आई - ३

दिनेश५७'s picture
दिनेश५७ in जनातलं, मनातलं
4 Jun 2019 - 11:51 pm

एक मनस्वी वादक होता. आत्मानंदी! कलेचा उपासक. रोज सकाळी उठून वाद्य खांद्यावर घेऊन गावाबाहेर दूरच्या डोंगरावरच्या एका कड्याच्या काठी बसायचा, आणि कलासाधनेत मग्न व्हायचा. डोंगरातला वाराही त्या तालावर फेर धरायचा, पक्षी सम साधत गाऊ लागायचे, सारे भवताल सचेतन होऊन जायचे. या वादकाला त्याचा पत्ताही नसायचा. त्याची जादूई बोटं त्या वाद्यावर थिरकत स्वर्गीय नादनिर्मितीत मग्न असायची...
अशा समाधीस्थितीत बराच वेळ जायचा. सूर्य डोंगराआड कलू लागला की पक्षी भानावर यायचे आणि नाखुशीनेच घरट्याची वाट धरायचे. वाराही मलूल होऊन शांत डुलकी घ्यायचा, आणि कधीतरी हा वादक भानावर यायचा... वाद्य नीट गुंडाळून उठून वाट धरायचा.
... बाजूच्याच एका झाडाखाली एक कोवळं कोकरू बसलेलं त्याला दिसायचं. त्या वाद्याचा ताल कानात साठवत एकाग्र बसलेलं... तो निघाला की जाताना प्रेमानं त्या गोंडस कोकराच्या पाठीवरून हात फिरवायचा, आणि ते कोकरू त्याच्याकडे पाहायचं. डबडबलेल्या डोळ्यांनी!!
हे कोकरू त्याच्यासाठी कोडं होऊ लागलं. रोज न चुकतां झाडाखाली बसून त्या वाद्यातून निघणारा ताल एकाग्रतेने ऐकताना त्याचे डोळे पाण्यानी भरतात, ते आतून गदगदत असतं, हे त्या वादकाला जाणवू लागलं.
आपल्या वादनानं अवघं आसपास आनंदून मोहरत असताना हे कोकरू मात्र कळवळून आतल्या आत आक्रोश करते, या जाणीवेनं वादक अस्वस्थ होऊ लागला...
त्या संध्याकाळीही तो निघाला, नेहमीप्रमाणे कोकराला गोंजारलं, आणि बेचैन सुरात त्यानं त्या कोकराला विचारले, 'माझ्या वाद्याच्या तालाने सारी सृष्टी मोहरत असताना, तू मात्र दु:खानं झुरत असतोस... असं का?'
कोकरानं केविलवाण्या ओल्या नजरेनं वादकाकडे पाहिलं. एक हुंदका घशातूनच मागे परतवला, आणि लांबवर कुठेतरी नजर लावून ते बोलू लागलं...
'तुमची बोटं ज्या वाद्यातून स्वर्गीय सूर उमटवतात, त्या वाद्याचं कातडं माझ्या आईचं आहे. तुम्ही वाजवू लागता तेव्हा उमटणाऱ्या सुरातून मला माझ्या आईचा आवाज एेकू येतो, ती माझ्याशी बोलू लागते, आणि मी आईच्या आठवणीत बुडून तिच्या सहवासाचं सुख शोधू लागतो...'
वादक त्या कोकराच्या प्रत्येक शब्दागणिक अधिकच बेचैन होत होता.
त्यानं पुन्हा ते वाद्य उघडलं, थाप मारली, आणि ताल धरला.
आता फक्त त्या पिल्लासाठी आईचे बोल उमटत होते!!
दोघंही भान विसरले होते.
अचानक वारा वाहू लागला, ढग दाटले आणि अवघं आकाश बरसू लागलं!!

...आई या शब्दातच जादू असते!!

ही कथा दूरदर्शनच्या एका जुन्या मैफिलीत संवादकाने ऐकवली, अन् मला ग्रेस आठवला!
तेही एक कोडंच!
कधी सहज सुटणारं, कधी कधीच न आकळणारं!!

मग ग्रेसच्या लेखणीतून उमटलेले ते शब्दही आठवले, अन् आश्चर्य म्हणजे, त्या छोट्या पडद्यावर त्याच शब्दांना सुरांना साज चढत गेला...

ती गेली तेव्हा रिमझिम, पाऊस निनादत होता
मेघांत अडकली किरणे, हा सूर्य सोडवित होता |

ती आई होती म्हणुनी, घनव्याकुळ मीही रडलो
त्यावेळी वारा सावध, पाचोळा उडवित होता |

अंगणात गमले मजला, संपले बालपण माझे
खिडकीवर धुरकट तेव्हा, कंदील एकटा होता !

....गाणं संपलं, आणि मला पुढचं, एक अव्यक्त कडवंही आठवलं..

तशि सांजहि अमुच्या दारी, येऊन थबकली होती
शब्दांत अर्थ उगवावा, अर्थांतुन शब्द वगळता |

... बाहेर पाऊस रिमझिम निनादतोच आहे!
_________________________________

मुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

योगी९००'s picture

5 Jun 2019 - 10:37 am | योगी९००

फार छान लिहीलेय तुम्ही...काळजाला भिडले. निवडूंग चित्रपटात हे गाणे घेतले आहे. आज पुन्हा ऐकतो.

धन्यवाद

डॉ सुहास म्हात्रे's picture

5 Jun 2019 - 10:43 am | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर लिहिले आहे !

जालिम लोशन's picture

5 Jun 2019 - 1:57 pm | जालिम लोशन

+1

महासंग्राम's picture

5 Jun 2019 - 3:09 pm | महासंग्राम

सुंदर लिहिलंय. ती गेली तेव्हा रिमझिम, पाऊस निनादत होता या गाण्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर सर्वसामान्य पणे रसिकांना माहिती असलेला अर्थ आणि या कवितेचा मूळ अर्थ फार वेगळा आहे.

ज्ञानोबाचे पैजार's picture

5 Jun 2019 - 3:38 pm | ज्ञानोबाचे पैजार

हेच लिवायला आल्तो.
जर ग्रेसची संपूर्ण कविता वाचली तर त्याला अभिप्रेत असणारा अर्थ वेगळा आहे हे लक्षात येते.
मिपावर अनेकदा यावर चर्चा झाल्या आहेत.
पैजारबुवा,

ज्योति अळवणी's picture

5 Jun 2019 - 8:42 pm | ज्योति अळवणी

ही कथा देखील मिपावर पूर्वी वाचल्यासारखी वाटते. मात्र आपलं विवरण अप्रतिम

जॉनविक्क's picture

5 Jun 2019 - 8:52 pm | जॉनविक्क

ती गेली तेव्हा रिमझिम, पाऊस निनादत होता
मेघांत अडकली किरणे, हा सूर्य सोडवित होता |

ती पळून गेली तेव्हा रिमझिम, पाऊस निनादत होता, असे काही कवी ग्रेस यांच्या मनी होते असे म्हणतात. खरे खोटे त्यांनाच माहीत..!