मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मला भेटलेले रुग्ण - २१

डॉ श्रीहास · · जनातलं, मनातलं
https://misalpav.com/node/45617 निदान झालं , त्यानंतर ॲलर्जीबद्दल सविस्तर समजावूनही पेशंटच्या सासऱ्यानी एकच प्रश्न ७ वेळा विचारला तेव्हा मी त्यांना रागवलो !!....कारण एकच प्रश्न ७ वेळा उत्तरून कंटाळलो होतो आणि परत ह्यांना आणू नका हे देखील म्हटलो होतो... काल त्या पेशंटच्या सासऱ्यांना साॅरी म्हटलो तर त्यांना काहीच आठवत नव्हतं पण पेशंट विसरली नव्हती आणि म्हणाली की ह्यांना शक्यतो मी आणत नव्हते व आलेच तर काहीही बोलायचं नाही हे बजावूनच सोबत आणायचे ... पण कालपर्यंत असलेलं हे ओझं मनावरून उतरून गेलं .... मी त्या पेशंटला म्हणालो ताई नशिबवान आहात सासरा तुम्हाला सुन न मानता पोटची पोरगी मानतो आणि काळजीपोटी सोबतही येतो !! का कोण जाणे हा माणूस पूर्णपणे बदलेला होता आणि त्याहूनही महत्वाचं म्हणजे मला ते जाणवलं ...... _____________________________________ शेवटचा पेशंट म्हणाला डाॅक्टर तुम्ही ईतक्या ठिकाणी व्हिसीटला जाता ,जालन्याला का येत नाही ? ह्या मी म्हणालो की ती सगळी गावं किमान सव्वाशे किलोमिटर्सवर आहेत आणि जालना फार जवळ आहे , तिथपर्यंत तर मी सायकलनीच जातो ;)) (मी औरंगाबादला प्रॅक्टीस करतो , तिथून जालना ६० किमी अंतरावर आहे) _____________________________________ ही पेशंट नेहेमीच त्रास वाढला की येते , तेव्हा औषधही संपलेली असतात .... मी त्यांना नेहमी रागावतो, स्वत:ची काळजी करत नाही हे सांगतो आणि परत तपासणी करून पुढची तारीख व औषधं लिहून देतो.... हा गेल्या ५-६ वर्षांचा शिरस्ता , पण ह्यावेळेस ती पेशंट नेहमीपेक्षा जास्त कालावधीनी आलेली आणि नेहमीपेक्षा किंबहूना फारशी बोलतच नव्हती .... हे मला जाणवलं आणि मी थोडं खोलात जाऊन विचारल्यावर ती म्हणाली डाॅक्टर मला अस्थमाशिवाय बिपी आणि थायराॅईड साठी ट्रिटमेंट घ्यावी लागते. घरी सासू ह्यावरून सतत घालून पाडून बोलतात त्यातही ईन्हेलर घेतांना दिसले तर हसायलाच लागतात किंवा शेजारचं कोणी आलं तर माझी गाऱ्हाणीच मांडत बसतात .... ह्यासगळ्याला तोंड देता देता मी बरेचदा ईन्हेलर, बिपीची गोळी किंवा थायराॅईडची गोळी विसरून जाते आणि मला तुम्ही दुसरे डाॅक्टर्स ह्यावरून नेहेमीच रागवतात ; एव्हाना डोळ्यांच्या कडांमध्ये अडलेलं घळाघळा वाहू लागलं ... मी त्यापेशंटला धीर दिला आणि सांगीतलं की ह्यापुढे तुम्हाला कधी रागावणार नाही, ईन्हेलर छोट्या आकाराचं देतो आणि सासूसमोर कोणतही औषध घ्यायचं नाही ,अगदीच शक्य नसलं तर बाथरूम मध्ये जाऊन औषधं घ्या (ह्यावर रडणारी पेशंट खुदकन हसली)कारण आपण त्यांना बदलू शकत नाही म्हणून स्वत:मध्येच थोडा बदल करूयात .... आणि सर्वात महत्वाचं पुढल्या भेटीत घरच्या सर्वाना मला भेटायला घेऊन यायचं !! ह्या प्रसंगाच्या निमित्तानी मी सर्व मिपाकरांना हा प्रश्न विचारतो की असं तुमच्याबाबत किंवा तुमच्या आप्तस्वकीयांबाबत कधी घडलंय का ? जर नसेल घडलं तर फार उत्तम परंतू असं घडतांना दिसलं तर पेशंटला सपोर्ट द्या , आपल्या पाठीशी कोणीतरी आहे ही भावना पेशंटसाठी औषधापेक्षा जास्त महत्वाची असते !! हे मला कोणी शिकवलं असेल तर ते श्रेय माझ्या रुग्णांना _/\_ _____________________________________ पेशंटचा सोबत आलेला मित्र - डाॅक्टर रविवारी दवाखाना चालू असतो का हो ? मी - का हो ? पे. मित्र - आम्हाला रविवारी सुटी असते ना ! मी - अरे वा !! द्या टाळी , मलाही रविवारी सुटी असते ;)) :)) (ह्यातला गंमतीचा भाग सोडला तर आपली तब्येत ही आपली प्राथमिकता हवी , सवडीप्रमाणे तब्येतीकडे लक्ष दिलं तर कधीच सवड मिळणार नाही) _________________॰______________

वाचन 16815 प्रतिक्रिया 0