मुंबई ते कन्याकुमारी सायकलिंग (दिवस तिसरा) 27.10.2019 कराड ते संकेश्वर

Primary tabs

सतीश विष्णू जाधव's picture
सतीश विष्णू जाधव in भटकंती
13 May 2020 - 1:59 am

मुंबई ते कन्याकुमारी सायकलिंग (दिवस तिसरा) 27.10.2019 कराड ते संकेश्वर

.*

कराडच्या अलीकडे 6 किमी असलेल्या आराम हॉटेल पासून पहाटेच आजची राईड सुरू झाली. सकाळी सर्वांनी स्ट्रेचिंग केले. आज 75 किमी चा पहिला टप्पा कोल्हापूर पर्यंत होता. आजचे सायकलिंग सरळसोट परंतु चढ उताराचे होते.

कराड पार केले आणि लक्ष्मणची सायकल चढाला दमछाक करायला लागली. बारीकशा पंचरमुळे हवा कमी झाली होती. नवीन ट्यूब टाकली. त्याच्या सोबत मी होतोच.

बाकीचे सवंगडी पुढे निघाले होते. आता रस्ता दोन पदरी होता. सिमेंटचा मुख्य रस्ता आणि त्याच्या बाजूला डांबरी रस्ता. या दोन्हीच्या मध्ये एक बारीक चर होता.

हायवेला सकाळी मोठ्या व्होल्वो प्रवासी बसची खूपच वर्दळ होती. त्यात ह्या बस मोठया कंटेनरला डाव्या बाजूने ओव्हर टेक करताना सायकलच्या खूपच जवळून पुढे जात होत्या. त्यामुळे मुख्य रस्ता सोडून डांबरी रस्त्यावरुनच सर्वांना सायकलिंग करावे लागत होते. बाजूचा चर सोडून अतिशय काळजीपूर्वक पुढे पुढे चाललो होतो. हायब्रीड सायकलला तर सावधपणे तो बारीक चर टाळावा लागत होता. त्या चरा मध्ये माझी सायकल जाडजुड टायर असूनसुद्धा हडबडली. सायकलच्या मागे असलेले लाल ब्लिंकर खूपच महत्वाचे काम करत होते.
.
वातावरण कुंद झाले होते. काळ्या ढगांची दाटी नभांगणात झाली होती.

हिरव्यागार शेतावर विहरणारे पहाटपक्षी पावसाच्या आगमनाची चाहूल आपल्या किलबिलाटाने देत होते. रस्त्याच्या कडेला आणि शेतांच्या बांधावर असणारी सुबाभूळ, भेंडा, नारळाची झाडे सुद्धा वाऱ्यावर माना डोलावत पक्षांना साथ देत होते.

.

अशा धुंद निसर्गात, मनाच्या तारा झंकारल्या, "सुहाना सफर है ये मौसम हसी, हमे डर है हम खो न जाये कही" हे बोल आपसूक मुखातून बरसू लागले. देहभान विसरणे याचा अर्थ आज प्रत्यक्ष अनुभवत होतो. या निसर्गात विरघळून जावे, हे भाव मनात उमटले.

.

आता टक्क उजाडले होते. दीड तासातच छोट्या टपरी वजा सरस्वती हॉटेल मध्ये थांबलो. कांदापोहे नास्ता केला. विजयने दिलेला जडिबुटी-हळद मिश्रित दुधाचा मसाला घालून प्रत्येकाने एक एक ग्लास दूध घेतले. या मसाले दुधाने अतिशय मस्त एनर्जी आली. आठ वाजले आणि सूर्याचा प्रकाश त्याचे तेज दाखवू लागला. सोपानराव सर्वांना सांगत होते, 'दुपारपर्यंत आपणास 100 किमी मारायचे आहेत', जरा जोर मारा.

वाटेत 'नेरले गाव' लागले. "आधार फाउंडेशन" तर्फे मुख्य रस्त्यावर सामूहिक दिवाळी साजरी करणे सुरू होते. आम्हाला पाहून आधार फाउंडेशनचे कार्यकर्ते पुढे आले, आमची चौकशी केली. कोल्हापूर सकाळचा वार्ताहर विजय लोहारची सुद्धा भेट झाली.

त्याने "प्रदूषण मुक्त भारत" या उपक्रमाबद्दल, दिपक आणि माझी मुलाखत घेतली. सामूहिक दिवाळी साजरी करण्यासाठी सर्व गावकरी एकत्र आले होते. गावकऱ्यांनी प्रदूषणमुक्ती उपक्रमाच्या निमित्ताने आमचा सन्मान केला

.

तसेच समृद्धी नास्ता सेंटर द्वारे, मसाले दूध प्यायला दिले.

कोल्हापूर पर्यंतचा पुढील रस्ता चढ उताराचा होता. मध्ये मध्ये लागणारे पूलसुद्धा 'हेडविंड' मुळे (विरुद्ध दिशेने वाहणारे वारे) दमछाक करत होते. मध्ये टोल नाका लागला, खूप वर्षांनी गोटी-सोडा प्यायला मिळाला. वातावरण अजूनही ढगाळ होते. हिरव्यागार गालिच्यावर नभांची नक्षीदार रांगोळीच दीपावलीच्या मुहूर्तावर सजली होती.

.

परंतू पाऊस पडत नव्हता. वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यामुळे ढग सुद्धा सैरावैरा पळत होते. जणूकाही आमच्या सायकल बरोबर लपंडाव खेळत होते.

.

दीड वाजता कोल्हापूर गाठले होते. करवीर नगरामधील हायवेला उजलाईवाडी येथे "ऑरेंज हॉटेल" मध्ये जेवणासाठी थांबलो.

.

अतिशय मस्त ऐम्बीयन्स होता या हॉटेलचा. हॉटेल मधील सर्व कामगार वेटर्स यांनी ऑरेंज रंगाचे कपडे घातले होते. चिकन मसाला थाळीचे जेवण सुद्धा फर्मास होते. पुन्हा पांढरा आणि तांबडा रश्यावर ताव मारला. या रश्यामुळे सायकलींगचे श्रम हवेत विरून गेले होते.

पुढील सायकलिंग सुरू झाले. दुपारच्या उन्हाचा कडाका आता वाढला होता. कागल बस स्टँड पर्यंत 91 किमी सायकलिंग झाले होते. कागल येथील हायवेला असलेल्या बाजारपेठेत आम्ही पोहोचलो. लक्ष्मण आणि मी हायड्रेशन ब्रेक घ्यायचे ठरविले. बाकीची मंडळी पुढे निघाली होती.

सायकलवर असलेल्या सामानामुळे तसेच सायकलिंगच्या पोशाखामुळे आम्ही तेथील गावकऱ्यांचे केंद्रबिंदू होतो. आमची चौकशी सुरू झाली. लक्ष्मण आणि माझी दमछाक झाली होती. इतक्यात जवळच असलेल्या भेळपुरीवाल्याने झक्कास भेळपुरी आणून दिली. तेथील गावकऱ्यांनी आम्हाला गराडा घातला होता. कुठून आले, कुठे निघालात? या सर्व प्रश्नांची उत्तरे लक्ष्मण तडफेने देत होता.

सायकलला लावलेला "मुंबई ते कन्याकुमारी सायकलिंग आणि प्रदूषणमुक्त भारत" हा बोर्ड वाचून विस्फारीत नजरेने त्या जमावातील तरुण प्रश्न विचारू लागले. आता लक्ष्मण मधील व्याख्याता जागृत झाला. सविस्तर माहिती तसेच या सायकल वारीचे प्रयोजन लक्ष्मणभाऊ सर्वांना समजावून सांगू लागले.

मी निमूटपणे भेळपुरी खात होतो. हळूच त्या गर्दीतून सटकून भेळपुरी गाडीजवळ आलो आणि पाणीपुरी सुद्धा गटकावली. आता त्या जमावाचा चार्ज मी घेतला आणि लक्ष्मणला भेळपुरीवाल्याकडे पिटाळले. पंधरा मिनिटात सर्वांचे समाधान केले, तसेच प्रदूषण मुक्तीचे महत्व सांगितले. पुढे प्रस्थान करणार इतक्यात चहाचा कप सुद्धा हातात आला. आमच्या भेळपुरी आणि चहाचे पैसे त्या जमावातील कोणीतरी दिले होते.

सर्वांचे आभार मानून पुढची सफर सुरू झाली. पुढील दहा किमी टप्प्यात बाकीच्या सायकलिस्ट मंडळींची भेट झाली. त्यानंतर तीन तासात संकेश्वर गाठले. दाभाळे कॉम्प्लेक्स मधील 'राजधानी हॉटेल' मध्ये राहायची व्यवस्था झाली.

.

सायंकाळचे सहा वाजले होते, संकेश्वर गाठायला. आज 133 किमी राईड झाली होती.

हॉटेलच्या टेरेसवर सायकल ठेवल्या. उजेड आल्यामुळे संकेश्वर बाजारपेठ फिरलो. छान सफरचंद मिळाली. विक्रेते प्रामाणिक आणि हसतमुख होते. केळी सुद्धा रसरशीत मिळाली. रात्री बाजूच्याच "वीरशैव लिंगायत धाबा" मध्ये शाकाहारी जेवण जेवलो. दिवाळीचे लक्ष्मीपूजन प्रत्येक दुकानात चालू होते. मराठी बोलणारे बरेच मिळाले.

आता दिवसेंदिवस आम्हा सर्वांचा आत्मविश्वास वाढत होता. आजच्या सफरीत जी जी मंडळी भेटली त्यांनी खूपच प्रेमाने आमचे आदरतिथ्य केले होते. उदात्त ध्येय असेल तर प्रभावित जनप्रवाह उदारहस्ते मदत करतो याचा प्रत्यय आला.

पूर्वी ऋषी-मुनी साधु-संत अशाच कारणांसाठी भ्रमंती करत असावेत काय?

.

आज नितांत सुंदर निसर्ग दर्शन झाले होते तर नटखट ढग आमच्या सायकलशी स्पर्धा करत होते. या सौंदर्याला मनात साठवून निद्रेच्या अधीन झालो.

सतीश विष्णू जाधव

प्रतिक्रिया

वा सुंदर... काय लिहिले आहे, तुमच्या सोबत आमची ही सुंदर सहल होते आहे..

वातावरण कुंद झाले होते. काळ्या ढगांची दाटी नभांगणात झाली होती.

हिरव्यागार शेतावर विहरणारे पहाटपक्षी पावसाच्या आगमनाची चाहूल आपल्या किलबिलाटाने देत होते. रस्त्याच्या कडेला आणि शेतांच्या बांधावर असणारी सुबाभूळ, भेंडा, नारळाची झाडे सुद्धा वाऱ्यावर माना डोलावत पक्षांना साथ देत होते.

वा निसर्गा प्रती काय लिहिले आहे असेच लिहीत रहा...

प्रशांत's picture

13 May 2020 - 7:17 pm | प्रशांत

मस्त लिहत आहात.

टायर किती जुने होते? किती किमी वापरलेले होते?

सतीश विष्णू जाधव's picture

13 May 2020 - 11:17 pm | सतीश विष्णू जाधव

कन्याकुमारी सायकल सफर सुरू करण्याआधी सायकलवर मुंबई गुजरात, मुंबई हरिहरेश्वर ह्या मोठ्या सफर केल्या होत्या.

या टायर वर साधारण पाच हजार किमी प्रवास केला होता. सात महिने वापरले होते.

प्रशांत's picture

14 May 2020 - 12:49 pm | प्रशांत

तरीच एवढे पंचर होत होते

मोदक's picture

14 May 2020 - 1:08 pm | मोदक

भारी सुरू आहे सफर...

फोटोचे साईझ थोडे वाढवा. विड्थ आणि हाईट थोडे वाढवा.

सतीश विष्णू जाधव's picture

16 May 2020 - 7:37 pm | सतीश विष्णू जाधव

पुढच्या पोष्ट साठी फोटो साईज वाढवतो