लिहिलेली आणि तरीही तितकीच रोमांचक व स्फूर्तिदायक वाटणारी लेखमाला.

शेवटचा अभ्यासकाच्या नजरेतून हा भागही वाचला आहे.

दुर्गविहारी's picture

2 Aug 2020 - 9:58 pm | दुर्गविहारी

सर्वच वाचकांना आणि ईथल्या जाणकार वाचकांना मनापासून धन्यवाद ! __/\__
असेच आणि आणखी लिखाण ईथे द्यायचा प्रयत्न करेन.

बेकार तरुण's picture

3 Aug 2020 - 1:22 pm | बेकार तरुण

अप्रतिम... खूप आवडली ही मालिका....
तुमच्याकडुन लिहिलेल्या अजुन अनेक मालिका वाचण्यास उत्सुक.....

सौ मृदुला धनंजय शिंदे's picture

4 Aug 2020 - 10:40 pm | सौ मृदुला धनंजय...

रोमांचक आणि दमदार लेखनमाला. वाचताना डोळ्यात पाणी आले.

सगळे भाग एकदम वाचून काढले.
डोळ्यातून पाणी कढलत _/\_

सुंदर लेखन केलं आहे, पुढे काय झालंय हे शेकडोवेळा वाचून सुद्धा तुमच्या लेखन कौशल्यामुळे पुढे काय ही उत्सुकता लागून राहिली... प्रत्यक्ष जगल्यासारख वाटलं.

शशिकांत ओक's picture

5 Sep 2020 - 11:41 am | शशिकांत ओक

शिवाजी महाराजांच्या भेटतील नाट्य आणि लढाईच्या धामधुमीतील थरारकता वाचताना अनुभवायला येते... यात नकाशांची भर घालता येईल तर आणखी रंजकता वाढेल.