कटका रस्थान की साजिश ?

शेखरमोघे's picture
शेखरमोघे in जनातलं, मनातलं
26 May 2019 - 1:37 am

मी हल्ली पुन्हा मराठी शिकायची जरूर वाटल्याने काय बरें करावे अशा विचारांत आहे. कारण पहा - जर दूरचित्रवाणीवरचे बोलणे आदर्श मानले तर हल्ली कुठेही नुस्ताच कट किंवा नुस्तंच कारस्थान केलं जात नसतं तर जे कांही होत असतं ते double barrel "कटकारस्थान"च केलेलं असतं आणि म्हणतांना "कटका" ("फटका" सारखं) आणि "रस्थान" ("राजस्थान" सारखं) असं दोन शब्दांत म्हणायचं असतं. आणखी एक पर्यायही आहे - "षट्कार" या शब्दांतला "ष" का "शहामृग" या शब्दांतला "श" हे कळेल ना कळेल अशा (की अषा?) बेताने जे घडले त्याला "साजिश" किंवा "षडयंत्र" म्हणून टाकायचे. यांतलं नक्की काय बरोबर याचा नेहेमीच घोटाळा होत असल्याने मला हल्ली पुन्हा मराठी शिकायची जरूर भासू लागली आहे. आणि म्हणून आज नक्की शीर्षक काय वापरावे हे नक्के करता येत नाही.

पण ते जाऊ दे. जे कांही घडले ते माझ्या शाळेतल्या पहिल्या दिवशी घडले - आणि अजून माझे शाळेंत नांव देखील घातलेले नव्हते.

ही वाक्य लिहितांना मात्र कांहीही घोटाळा झालेला नाही. त्याचे असे झाले -

वयाच्या पांचव्या वर्षी (किंवा त्यानंतर) शाळेंत नांव घातले जाते तसे माझ्या चौथ्या वर्षी अजून माझे नांव शाळेत घातलेले नव्हते, त्यावेळी आमच्या शेजारच्या एका मुलाने - त्याला आपण गोविंद म्हणू- विचारले "येणार का माझ्या शाळेत?" जरी गोविंद माझ्यापेक्षा ४-६ वर्षांनी मोठा असला तरी या गोविंदाची माझ्या वयाची भावंडे गल्लीतल्या खेळगड्यांतली असल्याने असे कांही गोविंदने विचारणे यांत मला कांही वावगे वाटले नाही. मी उलट विचारले "कधी?". त्याने म्हटले "उद्या दुपारी". मी त्यावेळच्या पद्धतीप्रमाणे लगेच सांगितले " आई हो म्हणाली तर कधीही ". मला वाटतं त्यावेळी मी त्याच्या शाळेंत कसें जावें (माझ्याही शाळेंत जात नसताना) असे काही माझ्या डोक्यांतच आले नाहीं. दुसऱ्या दिवशी त्याच्याबरोबर त्याच्या शाळेंत जाण्याकरता आईने हो म्हटल्याने मी (त्याचा हात धरून) त्याच्या शाळेत निघालो.

माझ्या शाळेंत माझे नाव लागण्याच्या आधीच मी शाळेत निघालो होतो.

शाळेतला पहिला तास होता - "सूतक ताई"चा. (मी आधीच सांगितल्याप्रमाणें मराठीतल्या दूरचित्रवाणीवरच्या लोकांचे बोलणे ऐकून ऐकून "मराठी नक्की कसे बोलावे किंवा म्हणूनच कसे लिहावे", हे ठरवणे हल्ली मला कठीण जाते). त्या काळांत महात्मा गांधींच्या जीवनपद्धतीच्या सरकारी अभ्यासक्रमांवर असलेल्या पगड्यानुसार "सूतक ताई" कांही शाळांतून शिकवली जात असे. आणि गोविंदने शाळेत पोचल्यावर माझी त्यांच्या - "सूतक ताई"च्या शिक्षकांशी ओळख करू देतांना "याला पुढच्या वर्षी आपल्या शाळेत यायचं आहें" असं सांगितलं. "सूतक ताई" शिकवणाऱ्या त्यांच्या शिक्षकांनी वर्गातल्या मुलांना कामाला लावले आणि मला कौतूकाने कांही पेळू (कापसाची लांबट विसविशीत नळी की जी वापरून टकळीनें तिची लांबी वाढवत आणि जाडी कमी करत सूत कातले जाते) करून दिले. मी ही वर्गभर कुतुहुलाने फिरतांना ते पेळू गोविंद आणि त्याच्या मित्रांत वाटून टाकले.

त्यानंतरच्या तासाला परवचा म्हणतांना (एक मुलगा पाढे सांगतो आणि इतर त्याने सांगितलेले पुन्हा म्हणतात) जो मुलगा पाढे "सांगत" होता त्याचे बोलणे नीट ऐकू येत होते पण नंतरचे म्हटले जात असतांना त्यांत खिदळणेही ऐकू येत होते आणि खिदळत असणाऱ्या मुलांत गोविंद आणि त्याचे मित्र यांचा पुढाकार होता.

इतक्या वर्षांनंतर जेंव्हा कधी माझ्या माझ्या शाळेतल्या पहिल्या दिवशी काय घडले याबद्दल बोलणे निघते - कधी मित्रांबरोबर तर कधी नातवंडांबरोबर - तेव्हा प्रश्न पडतो की गोविंदला मला त्याच्या शाळेंत न्यावे असे का वाटले असावे? गोविंदचे कांही कटका रस्थान किंवा साजिश तर नव्हती? परवचा म्हणतांना खिदळत असणाऱ्या मुलांत गोविंद आणि त्याचे मित्र यांचा पुढाकार का होता? मला कौतूकाने दिलेले पेळू (जे मी गोविंद आणि त्याच्या मित्रांत वाटून टाकले होते) वापरून "सूतक ताई"च्या तासाला आपले काम सुकर करणे हा तर गोविंद आणि त्याचे मित्र यांचा उद्देश नव्हता?

मांडणीविचार

प्रतिक्रिया

संशयाची सुई गोविंदा कडे वळते आहे.

गोविन्दाचा मला त्याच्या शाळेत नेण्याचा motive मला कधीच कळला नाही. त्याला benefit of doubt देणे अनिवार्य.

शेखरमोघे's picture

26 May 2019 - 3:58 am | शेखरमोघे

मराठीत नक्की काय म्हणावे किन्वा लिहावे हा जेव्हा doubt येतो तेव्हा सगळ्याना समजण्याकरता सरळ English च वापरावे लागते - नाहीतर असेच काहीतरी न कळणारे "कटका रस्थान"चालू असल्यासारखे वाटते.

जालिम लोशन's picture

26 May 2019 - 7:23 am | जालिम लोशन

घरी त्रास देत असल्यामुळे आईनेच गोविंदाला सागुंन शाळेत न्यायला सांगितले. तेव्हढाच त्या माऊलीला पाच तास आराम

उगा काहितरीच's picture

26 May 2019 - 10:01 am | उगा काहितरीच

यावरून एक किस्सा आठवला.
शाळेत असतानाची गोष्ट इभुनाशा शिकवायला एक शिक्षक होते ते क्वचितच पुस्तक हातात घेऊन शिकवत होते. थोडा भाग वाचायला लावत होते. व अवघड शब्द आले तर विचारा असं म्हणत होते. व त्यानंतर प्रत्यक्ष शिकवत असत. भूरुपे वगैरे काहीतरी धडा होता. मला दुप दरी हा शब्द अडला. अर्थच लागत नव्हता. त्यांनी दोनदा वाक्य वाचायला सांगितलं डोंगराची दुप दरी रांग होती वगैरे. त्यांनाही अर्थ लागेना शेवटी त्यांनी पुस्तक हातात घेऊन बघितलं ... वाक्य होतं डोंगराची दुपदरी रांग आहे. ;-)

शिकवण्याची पद्धत आवडली मला.

शेखरमोघे's picture

26 May 2019 - 7:20 pm | शेखरमोघे

स्वा. वी. सावरकर (किन्वा त्या काळातील इतर कोणीही असेल कदाचित) यान्च्या लिखाणातून - एकदा "अवाटर्" हा इन्ग्रजी शब्द "अडल्या"मुळे शिक्षकाना त्याचा अर्थ विचारला, त्यानी शोधाशोध करून अर्थ न मिळल्याने कुठे वाचला अशी चौकशी केल्यावर सगळ्याच्याच लक्षात आले की तताशब्द म्हणजे "अवतार" (avatar) होता.

बबन ताम्बे's picture

26 May 2019 - 8:29 pm | बबन ताम्बे

कित्येक लोकांना भडकमकर हे आडनाव कसे वाचावे माहीत नसते. काही लोक भडक मकर असे वाचतात.

कुमार१'s picture

27 May 2019 - 7:08 am | कुमार१

शालेय वयातील विनोद आठवला.

' सांग लीला जायचं ना गडे' हे वाक्य अनेक प्रकारे फोड /जुळवणी करून कसे वेगवेगळे अर्थ निघतात !

सुबोध खरे's picture

29 May 2019 - 9:54 am | सुबोध खरे

कविवर्य श्री मंगेश पाडगावकर हे आपल्या कवितेत एक शब्दही फेरफार करण्यास नकार देत असत.
याला अपवाद म्हणजे हा किस्सा
दिवस तुझे हे फुलायचे या गाण्यात एक ओळ अशी आहे
माझ्या या घराच्या पाशी
थांब तू गडे जराशी.
या ठिकाणी मूळ शब्दरचना अशी होती
माझ्या या घराच्या पाशी
थांब ना गडे जराशी.
येथे श्री मंगेश पाडगावकर याना प्रेयसीला आग्रह करायचा होता म्हणून "ना" हा शब्द टाकला होता.
परंतु त्याचा अर्थ तिसराच निघू शकतो असे श्री यशवंत देव यांनी समजून सांगितल्यावर नाखुशीने त्यानी तो शब्द बदलण्याची तयारी दाखवली.

शेखरमोघे's picture

30 May 2019 - 1:16 am | शेखरमोघे

खुसखुशित किस्सा!

चित्रगुप्त's picture

26 Jan 2023 - 7:58 pm | चित्रगुप्त

स्टे.बँ. मधे कार्यरत माझ्या एका हिंदीभाषी मित्राची काही काळ पुण्यात बदली झाली होती, त्या विषयी सांगताना "हड - पसर मे हमारा ब्रांच था" ... वगैरे सांगत असे.