लॉकडाऊन: चाळीसावा दिवस

नीलकांत's picture
नीलकांत in काथ्याकूट
3 May 2020 - 10:12 am
गाभा: 

लॉकडाऊन चे दिवस

कोरोनाच्या जागतीक संकटामुळे जे अविश्वसनीय वातावरण तयार झालं ते प्रत्यक्षात पाहिलं नसतं तर कुणी सांगुनही विश्वास बसला नसता. जगातील अनेक देश कुलुपबंद झालेत. जगात विमानं उडायला लागली तेव्हापासून आकाशात विमान नाही असे कधी घडले नव्हते की सुरूवात झाली तेव्हापासून देशात रेल्वे आणि महाराष्ट्रात एसटी धावली नाही असे घडले नव्हते. आता मात्र या कुलुपबंद ( लॉकडाऊन) मुळे अश्या अनेक फ़ॅण्टसी सारख्या गोष्टी घडताना दिसत आहेत. यासोबतच हा घडामोडींकडे अनेक लोक अनेक वेगवेगळ्या विचाराने बघत आहेत. त्यांच्या या लॉकडाऊनकडे बघण्याचा विचार जाणून घ्यावा. तसेच या लॉकडाउन ने लोकांना त्यांच्या धकाधकिच्या जीवनात बळजबरीने का होईना पण थोडं थांबून आपल्या आयुष्याबद्दल विचार करायला लावलाय. जी मुंबई आणि मुंबईची लाईफ़लाईन म्हणजे मुंबई लोकल कधी थांबूच शकत नाही असे म्हटले जायचे ती मुंबई आणि लोकल थांबून आता चाळीस दिवस होतील. विदर्भातील मागास जिल्हे हे एवढ्या तातडीने चीनहून आलेल्या व्हायरसच्या प्रभावाखाली येतील असे वाटले नव्हते मात्र असे दिसतेय की जगातील लोकांचा एकमेकांशी जरा जास्तच घनिष्ठ संबंध असावा.

गेले 39 दिवस आपण लॉकडाऊन ही लेखमाला चालवतोय. यात अनेकांनी सहभाग नोंदवला आहे. जे नियमीत लिहीत आहेत ते तर लिहीते होतेच पण जे लोक लिहीत नव्हते ते सुध्दा परत एकदा सक्रिय होऊन लिहायला लागले आहेत. लिहीते आणि परत लिहीते झालेले आणि नव्याने लिहू लागलेल्या सर्वांचे मिपाकडून आभार मानतो. कारण आजच्या कठीण काळात मिपासारख्या संकेतस्थळावर वाचायला मिळणे फार आवश्यक होते. लिहीणे आणि वाचणे म्हणजे आपल्यासोबत अन्य लोकांसोबत आपले आयुष्य सामायीक करणे होय.

अश्या वेळी जेव्हा आपल्याल्या प्रत्यक्ष भौतीक आयुष्यात सामाजीक अंतर पाळणे आवश्यक आहे तेव्हा आपण ऑनलाईन जगात मात्र एकमेकांच्या अधिकच जवळ येतो. एकमेकांच्या नजरेने जग बघायला शिकतो. आपण करतो तोच विचार शेवटचा नाही आणि आपण बघतो तोच एकमेव दृष्टीकोण नाही हे आपल्या लक्षात यायला लागते. हे सगळं समजण्यासाठी आपण कुठेतरी एकत्रीत यायला हवं. प्रत्यक्षात एकत्रीत येणे सध्या लॉकडाऊन मुळे म्हणा किंवा प्रत्यक्षात आपण जगात कुठे आहोत त्यावर अबलंबुन असु शकते मात्र इंटरनेटमुळे हे शक्य झाले आहे. गेले 39 दिवस आपण सतत मिपावर कुणीतरी आपल्या लॉकडाऊनच्या काळातील केलेले उपक्रम शेअर करतंय. कुणी गच्चीवर बाग लावतंय, कुणी सलग वेबसीरीज बघतंय, कुणी लोकप्रतिनिधी समाजकार्य करतंय, कुणी वाचतोय, कुणी लिहीतोय, कुणी कविता करतोय. अश्या एक नाही तर अनेक त-हांनी लोक व्यक्त होत आहेत. ह्या सर्वांचा उत्साह बघून मिपा सुध्दा भरभरून वाहतंय.

माझ्या व्यक्तीगत आयुष्यात लॉकडाऊन अनेक पातळीवर मध्ये येत गेला. मूळात कामाच्या स्वरूपामुळे लॉकडाऊन किंवा सुरक्षीतपणे घरात राहणे शक्य नव्हते. त्यामुळे वेगवेगळ्या लोकांना भेटून त्यांच्याशी संपर्कात येणे होत आहे. अश्या वेळी आपल्याला अनेक गोष्टी जाणवतात. सुरूवातीच्या काळात लोकांना असा काही व्हायरस असतो हे समजण्यास अडचण गेली. त्यामुळे सुरूवातीचा काळ असं काही असतं का कुठे? पासून ते आपल्याला काही होत नाही अश्या स्वरूपात गेला. हळूहळू जेव्हा पेपरमध्ये लोक आजारी पडण्याची बातमी येत गेली आणि लोक मरायला लागले तेव्हा लोकांनी हा आजार गांभीर्याने घेणे सुरू केले. मात्र तरीही घरात बसण्याची सवय नाही असे लोक कसे घरात राहतील? सरकारने जून्या मालीका सुरू केल्यामुळे अनेक लोकांना घरात बसून काहीतरी करण्याचा कार्यक्रम मिळाला.

वेगवेगळ्या राज्यातील प्रवासी लोक अडकून पडलेत. कुणाला तरी मध्ये रस्त्यात थांबवून 15 दिवस विलगीकरणात ठेवलेले दिसले. यापुर्वी असं वाटायचं की लोकांना दोनवेळ जेवण, चहा नास्ता करायला दिलं की काय मजाच मजा. मात्र प्रत्यक्षात लोकांना काहीतरी करायला आणि स्वत:ला काहीतरी कामात गुंतवून घेणे आवश्यक वाटते असे दिसून आले. दोन वेळ जेवा आणि आराम करा ही मजा आहे पासून ही सजा आहे हे अंतर केवळ एका आठवड्यात पार पडलं. त्या लोकांशी बोलताना हे जाणवत होतं की लोक कामाच्या निमीत्ताने घराच्या दूर राहू शकतात. कामावर गेल्यामुळे शरीर मन एका थकवणा-या प्रक्रियेत (प्रोसेस)मध्ये गुंतलेले असतात. या लॉकडाऊनमुळे एका जागेवर थांबलेल्या लोकांना घरची आठवण फारच प्रकर्षाने येत असलेली जाणवली. आता सुध्दा काल परवा पासून ज्या स्पेशल ट्रेन सुरू झाल्या आणि त्यामध्ये घरी जाण्यासाठी जी गर्दी झाली त्यावरून तर घर, आपले लोक यांचा किती मोठा मानसीक आधार आपल्याला असतो हे दिसून येते. हे लोक आपल्या घरापासून, नातेवाईकांपासून हजार – दिड हजार किलोमिटर दूर असतात. मेहनत करतात आणि घरी पैसे पाठवतात. मात्र आपण कुठेतरी स्थानबद्द आहोत किंवा आपल्या घरीच आहोत पण एवढ्यात कामाची किंवा कमाईची काही शक्यता नाही हे समजल्यावर त्यांना घराची ओढ खुप तीव्र झालेली लक्षात येते. खरं तर तेथे जाऊन काय करणार हे सुध्दा त्यांना ठाऊक नाही. कारण घरी-गावी खाण्यापिण्याची व्यवस्था असती तर यातील कुणीही घर सोडून आले नसते. सध्या मात्र बदलत्या परिस्थितीमुळे लोकांचे जगण्याचे प्राधान्यक्रम सुध्दा बदललेले दिसून येत आहेत.

पुर्वी ठरल्याप्रमाणे हा लॉकडाऊन आज म्हणजे 3 मे रोजी संपणार होता. आपली ही लेखमालासुध्दा आज म्हणजे 3 तारखेला थांबणार होती. आपला राष्ट्रीय कुलुपबंद कालावधी पुढ़े गेलाय. मात्र ही लेखमाला येथे थांबवतोय. हा संवाद मात्र असाच सुरू राहील हे नक्की.

प्रतिक्रिया

लेखमाला चांगली झाली..धन्यवाद

कुमार१'s picture

3 May 2020 - 10:49 am | कुमार१

लेखमाला चांगली झाली..धन्यवाद

चौथा कोनाडा's picture

3 May 2020 - 11:13 am | चौथा कोनाडा

लॉकडाऊन लेखमालेच्या समारोपा प्रसंगी समयोचित विचार मांडलेत !
अतिशय शिस्तबद्ध लेखमाला होती, सर्वच लेख चांगले होते, वाचून दिलासा मिळत होता,
कुठं काय चाललंय, कोण काय करतंय, कुणी काय नवा उद्योग/कला सुरु केलीय याचा ग्राउंड रिपोर्ट मिळत होता.
या सर्व लेखकांची प्रशंसा करावी तेवढी थोडी आहे !

आता लॉकडाऊन हा शब्दच मनातून काढून टाकून वाटचाल सुरु करायची वेळ आलीय !
एका मोठ्या स्थित्यंतराचे आपण साक्षीदार आहोत !
आता बदलाचे मोठे आव्हान आपल्यासमोर असणार आहे.
पुढे काय काय होईल, बदलेल अजूनही धुरकटच आहे !
नीलकांत आपण म्हटल्याप्रमाणे सकारात्मक विचार घेऊन नक्कीच हा कालखंड पार करू !

चांदणे संदीप's picture

3 May 2020 - 11:14 am | चांदणे संदीप

लेखमाला उत्तम झाली. मालकांनी स्वतः धोनीसारखा सिक्सर मारून लेखमाला थांबवली. :)
लॉकडाऊनच्या निमित्ताने का होईना बरेच जण लिहिते झाले. येत्या काळात उतमोत्तम लेख, कविता वाचायला मिळाव्यात ही मिपाचर्णी प्रार्थना! :)

सं - दी - प

जव्हेरगंज's picture

3 May 2020 - 11:49 am | जव्हेरगंज

हेच बोलतो!!
अशाच उत्तोमोत्तम लेखांनी मेनबोर्ड वाहता राहावा ही प्रार्थना!!
लेखमालेला उत्तुंग यश मिळाले!! अभिनंदन!!

प्रशांत's picture

3 May 2020 - 12:25 pm | प्रशांत

कविता वाचायला मिळाव्यात ही मिपाचर्णी प्रार्थना! :

)

लवकरच एकापेक्षा एक चांगल्या कविता वाचायला मिळतील...

;)

चांदणे संदीप's picture

3 May 2020 - 2:42 pm | चांदणे संदीप

झाली.... धुराळा... धुराळा....निस्ता धुराळा...!

:)

सं - दी - प

तुषार काळभोर's picture

3 May 2020 - 12:28 pm | तुषार काळभोर

स्थानिक गावापासून ते जागतिक स्तरावर अभूतपूर्व अशी उलथापालथ घडत आहे. आज महाराष्ट्रासाठी लॉकडाऊनचा त्रेचाळीसावा दिवस आहे. पहिले काही दिवस सुट्टीप्रमाणे गेल्यावर मग कंटाळा येणं, मग त्यावर नाविन्यपूर्ण उपाय शोधणं, मग उपाय शोधण्याचाही कंटाळा येणं, मग हुरहुर, काहींना बाहेर काम करावं लागतं त्यांच्या कुटुंबीयांची मनस्थिती, काहींना घरून काम आहे, त्यांची तुलनेने बरी मानसिकता, ज्यांना घरून काम नाही, अशांची चिंता, ज्यांचा पगार झाला, ज्यांचा कमी झाला, ज्यांचा झालाच नाही, ज्यांची नोकरी गेली, अशा वेगवेगळ्या परिस्थितीतील लोक, चार सहा दिवसांहून अधिक काळ घरी राहण्याची सवय नसणारे नोकरदार दिवसभर रिकाम्या हाताने अन रिकाम्या डोक्याने (नंतर रिकाम्या पाकीट- बँक खात्याने) वैतागू लागले, काही घरात कुरबुरी झाल्या असतील, घरगुती हिंसेपासून बाल लैंगिक छळापर्यंत घटनांमध्ये वाढ व्हायला लागली. अशा परस्थितीची सवय अन अनुभव कोणत्याच स्तरावर कोणत्याच सरकारला अन प्रशासनाला नाही. प्रत्येक जण आपापल्या परीने प्रयत्न करतोय, झगडतोय.

जानेवारीत कुणीही - अगदी जागतिक आरोग्य संघटनेने सुद्धा - कल्पना केली नसेल की जगात इतकी उलथापालथ होईल.

दहा-पंधरा-वीस वर्षांनंतर ही डायरी वाचताना हे दिवस पुन्हा आठवता येतील अन थोडं भानावर यायला मदत होईल हे नक्की!
केवळ मिपावरच नाही तर एकूण मराठी साहित्यात ही लॉकडाऊन डायरी हा एक मैलाचा दगड ठरू शकते.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 May 2020 - 12:30 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लॉकडाऊनच्या घोषणेने गोंधळून गेलेल्या जनमानसांच्या भावनेला दिलासा देण्याचं काम लॉकडाऊनच्या धाग्यांनी केलं. पहिला धागा आमचे मित्र आणि मिपाचे तंत्रज्ञ प्रशांत यांनी ओपनिंग केली तर आज मिपाचे मालक नीलकांतशेठ यांनी उत्तम समारोप केला. मिपाकरांबरोबर आम्हाला धाग्यावर व्यक्त करण्याची संधी दिली त्याबद्दल मालक चालक तंत्रज्ञ यांचे आभार.

आज लॉकडाऊनच्या धाग्यांना चाळीस दिवस झाले खरं वाटत नाही इतका आधार या धाग्यांनी दिला. एकमेकांकडे काय सुरु आहेत, मिपाकर काय करीत आहेत हे वाचतांना त्यांचे प्रश्न समजून घेतांना आपल्या कुटुंबातलं कोणी तरी व्यक्त होतंय असे वाटत होते. भविष्यात काय मांडून ठेवलंय त्याचंही काळ उत्तर देईलच. जगावरील कोव्हीड-१९चं संकट थांबेल तेव्हा लॉकडाऊनच्या धाग्यांना उचकतांना एक आठवण राहीलच. माणूस मोठमोठ्या बाता मारतो पण एका विषाणुने माणसांचे काय हाल केले ते आजुबाजुला पाहतांना दिसून आले.

मालक, आपली ड्युटी सतत चोवीस तास धावाधाव करणारी. आपण म्हणता तसे कुटूंबाकडे धाव घेणा-या मजूरांची खूप वाताहात झाली. सक्तीची सूटी त्रासदायक असते. ऑफिसमधे मित्र मैत्रीनी सोबा असतात कामात वेळ निघून जातो. घरी कौटुंबिक त्रास होतो असेही बोलणारे होते.

काल रामायणाचा समारोप झाला. आज लॉकडाऊनच्या धाग्यांचा. एकेक करुन सर्व विष्णूमय झाले. आपलेही धागे असेच सर्व सामावून गेलेले. रामायणातला एखादा श्लोक भक्तांना रसिकांना आनंद देतो तसे लॉकडाऊनचे धागे आनंद देणारे. जगावरील संकट लवकर जाऊन लोक पूर्वीप्रमाणेच सुखी होऊ दे,मस्तीत जगू दे, सर्वेत्र सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु, माँ कश्चिद् दुःख माप्युन्यात अशी प्रार्थना करुन थांबतो.

-दिलीप बिरुटे

चौकटराजा's picture

3 May 2020 - 2:00 pm | चौकटराजा

मला स्वतःला आयुष्यात एक भावलेले तत्व म्हण्जे " माणसाला कुठे थांबायचे हे कळले पाहिजे ! " सबब ही मालिका थांबली याबद्द्ल मी समाधानी आहे. त्यात लिहू शकलो याचेही समाधान आहे. अनेक अंगानी साम्प्रतच्या समस्येचा विचार झाला असला तरी "जान है तो जहान है " हे विसरता कामा नये. यापुढे कदाचित अशा साथी येत राहू शकतील असे आता गृहित धरून एकूणच मानवी समाजाने संरक्षण या शब्दाची व्याख्या बदलंण्याची वेळ आली आहे .वैद्यकीय संशोधनाला सर्वोच्च्च प्राधान्य दिले तरच मानवी अभियांत्रिकीला काही अर्थ राहील .अन्यथा कोणताही अत्याधुनिक शोध मानवाला न दिसणार्‍या या घातक शत्रू विरूद्ध उपयोगी ठरणार नाही. कारण तो स्वःतच एक संशोधक आहे. अवकाश संशोधन हा तर विषय काही कामाचा नाही हे या जैविक हल्याने अधोरेखित केले आहे .
फार पूर्वीपासून नासा सारख्या संस्थानीही आपल्या मोहिमा आखडत्या घेतल्या आहेत ते त्यामुळेच. आता सर्व राज्यकर्ते जागे होऊन आपल्या मानवी समाजाच्या हिताची " बकेट लिस्ट" पुन्हा तपासून पहातील अशी आशा करू या !

सौंदाळा's picture

3 May 2020 - 2:31 pm | सौंदाळा

खरंय, बरेच वर्ष मिपा सदस्य असून पहिला लेख लॉक डाऊनमधेच लिहिला.
सर्व लेख एकत्र गुंफून ४० भागांची लेखमाला करावी ही विनंती. अजून काही वर्षांनी वाचायला मजा येईल

Prajakta२१'s picture

3 May 2020 - 3:09 pm | Prajakta२१

धन्यवाद
चांगल्या लेखमालेबद्दल

ह्या सर्व लेखांचे संकलन करून त्याचा एकत्रित विभाग /लिंक करता येईल का?

किसन शिंदे's picture

3 May 2020 - 5:01 pm | किसन शिंदे

लाॅकडाऊन मालिकेचा समारोप यथोचित धाग्याने व्हावा यासारखी दुसरी चांगली गोष्ट ती कुठली, आणि त्यानिमित्ताने मिपाच्या शेठनी दोन शब्द लिहिले याबद्दल त्यांना ठाण्यात आल्यावर हेमंतच्या सुरमईचा नैवेद्य दाखवण्यात येईल.

लक्षात आली, मिपावरची वर्दळ वाढली, असे अनेक जमा मुद्दे आहेत, कृृपया ह्या लेखमालेची मुद्रित आवृत्ती काढावी.

रीडर's picture

4 May 2020 - 1:06 am | रीडर

सध्या मात्र बदलत्या परिस्थितीमुळे लोकांचे जगण्याचे प्राधान्यक्रम सुध्दा बदललेले दिसून येत आहेत<<< +1

रीडर's picture

4 May 2020 - 1:10 am | रीडर

सध्या मात्र बदलत्या परिस्थितीमुळे लोकांचे जगण्याचे प्राधान्यक्रम सुध्दा बदललेले दिसून येत आहेत +1

नीलकांत, उत्तम लेख.. अजून जास्त वेळा लिहीत जाणे.

प्रचेतस's picture

4 May 2020 - 7:29 am | प्रचेतस

लेखमालेचा योग्य समारोप.
सुरुवातीला केवळ उत्स्फूर्तपणे सुरू झालेली ही लेखमालिका हळूहळू आकार घेत गेली आणि अनेक उत्तमोत्तम लेख वाचता आले. सदस्यांच्या विविध गुणांचे दर्शन घेता आले. काही काळानंतर ही लेखमालिका लॉकडाऊनचा एक मोठा दस्तऐवज ठरणार ह्यात शंकाच नाही. आम्ही पहिले आणि दुसरे महायुद्ध पाहिले नाही मात्र हे एका क्षुद्र विषाणूविरुद्ध लढल्या गेलेल्या तिसऱ्या महायुद्धाच्या प्रत्येक क्षणांचा साक्षीदार राहिलो.

जेम्स वांड's picture

4 May 2020 - 8:16 am | जेम्स वांड

समारोपाचा लेख फर्मास जमलाय, पूर्ण टाळेबंदी त्याची कारण मीमांसा, मानवी मानसिकतेवर त्याचे पडलेले प्रभाव ह्यावर उत्तम लिहिलेत मालक. आवडले.

आवडाबाई's picture

6 May 2020 - 12:42 pm | आवडाबाई

मालिकेचा समारोप छान झाला.
ही लेखमालिका आणि शशक स्पर्धा ह्यांमुळे मिपा रिवाईव झाल्यासारखे वाटले.

कवितांच्या प्रतिक्षेत.

टर्मीनेटर's picture

6 May 2020 - 3:03 pm | टर्मीनेटर

उत्तम समारोप!
नीलकांतजी पुढील लेखनास शुभेच्छा!