बंगळुरु आणि २५ जुलै २००८

यशोधरा's picture
यशोधरा in जनातलं, मनातलं
27 Jul 2008 - 1:35 pm

शुक्रवार, २५जुलै, २००८. नेहमीप्रमाणेच बंगळुरु सकाळी सकाळी आळोखे पिळोखे देत जागं होत असतं. नेहमीप्रमाणे मी सकाळची फिरुन परत येते, तेह्वा सकाळचे ७-७.१५ होत असतात. सकाळी बंगळुरुमधली हवा एकदम मस्त असते, रात्रीचा पाऊस झाल्याने, हवेत आल्हाददायक गारवा असतो. पुण्याची हवाही अशीच होती कधीतरी... माझ्या मनात विचार आल्याशिवाय रहात नाही...

नेहमीप्रमाणे रस्त्यावरची बरीचशी दुकानं बंदच असतात. इथले दुकानदारही तसे पुण्यातल्या दुकानदारांचे भाऊबंदच!! आरामात साडेनऊ - दहाला आपापली दुकानं उघडणार!! अगदी इस्त्रीवाल्यापासून ते मॉलवाल्यांपर्यंत सगळे जण या परंपरेचं न चुकता पालन करणार... आनेका है तो हमारे टाइमपे आव, नै तो जाव!! तोच माज!! म्हणायला दूधवाला, एक किराण्याचं दुकान अन् एक दोन टपर्‍या सुरु झालेल्या असतात. बाकी, ही माझ्या घराजवळची टपरी एकदम खास!! तिथल्या काssssफीचा सुगंध तुमच्या नाकाशी जवळीक साधता साधता तुमची रसनेंद्रियंही हां हां म्हणता तॄप्त करुन जातो!! तर तिथे एक कॉफी रिचवून होतेच! तिथे काम करणारे एक दोघे जण, तिथेच फरशीवर फतकल मारुन एका लाकडी फळीवर पुढच्या रस्सम् सांबाराची तयारी म्हणून कांदे वगैरे कापण्यात गुंतलेले असतात. अगदी रस्त्यावरच बसलेले असतात, पण, याकडे फारसं लक्ष द्यायचं नसतं! नायतरी पंचतारांकित हाटेलात आतल्या मुदपाकखान्याची काय अवस्था अन् वेवस्था असते कोणास ठाऊक!! आमची अन्नदाती टपरी आम्हांला प्यारी! रस्त्यावर कांदे कापा नाहीतर गल्ल्यामागच्या एवढ्याश्या जागेत!

तर, सकाळी फिरुन परत येताना, हमखास दिसणारी दृश्यं, २५ तारखेलाही तशीच दिसत असतात -घरातल्या गृहिणींची घराबाहेर पाण्याने सडा शिंपण करुन, पाणी ओतून झाडझूड करुन रांगोळ्या काढायची लगबग, सुगंधी मोगर्‍याच्या वेण्यांचे हारे घेऊन विकायला बाहेर पडलेल्या फुलवाल्या, जरा उशीराने सकाळी फिरायला बाहेर पडलेले पेन्शनर्स... शहर हळूहळू जागं होत असतं.... मी राहते त्या भागात, ठराविक क्रमाक्रमानं बंगळुरुला जाग येते. आधी दूधवाले, पेपर टाकणारे लोक, मग फुलवाल्या, एखाद दुसरा भाजीवाला/ली, एक दोन दुकानवाले, तशातच शाळेत जाणारी पिल्लं आपापल्या आयांबरोबर चिवचिवत शाळेच्या बससाठी बाहेर पडतात. सकाळची शिफ्ट असणारे आयटी क्षेत्रातले विंजनेर, मॅनेजरही आपापले लॅपटॉप घेऊन आपापल्या कंपनीने पुरवलेल्या वाहनांची वाट पाहत थांबलेले तरी असतात, किंवा भरधाव वेगाने धावणार्‍या अशा वाहनांपैकी एकात, आपापला जीव मुठीत घेऊन बसून आपापल्या कंपन्यांमधून पोहोचत तरी असतात. बघता बघता बंगलोरच्या दिवसानं बर्‍यापैकी वेग घेतलेला असतो.

मीही नेहेमीप्रमाणे माझी सुमो पकडून नेहमीप्रमाणे हापिसात, शहरापासून दूर पोचते, काम सुरु होतं. एकदा कंपनीच्या आवारात शिरलं की शहराशी तसा काही संपर्क राहात नाही. शुक्रवार म्हणून जरा सगळेच आरामात असतात. रुटीन कामं, मीटींगा सुरु असतात, एक सहकारी नव्या नोकरीत रुजू होणार, त्याचा आमच्या बरोबर शेवटचा दिवस असतो, आता तो जाणारच म्हटल्यावर, मॅनेजरला तो किती कामसू आहे याचा सा़क्षात्कार होऊ घातलेला असतो... आम्हां एकत्र टपोरीगिरी करत असलेल्यांना अस्सल टपोर्‍या चालला म्हणून लै वाईट वाटत असत... त्यातच गप्पा, कामं, अस सुरु असतं. असंच थोडंफार बंगळुरुमध्ये प्रत्येक कंपन्यांमधून सुरु असावं, नाही?

बाकीचं शहरही आता धावायला लागलेलं असतं. बंगळुरु तसं शांतताप्रिय शहर. अस्सल मूळ बंगळुरी माणूस आरामात जगायला प्रथम पसंती देतो, अस माझं मत. कॉफी, इडली, डोसे आणि रस्सम भात असला की दुपारी मस्त ताणून द्यायला त्याला मनापासून आवडतं. आता आयटीसारख्या फैलावलेल्या उद्योगामुळे जी काही हालचाल सुरु आहे, तीच आणि तेवढीच हालचाल. आयटी उद्योग बाहेर न्या, की बहुधा बंगळुरु परत एकदा बर्‍यापैकी पेंगायला लागेल!

आमच्या हापिसातही, माझ्या टीमची चंगळ असते! मीटींगा वगैरे आटोपलेल्या असतात, आणि आता पुढचे २-३ तास सांघिक भावना वगैरे असल्या विषयावर प्रशिक्षण असतं! टीपीची नामी संधी, असं जाणून आम्ही सगळे प्रशि़क्षणात भाग घ्यायला निघतो, आणि, बॉसलाही तिथे पुढचे २-३ तास काय धुमाकूळ चालणार याची पूर्ण कल्पना आलेली असते!! "हरलो बुवा मी", किंवा "मी तर तुमच्यापुढे हातच टेकले बुवा", छाप हसत तो मान हलवतो आणि आम्हांला लै लै आसुरी आनंद होतो!!! मिपावरची :D ही आणि =)) ही बाहुली, बॉसला दाखवावी अशी मला अगदी आतून उर्मी येते, पण माझा मिपाचा ऍक्सेस बंद होईल, हे लक्षात घेऊन मी चाणाक्षपणे गप्प बसते!

प्रशिक्षण मजेत सुरु असतं, आणि, तेवढ्यात प्रशिक्षणात उशीरा सामिल झालेला एक सहकारी बाँबस्फोटाची वार्ता सांगत येतो. सारेजण अवाक् होतात!! हे काय मधेच! कोणाचा विश्वास बसणं कठीण असतं! एव्हाना, सर्वांचे सेल फोन किणकिणायला सुरुवात झालेलीच असते... एक तर शहरापासून दूर असल्याने, खरं तर अजूनपर्यंत शहरात नक्की काय झालंय याचा आम्हालाच काही पत्ता लागलेला नसतो, पण बंगळुरुमधे अन् इतर शहरांतही घरी टी.व्ही. पुढे बसून बातम्या पाहणारे आई वडिल, इतर नातेवाईक, भाऊबंद, इंटरनेटच्या माध्यमातून बातम्या पाहणारी मित्र मंडळी - सगळेच हादरलेले असतात! हळूहळू बातमीच गांभीर्य वाढायला लागतं आणि सर्वांचा मूडही गंभीर होत जातो. प्रशिक्षणात आता फारसं कोणाचं लक्ष नसतं....

प्रशिक्षक तरी म्हणतेच, " इथे बसून आत्ता आपण काही करु शकतोय का?? मग निदान प्रशिक्षण तरी पूर्ण करुयात!" परत एकदा सगळे प्रशिक्षणात मन रमवायचा प्रयत्न करतो... सगळ्यात जास्त माझा सेल वाजत असतो, पहिला फोन, बंगळुरुमधल्याच मैत्रिणीचा असतो, खुशाली विचारायला, आणि मग, घरचा फोन यायच्या आधीही, पुण्या, मुंबईहून सवंगड्यांचे फोन येतात, मी हातीपायी धड आहे ना हे विचारायला! मनात सगळ्या सोबत्यांबद्दल इतका अभिमान अन् माया दाटून येते की सांगता सोय नाही!! बंगळुरुमधल्या अन् पुण्यातल्या इतर मित्र मैत्रिणींचेही फोन, निरोप यायला सुरुवात झालेली असते, सेल वाजतच असतो.

थोडंस वैतागून माझी प्रशिक्षक मला सेलफोन सायलेंट मोडवर ठेव अशी सूचनावजा आज्ञा करते. मी काही म्हणायच्या आत, लग्गेच माझे सहकारी तिची कल्पना मोडीत काढतात. "ती इथली नाही आहे, पुण्याहून तिचे फोन येताहेत, ती ठीक आहे ना, हे पहायला. समजा, सायलेंटवर फोन असताना तिला फोन आल्याचं समजलं नाही, अन् तिने फोन घेतला नाही, तर तिथल्या लोकांना डोक्याला घोर लागेल, तिचा फोन सायलेंटवर नको आत्ता..." आणखी सांघिक भावना काय वेगळी असते?? सगळ्यांचा आग्रह प्रशिक्षिकेलाही मोडवत नाही.

घरी फोन करायचाही मी आटोकाट प्रयत्न करते, तितक्यात सेल नेटवर्क जाम झालेलं असतं! आई, बाबांच्या जीवाला कसा घोर लागला असेल, याची कल्पना करुनच मला रडू फुटायच्या बेतात असतं. वैयक्तिक फोन ऑफिसमधले फोन वापरुन करायचे नाहीत, हा नियम "गया भाडमें" असं म्हणत माझा बॉस मला फोन लावायची सोय करुन देतो. "आरामसे, ठीक तरहसे बात कर..." हे पण सांगतो. घरचे लोक फोन लागत नाही म्हणून चिंतेत असतातच. घरी खुशाली कळवून मीही जरा निर्धास्त होते, आणि माझा आवाज ऐकून घरच्यांचा जीवही भांड्यात पडतो. बाकीच्यांचेही फोन लावून, करुन झालेले असतात, खुशाली विचारुन झालेली असते...

प्रशि़क्षण संपवून आम्ही बाहेर पडतो. कँपसमधे ठिकठिकाणी घोळके उभे राहून जरा दबक्या आवाजात एकच चर्चा करत असतात! बंगळुरुमधे, आपल्या घरांच्या आसपास असं होईल, होऊ शकत, हे पचवायला बहुतेकांना जडच जात असतं... काहीजणांची कुठलं आयटी पार्क आधी उडवतील यावरही चर्चा सुरु झालेली असते. काही जण लवकर घरी गेलेले असतात, त्यांची पिल्लं शाळांमधून सुरक्षित घरी आणायची असतात. जनजीवन तसं विस्कळीत झालेलं असतच, पण त्याहीपेक्षा अचानक बसलेला मानसिक धक्का बर्‍याच जणांसाठी जबरदस्त असतो. रस्त्यांवरही बर्‍याच कंपन्यांनी लोकांना घरी जायला परवानगी दिल्याने भरपूर गर्दी वाढलेली असते.... बंगळुरुमधली वाहनव्यवस्था परत एकदा कोलमडलेली असते, आणि या परिस्थितीमुळे आमची कंपनी आम्हांला नेहमीच्याच वेळेला, म्हणजे रात्री ८:०० नंतर सोडायचा निर्णय घेते.

परत माझ्या जागेवर येऊन बसल्यावर, परत एकदा कामात गुंतवून घेण्याबरोबरच, मिपाकरांच्या, आणि इतर स्नेह्यांच्या खरडी, मेल्स, खुशालीबाबतचे प्रश्न, खुशाली कळवणं सुरुच राहत... नोकरी सोडलेला सहकारी संध्याकाळी ५:०० वाजता जायला निघतो, तसं सगळेच त्याला जपून जा आणि घरी पोचल्याचं कळव, असं कैकदा बजावून सांगतो. तब्बल साडेतीन तासांनी, रात्री ८:३० ला तो घरी पोचतो, आणि तो व्यवस्थित घरी पोहोचला हे ऐकून सगळ्यांनाच हुश्श् होतं!

बंगळुरुमधल्या मिपाकरांनी फोनाफोनी करुन सगळे ठीक आहेत याची खातरजमा केलेली असते. मिपावरही खुशाली विचारलेली असते, मिपामुळे मिळालेल्या मित्रगणांचे व्यनि, खरडी आलेल्या असतात, तेवढयतही आपली काळजी वाटनारी इतकी मंडळी आहेत हे बघून बरं वाटत... हळूहळू हापिसमधेही वातावरणातला ताण सैलावलेला असतो, घरी जायची वेळ जवळ येत असते अन घरी जायचे वेधही लागलेले असतात. एकमेकांना घरी जाताना वीकांताला फारसं बाहेर पडू नका, असं आवर्जून सांगितलं जातं. कंपनीची वाहन व्यवस्थाही बर्‍यापैकी कोलमडलेली असते, शहरात गेलेली वाहनं अडकलेली असतात, निम्मी अधिक परतलेली नसतात..... तरीही सर्वांची घरी जायची सोय ऍडमिन विभागातले कर्मचारी जातीने उभे राहून करतात, घरापर्यंत सोडणं आज शक्य नाही, मुख्य रस्त्यापर्यंत सोडू शकतो, कृपया सहकार्य करा, असं विनवतात. त्यांचाही इलाज नसतो, पुन्हा सर्व सुखरुप जावेत याचंही टेंशन.

परत घरी जाताना, बंगलोर परत एकदा सुरळीत, मार्गाला लागलेलं आहे हे लक्षात येतं. आणि जनतेचा विश्वास टिकून राहण्यासाठी हे खूप आवश्यक असतं. माथेफिरु विघ्नसंतोष्यांच्या नाकावर टीच्चून बंगलोरमधले व्यवहार सुरुच असतात! हे बघून सुद्धा खूप खूप बरं वाटतं... सुरुवातीला इथे आल्यावर ह्या शहराला जितक्या शिव्या घातल्या, त्याच शहराबद्दल आता आत्मियताही वाटायला सुरुवात झाली आहे, हेही तेवढयात लक्षात येत! स्वतःचीच गंम्मत वाटते!

एव्हाना मस्त पाऊस झालेला असतो, रस्ता धुवून निघालेला असतो, वातावरणातही सुखद गारवा आलेला असतो. परत एकदा हा सुखद गार हवा अंगावर झेलत, मुख्य रस्त्यावर उतरून मी पायी पायी घरी जायला निघते. सगळा माझाच एरिया तर असतो, भीती कसली??

नवीन दिवसाला सामोरं जायला बंगलोर परत एकदा रात्रीच्या कुशीत विसावायला सुरुवात करत असतं, रस्त्यांवरची रहदारी तुरळक होत चाललेली असते. मध्यवर्ती भागांमधून मात्र, अजून थोडा वेळ रहदारी सुरु राहणार असते...

बंगळुरु थांबणार नसतं!

राहती जागासमाजलेखअनुभव

प्रतिक्रिया

अभिज्ञ's picture

27 Jul 2008 - 1:52 pm | अभिज्ञ

अगदी असाच अनुभव मलाहि आला.
यशोधरा,तु अतिशय चांगला शब्दांकित केला आहेस.
अभिनंदन.

बाकी,
बंगळुरु थांबणार नसतं!

हे अगदी खरे आहे. (अपवाद-इथे होणारे राजकीय "बंद")

अभिज्ञ.

विद्याधर३१'s picture

27 Jul 2008 - 2:00 pm | विद्याधर३१

ही जिद्द कायमच सर्वत्र दिसते.
पण त्याला अपरिहर्यता म्हणायचे कि काय असे वाटू लागले आहे.

विद्याधर

सखाराम_गटणे™'s picture

27 Jul 2008 - 2:22 pm | सखाराम_गटणे™

लिखाण चांगले आहे. आवडले.
बोम्ब फुटल्यावर आपल्याला जानवते की आपण की पोकळ डोलार्यावर बसलो आहे, कधी ही फुटु शकतो.

अपरिहर्यता, हीच असावी बहुतेक.
मी मुबंई मध्ये १८ वर्ष काढली आहे, लोकांना वेळ नाही आहे, विचार करायला अस्ल्या गोष्टीबाबत.

सखाराम गटणे
आम्ही भुकेल्या माणसांना खोटे अन्न दाखवुन उपाशी ठेवत नाही.

एडिसन's picture

27 Jul 2008 - 6:45 pm | एडिसन

वृत्तांत छान आहे..आवडला.
मिपावरच्या लोकांमधली एकमेकाबद्दलच्या आपुलकीची भावना या निमित्ताने दिसली. आनंद वाटला.

लोकांना वेळ नाही आहे, विचार करायला अस्ल्या गोष्टीबाबत.
मलापण जगण्याची अपरिहार्यताच दिसते. लोकांना घाबरून घरी बसणे परवडणारे नाही, मग ती मुंबई असो वा बंगलोर..
Life is Complex, it has a Real part & an Imaginary part.

मदनबाण's picture

27 Jul 2008 - 2:45 pm | मदनबाण

बाँबस्फोट हे मुंबईकरांना नवीन नाहीत !!
कामावर जाणारा माणुस संध्याकाळी घरी परत येईल याची गॅरेंटी अजिबात नाही..कारण सिनेमागृह्,,बस ,,रेल्वे या पैकी कुठेही आणि कधीही बाँबस्फोट होतात आणि सामान्य नागरीकाचा सहज बळी जातो,,,
कोणाचे वडील्,,कोणाचा एकुलता एक मुलगा,,सर्वच काही क्षणातच आपल्या कुटुंबाला कायमचे दुरावतात !!
रस्त्यावरचे सांडलेल रक्त्,,,फुटलेल्या गाडांच्या काचा,,,हे तर रोजचच झालय असं वाटायला लागलय !!
लगेच सरकार मृतांच्या नातेवायकांना १लाख रुपयांची मदत देऊन मोकळे होते...
मला सांगा १ लाख देऊन गेलेला माणुस परत येणार आहे का ??
काय करायचे आहेत ते पैसे ???चाटायचे आहेत का ते ?
पण या राजकारण्याना फक्त पैशाचीच भाषा कळते हेच आपल्या हिंदूस्थानाच दुर्दैव आहे !!
कधी जाग येणार यांना????
झोपेच सोंग घेणारे कधीच जागे होत नसतात !!!!

बाँबस्फोट होत राहणार लोकं अशीच मरत राहणार..स्त्रीया विधवा आणि अजाण बालके अनाथ होत राहणार ...
कधी बदलणार ही परिस्थीती..??

(व्यथित)
मदनबाण.....

"First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

27 Jul 2008 - 3:22 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अनुभव मस्त शब्दबद्ध झाला आहे आणि आनंदाच्या मोकळ्या श्वासाबरोबर आलेले ''एव्हाना मस्त पाऊस झालेला असतो पासून ते
रहदारी सुरु राहणार असते...'' हे वर्णनही मस्तच !!!

बिपिन कार्यकर्ते's picture

27 Jul 2008 - 3:30 pm | बिपिन कार्यकर्ते

यशोधरा, शब्दांकन छान केले आहे. प्रत्यक्ष तुमच्या बरोबर असल्यासारखे वाटले.

बिपिन.

पिवळा डांबिस's picture

28 Jul 2008 - 12:52 am | पिवळा डांबिस

शब्दांकन छान केले आहे. प्रत्यक्ष तुमच्या बरोबर असल्यासारखे वाटले.
असेच म्हणतो...

शितल's picture

27 Jul 2008 - 4:51 pm | शितल

"ती इथली नाही आहे, पुण्याहून तिचे फोन येताहेत, ती ठीक आहे ना, हे पहायला. समजा, सायलेंटवर फोन असताना तिला फोन आल्याचं समजलं नाही, अन् तिने फोन घेतला नाही, तर तिथल्या लोकांना डोक्याला घोर लागेल, तिचा फोन सायलेंटवर नको आत्ता..." आणखी सांघिक भावना काय वेगळी असते??
हे तर एकदम मनाला पटलले.

खुप छान लिहिले आहेस :)

प्रियाली's picture

27 Jul 2008 - 4:58 pm | प्रियाली

आवडला. नेमक्या शब्दांत वृत्तांत लिहिला आहे.

विसोबा खेचर's picture

27 Jul 2008 - 5:14 pm | विसोबा खेचर

बंगळुरुमधल्या मिपाकरांनी फोनाफोनी करुन सगळे ठीक आहेत याची खातरजमा केलेली असते. मिपावरही खुशाली विचारलेली असते, मिपामुळे मिळालेल्या मित्रगणांचे व्यनि, खरडी आलेल्या असतात, तेवढयतही आपली काळजी वाटनारी इतकी मंडळी आहेत हे बघून बरं वाटत...

वा! सुंदर प्रकटन!

प्रियालीशी सहमत...

तात्या.

डॉ.प्रसाद दाढे's picture

27 Jul 2008 - 7:02 pm | डॉ.प्रसाद दाढे

सरळ, साध्या शब्दा॑त केलेले अनुभवकथन आवडले.
आणखी लिहा म्हणणार नाही (म्हणजे असा बॉम्बस्फोटाचा अनुभव तुम्हा॑ला परत येऊ नये अशी इच्छा!)

मेघना भुस्कुटे's picture

27 Jul 2008 - 8:37 pm | मेघना भुस्कुटे

यशोधरा, सुंदर लिहिलं आहेस. पण खरं सांगू, मला काही अद्याप या शहराबद्दल आत्मीयता वाटायला लागलेली नाही. हा या शहराचा स्वभाव, नुसताच आमच्या नशिबात नसलेला योग की माझा हट्टीपणा.. कुणास ठाऊक. पण एक मात्र खरं, बेंगलोरच काय, अहमदाबाद आणि सुरत आणि सगळंच... असंच न थांबता चालू राहायला हवं. आपण आपलं दैनंदिन आयुष्य असल्या भ्याड लोकांना घाबरून बंद करायचं नाहीय... आपला तोच खारीचा वाटा...

यशोधरा's picture

28 Jul 2008 - 6:36 am | यशोधरा

अभिज्ञ, विद्याधर३१, गटणे, एडिसन, मदनबाण, बिरुटेसर, कार्यकर्ते, पिडांकाका, शीतल, प्रियाली, तात्या, डॉ. साहेब, मेघना तुम्हां सार्‍यांना लेखाला प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद.

संदीप चित्रे's picture

28 Jul 2008 - 7:41 am | संदीप चित्रे

लिहिलं आहेस यशोधरा... बाकी विषय असा आहे की प्रतिसादात अजून काय लिहिणे ?
पोकळ डोलारा आम्ही इथे ११ सप्टेंबरला अनुभवलाय !!!
--------------------------
www.atakmatak.blogspot.com

आनंदयात्री's picture

28 Jul 2008 - 11:58 am | आनंदयात्री

सुंदर प्रकटन !

नंदन's picture

28 Jul 2008 - 12:06 pm | नंदन

असेच म्हणतो, लेख आवडला.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

स्वाती दिनेश's picture

28 Jul 2008 - 12:26 pm | स्वाती दिनेश

सरळ, साध्या शब्दा॑त केलेले अनुभवकथन आवडले.
असेच म्हणते.
स्वाती

मनस्वी's picture

28 Jul 2008 - 1:10 pm | मनस्वी

'त्या' वेळेत अनुभवलेले मनातील चढ-उतार छान वर्णन केलेस.

थोडंस वैतागून माझी प्रशिक्षक मला सेलफोन सायलेंट मोडवर ठेव अशी सूचनावजा आज्ञा करते. मी काही म्हणायच्या आत, लग्गेच माझे सहकारी तिची कल्पना मोडीत काढतात. "ती इथली नाही आहे, पुण्याहून तिचे फोन येताहेत, ती ठीक आहे ना, हे पहायला. समजा, सायलेंटवर फोन असताना तिला फोन आल्याचं समजलं नाही, अन् तिने फोन घेतला नाही, तर तिथल्या लोकांना डोक्याला घोर लागेल, तिचा फोन सायलेंटवर नको आत्ता..." आणखी सांघिक भावना काय वेगळी असते?? सगळ्यांचा आग्रह प्रशिक्षिकेलाही मोडवत नाही.

हे आवडलं.

मनस्वी
* केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *

यशोधरा's picture

28 Jul 2008 - 7:58 pm | यशोधरा

संदीप, आनंदयात्री, नंदन, स्वातीताई, मनस्वी तुमचेही खूप आभार...

चौथा कोनाडा's picture

18 Jul 2019 - 4:30 pm | चौथा कोनाडा

वॉव ! कसलं सुरेख लिहिलंय ! जणू एखादी सुंदर शॉर्टफिल्म पाहतोय असं वाटून गेलं !

सकाळची सुरुवात, शहराची हळूहळू वाढती गती, ऑफिस, सहकारी अन शेवटी बाँबस्फोटाची वार्ता, वातावरणात तणाव ते हळूहळू सुरळीत होत जाणारं शहर आणि रात्री घरी जाताना मनाला आलेली निश्चितीं ... सगळंच क्लासिक !

(मिपा नवीन असताना हे वाचलं होतं, त्यावेळी मिपाचा सभासद नव्हतो, पण, मिपावर खुप सुंदर सुंदर वाचलं. त्यातला हा एक लेख !
( सभासद २०१४ ला झालो)
आज परत वाचण्यात आला, प्रतिसाद टंकला गेलाच !

क्या बात है ! क्लासिक !

अकरा वर्षांपूर्वीची घटना! परत एकदा आठवलं सगळं.
धन्यवाद, वाचल्याबद्दल आणि आवर्जून प्रतिसाद लिहिल्याबद्दल.

चौथा कोनाडा's picture

20 Jul 2019 - 5:47 pm | चौथा कोनाडा

+१

Namokar's picture

18 Jul 2019 - 5:39 pm | Namokar

छान लिहिलय

श्वेता२४'s picture

18 Jul 2019 - 5:59 pm | श्वेता२४

हा धागा वर काढलात. छान लिहीलंय.

त्या दिवसाचे सुंदर शब्दचित्र!!

मुक्त विहारि's picture

20 Jul 2019 - 11:35 pm | मुक्त विहारि

मस्त वर्णन. ..

नाखु's picture

21 Jul 2019 - 2:39 am | नाखु

लिहिले आहे.

मुंबईत राम नायक यांची हत्या झाली तेंव्हा तिथल्याच परिसरातील हापिसात होतो

चौथा कोनाडा's picture

23 Jul 2019 - 10:44 pm | चौथा कोनाडा

रामदास नायक ना ?

तुमचा अनुभवाबद्दल सविस्तर वाचायला आवडेल !

उपेक्षित's picture

21 Jul 2019 - 6:42 pm | उपेक्षित

अप्रतिम मनोगत यशोताई. पण अर्थात असले काही लिहायची तुमच्यावर परत वेळ न येवो.

सुधीर कांदळकर's picture

22 Jul 2019 - 6:29 am | सुधीर कांदळकर

पाहिले नाही आणि `चित्रवाणीवर अजून बातमी कशी काय नाही असे मनात आले. नंतर साल नीट पाहिले. मस्त वेगवान, ओघवते, चित्रदर्शी लेखन आवडले.

परंतु एक नवल वाटते की असे काही घडते तेव्हा बातमी कळल्याबरोबर आपण घरच्यांना सुखरूप असल्याचे समस का नाही पाठवत.

यशोधरा's picture

22 Jul 2019 - 8:32 am | यशोधरा

तेव्हा घरी ज्येष्ठ नागरिक सेलफोन वापरत नव्हते. जमणार नाहीच, ही धारणा होती. :) बातमी समजली, तसे मी घरी फोन लावायला सातत्याने प्रयत्न करतच होते.