तिरुपती दर्शन (प्रवास ) भाग २

AKSHAY NAIK's picture
AKSHAY NAIK in भटकंती
10 Mar 2020 - 1:46 pm

नमस्कार मंडळी,
नुकतेच तिरुपती दर्शन सहल पूर्ण झाली. आपल्या सर्वांच्या शुभेच्छा आणी जाणकार मंडळींचे मार्गदर्शन यामुळे कोणतीही अडचण न येता तिरुपती यात्रा विनासायास पूर्ण झाली. प्रवासात आलेले अनुभव आपल्यासोबत वाटून घेण्यासाठी हा प्रपंच करीत आहे.

दिवस ५ मार्च २०२०
पहाटे साधारण सात वाजण्याच्या सुमारास प्रवास करण्यासाठी मी सज्ज झालो. सकाळी ठीक आठ वाजता सर्व मित्रांनी बस stand वर उपस्थित राहणेबाबत चे मेसेज आदल्या रात्रीच सगळ्यांना केले होते. लातूरहून तिरुपती येथे कोणतीही थेट रेल्वे नसल्यामुळे, तिरुपती ला जाणेसाठी टप्प्या टप्प्या ने प्रवास करावयाचा होता. लातूर - लातूर रोड रेल्वे स्टेशन -विकाराबाद-तिरुपती अशा तीन टप्प्यात प्रवास करायचा होता. सकाळी ठीक आठ वाजता सर्व मित्र मंडळी बस stand वर जमलीच होती. बस stand वर लातूर रोड कडे जाणारी महामंडळाची गाडी उभी होती. लातूर ते लातूर रोड हे अंतर साधारण ३५ किमी असल्यामुळे एखाद तास लातूर रोड येथे पोहचण्यासाठी ग्रहीत धरला होता. लातूर रोड येथे सकाळी नऊ च्या सुमारास बस ने आम्हास सोडले.
लातूर रोड येथे काढलेले छायाचित्र
लातूर रोड रेल्वे स्टेशन वरून विकाराबाद ला जाणेसाठी सकाळी १०.१० वाजता निघणाऱ्या नांदेड बंगलोर गाडीने प्रवास करायचा होता. एक तास आधी पोहचल्यामुळे चहा नाश्ता उरकून रेल्वेची वाट पहात आम्ही मंडळी उभे होतो. अपेक्षेप्रमाणे गाडी अगदी वेळेवर स्टेशनवर दाखल झाली आणी आमच्या प्रवासाला सुरवात झाली.
गाडीने गती पकडताच गप्पांच्या फडाला सुरवात झाली. खूप वर्षांनी एकत्र सर्व मंडळी जमल्यामुळे बोलण्याच्या विषयाला अंत नव्हता. गप्पा मारण्याच्या विषयाची सुरवात अर्थातच कॉलेज मधील आठवणीने न झाली तर नवल., बोलण्याच्या ओघात एका भेळपुरी वाल्या फेरीवाल्याने खुड खुड असे वाजवत आमचे लक्ष वेधले. रेल्वेत आलेला प्रत्येक खाद्यपदार्थ चव घेतल्याशिवाय आपल्या टप्प्याबाहेर जाऊ द्यायचा नाही असा चंगच जणू आम्ही बांधला होता. नुकताच नाश्ता झाला होता तरीपण चव म्हणून भेळपुरी चा आस्वाद घेणे आवश्यक होते. त्याप्रमाणे भेळपुरी खात खात पुन्हा आमच्या चर्चेला सुरवात झाली. राजकारण,चित्रपट,समाजकारण,अर्थकारण या विषयावर अगदी अथांग चर्चा झाली. मोदींनी केलेल्या नोटबंदी पासून हल्ली च्या कलम ३७०,राम मंदिर,CAA या सर्व विषयावर अगदी सखोल चर्चा झाली. मोदींनी काय करायला पाहिजे किंवा त्यांचे काय चुकले यामध्ये देखील बराच खल झाला. मोदी समर्थक विरुद्ध मोदी विरोधक असे दोन गट पडून बऱ्यापैकी वाद विवाद देखील झाला. मध्येच एकदा महाभारत, रामायण हे कालखंड देखील फिरून झाले. गप्पा मारता मारता विकाराबाद रेल्वे स्टेशन आले. दुपारचे अडीच वाजले होते. येथूनच आम्हाला संध्याकाळी सात वाजता सिकंदराबादहून तिरुपती येथे जाणारी रायलसीमा एक्स्प्रेस गाडी पकडायची होती. विकाराबाद स्टेशन येथे उतरून सर्वप्रथम सोबत आणलेल्या बाटल्यांमध्ये थंड पाणी भरून घेतले. पुढील गाडी पकडण्यासाठी साडेचार तास शिल्लक होते. विकाराबाद स्टेशनच्या बाहेरच एक बाग आहे असे कळल्यानंतर आमचा मोर्चा आम्ही बागेकडे वळविला.
बागेमध्ये पोहचल्यानंतर एका मोठ्याशा झाडाखाली आम्ही जागा पकडली. बाग तशी बऱ्यापैकी मोठी होती. वातावरण देखील छान होते. अनेक प्रवासी देखील येथे दिसत होते. जेवणाची वेळ झालीच होती. आमच्यापैकी एका मित्राने अगदी साग्रसंगीत बेत आखला होता. कांद्याची धपाटी, घट्ट दही,शेंगाची चटणी,मिरचीचा खर्डा,लोणचे आणी तोंडी लावण्यासाठी कांदा व काकडी. मेनू पाहूनच तोंडाला पाणी सुटले होते. जेवणावर अगदी सर्वजण तुटून पडले. पोटभर जेवण झाल्यामुळे आता एक वामकुक्षी घेतल्याशिवाय पर्याय नव्हता. सोबत आणलेल्या bags डोक्याखाली ठेवून मस्तपैकी ताणून दिली. संध्याकाळी साडेपाच च्या सुमारास जाग आली. चहाची वेळ झाली होती. हातपाय धुवून चहा घेण्यासाठी आम्ही सगळे बागेचा निरोप घेवून बाहेर पडलो. विकाराबाद ची बाजारपेठ पहात पहात बरेच अंतर चालत जाऊन एके ठिकाणी चहा घेतला. संध्याकाळचे साडेसहा वाजत आले होते. गाडीची वाट पहात विकाराबाद स्टेशनवर आम्ही येवून थांबलो. गाडी १५ मिनिटे लेट झाली होती. ठीक सव्वासात च्या ठोक्याला गाडीचे स्टेशनवर आगमन झाले. गाडी येताच "व्यंकट रमणा गोविंदा गोविंदा" असा जयघोष अनेकांनी चालू केला तसे आम्हीपण त्यांच्यात सामील झालो. गाडी तिरुपतीच्या दिशेने मार्गस्थ झाली होती. आमच्या शेजारील सीट वर अनेक आंध्र, कर्नाटक या भागातील भक्तगण दिसत होते. त्यातील एकजण आमच्याशी त्याच्या भाषेत काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करीत होता मात्र तो काय म्हणत होता हे काही कळले नाही. जिथे काळेपणा देखील संपतो असा एक काळाकुट्ट इसम माझ्या शेजारी येवून बसला. तोडक्या मोडक्या हिंदी भाषेत आमच्या गप्पा मस्त रंगल्या. तिरुपतीला गेल्यावर काय नियोजन करायचे याची माहिती तो देत होता. रात्रीचे नऊ वाजले होते गाडीतील लाईट बंद होत होते. जसजसे लाईट बंद होत गेले तसतसे तो इसम लोप पावत गेला. दुपारी खूपच जेवण झाल्यामुळे आता काही खाण्याची इच्छा राहिली नव्हती. सोबत आलेली मंडळी हळूहळू झोपत होती. मग मी देखील सकाळी साडेपाच चा गजर लावून पांघरून ओढून निद्रिस्त झालो.

क्रमशः

प्रतिक्रिया

उदयगिरी's picture

10 Mar 2020 - 2:51 pm | उदयगिरी

भावा तू तर आमच्या गावा कडला आहेस. ट्रेन रॉयल सीमा एक्स्प्रेस होती का.

AKSHAY NAIK's picture

10 Mar 2020 - 7:22 pm | AKSHAY NAIK

हो भावा !

कंजूस's picture

10 Mar 2020 - 4:04 pm | कंजूस

वाचतोय.

AKSHAY NAIK's picture

10 Mar 2020 - 11:05 pm | AKSHAY NAIK

धन्यवाद कंजूषजी!

उगा काहितरीच's picture

10 Mar 2020 - 9:54 pm | उगा काहितरीच

वाचतो आहे. साधं सरळ लेखन आवडत आहे.

AKSHAY NAIK's picture

10 Mar 2020 - 11:06 pm | AKSHAY NAIK

खूप खूप आभार

शशिकांत ओक's picture

10 Mar 2020 - 10:08 pm | शशिकांत ओक

कोणतीही अडचण न येता तिरुपती यात्रा विनासायास पूर्ण झाली.

चलो बुलावा आया है... माताने बुलाया है...
असे म्हणतात... आपण जायचे ठरवतो. पण यात्रा पूर्ण करायला त्याची संमती लागते...

AKSHAY NAIK's picture

10 Mar 2020 - 11:08 pm | AKSHAY NAIK

हे मात्र अगदी खरंय!

चौथा कोनाडा's picture

15 Mar 2020 - 12:53 pm | चौथा कोनाडा

छान, मस्त प्रवास वृत्तांत !
साधे सरळ कथन आवडले.

अपेक्षेप्रमाणे गाडी अगदी वेळेवर स्टेशनवर दाखल झाली
आजकाल ट्रेन वेळेवर असतात असा माझा देखील गेल्या काही महिन्यांचा अनुभव आहे.

AKSHAY NAIK's picture

15 Mar 2020 - 2:54 pm | AKSHAY NAIK

धन्यवाद!