वाई-मंत्र

मी_आहे_ना's picture
मी_आहे_ना in जनातलं, मनातलं
19 Jul 2019 - 3:14 pm

(चेपुवर पूर्वप्रकाशित. सातारा जिल्ह्यातल्या वाई सारख्या टुमदार गावात गेलेलं बालपण शब्दांकित करण्याचा छोटासा प्रयत्न.)

मंडळी , "वाईमंत्र" ही लेखमाला माझ्या आवाक्यातील आठवणींनुसार लिहिली आहे. आमच्या बालवाडी ते ४थीच्या शाळेचा व्हॉट्सअ‍ॅप गृप निमित्त ठरला आणि आठवणींची एक मालिकाच बनत गेली. ती एकत्र करुन इथे पोस्ट करतोय. कदाचित इतरांनाही त्यांच्या लहानपणीचा प्रवास आठवेल.

वाईमंत्र-१

'वाई' - हा शब्दच जणू एखाद्या मंत्रासारखा. आणि आपण सगळे भाग्यवान की आपल्याला कोणाला तो वेगळा शिकायची गरजच नाही, तो आपल्याला जन्मत:च येतो :)

तर अश्या ह्या वाई मधलं १९८० चं दशक. देशभरात 'मारुती' च्या गाड्या येत होत्या तश्या वाई मधेही. म्हणजे ह्या आधीही वाई मध्ये गाड्या होत्या, नाही असं नाही. जोगांची इंपाला असो, दातार डॉक्टरांची फियाट असो, किंवा विश्वकोषाच्या तर्कतीर्थांची अँबेसेडर. पण 'मारुती' गाड्यांबद्दल सगळ्यांनाच एक अप्रूप होतं. डॉ. अभ्यंकरांची चॉकलेटी 'ओमनी' किंवा अजून कोणाची लाल चुटुक 'मारुती ८००' रस्त्यावरून फिरायचा तो काळ, आणि आमचीही गाडी तेव्हा आयुष्याच्या पहिल्या शाळेत दाखल झाली.

"महिला स्नेहसंवर्धक समाज बालक मंदिर" - वाईच्या महागणपतीला (किंवा आपल्या लाडक्या 'ढोल्या' गणपतीला) नमस्कार करून त्याला लागूनच असलेल्या ह्या शाळेत आपल्या सगळ्यांना दाखल (किंवा रवानगीही म्हणा) करण्यात आले, आणि सुरु झाले आपले 'मंतरलेले' दिवस.

बापट बाई आणि अष्टपुत्रे बाई शाळेच्या दारात उभ्या असायच्या - अजूनही आठवतंय मला त्यांच्याकडे सुपूर्द करून ऑफिसला जाताना, मी तर रडायचोच पण आईही बिचारी कावरी-बावरी व्हायची. आजोबा तर काठी टेकत टेकत कधी शाळेच्या बाहेर येऊन बसलेलेही दिसायचे. हळू हळू रुळत गेलो - भूषण, अमित, मंदार, विशाल - सवंगडी बनू लागले, घरून आणलेला डबा संपवायला लागलो, खिश्याला पिन ने बांधलेल्या रुमालाला नाक पुसायला लागलो - आपल्या सगळ्यांच्या बाकी मदतीसाठी सुलाबाई आणि सीताबाई होत्याच! काही गोष्टी, काही गाणी शिकत, अक्षरओळख करत, रमत गमत "बालवाडी" संपली आणि वेळ झाली "प्राथमिक" शाळेत दाखल व्हायची

वाईमंत्र -२

साधारण १९८६ चा काळ, भारतीय क्रिकेट संघाने नुकतेच ऑस्ट्रेलिया एम-सी-जी ला पाकिस्तानला नमवत "वर्ल्ड चॅम्पियनशिप" जिंकलेली आणि रवी शास्त्रीला "ऑडी" कार मिळालेली. त्या राखाडी "ऑडी" तून (किंवा गाडी वरून) संपूर्ण भारतीय संघानी मेलबॉर्न क्रिकेट ग्राऊंडला मारलेली फेरी अजूनही आठवतेय. (हे सर्व अर्थात, त्या खाट-खाट वाल्या कृष्णधवल क्राऊन टीव्हीवर बघितलेले) राजीव गांधीही राष्ट्रीय राजकारणात स्थिरावलेले.

.. आणि आम्ही इकडे , महिला मंडळ बालक मंदिर समोर असणाऱ्या "महिला स्नेहसंवर्धक समाज प्राथमिक विद्यामंदिर, वाई" मध्ये दाखल झालो. कुलकर्णी बाई (ब तुकडी) आणि चितळे बाई (अ तुकडी). अर्थात, ह्या प्राथमिक शाळेबद्दल आधीपासून कुतूहल तर होतंच. बालवाडी लवकर सुटायची तेव्हा ह्या प्राथमिक शाळेतली मुलं निलगिरीखाली खेळायला किंवा चिंचेखाली सु-सु करायला आलेली दिसायची. "त्यांना कसलं भारी, बाहेर खेळायला मिळतंय" असा सूप्त विचार कधी कधी मनातलं कुतूहल जागं ठेवायचा.

तर ७ जून १९८६, आमची रवानगी "१ली ब" मध्ये, कुलकर्णी बाईंच्या वर्गात. मुख्याध्यापिका अष्टपुत्रे बाईंच्या केबिन समोरचा वर्ग. बालवाडी पेक्षा थोडं वेगळा वातावरण , अभ्यासात पाटीवर लिखाणाचा समावेश , ह्या सगळ्यात सरावयाला २-३ महिने गेले. शिवाय इथे बसायला बस्करांच्या ओळी, एक मुलगा, एक मुलगी असा एकाआड-एक बसायचा क्रम. (मला आठवतंय, पहिलीतल्या सर्वांना कुठलेतरी डॉ. कसलासा बूस्टर डोस द्यायला आलेले. "अ" तुकडीचा आधी झालेला आणि दुसऱ्या दिवशी आमच्या "ब" तुकडीतल्यांना इंजेक्शन देणार होते, तेव्हा "अ" तुकडीचे पश्या, बाऱ्या आम्हाला चिडवायला आले आणि त्यांना आमच्या वर्गातल्या मुलांपेक्षा गौरी , पल्लवी, गजाला ह्या मुलींनीच हुसकावून लावलेलं - त्यांचे मनापासून धन्यवाद - हीहीही)

कुलकर्णी बाई बापट बाईंइतक्याच प्रेमळ (आणि 'अ' तुकडीच्या चितळे बाईंपेक्षा थोड्या कमी कठोर) त्यामुळे रुळायला फार वेळ नाही गेला. बाहेरच्या निलगिरीच्या सुगंधाने आतलं वातावरण आल्हाददायक असे. पाटीवर अक्षरं, शब्द, पाढे लिहायला शिकत गेलो. डबा लवकर संपवून बाहेर खेळायला सगळे पळायचे. दसऱ्याला पाटीवर "९" आकड्यातुन सरस्वतीचे चित्र काढून त्याची पूजा व्हावयाची. दिवाळीच्या सुट्टीनंतर सुरु व्हायची स्नेहसंमेलनाची तयारी, नगरपालिकेच्या ग्राउंडवर आपल्या शाळेचं स्नेहसंमेलन भरायचं. कोणाचा नाच, कोणाचं गाणं ह्याची तयारी आपल्या बाई कश्या करून घेत ते त्याच जाणोत. ह्या शाळेचं अजून एक अप्रूप म्हणजे "दादा जोशी" - ह्यांच्या हस्ते शाळे-बाहेरच्या (रस्त्यावरच्या) फळ्यावर "पहिले ३" मध्ये आपलंही नाव असावं, ह्यासाठी धडपड करत करत पहिली संपली. आणि १ मे १९८७ ला बाहेरच्या फळ्यावर नावं झळकली

१ली ब -

१) भूषण दीक्षित

२) अश्विनी भंडारी

३) प्रसाद अवचट

वाईमंत्र - ३

१९८६-८७ - राजीव गांधी राजकारणात स्थिरावल्यावर त्यांनी तंत्रज्ञानाच्या प्रगतीच्या दृष्टीनं पावलं उचलायला सुरुवात केली होती. त्याचाच एक भाग होता पहिला "डेल्ही ऑटो एक्स्पो" जो की त्या काळातल्या भारतीय नियोजनाचा एक वाखाणण्याजोगा प्रयत्न होता. इकडे भारतीय क्रिकेट जगतातही उत्साह होता, कारण १९८७ च्या विश्वचषकाचे भारत-पाकिस्तान मिळून यजमान बनले होते (आणि ही स्पर्धा प्रथमच इंग्लंड सोडून दुसरीकडे कुठेतरी होत होती)

.. आणि इकडे आमच्या आयुष्याच्या गाडीनं "दुसरी ब" चा गियर टाकला. फळ्यावर अस्मादिकांचेही नाव लागल्यानं नवीन दप्तर, नवीन गणवेश हे तर होतेच. त्या दप्तरात आता भर पडली ती एका सुरेख- सुगंधित गोष्टीची. "वही" - जून महिन्यात अख्या वर्गात नव्या कोऱ्या वहीचा काय सुगंध दरवळे. त्या दुरेघी वहीवर बाराखडी, मुळाक्षरं लिहायला इतकी मजा येई, असं वाटे कि जणू प्रत्येक जणच सुनील गावस्कर झालाय आणि कव्हर ड्रॅइव्ह मारतोय, स्मूथ...

त्यात मला अजून एक खास गोष्ट मिळालेली, एक लाल रंगाची कंपास बॉक्स जिच्या झाकणावर १-१० अंक लिहिलेले आणि स्टेन्सिल सारखी रचना होती, ज्यामुळे ते गिरवता येत असत. एव्हाना वर्गात बसण्याचा क्रमही निश्चित झालेला. फळ्याकडे तोंड करून उजवीकडच्या ओळीत पहिला श्रीपाद, मग अर्चना, मी, पल्लवी, अभ्या इ.. बाजूच्या रांगेत बहुधा इब्ब्या, भूषणा गोरे, संत्या पवार इ. मंडळी होती. "दुसरी ब" पहिलीपेक्षा जास्त "भारी" वर्ग होता कारण त्याच्या खिडकीतून निलगिरीचे झाड आणि पुढे रस्ताही दिसायचा. धोम ची एसटी गेली कि मधल्या सुट्टीची चाहूल लागायची. तेव्हा निलगिरीपेक्षा वर्गातच सगळ्यांच्या पोटात जास्त कावळे ओरडत असत.

दुसरीमध्ये अजून एक गोष्ट बदलली, ती म्हणजे वार्षिक क्रीडा स्पर्धा महागणपती शेजारच्या काशीविश्वेश्वर मंदिरात घेण्याची प्रथा सुरु झाली (अर्थात हे आपल्या पथ्यावरच पडले, कारण जेव्हा इतरांच्या स्पर्धा सुरु असत तेव्हा त्या "रणमर्द गणेश मंडळाच्या" गरूड वाल्या मंडपात, नंदी च्या आजूबाजूला शिवापाणी , विषामृत इ. मध्ये ते दिवस कसे संपायचे कळतच नसे.) चमचा लिंबू, शेंगदाणे उंच उडवून खाणे अश्या लिंबूटिंबू स्पर्धाच असत, तरी त्यातही जग जिंकल्याचा आनंद असें. पण मला ह्यात कधी बक्षीस मिळाल्याचं आठवत नाही.

.. दरम्यान, तिकडे मुंबईला भारतीय क्रिकेट संघाचं पुनः:शच जगज्जेते बनण्याचं स्वप्न इंग्लंडने धुळीस मिळवलं आणि भारत १९८७ च्या विश्वचषकातून बाहेर पडला. पण ह्यापेक्षाही जास्त दुःखदायक गोष्ट घडली ती म्हणजे किशोर कुमारचे (माझ्या सगळ्यात जास्त आवडत्या गायकाचे) निधन. अर्थात तेव्हा वयाच्या ७व्या-८व्या वर्षी काय कळणार म्हणा, पण तरीही त्या काळीं दूरदर्शन वर लागणाऱ्या "चलती का नाम गाडी", "झुमरू" इ. मुळे माहिती होताच आणि "मेरे सपनोंकी रानी" किंवा "खैके पान बनारस वाला" इ. गाणी रेडियो मुळे मुखोद्गतही झालेली होती. असो, "मि. इंडिया" त त्यानी सांगितलेलंच "जिंदगी कि यही रीत हैं..."

वाईमंत्र -४

१९८८-८९, तिकडे कुठेतरी अमेरिका आणि युरोपला माहिती आदान-प्रदानासाठी जोडणाऱ्या "इंटरनेट" , "वर्ल्ड वाईड वेब" वगैरे चर्चा सुरु झालेल्या. भारताच्या उदात्त धोरणासाठीही पोषक वातावरण म्हणून राजीव गांधींच्या हाताशी "नीती आयोगाचे अध्यक्ष" मनमोहन सिंग रुजू झाले होते.

.. आणि इकडे वाई मध्ये "रंगोली"च्या सुरेल गीतांनी आपले रविवार सुरु होत. कधी एकदा ९ पर्यंत सगळं आवरतोय आणि टीव्ही समोर बसतोय असं व्हायचं, कारण "रामायण". घरा-घरांत आजी-आजोबांपासून नातवंडांपर्यंत सगळ्यांना टीव्हीसमोर एका अदृश्य दोराने बांधून, खिळवून ठेवणारा कार्यक्रम. ह्या "रामायणा"तले रंगीबेरंगी बाण बघून आमच्या ३री मधल्या चिन्या (साकेत), प-या, चेत्या, नाग्या ह्यांची सुपीक डोकी चालत असत आणि अश्याच कागदी बाणांची देवाण-घेवाण वर्गांमध्ये , काशी-विश्वेश्वरमध्ये होत असे.

शाहरुख खानची भूमिका असलेली "फौजी" मालिका बघून संचारलेला उत्साह, तेनाली रामन च्या गोष्टी बघून विचारांना मिळणारी चालना ह्यामध्ये आमची "तिसरी ब" ची घोडदौड सुरु होती.

दूरदर्शन वर बघितलेल्या "He-Man" सारखे , लाकडी फूटपट्ट्या पाठीला लावून शाळेच्या व्हरांड्यात, जिन्यावर पळत असू. इब्ब्याची लोखंडी पट्टी असल्यानं वाचायची पण सगळेच तेवढे भाग्यवान नसत, काही पट्ट्या तर मुलींनीही तोडलेल्या स्मरणात आहेत. घरी नवीन आणलेल्या बल्ब चे कव्हर वापरून "शेहेनशाह" बनत असू. नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये "वार्षिक सहल" हे आपल्या शाळेचं (अर्थात सगळ्याच शाळांचे) खास आकर्षण. मला आठवतंय ३रीत असताना देहू-आळंदीला सहल गेलेली. तेव्हाच्या सहलींमध्ये सर्रास जेवणाच्या डब्यात दिसणारा पदार्थ म्हणजे कोरडी बटाटा भाजी-पोळी किंवा तिखटाच्या पुऱ्या.

जानेवारीच्या सुमारास स्नेहसंमेलन (किंवा "विविधगुणदर्शन") नगरपालिकेच्या मैदानात भरवलं जाई. ३रीमध्ये ह्या कार्यक्रमाच्या "स्वागत गीता"ची जबाबदारी माझ्याकडे होती, तेव्हा "मान्यवर"ऐवजी चुकून "मानेवर" म्हणालेलो आणि मागे विंगेतून कुलकर्णी बाईंनी "असू दे पुढे बोल" अशी केलेली सूचना अजूनही आठवतेय.

तिसरीपर्यंत सगळ्यांची घट्ट मैत्री झालेली होती. वेगवेगळ्या स्वभावांची, सवयीची, वेगवेगळ्या आवडी निवडी असणारी मुले होती. असाच एकीचा व्यावसायिक पैलूही दृष्टीस पडला जेव्हा तिने हिरे विकायला आणले. मी षटकोनी आकाराच्या २० पैश्यांची ३ नाणी देऊन ६ हिरे घेतलेले आणि घरी जाऊन ते अभिमानाने सांगितलं तर बहिणींनी वेड्यातच काढलेलं. दुसऱ्या दिवशी शाळेत गेलो तर बाकीचेही "वेड्यात" निघालेले होते. अश्या सगळ्याच वेड्यांना बाईंनी उभं केलं आणि मिश्कीलपणे झाडलं. तेव्हा कळलं कि ते हिरे म्हणजे बुलेटच्या तुटलेल्या दिव्याच्या काचा होत्या. पण काहीही असो, तिचा तो आत्मविश्वास, आणि convincing तंत्र नक्कीच दाद देण्यासारखं होतं.

तिसरीत अजून एक लक्षात राहण्यासारखी गोष्ट म्हणजे नेमक्या माझ्या वाढदिवसाला कुलकर्णी बाई रजेवर आणि "अ" आणि "ब" तुकडी एकत्र केलेली. मी तर फक्त आमच्याच वर्गातल्या मुलांना वाटायला चॉकलेट आणलेली. वर्ग एकत्र केलेले बघून हिरमुसून गेलो, तेव्हा चितळे बाईंनी बोलावलं. त्यांनी चॉकलेट्स बघितली आणि त्या "कॉफी ब्रेक" (कॉफी बाईट नव्हे) ब्रेक करुन प्रत्येकी निम्म्या निम्म्या वाटल्या. तेव्हा पासून चितळे बाईही कुलकर्णी बाईंइतक्याच लाडक्या झाल्या.

अश्याच ३रीच्या ताला-सुरात अनिल अन माधुरीचे "एक दो तीन" किंवा "रमपम्पाम रमपम्पाम रपंपापम रमपम ... माय नेम इज लखन"वर थिरकता थिरकता "तिसरी विसरी" होण्याची वेळ जवळ आली...

वाईमंत्र -५

१९८९ : १४ फेब्रुवारी १९८९, अमेरिकेने पहिला "जी पी एस" उपग्रह अवकाशात सोडला. तिकडे दुसरीकडे "सोव्हियेत युद्धाच्या" बातम्याही येत असत. दूरदर्शन वर ७ च्या बातम्या किंवा ८:३० चे "हिंदी समाचार" बघताना हे सगळं कळायचं. अनंत भावे म्हणून एक दाढीवाले गृहस्थ ७च्या बातम्या द्यायला आले कि माझी बत्ती गुल, त्यांच्या दाढीची इतकी भीती वाटे कि "भावे बडीशेप" चेही नाव मी घरात घेऊ देत नसे.

रविवारच्या सकाळी "रामायण" / "महाभारत" आणि "स्टार ट्रेक"/"मोगली" इ.ने व्यापलेल्या तश्या संध्याकाळी "भारत एक खोज", "सुरभी" वगैरे. चौकोनी आकाराचे ५ पैसे आणि फुलाच्या आकाराचे १० पैसे असे १५ पैसे पोस्टात देऊन पोस्टकार्ड मिळवायचे आणि सुरभी मध्ये विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पाठवायची ह्याचा छंद जडलेला. शिवाय, रिकाम्या काड्यापेट्या गोळा करण्याचा किडा होताच.

मे १९८९ मध्ये आमच्या आधीच्या बॅचचा स्कॉलरशिप चा निकाल लागला, आणि जून मध्ये ४थी ची शाळा सुरु होताच आमचेही स्कॉलरशिपचे वर्ग सुरु झाले. महिन्यातल्या २ रविवारी ते वर्ग भरत आणि "बुद्धिमत्ता"साठी मोठ्या कुलकर्णी बाईं (मधली आली, कन्या शाळेच्या अलीकडे राहणाऱ्या एस.पी.के.) कडे जात असू.

नेहमीची शाळा तर सुरु होतीच. १५ ऑगस्ट चे झेंडावंदन शाळेच्या गच्चीवर होत असे. साधारण त्याच सुमारास "श्रावण" असला कि वर्षा सहल असे, पायी. अशी वर्षा सहल ३री मध्ये सिद्धनाथवाडी मधल्या रोकडोबा ला गेलेली तर ४थी मध्ये "भद्रेश्वर" ला. तेव्हा भद्रेश्वरहून येताना वाटेतच होतं म्हणून गुलजार शेख च्या घरी गेल्याचेही आठवतंय.

पहिल्या सहामाहीतच होतं "विज्ञान प्रदर्शन" तेव्हा माझ्याकडे असलेला विषय म्हणजे "रडार" (म्हणूनच वर 'जी पी एस' चा उल्लेख इतक्या आत्मीयतेने केलेला आहे, खिक) तेव्हाच हे जग दिसतंय तेवढं छोटं नाही आणि ह्याची व्याप्ती खूप मोठी आहे ह्याची कल्पना येऊ लागली आणि महिला मंडळ (म्हणजेच म.स्ने.स.प्रा.वि.मं. - महिला स्नेहसंवर्धक समाज प्राथमिक विद्यामवाई), वाई) शाळेच्या कवचातून बाहेर पडावं लागणार ह्याची जाणीव करून देत नोव्हेंबर १९८९ मध्ये, ४थी ची सहामाही परीक्षा संपली.

© प्रसाद अवचट

वाईमंत्र -६

१९८९ - ९० - "... के आया मौसम दोSस्ती का... " , "कबूतर जा जा जा" - मैने प्यार किया - शेजारी माझा मित्र मंग्या रहायचा, त्यांच्याकडे व्हिडियोकॉनचा नवीन रंगीत TV घेतलेला आणि त्याच्यावर शेजार-पाजारच्या सगळ्यांनी बघितलेल्या त्या चित्रपटातील हे गीत. अर्थातच त्या काळी केवळ चित्रपटांचा आस्वादच नव्हे तर कोजागिरी, होळी असे सणही आजूबाजूच्या कुटुंबांसोबत साजरे होत.

शाळेतही ४थीच्या वर्गात असलो तरी इतर वर्गांच्या बाईही माहिती झालेल्या. उंडाळे बाई, पार्टे बाई, किरवे बाई - आमच्या वर्गात एक स्मिता किरवे होती, तिची आई. वर्गात बस्करांची मारामारी आणि त्यापासून स्वतःचा बचाव ह्यासाठी कोणी काहीही क्लृप्त्या लढवत असे. असाच एकदा मी विशल्यापासून स्वतःला वाचवताना ४थी ब च्या वर्गाचं दार ढकललं आणि अनवधानानं तिचा हात त्यात सापडला. झालं... गोष्ट अगदी मुख्याध्यापिकांपर्यंत पोहोचली. तिच्या हाताला मलमपट्टी झाली आणि माझी खरडपट्टी सुरु झाली. झाल्या प्रकाराबद्दल मी (तेव्हाही आणि आताही) दिलगीर होतोच, तिचे आणि माझे नशीबच की जखम खोलवर नव्हती. पण किरवे बाईंचा संताप (जो कि एक आई म्हणून साहजिकच होता) बघता, कुलकर्णी बाईंना त्यांच्या लाडक्या विद्यार्थ्याला शिक्षा करणे क्रमप्राप्त होतें. सगळ्या वर्गासमोर पट्टीचे पाच फटके, अशी शिक्षा भोगून राहिलेला दिवस कसा बसा संपवला. आयुष्यात जे काही थोडे फार फटके खाल्लेत त्यापैकी हे पहिलेच. शाळा सुटल्यावर घरी निघालो, आई घ्यायला आलेली आणि जाताना घोटावडेकरांच्या गिरणीत दळण घ्यायला थांबलो. आईला काही सांगितलं नव्हतंच. समोरून बाई घरी जाताना आम्हाला बघून थांबल्या आणि त्यांनीच आईला घडलेला किस्सा सांगितला,आणि हेही अजीजीने समजावले कि "दत्ताला झाल्या प्रकारची शिक्षा दिलेली आहे तुम्ही अजून काही शिक्षा करू नका".. वर्गात दाबून ठेवलेलं रडू तिथे, रस्त्यात माझ्या पापण्या चुकवून खाली पडलं...

तिकडे मुंबईच्या सचिन तेंडुलकर चे भारतीय संघात पदार्पण झालेले आणि इकडे विश्वकोषासमोर किंवा निमजग्याजवळच्या क्रिकेट मध्ये आमचे. आमच्यापेक्षा मोठे असलेल्या मंग्या, ऋष्या, हेम्या, अमोल ह्यांच्याशीही ह्या क्रिकेटमुळे गट्टी होऊ लागली. "बोरकुट"चे व्यसन ह्यातल्याच कोणापासून तरी लागलेलं (अर्थात त्यात फक्त कुटलेली बोरं असत) नदीवर "डालडा"चा पिवळा डब्बा बांधून पोहायला शिकवणारीही हीच मंडळी.

तिसरीच्या सहामाहीपासून "ब" तुकडीतला माझा नंबर वर आलेला - भूषण पहिला आणि मी दुसरा - हे समीकरण ४थी पर्यंतही कायम होतं. "अ" तुकडीमध्ये विवेक, तृप्ती, आशिष ह्यांच्यात चुरस असे. दर वर्षीच्या १ मे ला "गुलाबी" रंगाचे प्रगतीपुस्तक मिळाले की ते घेऊन ढोल्या गणपतीला आणि काशीविश्वेश्वराला जाण्याचा नित्यक्रम.

काशीविश्वेश्वरासारखेच अजून एक आवडते शंकराचे मंदिर म्हणजे "बनेश्वर" - ४थी ची सहल बनेश्वर, सारसबाग, शनिवारवाडा अशी फिरून आलेली. लाल चड्डीतल्या मुलांची किंवा लाल फ्रॉकातल्या मुलींची २-२- च्या जोडीने बाहेरगावी फिरण्याची ती शेवटची वेळ.

ती जशी शेवटची नांदी तशीच वार्षिक विविधगुणदर्शनातलीही शाळेसाठीची शेवटची नांदी - जानेवारी १९९०. तेव्हा गॅदरिंग मध्ये काय केलेलं आठवत नाही, पण भारीच काहीतरी होतं. साधारण फेब्रुवारी-मार्च १९९० मध्ये शाळेच्या दुसऱ्या कुठल्याश्या कार्यक्रमासाठी आम्हा एक डझनभर मुलांचा एक छोटा कार्यक्रम बसवलेला - प्रत्येक जण एक एक पान बनलेला आणि मी होतो पिंपळ - "मी आहे मी आहे पिंपळपान, माझा आकार आहे छान, माझी महती आहे महान, माझ्याच वृक्षाखाली तर बुद्धांना मिळाले ज्ञान" - त्या पिंपळासारख्याच नक्षीदार आठवणी हृदयात खोलवर रुतून बसलेल्या आहेत आणि त्यातल्याच काही एकत्र गुंफून आपल्या सगळ्यांसाठी ही लेखमाला सादर केली.

-समाप्त-

© प्रसाद अवचट

वावरसंस्कृतीबालकथामुक्तकजीवनमानप्रकटन

प्रतिक्रिया

कंजूस's picture

19 Jul 2019 - 8:40 pm | कंजूस

छानच.

मी_आहे_ना's picture

20 Jul 2019 - 7:49 am | मी_आहे_ना

धन्यवाद

चौकटराजा's picture

19 Jul 2019 - 9:32 pm | चौकटराजा

तुम्ही जोग कंत्राटदार यांची इंपाला म्हणत असाल तर ती मध्ये मी बसलेलो नाही . पण वाईत १९७६ तर १९८० या काळात एक डॉक्टर होते. एका मित्राची व त्यांची ओळख होती त्यामुळे मी त्या लाल इंपाला मधून गावभर फिरलो आहे. तुमची शाळा बोपर्डीकर यांचे वाड्याचे शेजारी होती का ? ( बाहेर शिंदे यांचे शिवण कामाचे दुकान ). बाकी माझ्या वाईबद्दल अगणित आठवणी आहेत .

मी_आहे_ना's picture

20 Jul 2019 - 7:52 am | मी_आहे_ना

धन्यवाद. होय, तीच शाळा म्हणजे महिला मंडळ प्राथमिक विद्यमंदिर.

चौकटराजा's picture

20 Jul 2019 - 8:46 am | चौकटराजा

मी राहत होतो ती खोली व शाळा यांच्यात जवळ जवळ अडथळा काहीच नव्हता . मी कपडे धुवायला बाहेर आलो की पोराचा वर्ग दिसत असे. पोरे फार मस्ती करीत. एकदा गंमत झाली .कुत्रयांचा " मौसम" असावा . एक कुत्री व तिच्या मागे लागलेले दहा बारा कुत्रे अशी वरात शाळेत घुसली . कुत्री पुढे कुत्रे पाठिमागे असे पोरांच्य मधून पाठलाग सुरू झाला. बाईना काय करावे कळेना . पोरे किंचाळू लागली. जराशाने कुणीतरी काठी आपटल्याने हा प्रकार थांबला शाळा सुरू झाली .

वाईमंत्र. नाव आवडलं. लिखाण पण आवडलं.

मी_आहे_ना's picture

20 Jul 2019 - 7:52 am | मी_आहे_ना

धन्यवाद

मुक्त विहारि's picture

19 Jul 2019 - 10:29 pm | मुक्त विहारि

लेख आवडला....

शाळा ही फक्त चौथी पर्यंतच आवडली....

पाचवी नंतर पांजरपोळात भरती करण्यात आली...

अजून पण वाईला जाता का?

धन्यवाद. होय, अजूनही वर्षातून २-३वेळा वाईला जाणे होते.

मुक्त विहारि's picture

20 Jul 2019 - 3:31 pm | मुक्त विहारि

मग आता वाईच्या आसपासच्या परिसरातील प्रेक्षणीय स्थळांच्या बाबतीत पण काही लिहू शकता का?

वाई मध्ये खाण्याची चंगळ आहे, (पुण्या पेक्षा नक्कीच जास्त) असे ऐकीवात आहे. विशेषतः घरगुती खानावळीत जेवण चांगले मिळते, असे ऐकले आहे. ..

तशी आमच्यावेळी ही शाळा अस्तित्वात नव्हती. फक्त द्रविड हायस्कुल, कन्याशाळा, शिंदे हायस्कुल आणी नगरपरिषदेच्या शाळा होत्या.

मी_आहे_ना's picture

20 Jul 2019 - 7:57 am | मी_आहे_ना

बहुधा ही शाळा १९७५ते८० दरम्यान सुरु झाली. माध्यमिक शिक्षण द्रविड्मध्येच, तेव्हाच्या आठवणी "द्रविडायन" ह्या लेखमालेतून मांडल्या आहेत, लवकरच तीही डकवतो इथे.

संजय पाटिल's picture

20 Jul 2019 - 10:52 am | संजय पाटिल

द्रविडायनाच्या प्रतिक्षेत....

अभ्या..'s picture

20 Jul 2019 - 11:30 am | अभ्या..

टिपिकल सरासरी चरित्र. इतके प्रेडिक्टेबल की पुढील वैकुंठापर्यंत ही लिहू शकेन.
अर्थात वाई सातार्यातल्या पब्लिकला रिलेट होत असणार पण इतके सरळसोट वाचायचाही कंटाळा येतो.
स्मरणशक्ती मात्र वाखाणण्याजोगी आहे.

मुक्त विहारि's picture

20 Jul 2019 - 10:22 pm | मुक्त विहारि

मोठ्या कौतुकाने "शाळा" आणि "दुनियादारी" वाचायला घेतले आणि संपवले.

शालेय आणि बर्याच काॅलेजमधील जीवन सामान्यतः सारखेच असते.

आंबट चिंच's picture

20 Jul 2019 - 1:21 pm | आंबट चिंच

अहो कालच त्यांच्या आय डी चा 8 वा वर्धापनदिन झाला.
तेव्हा ते लिहते झाले हे काय कमी आहे.

लेख आवडला.

धोम धरणामुळे कृष्णेचे पाणी वरच अडले, वाई गावातल्या नदी पात्रांची डबकी झाली. मजाच गेली. कृष्णेचा उत्सव होतो फेब्रुवारीत तो सप्टेंबरात केला पाहिजे नदीला पाणी असताना.

लेख कृत्रिम वाटत आहे .
१, का पाढे ते सुद्धा खूप पूर्वी नाही पटत
लेख अत्यंत कृत्रिम वाटतं आहे .

मी_आहे_ना's picture

23 Jul 2019 - 9:30 am | मी_आहे_ना

सर्व प्रतिसादकर्त्यांचे आभार. पहिल्याच ओळीत सांगितल्याप्रमाणे हे लेखन माझ्यासोबत प्राथमिक शिक्षण घेतलेल्या मित्रसमूहासाठी केलेले असल्याने त्यात सार्वत्रिक भावना असण्याला मर्यादा नक्कीच होत्या. शिवाय वाई सारख्या (तत्कालीन) खेड्यात घडणार तरी किती अन काय! अर्थात असाच सरधोपट जीवनप्रवास वैकुंठापर्यंत झाला तर तिथेपर्यंतही अश्याच छोट्या छोट्या गोष्टींबद्दल उल्लेख करून जरूर लिहीन (ह.घ्या.) पण ह्यात कृत्रीमपणा काही वाटत असल्यास ते मात्र माझे अपयश समजतो कारण ह्यात वर्णन केलेले क्षण अन क्षण मी जगलेलो आहे!