मी अजिबात घाबरत नाही.....!

मृणालिनी's picture
मृणालिनी in जनातलं, मनातलं
4 Aug 2019 - 5:39 pm

अमावस्येची रात्र! ऑफिस मधून सगळे लवकर घरी गेले होते. माझे काम मात्र अजून पूर्ण व्हायचे होते. मी एकटाच फाईलवर रिमार्क लिहित बसलो होतो. घड्याळाच्या मोठा काट्याने १२ वर येत ९ वर असलेल्या छोट्या काट्याशी काटकोन केला. उशीर झाला होता. पण मला चिंता नव्हती. तसाही मी अंधश्रध्दाळू नाही. त्यामुळे, अमावास्येला घरी लवकर जाऊन झोपायचे असते, असे कोणी कितीही सांगितले तरी ते मी ऐकत नाही. शेवटी काम महत्त्वाचे! आणि त्यात मी खवीस, चेटकीण, हडळ, भूत, मुंजा वगैरेला तर अजिबातच घाबरत नाही. त्यामुळे हातात मंतरलेला गंडा बांधणे वगैरे असले काही नखरे नसतात माझे. या उलट माझे घाबरट कलिग्ज्! आंघोळही मुहूर्त बघून करतात.
काम आटपले तसा मी मोबाईलवर रेडियो लावला. कानात इअरफोन अडकवून लॅपटॉप बंद केला. गाडीची चावी बॅगेतून बाहेर काढून बॅग खांद्यावर टांगली. पंच आऊट करून दारातून बाहेर आलो तेव्हा हवेत मस्त गारवा पसरला होता. पावसाची तुरळक रिपरिप चालू होती. झाडे भिजून गडद रंगांमध्ये रंगल्या सारखी भासत होती.
मुख्य गेटच्या बाहेर कच्च्या रस्त्यावरची माती भिजून ओली किच्च झाली होती. मी पॅंट वरच्या बाजूने दुमडत गुडघ्यापर्यंत वर घेतली. नवीन घेतलीये. पार शहरात गेलो होतो आणायला. चिखलात भिजली असती तर नक्की खराब झाली असती.
रेडिओवर मस्त पूर्वीची जुनी गाणी सुरु होती. एखादं गाणं सिलेक्ट करून ऐकण्याऐवजी अशी रेडिओ वरची रॅन्डम गाणी ऐकायला छान वाटतात. ॲंकर आधी गाण्याची हिंट देतो..... गुमनाम चित्रपटातील हे गीत.... शंकर जयकिशन यांनी संगीतबद्ध केलेले आहे.... आणि स्वर लता मंगेशकर यांचे....! मग सोबत संगीत सुरु होत.... अशी गाणी ऐकत असताना पावसात भिजत टू व्हिलर वर जायची मजाच वेगळी. इथली लोकं तर अशी गाणी ऐकायलाही घाबरतात या वेळेला. गावाकडची लोकं. दुसरं काय!
बाहेर पाऊस पडतोय हेही ए.सी. ऑफिसमध्ये मध्ये बसल्यावर कळत नाही. निसर्गाच्या सानिध्यापासून किती लांब गेलो आहोत आपण गावात राहत असूनही! विचार करता करता चालत मी बेसमेंट मध्ये पोचलो सुद्धा!
माझी गाडी लावलेली होती, तिथे प्रकाश जरा कमी होता. माझी टू व्हिलर मी कायम १३व्या नंबरला लावतो. काय म्हणता? अपशकुनी आहे नंबर? म्हणूनच लावतो. बघू ना कोण भूत येतय ते! मला ना लोकांचे हे भ्रम तोडायचेच आहेत. मी गाडीलाच लॉक केलेलं हेल्मेट काढून डोक्यावर बसवलं. ती एकच अशी गोष्ट आहे, जी मी लोकांची ऐकतो. कारण हेल्मेट म्हणजे शिरस्त्राण ही एकच गोष्ट डोक्यावर चढवली तरी ती डोक्यावर चढत नाही. हा विनोद मी ऑफिस मध्ये ऐकवला पण तो सर्वांच्या डोक्यावरून गेला. असो. चावी फिरवली, स्टार्टर मारला आणि सुसाट सुटणार इतक्यात समोर एक आकृती उभी दिसली. स्त्री असावी. ती माझ्या बाजूने पुढे येत असावी कारण ती आकृती मोठी मोठी होत होती. कानांत गाणे सुरुच होते..... किसको खबर कौन है वो.... अंजान है कोई!
मी खवीस, चेटकीण, हडळ, भूत, मुंजा वगैरेला अजिबात घाबरत नाही. मी एअरफोनच्या बटणाने आवाज कमी करत बंद केला. " कोण? "
"अहो मी आहे, मिसेस जोशी." जोशीमॅडम पुढे आल्या तसा त्यांचा चेहरा प्रकाशात दिसला.
"काय हो, आज अजून इथेच? तुम्ही तर सर्वांसोबत निघाला होतात ना?"
"हो. पण अहो गाडी सुरुच होत नाहीये. त्यात इथे मेकॅनिक मिळत नाही. कोणातरी सोबत जाव म्हणलं तर आपल्या या एरियातून माझ्या घराच्या बाजूला राहणारे तुम्ही आणि मी सोडलो तर बाकी कुणी नाही. निशूला बोलवावे तर तो आत्ताच थकून घरी पोचला असणार. म्हणलं तुम्हालाच विचारावं. सोडाल का मला आज?"
चला! सोबत आहेत आज जोशी मॅडम! मला बरे वाटले. छे, छे, घाबरलो नव्हतो मी. सोबत कुणीतरी आहे म्हणून आनंद झाला होता मला. 'का' काय विचरता! एकटा जायला घाबरत नाही हो मी. पण जोशी मॅडम देव-भविष्य वगैरे विषयांवर न कंटाळता गप्पा मारणाऱ्या एकमेव स्त्री आहेत त्या माझ्या ओळखीतल्या! बाकीचे मी काही विरूध्द, थोडक्यात लॉजिकल बोललो की बोलणच बंद करतात. शिवाय जोशी बाईचा डब्बा खायला मिळतो रोज. काय मस्त आंबट-गोड आमटी बनवतात.... वरती अगदी खोबरं-बिबरं घालून. गुरगुट्या भात आणि वर साजूक तुपाची धार! साजूक तुपही विकतचं नाही बरं का ! घरच्या कढलेल्या लोण्यापासून बनवलेलं. त्यांच्या हातचं जेवण म्हणजे केवळ अप्रतिम. त्या बदल्यात लिफ्टच काय मी त्यांचा ड्रायव्हर बनायला तयार आहे.... तेही रोज! भूक मिटवायलाच तर माणूस आयुष्यभर धडपडत राहतो. घर ते ऑफिस... ऑफिस ते घर!
भविष्य सांगणे जोशींची आवड आणि ते कसं खोटं असते हे सांगणे माझे कर्तव्य! एकटच भुतासारख जाण्यापेक्षा वादावादी करत जाणं काय वाईट ! एक मिनिट.... भुतासारखं म्हणालो मी? लोक म्हणतात म्हणून तोंडात बसतं ओ.... बाकी मी खवीस, चेटकीण, हडळ, भूत, मुंजा वगैरेला अजिबात घाबरत नाही.
त्या मागे बसल्या. गाडी बेसमेंट मधून बाहेर काढून मी मेन गेट वर आणली. सिक्युरिटीवाल्याने सलाम ठोकत किडके दात विचकले. दार उघडून तो माझ्या कडे 'सहाशी' दाखवत बघत होता. माहितीये, ते 'बत्तीशी' असतं. पण तंबाखू खाऊन खाऊन त्याचे दर्शनी भागातले मोजून सहाच दात शिल्लक होते. त्याच्या बघण्यावरून वाटले, पैशांची अपेक्षा असावी. पण मी कोणाला वरकमाई देत नसतो.
रस्त्यावर मी गाडी सुसाट सोडली. गाडीवर बसून आम्ही जात होतो तो रस्ता आज अंधारलेला होता. पण वर्दळ होती. जोशी मॅडम घाबरून बसल्या असाव्यात किंवा मग त्यांचा मूड गप्पांचा नसावा... पण त्या आज एकदम गप्प होत्या.
मग मी च सुरवात केली, "काय मग आजचे माझे भविष्य सांगितले नाहीत?" हेल्मेट मधून जितक सुस्पष्ट बोलता येईल तितक मी बोलत होतो. पावसाच्या आवाजात पानांची सळसळही मिसळत होती. त्यात टू-व्हिलरवर असल्याने वाऱ्याचे घोंगावणे जास्त आवाज करत होते. मला ऐकू यावे म्हणून मोठ्याने बोलण्याच्या भरात जोशीमॅडम जवळ जवळ किंचाळत होत्या, "अहो आता दिवस संपायला असा कितीसा वेळ राहिला आहे?"
"पण तरीही.... सांगा ना!"
"राहू द्यात हो...."
"सांगा की मॅडम...." मी ही जिद्दीला पेटलो.
"बर...." त्यांनी काही वेळ घेतला.
"काय झालं ओ जोशी मॅडम? आज पावसाने ग्रहदशा दिसत नाहीत वाट्ट." मी टोमणा मारला.
"जाऊ द्या ओ..... तुम्ही विश्वास ठेवत नाही. आणि मी सांगितले तर उगाच अभद्र बोलले म्हणून माझ्यावर तुम्हाला टोमणे मारायचा चांस मिळायचा."
"काय उगाच वातावरणनिर्मिती करताय.... भविष्यात नसेल तरी तुमचे बोलणे ऐकून फेफर भरून मरायचा एखादा माणूस. सांगा की."
"आज काहीतरी भयंकर घडणार आहे."
मी हसू आवरूच शकलो नाही. माझं जोर जोरात हसणं त्यांना कडेच्या गोंगाटातही ऐकू गेलं असावं
"मी म्हणूनच सांगत नव्हते." त्या चिडल्या. .
"तस नाही ओ.... तुम्हीच म्हणाला होतात न मगाशी.... असा किती वेळ राहिलाय आजचा दिवस संपायला." त्यांची सोसायटी आली आणि त्या उतरून जायला लागल्या. मधेच मागे वळल्या, "Thanks. तुम्ही हवं तर आज थांबता का आमच्या घरात? भिजला आहात आणि पाऊसही थांबत नाहीये. निशूचे कपडे आहेत घरात आणि निशूलाही आवडेल तुमच्याशी बोलायला." कपाळावर हाताचा आडोसा करत त्यांनी मला विचारलं.
"अहो राहूद्यात हो... निशांत भाऊंना भेटेन नंतर कधी. ह्या अश्या अवस्थेत नको." मी माझ्या ओल्या कपड्याकडे हात दाखवत म्हणलं, "आणि आता दिवस संपायला तरी असा कितीसा वेळ आहे?" मी उगाच त्यांना डिवचलं.
"पण....... अजून संपला नाहीये.....एकटे जाताय....पुढचा रस्ता जास्त एकाकी आहे." मला घाबरवू पाहाताय? लक्षात ठेवा, मी खवीस, चेटकीण, हडळ, भूत, पिशाच्च वगैरे कश्यालाही अजिबात घाबरत नाही. मगाशी बोलावलतं तेव्हा आलो ही असतो. पण आता? नाही. तुम्ही वर्तवलेल्या भविष्यावर जेव्हढा तुम्हाला विश्वास आहे, तितकचं ते खोटे असल्याचे सिद्ध करणे माझ्यासाठी महत्वाचे आहे.
मी काही न बोलता स्टार्टर मारला. क्लच दाबून गाडी एक्सलरेट करत घर्र... घर्र... आवाज केला. मग काय! मलाही राग आलाय, हे कळालं पाहिजे त्यांना. मग त्यांच्याकडे न बघता सरळ गाडीचा वेग वाढवला. तसे रस्त्यावर कोणी नव्हते. त्यामुळे कोणी मधे येऊन धडकण्याचा प्रश्नच नव्हता.
मी डाव्या हाताने इअरफोन च बटण दाबत आवाज वाढवला. गाणी हा बेस्ट उपाय आहे बघा कोणत्याही मनस्तापातून बाहेर पडायला. पण हात्त्याला..... रेडिओ वर गाण्याऐवजी न्यूज ऐकवत होते लेकाचे. आता पुन्हा मोबाईल काढून रेडिओ चॅनल बदलायचा ही कंटाळा आलाय. एका कानातून इअरफोन काढून दुसरा काढणार तितक्यात शब्द ऐकले, 'कानन गावच्या पलाशमार्गावर आजवर विचित्रपणे घडलेल्या अपघातांची चौकशी करायला नवी समिती नेमलेली आहे. आजवर तिथे जप्त झालेल्या डेड बॉडीज् वर सापडलेले निशाण हे सापांच्या दंशाचे भासत असले तरी आलेल्या पोस्ट मार्ट्म रिपोर्टस् मध्ये सापाचे विष मृतांच्या शरीरात सापडलेले नाही....'
अच्छा? आता तुम्हीपण सुरु झाले? रेडिओ वाल्यांना मनात चार सणसणीत शिव्या घातल्या. हे सगळ्यांना घाबरवून ठेवतात आणि लोकही घाबरून घरी बसतात. नेहमीचे आहे हे. मी धावत्या गाडीवरूनच दिसणाऱ्या हिरव्या फलकाकडे पाहिलं. विज कडाडली तसा त्या फलकावरची पलाश मार्ग ही अक्षरे चमकली. मी गाडी चालवत वेग कमी केला.... बघुयात तरी.... आहे का कोणी ते!
कोणी दिसलं नाही. हे अफवा पसरवणारे वेडे आणि ऐकणारे सातवेडे! बातमी संपून पुन्हा गाणे सुरु झाले. 'झुमझुम झलती रात......' मी रेडिओ ऐकत मस्त गाडी पळवत होतो. तितक्यात एक मुलगी दिसली. भिजून ओली चिंब झालेली. वळणदार केसांची. एका हातातली पर्स दुसऱ्या हातात घेऊन लिफ्टसाठी हात पुढे करून तिने स्टाईलने अंगठा दाखवत हात हलवला.
हा आपला विक पॉईंट आहे. कोणी लिफ्ट मागितली की मी देतो. लिफ्ट नाही हो.... स्माईल! स्माईल देतो. लिफ्ट देणं न देणं हे नंतर ठरवतो. गाडी थांबवली. हेल्मेट काढलं. इअरफोन बाहेर काढले. तिच्या कडे बघत चेहऱ्यावर एक गोड हसू ठेवून तिला विचारलं, "इतक्या रात्री इकडं कुठे?"
"अहो, गाडी बंद पडलीये. केव्हापासून वाट बघतेय कोणीतरी लिफ्ट देईल म्हणून. तुम्ही सोडाल ना पुढं पर्यंत?" गोड आवाज. सुंदर चेहरा. भिजलेली मुलगी. आर्जवी स्वर ! मदत करायलाच हवी. अश्या वेळी आमचं स्त्री-दाक्षिण्य उफाळून येतं.
"कुठे जायचयं?" हेल्मेट घालून तिला मी मागे बसण्याची खूण करत विचारलं.
"जवळच जायचयं!"
जवळच जायचयं तर लिफ्ट कशाला हवी होती? मी किक मारली. तर गाडी सुरुच होईना! पावसामुळे बंद पडली असणार. मागे वळून बघितलं तर ती नव्हतीच तिथे. मग मी पण गाडीवरून उतरलो. तर झाडाखाली उभी होती. तिला वाटलं असणार काय फालतू माणसाकडे लिफ्ट मागितली! मी गाडीला एक लाथ मारली. अगं आई ग..... इथे राग काढायची पण पंचाईत!
तिच्या कडे बघितले तर ती झाडाला टेकून केसांची एक बट बोटांनी गोलगोल वळवत उभी होती. माझं तिच्या कपड्यांकडे लक्ष गेलं. मगाशी अंधारात नीट पाहिलं नव्हतं. लाल ड्रेस अगदी रक्तासारखा लाल रंग. तिच्या ओठांशी मिळता जुळता! ते पाहून मला काही आठवलं. असच काहीसं वर्णन करतात ना ते येडछाप सिरियल वाले पिशाच्चांच. उगाच घाबरण्याची कामं! दिशाभूल करण्यात मिडियावाल्यांनी पी.एच.डी. केली आहे. 'पब्लिक हॅरॅसमेंट डायरेक्टली'
तिने मला खुणेनेच झाडाखाली बोलावले. गाडी बंदच पडली होती. गाडीजवळ थांबण्या पेक्षा तिच्या जवळ थांबणं काय वाईट?
मी तिच्या जवळ जाऊन झाडाला टेकलो. "अहो काय सांगू ? आज आमच्या जोशी मॅडमची गाडी बंद पडली, मग तुमची. आणि आता माझीही. आज काय मुहूर्त काढून भर उन्हाळ्यात पाऊस पडतोय कुणास ठाऊक?" तिने काहीच प्रतिक्रिया दिली नाही. माझी दुमडलेली पॅंट पाहून तिला मी टपोरी वाटलो असणार. हा असा पाऊस त्यात पोटात कावळे कोकलत होते. जोशी मॅडम कडे थांबलो असतो तर स्वादिष्ट खायला तरी मिळालं असतं. डोळ्यासमोर त्यांनी बनवलेला भात आणि आमटी सोबत चटणी असं ताट येऊ लागला. आता काय? तर त्या पावसात मी मुर्खासारखा उभा होतो, कोणीतरी येईल म्हणून. खेडेगाव, त्यात या बाजूला वस्ती तुरळक. त्यात अमावस्या! मी खवीस, चेटकीण, हडळ, भूत, मुंजा वगैरेला अजिबात घाबरत नाही. पण गाववाले घाबरतात ना. कोणी येणार नाही, याची जवळ जवळ खात्रीच पटली. तिने कोणाला फोन केला नाही अजून, अर्थात कोणी घ्यायला येण्याची शक्यताही नाही. मी विचार करत उभा होतो आणि तितक्यात झाडाची एक फांदी जोरात खाली आली. तिच्यावर आदळणार त्या आधी मी तिला बाजूला केलं आणि फांदी खोडावर घासत जमिनीवर कोसळली. झाल्याप्रकाराने ती धास्तावली होती. तिने माझ्याकडे पाहिलं.
मी मुंजा बद्दल ऐकून होतो. पिंपळावर बसून खाली आलेल्या माणसांवर हा प्राणघातक हल्ला करतो. मी तिला पिंपळा पासून लांब घेऊन आलो. रस्त्याच्या कडेला दुसऱ्या झाडाखाली थांबलो. तिला इकडे आणताना मी तिचा हात धरला होता. सोडायचा विसरून गेलो होतो. पण हात तिनेही सोडला नव्हता. मला काहीच हरकत नव्हती. सुंदर मुलगी..... निसर्गरम्य ठिकाण.... तिचा हवेवर उडण्याचा प्रयत्न करणारा लाल ड्रेस.... आरक्त ओठ..... थंड वारा..... पाऊस.... एकांत..... शरीरात पेटलेली भूक आता नजरेतून बाहेर दिसू लागली.
बास! आता वाट पाहणार नाही. मगाशी त्या मुंजाने फांदी पाडली. आता खवीस येईल हाका मारत! एखाद्या हडळीचे रडगाणे सुरु होईल. अरे, किती मुश्किलीने मिळते एखादे सावज! लोकांच्या अंधश्रद्धेच्या नादात आजकाल निर्जन स्थळी ते एकटे फिरतात तरी कुठे?
ती माझ्याकडे पाहत होती. नजरेत काहीतरी होते तिच्या. माझ्याकडे बघता बघता तिच्या चेहऱ्यावर आणि डोळ्यात भयाची तिव्र लहर उठली. बहुदा रक्ताच्या ओढीने माझे डोळे लाल झाले असावेत. आता थांबता येणार नाही. मी सुळे बाहेर काढले तशी ती जोरात किंचाळली. आज काहीही झालं, तरी ही शिकार फक्त माझी होती. फक्त माझी! बाकी कोणाची नाही. आणि मी म्हणलं ना, मी खवीस, चेटकीण, हडळ, भूत, मुंजा वगैरे कश्यालाही अजिबात घाबरत नाही!

©मधुरा कुलकर्णी

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

पद्मावति's picture

4 Aug 2019 - 6:43 pm | पद्मावति

बापरे......
खतरनाक लिहिता हो. मस्तंच.

मृणालिनी's picture

4 Aug 2019 - 8:44 pm | मृणालिनी

धन्यवाद पद्मावती जी!

जॉनविक्क's picture

4 Aug 2019 - 6:53 pm | जॉनविक्क

प्रतिसाद लिहावा की नको तेच समजेना,

जव्हेरगंज's picture

4 Aug 2019 - 8:18 pm | जव्हेरगंज

कडक...!!

मृणालिनी's picture

4 Aug 2019 - 8:45 pm | मृणालिनी

तुमची प्रतिक्रिया वाचून खूप आनंद झाला. धन्यवाद जव्हेरगंजजी! :)

भीमराव's picture

4 Aug 2019 - 11:34 pm | भीमराव

भारीच

मृणालिनी's picture

4 Aug 2019 - 11:37 pm | मृणालिनी

धन्यवाद ईश्वरदास! :)

जालिम लोशन's picture

5 Aug 2019 - 12:13 am | जालिम लोशन

मकु जाॅईन झाले!

मकु खूप बरे ... अकुंंनी घेतलेली VRS तशीच राहील तेवढं बरं.. पुन्हा त्यांची लेखनप्रतिभा उफाळून यायला नको .. संस्थळाचा दर्जा कमी करणाऱ्या पोस्ट होत्या एकूण एक , शेवटची एखाद दुसरी सोडल्यास ..

nishapari's picture

5 Aug 2019 - 12:23 am | nishapari

चांगली आहे ... अशीच एक रत्नाकर मतकरींची होती जवळपास सेम ...

सोन्या बागलाणकर's picture

5 Aug 2019 - 4:27 am | सोन्या बागलाणकर

+१ मला पण मतकरींची आठवण आली ही गोष्ट वाचून.

बादवे, बाईक आणि स्त्रीदाक्षिण्य वाचून "ब्रम्हे आणि लुना"आठवले. कृ ह घे

मृणालिनी's picture

5 Aug 2019 - 11:19 am | मृणालिनी

धन्यवाद

कंजूस's picture

5 Aug 2019 - 5:59 am | कंजूस

चांगली बनवलीय.

मृणालिनी's picture

5 Aug 2019 - 6:54 am | मृणालिनी

धन्यवाद

सुधीर कांदळकर's picture

5 Aug 2019 - 7:09 am | सुधीर कांदळकर

मतकरींच्या खेकडा कथासंग्रहात अशीच एक कथा आहे. कथाभर आपल्याला गुप्त पोलीस निवेदन अरतो आहे असे वाटते पण निवेदकच खुनाचा प्रयत्न करणारा सिरीयल कीलर असतो.

एक नम्र सूचना: प्रत्येक परिच्छेदानंतर एक ओळ मोकळी सोडली तर दिसायला चांगले दिसेल.

ज्ञानोबाचे पैजार's picture

5 Aug 2019 - 9:30 am | ज्ञानोबाचे पैजार

बर्‍याच दिवसांनी मस्त भयकथा वाचायला मिळाली
पैजारबुवा,

मृणालिनी's picture

5 Aug 2019 - 9:32 am | मृणालिनी

धन्यवाद :)

माबोवर प्रतिक्रिया दिली होती. इथे वेगळी देतो.

भयकथा आवडली..!! सुरूवातीला वाटले होते की कथा निवेदकच भूत असणार पण नंतर नंतर संशय दुसर्‍यांवर गेला. जोशी मॅडम याला खाणार असे वाटत होते पण शेवटच्या twist ने बाजू परतवली.

मी सुद्धा खवीस, चेटकीण, हडळ, भूत, मुंजा वगैरेला अजिबात घाबरत नाही. फक्त भयकथांना घाबरतो.

मृणालिनी's picture

5 Aug 2019 - 11:18 am | मृणालिनी

धन्यवाद योगीजी! :)

श्वेता२४'s picture

5 Aug 2019 - 3:04 pm | श्वेता२४

तुमचे लेखन छान चालू आहे. लिहीत राहा.

मृणालिनी's picture

5 Aug 2019 - 3:16 pm | मृणालिनी

धन्यवाद श्वेताजी :)

संग्राम's picture

5 Aug 2019 - 3:36 pm | संग्राम

कलाटणी मस्तच !

मृणालिनी's picture

7 Aug 2019 - 9:55 am | मृणालिनी

धन्यवाद संग्राम जी :)

ज्योति अळवणी's picture

5 Aug 2019 - 10:09 pm | ज्योति अळवणी

झक्कास. खूप आवडली कथा. भय, रहस्य कथा फारच आवडतात.

आणि तरीही मी मात्र खवीस, चेटकीण, हडळ, भूत, मुंजा वगैरे सर्वांनाच घाबरते हं!

मृणालिनी's picture

7 Aug 2019 - 9:51 am | मृणालिनी

धन्यवाद ज्योती जी!! :)

मृणालिनी's picture

7 Aug 2019 - 9:53 am | मृणालिनी

:D मला सुद्धा आवडतात भयकथा, गूढकथा आणि रहस्यकथा.

जॉनविक्क's picture

7 Aug 2019 - 2:42 pm | जॉनविक्क

टेक्स्ट वेबसेरीजचे जबरा पोटंशियल आहे

मायमराठी's picture

5 Aug 2019 - 10:51 pm | मायमराठी

वा! एकदम वेगळीच धाटणी. सुळे बाहेर काढेपर्यंत काहीच अंदाज आला नव्हता.

मृणालिनी's picture

7 Aug 2019 - 9:51 am | मृणालिनी

धन्यवाद मायमराठीजी!! :)

राघव's picture

6 Aug 2019 - 12:44 am | राघव

मस्त लेखन! :-)

आणि हो, मी सगळ्यांना घाबरतो.. खास करून स्त्री जातीला.. आई, बहीण, मुलगी, बायको, मैत्रीण सगळ्या मातामाय ना! तुम्ही तर स्वतः घाबरवण्यासाठीच लिहिलंय.. का नाही घाबरणार! ;-)

मृणालिनी's picture

7 Aug 2019 - 9:54 am | मृणालिनी

हा.. हा.. हा.... ! धन्यवाद राघव जी :)

सोत्रि's picture

6 Aug 2019 - 10:27 am | सोत्रि

मस्त जमलीय भयकथा, फक्कड!

- (खवीस, चेटकीण, हडळ, भूत, मुंजा यांना न घाबरणारा) सोकाजी

मृणालिनी's picture

7 Aug 2019 - 9:55 am | मृणालिनी

धन्यवाद सोकाजी :)

दुर्गविहारी's picture

7 Aug 2019 - 2:25 pm | दुर्गविहारी

वा ! मस्त लिहीली आहे. बर्‍याच दिवसांनी मि.पा.वर वाचन करतो आहे. हि कथा उघडल्याचे सार्थक झाले. पु.ले.शु.

मृणालिनी's picture

7 Aug 2019 - 11:01 pm | मृणालिनी

धन्यवाद दुर्गविहारीजी. :)

छान लिहिलीय. शेवटपर्यंत अंदाज आला नाही.
पण मग तो जोशीबाईंची शिकार का करत नाही?
मुलीने लाल ड्रेस घातल्यामुळे रक्ताची आठवण होऊन तिला खातो असं आहे का?

मृणालिनी's picture

9 Aug 2019 - 5:00 pm | मृणालिनी

हो. अंदाज अगदी योग्य आहे. अजून एक तर्क निघतो तो म्हणजे तो ओळखीच्या व्यक्तीला काही करत नाही. विशेषत: जी त्याची भूक स्वादिष्ट अन्नाने भागवते. आणि जोशी बाईंकरता वर्दळीच्या ठिकाणी तो सुळे बाहेर कसे काढणार ना.... :)

वर्षा's picture

10 Aug 2019 - 10:31 pm | वर्षा

ओह :)

मराठी कथालेखक's picture

12 Aug 2019 - 11:51 pm | मराठी कथालेखक

छान आहे !!

जॉनविक्क's picture

13 Aug 2019 - 11:48 am | जॉनविक्क

पण कॉमेडी ?

- (विचारात पडलेला) जॉनविक्क

मराठी कथालेखक's picture

13 Aug 2019 - 3:52 pm | मराठी कथालेखक

विनोदी (खुसखुशीत) शैलीत लिहिलं आहे.. अगदी शेवटसुद्धा. तुम्हाला नाही वाटंत ?

जॉनविक्क's picture

13 Aug 2019 - 5:40 pm | जॉनविक्क

मला भीती वाटली. कॉमेडीकड़े लक्ष नाही गेले इतका मी कथानकात गुंतलो होतो

मृणालिनी's picture

14 Aug 2019 - 7:44 am | मृणालिनी

मराठी कथालेखकजी, मनापासून धन्यवाद !! :)