नागझिरा - बिबट्या (बघण्या) साठीचा थरार

लाल गेंडा's picture
लाल गेंडा in भटकंती
24 Jan 2020 - 3:53 pm

ही आमची चौथी सफारी होती.

आल्यापासून आम्ही बिबट्याच्या मागावर होतो.

पहिल्या दिवशी पहिल्या सफरीला फार अपेक्षा नव्हत्या. आधी दोन सफारीना जाऊन आलो असल्यामुळे एखादं जनावर लगेच दिसेल किंवा दिसावं अशी हौशी अपेक्षा तर बिलकुल नव्हती. आमचं कन्यारत्नसुद्धा नवीन जंगल म्हणून शांत होतं. आम्ही निघालो किंबहुना आत शिरलो तेव्हा तीन वाजले होते. आधी बघितलेल्या जिम कॉर्बेट किंवा रणथम्बोरपेक्षा हे नक्कीच वेगळं होतं. या अभयारण्याला पश्चिम घाटाचा वास होता, प्रत्यक्षात घाटापासून कितीतरी लांब असूनही एक आपलेपणा होता त्याचा. महाराष्ट्रात होत म्हणून मी असा विचार करत होतो का? यावेळी आमचा गाईड जे बोलत होता ते कन्येला सहज समजत होते म्हणून का? मनात विचार उमटत होते आणि मागे रेटले जात होते.

1

बफरच्या आत आल्यावर आमच्या गाईडने , अंबादासने, शांत बसायची खूण केली आणि आम्हीही सराईत असल्यासारखे इकडे तिकडे पाहू लागलो. आतमध्ये रहाण्याच्या जागी पोचेपर्यंत आम्हाला जवळ काहीच दिसले नाही. पण आज पहिलाच दिवस होता. बॅगा कँटीनमध्ये टाकून आम्ही आता कोअर मध्ये शिरलो. आमच्या एकूण चार जिप्सी होत्या, तीन एका दिशेने गेल्या आणि आम्ही वेगळया. आमचा गाईड जरा वेगळा होता. (का ते शेवटच्या दिवशी कळलं.)
आमच्या भाचेसाहेबांनी डी एस एल आर सज्ज केला होता आणि त्याचा वापरपण चालू केला होता. एक सफारी तो वापरणार आणि पुढची मी, अशी डील झाली होती आमची. तो आधी बर्याच सफार्याना जाऊन आला असल्यामुळे त्याला त्यांचा प्रगाढ अनुभव होता. त्यात तो नागझिरालाही आधी येऊन गेला असल्याने या जंगलाची थोडीफार माहिती होती. त्याने आणि अंबादासने पक्षी दाखवायला सुरुवात गेली. मोठं जनावर बघायचं या आशेने आलेल्या डोळ्यांना आधी पक्षी कुठे आहे हे दाखवावं लागत होतं. थोड्यावेळाने सराव झाला पक्षी बघायचा. दोन प्रकारचे पक्षी पाहून, त्यातलं एक घुबड, आम्ही परतलो. नागझिर्याच्या वातावरणाला सरावलो. कोअर मध्ये असल्याने बर्याच गोष्टींना मनाई होती पण त्याने आम्हाला फार फरक पडत नव्हता. आमच्या खोल्यांच्या दिशेने जेव्हा निघालो तेव्हा आपलं कँटीन पर्यंत जाणं येणं थरारक असणार आहे याचा अंदाज आम्हाला आला. आमचं मधूकुंज एकदम एका बाजूला, लांब आणि तळ्याच्या एकदम काठाशी होतं. ते जवळच्या खोल्यांच्या सर्वात लांब होतं. तिथे जायला पायवाट, अंधार कारण वीजचे दिवे नाही, आणि आजूबाजूला किर्रर्र जंगल. मधूकुंज म्हणजे दोन मोठ्या खोल्या, त्यांच्यासमोर व्हरांडा आणि त्याभोवती संरक्षक जाळी. व्हरांड्यात बसायला सोफा. समोर नागझिरा तळं. अंधारात धड काही दिसत नव्हतं पण मन आधीच अहाहा झालं होतं. इथे आत वीज होती पण ते सगळं सौर ऊर्जेवर चालतं म्हणून जपून वापरा असा सल्ला मिळाला होता. आवरून आम्ही जेवायला परत कँटीनमध्ये गेलो. जेवणाआधी आणि नंतरसुद्धा वर आकाश काय दिसत होतं हेच डोक्यात होतं.

2

शाळेत असताना एकदम सुरुवातीला आकाश दर्शनाला जायचो वांगणीला तेव्हा असं दिसायचं आकाश. निरभ्र. जणू आकाशातला तारान तारा दिसत होता. नेहमीची नक्षत्रपण अनोळखी वाटत होती. उत्तरेला शर्मीष्ठेचा एम पटकन ओळ्खतच नाही आला. आणि मृग, अहाहा , शब्दच नाहीत सांगायला. ग्रीक पुराणातल्या गोष्टीमधला शिकारी, म्हणजे आपला मराठीला मृग, त्याच्या पूर्ण शरीरानीशी दिसत होता. त्याच्यावर चालून येणारा तो बैल, म्हणजे आपलं रोहिणी नक्षत्र, त्या बैलापासून वाचण्यासाठी शिकार्याने उभारलेली ढाल, दुसऱ्या हातात त्या बैलावर उगारलेली ती काटेरी गदा. मन नुसतं हरखून गेलं होतं. त्यात व्याध एका झाडावरून डोकावत होता. मनात आलं की जर इथे दुर्बीण लावून बसलो तर काय काय दिसेल. मग नंतर आठवलं की आपण अभयारण्यात आहोत तेव्हा बाहेर बसणं शक्य नाही.

3

4

दुसऱ्या दिवशी सकाळच्या सफारीपासून जंगलाने आपले खरे रंग दाखवायला सुरुवात केली. स्पॉटेड डिअर अर्थात आपलं हरीण. सांबार, एक जरा लांबून दिसलं. त्याने आमच्याकडे पाहिलं आणि पाठ करून आत निघून गेलं. दुसरं जे दिसलं ते झाडाच्या खोडाला माथा घासत होतं. आम्ही बराच वेळ बघत होतो त्याला. त्याच आपलं तल्लीन होऊन घासण चालू होतं. मग आम्हीच कंटाळलो आणि पुढे निघालो. "दादा ते खाजवत का होतं?" आमच्या कन्यारत्नाचा दादाला प्रश्न. "ते त्वचा काढत होत त्याच्या डोक्यावरची." न कळत दादाची चक्रव्यूहात उडी. " का पण? त्याला काही लावून द्यायचं का?" दादाला झालेली जाणीव की आपण अडकत चाललो आहे. तेवढ्यात अंबादासने दूरच्या झाडावर एक पक्षी दाखवला आणि दादाची सुटका झाली. नागझिरा छोटं आहे त्यामुळे आम्ही त्याच त्याच रस्त्यांवरून फिरत होतो. एका ठिकाणी अंबादासनी जिप्सी थांबवली. त्याला सांबाराचे आणि माकडाचे कॉल ऐकू येत होते. "जवळ एकतर बिबट्या आहे नाहीतर दुसरा कुठला तरी शिकारी प्राणी" त्याने पिंट्याला म्हणजे आमच्या चालकाला जिप्सी हळू हळू पुढे घ्यायला सांगितली.

रस्त्याच्या मध्यावर एक जंगली कुत्र्यांचं टोळकं मस्ती करत होत. अंबादास म्हणाला की ह्यांच्यामुळेच आपल्याला कॉल ऐकू येत होते. "बाबा किती क्युट आहेत ना हे कुत्रे?" कन्यारत्नाचा कुजबूजाट. मला हसायला आलं मनातल्या मनात. जंगली कुत्रे दिसायला क्युट होते पण हे टोळकं मिळून एखादं हरण किंवा सांबार मारू शकतं, ह्याचा मला अंदाज होता. जंगली कुत्रा दिसायला कोल्ह्यासारखं, छोट्या चणीचा पण कळपात राहणारा प्राणी, शिकारीत तरबेज. आम्ही बराचवेळ त्यांची मस्ती पाहत होतो. शेवटी ते आत जंगलाच्या दिशेने निघून गेले तेव्हा बाकीच्या जिप्सी आल्या तिथे. दिवसाची सुरुवात तर चांगली झालेली, आता शेवट कसा होतो बघायचं होतं.
5

दुपारच्या जेवणानंतर मस्त झोप काढू ही आशा फारशी फलद्रुप झाली नाही. झोप मिळाली पण मनासारखी नाही. दुपारी जिप्सीतून निघालो तेव्हा जंगलभर कॉल चालू होते. अंबादास निघायला फारच उत्सुक होता. त्याने जवळजवळ सगळ्या रस्त्यांवर आज जाग बघितली. शेवटी एका चौकात त्याला दुसऱ्या जिप्सीवाल्याने सांगितले की निलय जवळ बिबट्या आहे. ते ऐकून त्याने पिंट्याला गाडी जमेल तशी पळवायला लावली. आम्ही त्या चढावावर पोचेपोचेस्तो बिबट्याने एक माकड पकडून आत दडी मारली होती. तिथे आधी उभ्या असलेल्या जिप्सीसमोर तो जवळजवळ पंधरा मिनिटं रस्त्यावर बसला होता. त्यांच्याकडचे फोटो पाहून खूप हेवा वाटला. मग आम्ही तिथेच थांबलो. कॉल चालूच होते, बिबट्याही जवळपासच होता. कारण आजूबाजूला असलेले प्राणी त्याच दिशेने सावधान होऊन बघत होते. एक तास तिथेच गेला. अंबादासला बिबट्या हलत असल्याची चाहूल एकातासानंतर लागली. इतर प्राण्यांच्या आवाजाचा आणि कॉल्सचा अंदाज घेत त्याने माग काढायला सुरुवात केली. मागे-पुढे, वर-खाली, या गल्लीतून त्या गल्लीत, अंबादास त्याच्या मागावर होता. आणि खरंच बिबट्या आत हलतोय हे आम्हालाही कळत होतं. जिथे आम्ही माग काढत जात होतो तिथे तिथे प्राणी सतर्क आणि सजग उभे होते. कॉल्स देत होते. बिबट्या बाहेर काही येत नव्हता आणि दुरून दिसतही नव्हता. दोन तास मागावर उभा राहिल्यानंतर, अंबादास शेवटी खाली बसला. ही खूण चांगली नव्हती. कॉल्स हळूहळू दूर होत गेले आणि आजूबाजूचे प्राणीसुद्धा निडर होऊ लागले. आज बिबट्याने खरंच चकमा दिला आम्हाला.

ही आमची चौथी आणि नागझिरामधली शेवटची सफारी होती. थंडी वाढली होती. उघड्या जिप्सीतून गार वारा चांगलाच जाणवत होता. काल रात्री आमच्या वास्तव्याच्या ठिकाणाच्या आजूबाजूला फार कॉल्स चालू होते. आणि ते सगळे कॉल्स वाघाचे होते. आम्ही परतलो आणि जेवून झोपेपर्यंत ते चालू होते. सकाळी बाहेर पडतानाच अंबादास म्हणाला की काल वाघीण तिच्या बछड्याना घेऊन आली होती. त्याने मग जिप्सी थांबवून आम्हाला तिचे पगमार्क्स दाखवले. छान ठसठशीत होते ते. आमची उत्सुकता आता फारच ताणली गेली होती. काल दुपारी आणि संध्याकाळी बिबट्याने हुलकावणी दिली होती आणि रात्री वाघिणीने. या शेवटच्या सफरीवर काहीतरी दिसावं असं मनापासून वाटत होतं. आमचं कन्यारत्न आता अतिउत्सुक झालं होतं. सध्या तिची हळू आवाजात कुजबुज आजीच्या कानाशी चालू होती. सारखं तिच्या का दिसत नाही या प्रश्नावर आजीने फुल्ल टॉस दिला. " बघ बिबट्या आणि आपण लपाछुपी खेळतोय आणि आपल्यावर डेन आहे , कारण आपण शोधतोय ना. मग तू असं कर की त्याला म्हणावं टाईम प्लीज, म्हणजे तो बाहेर येईल आणि दिसेल." आजीचं वाक्य म्हणजे ब्रह्मवाक्य या न्यायाने आमच्या कन्यारत्नाने लगेच टाईम प्लीज घेतली.

"बिबट्या" , अंबादास उघड्या जिप्सीच्या सीटसमोरच्या सेफटी रेलवर उभा होता. त्याने दिशा दाखवताच मी आणि भाचेसाहेब दोघेही तसेच उभे राहिलो. झाडाच्या आडून, झुडुपांच्या मागून तो बिबट्या आम्हाला समांतर जात होता. आम्ही जसे वर उभे राहू शकलो तशी सोय बायकांना नव्हती. त्यांना तो नीट दिसतच नव्हता. अचानक जिप्सी आणि कार्सची गर्दी वाढायला लागली. ज्याला त्याला तो बघायचा होता आणि आपल्या कॅमेऱ्यात किंवा मोबाईल मध्ये पकडायचा होता. इकडे अंबादास बाकीच्यांना कडक आवाजात विनंती करत होता की त्या बिबट्याला पलीकडे जायचं आहे तर मध्ये जागा सोडा म्हणजे तो सगळ्यांना दिसेल. पण कोणीच ते ऐकून घ्यायच्या मनस्थितीत नव्हतं. बिबट्या एका झाडासमोरून खाली घळीत उतरला. अंबादासला तो कुठे जाणार याचा अंदाज आला. त्याने पिंट्याला जिप्सी जशी आहे तशी मागे घ्यायला लावली. रस्ता नसलेल्या रस्त्यातून आम्ही रिव्हर्स मध्ये मागे आलो आणि एका गल्लीत घुसलो. आता बाकीच्या गाईडना पण अंदाज आला की काय होते आहे पण अंबादासने पहिला नंबर पटकावला होता. त्या गल्लीत त्याने पिंट्याला जिप्सी आडवी घालायला लावली म्हणजे आमच्या पुढे कोणी जाऊ शकणार नाही आणि पुढच्या कारवाल्याला अजून पुढे जायला लावले. बरोबर आमच्या समोर कॉरिडॉर तयार झाला होता. मी, भाचेसाहेब, अर्धांगिनी आणि आमच्या मातोश्री , आता सगळे सीटवर उभे होतो. हो आमचे कन्यारत्न माझ्या खांद्यावर.

डाव्याबाजूच्या झुडुपातून बिबट्या राजेशाही थाटाने बाहेर आला, त्याने आमच्या पुढच्या काळ्या कारकडे पाहिले आणि त्याच राजेशाही अंदाजात तो उजव्याबाजूच्या झुडुपात शिरला. तो जोपर्यंत उजव्याबाजूच्या टेकडीवर आत गेला नाही तोपर्यंत आम्ही त्याला पाहत होतो.

6

साठाउत्तराची कहाणी सफळ झाली.

आमचं कन्यारत्न एवढ्या जवळून बिबट्याला बघून घाबरलं होतं. मी जेव्हा माझ्या खांद्यावरून तिला खाली उतरवलं तेव्हा ती थरथरत होती. मग मी तिला बरोबर आणलेल्या ब्लॅंकेटमध्ये गुंडाळले आणि घट्ट जवळ घेतले. तिला वाटत होतं की बिबट्या आपल्याला येऊन खाणार. मग तीच लक्ष विचलित करायला , मी भाचेसाहेबांकडे बघितलं. " काका , जबरदस्त फोटो आलेत. मी शटर वरचा हात काढलाच नाही." त्याच्या चेहऱ्यावर आनंद ओसांडून वाहत होता. मग आम्ही दोघांनी, बायकोने, आईने, अंबादासने, पिंट्याने सगळ्यांनी फोटो पाहिले. इकडे कुशीतली थरथर कमी होऊन, उत्साह आला होता.

परत आल्यावर कळलं की अंबादास बिबट्याला ट्रॅक करण्यात खूप माहीर आणि प्रसिद्ध आहे. मनात म्हटलं, वा याला म्हणतात नशीब.

अजूनही ते फोटो पाहिले की बिबटया डोळ्यासमोरून जातो.

प्रतिक्रिया

प्रशांत's picture

24 Jan 2020 - 5:50 pm | प्रशांत

मस्त लिहलस

तेजस आठवले's picture

24 Jan 2020 - 6:25 pm | तेजस आठवले

सुरेख.
तुमचा आयडी वाचून बिबट्याला भिती वाटली असणार.
आपल्या दोन पिढ्यानन्तर हे शिल्लक राहिल का हाच विचार डोक्यात पहिला येतो हल्ली.
पुलेशु.

लाल गेंडा's picture

27 Jan 2020 - 12:32 pm | लाल गेंडा

बिबत्याला थोडि माहिति आहे कि मी गेंडा आहे हे?? :-)
बरीच लोक प्रयत्न करत आहेत की ही सम्पदा वाचावी म्हणून त्यामूळे आशा आहे.

प्रचेतस's picture

24 Jan 2020 - 7:16 pm | प्रचेतस

खूपच भारी लिहिलंय.
ह्या एप्रिलअखेरीस नागझिऱ्याला चाललो आहेच. फॉरेस्ट रेस्ट हाऊस नेमकं बुधवारी आणि गुरुवारी बंद असल्याने त्यांचं बुकिंग करता आलं नाहीये. :(

लाल गेंडा's picture

27 Jan 2020 - 12:33 pm | लाल गेंडा

तिथे राहायला खूप मजा येते.

Nitin Palkar's picture

26 Jan 2020 - 4:02 pm | Nitin Palkar

सुरेख वर्णन!

खूपच ओघवतं वर्णन. मजा आली वाचायला. फोटो तर लाजवाब.

लाल गेंडा's picture

27 Jan 2020 - 12:34 pm | लाल गेंडा

धन्यवाद!

अनिंद्य's picture

27 Jan 2020 - 11:44 am | अनिंद्य

बिग कॅट ची थेट भेट ! थरारक अनुभव आवडला. नागझीऱ्याच्या जंगलाला 'पश्चिम घाट' संबोधन थोडे वेगळे वाटले, पण ते बरोबर असावे.

मी तिकडे गेलो आहे, २० वर्षाहून जास्त समय लोटला.

लाल गेंडा's picture

27 Jan 2020 - 12:34 pm | लाल गेंडा

नागझीरा पश्चिम घाटात नाही हे नक्की, परन्तू मला तसे वाटले.

अजय खोडके's picture

4 Feb 2020 - 5:41 pm | अजय खोडके

खुप छान. फोटो आवडला.

नानुअण्णा's picture

5 Feb 2020 - 8:08 pm | नानुअण्णा

सुंदर लिहिलंय, मागील वर्षी नाग्जीराला गेलो होतो, फार अप्रतिम आहे, शक्यतो जंगलात हॉलिडे होम, मधु कुंज, लता कुंज मध्ये राहावे, सफारी शिवाय दुपारी जेव्हा विश्रांतीच्या वेळ असते त्तेव्हा

नानुअण्णा's picture

5 Feb 2020 - 8:09 pm | नानुअण्णा

तळ्याकाठी खुप काही दिसत, सफारी शिवाय दुपारी जेव्हा विश्रांतीच्या वेळ असते त्तेव्हा