सैनिक आणि शोधक

अन्या बुद्धे's picture
अन्या बुद्धे in जनातलं, मनातलं
23 Apr 2019 - 11:59 am

*मानसिकता : सैनिक आणि शोधक*

जगात 2 तर्हेची मानसिकता असलेली माणसं पहायला मिळतात. तो फरक सांगणं सोपं व्हावं म्हणून एक उदाहरण किंवा रूपक मांडतो. सैन्याची वर्गवारी अनेक प्रकारे होऊ शकते. मला जे सांगायचंय त्यासाठी ती वर्गवारी सैनिक आणि शोधक (स्काऊट). सैनिक संरक्षण आणि आक्रमण या दोन्हीसाठी उपयोगी असतो. तर शोधक त्याला माहिती पुरवतो. सैनिक प्रत्यक्ष लढतो तर शोधक ब्रिजेस कुठे आहेत, जंगल कस आहे, जिथे हल्ला होणार तिथले लोक मदत करणारे आहेत का, अडचणी काय असणार, सोयीच्या गोष्टी कोणत्या वगैरे माहिती काढतो आणि सैन्याला पुरवतो. सैन्याला सैनिक आणि शोधक दोघांची गरज असते.

ही रूपकं आता इतिहासातून समजून घेऊ. 1895 ला फ्रान्समधे एक लष्कर आणि राजकीय दृष्ट्या भलीमोठी खळबळ माजवणारी घटना घडली. जनरल ऑफिस मध्ये एक कागद फाडलेला कचर्याच्या डब्यात सापडला. जोडल्यावर लक्षात आलं की त्यावर काही महत्वाची लष्करी गुपितं आहेत. प्रथमदर्शनी या फितुरीसाठी संशयाची सुई अल्फ्रेड ड्रेफस या अधिकाऱ्याच्या दिशेने वळली.

त्याचं रेकॉर्ड स्वच्छ होतं. त्याच हस्ताक्षर त्या कागदावरच्या लिखाणाशी जुळतंय असा निष्कर्ष निघाला, जरी खाजगी तज्ज्ञ पूर्ण सहमत नव्हते. त्याच्या नकळत त्याच्या घरात शोध घेतला गेला. काहीच सापडलं नाही. पण संशय पक्का झाला. ड्रेफसला पुरावे मागे न ठेवता काम करत येतं असा निष्कर्ष निघाला. त्याचं पूर्वायुष्य तपासलं गेलं. त्यात लहानपणापासूनच त्याला 5 भाषा अवगत आहेत व कुशाग्र बुद्धिमत्ता आणि स्मरणशक्ती आहे अशी माहिती मिळाली. निर्णय पक्का झाला. हेराला हे गुण अत्यावश्यकच होते. रीतसर खटला होऊन त्याला दोषी ठरवण्यात आले. सार्वजनिकरित्या अपमानित करून डेव्हिल बेटावर आजन्म कारावासाची शिक्षा झाली. इतक्या त्रोटक पुराव्यावर तो दोषी ठरला कारण तो ज्यू होता. आणि एकमेव ज्यू अधिकारी होता. त्याकाळी फ्रान्समध्ये ज्यू द्वेष नित्याची बाब होती.

ड्रेफस 10 वर्ष तुरुंगात होता. त्याकाळात अधिकारी, राजकीय नेते यांना पुन्हा तपासणीची विनंती करणारी पत्र लिहिणे हा एकच उद्योग होता. पण त्याच्या पत्रांना केराची टोपली दाखवण्यात येई.

नशीबाने पिकार्ट नावाच्या अधिकार्याकडे त्याचं पत्र पोचलं. तोही इतरासारखाच ज्यू विरोधकच होता. पण पुरावे पाहून 'ड्रेफस दोषी नसेल तर?' हा प्रश्न त्याची पाठ सोडेना. तपासात समजलं की ड्रेफस तुरुंगात असला तरी गुपितं शत्रू कडे जातच आहेत. त्यावर उत्तर होतच. ड्रेफस ने नक्कीच दुसऱ्या कुणाला तयार करून ठेवलं असणार किंवा हा स्वतंत्र गुन्हेगार असेल. पण ड्रेफस गुन्हेगार आहेच.

पिकार्टच्या तपासाने खरा गुन्हेगार सापडला. त्याच हस्ताक्षर तंतोतंत जुळत होतं. इतरही बळकट पुरावे सापडले आणि ड्रेफस 10 वर्षांनंतर दोषमुक्त सिद्ध झाला. तुम्हाला वाटेल ड्रेफसला जाणीवपूर्वक गोवण्यात आलं. पण तसं नाहीए. बहुसंख्य इतिहासतज्ज्ञाच मत असं की ती त्या अधिकाऱयांची सहज घडलेली स्वाभाविक चूक होती. त्यांना ड्रेफस प्रामाणिकपणे दोषी वाटत होता.

इथे सैनिक आणि शोधक या दोन्ही वृत्ती स्पष्ट होतात. सैनिकाला आपपर भाव असतो. विरोधक सम्पवणे आणि स्वपक्षाचा बचाव करणे या प्रवृत्ती प्रबळ असतात. त्याची बुद्धी, जमवलेली माहिती, ज्ञान ते यासाठी वापरतात. तर शोधक कुतूहलाने भारलेले असतात. त्यांना सत्य शोधण्यात स्वारस्य असतं. स्वतःचे पूर्वग्रह, मत ते जाणीवपूर्वक बाजूला ठेवतात. आपण समजत होतो ते चूक होतं हे समजल्यावर त्यांना मनापासून आनन्द होतो. आपल्या मताला दुजोरा देणारे पुरावे न शोधता पुरावे शोधून समोर येणारे निष्कर्ष ते स्वीकारतात.

मित्रहो, आपल्याही मनात सैनिक आणि शोधक असतो. आजुबाजुच्या घटनांचं आकलन आणि निष्कर्ष, त्यावर अम्मलबजावणी हेच करतात. हे दोघेही गरजेचेच असतात. पण त्यांना कधी आणि कसं वापरायचं ते आपल्या हाती आहे.

-- अनुप

इतिहास

प्रतिक्रिया

आनन्दा's picture

23 Apr 2019 - 1:09 pm | आनन्दा

रोचक माहिती.

प्रमोद देर्देकर's picture

23 Apr 2019 - 1:48 pm | प्रमोद देर्देकर

मस्त येवू दे अजून

उगा काहितरीच's picture

23 Apr 2019 - 2:08 pm | उगा काहितरीच

रोचक!

श्वेता२४'s picture

23 Apr 2019 - 2:08 pm | श्वेता२४

आवडलं.

डॉ सुहास म्हात्रे's picture

23 Apr 2019 - 2:26 pm | डॉ सुहास म्हात्रे

दोन मानसिकतांची छान तुलना.

दुर्गविहारी's picture

23 Apr 2019 - 7:03 pm | दुर्गविहारी

छान. हा किस्सा नव्याने वाचला.

प्रकाश घाटपांडे's picture

4 May 2019 - 9:22 am | प्रकाश घाटपांडे

लेख आवडला

वकील साहेब's picture

7 Jun 2019 - 8:17 pm | वकील साहेब

खूप छान. आवडले.