असुनी स्वत:च पाशी

संदीप-लेले's picture
संदीप-लेले in जे न देखे रवी...
15 Mar 2020 - 11:13 pm

अध्यात्म मोप झाले, व्यवहार तो सुटेना
अंतर्मनात चाले, तो घोळही मिटेना
 
मी एकटाच आलो, जाईन एकटा मी
गर्दी कशास जमली? उत्तर कुठे मिळेना
 
विज्ञान हाच पाया, विज्ञान हीच निष्ठा
मानून चाललो तर, तेही पुरे पडेना
 
दिक्काल वेग सारे, सापेक्ष एकमेका
स्थिर वेग का प्रकाशा, बुद्धीस हे गमेना
 
बुद्धी पल्याड सृष्टी, मी त्यात एक बिंदू
असुनी स्वत:च पाशी, मी कोण हे कळेना

कविता

प्रतिक्रिया

राघव's picture

17 Mar 2020 - 1:45 am | राघव

मी एकटाच आलो, जाईन एकटा मी
गर्दी कशास जमली? उत्तर कुठे मिळेना
आवडले!

संदीप-लेले's picture

17 Mar 2020 - 10:51 am | संदीप-लेले

धन्यवाद राघव.

चौथा कोनाडा's picture

17 Mar 2020 - 12:51 pm | चौथा कोनाडा

मस्त ! आवडली रचना !

विज्ञान हाच पाया, विज्ञान हीच निष्ठा
मानून चाललो तर, तेही पुरे पडेना

खरयं, प्रत्येक गोष्टीला मर्यादा आहेत हेच खरे !

संदीप-लेले's picture

18 Mar 2020 - 10:25 am | संदीप-लेले

धन्यवाद चौथा कोनाडा !

बर्‍याच लोकांना कल्पना नसेल म्हणून थोडा खुलासा.
'स्थिर वेग का प्रकाशा' याओळी विषयी.

प्रकाशाचा वेग कायम असतो हे तर सर्वांना माहीतच आहे. परंतु, त्यातही गमतीची गोष्ट अशी की निरीक्षक एका जागी स्तब्ध असतो तेव्हा त्याला भासणारा प्रकाशाचा वेग आणि कितीही वेगात असताना भासणारा प्रकाशाचा वेग हे सारखेच असतात. निरीक्षक जरी प्रकाशाच्या तथाकथित वेगाच्या 90% वेगाने जात असेल तरी त्याला प्रकाशाचा वेग कमी झाल्याचे भासत नाही तर मूळचा प्रकाशाचा वेग असेल तेवढाच तो आताही भासतो. हा संदर्भ आहे त्या ओळीला.

खिलजि's picture

18 Mar 2020 - 5:11 pm | खिलजि

आपली ही आणि अनंत यात्रींची एक पूर्वकविता ( जनुक जिन्यांची सर्पिल वळणे ) ,, या कविता खरंच आशयघन आहेत .. बघायला गेलं तर त्या खरंच आव्हानात्मक आहेत .. या कविता , कुण्या संशोधकाने वाचल्या तर कदाचित त्याला मार्गदर्शक ठरू शकतात .. खास करून हे कडवं """दिक्काल वेग सारे, सापेक्ष एकमेका,,,स्थिर वेग का प्रकाशा, बुद्धीस हे गमेना""".. खूप गहन अर्थ आहे या कडव्याचा..

संदीप-लेले's picture

18 Mar 2020 - 8:37 pm | संदीप-लेले

खिलजी

आपला अविष्कार पुर्णपणे वाचकापर्यंत पोहोचणे याशिवाय आणखी दुसरे समाधान नाही.
खुप खुप धन्यवाद - केवळ तुम्ही केलेल्या यथोचित कौतुकाबद्दल नाही, तर यातला गहन अर्थ पुर्णपणे समजून घेताल्यानाद्दल अधिक.