बालकथा - पहिला प्रवास

बिपीन सुरेश सांगळे's picture
बिपीन सुरेश सांगळे in जनातलं, मनातलं
12 Jun 2019 - 11:21 am

बालकथा - पहिला प्रवास

ही बालकथा आहे . ( छोटा वयोगट ).
मुलांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी . खास उन्हाळी सुट्टीनिमित्त .
मला मुलांच्या प्रतिक्रिया कळवा हं . .. आवर्जून !
आणि तुमच्या सुद्धा .
---------------------------------------------------------------------------------------------------------------------
पहिला प्रवास
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
राजूच्या शाळेला उन्हाळ्याची सुट्टी होती. तो मामाच्या गावी निघाला होता. त्याचा मामा मुंबईला राहायचा.
त्याने हिरव्या रंगाचा टी शर्ट घातला होता. डोक्यावर हिरवी टोपी तर पाठीवर छोटीशी सॅक. त्याला प्रवासाला जायची मजा वाटत होती. कारण आज तो पहिल्यांदाच आगगाडीत बसणार होता. तो आई बाबांबरोबर रेल्वे स्टेशनवर पोहोचला.
बापरे ! केवढं मोठं स्टेशन होतं. किती वेगवेगळे लोक. रंगीबेरंगी कपडे घातलेले . त्या साऱ्यांची धावपळ. ते प्लॅटफॉर्मवर पोहोचले. समोर हे लांबलचक आगगाडी उभी होती. निळ्या निळ्या रंगाची. अचानक तिचा भोंगा वाजला. जोरात ! पॉमू ! राजू असा काही दचकला म्हणताय !
गरम वाटत होतं . पण राजुला काय त्याचं ? स्वारी आनंदात होती .
आई - बाबा पुढे चालले होते. राजू त्यांच्या मागे. त्याला एक पुस्तकांचं दुकान दिसलं. ते खूप पुढे गेले व एका जागी बसले. त्यांची गाडी यायला वेळ होता. म्हणून बाबा काहीतरी पाहण्यासाठी गेले. आई मोबाईल पाहू लागली.
राजूने विचारलं ,” आई, गोष्टीचं पुस्तक घेऊ या ? “
“ हो , “ आई फोन पहात म्हणाली.
“ चल तर मग “, तो म्हणाला .
राजू निघाला. पुस्तकांच्या दुकानाकडे. त्याला गोष्टी वाचायला , चित्र पहायला भारी आवडायचं. तो तिथे पोचला. दुकानात खूप पुस्तकं होती. मुलांचीसुद्धा. छान छान . रंगीबेरंगी, चित्र असलेली.
त्याला एक पुस्तक आवडलं. त्यामध्ये खूप चित्रं होती . छान आणि रंगीत . ते त्याने घेतलं . नवीन पुस्तकाचा वास येत होता . त्याला तो आवडायचा . त्याने तो वास नाकात भरून घेतला व मागे पाहिलं . मागे आई नव्हती. ती आलीच नव्हती. तो एकदम घाबरला. त्याच्या डोळ्यांत पाणीच आलं. लहानच होता ना तो. तुमच्या एवढाच.
हातातलं पुस्तक त्याने ठेऊन दिलं . जिथे होतं तिथे.तो आजूबाजूला पाहू लागला. आई - बाबांना शोधू लागला. त्याला काय करावं ते कळेना. तो घामाघूम झाला .लालेलाल झाला.
एक मालगाडी गेली. खूप डबे असलेली. धडाड धड - खडाड खड . तो गुंग होऊन पाहतच
राहिला .
तेवढ्यात त्याला एक पोलिसकाका दिसले. शाळेत बाईंनी सांगितलेलं, त्याला आठवलं . ‘ पोलिसकाका मुलांना मदत करतात. ' तो त्यांच्याकडे गेला. त्यांनी राजूकडे पाहिलं.
“ काय झालं रे बाळा ? “
“ माझे आई - बाबा हरवलेत ! “ तो म्हणाला.
पोलिसकाकांना हसू आलं. ते म्हणाले, “अरे , तू हरवला आहेस का तुझे आई बाबा ?.”
घाबरल्यामुळे तो चुकून तसं म्हणाला होता . मग तो डोळे पुसत म्हणाला , “ मी - मी ,”
त्यावर त्या काकांनी त्याला जवळ घेतलं. त्याच्या पाठीवरून हात फिरवला. त्याला बरं वाटलं. मग ते काका आई - बाबांना शोधू लागले.
पण गंमत अशी की राजू होता एका बाजूला. तर आई - बाबा दुसऱ्याच दिशेला . तेही त्याला शोधत होतेच . एकदा तर राजूने दुसऱ्याच बाईला ' आई ' म्हणून हाक मारली. कारण त्या बाईने आईसारखाच गुलाबी पंजाबी ड्रेस घातला होता.
आई बाबा काही सापडेनात . पोलिसकाकाही विचारात पडले . शेवटी , पोलिसकाकांनी त्याला एके ठिकाणी नेलं. तिथून रेल्वेच्या घोषणा दिल्या जातात. म्हणजे कुठली रेल्वे येणार आहे, कुठली जाणार आहे. तिथल्या बाईंनी त्याच्या नावाची घोषणा केली. ती संपूर्ण स्टेशनवर घुमली.
थोड्याच वेळात आई - बाबा तिथे आले. राजू आईला चिकटला. आई म्हणाली, “ असं , आईला सोडून एकटं जातात का ? “
बाबांनी पोलिसकाकांचे खूप आभार मानले.
थोड्यावेळाने राजूची गाडी आली. सगळे आत बसले. गाडी निघाली. त्यांची जागा खिडकीमध्ये नव्हती. पण तो खिडकीजवळ जाऊन उभा राहिला. गंमत पहायला .
झाडे मागे पळू लागली. तारांवरचे पक्षी मागे पडू लागले. गाडी पुढे गेली. मग डोंगर, शेतं, नद्या दिसू लागल्या. चरणारी गुरं दिसू लागली. त्याला येणाऱ्या - जाणाऱ्या कितीतरी रेल्वेही भेटल्या.
ते पाहण्यात तो दंग झाला . तरीही तो मागे वळून पाहायचा. आई - बाबा जागेवरच आहेत ना ? बाबांचं आता राजूवर लक्ष होतंच. आईही त्याला हात दाखवायची. मग तो ही आईला हात दाखवून हसायचा. गाडी धडाड धड पळतच होती.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------
- बिपिनसांगळे

वाङ्मयलेख

प्रतिक्रिया

नाखु's picture

27 Sep 2019 - 10:22 pm | नाखु

पुलेशु

सुचिता१'s picture

27 Sep 2019 - 11:05 pm | सुचिता१

खुप छान.. गोष्ट वाचून बोध ही मिळाला.
पण मुलीच्या डोळ्यात पाणी आले, ते ही एका अर्थाने पावती च आहे तुमच्या लेखनाला. पुलेशु.

कंजूस's picture

28 Sep 2019 - 5:26 am | कंजूस

छान.

पद्मावति's picture

28 Sep 2019 - 1:01 pm | पद्मावति

तुमच्या बालकथा आवडतात. छान लिहिता.

बिपीन सुरेश सांगळे's picture

16 Oct 2019 - 9:55 pm | बिपीन सुरेश सांगळे

सर्व रसिक वाचकांचा खूप आभारी आहे
लोभ असावा

बिपीन सुरेश सांगळे's picture

16 Oct 2019 - 9:58 pm | बिपीन सुरेश सांगळे

मुलांची प्रतिक्रिया महत्त्वाची
त्यामुळे तुमची - मुलीच्या डोळ्यात पाणी आलं ही प्रतिक्रिया मला आवडली
तिला माझे मोठे आभार सांगा