शुभ्र रुपेरी हव्यात लाटा बटाबटांच्या डोक्यावरती
नकोच तेव्हा काळीकुरळी बट डोळ्यावर सळसळणारी
शेलाटीशी रेघ वक्रशी हातावरती उमटून जावी
टिचकी मारून गिरकी घेता झोका माझा खाली यावा
डोळ्यांवरती जरा खालती ग्रहण हवे मज चंद्राचे
त्या ग्रहणाला मोक्ष नसावा, केवळ अनुभव साक्ष असावा
नाजुक साजुक पेरांवरती खोडावरचे रिंगण यावे
साल कोवळी मधुमासाची गंध फुलांचा उडून जावा
पोटामधले उदंड पाणी खळखळ अवघी डोळ्यांमधली
एक मोजता दुजी उठावी लाट बोलकी मिटून जावी
पाठीवरच्या पानावरचा रंग केशरी विराट व्हावा
त्यावर हलते माळ मण्यांची ताठ कण्याची पाठ रहावी
हळुच यावे जरा बसावे आस्ते आस्ते कवेत घ्यावे
वयास माझ्या पैंजण घालित वार्धक्याने हसुन यावे
शिवकन्या
प्रतिक्रिया
5 Sep 2019 - 5:56 pm | यशोधरा
वा!
सुंदर.
5 Sep 2019 - 10:21 pm | जालिम लोशन
अगदी सुदंर अपेक्षा.
6 Sep 2019 - 5:04 pm | श्वेता२४
नेहमाप्रमाणेच.
7 Sep 2019 - 5:58 pm | खिलजि
कसे सावरू वयास माझ्या , तारुण्याचे वरदान कुठे ?
रंगवून टाकल्या सफेद झालरी , काळा रंग लपला कुठे ?
झिडकारुनी त्या वार्धक्क्यास , ठेवले माझे मन कोवळे
मोतीबिंदूही हिरवे झाले , जीवन सोन्याहुनी पिवळे
12 Sep 2019 - 9:40 am | मन्या ऽ
वाह! क्या बात है!!
अतिशय सुंदर
12 Sep 2019 - 12:21 pm | जॉनविक्क
आता तो फक्त एक बागुलबुवा होता असे वाटते.
आता सगळ्याच बाबतीत फक्त साक्षीदार या नात्याने जोडला जातो (आणि या साक्षीभावाचे प्रयोजन काय इतकाच विचार मनात असतो,) कारण नाविन्य असे काही नाहीच. वार्धक्य इतरांचे जवळून पाहिलेले म्हणून तेही अपेक्षितच अन... बालपण, तरुणपण स्वतःच अनुभवलेले म्हणून ते ही ताजे नाही. त्यामुळे हा साक्षीभाव पोसून करायचे काय, टाळून करायचे काय हा एक प्रश्नच आहे ?
अर्थात शोध चालूच ठेवला की उत्तरे मिळतात खरी :)
25 Sep 2019 - 2:30 pm | राघव
:-)
भारी!
18 Sep 2019 - 10:19 am | रातराणी
सुरेख!!
24 Sep 2019 - 5:23 pm | रिकामटेकडा
सुंदर
25 Sep 2019 - 2:29 pm | राघव
आवडली! :-)
28 Sep 2019 - 8:07 am | शिव कन्या
सर्व रसिकांचे आभार ...