अन्न खाता दुःखी भव..!!

आजी's picture
आजी in जनातलं, मनातलं
17 Feb 2020 - 6:05 pm

मी सुरुवातीलाच कबूल करते की,मला खाण्यात इंटरेस्ट आहे. मी पक्की खवैय्यी आहे. माझं वजन वाढलेलं असल्यानं डाएटिशियन सांगेल तेच मी खाते. पण न राहवून, मोह न आवरल्यामुळे मी ते डाएट अनेकदा मोडतेही. ज्यामुळे वजन वाढतं ते सगळे पदार्थ मला अतिशय आवडतात. म्हणजे तळलेले आणि गोड पदार्थ. माझे फँमिली डॉक्टर मला आवडतात, कारण ते मला म्हणतात,"you are fat but fit.
your reports are normal.

"फॅट बट फिट!वा वा! तरीही वाढलेलं वजन माझं मलाच खुपतं आणि मी (वारंवार) डाएट करते.

कुणी जेवायला बोलावलं की मला फार आनंद होतो. वेगळ्या हाताचं, वेगळ्या चवीढवीचं खायला मिळावं अशी माझी अपेक्षा असते.(मीच केलेलं मी खातेसुद्धा) पण जेवायला बोलावून आपला विरस करणारे अनेक भेटतात.

एकदा एके ठिकाणी मी जेवायला गेले. आणि ताटावर बसून पहिला घास घेणार ,इतक्यात माझ्याबरोबर जेवायला बसलेला त्यांचा मुलगा म्हणाला," आई, मला बेतानंच वाढ हं! मला सारखं सारखं 'संडासला जावं' लागतंय. सकाळपासून चारदा गेलो. डहाळ होताहेत. दोनदा उलटीही झाली."

माझा हात जागीच थांबला.

ते ऐकून त्याची आई म्हणाली," अरे,काय सांगतोयस काय? तात्यांचं पण पोट बिघडलंय. पातळ होतंय. अर्धवट घट्ट अर्धवट पातळ असं चालू आहे. उलट्या, जुलाब, हैराण झालेत. बाहेरचं खाता आणि पोटं बिघडतात."

त्यापुढे संडास, बाथरुम, वॉशबेसीन ह्या आणि अशा विषयावर सचैल गप्पा झाल्या. मला वाढलेल्या ताटाला नमस्कार करुन उठावंसं वाटलं पण लाजेकाजेस्तव पहिलं वाढलेलं तेवढं खाऊन मी उठले.

आणखीही एक जरा वेगळा प्रकार सापडतो कधीकधी. एका ठिकाणी गेले जेवायला बोलावलं म्हणून. साग्रसंगीत बेत होता.
माझी आवडती पुरणपोळी होती. मी अगदी पोटभर खायचं ठरवून टाकलं (डाएट काय रोजचंच आहे). कटाची आमटीही मी ओरपणार होते. आम्ही जेवायला बसलो. मी प्रसन्न मनाने सुरुवात केली.

पण... तेवढ्यात माझ्या शेजारी बसलेल्या आत्याबाई म्हणाल्या,"मला पुरणपोळी वाढू नका हं! 'हे' गेल्यापासून मी सोडलीय.'ह्यांना' खूप आवडायची. त्यांची आठवण म्हणून सोडली." (उलट त्यांना आवडायची म्हणून त्यांच्या आठवणीत खावी ना पुरणपोळी-मी मनात म्हटलं.)

आत्याबाईंनी डोळ्यांना पदर लावला आणि त्या रडत रडत पतीच्या आठवणी सांगण्यात मग्न झाल्या. अजून पुरणपोळी वाढलीही नव्हती पण आम्ही सगळेच जेवायचे थांबलो. माझा मूडच गेला. आत्याबाईंचं रडणं थांबलं. त्यांनी जेवायला सुरुवात केल्यावर आम्हीही सुरुवात केली. पण या सर्वामध्ये पहिल्या वाफेचा गरम भात, वरण, तूप, लिंबू, कटाची आमटी, मागून येऊ घातलेली गरमगरम पुरणपोळी, त्यासोबत नारळाचं दूध.. सगळ्या अन्नाच्या गारगोट्या झाल्या. दुःखातून सावरलेल्या आत्याबाई नंतर चांगल्या चापून जेवल्या बरंका!

या आत्याबाईंवरुन आठवलं, आणखी एक कॅटेगरी. एके ठिकाणी जेवायला गेले तर सगळ्या आजारावरच्या गप्पा. कोण कसं 'गेलं' ह्याची वर्णनं. अकाली जाण्याबद्दल आणखी विशेष उत्साह.

जेवणात चांगली बासुंदी केलेली होती. मी बासुंदीची वाटी तोंडाला लावली आणि ऐकू आलं,"अहो, आमचे काका! गेल्याच वर्षी हार्ट अटॅकनं गेले. अशीच बासुंदी केली होती. बासुंदीची वाटी तोंडाला लावली आणि तिथंच ताटावरच कोसळून पडले. बासुंदीचा घोट शेवटचा घोट ठरला. मामला खतम. खेळ खलास. मी ओरडतेय काका काका म्हणून, आणि त्यांनी गर्रकन डोळे फिरवले"

मी दचकून तोंडाला लावलेली वाटी दूर केली. मी धीर एकवटून पुन्हा पुढची बासुंदी पिणार एवढ्यात शब्द ऐकू आले, "शालनमामींचा कँन्सर जास्त झालाय. सगळीकडे पसरलाय. अँडव्हान्स्ड स्टेज. कधीही बातमी येऊ शकते. मग कुणाला खोकला, कुणाला ताप, कुणाला सर्दी, चक्कर, डोकेदुखी आणि लोकप्रिय पित्त, उलट्या अशा सगळ्या आजारांवरच गप्पा झाल्या. आपण अशावेळी काहीच करु शकत नाही. मी दोनतीनदा विनोदी चुटके सांगून,आमच्या बागेत फुललेल्या सुगंधी फुलांबद्दल सांगून विषय बदलण्याचा प्रयत्न केला पण त्याचा काही उपयोग झाला नाही.

काही ठिकाणी जेवणात नियमित केस सापडतात, की आपण पुढचं जेवण जेवूच शकत नाही. एकदा मला पानात वाढलेल्या फ्लॉवरच्या भाजीत अळी सापडली. मी ती भाजी खाणं कायमचं सोडलं. तर एकदा आमटीच्या वाटीच्या बुडाला चिकटलेली, काड्यापेटीतली विझलेली काडी सापडली. गॅस लायटर बिघडला होता म्हणून काड्यापेटी वापरली होती म्हणे!

खूप वर्षांपूर्वी एकदा एके ठिकाणी मी, माझा मुलगा आणि माझे 'हे' आम्ही जेवायला गेलो होतो. आम्ही आणि त्यांच्याकडचे मिळून सात माणसं होतो. मध्यभागी अगदी लहान लहान भांड्यांत डाव डाव भाजी आणि थेंब थेंब आमटी ठेवली होती. मोजक्याच पोळ्या, किंवा फुलकेच ते. आकाराने लहान. आम्ही प्रत्येकी जेमतेम एक पोळी, दीड चमचा भाजी आणि दोन ठिपके आमटी एवढंच खाल्लं. यजमानीणबाई म्हणाल्या,"आम्हांला शिळंपाकं,उरलेलं खायला अजिबात आवडत नाही. म्हणून मी मोजकंच करते. गोड मुद्दाम केलं नाही. काहींना डायबेटीस असतो ना! तळलेलं काही केलं नाही. वजन वाढतं. दुधातुपाचं पण मुद्दामच काही केलं नाही. कोलेस्टेरॉल वाढतं. आणि गळ्याशी येईपर्यंत जेवू नयेच. अपचन आणि गॅसेस होतात. भुकेपेक्षा चार घास कमी खावेत. आरोग्याला चांगलं. घ्या ना आणखी आमटी.."

आम्ही मान डोलावली, पण आमटी घेतली नाही. त्यांचं रात्रीचं जेवण कमी पडलं असतं.

जेवून (?) झाल्यावर आम्ही त्या घराबाहेर पडलो. मुलगा आणि हे म्हणाले,"चला आता आपण कुठेतरी जेवूया." मी सावधपणे म्हटलं,"त्यांच्या घरापासून दूरचं हॉटेल शोधूया. ते बाहेर आले तर? नाहीतर ते पण आपल्याच हॉटेलात यायचे"

अशा प्रकारची जेवणं जेवताना मला काय वाटतं सांगू? वाटतं की आपण एक करकोचा आहोत आणि आपल्यासमोर एका पसरट थाळीत बासुंदी वाढलीय.. आणि कोल्हा समोर बसून म्हणतोय, "पोटभर होऊ दे, संकोच नको हं.."

जीवनमानविचारलेख

प्रतिक्रिया

माहितगार's picture

17 Feb 2020 - 6:45 pm | माहितगार

:) आजी, नेमकं खुसखुशीत लेखन जिथे चव हुकली त्यात तुमचा नव्हे आमंत्रण देणार्‍या यजमानांचा दोष हे नक्की. मला असाच एका गोष्टीचा त्रास होतो म्हणजे जेवण्यास बसल्यानंतर बरीच मंडळी एखादा पदार्थ आवडत नाही असे सांगून थांबत नाहीत तर सोबत 'ईई..' इत्यादी सारखा एखादा किळसवाणा उच्चार करतात, माझ्या सारखा सर्व पदार्थ चालणार्‍या किंवा नेमका तोच पदार्थ आवडणार्‍या व्यक्तिचा विरस होतो. अर्थात मी सुद्धा सर्व पदार्थ खाण्याबद्दलचे मोठे व्याख्यान देण्यास मागे पुढे बघत नाही.

आनन्दा's picture

17 Feb 2020 - 9:24 pm | आनन्दा

आज्जे, हा म्हणजे अगदी मास्टरपीसच आहे

जेवणात चांगली बासुंदी केलेली होती. मी बासुंदीची वाटी तोंडाला लावली आणि ऐकू आलं,"अहो, आमचे काका! गेल्याच वर्षी हार्ट अटॅकनं गेले. अशीच बासुंदी केली होती. बासुंदीची वाटी तोंडाला लावली आणि तिथंच ताटावरच कोसळून पडले. बासुंदीचा घोट शेवटचा घोट ठरला. मामला खतम. खेळ खलास. मी ओरडतेय काका काका म्हणून, आणि त्यांनी गर्रकन डोळे फिरवले"

ठो करून हसू आलं अनेक ठिकाणी. काही नमुने पाहून पिकू चित्रपट आठवतो.

बरं, आलोच माझं आम्लपित्तावरचं चूर्ण घेऊन. नाहीतर घशाशी येतं पिवळं पित्त आणि उलटून पडतं.

सौन्दर्य's picture

18 Feb 2020 - 9:29 am | सौन्दर्य

एखाद्या ठिकाणी कोणी जेवायला बोलावले की मी अगदी आडवा हात मारतो कारण बोलावणारा नंतर गावभर मी अमक्या अमक्याला जेवायला बोलावले होते हे सांगत फिरणार असतो त्यामुळे तेथे जाऊन हात राखून जेवायाचेच का ?

बाकी लेख अगदी जेवणासारखाच खुसखुशीत. एकदम मस्त.

ज्ञानोबाचे पैजार's picture

18 Feb 2020 - 9:40 am | ज्ञानोबाचे पैजार

अजून एक जमात असते, हे लोक जेवताना चित्र विचित्र आवाज काढत असतात, काही जण घास चावताना मचाक मचाक असा आवाज काढत जेवतात, हे आवाज बारकाईने ऐकले तर या आवाजाच्या सुध्दा अनेक विविध छटा ऐकायला मिळतील.

काही जण पहिल्या घासापासून ढेकरा द्यायला सुरुवात करतात म्हणजे आपण इकडे श्रीखंडपुरीचा घास घ्यावा की ऑSSSम असा आवाज कानात घुमतो आणि यांच्या ढेकरा सुध्दा त्या सुध्दा अत्यंत साग्रसंगीत असतात, काही लोक ज्यांना ढेकर द्यायला जमत नाही ते विरुध्द मार्गाने वायू उत्सर्जित करत असतात, बर्‍याचदा हे उत्सर्जन ध्वनी आणि गंधयुक्त असते. त्यातही काही जण अगदी दिर्घ ताना घेत उत्सर्जन करत असतात

आणि हे कमी असते म्हणून की काय या असल्या आवाजखोर लोकांच्या गृहलक्षम्या त्यांच्या आहोंच्या असल्या पादनैपुण्याचे तिकडेच पंगतीतच यथासांग वर्णन करत असतात. "आहो एकदा कि नै पंडीत नेहरु की राहुल गांधी यांच्या बरोबर जेवायला बसले होते. आणि तिथे सुध्दा यांनी अशी काही तान मारली की नेहरु एकदम खुश झाले आणि यांना भारतरत्न देण्यात यावे अशी तिथे पंगतीतच शिफारस केली"

इंग्रज लोक टेबलावर बसून नाके शिंकरतात म्हणून मग काही बाटगे इंग्रज सुध्दा जेवताना "वदनी कवळ घेता" म्हटल्या सारखे भक्ती भावाने आपले श्वसनमार्ग रिकामे करत असतात.

समोर आलेल्या पदार्थाला चव न घेताच नावे ठेवणारे लोक जसे डोक्यात जातात तसेच उगाचच समोरच्या पदार्थांचे अनाठायी वर्णन करणारे लोकही डोक्यात जातात. "वा वहिनी आळूचे फदफदे खावे तर तुमच्यात हातचे वा, झकास झाले आहे, घाला अजून एक वाटी वाढा" असे वर्णन करणार्‍या भाउजींनी मग वहिनी पण कौतुकाने दोन डाव वाढत म्हणतात "फसलात ना भाउजी तुम्ही सुध्दा, आहो ती शेपुची कढी आहे कारले घालून केलेली, घ्या ना अजून घ्या, आत बरीच शिल्लक आहे, घरी जाताना डब्यात भरुन देते, आमच्या यांना ना माझ्या पाककलेचे जरा देखिल कौतुक नाही"

अजून एक जमात म्हणजे "आमच्या आईच्या / बायकोच्या हातची चव काय आहे बेटा, तिच्या हातची भरली ढेमसी, ज्वारीच्या पुर्‍या आणि बटाट्याचे अंबील खाउन बघ हॉटेलात जाणे विसरशील" असे यजमानाला ऐकवत जेवणारे कृतघ्न लोक्स. "अरे आमच्या घरी जेवलास की हॉटेलात जायचे विसरशील." असे वर्णन करणारा स्वतःच आठवड्यातून चार वेळा वेगवेगळ्या हॉटेल मधुन बाहेर पडतना आणि सहा सात वेळा भजी वडापावच्या गाड्यांवर उभा राहिलेलेला आपल्याला दिसतो.

यांच्या घरी जेवलो की थेट हिमालयाचा रस्ता धरावा लागेल म्हणून मी असल्या लोकांच्या घरी जेवायला जाणे टाळतो.

पण खरा खवैय्या तोच जो असल्या सर्व क्षुल्लक गोष्टींकडे दुर्लक्षकरुन केवळ आणि केवळ समोर वाढलेल्या पदार्थांचा मनसोक्त आस्वात घेतो.

पैजारबुवा,

प्रचेतस's picture

18 Feb 2020 - 9:54 am | प्रचेतस

=))

श्वेता२४'s picture

18 Feb 2020 - 1:04 pm | श्वेता२४

खिक्क करुन हसूच आलं. पैजारबुवांनी तर प्रतिसादात सिक्सरच मारलाय.हहपुवा.

कुमार१'s picture

18 Feb 2020 - 10:40 am | कुमार१

खुसखुशीत लेख
छान !

सुचिता१'s picture

18 Feb 2020 - 4:41 pm | सुचिता१
मुक्त विहारि's picture

18 Feb 2020 - 6:42 pm | मुक्त विहारि

एकदम खुसखुशीत लेख.

प्राची अश्विनी's picture

19 Feb 2020 - 10:08 am | प्राची अश्विनी

:):)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Feb 2020 - 12:09 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

खुसखुशीत लेखन. आवडले.

-दिलीप बिरुटे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Feb 2020 - 12:13 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

जेवणात चांगली बासुंदी केलेली होती. मी बासुंदीची वाटी तोंडाला लावली आणि ऐकू आलं,"अहो, आमचे काका! गेल्याच वर्षी हार्ट अटॅकनं गेले. अशीच बासुंदी केली होती. बासुंदीची वाटी तोंडाला लावली आणि तिथंच ताटावरच कोसळून पडले. बासुंदीचा घोट शेवटचा घोट ठरला. मामला खतम. खेळ खलास. मी ओरडतेय काका काका म्हणून, आणि त्यांनी गर्रकन डोळे फिरवले"

मी दचकून तोंडाला लावलेली वाटी दूर केली.

-दिलीप बिरुटे

पियुशा's picture

19 Feb 2020 - 12:58 pm | पियुशा

वाह दिलखुलास लिहिलं आहेस आज्जे :) माझया एका क्ष मैत्रिणीने आम्हाला 3,4 कॉलेजातल्या मैत्रिणींना जेवायला बोलावले होते , ती आमची पहिलीच वेळ होती कुणाकडे अस जेवायला जायची आणि त्या मैत्रिणीच्या आईने काय काराव ? चांगलं शेलक शेलक घरच्यांना वाढलं आणि करपलेली भजी, वातड पोळ्या, नरम झालेल्या कुरडया गार झालेली आमटी आम्हाला वाढली आम्ही फक्त एकमेकांकडे बघत राहिलो , इतका कसा कोतेपणा असावा अंगात ? असो काही अगदी देवाला जसा पाहुणचार करावा असे लोकही आहेत जगात आणि मनसोक्त पाहुनचारही घेतला आहे केलाही आहे,पण असे किस्से असतातच ठेवणीतले :)

गवि's picture

19 Feb 2020 - 1:26 pm | गवि

पाहुण्यांना अगदी जास्तच "घरच्यासारखं" मानून त्यांच्या पोटी उरलेलं शिळंपाकं दडपून ते संपवल्याचा आनंद मिळवणारेही यजमान बघितले आहेत.

काहीजण गुपचूप साळसूदपणे शिळं वाढतात तर काहीजण अगदी फ्रॅंकनेस दाखवल्यासारखं "चला, भात उरलेला आहे, तो संपवूया, आणि कालची भजीही घेऊन टाकू सोबत, सगळे घरचेच आहेत.." वगैरे.. एका घरी तर भाताला आंबून तार आली होती. यक्क.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Feb 2020 - 2:04 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

एका घरी तर भाताला आंबून तार आली होती. यक्क.

हे राम. हाइट झाली ही..! :/

-दिलीप बिरुटे

प्रकाश घाटपांडे's picture

19 Feb 2020 - 2:37 pm | प्रकाश घाटपांडे

तार आमटीला येते ना?

ज्ञानोबाचे पैजार's picture

20 Feb 2020 - 12:06 pm | ज्ञानोबाचे पैजार

इ,पू, काळात कोणी खपले की तार यायची.
आता कायप्पा वर संदेश येतो.
आणि मग तार स्वरात भेसूर आवाज येउ लागतात.
पैजारबुवा,

यावरून आठवल हापिसातल्या एका ज्येष्ठ सरानी दिवाळीचे (उरलेला मोक्ष प्राप्ती झालेला फराळ ) खवट झालेले खोब्रा आनी रवा लाडू , नरम झालेल्या शंकरपाल्या आनी करंजी, तळाला जाऊन फक्त काही पोह्यांचा अवशेष राहिलेला असा खारट चिवडा डब्बा भरून आणून एकेकाला धरून आणून संपवायला भाग पडलेलं याची देही याची डोळा पाहिलेले आहे

जालिम लोशन's picture

19 Feb 2020 - 3:50 pm | जालिम लोशन

जेवायला आलैकी मनगटे बुडे पर्यंत जेवतात म्हणणारी,

अनिंद्य's picture

20 Feb 2020 - 10:31 am | अनिंद्य

लेख फस्टक्लास !

तुमचे लेखविषय रोजच्या जगण्यातले साधे सोपे असले तरी त्यावर तुमचं भाष्य नाविन्यपूर्ण आणि मजेशीर असते - हे फार आवडते.

स्वआमंत्रित अतिथीला शिळेपाके - खरवड ? शापच देईन मी तर :-)

खिलजि's picture

20 Feb 2020 - 5:23 pm | खिलजि

आजीनू मला भरपूर अनुभव हैत असे .. पण इथे नमूद नाही करता येणार ...

कानडाऊ योगेशु's picture

22 Feb 2020 - 9:42 am | कानडाऊ योगेशु

मस्त लेख पाडला आहे आज्जीबाई! ;)

एकदा मला पानात वाढलेल्या फ्लॉवरच्या भाजीत अळी सापडली. मी ती भाजी खाणं कायमचं सोडलं.

माझीही अगदी माझ्या लहानपणीची आठवण आहे. आई भेंडीची भाजी चिरत होती आणि एका भेंडीत जिवंत आळी निघाली . तशीही एरवी भेंडीची भाजी स्पर्शाला बुळबुळीत लागते आणि त्यातुन ती अळी बाहेर पडताना प्रत्यक्ष डोळ्याने पाहिल्याने पुन्हा भेंडीची भाजी खाण्यावरची वासनाच उडुन गेली.

अजुन एक आठवण माझे वडिल माझ्या आजोबांबद्दल सांगत असत .ती म्हणजे माझे अजोबा लहान असताना बटु म्हणुन कुणा एका दांपत्याने त्यांना जेवायला बोलावले. आजोबांची वामनमूर्ती पाहुन गृहीणीने बेतानेच स्वयंपाक केला होता पण आजोबा व्यायाम वगैरे करणारे असल्याने त्यांची भूक जास्त होती आणि वडिल पुढे सांगायचे बाईला दुसर्यांदी स्वयंपाक करावा लागला. हे कुबेराच्या घरी गजाननाला जेवायला बोलावल्यासारखेच झाले.

मदनबाण's picture

22 Feb 2020 - 10:09 am | मदनबाण

आजी छान गोड लिहलं आहेस, खवैय्यी आहेस हे कबुल केल्या बद्धल अभिनंदन !
तुझे निरिक्षण उत्तम दिसत आहे ! :)
बादवे, मी पाखरांचे निरिक्षण केले असता मला असे जाणवले की त्यांचे खाण्या-पिण्याचे लयं नखरे असतात... ह्याव मला पाहिजे अन् त्याव मला नको, ह्याव मला फार आवडत अन् त्याव मला अजिबात आवडत नाही, ह्याव खाल्ल की मला त्रास होतो अन् त्याव खाल्लेल मला सहन होत नाही [ काय त्रास होतो आणि सहन होत नाही म्हणजे काय ? असे प्रश्न पाखरास विचारु नये, उत्तर तर मिळणार नाहीच पण त्याचे डोळे मोठे झालेले मात्र पहायला नक्की मिळतील ! :))) ]
मागच्या आठवड्यात मी रस मलई [ मला फार फार आवडते. ] मलई सँन्डवीच , अंजीर मावा , रबडी , मँगो लस्स्सी इं पदार्थांवर ताव मारला आहे ! मी श्वास घेतला तरी माझ्या कॅलरीज वाढतात असा मला दाट संशय असल्या कारणाने मी मुक्त हस्ताने माझे आवडते पदार्थ खातोच खातो. :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Virgin Mojito - Sainee Raj | Hindi Storytelling | Tape A Tale

बबन ताम्बे's picture

22 Feb 2020 - 2:02 pm | बबन ताम्बे

लेख खूपच आवडला.
अजून एक क्याटेगरी म्हणजे आग्रह करून करून वाढणे. त्यात पाहुणा लाजाळू असला की यजमानाला अजून चेव येतो. खा हो, लाजू नका असं म्हणून भरपूर वाढतात.
बरं ताटात उष्ट टाकणं चांगलं दिसत नाही त्यामुळे पाहुण्याला ताटातले पोटास तडस लागेपर्यंत खायला लागते.

- माहितगार-तुमच्यासारखा अनुभव बरेचदा येतो.आपला विरस होतो."नेमकं,खुसखुशीत लेखन "हा तुमचा अभिप्राय वाचून आनंद झाला.

-आनन्दा-"हा म्हणजे मास्टरपीसच"हा तुमचा उत्स्फूर्त उद्गार मनाला समाधान देऊन गेला.

-गवि-"पिवळं पित्त उलटून पडतं" हे किळस आणणारं पण अनुरुप आणि गंमतीदार उत्तर वाचून हसू आलं.

-सौन्दर्य-"लेख जेवणासारखाच खुसखुशीत.एकदम मस्त"...
याबद्दल थँक्यू.मनापासून आभार.

-ज्ञानोबाचे पैजार-तुम्ही इतरांच्या कॉमेंटस् कडे लक्ष न देता वाढलेल्या पदार्थांचा मनसोक्त आस्वाद घेता हे योग्य करता.

-प्रचेतस-धन्यवाद.

- श्वेता२४- हहपुवा म्हणजे हसून हसून पुरेवाट हे कळायला वेळ लागला. थँक्यू प्रतिसादाबद्दल.

-कुमार१-धन्यवाद.

-सुचिता१-"नेहमीप्रमाणे खुसखुशीत" अशी दाद मिळाल्यावर मला आणखी काय हवं?

-मुक्तविहारि-मनापासून धन्यवाद.

-प्राची अश्विनी-थँक्स फॉर द स्माईली. एखादं वाक्य पण टाका ना!

- प्रा.डॉ.दिलीप बिरुटे-तुम्ही दोनदा अभिप्राय दिलायत. तुमच्यासारख्या प्राध्यापकांनाही माझे लेखन आवडले हे वाचून आनंद द्विगुणित झाला. माझ्या अंगावर (ज्यामुळे वजन वाढणार नाही असं) मूठभर मास चढलं.

-पियुशा- तुमची आठवण अगदी कटु आठवण आहे.कमाल आहे त्या मैत्रीणीच्या आईची!

- गवि-दोनदा अभिप्राय.धन्यवाद. तुम्हाला आलेला शिळं वाढण्याचा अनुभव कटुच आहे.

-प्रकाश घाटपांडे-तार आमटीलाही येते आणि गवि म्हणाले तशी आंबलेल्या भातालाही येते. पण शी, नकोच तो तपशील.

ज्ञानोबाचे पैजार- हा हा हा!खूप हसू आलं.

-पियुशा-दुसऱ्यांदा!दिवाळीचा असा खवट,शिळा फराळ खावा लागणं?याक् ना!

-जालिम लोशन-मजेशीर!

-अनिंद्य-तुमचा अभिप्राय मनाला आनंद देऊन गेला. बरं वाटलं.
अशानं आणखी लिहायला प्रोत्साहन मिळतं.

-खिलजि-असे भरपूर अनुभव सगळ्यांनाच दिसताहेत आलेले.

-कानडाऊ योगेशु-"मस्त लेख" बद्दल थँक्स. तुमचा अनुभव वाचण्याजोगा आहे.

-मदनबाण-"माझं निरीक्षण उत्तम आहे" ह्या तुमच्या अभिप्रायामुळं बरं वाटलं.

-बबन ताम्बे-तडस लागेपर्यंत जेवावं लागतं हाही एक अनुभव तुम्ही म्हटल्याप्रमाणे येतोच. भीड पडल्याने अनेकदा नाहीही म्हणता येत नाही आणि पानात टाकताही येत नाही.

चांदणे संदीप's picture

25 Feb 2020 - 9:53 am | चांदणे संदीप

जाम हसलो आज्जी! =)) लिहित रहा.
आज्जीचं लिखाण वाचाल तर वाचाल असं सार्वजनिकरीत्या जाहीर करून टाकलंच पाहिजे आता.
(याआधीचा माझा पर्तिसाद उमट्याच नै)

सं - दी - प