एका साइड व्हिलनची कैफियत

फारएन्ड's picture
फारएन्ड in जनातलं, मनातलं
26 Aug 2019 - 4:17 am

काय डोक्याला ताप राव! असले झंपट टीशर्ट आणि प्यांट घालून फाईट करायला लावतात. तो मेन व्हिलन राहतो बाजूला पिक्चर भर नुसत्या धमक्या देत आणि हीरो आला की फाईटला आम्ही. तरी बरं ष्टोरीत लौकर मेलो तर लगेच दुसरा पिक्चर शोधून तिथली फाईट करायला जाता येतं. नाहीतर उगाच चार महिने शूटिंग ला रोज वेळेवर तयार राहावं लागतं. त्यात अर्ध्या वेळा शूटिंग कॅन्सल.

आता बच्चनकडून, धरमपाजींकडून मार खायला काय वाटायचं नाही. पहिलं म्हणजे ते खरंच मारतायत असं वाटायचं. दुसरं म्हणजे सीन टायमावर शूट होउन बच्चन मोकळा व आपण मोकळे दुसर्‍या स्टुडिओत जायला. नाहीतर एकेकाचे नखरे. "आज मूड नही है". फाईट केलीच, तर अ‍ॅक्शन अशी की आजवर कधी डोक्याच्या वर हात उचलला होता का नाय असं वाटेल. याच्या अ‍ॅक्शनमधे काहीच जोर नाही, म्हणून बॅकग्राउण्डला च्भिश्श! च्भिश्श! सारखे आवाज देतात, आणि आम्ही आडवं व्हायचं. त्यात ग्रूप फाईट असली तर अजून कल्ला. हा हीरो समोरच्याला मारत असला तर मागून मारायचं नाही. थांबायचं. तो त्या समोरच्याला मारणार, आपण इकडं वाट बघायची. किक शॉट असेल तर काही लोकांना एक किक शूट केल्यावर कमरेला बाम लावायला लागतो. मग त्या पहिल्या किकचाच अ‍ॅक्शन रिप्ले २-३ वेळा व्हूप व्हूप आवाज काढत दाखवतात. मग दोन तासानी पुढचा शॉट. मग आम्ही हात उगारून यायचं या बाजूने. तोपर्यंत हा हीरो आराम करून येणार मग फाईट कंटिन्यू. त्यात सीन कंटिन्यूटीवाल्या कोणाचं डोकं चाललं, तर तो आधीचा मारलेला पुन्हा आडवा करतात समोर, नाहीतर कोणाला पत्ता नाही. आता बघा, शूटिंग दोन तासानं झालं तरी पिक्चर मधे हा तोच सीन आहे ना? हीरोने त्याला आडवा करून इकडं वळल्यावर तो पडलेला कुठं गायब झाला? जाउद्या. आपल्याला काय करायचं आहे. कधीकधी तर सेम पिक्चर मधे आधी मेलो असलो तरी नंतरच्या फाईटसीनला परत आणतात. कोणाला कळण्याएवढं आपल्याला कोण लक्षात ठेवतो.

दुसरं, एकेक चिपाड हीरो. फाईट मधे सुद्धा आपली झुल्फं ठीक आहेत ना बघत बसणार. इकडून फाईट मार म्हंटलं तर म्हणतो नाही - कॅमेर्‍यापुढं फक्त उजव्या साईडने येणार. मग एक "ढिशूम" आणि आम्ही आडवं पडायचं खाली आणि पडून राहायचं 'कट' होईपर्यंत. आता याच्या फाईट ने जाहिरातीतला कट आउट सुद्धा खाली पडणार नाही. पण ठीक आहे, सीन आहे, पडलो. तर काय पुन्हा उठून बसणार नाही, त्याला पुन्हा मारणार नाही? सीन मधे पाहिलं तर हीरो तसाच पुढं.

सीन लिहीणारे पण कायपण लिहीतात. तो सर जॉन, जे के, ठुकराल नायतर असल्याच कोणाच्यातरी अड्ड्यावर आम्ही वॉचमन सारखे उभे सीनमधे. आता पंध्रा वर्षांपूर्वी हीरोच्या कोणालातरी याने मारलं, म्हणून कधीतरी तो हीरो मारायला यील म्हणून आम्ही काय २४ तास दारात उभं राहणार रागीट चेहरे करून? आणि हा जेकेला मारायला आलाय, तर आम्ही कशाला त्याच्यावर एवढे चिडून त्याच्या अंगावर जाणार? डायरेक्टर म्हणतो एकदम फुल रागात दात काढून, हातपाय हलवत जायचं. उगाच कायच्या काय. नाहीतर तो दचकायचा सीन. आता हीरो फुल बाईक घेऊन भिंत फोडून आला तर तेव्हाच सगळे एकदमच दचकतील ना? तर तसं नाय दाखवायचं. हीरो जिकडं जसा बघेल तसा तिकडच्यांनी दचकायचं. कायपण कॉमेडी.

फाइटमास्तर पण कायपण फाईट करतो - फुल बँडेज मधला हीरो सलाईन काढतो, हॉस्पिटल मधून पळत येतो आणि आम्हाला एका फाईटमधे आडवा करतो. त्यात परत हेटाई - आपण रिअल मधे फाईट करताना मार खाईल पण पळून नाही जाणार. तर इथं, फाईटच्या शेवटी हीरो नुसता आमच्याकडे रागाने पाहतो तर आम्ही पळून जायचं, नाहीतर हीरॉइनकडून पण फाईट खायची. आपल्याला त्याचे काही नाही. आता तो चिपाड हीरो जर दहा जण आडवे करू शकत असेल तर हीरॉइनने काय घोडं मारलंय. पिक्चर मधल्या सगळ्या फाईटमधे असलो तरी आमचं नाव पिक्चर मधे येतच नाय. मेन व्हिलनने नाव घेतलं तर ते फितूर झालो समजून मारून टाकायला. हीरो तर डायरेक्ट "ये भाडे के टट्टू" म्हणूनच सांगतो. आता मेन व्हिलनचा नोकरच आहे ना? हीरो ज्या ठिकाणी नोकरी करतो तिथला तो पण काय भाडे का तट्टू असतो काय?

त्या 'कुली' च्या फाईटमधे बच्चनला लागलं तेव्हा फुल हेडलाईन. सगळे नेते हॉस्पिटलात. ठीक आहे, आम्हाला पण वाईट वाटलं. लै लागलं होतं, त्यात बच्चन फेमस आहे. पण अशा फाईट मधे आमच्यासारखे जेव्हा जखमी होतात तेव्हा बातमीपण येत नाही. प्रोड्यूसर चांगला असेल तर भरपाई चांगली मिळते, नाहीतर काय खरं नाही. जाउ दे.

जरा रोल तर नीट लिहा राव. कालिया, सांबा, पीटर, नारंग सारखं काहीतरी. नाहीतर फुल मेन व्हिलनचा रोल कसा मिळेल? सूट घालून जेके म्हणून थेट पोलिस स्टेशन मधे जायचा सीन, नाहीतर मोठ्या हवेलीत हुक्का घेऊन बसायचा सीन करायचा आहे. "बाँध दो इसे" डायलॉग मारायचा आहे. कोणी आमच्यासारखे साईड व्हिलन असेल तर सांगा काय करता येइल.

मौजमजाचित्रपटआस्वादसमीक्षा

प्रतिक्रिया

फारएन्ड's picture

26 Aug 2019 - 4:20 am | फारएन्ड

मिपावरच्याच या आवडलेल्या लेखावरून प्रेरणा घेउन एक खूप आधीचा लिहून ठेवलेला हा लेख देत आहे :)

पण थोडाफार अजून प्रयत्नच आहे. Yet, lets hope to rock further, for the upcoming stuff. ALL THE BEST.

सगळे साईड व्हिलन तुला दुवा देणार, हा लेख वाचून!

उपेक्षित's picture

26 Aug 2019 - 1:42 pm | उपेक्षित

थोडा विस्कळीत वाटला आणि नेहमीचा (फारेंड) टच नाही जाणवला दादा.

उगा काहितरीच's picture

26 Aug 2019 - 5:38 pm | उगा काहितरीच

+1

लेख आवडला. जुने खलनायक आठवून हसू आलं.

फारएन्ड टच मिसिंग. पण होतं कधीकधी. मुद्दे मात्र भारी आहेत.

नेमकं काय मिसिंग, तर फारएन्ड यांच्या विनोदी शैलीत एक धारदारपणा असतो, 'ठ्ठो'जनक. तो किंचित बोथट वाटला इतकंच. लेकिन अंदाज तो वही पुराना है. येऊ द्या आणखी.

कानडाऊ योगेशु's picture

26 Aug 2019 - 5:52 pm | कानडाऊ योगेशु

हेच म्हणतोय. कदाचित फारएन्ड टच मिळण्यापूर्वीचे लेखन असावे हे.
एका फर्मास परिक्षणाच्या प्रतिक्षेत..

नाखु's picture

26 Aug 2019 - 6:17 pm | नाखु

आणि अमिताभची खलनायकाच्या डाव्या उजव्या शी होणारी (तर्रीबाज पंच मिसळ) मारामारी पहायला बसावं आणि पडद्यावर विवेक मुश्रन आणि देव आनंदच्या हडती डुलती चलचित्रांची (फुळकावणी मिसळ खायला मिळाली एक दुसरा फरसाण पापडी वगळता)

मिसळीचे नाव आणि दर्जा याचा ताळमेळ मिसळलेला पांढरपेशा मध्यमवर्गीय नाखु

Namokar's picture

27 Aug 2019 - 7:50 pm | Namokar

लेख आवडला >>+११११

मित्रहो's picture

28 Aug 2019 - 11:16 am | मित्रहो

कैफियत छान मांडली आहे

चौथा कोनाडा's picture

28 Aug 2019 - 9:41 pm | चौथा कोनाडा

लेख आवडला.

सुधीर, रुपेशकुमार, जानकीदास, मॅकमोहन पासूनची सर्व नट मंडळी डोळ्यांसमोरुन तरळून गेली.

पियुशा's picture

29 Aug 2019 - 2:11 pm | पियुशा

"च्भिश्श! च्भिश्श! याचा उच्चार कसा कराय्चा म्हने ?;) लेख आवड्या :)

मिपाकर्स म्हणजे रत्नांची खाण आहे खाण!

diggi12's picture

13 Oct 2021 - 7:28 pm | diggi12

मस्त

विवेकपटाईत's picture

14 Oct 2021 - 5:32 pm | विवेकपटाईत

हा ही लेख मस्त. साईड विलेन म्हंटले की मला महाराष्ट्रातील एक नेता डोळ्यांसमोर उभा राहिला.

रंगीला रतन's picture

14 Oct 2021 - 11:54 pm | रंगीला रतन

लै भारी.