पुणे ते कन्याकुमारी सायकल प्रवास - दिवस १

किरण कुमार's picture
किरण कुमार in भटकंती
18 May 2020 - 11:31 am

पूर्वार्ध -
http://misalpav.com/node/46691
http://misalpav.com/node/46738

(चलचित्र साभार : केडी उर्फ केदार दीक्षित)

एव्हाना P2K2 (पुणे ते कन्याकुमारी 2) नावाचा शंख फुंकला गेला होता , आपापल्या कामाचे गणित बसवून 7 डिसेंबर ला मी , सेथु आणि केदार पुढे निघणार होतो , या ना त्या कारणाने रखडलेली केदारची आणि सेथुची कन्याकुमारी राईड यंदा नक्कीच पार पडणार होती , गेल्या दोन तीन वर्षांत अनेक घटना घडल्या होत्या ,केदारच्या हातात रॉड टाकावा लागला होता , सायकलिंगच्या दरम्यान सेथुचे गुडग्यातील स्नायू अनेकदा दुखावले होते, माझे दोन दात पुणे गोवा राईड दरम्यान शहीद झाले होते पण सायकलिंगच्या छंदापुढे या गोष्टी गौण झाल्या होत्या आणि कन्याकुमारी प्लॅन शिजला होता . आमचा चौथा भिडू आनंद नंतर मुरुडेश्वरला येवून तिथून पुढे आमच्याबरोबर सायकल प्रवास करणार होता. तिथपर्यंत तो सायकल घेवून कसा पोहचणार हे अजून गुलदस्त्यात होते .

माझी बॅग कालच भरली होती , यापूर्वी बऱ्याच लांब अंतराच्या राईड झाल्या होत्या त्यामुळे बॅगेत कमीत कमी आणि फक्त गरजेच्या वस्तू टाकून छोटी बॅग घेतली होती . हवा भरायचा पंप मी घेणार असे ठरले होते त्यामुळे बॅगेत अर्धी जागा त्या पंपाने घेतली ,राहिलेल्या अर्ध्या बॅगेत माझा संसार बसवला होता त्या पहाटे झुंजूमंजू व्हायच्या आतच आम्ही तिघे वडगावच्या पुलाजवळ भेटलो ,सायकल सायकल समूहातून सागर पाध्ये ही निरोप देण्यासाठी वडगावला येवून धडकला .
माझ्याकडे गेल्या वर्षीचा अनुभव गाठीशी होता ,रस्ता तर चांगला आहे हे नसे थोडके असे समजावून सायकलस्वार वाटेला लागले , गेल्या काही दिवसात थोडाफार सराव झाला असल्याने सायकलवर मोठ्या प्रवासाची मानसिक तयारीही बऱ्यापैकी झाली होती. वडगाव सोडताच कात्रजचा छोटासा घाट (उर्फ चढ) सुरू होतो , सायकलचे काही गिअर बदलून हळूहळू घाट चढायला सुरुवात झाली . रोजच्या पेक्षा आज वाहनांची वर्दळ कमी होती , सायकल प्रवासाच्या अलिखित सुरक्षा नियमांनुसार आम्ही तिघेही हेल्मेट, हेडलाईट ,टेललाईट लावूनच सायकल चालवत होतो , सेथु उत्साहात पुढे निघून गेला इतका नंतर तो थेट शिरवळजवळ दिसला , केदार आणि मी आमच्या नेहमीच्या वेगात पुढे मागे करत होतो, निरोप द्यायला आलेला सागर अधेमध्ये वेग बदलत सर्वांशी गप्पा मारत पॅडल मारत होता . कात्रजचा बोगदा येईपर्यंत सुर्यदेवाने दर्शन दिले आणि आज दिवसभर असणाऱ्या कडक उन्हाचे संकेतही दिले .

राष्ट्रीय महामार्ग असल्याने रस्ता चांगला असेल हा भ्रम तुटायला फार वेळ लागला नाही , शिवापूर च्या पुढे निघताच मोठे मोठे खड्डे , रत्याचे काम चालू असल्यामुळे ठिकठिकाणी लागलेले पर्यायी रस्त्याचे फलक , शेजारून मोठी वाहने गेल्यानंतर उडणारी प्रचंड धूळ , रस्त्यावर पसरलेली खडी ,राडारोडा यामुळे सायकलचा वेग खूपच कमी झाला होता शिरवळ च्या आसपास नाष्टा करणयासाठी थांबायचे असे ठरले होते त्यामुळे मुख्य रस्त्याला लागूनच असलेल्या एका टपरीवजा हॉटेलात बुड टेकवले , सागर परत फिरला आणि आम्ही तिघांनी मिसळ आणि पोह्यांवर ताव मारला .साधारण 40-45 किमी अंतर कापून झाले होते , अजून पल्ला मोठा होता शिवाय खंबाटकी घाटही लढवायचा होता ,
खंबाटकी घाटमाथा दुपारच्या कडक उन्हाच्या आधीच गाठू अशी चर्चा मिसळीनंतरच्या चहाच्या वेळी झाली, त्यामुळे जास्त वेळ न दवडता आम्ही मार्गस्थ झालो , कोवळे उन केव्हाच संपले होते , बघता बघता घाट सुरु झाला .
'अजून किती राहिला आहे घाट' असा बाळबोध प्रश्न विचारणारे माझे सहकारी आणि 'हा शेवटचा चढ पुढे उतारच आहे' असे त्यांच्यासह स्वतःला समजावणारा मी ... हे प्रत्येक चढाला.....
चढ इथले संपत नाही ... खूप वेळ टांगड तोड मेहनत झाल्यानंतर घाटमाथ्याच्या अलीकडे असलेल्या दत्त मंदिराजवळच्या पाणवठ्यावर आम्ही विसावलो , थंड पाणी तोंडावर मारून ताजेतवाने झालो , शेजारी खेळत बसलेल्या श्वानाबरोबर सेल्फी घेतल्या ( तसा मी श्वानप्रेमी .. ), आता खरच घाट संपला आहे असे मी या दोघांना सांगितले खरे पण आता त्यांचा विश्वास राहिला नव्हता , (लांडगा आला रे
आला गोष्टीत खरंच लांडगा येतो यावर कोण विश्वास ठेवतो )

एक छोट्या वळणानंतर लगेच घाटमाथा आला आणि आम्ही सुखावलो , आजच्या दिवसाचा मोठा टप्पा झाला होता , आता पुढे उतार होता . उतारावर भुंगाट जाण्यात केदार सराईत त्यामुळे तो सुटला ,पाठोपाठ सेथु पण सुटला , मी मात्र नेहमीप्रमाणे घाट सावकाश उतरणे पसंत केले

आता पुढे मख्खन रस्ता , फारसा चढ नव्हता आता सायकलने वेग पकडला , सुरूर फाटा ओलांडून पुढे निघालो , उन्हाचे चटके बसायला सुरवात झाली होती , पोटात कावळेही ओरडू लागले होते आता सातारला जेवण करून थोडी विश्रांती घ्यावी असे वाटले आणि सुदैवाने मंगलमूर्ती लॉन्स नावाचे एक ऐसपैस हॉटेल आमच्या नजरेस पडले , पुढे सायकल चालवायची असल्यामुळे व्हेज मेनू निवडला आणि रसपान केले , लॉन्स वरील गवतात बाजूच्या झाडाच्या सावलीत पाठ टेकविली ,खूपच छान वाटू लागले , आजच्या वामकुक्षी साठी याहून चांगली जागा मिळाली नसती कदाचित , पुढचा प्रवास उन उतरल्यावर सुरू केला , सातारा ते कराड अंतर साधारण 50 किमी पुढे 3 तासात होईल अशी अपेक्षा होती , मध्ये एक कॉफी ब्रेक घेतला , संध्याकाळच्या उन्हात सायकलिंग आल्हाददायक वाटत होते , वाटेत एका पुलावर थांबून नदीचे फोटोही काढले कराड हाकेच्या अंतरावर राहिले होते , मूळ प्लॅनमध्ये आधी हॉटेल बुकिंग करायचे नाही असे ठरले होते त्यामुळे कराड गाठून रहायची व्यवस्था शोधायची होती , दिवसभर सायकलिंग केल्यामुळे ते काम तसे त्रासदायक वाटत होते म्हणून वाटेत दिसलेल्या महिंद्रा हॉटेल च्या बोर्डकडे मोर्चा वळवला , हॉटेल रुमही चांगल्या होत्या , तिथेच मुक्काम करावा यावर एकमत झाले . रूम ताब्यात घेवून फ्रेश झालो , स्ट्रेचिंग आवश्यक होतेच ते केले , संध्याकाळी त्याच हॉटेलमध्ये व्हेज थाळी खात गप्पाटप्पा झाल्या . रात्री पाठ टेकताच गाढ झोप लागली . एकंदरीत पहिल्या दिवसात आमचे 170 किमी अंतर सहज पार पडल्यामुळे पुढचा प्रवासही फार जड जाणार नाही असे वाटले खरे....

- किरण कुमार

क्रमशः ....

प्रतिक्रिया

कंजूस's picture

18 May 2020 - 12:00 pm | कंजूस

वा! वाचतोय.

मोदक's picture

18 May 2020 - 12:55 pm | मोदक

झकास सुरूवात..!!

फोटो भरपूर टाका.

सिरुसेरि's picture

18 May 2020 - 5:08 pm | सिरुसेरि

मस्त सुरुवात . शुभेच्छा .

गणेशा's picture

18 May 2020 - 6:13 pm | गणेशा

वाचतोय..

प्रशांत's picture

19 May 2020 - 5:56 pm | प्रशांत

पहिल्या सायकल सफर चा एकच भाग लिहला तुम्हि....

आता पुढचा भाग टाकणार का? २०१८ च्या सफर चा कि २०१९ च्या?

चौथा कोनाडा's picture

8 Jun 2020 - 12:45 pm | चौथा कोनाडा

भारी सायकल ट्रिप !
वृतांत आवडला !

अनय सोलापूरकर's picture

30 Jul 2020 - 2:19 pm | अनय सोलापूरकर

पु.भा.प्र.