तात्या!

दिनेश५७'s picture
दिनेश५७ in जनातलं, मनातलं
15 May 2019 - 3:12 pm

तात्या अभ्यंकर ‘मिसळपाव’ चालवायला लागला आणि कधीतरी मी त्याच्या ‘हाटेला’त जाऊन ‘तात्याची स्पेशल मिसळ’ चाखली. मग मला त्याची एवढी चटक लागली, की मी ‘मिसळपाव’वर अक्षरश: ‘पडीक’ होऊन गेलो. मनात आलं की काही ना काही ‘मसाला’ तिथे ओतू लागलो. चवदार असला तर तात्या स्वत: तारीफ करायचा. जमला नाही तर स्पष्ट तसंही सांगायचा. पण तात्याच्या हातची टेस्ट काही वेगळीच असल्याने, त्याचा तो अधिकार माझ्यासारख्या अनेकांनी मान्य केला होता.
तात्याने पालथा घातला नाही असा प्रांत नाही, हे त्याच्या अनुभवी लिखाणातून केव्हाच स्पष्ट झालं होतं. ‘मिसळपाव’ नामांकित करण्यात तात्याच्या या हरहुन्नरी लिखाणाचा मोठा वाटा होता. त्याने लेखक घडविलेच, पण वाचक घडविण्याचे महत्वाचे कामही केले. घडविले म्हणजे, त्याआधीही वाचक होते, पण काही वाचल्यावर व्यक्त होण्याची संधी मर्यादित होती. तात्याच्या हाटेलात कट्ट्यावर जमलेला प्रत्येक वाचक, व्यक्त व्हायचा. मिसळपावची ही पुण्याई तात्याच्या समावेशक वृत्तीमुळेच जमा झाली होती.
जबरदस्त धार असलेलं, जगण्याचे असंख्य पदर उलगडणारं, कधी हसवणारं, कधी रडवणारं, कधी अंतर्मुख व्हायला लावणारं तरी कधी सहज सापडलेल्या एखाद्या धाग्याला वस्राची विशालता देणारं तात्याचं लेखन हा दिवसाअखेरचा आणि शिणवट्याच्या कोणत्याही क्षणावरचा हक्काचा विरंगुळा होता.
अचानक तात्याचं लिखाण बंद झाल्याचं जाणवत होतं, पण संपर्क नसल्याने कारण कळलंच नव्हतं. एवढ्या वर्षांपासून मिसळपावचा मेंबर असतानाही, खूप पूर्वी एकदाच तात्याशी बोलायची संधी मिळाली होती. कशावर बोललो ते आता आठवतही नाही, पण तेव्हा बोलणं झाल्यावर तात्या फोनवर खळखळून हसला होता, ते मात्र अजूनही आठवतं.
आज ती बातमी कळल्यावर तात्याचा ब्लाॅग उघडला.
त्यावरचा एक लेख काॅपी केला. तोच इथे पेस्ट करतोय.
तात्याची आठवण आली, की सहज वाचता यायला हवा. कारण या लेखात त्याच्या अंत:करणाचा एक पदर उलगडलाय!
***
विठ्ठल उभा पहावा विटेवरी..

आज संध्याकाळी ठाण्याच्या गोखले रस्त्यावरून चाललो असताना अचानक पाठीवर थाप पडली..

"तात्या..भोसडीच्या..."

मागे वळून बघतो तर खूप जुनी ओळख निघाली. 30 वर्षांपूर्वेचा कोलेजमधला जुना दोस्त भेटला होता.

"अरे.. तू...? इथे कुठे..? किती वर्षांनी भेटतो आहेस" वगैरे जुजबी बोलणं झालं..

"तात्या, आता घरीच चल ५ मिनिटं. मी तुझं काही ऐकणार नाही. तुला आठवतंय, पूर्वीही आमच्या घरी तू आला आहेस. आईलाही भेटशील माझ्या.."

मी काहीही आढेवेढे न घेता त्याच्या घरी गेलो.

"आई..तात्या आलाय. ओळखलंस का? अजून साला जिवंत आहे.."

पक्षाघताने डावी बाजू गेलेली त्याची आई खुर्चीवर बसली होती. त्याच्या बायकोने पुढ्यात पाणी आणून ठेवलं. मी म्हातारीच्या पाया पडलो..

"अरे तू गायचास ना रे..? इथेही एकदा गाणं म्हटलं होतंस.."

पक्षाघातामुळे म्हातारीचं बोलणं तसं पटकन कळत नव्हतं..पण मेमरी sharp होती.

"तात्या..चहा टाकलाय. बघ, आईनेही तुला ओळखलं. चहा होईपर्यंत म्हण एखादं गाणं.."

सगळ्या घटना पटापट घडत होत्या. मीही लगेच त्या म्हातारीच्या पुढ्यात बसून 'फिरत्या चाकावरती देसी..' हे गाणं लगेच हातवारे करून हौशीहैशीने गायलं. म्हातारी खुश झाली. तिच्या चेहे-यावर छान समाधान पसरलं. पक्षाघाताने तिचा वाकडा झालेला चेहेरा आता एकदम छान दिसू लागला.

चहा आला. बाकरवडी आली. आमच्या जनरल गप्पा सुरू होत्या. त्याची बायकोही अगदी सात्विक, समाधानी दिसत होती.

तेवढ्यात १०-१२ वर्षाची एक मुलगी आतल्या खोलीतून बाहेर आली. तिला पाहून मला जरा भलतीच शंका आली. ती मुलगी स्पेशल चाईल्ड होती. Autistic..

"हा कोण आहे माहित्ये का? हा तात्याकाका.. नमस्कार कर बघू तात्याकाकाला..त्याला hello म्हण.."

"तात्या..ही माझी लाडकी लेक. तुझ्याकडे कशी छान बघते आहे बघ.."

मला हे सगळं जरा धक्कादायकच होतं. तरी मी पटकन स्वत:ला सावरत त्या मुलीच्या गालावर आणि चेहे-यावर प्रेमाने हात फिरवला.

"खूप सुंदर आहे रे तुझी मुलगी.."

माझं फक्त एवढं एक वाक्य. परंतु त्या वाक्यामुळे मला लाख मोलाचं समाधान आणि आनंद दिसला त्या नवरा-बायकोच्या चेहे-यावर..

आणि खरंच ती मुलगी सुंदर होती. अगदी निष्पाप...

जरा वेळ कुणीच काही बोललं नाही आणि एकदम माझ्या मनात विचारांचं काहूर माजलं..

एका वेगळ्याच दुनियेतली मुलं आहेत ही. त्यांना तुमच्या दयेची भीक मुळीच नकोय. त्यांना फक्त आणि फक्त तुमचं प्रेम हवं आहे. आणि तुम्ही कोण लागून गेलात त्याच्यावर दया दाखवणारे..? तुमची so called बुद्धी शाबूत आहे हा तुमचा भ्रम आहे.. अरे..तुमच्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक संवेदनशील मुलं आहेत ती..!

"चल निघतो रे..उशीर होतोय..पुन्हा येईन."

म्हातारीच्या पाया पडलो आणि निघालो. ते दोघे आणि ती मुलगी जिन्यापर्यंत मला सोडायला आले..

"तात्याकाकाला टाटा कर.."

पुन्हा एकदा त्या मुलीचा तो सुंदर चेहेरा..

मी इमारतीखाली उतरलो. दुकानातून एक छान डेअरीमिल्क घेतलं आणि पुन्हा त्याच्या घरचं दार वाजवलं.

'अरे..तुझ्या लेकीकारता खाऊ आणलाय..' असं म्हणून त्या मुलीचा हात हातात घेतला आणि तिच्या हातावर डेअरीमिल्क ठेवलं..

पुन्हा एकदा तेच निष्पाप, निरागस हास्य..

उद्या आषाढी. पण मला मात्र तिच्या त्या निर्व्याज, निष्पाप हास्यामधून विठोबाने आजच दर्शन दिलं होतं..

-- तात्या अभ्यंकर..

मुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

अत्रुप्त आत्मा's picture

15 May 2019 - 3:36 pm | अत्रुप्त आत्मा

:(

मार्गी's picture

15 May 2019 - 4:06 pm | मार्गी

ओहहह. . .भावपूर्ण श्रद्धांजली.

मुक्त विहारि's picture

15 May 2019 - 4:07 pm | मुक्त विहारि

भावपूर्ण आदरांजली

पाषाणभेद's picture

15 May 2019 - 4:48 pm | पाषाणभेद

स्साला तात्या. असाच बोलता बोलता रडवायचा!

कुमार१'s picture

15 May 2019 - 5:20 pm | कुमार१

मृत्यू समयीचे वय समजेल का ?

प्रसाद_१९८२'s picture

15 May 2019 - 5:31 pm | प्रसाद_१९८२

भावपूर्ण श्रद्धांजली.

प्रसाद_१९८२'s picture

15 May 2019 - 5:31 pm | प्रसाद_१९८२

भावपूर्ण श्रद्धांजली.

टिवटिव's picture

15 May 2019 - 7:46 pm | टिवटिव

भावपूर्ण श्रद्धांजली.

कुसुमिता१'s picture

15 May 2019 - 11:40 pm | कुसुमिता१

फार पूर्वी मनोगतावर असताना त्यांच्याशी संपर्क झाला होता.. देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो...

जुइ's picture

16 May 2019 - 1:22 am | जुइ

खूप दुर्दैवी बातमी. तात्या अभ्यंकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

चंबा मुतनाळ's picture

17 May 2019 - 10:40 am | चंबा मुतनाळ

भावपूर्ण श्रद्धांजली.

वाहीदा's picture

17 May 2019 - 12:05 pm | वाहीदा

मैं तात्या को रुबरु जानती थी ..उनसे कई बार मुलाकात भी हुई २००८ - २००९ के दरमीयान !वोह दौर हि कुछ और था नायाब दौर ! तात्याके वजह से कईयोंके कलम, तीर - कमान की तरह तरकश से बाहर निकाले जाते और लफ्जोंमे पिरोए जातें.. उन्होंने कईयों को लिखना सिखाया और कईयोंको अच्छा पढना | तात्याने लिखे लेख पढना एक मेजवानी हुआ करती .. तात्या मेजबान और हम सब मेहमान :-) और उन्ही के वजह से मिसलपाव याने आला दर्जे की मेजवानी !! कई लेखकों की एक से एक नायाब तहरीर हमें पढने मिलती और उससे भी ज्यादा उसपर आए हुए एक से एक कमेंट्स याने प्रतिसाद पढना याने Intellectual मेजवानी !
खैर, तात्या जिंदगी के उतार और चढाव बहोत देख चुके थे उस वजह से अज़ीम बनना मुश्किल था लेकीन अजी़ज़ जरुर थे.. उन्हें नसीब ने साथ नहीं दिया शायद उस वजह से दिलफरेबी भी हो गएं लेकीन दिलकश जरुर बनें रहे . माली हालात Financial Situation के वजह से गमगीन थे लेकीन फिर भी लिखते बहोत हि बढिया थे ..आला किस्म की उनकी कलम बहोत हि बढिया तरीके से चलती उस कलम को सलाम !! खुदा ने उन्हें कई फन (कलाओं) से नवाजा अगर वक्त साथ देता तो न जाने उडान भर के किस बुलंदी पे चले जाते | उन्होंने अपने अम्मी की काफी खिदमत की और जिसे अपने अम्मी के खिदमत का मौका मिला उसे खुदा ने और ज्यादा तकलीफ नहीं दी ..खुदा की मर्जी , अपने तरफ जल्द हि बुला लिया . अगर जिंदगी ने इतना बुरा बर्ताव न किया होता तो शायद Financial मामुले में दिल-फरेबी नहीं बनते |
अब खुदा से एक हि गुजारीश, ऐ खुदा, तात्याने जो कुछ जाने - अनजाने गुनाह किए उन सारे गुनाहोंको बक्श दें और उनके बुजुर्ग अम्मी को हौ हिम्मत दें के वोह इस गम बर्दाश्त कर सकें आमीन !! Allah Does not Burden a Soul with more than it can bear : Al-Quran 2:286
अल्लाह, तुम तो गफ्फुरो रहीम हो . तात्या की रुहपर रहमत नाजील फरमा , उनकी रुह को सुकून दें ! अल्लाह उनकी बुजुर्ग अम्मी जो अब भी इस दुनिया में है उनकी हिफाजत फरमा . आमीन !!
~ तात्या के खातीर १० साल बाद मिसलपाव पे कदम रखनेवाली 'वाहीदा'

विजुभाऊ's picture

17 May 2019 - 12:09 pm | विजुभाऊ

खरे आहे वहिदा.
तात्या ने आपल्या सर्वांना व्यक्त होण्यासाठी एक चांगले व्यासपीठ तयर करुन दिले.
त्यात्या दिलखुलास होता हे नक्की.

वाहीदा's picture

17 May 2019 - 12:25 pm | वाहीदा

काफी लोगों के दिल दुखे के तात्या फरेबी निकले ...वैसे उन लोगोंका गुस्सा भी जायज है लेकीन अब अगर हम ज्यादा तात्या को परखेंगे तो उनकी कितनी सारी अच्छाईयों को भी नकारेंगे | अब जो कुछ फरेब हुआ उसे खुदा पे हि छोड दे तो बेहतर |
अब जो भी था जैसा भी था तात्या शख्स दिल का अमीर था यह बात तो हम नहीं नकार सकतें | उन्ही के वजह से हमारी कई आला writer हस्तीयों के articles से मुलाकात हो पायी जैसे के आप , रामदास काका , प्रभूसर , बिपीन कार्यकर्ते, पिवळा डैंबिस , प्राजू, राज जैन , राजेंद्र बापट कितनोंकी किताबें छपी और कितनोंकी सोशल मिडीयापे एक नई पहेचान बन के उभरें. कितने तो आजभी यु-टुब्स पे एक नए इतमाद confidence से घुम रहे हैं ..यह बिल्कुल तात्या की और मिसलपाव कि हि देन हैं. we can never forget what Tatya and Misalpav has given all of us indirectly.

कथा वाचताना डोळे कधी पाणावले ते कळलंच नाही. त्या अवलियाला प्रणाम.

मूकवाचक's picture

17 May 2019 - 2:33 pm | मूकवाचक

मर्मज्ञतेची दैवी देणगी, शैलीदार लेखन आणि अवलिया वृत्ती असा त्रिवेणी संगम असलेल्या मिपा संस्थापक तात्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

प्रमोद देर्देकर's picture

17 May 2019 - 3:59 pm | प्रमोद देर्देकर

तात्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
जेव्हा मिपावर आलो तेव्हा त्यांचे जुने लिखाण आणि नंतर त्यांचा ब्लॉग अधाशी होवून वाचून काढला.
त्यांना व्यक्तिगत संदेश देवून भेट घेण्याचा प्रयत्न केला होता.

आज बऱ्याच वर्षांनी जुने मिपाकर प्रतिसादासाठी आले.
सं.पा. एक विनंती तात्यांच्या सगळया लेखाची मुख्य पानावर लिंक द्यावी.

स्वतःच्या बोलीवर आयुष्य जगणारा माणूस! अनेक चढउतार पाहिलेला अवलिया. ईश्वरी इच्छेच्या पुढे कुणाचा इलाज चालत नाही. त्याच्या पश्चात मातोश्रींचे कसे होणार???

ज्योति अळवणी's picture

21 May 2019 - 10:38 pm | ज्योति अळवणी

तात्यांबद्दल वाचल्यानंतर वाटतं की एका अवलीयाला भेटणं राहून गेलं

भावपूर्ण श्रद्धांजली

ज्योति अळवणी's picture

21 May 2019 - 10:38 pm | ज्योति अळवणी

तात्यांबद्दल वाचल्यानंतर वाटतं की एका अवलीयाला भेटणं राहून गेलं

भावपूर्ण श्रद्धांजली

संजय पाटिल's picture

22 May 2019 - 12:46 pm | संजय पाटिल

भावपूर्ण श्रद्धांजली ____/\____