लॉकडाऊन सुरु आहे. - भाग २ - इंजिनिअरींग ऍडमिशन

श्रीकांतहरणे's picture
श्रीकांतहरणे in जनातलं, मनातलं
24 May 2020 - 11:37 pm

ऍडमिशन हॉलमदे, इकडे तिकडे पाहत, कोणी भेटते का एखादा तरी ओळखीचा दोस्त, माया शोध चालू होता. कस दिसण बे कोणी? हा त तिसरा राऊंड होता. सगळ्यांन, बारावीमदे केलेल्या मेहनतची चांगली बक्षीस घेऊन, आधीच दोन राऊंड खल्लास केले होते. आता उरल सुरलं, काई हाय का आपल्या नशिबात? का ते पण नाय? याचाच उत्तर शोधले, मी लई आस लावून, माया नंबरची वाट पाहत उभा होतो.
अचानक एक लंबु , बारक, सावळस, थोड ओळखीच पोट्ट, त्याच्या बाबांबरोबर उभ दिसल. कशीतरी आपली ओळखी काढत.
"कारे तू इकडं कसा?" म्या डेरिंग करून विचारल.
"अरे पहिल्या राऊंड मध्ये, सीट भेटली ना, पण आवडीची नाही, म्हणून बदलते का पाहाले आलो."
“असं का, बर बर” म्हणत थोबाड लपवत, मी तिथून कल्टी मारून, आपल्या जागेवर गुपचाप आलो.
डावीकडे पायतो, त अजून एक ओळखीच लंबु, बारक, गोर, केस स्पाईक कट केल्यासारखे उभे, आपल्या बाबासोबत आलेल. या टायमाले, अजून कितीदा आपल्या तिसऱ्या राऊंडच्या, गोष्टीचा फुगा करून आपल्याच इज्जतीचा भाजीपाला कराचा? म्हणून म्या, दुरूनच त्याले स्माईल दिली. त्यान पण ओळख दाखवली.
तितक्यांत, समोरच्या क्लर्कच्या टेबलावरून, माया नाव अन नंबरचा पुकारा झाला. मी गीतांजली एक्सप्रेस सारखा जोरात पळतच सुटलो, ते डायरेक्ट समोरच्या क्लर्कच्या टेबलापर्यंत. त्यान एक, एक सर्टिफिकेट् चेक कराचे, अन मी, चेहेरापाडून शरमेन, ते दाखवाच. “मार्कशिट” म्हणताच “काय लेका? एकदा झेरॉक्स लावली तरी, अजून अजून, काऊन मागून रायाला बे?“ म्या मनातच म्हटल, अन सुमडीत ठेवलेली माई, हीच ती दिवे लावलेली बारावीची मार्कशीट हळूच, पुढं पुढं सरकवाले लागलो.
"अबे दे न बे, काय टाईमपास चालू आहे बे , दिसून नाय रायल का किती गर्दी हाय? दे लवकर, अन चल होय पुढ्च्या टेबलावर" त्यांचा त्या बोलण्यानं, माया चांगलाच सत्कार केला होता. बारावीच्या निकालानंतर, आता दिवसातून, तीनचारदा तरी माये अशे सत्कार व्हतच होते. पण मी काय आजच्या जमण्याचा? की जरा कोणी अपमान केला, की लगेच डिप्रेशन मदे जाईन? आता त, अशे खोचट बोलण्याचे बाण पचविण्यासाठी, म्या कर्णाच्या कवचासारखा कवचच, अंगावर घालून घेतलं होता. पुढच्या टेबलावर मायासमोर, अजून एक पोट्ट होत. मले लांबूनच, एका लई मोठ्या कागदावर, कॉलेजची नाव आणि त्याच्या समोर ब्रॅन्चचा कॉलम, अस अंधुक अंधुक चित्र दिसायले लागल होत. लय कॉलम आधीच क्रॉस मारले होते. तेच्यात बडनेरा कॉलेज मधील, सिविल इंजिनीरिंग ब्रॅन्चचा कॉलम खाली दिसला. बस रे भाऊ आता मले, माई मंजिल लय दूर नोती. मनात अचानक आनंदचे ढोल , ताशे वाजाले लागले होते. हीच, हाव हीच ब्रॅन्च मागायची बे. मनात, हेच पक्क पकडून ठेवलं होतं. आला, अन माया नंबर आला.
"बोल रे, कुठची ब्रॅन्च?" तो रागीट, अन कामान परेशान असलेला आवाज माया कानावर पडला, अन दोन मिनिटाआधीच्या स्वप्नांतून, मले जाग आली.
"सर, बडनेरा इंजिनीरिंग, सिव्हिल ब्रँच" एका मिनिटाचा विचार न करता, म्या बंदूकीतील सगळ्या गोळ्या झाडाव्या तशा जोशातच उत्तर देल.
"ती शीट गेली ना बे, दिसत नाय काय क्रॉस झाली.”
झाल, माया पायाखालची जमीन सरकली, पण तोल न जाऊ देता, लगेच मी,
"अहो सर, आत्ता मी पायली ना?” मले एवढ्या लवकर हाराच नॊत.
"गेली ना रे भाऊ, तुया समोरच ते पोट्ट, ते पाय त्याले भेटली ती शीट, तू चल बोल बर लवकर काय पायजे त तुले, नाय त निंग इथनं, टाईमपास नको करू " तो अजून जोरान ओरडून मले बोलला.
"सर, अमरावतीत अजून काही? पाहणा सर, सर प्लीज." एक्दम भीक मांगणाऱ्या लोकांसारख माय बोलणं वाटू रायल होत.
"नाहीनाबे , तू पायत पट्कन दुसरी शीट, की बोलवू पुढचा नंबर?" आत त तो अजूनच भडकला होता.
"अकोला सिव्हील इंजिनीरिंग, अन चिखली सिव्हिल इंजिनीरिंग हाय, चल बोल लवकर." तो अजून मायावर खेकसला.
आताज मी याच्याशी, अजून लपाछपी खेळत बसलो, त तेलई जाईन, अन तूपई जाईल, अन हाती धुपाटण येईन. धोबी का कुत्ता, ना घर का, ना घाट का असा माया कार्यक्रम होईन. आता इंजीनीरिंगचा पट्टा गळ्यात घालायचा च हाय, तर मग या घाटचा नाय, त त्या घाटचा, म्हणजे अकोल्याचा घालु.
अजून फुकट टाईम पास न करता “सर, अकोला सिव्हिल एनिजिनीरिंग.”
झाल, माया या वाक्याबरोबर शिक्कामोर्तब झाला, अन साहेबांन तो कॉलम माया नावान क्रॉस मारला.
ऍडमिशन हॉलच्याबाहेर पडतांना, मले त्या बारक्या, लंबू, गोऱ्यागोमट्या स्पाईक केस असलेल्या, पोट्ट्याचा बाबानं आवाज दिला. मी एक्दम खुशीत, त्याचा बाबाजवळ गेलो. त्याचे बाबा पण लय गोरे, लंबू अन चेहऱ्यावर एक्दम शांती. मले हळू आवाजात म्हणाले.
"का रे, भेटली का शीट?”
“हो काका” मग मी, पाचदहा मिनिटाआधी मायासोबत झालेला सगळा सीन काकांले सांगतला.
काकांनी "बर बर", म्हणत सगळ ऐकून घेतल. ख़ुशीतच माय लक्ष, त्या दुसऱ्या लंबू, सावळया पोराकडे पण गेल होत, पण भेटलेली शीट आवडली नाई म्हणून, बदलून घ्याले आलेला तो, अन माया रिकाम्या झोळीत, काय पळल ते घेऊन चालेला मी, मी त्याले दुरूनच स्माईल दिली. पण त्याचा चेहेरा अजून तसाच होता. मले काय भेटलं, काय नाय भेटल? हे समजायले, मले तेव्हा बहुतेक, तेव्हडी अक्कल आली नोती. पण काही पण असू दे, चिखलीले दोनशे किलोमीटर दूर गेल्यापेक्ष्या, अकोला नव्वद किलोमीटर, म्हणजे त्यातल्या त्यात जवळ समजून, मी इंजिनेरींगच्या रोडवर आपली गाडी सुरु करणार होतो.

|| सूचना ||
माया छोट्या दोस्तांनो, बघितल ना, माई काय हालत झाली ती? म्हूणन मजा करा, मस्ती करा, पण अभ्यास टाळू नका. मले लकीली किंवा अनलकीली ऍडमिशन भेटली. पण लक नेहमीच साथ देत नाई रे भाऊ. पण तुमची अभ्यासातली मेहनत, तुमाले, आयुष्याच्या कुठल्याही ऍडमिशनच्या पहिल्याच राऊंडमध्ये बक्षीस देईल, हे माय पक्क मत हाय.

धन्यवाद.

राहणीराहती जागाव्यक्तिचित्रलेख

प्रतिक्रिया

नुसती अ‍ॅडमिशन भेटून काय झाली का भौ.
हे तर निस्ता टृरेलर होतो.
पुढे काय झाले ते पण लिहा. शिव्हील घेतले म्हणून बरे केले. इलेक्ट्रॉनिक्स ला हल्ली कुणी विचारते की माहीत नाही.
शिव्हील चं बरं असते नोकरी नसली तरी कायतरी भिंती बांधा , प्लाश्टर करा हे तरी करता येते
इलेक्ट्रॉनिक्स ला हल्ली टीव्ही रीपेरिंग मोबाईल रिपेरिंग हे पण कामे मिळत नाहीत

श्रीकांतहरणे's picture

25 May 2020 - 8:22 pm | श्रीकांतहरणे

हाहाहा , धन्यवाद साहेब.
लॉकडाऊन सुरु आहे - भाग २ तुम्ही वाचला. ही एक मालिका आहे . मी आधी लॉकडाऊन सुरु आहे , लॉकडाऊन सुरु आहे - भाग १ असे दोन अंक पण प्रकाशित केलेले आहेत. ते पण वाचा आणि पुढेचे पण भाग हळूहळु प्रकाशित होणार.

गणेशा's picture

25 May 2020 - 3:03 pm | गणेशा

छान लिहिले आहे.. आवडले.

आमचा पण या पेक्षा भयंकर ऍडमिशन प्रकार आठवला.. नंतर लिहिल कधीतरी..
Bio साईड ला जाता जाता बीसीएस ला जायला लागले ते पण 3 महिन्या नंतर..

श्रीकांतहरणे's picture

25 May 2020 - 8:24 pm | श्रीकांतहरणे

हाहाहा , धन्यवाद साहेब.
तुम्ही पण तुमचे अनुभव मांडा, वाचायला फार आवडेल.

गणेशा's picture

25 May 2020 - 8:32 pm | गणेशा

नक्कीच,
माझ्याकडे वेगवगेळे खुप अनुभव आहेत, so मी वेगवेगळ्या धाग्यात ण लिहिता एकाच धाग्यात लिहितोय सारे येथे .. डायरी सारखे.. शब्द झाले मोती वर