आशा आणि निराशा .

Jayant Naik's picture
Jayant Naik in जनातलं, मनातलं
8 Jun 2019 - 9:58 am

आशा आणि निराशा .

लेखक .
( असे म्हणतात कि लेखक वेगवेगळ्या पद्धतीने तीच तीच गोष्ट पुन्हा पुन्हा सांगत असतो . म्हणजे त्याला भेटलेली माणसे ,त्याने अनुभवलेले प्रसंग ..त्या वेळी त्याच्या मनात उमटलेल्या भावना तो वेगवेगळ्या कथेत मांडत असतो,सांगत असतो. मी शिकत असताना एका आजोबा आणि त्यांची बायको ..माई . यांच्या बंगल्यात अभ्यास करण्यासाठी खोली घेऊन रहात होतो. . ते दोघेच रहात. त्यांची जगण्यासाठी चाललेली निरर्थक धडपड मला पावलोपावली दिसत होती. मनाला उभारी नव्हती ..शरीर साथ देत नव्हते . पण जगणे संपत नव्हते. मी त्यांची खोली सोडून आपल्या मार्गाला लागलो..त्यांचा सहवास सुटला तरी मनात कुठे तरी ते घर करून होतेच …
मग एके दिवशी अचानक ते माझ्या या कथेतच आले . )
************
“ आजोबा ...आजोबा उठा उठा ..आज तुम्ही मला आपले शेत दाखवायला नेणार होतात ना ? उठा उठा …”
“ हो रे बाबा उठतो उठतो . पण आता ते आपले शेत राहिले नाही ..आपण विकले आहे ते ...” असे म्हणत आजोबा उठले. त्यांनी डोळे उघडून बघितले त्यांना कोणीच दिसले नाही . त्यानी आपले डोळे चोळून परत एकदा इकडे तिकडे पाहिले पण तिथे कोणीच नव्हते. त्यांनी उशी जवळ ठेवलेला चष्मा लावला , पण तरीही त्यांना कोणीच दिसेना.
“ अरे कुठे गेला हा ? ..आत्ता तर मला उठवत होता कि ..माझा नातू ..उमेश ..गायब कसा होईल इतक्यात …”
असे काही तरी ते म्हणाले.
“ अहो कोण आहे ? कोणाशी बोलताय ? इतक्या सकाळी सकाळी कोण येणार ? तुम्हाला स्वप्न पडले असेल ..” माई शेजारच्या पलंगावरून म्हणाल्या.
आजोबानी सुस्कारा सोडला. हो . स्वप्नच ते. उम्या कुठला यायला? तो तिकडे दूर पुण्यात .त्यांचा मुलगा ,सून आणि नातू उमेश सगळे पुण्यात. किती वर्षात इकडे कोकणात फिरकले नाहीत . पण स्वप्नात का होईना आजोबाना नातू दिसल्याचे खूप समाधान वाटले. ते लगबगीने उठले आणि शेजारच्या पलंगावर झोपलेल्या माई जवळ जाऊन ते उत्साहात म्हणाले ,
“ अग..अलके खरे सांगतो ? स्वप्न इतके खरे वाटले मला कि उमेश आला आहे .माझ्या पलंगाजवळ उभा राहून मला उठवतो आहे .त्याच्या त्या मुलायम हाताचा स्पर्श सुद्धा मला जाणवला .पहाटेची स्वप्ने खरी होतात म्हणतात ना ? …”
माईना खरे तर अजून थोडा वेळ झोपायचे होते. सकाळी सकाळी त्यांचे सगळे अंग खूप दुखायचे . रात्री त्यांची झोप पण चांगली झाली नव्हती ..पण त्यांना आजोबांचा उत्साहावर पाणी टाकायचे नव्हते.
“ अग बाई ..काय सांगताय ? तुम्हाला उम्याचा स्पर्श जाणवला म्हणताय ? कसा दिसत होता हो तो ?..कसले कपडे घातले होते ?”
“ ते काही दिसले नाही बघ ..पण आवाज आणि स्पर्श अगदी खरे वाटले ..” आजोबा उत्साहात म्हणाले.
माईने किलकिले डोळे करून आजोबांकडे पाहिले.मग एकदम त्यांना आपल्या अंगातील शक्ती कुणी तरी काढून घेतली आहे असे वाटले . जे कधीही होणार नाही त्याची आपण अपेक्षा तरी का ठेवतो कुणास ठाऊक ?. मग अपेक्षा भंग . मग त्याचे दुखः .
“ आपला मुलगा,नातू आणि सून ...आता आपल्याला स्वप्नातच दिसणार ,नाही तर फोन वर ..” माई सुस्कारून म्हणाली आणि तिने आपले पांघरूण सरळ केले आणि पांघरूण तोंडावर घ्यायचे निमित्त करून आपले डोळे पुसून घेतले.
आजोबाना ते दिसले ..पण त्यांनी आपल्याला काही कळले नाही असे दाखवले आणि ते उठले.
“ तू अजून एक दहा पंधरा मिनिटांनी उठ. मी आवरतो माझे आणि तुला मस्त चहा करतो . दुधवाला रामजी आत्ता येईल ताजे दुध घेऊन...जरा हालचाल केलीस कि तुझे अंग दुखायचे कमी होईल ..झोप तू अजून थोडा वेळ .” असे म्हणून आजोबा उठले त्यांचे हि दोन्ही गुढघे दुखत असत ..आपले थरथरते हात आपल्या दोन्ही गुढग्यांवर दाबून धरत ते एक एक पाउल सावकाश पणे टाकत दिवाणखान्यात आले . अरेच्या या पायाच्या दुखण्यामुळे का होईना आपण चार्ली चापलीन सारखे चालायला लागलो की? असे वाटून त्यांना उगीचच हसायला आले. पाय हळू हळू टाकत ते दारापाशी आले. दाराला आतून लावलेल्या एक खालची आणि एक वरची कडी काढून ते बाहेर पडवीत आले. नुकतेच उजाडले होते. आपल्या नेहमीच्या सवयीने त्यांनी पूर्वेकडे पाहून उगवत्या सूर्याला नमस्कार केला. अंगणात असलेल्या तुळशीला नमस्कार केला ..तसेच मागे वळून एक एक पाऊल सावकाश टाकत कोठीची खोली आणि स्वयपाक घर ओलांडत ते बाथरूम कडे गेले. माई त्यांना म्हणायची ..
“ अहो बाबा ..काठी घेऊन चालत जा ..कुठेतरी पडलात बिडलात तर ..मी काही तुमचे करणार नाही हो ! ..मलाच आपले करणे जमत नाही ..”
आजोबाना पण घरात काठी घेऊन चालायला आवडत नसे.
खूप पूर्वी म्हणजे रवी त्यांचा मुलगा व्हायच्या आधी माई आपल्या नवऱ्याला अहो एकलत का ? असे म्हणायच्या पण मग रवी बाबा म्हणायला लागला मग त्या पण बाबा म्हणायला लागल्या. आता त्यांना सगळे माई म्हणायचे. अलका म्हणणारे आता फक्त बाबाच उरले होते.
आजोबांनी आपले आवरले. देवघरापाशी जाऊन देवांना नमस्कार केला आणि मग तिथेच थोडा वेळ ते प्राणायाम करत बसले. पूर्वी ते योगासने करत आणि सूर्य नमस्कार सुद्धा घालत पण आता त्यांना ते जमत नसे.
तेवढ्यात रामजीची हाक आली. ते दुधाचे भांडे घेऊन बाहेर गेले .
“ काय रामजी ? घरचे सगळे बरे आहेत ना ? रखमा काय म्हणते?”
“ सगळे बरे आहेत आजोबा … रखमा पण बरी आहे. माई अजून उठल्या कि नाहीत ?”
“ अरे रामजी आता दोन महिने आम्हाला दुध नको बरे का ? पुण्याला मुलाकडे जाणार आहोत आम्ही उद्या सकाळी. आज रात्रीच रवी गाडी घेऊन येणार आहे. उद्या लवकर सकाळी निघू. तू जरा थांब तुझे आज पर्यंतचे पैसे देऊन टाकतो .” असे म्हणत आजोबा आत वळले. आपले दुखरे पाय फाकवून हळू हळू आत जाणाऱ्या आजोबांकडे पहात रामजी म्हणाला ,
“ राहू दे आजोबा ..चार पाच दिवसांचेच राहिलेत ..परवाच मागच्या महिन्याचा हिशोब संपला की..”
“ रामजी जरा थांब बाबा ...मी पण आले ..” आतून माईंचा आवाज आला. अरे वा ! आज माई लवकर उठल्या वाटते ? रामजी मनात म्हणाला.
मग थोड्या वेळात माई काठी टेकत टेकत बाहेर आल्या. त्यांच्या हातात एक भरजरी साडी होती. लाल चुटूक रंगाची .
“ ही साडी तेव्हडी रखमाला दे बाबा ..रामजी .. बाकी तू बरा आहेस ना ? “ माई म्हणाल्या.
“ अहो माई ,परवाच तुमची किती तरी लुगडी रखमाला दिलीत की..आता आणि हे कशापायी ?”
“ परवा द्यायची राहून गेली होती म्हणून आज देतेय हो ..रखमाला शोभून दिसेल ..”
तेवढ्यात आजोबा पैसे घेऊन आले.
“ हे घे आणि रखमाला आमच्या झाडांना मधून मधून पाणी घाल म्हणावे …”
रामजी पैसे आणि आणि साडी घेऊन गेला.
मग आत येऊन आजोबांनी दुध तापत ठेवले ,चहा ठेवला .माई पण आपली आवाराआवार करून स्वयपाकघरात येऊन टेबलापाशी बसल्या. पाच सहा वर्षापूर्वी रवी येणार ..त्याची खाली बसायची सवय गेली असेल म्हणून आजोबानीच घरात हे टेबल केले ,घरात पलंग केले आणि बाथरूम मध्ये कमोड सुद्धा बसवून घेतले होते. आज चहा घेता घेता माईना तो दिवस आठवला. रवी समोरच बसला होता ..शेजारी त्याची बायको आणि आपल्या शेजारच्या खुर्ची वर बाबा. आगदी कसा कालच घडल्यासारखा त्यांना तो प्रसंग आठवला.

“ माई , बाबा ..आपला उमेश आता मोठा व्हायला लागला आहे. तुम्ही दोघे सुद्धा मधून मधून पुण्याला येत असता ...आपला दोन बेडरूम चा flat आता आम्हाला लहान वाटायला लागला आहे. माझे नुकतेच प्रमोशन पण झाले आहे ...आमच्या कंपनीतले अधिकारी आमच्या घरी आले कि आमचा हा flat लहान असल्याने मला टोमणे मारतात …” रवी म्हणाला.
“ हो ना ! त्यांच्या बायका सुद्धा नेहमी मला कुजकट बोलतात…” सुनेत्रा ,त्याची बायको म्हणाली.
“ अरे रवी ..तुला आता बढती मिळाली ..तुझी बायको सुद्धा नोकरी करते ..एक झकास तीन बेडरूम चा flat घेऊन टाक ना ! ..” आजोबा उत्साहात म्हणाले.
“ अगदी माझ्या मनातील बोललात बाबा. तेच मला तुम्हाला सांगायचे होते .बाणेर मध्ये आम्ही एक flat पाहिला आहे ..तीन बेडरूम चा ..खूप मोठी terrace असलेला आहे. शिवाय सोसायटीचे क्लब हाउस आहे ..स्विमिंग पूल आहे ..सुंदर बाग आहे …”
“ अरे मग घेऊन टाक की !” आजोबा .
“ होय खूप मनात आहे पण ..जरा पैसे कमी पडत आहेत ..” रवी म्हणाला.
“ मग काय करायचे ठरवले आहेस ..लोन मिळत नाही का ? आणि आत्ताचा flat विकून टाक ना ?”
“ त्याला मनासारखा भाव येत नाही आहे ..तेव्हा तो तसाच ठेऊन भाड्याने द्यावा म्हणतो ..दर महिन्याला भाडे पण येत राहील. माझा थोडा हप्ता त्यातून देता येईल ..”
“ मग काय करायचे ठरवले आहेस ? ..” माई म्हणाल्या . थोडा वेळ रवी आणि सुनेत्रा गप्प बसले . रवीने काही बोलायचा प्रयत्न केला ,पण त्याला मधेच थांबवत सुनेत्रा म्हणाली ,
“ बाबा ,मला वाटते आपण आपले हे कोकणातील घर विकून टाकू. केवढे मोठे आहे हे. तुम्हाला दोघांना याची देखभाल पण अवघड जाते. तसे गावाबाहेर पण आहे .”
“ अग सुनेत्रा मग आम्ही कुठे राहायचे ? आम्हाला काही तिकडे पुण्यात करमायचे नाही हो !” माई जरा घाबरूनच म्हणाल्या. पुण्याला त्या गर्दीत त्यांना अजिबात आवडत नसे.
“ आई ,आपण इथेच गावात एक दोन खोल्यांचा flat घेऊ. तुम्हालाही व्याप कमी होईल आणि गावात असल्याने जरा सुरक्षित पण वाटेल. या घराची जागा मोठी असल्याने ..चांगली किमत येईल ..मी थोडी चौकशी करून ठेवली आहे.” रवी म्हणाला.
मग थोडावेळ कुणीच काही बोलले नाही . एक विचित्र शांतता त्या वास्तूत उतरली. एक दुखरी शांतता. नाते तोडून टाकणारी .
आजोबा मग जागचे उठले. माईनी मोठ्या कष्टाने आणि आवडीने जमवलेल्या स्वयपाकघरातील वस्तूंकडे त्यांनी एकदा नजर फिरवली. मग त्यांनी रवी कडे पाठ केली आणि स्वयपाकघरातील मागच्या दरवाजातून दिसणाऱ्या आकाशाच्या तुकड्याकडे एकटक पहात ते तसेच बराच वेळ उभे राहिले. आपल्या पूर्वजांनी खूप कष्टानी बांधलेल्या घराची नाळ तोडून टाकणाऱ्या या मुलाला आता काय बोलायचे ? ..आपण काय बोलतोय हे त्याला कळणार सुद्धा नाही . असा विचार करत ते तसेच अस्वस्थपणे उभे राहिले.
“ बाबा ..शांत पणे विचार करा. एक दोन दिवस आपण सगळेच याचा साधक बाधक विचार करू आणि निर्णय घेऊ.” रवी म्हणाला.
“ रवी ..याच घरात मी लहानाचा मोठा झालो. तुझ्या आईला लग्न करून याच घरात घेऊन आलो मी. तुझा जन्म याच घरात झाला. तू आपली अडखळती पहिली पाऊले याच घरात टाकलीस. अरे हे नुसते घर नाही .आपल्या सगळ्यांच्या आठवणी इथे पावलोपावली आहेत ...हे घर विकून टाकायचा विचार तुझ्या मनात आला तरी कसा ?
वास्तू म्हणजे चार भिंती आणि आजूबाजूची जागा नव्हे रे ! आपल्या आठवणींचा एक अविभाज्य घटक आहे ही वास्तू. नाही ...मी ही विकणार नाही . तुला काही तरी वेगळी व्यवस्था करावी लागेल ..तुझ्या नवीन flat साठी .”
आजोबा म्हणाले आणि ते बाहेरच्या खोली कडे निघाले. रवी आणि सुनेत्रा खुर्चीतून उठले ..मग सुनेत्रा गडबडीने म्हणाली …
“ बाबा ..बाबा ..लगेच तुमचा निर्णय घेऊ नका ..आपण सगळेच जरा शांत पणे विचार करू आणि मग पाहिजे तर उद्या पुन्हा एकदा या विषयावर बोलू. ..”
माई काहीच न सुचून आपल्या जागी सुन्न होऊन बसून राहिल्या. त्यांना काय बोलावे ते कळेना . रवीच्या मनात हा विचार आला तरी कसा ?

आजोबा आणि माईनी घर विकायला ठाम पणे नकार दिला. रवी आणि सुनेत्रा नाराज झाले. धुसपुसत दोघेही पुण्याला गेले.

त्या दिवसानंतर रवी आणि सुनेत्रा आणि उमेश परत कधीच आले नाहीत. केव्हातरी फोनवर तुटक बोलणे आणि नातवाशी थोड्या गप्पा.
आजोबा आणि माईंचा तेवढाच आधार. पुढच्या पिढीशी फोनवरचे नाते.
आजोबा या पंचक्रोशीत चांगले नावाजलेले डॉक्टर होते. पेशंट त्यांना फार मानत. आजोबा सुद्धा वेळी अवेळी त्यांच्या मदतीला धावून जात. आजोबांच्या हाताला गुण होता. लांब लांबच्या गावातून पेशंट येत. आपल्या कुटुंबाची घ्यावी तशी ते आपल्या साऱ्या पेशंटांची काळजी घेत. पण मग त्यांचे शरीर साथ देईना . विसरभोळेपणा वाढला.औषधांची नावेच आठवायची नाहीत . पेशंटची नावे आठवायची नाहीत . मग एकेदिवशी त्यांनी आपली प्रक्टिस एका भल्या डॉक्टरला विकून टाकली.

मग हळू हळू इतकी वर्षे इतक्या लोकांची काळजी घेणाऱ्या डॉक्टर आजोबाना आणि माईना एकमेकांची सुद्धा काळजी घेता येईना . मग एक दिवशी ते म्हणाले ,
“ अलके ...तुझ्या आधी मी गेलो तर तुझी काळजी कोण घेणार ?”
“ आणि बाबा तुमच्या आधी मी गेले तर तुमची काळजी कोण घेणार ?”माई म्हणाल्या.
मग किती तरी दिवस आणि महिने दररोज संध्याकाळी हाच प्रश्न ते दोघे एकमेकांना विचारत. रवी आणि सुनेत्रा नाराज होऊन गेले आणि मग गावातील काही माणसे आणि त्यांची प्रक्टिस चालवणारा तो भला डॉक्टर एवढेच त्यांची काळजी घेणारे उरले .
आता भार त्या गजाननावर !
आज सकाळी सुद्धा चहा झाला आणि हाच प्रश्न मनात घोळवत ते दोघे आपल्या कामाला लागले. आजोबांनी दुधाचे दोन ग्लास तयार केले. मग एकदा एक ग्लास आणि नंतर एक असे करत दोन्ही ग्लास आपल्या झोपायच्या खोलीत टेबलावर नेऊन ठेवले. मग टेबलाच्या खणामधून बरेच दिवस जपून ठेवेलेल्या गोळ्या काढल्या . मग परत आपल्या चार्ली चापलीन चालीने स्वयपाकघरात जाऊन एक छोटा खलबत्ता आणला. त्या सगळ्या गोळ्यांची बारीक पूड करून त्या दोन्ही दुधाच्या ग्लासात ती पूड मिसळून टाकली. तेवढ्यात माई आपले दुखरे गुढघे घेऊन हळू हळू चालत एक चमचा घेऊन आल्या.
“ अहो , बाबा चमचा विसरलात….”
“ अरेच्या ..असे झाले होय ? आताशा तर हे फारच होते आहे. ..द्या तो इकडे …”
“ असू द्या .मी ढवळते ते दूध ..तुम्ही तेवढे कुलुपाचे बघा…” माई म्हणाल्या.
आजोबांनी कालच रात्री कुलूप आणि किल्ली कुठेतरी काढून ठेवली होती . पण त्यांना आत्ता ते कुठे ठेवलय तेच आठवेना.
“ अलके ..कुलूप कुठे ठेवलंय मी ?”
“ बाहेरच्या दाराशेजारी कोनाडा आहे ना ? त्यात कालच ठेवलंय तुम्ही ..जा ते कुलुपाचे बघा मी तो पर्यंत बाकी आवारा आवरी करते .” माई म्हणाल्या.

मग आजोबा खुरडत खुरडत कोठीची खोली ओलांडून दिवाणखान्यात आले ..पण त्यांना आपण इथे कशाला आलोय तेच आठवेना ..मग एकदम आठवले. कुलूप. कोनाड्यातून कुलूप काढून ते बाहेर आले. मग आपल्या मागे दार लावून घेत त्यांना मुख्य दाराला बाहेरून कुलूप लावले. ते नीट बसले आहे याची दोन तीनदा ओढून खात्री केली. मग तसेच अंगणातून हळू हळू चालत घराच्या मागच्या बाजूच्या दारातून ते परत घरात आले. आता हे दार आतून लावले कि झाले. आपण दोघे जायला मोकळे. ..चारपाच दिवस तरी लोकांना वाटेल आजोबा आणि माई रवी कडे पुण्याला गेले. गावात सुद्धा त्यांनी आपल्या ओळखीच्या लोकांना हेच सांगितले होते.

तो पर्यंत माई दारापाशी येऊन थांबल्या होत्या. दाराला आतून नीट कडी लावून त्यानी आजोबांचा हात धरला.
“ तुमचा हात धरून या घरात आले….जाताना पण हात धरूनच जाणार. …” त्या म्हणाल्या. आपल्या डोळ्यातून येणारे अश्रू त्यांनी आता पुसायची तसदी घेतली नाही .
एकमेकांच्या आधाराने ते दोघे मग झोपायच्या खोलीत आले. पलंगावर एकमेकाशेजारी बसले. शेजारी टेबलावर असलेल्या रवी ,सुनेत्रा आणि उमेशच्या फोटोकडे ते दोघे किती तरी वेळ पहात बसले. मग टेबलाचा Drawar उघडून आपले नुकतेच केलेले मृत्युपत्र नीट आहे ना याची खात्री केली.
“ सगळे नीट आहे ना ? बाबा ...काही राहिले नाही ना ? “ माई म्हणाल्या.
“ नाही काही राहिले नाही . अलका ..तू मला खूप सांभाळून घेतलेस बर का ? ये अशी जवळ बैस. घे हे दुध घे…” आजोबा म्हणाले.
“ आणि तुम्ही काय माझ्यासाठी कमी केलेत का ? तुम्ही सुद्धा हा ग्लास घ्या . ” माई म्हणाल्या.

पहिल्यांदा दुध कोणी प्यायचे यावर त्यांचा बराच वाद झाला होता. आजोबा म्हणत होते कि तू पहिल्यांदा घे तू घेतलेस की लगेच मी घेणार माईही तसेच म्हणत होत्या.
शेवटी दोघांनी एकदम दुध घ्यायचे असे त्यांनी ठरवले.
त्या दोघांनी हातात दुधाचा ग्लास घेतला आणि तो तोंडाला लावणार एवढ्यात आजोबांचा फोन वाजला.
“ अरेच्या ..हा आपण बंद करायचा विसरलो कि .” आजोबा म्हणाले.
“ मग आता बंद करा. आता कुणाचा ही फोन नको.” माई म्हणाल्या पण तरीही त्यांनी फोन आगदी डोळ्याजवळ नेऊन पाहिला.
“ अग बाई ? उमेश चा फोन. ..घेऊ का ?” असे म्हणत फोन चे बटन दाबत फोन कानाला लावला सुद्धा.

“ अरे उमेश काय म्हणतोस कसा आहेस ? ..काय ? तू आठ दिवसांनी आम्हाला भेटायला येणार आहेस ? चांगला महिनाभर राहणार आहेस ? परीक्षा झाल्यावर ? ..अरे मग ये कि ..विचारायचे काय त्यात ? ..” माई एकदम आनंदित झाल्या. त्यांनी मग फोन आजोबाना दिला. थोडावेळ बोलून त्यांनी फोन ठेऊन दिला.

मग ते दोघे तसेच किती तरी वेळ त्या बंद झालेल्या फोन कडे पहात बसून राहिले. मग त्या दोघांनी शेजारच्या टेबलावरील दुधाच्या ग्लासाकडे पाहिले. किती तरी वेळ ते दोघे काहीच न बोलता त्या जीवघेण्या दुधाकडे पहात तसेच बसून राहिले.
“ अहो..माझे जरा एकता का ? उम्या किती दिवसांनी आपल्या कडे राहायला येणार आहे….त्याला एकदा शेवटचे भेटून घेऊया का ? ...हे दुध आपण काही दिवसांनी घेतले तर ? ..घ्यायचे हे नक्की पण ...उम्या आपल्याला किती दिवसांनी भेटणार ..आणखी काही दिवसांनी घेतले तर काय होईल ?” माई म्हणाल्या. आजोबांचा हात हातात धरून त्या मोठ्या आशेने त्यांच्याकडे पहात होत्या. आजोबांनी आपल्या लाडक्या अलकेच्या सुरकुतलेल्या पण आता एकदम आनंदित झालेल्या चेहऱ्याकडे पाहिले आणि ते म्हणाले..
“ मरण कवटाळणे सोपे नसते. अनेक खऱ्या खोट्या कारणांचे वैराण वाळवंट समोर असावे लागते ..किवा तसे ते आहे असा आभास लागतो .. आता जगण्यात काहीही अर्थ नाही असे पूर्ण खात्रीने वाटायला लागते. जगणे त्या मानाने सोपे ..त्याला आशेचे एकच मधुर बोट पुरेसे असते.” आजोबा म्हणाले.
“ काय म्हणालात ?” माई म्हणाली .आजोबा हसले . अलकेला सगळे ऐकू गेले हे त्यांना माहित होते ,त्यानी हळूच विषय बदलला. आशा निराशेचा हा लपंडाव आणखीन थोडे दिवस खेळून बघू असा विचार करून ते म्हणाले ,
“ काही नाही ग ! आज Valentain Day आहे म्हणे ...आपला साजरा करायचा राहूनच गेला .”
“ राहून कसा जाईल ? आजच का ? आपण दररोजच तो साजरा करत नसतो का ? आणि प्रेम का असे एकाच दिवशी साजरे करायचे असते का ? तुम्ही आपल्या आधी माझा विचार करता आणि मी माझ्या आधी तुमचा विचार करते ..आणखी कसा तो साजरा करायचा ?” माई म्हणाल्या आणि नव्या उत्साहाने त्या स्वयपाकघराकडे निघाल्या .नातवाला आवडणाऱ्या लाडूंची तयारी करायला.

****************
लेखक .
( मी इथपर्यंत ही कथा लिहिली ..किवा आजच्या भाषेत टंकलिखित केली माझ्या Laptop मध्ये . तेवढ्यात माझ्या खोलीचे दार धाडकन उघडले . मी आश्चर्याने बघितले तर आजोबा आपल्या चार्ली चापलीन चालीने भसकन आत आले. आपले घारे डोळे माझ्याकडे रोखून माझ्यावर खेकसले ..हो अगदी खेकसले.
“ तुम्ही लेखक स्वतःला कोण समजता ? ...मी तुमच्या कथेतील पात्र असलो तरी ..माझे काही स्वतंत्र विचार आहेत की नाहीत ? का मी आणि माई तुझ्या हातातील कठपुतळी आहोत ? आम्ही जगायचे की मरायचे हे ठरवणारे तुम्ही कोण ? स्वतःला काय परमेश्वर समजायला लागलास काय ?”
मी आपल्या खुर्चीतून धडपडत उठलो. माझ्या मनातील माझी पात्रे अशी माझ्या समोर कशी काय आली? मी स्वतालाच एक चिमटा घेतला. हो .मी जागाच होतो.
“ आजोबा ..तुम्ही जरा शांत व्हा. असे बसा या खुर्चीत ...आता मला जरा नीट समजावून सांगा ..
माझे काय चुकले ? मी फक्त निराशेवर आशेचा विजय दाखवला.” मी म्हणालो.
“ अरे पण आशा निराशा या पलीकडे काही नाहीच काय ? कथेत द्वंद पाहिजे हे सगळे ठीक आहे पण फक्त मरण येत नाही म्हणून आमच्या सारख्यांनी जगत राहायचे का ? आमच्या हातून होते तोपर्यंत आपल्या घरात राहायचे अगदीच अशक्य झाले तर वृद्धाश्रमात भरती होऊन ..जगत रहायचे . आजकाल काय म्हणतात त्याला ..हो .Assited Living.”आजोबा आपले दोन्ही हात जोरजोरात हवेत उडवत बोलत होते. मी काही तरी बोलणार इतक्यात ते अस्वस्थ पणे माझ्या अगदी जवळ आले ..माझ्या खांद्यावर आपले हात ठेवत आणि आपला चेहरा अगदी माझ्या चेहऱ्याजवळ आणून म्हणाले,
“ अरे , मला आणि अलकाला जगायचेच नसेल तर ? आमचे आयुष्य आम्ही पुरेपूर जगलो आहे ..आमची सगळी कर्तव्ये आम्ही यथासांग पार पाडली आहेत ...आमचे कार्य संपले आहे असे आम्हाला खरेच वाटते आहे ...मग परत या आशा निराशेच्या खेळात आम्हाला कशाला अडकवतो आहेस ? . आपले कार्य झाल्यावर ज्ञानेश्वर थांबले नाहीत ..तुकारामबुवा थांबले नाहीत ..शंकराचार्य थांबले नाहीत .. विवेकानंद ..सावरकर ..किती उदाहरणे देऊ तुला ? आम्ही तेवढे मोठे नाही ..आम्हाला समाधी जमणार नाही पण Assited Living पेक्षा आम्ही Assited Suicide ...इच्छा मरण का मागू नये ? फक्त मरत नाही म्हणून जगत राहायचे ? ...फक्त तुला ..लेखकाला आशेचा नेहमी निराशेवर विजय होतो असे सिद्ध करायचे आहे म्हणून ?”
“ अहो आजोबा .. मला तुमचे म्हणणे थोडे थोडे पटते आहे ..पण जन्म आणि मरण ह्या परमेश्वरा च्या हातातील गोष्टी ..आपण त्या आपल्या हातात का घ्या ? ..” मी म्हणालो.
“ अरे ..लेखका पण तो परमेश्वर खरेच आहे का ? खात्री आहे का तुझी ? … तुझ्या मनात थोडे वेगळे विचार आले असते तर .मी आणि अलका ते झोपेच्या गोळ्या घेतलेले दुध घेऊन मरून सुद्धा गेलो असतो ..तू ही सुटला असतास आणि आम्ही सुद्धा …” आजोबा .
“ मी कसा काय सुटलो असतो ?”
“ अरे म्हणजे ..आम्ही जीवंत राहिलो तर यांचे पुढे काय करायचे हा प्रश्न सुटला नसता का ? एका लेखकाची ही सुटकाच नाही का ?”
“ मी काय करावे असे तुम्हाला वाटते ? ..” मी म्हणालो.
“ ही कथा ज्या प्रकारे सुरु झाली ..तशीच संपव. एका आत्महत्येची कथा न म्हणता याला एका समाधीची कथा म्हण ..म्हणजे तुझ्या सद्सदविवेकबुद्धीला सुद्धा टोचणी लागणार नाही ..जातो मी !”
असे म्हणून जसे आले तसे आजोबा निघून गेले.
आता ही एक पंचाईतच झाली नाही का ? लेखक आणि त्यातील पात्रे यांच्यातच एकवाक्यता नाही . आता वाचकांनीच काय तो या कथेचा शेवट करावा हे उत्तम !..म्हणजे मी सुटलो ..)

************************************************************

कथालेख

प्रतिक्रिया

आज्जी आजोबा जगलेच पाहिजेत आणि ते सुद्धा आनंदात.

हमारी मांगे पुरी करो! आणि सुखांत श्टोरी लिख्खो!! =))

आज्जी आजोबा जगलेच पाहिजेत आणि ते सुद्धा आनंदात.

+१ असेच म्हणते.
कथा सुरेखच. लेखनशैली फार छान आहे तुमची.

जालिम लोशन's picture

9 Jun 2019 - 12:42 am | जालिम लोशन

+१

जॉनविक्क's picture

9 Jun 2019 - 1:08 am | जॉनविक्क

मी एक चित्रपट बघितला होता त्यात एका माणसाच्या आयुष्यात घटना घडत असतात ज्या त्याच्यापासून दूर असणारा एक लेखक लिहीत असतो... गम्मत अशी की नंतर नन्तर त्या माणसाला तो लेखक काय म्हणतोय (लिहतोय) हे ही ऐकू येऊ लागते, म्हणजे "जॉन ने मान उंचावून पलीकडे पाहिले" तर तो माणूस ते करतच असतो पण ते लिहलेले ही त्याला ऐकू येऊ लागते त्या मुळे तो प्रचंड वैतागतो की कोण त्याच्यावर पाळत ठेवत आहे, कोणाचे आवाज तो ऐकत आहे.... वगैरे वगैरे

शेवटी त्याचा एक सहकारी ज्याला तो हे सांगतो तो म्हणतो की ही वाक्ये फलाना फ्लाना लेखकाची शब्द रचना आहे तू त्यालाच भेट. मग हिरो त्या लेखकाला भेटून त्याची परिस्थिती सांगतो, व त्यांच्या लक्षात येते की त्याच्या आयुष्यात ते घडत आहे जे लेखक त्याच्या चालू कादम्बरीत लिहीत आहे. आणि जी एक शोकांतिका आहे ज्यामुळे लेखकाला एक प्रतिष्ठीत पुरस्कार मिळणार हे सर्वांना माहीत आहे म्हणून लेखक त्यात शेवटी नायक मरतो या गोष्टीत बदल करायला ठाम नकार देतो.

शेवटी नायक त्याला ऐकू येईल त्याच्या विरोधी वागायला सुरुवात करतो जेणे करून तो ते कथानक चुकवू शकेल व त्याचा मृत्यू तो वाचवू शकेल... अर्थात यामुळे अजून गुंतागुंत वाढते व शेवट काय होते ते चित्रपटात बघणे उत्तम...

दुर्दैवाने मला नाव आठवत नाही :( कोणाला ही कथा माहीत असेल व चित्रपटाचे नाव आठवत असेल त्याने अवश्य शेअर करावे ही विंनती.

बाकी लेखकाने अतिशय उत्सुकता या कथेत निर्माण केली आहे जी त्यानेच सॉर्ट करावे ही विनंती.

नावातकायआहे's picture

9 Jun 2019 - 9:12 am | नावातकायआहे

सुरेख कथा!

मराठी कथालेखक's picture

10 Jun 2019 - 5:41 pm | मराठी कथालेखक

आता वाचकांनीच काय तो या कथेचा शेवट करावा हे उत्तम

मरु देत त्यांना मरायचं आहे तर.. तसंही जगून काय करायचं हा प्रश्न आहेच.
जिंदगी बडी होनी चाहिए लंबी नही..