अज्ञान (Ig) - नोबेल पुरस्कार : विनोदातून विचाराकडे !

कुमार१'s picture
कुमार१ in जनातलं, मनातलं
14 Sep 2019 - 7:40 pm

पुढच्या महिन्यापासून २०१९चे नोबेल पुरस्कार जाहीर होऊ लागतील. संपूर्ण संशोधक जगताचे त्याकडे लक्ष असते. ते पुरस्कार सन्मानाचे असतात. पण त्यापूर्वीच या महिन्यात एक विचित्र प्रकारचे पुरस्कार आपले लक्ष वेधून घेतात. त्यांचे नाव शीर्षकात दिलेच आहे.

आता वळतो या Ig- नोबेल पुरस्कारांकडे. १९९१ पासून दरवर्षी सप्टेंबरमध्ये हे पुरस्कार अमेरिकेत दिले जातात. मार्क अब्राहम या संपादकाने हा अनोखा उपक्रम चालू केला. हा गृहस्थ एका शास्त्रीय विनोदाच्या मासिकाचा संपादक आहे. हे पुरस्कार उपरोधिक हेतूने दिले जातात. त्यासाठी १० संशोधने निवडली जातात, जी किरकोळ किंवा विचित्र प्रकारची असतात ! या पुरस्कार-संस्थेचे ब्रीदवाक्य असे आहे:

' ही संशोधने लोकांना प्रथमदर्शनी हसवतात पण नंतर विचार करायला लावतात !'

'Ig नोबेल' मधील Ig चा अर्थ आहे 'ignoble' (अज्ञानी).

संशोधन शाखा व निकष:
एकूण १० शाखांमध्ये हे पुरस्कार दिले जातात. त्यापैकी ६ शाखा या खऱ्या नोबेलप्रमाणेच आहेत. याव्यतिरिक्त जीवशास्त्र, अभियंत्रिकी अशा काही शाखा निवडल्या आहेत. यासाठी सादर करायची संशोधने ही विनोदी, विचित्र किंवा काही अनपेक्षित निष्कर्ष काढलेली असावी लागतात. पुरस्काराचा हेतू असा असतो. संशोधक जगतात बऱ्याचदा अतिसामान्य दर्जाचे शोधनिबंध 'पाडले' जातात. त्यांचा लायकीपेक्षा जास्त गाजावाजा केला जातो आणि काहींचे ढोल उठसूठ बडवले जातात. या सगळ्यावर उपरोधिक टीका करणे हा Ig नोबेल चा खरा उद्देश आहे.

मात्र या वरवर विनोदी वाटणाऱ्या उपक्रमाला एक आशेचीही किनार आहे. कधीकधी अशा एखाद्या विचित्र वाटणाऱ्या संशोधनातूनच खऱ्या उपयुक्त संशोधनाला चालना मिळालेली आहे. एक उदाहरण तर अचंबित करणारे आहे. Sir Andre Geim यांना २००० साली Ig-नोबेल दिले होते. पुढे २०१०मध्ये त्यांनाच पदार्थविज्ञानात खरेखुरे नोबेल प्राप्त झाले !! असे हे एकमेव उदाहरण आहे.

पुरस्कार वितरण:
हे सप्टेंबरमध्ये अमेरिकेतील हारवर्ड विद्यापीठात केले जाते. विजेत्यांना माजी खऱ्या नोबेल विजेत्यांच्या हस्ते पुरस्कार दिले जातात. त्यानंतर विजेत्यांना थोडक्यात भाषण करायची संधीही दिली जाते. एकूणच या समारंभात हास्यविनोद आणि टिंगलटवाळी यांची रेलचेल असते.

आता हे सर्व वाचल्यावर वाचकांना उत्सुकता लागली असेल की असली अजब संशोधने नक्की कुठली असतात त्याची. नुकतेच यंदाचे हे पुरस्कार जाहीर झालेले आहेत. तेव्हा त्यातल्याच काहींची ही झलक. फक्त संशोधन-विषय लिहितो; कोणाला मिळाला याला काही आपल्या दृष्टीने महत्त्व नाही.

२०१९ चे पुरस्कार:
१. रसायनशास्त्र: ५ वर्षाचे मूल एक दिवसात अर्धा लिटर लाळ तयार करते.

२. अभियांत्रिकी: बाळांचे लंगोट बदलायच्या यंत्राचा आराखडा.

३. वैद्यकीय: a)पिझ्झा खाण्याने माणसाला मृत्यूचा प्रतिबंध करता येतो.
b) पुरुषाचे डावे अंडाशय उजव्यापेक्षा अधिक गरम असते.

४. अर्थशास्त्र: चलनी नोटांच्या हाताळण्यातून रोगजंतूंचा प्रसार होतो.

५. शांतता: आपल्याला शरीराचा कुठला भाग खाजवायला सर्वात जास्त आवडते? त्याचे उत्तर आहे पायाचा घोटा.

वरील यादी वाचता वाचता तुमची ह ह पु वा झाली असणार याची मला खात्री आहे ! किंबहुना तोच तर या उपक्रमाचा उद्देश आहे.

जर आपण गेल्या २८ वर्षांतील या पुरस्कारांच्या यादीवर नजर टाकली तर आपल्याला एक जाणवेल. बरीचशी संशोधने ही टिंगल स्वरूपाची आहेत. काहींत थोडेफार तथ्य आहे पण त्यांकडे निव्वळ निरीक्षण म्हणून पाहिले जावे. उठसूठ कुठल्याही सामान्य निरीक्षणाला शोधनिबंधाचा दर्जा देता कामा नये, हेच त्यातून ध्वनित होते.

तर असे हे गमतीदार अज्ञान-पुरस्कार. या उपक्रमातून प्रचलित संशोधनातील काही अपप्रवृत्तीना छान चिमटे काढले जातात. यातून बोध घेऊन संशोधकांनी खरोखर गरज असलेलेच संशोधन करावे हा संदेश दिलेला आहे. संशोधन विश्वातील एरवी गंभीर असलेल्या वातावरणावर असे उपक्रम विनोदाची पखरण करतात आणि सामान्य माणसालाही घटकाभर हसवतात.
**********************

समाजलेख

प्रतिक्रिया

पण किमान तुम्ही या लेखात जी उदाहरणे दिलेली आहेत मला कुठलचं उदाहरण फालतु संशोधनाच वाटलं नाही.
खर म्हणजे असे काहीतरी संशोधन वेगळे वाटणे विचीत्र वाटणे हे च मला ऑब्जेक्शनेबल वाटतेय म्हणजे विज्ञानाच्या बाबतीत तरी.
कारण एक संशोधन कुठल्या दुसरृया महत्वपुर्ण संशोधनाच्या दिशेला वळु शकेल सांगता येत नाही.
हे म्हणजे खरे तर मला लॅटरल थिंकींग किंवा थिंकींग आउट ऑफ बॉक्स या सारखं वाटत आहे.
हो फालतु संशोधन मला मुलभुत विज्ञान विषय सोडुन इतर विषयात जी होतात त्याला वरील मांडणी पुर्णपणे लागु पडते याच्याशी सहमत आहे.
सर्वोत्तम उदाहरण संस्कृत विषयातील संशोधक त्यांना हा असा पुरस्कार भारतात नक्की सुरु करायला हवा
सर्वात जास्त दांभिक संशोधन सर्वात जास्त गैरलागु सर्वात जास्त लपवाछपवी सारवासारव करणारं संशोधन झालेलं असेल तर ते भारतीय संस्कृत संशो धकांकडुन
म्हणजे त्यांच्या संस्कृत च्या ज्ञानाने अभ्यासाने ते एखाद्या अत्यंत कळीच्या विषयाच्या अत्यंत जवळ जाऊनही त्याला अजिबात स्पर्श न करता धक्का न लावता जरा एक पैशाचे साहस वा प्रामाणिकता न दाखवता पटकन मंगलमय सात्विकतेला घट्ट चिकटुन घेतात
याचे पटकन आठवणारे उदा.कृष्ण श्रीनीवास अर्जुनवाडकर
यांना वरील प्रमाणे असा एखादा पुरस्कार द्यायला हवा होता असे वाटते.
असो

गामा पैलवान's picture

15 Sep 2019 - 9:31 pm | गामा पैलवान

मारवा,

संस्कृत संशोधक नावाचा काही प्रकार अस्तित्वात आहे की नाही इथपासून सुरुवात आहे. त्यामुळे तुमच्या म्हणण्याप्रमाणे संस्कृत संशोधकांना पुरस्कार द्यायचा झाला तर कोणत्या शाखेखाली द्यायचा?

आ.न.,
-गा.पै.

एखाद वेळेस त्यांना रामचंद्र गु हा किंवा अर्मत्य सेन च्या संशोधना बद्दल सांगायचे असेल.

बाळांचे लंगोट बदलायच्या यंत्राचा आराखडा.

जरा अमानवी वाटले हे पण नंतर लक्षात आले रोबोट सर्वोत्कृष्ट कँपयानिअन ठरण्याच्या या जमान्यात हे ही घडणे क्रमप्राप्त आहे.

आपल्याला शरीराचा कुठला भाग खाजवायला सर्वात जास्त आवडते? त्याचे उत्तर आहे पायाचा घोटा.

हे मात्र शांतता विभागात का याचे प्रयोजन समजले नाही. बाकी डोकं हा निष्कर्ष आला नाही हे बरेच काही सांगून जाते

कुमार१'s picture

15 Sep 2019 - 6:10 am | कुमार१

पुरस्काराची निवड जागतिक समितीने केलेली असल्याने त्याला 'I g' समजायला हरकत नाही !

मदनबाण's picture

15 Sep 2019 - 5:32 pm | मदनबाण

हा.हा.हा...

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मेरा दिल तेरे लिये धड़कता है... :- Aashiqui

लई भारी's picture

15 Sep 2019 - 6:15 pm | लई भारी

भारी प्रकार दिसतोय :-)
लक्ष ठेवायला हवं दर वर्षी!

कुमार१'s picture

15 Sep 2019 - 6:28 pm | कुमार१

दोन वर्षांपूर्वीचे एक संशोधन खरेच विनोदी आहे.

उंदराचे २गट :
एकाला कॉटनचे ' कपडे' तर दुसऱ्याला पॉलि स्टरचे घातले.
मग त्या दोन गटांच्या लैंगिक कृतीची तुलना !
….
भन्नाट कल्पना आणि अशक्य कोटीतले संशोधन यांना या उपक्रमात पूर्ण मुभा असते.

जॉनविक्क's picture

17 Sep 2019 - 2:07 pm | जॉनविक्क

कॉटनचे ' कपडे' जास्त कम्फर्टेबल असाच निष्कर्ष आला असावा.

कुमार१'s picture

17 Sep 2019 - 2:35 pm | कुमार१

कॉटनचे ' कपडे' जास्त कम्फर्टेबल असाच निष्कर्ष आला असावा.>>>

ठीक आहे, थोडी माहिती वाढवतो

या प्रयोगाचा हेतू असा होता. दोन प्रकारच्या कापडांचा शुक्राणूंवर काय परिणाम होतो ते पाहणे. त्याचा परिणाम पुढे लैंगिक क्षमतेवर होतो का , ते पाहणे. निष्कर्ष वगैरे मी काही शोधले नाहीत.

एकंदरीत गंमत म्हणूनच सगळे आहे हे !

जॉनविक्क's picture

17 Sep 2019 - 2:55 pm | जॉनविक्क

एकंदरीत गंमत म्हणूनच सगळे आहे हे !

अहो गंम्मत आहे म्हणून तर मी स्वतः या प्रयोगाला वोलेंटीअर बनलो असतो, त्या निष्पाप निरागस उंदरांना त्रास द्यायची गरजच न्हवती आम्ही पापी स्त्री पुरुष उपलब्ध असताना

हा प्रयोग उंदरावर करून गंम्मत घालवल्याबद्दल त्यांचा खरेतर Ig-नोबेलसाठी विचारच व्हायला नको होता फार फार तर एखादे साधे नोबेल देऊन टाका त्यांना ;)

कुमार१'s picture

17 Sep 2019 - 3:12 pm | कुमार१

पुढील वर्षाच्या एखाद्या प्रयोगासाठी तुमची एकमुखाने शिफारस करून टाकू !
हा का ना का ☺️

चामुंडराय's picture

17 Sep 2019 - 4:48 pm | चामुंडराय

एखाद्या प्रयोगासाठी नाही हो.
त्यांचा विंट्रेस्ट केवळ ह्याच प्रयोगात आहे म्हटलं.

गड्डा झब्बू's picture

20 Sep 2019 - 5:24 pm | गड्डा झब्बू

@जाॅनविक्क - तुमच्या प्रामाणीक भावना पोचल्या :-))
कुमार साहेब लेख आवडला.

अनिंद्य's picture

15 Sep 2019 - 6:42 pm | अनिंद्य

उपक्रम जोरदार आहे.

इथे लिहिण्यासारख्या नाहीत पण 'संशोधकांना' अनेक आचरट कल्पना सुचवू शकेन असा विश्वास वाटला :-)

कुमार१'s picture

15 Sep 2019 - 7:57 pm | कुमार१

त्याही पुढे जाऊन सुचवतो की तुम्हीच I g साठी एखादे भन्नाट संशोधन सादर करा ! ☺️

काही संशोधंन ह्यातुन पुढे येतात.

Ig - मिपा पुरस्कार : धाग्यातून अमरत्वाकडे.

मिपा च्या इतिहासात जे धागे अजरामर आहेत अश्या धाग्यांना Ig मिपा पुरस्कार देण्यात यावा !

आणि पहिल्या पुरस्कारासाठी मला ती क्विता कुनवीत आहे, तुम्हाला?

गामा पैलवान's picture

16 Sep 2019 - 1:49 am | गामा पैलवान

कुमारेक,

टिंगल उडवण्यासाठी इग्नोबेल पारितोषिकाची कल्पना नामी आहे. मात्र त्यासाठी शांततेचं नोबेल नावाचा एक प्रकार आधीपासनं अस्तित्वात आहे. बराक ओबामा, युरोपीय महासंघ, मलाला युसुफझाई अशा अनेक विनोदी व हास्यास्पद व्यक्तींना व संस्थांना हा पुरस्कार प्राप्त झाला आहे.

सांगायचा मुद्दा असा की इग्नोबेल पारितोषिक हा प्रकार नवीन आजिबात नाही.

आ.न.,
-गा.पै.

कुमार१'s picture

16 Sep 2019 - 6:02 am | कुमार१

खरे आहे.

जगातील कुठलेही पुरस्कार वादग्रस्त होतातच. आता नोबेल जाहीर होऊन गेल्यावर पहा. साधारण जानेवारीत 'नोबेल-निषेध' म्हणून काही समांतर पुरस्कार जाहीर होतात.

सुधीर कांदळकर's picture

16 Sep 2019 - 7:00 am | सुधीर कांदळकर

पण क्र. २ अभियांत्रिकीचा हा शोध नक्कीच कुचकामी नाही. यंत्रात बाळाच्या आईचा आवाज टाकला तर यंत्राला मुंबईतून तरी सॉलिड मागणी येईल. तसे यंत्र आलेच तर मला मुंबईची एजन्सी द्यायला शिफारसपत्र मात्र नक्की द्या बरे का!

कुमार१'s picture

16 Sep 2019 - 8:06 am | कुमार१

बघा बघा…..

मूळ संशोधनाला समिती जरी अज्ञानी म्हणत असली तरी त्यातून कशी नवी संशोधने इथे प्रसवत आहेत !

सुधीर कांदळकर's picture

16 Sep 2019 - 7:05 am | सुधीर कांदळकर


बराक ओबामा, युरोपीय महासंघ, मलाला युसुफझाई अशा अनेक विनोदी व हास्यास्पद व्यक्तींना व संस्थांना हा पुरस्कार प्राप्त झाला आहे.

तर मग शांतता पारितोषिक शिफारस करणार्‍या समितीलाच का आयजी पुरस्कार देऊ नये?

गामा पैलवान's picture

17 Sep 2019 - 1:14 pm | गामा पैलवान

आयजी कशाला, मी म्हणतो की शांततेचं नोबेलंच दिलं तर .... ? ;-)

-गा.पै.

कुमार१'s picture

17 Sep 2019 - 9:48 am | कुमार१

चाचणी प्रतिसाद

Ig- नोबेल पुरस्कार म्हणजे गमतीशीरच प्रकरण आहे 😀
ह्यावरून ते सर्वोत्कृष्ट वाईट सिनेमा, दिग्दर्शक, नट, नटी वगैरे वगैरेंसाठी २००९ साली आपल्याकडे सुरु झालेले 'गोल्डन केला ॲवॉर्ड्स' आठवले 😀
त्यामागची प्रेरणा बहुतेक Ig- नोबेल पुरस्कार हीच असावी....
'गोल्डन केला ॲवॉर्ड्स' बद्दलची मनोरंजक माहिती इथे वाचता येईल.
मजेशीर लेख आवडला!

कुमार१'s picture

17 Sep 2019 - 5:28 pm | कुमार१

धन्यवाद !
गोल्डन केला बद्दल नक्की वाचणार ! विंट्रेसटिंग असणार ☺️

कुमार१'s picture

18 Sep 2020 - 10:38 am | कुमार१

यंदाचा (२०२०) हा सोहळा अपेक्षेप्रमाणे ऑनलाइन पार पडला. काही उल्लेखनीय पुरस्कार असे:

१. मानसशास्त्र : माणसांच्या भुवयांवरून त्यांची आत्मपूजक वृत्ती ओळखणे.

२. शांतता : हे भारत व पाकिस्तान सरकारला विभागून मिळाले आहे.
विषय : या दोन्ही देशांचे राजदूत मध्यरात्री एकमेकांच्या दारावरची बेल चोरटेपणाने वाजवून दुसऱ्याने दार उघडण्यापूर्वीच पळून जाण्यात तरबेज असण्याबद्दल.

३. अर्थशास्त्र : देशाचे सकल राष्ट्रीय उत्पन्न आणि तिथल्या नागरिकांचे तोंडाची चुंबने घेण्याचे प्रमाण यांचा परस्पर संबंध.
हे इंग्लंड व फ्रान्ससह १० देशांना विभागून मिळाले.

४. वैद्यकीय शिक्षण : कोविडच्या साथीतून जगाला दाखवून दिले, की नागरिकांच्या जीवन-मरणाच्या प्रश्नांमध्ये वैज्ञानिक व डॉक्टरांपेक्षा राजकारणी व्यक्तींचे महत्त्व अधिक आहे.

हे भारत, अमेरिका आणि रशियासह ९ राष्ट्रप्रमुखांना विभागून दिले.

अन्य पुरस्कार इथे पाहता येतील :

https://www.improbable.com/ig-about/winners/#ig2020

अभिनंदन 👌

🙏

Bhakti's picture

18 Sep 2020 - 1:49 pm | Bhakti

अभिनंदन

विजुभाऊ's picture

18 Sep 2020 - 12:07 pm | विजुभाऊ

भारतीय विद्यापीठात पीएच करणारे काय संशोधन करतात याची लिस्ट पाहिली तर ती राहून अधीक विनोदी असेल

शा वि कु's picture

19 Sep 2020 - 8:13 pm | शा वि कु

Narendra Modi Becomes Second Indian Head of State To Win Ig Nobel Prize

Narendra Modi was included among this year’s laureates presumably for his government’s response to India’s COVID-19 epidemic – typified today by the world’s fastest-growing case load, disconnect with ground realities, complaints of fatality underreporting and data suppression, and opaque administration.

&#128079

शा वि कु's picture

19 Sep 2020 - 8:40 pm | शा वि कु

Meanwhile, the prize for Medical Education has been jointly awarded to Indian Prime Minister Narendra Modi, US President Donald Trump, Brazilian President Jair Bolsonaro, UK Prime Minister Boris Johnson, Russian President Vladimir Putin, Turkey’s President Recep Tayyip Erdogan, Mexico’s President Jai Andrés Manuel López Obrador, the Belarus President Alexander Lukashenko and Turkmenistan’s President Gurbanguly Berdimuhamedow.

डीप डाईव्हर's picture

19 Sep 2020 - 8:54 pm | डीप डाईव्हर

Narendra Modi Becomes Second Indian Head of State To Win Ig Nobel Prize

Sir,
May I Know Who Was The First One ?

कुमार१'s picture

19 Sep 2020 - 8:49 pm | कुमार१

मराठीत लिहावे ही विनंती.

कुमार१'s picture

19 Sep 2020 - 9:03 pm | कुमार१

डी डा
पहिले होते अटलबिहारी वाजपेयी

१९९८ : शांतता पुरस्कार

शा वि कु's picture

19 Sep 2020 - 9:07 pm | शा वि कु

>>>मराठीतून...
अर्रर्र. माफ करा. आता लक्षात ठेवीन.

@डी. डा.
दुव्यात दिले आहे. वाजपायींना "आक्रमकतेने शांततापूर्वक" अणुबॉम्ब वापरण्याच्या कल्पनेसाठी १९९८ मध्ये मिळाले.

कुमार१'s picture

19 Sep 2020 - 9:10 pm | कुमार१

डी डा
१९९८ चे “शांतता” वाजपेयी आणि नवाझ शरीफ या दोघांनाही अणुस्फोटाबद्दल मिळाले होते !!

(https://www.improbable.com/ig-about/winners/#ig1998)

अछा.
कुमार सर आणि शा वि कु सर दोघांना उत्तरासाठी धन्यवाद 🙏

मला वाटले मनमोहन सिंग यांना (गप्प राहून राखलेल्या) शांततेसाठी दिले होते कि काय? 😀

कुमार१'s picture

19 Sep 2020 - 9:21 pm | कुमार१

नाही,
मग ते Ig च्या नियमाशी विसंगत झाले असते.
😂

कुमार१'s picture

10 Sep 2021 - 10:53 am | कुमार१

२०२१ चा अज्ञान- नोबेल पुरस्कार सोहळा काल अमेरिकेत संपन्न झाला. Bw
यंदाची काही ठळक पारितोषिके अशी :

१. अर्थशास्त्र : एखाद्या देशाच्या राजकारण्यांचा लठ्ठपणा हा त्या देशातील भ्रष्टाचाराचा निर्देशांक आहे.

२. वैद्यकीय : श्वसनमार्ग स्वच्छ ठेवण्यासाठी लैंगिक कळसबिंदू हा नाकात घालायच्या औषधी थेंबांइतकाच प्रभावी असतो !

३. शांतता : चेहऱ्यावर मारलेल्या ठोशांपासून बचाव होण्यासाठीच माणसांमध्ये दाढीची निर्मिती उत्क्रांती दरम्यान झाली.

४. रसायनशास्त्र : चित्रगृहातील प्रेक्षकांच्या श्वासांच्या रासायनिक पृथक्करणावरून संबंधित चित्रपटातील हिंसा लैंगिकता व शिव्या यांचे मोजमाप करणे.

अन्य पुरस्कार इथे पाहता येतील

गॉडजिला's picture

11 Sep 2021 - 1:44 am | गॉडजिला

:) :) :)

कुमार१'s picture

22 Sep 2022 - 10:54 am | कुमार१

यंदाच्या (२०२२) सोहळ्यातील पुरस्कार विजेते आणि त्यांची संशोधने येथे आहेत:

फक्त शांततेच्या पुरस्काराचा इथे उल्लेख करतो.

" सतत कुजबूज करणाऱ्यांनी खरे कधी बोलायचे आणि खोटे कधी बोलायचे हे ठरवण्यासाठी एक प्रणाली" तयार केल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला.

विवेकपटाईत's picture

22 Sep 2022 - 1:26 pm | विवेकपटाईत
विवेकपटाईत's picture

22 Sep 2022 - 1:26 pm | विवेकपटाईत

शांततेसाठी दिलेले अधिकार नोबेल पुरस्कार विनोदी श्रेणीत येतात. अन्य श्रेणीत किमान 50 टक्के पुरस्कार या श्रेणीतील असतील. अमर्त्य सेन ही त्यातले. बाकी कुणाला द्यावे ही पुरस्कार देणाऱ्यांची राजनीतिक ईच्छा असते. त्यानुसार पुरस्कार दिले जातात. काही पुरस्कार तर नेहमीच भारत विरोधी लोकांना दिले जातात.

क्लिंटन's picture

22 Sep 2022 - 5:07 pm | क्लिंटन

जर हेनरी किसिंजरला शांततेचे नोबेल पारितोषिक दिले गेले असेल तर त्या नोबेलला काय अर्थ राहिला? ज्या माणसाला नरकात कायमस्वरूपी जागा आरक्षित ठेवायला हवी त्याला शांततेचे नोबेल? हेनरी किसिंजरला शांततेचे नोबेल दिले जात असेल तर मग ओसामा बिन लादेनला का दिले गेले नसावे? जास्त माणसे मारणार्‍याला शांततेचे नोबेल आणि कमी माणसे मारणार्‍याला नाही- हा तर मोठाच अन्याय झाला.

विवेकपटाईत's picture

22 Sep 2022 - 1:27 pm | विवेकपटाईत

शांततेसाठी दिलेले अधिकार नोबेल पुरस्कार विनोदी श्रेणीत येतात. अन्य श्रेणीत किमान 50 टक्के पुरस्कार या श्रेणीतील असतील. अमर्त्य सेन ही त्यातले. बाकी कुणाला द्यावे ही पुरस्कार देणाऱ्यांची राजनीतिक ईच्छा असते. त्यानुसार पुरस्कार दिले जातात. काही पुरस्कार तर नेहमीच भारत विरोधी लोकांना दिले जातात.

विवेकपटाईत's picture

22 Sep 2022 - 1:28 pm | विवेकपटाईत

अधिकार जागी अधिकांश वाचावे

कुमार१'s picture

22 Sep 2022 - 1:32 pm | कुमार१

*"कुणाला द्यावे ही पुरस्कार देणाऱ्यांची राजनैतिक इच्छा >>
खरंय

कुमार१'s picture

22 Sep 2022 - 5:33 pm | कुमार१

अज्ञानी नोबेल पुरस्कारांमध्ये तरी राजनैतिक लुडबुड नसावी असे वाटते ! :)

कुमार१'s picture

16 Sep 2023 - 10:06 am | कुमार१

सालाबादप्रमाणे यंदाही हे विविध पुरस्कार जाहीर झालेले आहेत. त्यापैकी मला वैशिष्ट्यपूर्ण वाटलेल्या दोघांची नोंद घेतो :

1. साहित्य Ig : जेव्हा काही लोक एकच शब्द लागोपाठ वारंवार वापरत राहतात तेव्हा काय वाटते, याचे संशोधन. या शोधनिबंधाचे नावही असे मजेशीर आहे :
The The The The Induction of Jamais Vu in the Laboratory: Word Alienation and Semantic Satiation.

2. वैद्यकीय Ig : माणसाच्या दोन नाकपुड्यांमधील केसांची संख्या समान असते का नाही हे मोजण्यासाठी प्रेतांचा वापर करून संशोधन केले.

कुमार१'s picture

16 Sep 2023 - 10:06 am | कुमार१

सालाबादप्रमाणे यंदाही हे विविध पुरस्कार जाहीर झालेले आहेत. त्यापैकी मला वैशिष्ट्यपूर्ण वाटलेल्या दोघांची नोंद घेतो :

1. साहित्य Ig : जेव्हा काही लोक एकच शब्द लागोपाठ वारंवार वापरत राहतात तेव्हा काय वाटते, याचे संशोधन. या शोधनिबंधाचे नावही असे मजेशीर आहे :
The The The The Induction of Jamais Vu in the Laboratory: Word Alienation and Semantic Satiation.

2. वैद्यकीय Ig : माणसाच्या दोन नाकपुड्यांमधील केसांची संख्या समान असते का नाही हे मोजण्यासाठी प्रेतांचा वापर करून संशोधन केले.

कर्नलतपस्वी's picture

16 Sep 2023 - 11:33 am | कर्नलतपस्वी

मिपावर असे काही पुरस्कार ठेवता येतील का याचा सासं नई विचार करावा.