सायकलायण : १. पुणे ते कर्दे ( दापोली)

गणेशा's picture
गणेशा in भटकंती
19 Jul 2020 - 10:38 pm

प्रस्तावना :
२०१४ पासुन प्रवासवर्णन आणि ट्रेकिंगचे सगळे लिखान बंद होते. खुप फिरलो नंतर मी, पण 'ही वाट भटकंतीची'.. ही माझी भटकंतीची सिरीज मी कधीच पुढे लिहिली नाही..
आता सायकलचा हा प्रवास लिहितोय ते ही १.६ वर्षांनंतर.. काही गोष्टी विसरल्या असतील काही चुकल्या असतील.. तंतोतंत वर्णन आणि काही बारीक तपशिल यात कदाचीत राहिले असतील पण हरकत नाही.. हे लिखान पुन्हा फक्त माझ्यासाठीच लिहितोय. यात नंतर येणारा निसर्ग आणी घटना जास्त शब्दांनी फुलवल्या नाहीत. कारण जास्त आठवत नाहीये, काही घटना , प्रवासातील छोट्या छोट्या घटना आता निटस्या आठवत नाहीत. त्याचा कसुर भरुन काढण्यासाठी त्याचे वर्णन फोटोतुन जाणुन घ्यावे असे वाटते. म्हणुन फोटो जास्त देतोय यावेळेस. पुढच्या वेळेस प्रवास वर्णन तेंव्हाच तेंव्हाच लिहिण्याचा प्रयत्न करेल.
------------------------
1

सुरुवात
आपल्याला माहिती होते, आपण काय व्यायामाची किंवा वजन कमी करायची नाटके करायला सायकल घेत नव्हतो... आपल्याला आवडते मुक्त जगायला.. निसर्गात हिंडायला..ढगांची चादर लपेटुन बसलेल्या हिरव्या गार डोंगरांना भेट द्यायला.
आषाढातला मेघ मल्हार आपल्याला लय आवडतो... पावसाचा हा खेळ जंगलात, रानावनात अनुभवताना आपण सारे भान विसरुन जातो. नंतर येतो श्रावण.. हळुवार, नाजुक अलवार सूर घेवून आलेला श्रावण ही आपल्याला खुप आवडतो.. सारी धरती हिरवा शालु घालुन नवयौवन वधु सारखी नटलेली असते, इंद्रधनुष्याच्या रंगीत कमानी आणि फुलांचा मोहक सुगंध श्वासा श्वासात अनुभवताना मस्त वाटते.

सायकल म्हणजे पुन्हा निसर्गात जायचे.. , रखरखीत रोड असुद्या किंवा झाडांच्या गर्दीतील रस्ता असुद्या त्यातुन हळुच अंतरे कापत जायचे, हळुच पाहिजेल तेथे थांबायचे.. जिथे जाईल तिथे तिथल्या लोकांच्यात मिसळायचे.. त्यांच्याशी बोलायचे .
सायकल ही आवडीची गोष्ट आहे, तीला व्यायाम, वजन असल्या गोष्टीमध्ये बांधुन ठेवुन आनंद का कमी करायचा ? उलट जिथे जाईल तिथे बिंधास्त खायचे, प्यायचे.. ऐश करायची...मी फ्युजी या कंपनीची सायकल आराध्याच्या वाढ दिवशी घरात आणली होती..

तर मी सायकल घेतली, आणि मग माझे गावाकडचे मित्र चेत्या आणि योग्या यांनी ही सायकली घेतल्या.. लिहिताना ही योग्या आणि चेत्याच बोलणार त्यांना, बालपणीच्या मित्रांना उगाच गुळमट पणे हाका मारणारे आपल्याला आवडत नाही. गावाकडं जे बोलायचो तसेच अजुनही..
आणि चेत्याचा आणि माझा सायकलवर कोकणला जायचा प्लॅन ठरला.. पुणे लोणावळा हा १०० किमी सायकलिंगचा आम्हाला अनुभव होता, या पावसाळ्यात तेव्हड्याच फेर्‍या झाल्या होत्या २-४. एकदा ७० किमीच आडवाटेवरती कासारसाई ला जावून आलो होतो ती एक ट्रीप.

मला सायकल वर कोकणात जायचे होते.. चेत्याला ही कल्पनाच भारी वाटली होती.. कुठलीही आव्हाने असल्यास चेत्याला ती पुर्ण केल्याशिवाय राहवत नाही.. हे ही तसेच, त्याने ट्रेक ची सायकल घेतली... आणि आमच्या कोकणच्या प्लॅन ला अमलात आणायचे आराखडे सुरु झाले..
चेत्या म्हणजे प्लॅन त्याचा, आणि आम्ही त्याचे गप ऐकुन घ्यायचे.. हे नेहमीचेच आहे. तो आम्हाला बोलण्यात काही ऐकत नाही.. भांडणात पण नाहीच :-)).

सुरुवातीला आम्ही दोघेच होतो, चेत्या ने नंतर त्याचे उरुळीतलेच मित्र गणेश बकरे( गणेश बी म्हणु) आणि पोपट यांची ओळख करुन दिली आणि त्यांना ही कोकणाच्या प्लॅन मध्ये सामिल करुन घेतले.. सायकल प्रेमाचे असेच असते, आपण चटकन दुसर्‍यांना त्यात ओढुन घेतो..

गणेश बी आणि पोपट ने एमटीबी घेतल्या होत्या, आमच्या हायब्रीड होत्या. आणि सुरुवात झाली आमच्या खरेदीला.. मग आम्ही डिकॅथॉलॉन ला जायचो कायम,
पोपट ची सायकल १५,००० ची मोन्ट्रा आणि घेतलेले सामान एकुन २०,००० प्लस रुपयांचे झाले होते :). म्हणजे चार आण्याची कोंबडी आणी बारा आण्याचा मसाला ही गत झाली होती.. सायकल अक्सेसरीज चा खर्च हा सुद्धा सायकल घेताना लक्शात घेणे जरुरी असते हे आम्हाला उशिरा कळाले.
लाईट्स, ब्लिंकर,हेल्मेट, २-२ सायकल कॉस्च्युम, हॅडग्लोज, फोरआर्म, बॅग, पॅनियर /कॅरीअर, त्याच्या बॅग्स, एक्स्ट्रा ट्युब, पंक्चर किट, वजनाला हलका सायकल पंप अश्या अनेक गोष्टी १०-१५ हजार घालवावे लागतातच :).. तुम्ही अगदीच निरुत्साही असला असले सगळे घ्यायला तरी ५-६ कुठे गेले नाहीच ...

कोकण ट्रीप - कर्दे, दापोली सुरुवात

दिवाळी झाली आणि बायको माहेरी गेली, बायको माहेरी गेली की मग सायकलिंग बिनधास्त कुठे ही कितीही दिवस करता येते.. ते म्हणतात ना " प्रत्येक यशस्वी सायकलिस्ट च्या मागे त्याच्या बायकोचा घराबाहेर माहेरी गेलेला पाय असतो..".
कोण म्हणाले असे ? अहो मीच :).

मग आमच्या प्लॅन ला उधान आले.. चेत्या ने पोपट आणि गणेश बी ला घेवुन, उरुळी वरुन शिंदवणे घाटातुन सासवड कडे जाणार्‍या रोड वरुन फेरफटका मारला ५० एक किलोमिटरचा. पोपट ने येव्हडे सायकलिंग कधी केले नव्हते.. त्याला बघता, तो दमला ह्यात आम्हाला काहीच नवल वाटले नव्हते...

ह्या सगळ्या परिस्थीतीत, दोन नवीन भिडु कसे आहेत हे मला माहीत नसताना, मी आपले पुणे ते आरावी(दिवेआगार) असा कमी अंतराचा प्लॅन आखला होता.. चेत्याला ट्रीपमध्ये राजेशाही थाट लागतात... त्याचे आणि माझे म्हणणे नेहमीच विरुद्ध असते, आणि मलाच नेहमी कमीपणा घ्यावा लागतो.. चालते यालाच मैत्री म्हणतात.
मग दिवेआगार, आरावी कसे मागास, तिकडे कसा समुद्र कर्दे येव्हडा छान नाही, आणी गर्दी आणि इतर सगळी त्याची कारणे झाली.. आणि त्याच्या म्हणण्याने आम्ही कर्दे, दापोली हा प्लॅन केला..
माझा त्याच्यापुढे दुसरा असा कुठलाही मार्ग नसतो.. एकच मार्ग असतो तो म्हणजे शरणागती.. ( पण कर्दे ला गेल्यावर कळाले, हाच प्लॅन भारी होता.. पुढे येइलच)..

उरुळीवरुन आधल्या रात्री सगळे माझ्या घरी गाडीत येतील आणि मग माझे घर ते कर्दे असा प्लॅन होता. चेत्याच्या इनोव्हा मध्ये २ सायकल बसतात. एक सायकल कशी आणायची ह्याचा विचार होता.. आमच्याकडे रीअर मॉऊंटन रॅक नव्हते गाडीचे. मग दोन दिवस आधी पोपट पुण्यात येणार होताच तर त्याने त्याची सायकल त्याच्या गाडीत माझ्या घरी आणुन ठेवली आधी.

मी माझी सायकल धुतली, सायकल च्या च्येन ला च्येनल्युब लावले, हवा भरली, सगळ्या बॅग भरल्या. आणि पोपटची सायकल काढली चैन ल्युब लावायला. आणि कळाले त्याचे ब्रेक रीम ला घासत होते, चैन पण थोडी स्मूथ वाटत नव्हती.. मी लगेच काळेवाडीच्या बोडके सायकल्स मध्ये त्याची सायकल न्हेली आणि ती निट करुन आणली.. पोपट ला पण सांगितले ( मग तो म्हणाला त्यामुळेच मला दम लागत होता तर :), हे खोटे आहे कळेल पुढे).

चेत्या ने त्यांना कोकणट्रीप कशी मस्त. फक्त हिंजवडी , पिरंगुट फाट्यापर्यंतच चढ, मग कसा सगळा उतारच आहे असे सांगितले होते हे मला नंतर कळाले..
मला सकाळी लवकर उठुन आल्हाददायक वातावरणात सायकल चालवायला सुरुवात करायची असती... चेत्याला थोडे निवांत लागते, त्याला नाष्टा करुन मग सुरुवात.
तरी पहिलाच दिवस असल्याने माझ्या म्हणण्याने अगदीच ५:३० - ६ ला निघालो नाही तरी चेत्याच्या म्हणण्यापेक्षा लवकरच म्हणजे ७ ला आम्ही ट्रीप ला सुरुवात केली..

पुणे ते माणगाव(११० किमी)
सुरुवातीला घरातुन निघताना फोटो काढुन झाले, मला पुर्वी फोटो काढायला आवडत नसत.. नंतर नंतर फोटो काढण्याची धुंदी माझ्यात आली. पण चेत्याला स्वताचे असंख्य फोटो काढायचे असतात. त्याच्या इतके फोटो काढुन घेणे नाही आवडत मला.
त्यामुळे फोटो फोटो करुन चेत्याची आणि आमची पहिली लॉंग सायकल ट्रीप सुरु झाली..मी आणी चेत्या यांना सराव होता.. गणेश बी आणि पोपट हे सायकल साठी नविन होते आणि त्यांच्याकडे एमटीबी होत्या.. मी पुढे, मागे हे दोघे आणि सर्वात मागे चेत्या असे आम्ही लाइनीत चाललो होतो...

2
सुरुवात

घोटावडे फाट्याला वळताना आम्ही थांबलो. पाणी पिलो थोडे आणि पुन्हा पौड माले कडे आम्ही कुच केली.. पोपट ने हिंजवडी पासुनच दमलो राव आता चढ नाहिये ना जास्त असे गणेश बी ला २-४ दा विचारले होते.. घोटावडे फाटा.. फार तर माले गेल्यावर सायकल जणु काय आपोआप चालेल असे त्याला का वाटले होते माहीत नाही..
या सायकल ट्रीपच्या आधी माझी जीम एकदम व्यवस्थीत चालु होती.. वजन ही १०-१२ किलो ने कमी झालेले होते, त्यामुळे सायकल चालवताना आनंद मिळत होता..
सेम गोष्ट चेत्याची पण होती. सायकल चालवताना सकाळची थंड हवा मस्त वाटत होती... रस्ता तितकासा चांगला नव्हता.. ताम्हिणीचा तो रोड कामे सुरु होणार आहेत अशी चिन्हे दिसत होती..
दरमजल करत करत आम्ही नाष्ट्याला थांबण्यासाठी माले ला पोहचलो.. साधारण ता ३५ किमी सायकल चालवुन झाली होती..
आम्लेट , बॉइल्ड अंडी, पोहे, चहा येव्हडे खाऊन झाले होते. येथे सगळ्यात आधी मी पोहचलो होतो.. तेथुन मग मी योग्या ला फोन लावला होता. असाच टाईमपास, त्याला येता आले नव्हते, सो त्याला कुठे पोहचलो कसे पोहचलो असे सांगुन झाले. पोपट आणि गणेश बी २० मिनिटे उशिराने आले. त्यांचे म्हणणे होते त्यांच्या सायकली पळत नव्हत्या, पोपट दमला होता.. आता अधिक चढ नसेल या आशेने तो पुढे यायला निघाला होता, गणेश बी जीम वाला माणुस तो सायकल ओढत होता..
पण एकंदरीत घाट-वाटा आणि साधा रस्ता धरला तरी माणगाव पर्यंत आम्ही ६-७ तासात ११० किमी करु असे पहिल्यांदा वाटले होते, पण पोपट ची अवस्था पाहता आम्हाला अजुन १-२ तास लागतील असे वाटत होते(पण पोपट ने हा ही अंदाज चुकवला :-)).

पोपट हे नाव मित्राने सार्थकी लावले नाही. पोपट प्रत्येक चढाला बसत होता, कधी गणेश बी त्याच्या साठी थांबायचा, तर कधी चेत्या त्याला सायकल चालवता चालवता हात हातात घेवुन खेचायचा.. कसे ते त्यालाच माहीती.. पण चढ आणि पोपटची विश्रांती ठरलेली.. आम्हाला प्रत्येक अंतर कापायला आता दुप्पट वेळ लागत होता.. आम्ही सायकल चालवुन पुढे गेलो तरी पोपट आणि गणेश बी ची वाट पहात थांबायचो.. कधी कधी त्यांना पुढे लावुन मग आम्ही निघायचो..

मुळशी चा सुंदर परिसर आम्ही ओलांडत होतो.. मी एका मस्त झाडाखाली सायकल लावुन पोपट आणि गणेश बी ची वाट पहात बसुन घेतले. ते आल्यावर आम्ही प्रोटीन्स बार खाल्ले. मला अजिबात आवडले नाहीत. जीम वाला म्हणाला होता हे दमल्यावर खा.. पण त्याची चव खुपच वेगळी होती.. नाही आवडले.
नंतर मुळाशी धरणातल्या पाण्यात तोंड धुतले आणि थोडे फोटो काढले.
3
मुळशी

नाष्टाच येव्हडा केला होता की जेवणासआम्हाला तशी भुक नव्हती, मध्ये वाटेत लिंबु सरबत वगैरे गोष्टी नियमित होत होत्या..

मुळशी धरणाच्या कडेने सायकल चालवणे खुप म्हणजे खुपच भारी वाटत होते. नंतर काही वेळेस झाडांच्या पुर्ण जंगलातुन जाणारा रस्ता खुपच भारी वाटत होता.. मन अगदी प्रसन्न होत होते. पोपट आणि गणेश बी ची वाट पहायची असल्याने, फक्त सायकली न दामटता, जिथे सुंदर वाट्टेल तिथे मी थांबत असे, निसर्गाचे सौंदर्य डोळ्यात साठवुन ठेवत असे.

थांबत, बसत आम्ही ताम्हीणी घाटात आलो होतो, ताम्हीणी घाट म्हणजे खरेच अनुभवण्याची जागा.. आता उतार असल्याने सायकली पळणार होत्या.. पण येथे ही यांनी बसुन घेतले होते.. नंतर आम्ही घाटाच्या पायथ्याला, विळा फाट्याच्या आधी नाष्ट्याला थांबलो. ज्या वेळेत आम्ही माणगाव ला पोहचलो पाहिजे होतो तेव्हड्या वेळेत नव्हे त्या पेक्षा जास्त वेळेत आम्ही विळा फाट्यावर पोहचलो होतो. नाष्टा झाला आण निघणार तर पोपट ची सायकल पंक्चर. पहिल्यांदा आम्ही सायकल पंक्चर काढली.
4
ताम्हीणी

नंतर दिवस मावळे पर्यंत तरी माणगाव ला पोहचु असे ठरवले आणि निघालो. चेतन यावेळेस फास्त गेला.. मी नंतर आणि पोपट आणि गणेश बी मागे. पिंपरी चिंचवड च्या एका गृप ने त्यांची गाडी थांबवुन चौकशी केली. असे करत करत आम्ही संध्याकाळी मानगाव ला पोहचलो.

तो पर्यंत पोपट आणि गणेश बी ने उरुळीवरुन त्याची क्रेटा मागवली होती. आणी येताना त्याला रीअर रॅक पण बसवुन आणायला सांगितली होती.. त्यांच्या आयुष्यात पहिल्यांदा त्यांनी येव्हडी सायकल चालवली होती. दुसर्या दिवशी ते क्रेटा ने कर्दे ला येणार होते. आणि मी आणि चेत्याच फक्त सायकल वर तेथे जाणार होतो.

संध्याकाळी बाळाराम (व्हेज) मध्ये मी आणि चेतन जेवलो, आणि आनंद भुवन मध्ये गणेश बी आणि पोपट . आनंद भुवन ला मी बर्‍याच दा जेवलो होतो, चेतन मुळे आणि तसेही सायकल चालवताना किंवा ट्रेकिंग ला मी शक्यतो व्हेज जेवन जेवत असल्याने मी यावेळेस बाळाराम मध्येच जेवलो.

संध्याकाळी आम्ही तरीही १ वाजेपर्यंत रमी खेळत बसलो होतो.. ,माझ्या सायकल च्या इतर गृप मध्ये असले हे आवडणार नाही, लवकर झोपुन लवकर उठुन सायकल चालवली पाहिजे, पण आमचे वेगळेच.
चेत्याचा आज वाढदिवस होता, आम्ही केक आणला होता, १२ वाजता केक कापला. आणि आम्ही १ नंतर झोपलो.
मी सकाळी ५:३० ला उठलो, ट्रेकिंग, फिरणे, सायकल या गोष्टीच्या वेळेस मी कसा लवकर उठतो आणि घरी मात्र लवकर उठता उठत नाही हे कोडे आहेच. असो.

मग चेत्या ला उठवुन कंटाळा आला, शेवटी कसे तरी तो उठुन आम्ही ८ ला नाष्टा करायला गेलो. आणि नाष्टा करुन आम्ही पुढील मार्ग कसे जाणार ते पाहिले.
आता आम्ही दोघेच जाणार असल्याने अंतरे फास्ट कव्हर होणार होती हे नक्की. मी प्रशांत ला फोन करुन तरी रस्त्याचा मार्ग कुठला , कसा ते विचारुन घेतले. त्याच्या म्हणण्याने आता पर्यंत आम्ही ५० किमी अंतर पुर्ण केले पाहिजे होते, खुपच उशीर झालेला होता त्याच्या म्हणण्याने.

माणगाव ते कर्दे via मंडनगड

माणगाव - टोळ फाटा- आंबेत - शेनाळे मंडन गड असा आम्ही पहिला ५० कीमी चा मार्ग ठरवला आणि सायकल चालवायला सुरुवात केली. गोवा हायवे वरती सगळीकडे धुकेच धुके होते, त्यातुन सायकल चालवताना खुप भारी वाटत होते, तोळ फाट्या ला आम्ही गोवा हायवे सोडला. आणि सायकल तश्याच पिदडत चाललो होतो, घाट वाटा यांनी सायकल चालवायला मज्जा येत होती.. सगळी कडे हिरवा निसर्ग, आल्हाद दायक हवा, झाडी यातुन सायकल चालवायला मज्जा येते होती.
आम्ही डायरेक्ट आंबेत च्या ब्रीज वर थांबलो, सावित्री नदी खाली वहात होती, थोडे फोटो काढले, तेथेच एक फॅमिली पण फोटो काढत होती, त्यांनी त्यांचे फोटो काढायला सांगितले , आम्ही पण आमचे फोटो काढले, आणि त्यांनी नंतर आमची आठवण म्हणुन त्यांच्या कॅमेरात आमचे फोटो काढुन घेतले.
5
माणगाव

7
ब्रीज

काही घाट तर इतके मोठे होते की बस की बस. या रस्त्याने पोपट ने १० किमी पण सायकल चालवली नसती असे आमचे मत झालेच., चेत्या आणि मी सर्व घाट न थांबता चढत होतो, एका घाटात तर सुमारे ७-८ किमी सायकल पहिल्या घेर वर चालवली.. घाटात सलग सायकल चालवणे अवघड, पण आम्ही मात्र पुर्ण घाटात न उतरता ती चालवण्याचा चंग च बांधला होता. घाटाच्या उताराला मात्र आम्ही सायकली खुप पळवत होतो, कधी कधी तर सायकल ५०-६० चा स्पीड घेत होती. हे तसे रीस्की होते, पण थोडी असी मज्जा मी घेतलीच.
6
चढण होती पण फोटो साठी माघारी आलो होतो :-)

आम्ही येव्हडे घाट रस्ते असले तरी जवळ जवळ नॉनस्टॉप असल्याने आम्ही आखलेल्या टाईम पेक्षा लवकर होतो. एका टपरी वर गोळ्या घ्यायला थांबलो, तर तेथे पोरांनी एकच गलका केला होता, सायकल ला लँप, पंप, बॅगा, मागची टेल लाईट असल्या गोष्टी त्यांनी पहिल्यांदाच पाहिल्या होत्या, त्यांच्या असंख्य सगळ्या प्रश्नांना मात्र काही आम्ही उत्तरे दिली नाहीत. तेथुन आम्ही पुन्हा मंडनगड कडे निघालो. आणि मंडनगड च्या आधी एक किमी वरती फाटा दिसला तेथे एका दुकानदाराला मार्ग विचारला दापोली चा. त्याच्या म्हणण्याने मेन रोड ने खुप अवघड घाट आहे, त्या पेक्षा पालगड च्या रोड ने गेले पाहिजे. पालगड चा रोड थोडा कच्चा होता, पण कमी वर्दळीचा आणि कमी घाटांचा आहे असे त्याचे म्हणणे, म्हणुन आम्ही तोच मार्ग निवडला.

त्याला हॉटेल कुठले चांगले आहे हे विचारले, त्याने सांगितले, ८ किमी वरती कुंबळे गाव लागेल त्या नंतर दोन हॉटेल आहेत त्यातील एक हॉटेल मध्ये जेवा , खुप छान जेवण मिळेल. हॉटेल चे नाव निटसे आठवेणा पण बहुतेक हॉटेल चवदार हे त्याचे नाव.

दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास आम्ही हॉटेल चवदार गाठले, ३ तासात आम्ही माणगाव ते कुंबळे अंतर पार केले होते, येव्हडे घाट असुन ही आम्ही २० कीमी/तास सायकल चालवली होती. आता दमलो होतो. हॉटेल चे जेवन खुपच भारी होते. रोटी तर मातीच्या भट्टीतून केलेल्या असल्याने त्याला खुप भारी चव होती.. मटकी आणि डाळ खुपच भारी.

येव्हडी सायकल चालवल्याने, आणि बाहेर उन असल्याने आम्ही जवळ जवळ २:३० पर्यंत तेथेच थांबलो. पोपट आणि गणेश बी माणगाव वरुन कार ने आता पर्यंत निघाले होते. पालगड चा रोड खरेच सुंदर होता. झाडांच्या मधुन सुंदर रोड..
जेवन झाल्याने आमचा वेग थोडा मंदावला होता. पाय थोडेसे जड वाटत होते. तरीही आम्ही मजेत निघालो होतो.. फोटो काढण्यासाठी पण मध्येच थांबलो .. ५ किमी दापोली राहिली असताना पोपट आणि गणेश बी दापोली ला पोहचले. त्यांनी मंडनगड वरुन डायरेक्ट सरळ रोड पकडल्याने त्यांची आमची भेट झाली नाही. आम्ही दापोलीत चहा च्या छोट्याश्या टपरीवजा हॉटेल मध्ये भेटलो. चहा पियुन मस्त वाटले.
चहा म्हणजे आपला जीव की प्राण. नंतर गणेश बी ने त्याची सायकल गाडीच्या रॅक मधुन बाहेर काढली.
दापोली ते कर्दे १५ किमी चा रस्ता खराब होता. गणेश बी ची एम टी बी खुप पळत होती इकडे, तो पुढे त्या बरोबर चेतन आणि शेवटी मी कर्दे कडे निघालो. आजचे १०० किमी खुपच फास्ट कवर झाले होते. तसे पाहिले तर ५-६ तासात सायकल चालवुन आम्ही १०० पेक्षा जास्त अंतर आज पार केले होते.
कर्दे beach खरेच खुप सुंदर होता. दिवस मावळतीला जायला लागला होता. आम्ही हॉटेल वरती जाण्या अगोदरच खुप[ फोटो काढले.. खुप मज्जा केली..
सकाळी उठुन पण आम्ही आमच्या सायकली पुन्हा समुद्रावरती आणल्या होत्या.

नंतर अनेक ट्रीप केल्या पण ह्या ट्रीपचा आनंद भारीच होता.

कर्देतील फोटो
8

9

10
मी आणि चेत्या

11
फोटो ऑफ द ईअर

12
13

14

------- गणेशा

प्रतिक्रिया

प्रसाद गोडबोले's picture

20 Jul 2020 - 3:05 pm | प्रसाद गोडबोले

मस्त वाटलं प्रवास वर्णन वाचुन ! फोटो ही उत्तम !

सायकल वर १६० किमि म्हणजे महान आहे ! मि एकदाच चिंचवड देहु अलंदी चिंचवड असाअ साधरण ५०-६० किमि प्रवास केलेला सायकल वर . रात्री पार्श्वभाग फार चिडलेला =))))

नेक्स्ट ताईम , पुण्यात येईन तेव्हा प्लॅन करु असले काही, तुम्ही सायकल चालवा मी बाईक वरुन येईन !

आणि महत्वाचं म्हणजे - लिहित रहा रे , हे असले लेखन वाचलं की फार छान वाटतं मिपावर आल्याबद्दल !!

गणेशा's picture

20 Jul 2020 - 3:28 pm | गणेशा

धन्यवाद..
आणि मिपा च्या सायकल सायकल group ची मदत जास्त झाली.

एक correction : मंडनगड पर्यंत 160km अंतर झाले होते. पूर्ण अंतर 216 km होते कर्दे पर्यंत..

ही पहिलीच ट्रिप होती सायकलची मोठी.

पुण्यात आल्यावर चहा ला भेटू :-))

चौथा कोनाडा's picture

21 Jul 2020 - 1:42 pm | चौथा कोनाडा

असले लेखन वाचलं की फार छान वाटतं मिपावर आल्याबद्दल !!

+१०० मार्कस !

प्रशांत's picture

20 Jul 2020 - 3:12 pm | प्रशांत

फोटो आणि लेख मस्त

सिरुसेरि's picture

20 Jul 2020 - 3:15 pm | सिरुसेरि

मस्त प्रवास वर्णन .

खूप छान शब्दान्कित केलाय सायकल प्रवास. वाचताना मजा आली.

प्रचेतस's picture

21 Jul 2020 - 9:21 am | प्रचेतस

मस्तच रे गणेशा.
खूप छान लिहिलं आहेस. फोटो पण बेस्ट.

मागच्या डिसेंबर मधेच दोन जीवभावाच्या मिपाकरांसोबत ह्याच मार्गाने मुरुड बीच भटकंती झाली होती त्याची आठवण झाली.

श्वेता२४'s picture

21 Jul 2020 - 11:57 am | श्वेता२४

छान वर्णन

बेकार तरुण's picture

21 Jul 2020 - 1:05 pm | बेकार तरुण

मस्त वर्णन

चौथा कोनाडा's picture

21 Jul 2020 - 1:44 pm | चौथा कोनाडा

व्वा, क्या बात है गणेशा !!!
पहिले दोन परिच्छेद खूपच सुंदर !
फोटो आणि वर्णन एक नंबर +१००

शा वि कु's picture

21 Jul 2020 - 3:51 pm | शा वि कु

भारी अनुभव आणि लेख !

जेम्स वांड's picture

22 Jul 2020 - 7:34 am | जेम्स वांड

प्रस्तावना तर लैच भारी आहे एकदम, फोटो वगैरे पण अतिशय उत्तम. बेस काम. पुढील लेखन व रपेटीस भरपूर शुभेच्छा.

रच्याकने,

१५,०००₹ ची सायकल २०,०००₹ च्या ऍक्सेसरीज सायकली लटकवून न्यायला क्रेटा वगैरे वाचूनच घाम फुटला, कारण आमची सायकल विषयक प्रगती म्हणजे "चौथीत ८०% मिळवलेमुळे वायद्यानुसार चिरंजीव वांड्या ह्यास २२ इंची ऍटलास घेऊन दिली" ह्या आमच्या वडिलांनी आजोबांना लिहिलेल्या पत्राच्या ओळीत संपते.

काही दिवसांनी लग्नाचे बायोडाटा निघतील अश्याने "मुलगा निर्व्यसनी आहे, अमुक कंपनीत कामाला आहे, इतकं तितकं पॅकेज आहे, स्वतःच्या खर्चाने श्विन स्पोर्टेरा सायकल घेतली असून ती लटकवून फिरवायला एक रेनॉ डस्टर आहे"

हे आपलं आमचं टवाळ आत्मरंजन, कृपया हलके घ्या हो, नकारात्मक म्हणून नाही, सहज "स्टँडअप पॅटर्नमध्ये" सुचलं तसं लिहीत गेलो.

हलकं घ्या म्हणुन पार परकं का करतोय वांडा.. आपल्याला आवडतं असं बोललेलं. आपण पण असलाच.

अर, ती क्रेटा आणि फलाना पोपट ची.. तो businessman...
आपला नंतर मित्र झाला :-))

आम्ही आपलं सायकल घ्यायला एक वर्ष पैसे मागं टाकत होतो,. अण घरी सायकल आणली आणि वडलांनी विचारलं कितीची रे. मग निम्मी किंमत सांगितली तरी मी मंजी उधळ्याच हाच अर्थ त्यांच्या मान हलवण्यात होता. आता असलं बोलणं पण त्यांनी सोडून दिलंय उपयोग नाय म्हणुन. पण इतकी महाग पण दणकट नाय वगैरे आलेच..

आमचं आपलं, कोकणात जायचं, पुन्हा माणगाव ला सायकली वर यायचं आणि मग midc तल्या टेंम्पो ला हात करुन, टेंम्पोत सायकल घालून यायचं पुण्यात असला plan होता.

हे लिहिलं नाही लेखात. ह्यात आपण कसे साधं हाय ही उगीच री ओढल्यागत वाटत होतं. :-)) तसं केलं असतं तर उलट मज्जा जास्त आली असती.

आमच्या वडलानी पण मी सायकल शिकावी म्हणुन 1990 ला 500 rs ची जुनी एटलास घरी आणलेली. तवा मी तीच्या नळी खालून पाय घालून, मधून पायंडल मारून सायकल शिकलेलो आठवलं.

अजुन बी बारामती ला गेलो कि ती सायकल चालवतो.

माझी सायकल तर 30 हजाराची, कंपनीत मित्र तर, नव्याचे नउ दिवस, एव्हड्या पैश्यात थोडे पैसे टाकले असते तर टु व्हीलर आली असती. पडून राहणार आहे असले बोलतच होते :-))

जेम्स वांड's picture

22 Jul 2020 - 9:32 am | जेम्स वांड

पठ्ठे असलं काम पायजेल, ताण देयाचा बी नाय अन घेयाचा बी नाय, मज्जानी लाईफ. त्यो रि ओढल्याचा पाईन्ट आहे बघा रास्त. बाकी लेख वगैरे एकदम फर्मास हायच, आता अजून हिंडा अन कंपनीतल्या दोस्तांना खोटं पाडा च्यामारी !

विजुभाऊ's picture

3 Aug 2020 - 10:38 am | विजुभाऊ

फ्रेश वाटले वाचून.
मस्त फ्लो आहे तुमच्या लिहीण्याला

गणेशा's picture

4 Aug 2020 - 7:58 am | गणेशा

सर्वांचे धन्यवाद..

पुणे ते पन्हाळा ही सायकल ट्रिप लिहायला घेतली, पण नाविण्य वाटत नाही त्या लिखाणात.. सो बहुतेक skeep करतोय ती ट्रिप लिहिण्यातुन..
Pcmc ते कोल्हापूर आणि मग पन्हाळा 275 km ची ट्रिप होती असो..

पुणे ते लिंगाणा (रायलिंग पठार ) लिहितो direct...

ज्ञानोबाचे पैजार's picture

4 Aug 2020 - 9:33 am | ज्ञानोबाचे पैजार

पहिला फोटो फारच आवडला त्या करता तुला एक मस्तानी लागु.
माझी मजल अजून पुणे परीसराबाहेर गेली नाही, आळंदी, रांजणगाव, केतकावळे आणि मुळशी या चतु:सीमा गाठण्यापलीकडे माझे सायकल कर्तृत्व नाही.
पण तुझ्या सारखे उत्साही लोक बघितले की चार पायडल जास्त मारावेसे वाटतात.
पायडल मारत रहा आणि लिहित रहा...
पैजारबुवा,

हे मजेदारच.
सायकल म्हणजे पुन्हा निसर्गात जायचे.. , रखरखीत रोड असुद्या किंवा झाडांच्या गर्दीतील रस्ता असुद्या त्यातुन हळुच अंतरे कापत जायचे, हळुच पाहिजेल तेथे थांबायचे.. जिथे जाईल तिथे तिथल्या लोकांच्यात मिसळायचे.. त्यांच्याशी बोलायचे .
अगदी बरोबर.

समुद्र किनारी​ सायकलचे फोटो ... मस्त मस्त कांम्बीनेशन.

कानडाऊ योगेशु's picture

5 Aug 2020 - 10:04 pm | कानडाऊ योगेशु

लेख आवडला. लै मज्जा केली असणार तुम्ही लोकांनी.
बाकी मित्रांची आडनावे बकरे आणि पोपट मजेशीर वाटली.

रातराणी's picture

5 Aug 2020 - 10:16 pm | रातराणी

मस्त फोटो आणि वर्णनही झकास! पहिला फोटो तर क्लास आहे!

दुर्गविहारी's picture

11 Aug 2020 - 4:39 pm | दुर्गविहारी

जबरी लिखाण ! वाचायला मजा आली ! रायलिंग पठाराच्या वर्णनाच्या प्रतीक्षेत ! पु. ले. शु.

गणेशा's picture

16 Aug 2020 - 12:30 pm | गणेशा

सर्वांचे आभार,

हो आज देतोय पुणे ते रायलिंग पठार (लिगांणा) चा लेख..

तो नवा लेख सकाळपासून तीन वेळा शोधला.