थिबा पॅलेस

दिनेश५७'s picture
दिनेश५७ in भटकंती
21 Sep 2019 - 6:25 pm

गेल्या काही वर्षांत शेकडो वेळा रत्नांग्रीस जाणं झालं असेल. पण तिथला तो फेमस थिबा पॅलेस आतून पहायची कधी संधीच मिळाली नाही. जांभ्या रंगाच्या अस्सल कोकणी मातीशी नातं सांगणाऱ्या लाल भिंतींची ती ऐसपैस इमारत लांबूनच कितीतरी वेळा खुणावायची. पण थिबा पॅलेसला मुद्दाम भेट द्यावी असंही कधी सुचलं नाही. तसंही, रत्नांगिरीत आवर्जून पहायला जावं आणि ते पाहिल्यावर छान वाटावं असं समुद्रकिनाऱ्याशिवाय दुसरं काही आढळलं नव्हतंच. परवाच्या एक दिवसाच्या रत्नागिरी भेटीत मात्र, गावात थोडं भटकायचं ठरवलं. बहिणीची स्कूटर घेतली आणि बाहेर पडून थिबा पॅलेस गाठून तीन रुपये शुल्क भरून पाहून आलो.
या वास्तूला एक इतिहास आहे. कदाचित त्यामुळे असेल, पण गेटातून आत शिरताच मला ती गूढ वाटू लागली. समोरच्या विस्तीर्ण परिसरात अस्ताव्यस्त वाढलेलं गवत आणि वास्तूच्या एकाकीपणात भर घालत होतं.
आता थिबा राजाचा हा ‘महाल’ पुरातत्व विभागाच्या ताब्यात आहे. तेथे एक वस्तुसंग्रहालय- म्युझियम- आहे, असे प्रवेशद्वारावरच्या फलकामुळे कळते. आत शिरताच एक व्यक्ती तीन रुपये सुट्टे घेऊन तिकीट देते, आणि ‘बघून या’ असे सांगते. मग जिन्याने वर गेलं की एका दालनात थिबा राजाच्या वापरातील एक भव्य टेबल व काही वस्तू मांडलेल्या दिसतात, आणि बाकीच्या एकदोन दालनांमध्ये, किनारपट्टीवर कुठेकुठे असलेल्या मंदिरांच्या परिसरांतील काही मोजक्याच मूर्ती मांडून ठेवलेल्या दिसतात. बऱ्याचशा मूर्ती संगमेश्वरजवळच्या कसबा या मंदिरग्रामांतून आणलेल्या असून त्या भग्नावस्थेत आहेत. त्यांची एका ओळीतील माहिती असलेली चिठ्ठी प्रत्येक मूर्तीशेजारी चिकटवलेली दिसते. अशा पंधरावीस मूर्तींचे दालन म्हणजे हे संग्रहालय!
महालाच्या बाकीच्या दालनांचा वापर नसल्याने व तेथे जाण्याचा गॅलरीतील मार्ग बांबूच्या काठ्या आडव्यातिडव्या लावून बंद केला असल्याने, बंद दरवाजाआडच्या त्या दालनांत आणखीनच एकाकी गूढ दडले असावे असे उगीचच वाटू लागते.
एकूणच या वास्तूची निगुतीने जपणूक करावी अशी काही या खात्याची इच्छा असावी असे वाटत नाही.
त्यामुळे, फेरफटक्याआधी दिलेले तीन रुपयेदेखील वसूल झाले असे वाटत नाहीच.
पाचसात मिनिटांत महालाचे बरेचसे बंद दरवाजे पाहून आपला फेरफटका पूर्ण करून बाहेर आल्यावर सहज मागे वळून पहावे...
ती वास्तू ओशाळल्यागत मान पाडून बसलेली वाटू लागते.
काही वर्षांपूर्वी याच वास्तूत मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्राचे कार्यालय होते. तेव्हा कदाचित या महालाने मरगळ झटकली असावी.
आता पुन्हा तो महाल मरगळ पांघरून बसलाय...
एकाकी! नजरकैदेत असताना थिबा राजा बसायचा, तसाच!
या वास्तूचे भविष्यही असेच गूढ, एकाकीपणातच लपेटलेले राहणार या विचाराने वाईट वाटते, आणि... ‘उगीच गेलो’ असा विचार नंतर छळत राहातो!

प्रतिक्रिया

कंजूस's picture

21 Sep 2019 - 6:35 pm | कंजूस

खरं आहे.

पूर्ण बालपण थिबा पॅलेसच्या बागेत, आवारात खेळत असू आम्ही सवंगडी आणि शाळूसोबती. सर्वाधिक उंच झोका त्या बागेत घेतलाय. तेव्हाही तो राजवाडा वैराणच होता, बागही रानटी झुडपं आणि मोकाट गावताचीच होती, पण कुठेही प्रवेशबंदी नव्हती. अगदी आतून सर्व खोल्या पाहिल्या आहेत.
शुल्क वगैरे वाचूनच हसू आलं.

थिबाची सख्खी नात टुटु मारुतीमंदीरच्या पुढे एका कातळावर झोपडीत राहायची. नेहमी हिंडताना दिसायची. अत्यंत हलाखीत पण मजेत असे म्हातारी. वास्तविक ब्रम्हदेशची राजकन्या.. पण एनिवे.

प्रचेतस's picture

21 Sep 2019 - 10:26 pm | प्रचेतस

त्या वस्तुसंग्रहालयाच्या प्रवेशद्वारातच एक सहा फूट उंचीची सूर्याची अतीव सुंदर मूर्ती ठेवली आहे. अतिशय जबरदस्त आहे.

धागा लेख आनि गविंच्या प्रतिसादातून राजमहालाच्या सद्य स्थितीची काही माहिती मिळाली. या निमीत्ताने आमची एक अनुषंगिक धागा जाहीरात.

"थिबॉ मीन" मयन्मारचा (ब्रह्मदेश) शेवटच्या सम्राट आणि राजघराण्याचा शेवट का अभ्यासावा ? जराशा लांबलचक शिर्षकाचा पण आकाराने मध्यम असा आमचा एक धागा लेख आहे.

सस्नेह's picture

22 Sep 2019 - 7:44 am | सस्नेह

ब्रिटिशांनी भारतातील , नव्हे, हिंदुस्थानातील संपन्न राजघराण्यांची कशी वाट लावली याचं मूर्त प्रतीक थिबा पॅलेस :(

मदनबाण's picture

22 Sep 2019 - 8:50 pm | मदनबाण

मी देखील थिबा पॅलेस पाहुन आलोय !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- सुमीत राघवनचा आदित्य ठाकरेंना खरमरीत टोला