इंदोरची खाऊ गल्ली!
कधी कधी रुटीन ह्या शब्दाचा देखील कंटाळा येतो इतकं ते
चालू असतं. मागच्या आठवड्यापर्यंत आमचा दाल रोटी खाओ प्रभू के गुण गाओ हाच कार्यक्रम चालला होता. अचानक तब्बल 4 दिवसांचा दौरा ठरला. तोदेखील इंदोर, उज्जैन आणि ओंकारेश्वर असा भरगच्च. आता इंदोर म्हणलं की लगेच तुमच्या समोर तिथली खादाडी आली असणार, माझ्या पण आली. आता एक जबाबदारी असते. म्हणजे नुसतच गेलो, खाल्लो आणि परतलो असं जमत नाही. तिथले सुंदर फोटो जमलंच तर व्हिडिओ, पाककृती यांची माहिती घ्यावी लागते आणि आपल्या मैत्रिणींना सांगितल्यावरच खादाडी पूर्ण होते. त्यामुळे मी देखील खादाडी व्यवस्थित प्लॅन केली.
इंदोर म्हणजे खवय्या लोकांच शहर. इथे आवर्जून भेट देण्यासारख्या 2 जागा एक म्हणजे सराफा बाजार आणि दुसरी म्हणजे छप्पन गल्ली! आता ही नावं का पडली ते सांगतो. सराफा बाजार हे खाण्याचं ठिकाण कस काय असू शकतं असा प्रश्न मलाही पडला होता. पण तीच तर गंमत आहे. इथल्या प्रसिद्ध राजवाड्याच्या मागच्या बाजूला सराफा बाजार आहे. हे मार्केट 8.30 ला बंद झालं की इथे एक एक करून आणि एक से एक खाण्याची दुकानं सुरू होतात. म्हणजे त्या सराफाच्या बंद दुकानासमोर. सराफा बाजाराची एकदम खाऊ गल्ली होऊन जाते. म्हणून याला हे नाव. रात्री 1-2 वाजेपर्यंत मग सोहळा चालू असतो. मी इथेच गेलो होतो. काही दुकानं, हातगाड्या जरी 8.30 नंतर सुरू होत असली तरी प्रसिद्ध दुकानं दिवसभर सुरू असतात. त्यापैकीच काही मोजक्या पदार्थांची ही सफर खास खादाड खाऊंसाठी सादर करत आहे...
ठीक 8 वाजता मी सराफा बाजारच्या गल्लीच्या तोंडाला उभा होतो. सगळी ज्ञानद्रिय अनुभवासाठी एकवटली होती. डोक्यात खाण्याशिवाय कुठलेही विचार नव्हते. माझ्यासोबत माझे इंदोरचे मित्र होते. जिंदगी ना मिलेगी दोबारा ह्या चित्रपटात दाखवल्याप्रमाणे ते माजलेले वळू कसे फुरफुरतात तसा मी देखील फुरफुरत होतो. बायको मला वेसण घालण्याचा प्रयत्न करत होती. सर्वप्रथम तिथे प्रसिद्ध असलेल्या आणि गल्लीच्या तोंडावरच असलेल्या विजय चाट हाऊस इथे मी धडकलो. कचोरी, ढोकळा हे नेहमीचं खाणं नको असं मित्राने सांगितलं आणि खोपरा पॅटिसची ऑर्डर गेली. अरुंद रस्ता, गर्दी ह्यापैकी कशाचीही पर्वा न करता मी बरोबर पॅटीसचा द्रोण उचलला. अप्रतिम तुम्हाला सांगतो. अहाहा. आतमध्ये खोबऱ्याचा भरपूर किस, चिंचेची आंबटगोड चटणी, हिरवी चटणी असं अफलातून मिश्रण. इतरही पदार्थ आहेत इथे पण हे पॅटिस सोडू नका. एकच पोट असल्यामुळे आणि इतरही पदार्थ खायचे असल्यामुळे फक्त 2च पॅटिस खाऊन जड मनाने पुढे सरकलो.
त्यानंतर गाठला कोकोनट क्रश. शहाळ्यातली मलई, पाणी इतर घटक पदार्थ एकत्र करून हा शेक बनवतात याची जास्त दुकानं नाहीत पण चव छान आहे. कल्पकतेने बनवला आहे हा शेक. भरपूर खोबरं पोटात गेलं होतं त्यामुळे मी पुन्हा माजल्या वळूसारखा फुरफुरायला लागलो.
मग आम्ही मोर्चा वळवला जोशी दहिवड्याकडे. इकडे याला दहीबडा म्हणतात आणि ते खरं देखील आहे. हा वडा खूपच बडा आहे. हा इथला सर्वात प्रसिद्ध आयटम. याच वैशिष्ट्य म्हणजे याचा आकार आणि दह्याची चव. घट्टसर दही, छान गोड चव आणि 5 मसाले यात टाकले जातात. हे मसाले 5 बोटांच्या चिमटीत घेऊन एका विशिष्ट क्रमाने टाकले जातात. हे जोशी काका हे मसाले टाकण्याआधी दहिवड्याचा भरलेला द्रोण उंच फेकतात. थोडं सुद्धा दही सांडत नाही. मला काही ही सर्कस फारशी आवडली नाही. खेळत काय बसायचं?पण लोकांना तेच जास्त आवडत होतं. तशी फर्माईश पण करत होते लोकं. मला गंमत वाटली. पण जर तुम्ही दहिवड्याचे शौकीन असाल तर एकदा तरी हा दहिवडा खाच. इतका चविष्ट आहे तो. मोठ्या प्रयत्नांनी 2 दहिवडे रिचवले. त्यातही दुसरा बडा बायकोला खाऊ घातला. माझं प्रेम मी सिद्ध केलं.
मग मागवला, भुट्टे का किस. म्हणजे आपलं मक्याचं कणीस. हा देखील मस्त आहे पदार्थ. मक्याचा किस दुधामध्ये शिजवला जातो. आणि मग चाट मसाले टाकून द्रोणात खायला देतात. शक्यतो मधु मका वापरला जातो. वेगळी आहे चव. एकदा जरूर चाखावी अशी.
आता वळूच रूपांतर सुस्तवलेल्या रेड्यात झालं होतं. कारण पोटात जागा नव्हती. काय करावं सुचत नव्हतं. थोडी चक्कर मारून आलो आणि एखादा पदार्थ खाता येईल अशी शक्यता निर्माण झाली. समोरच एक नवीन पदार्थ दिसला. गराडू. नाव जरा विचित्र वाटलं. हे काय आहे सांगतो. रताळ्याच्या कुटुंबातील एक कंदमूळ म्हणजे गराडू. ह्याला चांगलं वर्षभर ठेवतात आणि काढतात मग ह्याला तळतात. आणि मग मस्तपैकी मीठ आणि चाट मसाला टाकून खातात. रताळ्याला स्वतःची एक चव असते तशी ह्याला नाही. कुटुंबातल्या मठ्ठ लेकराला पाहुणे आले की कस चांगले कपडे घालून, गंध पावडर करून त्यातल्या त्यात सामान्य दाखवण्याचा प्रयत्न करतात तसला प्रकार वाटला मला. तरीही एखादा ठोंब्या आपला पोपट करतोच तसंच काहीतरी ह्या पदार्थाचं झालंय. नाही खाल्ला तरी चालेल. ह्यावर माझं नाव लिहिलेलं होतं म्हणून मी तो खाल्ला इतकंच. आता मात्र काहीही पोटात जाणं शक्यच नव्हतं. जिभेवर सगळ्या चवी फेर धरून नाचत होत्या. शांत वाटत होतं. इतरही अनेक पदार्थ आहेत इथे चाखण्यासारखे जसं की मोठी जिलेबी किंवा आपण तिला जिलेबा म्हणू. हिचा(की ह्याचा) आकार जरा जास्तच मोठा असतो चव काही फार वेगळी नसते असं मित्राचं म्हणणं आलं. खाणं तर शक्य नव्हतंच. त्यामुळे ते टाळलं. गुलाबजाम देखील जागोजागी दिसत होते. बाकी फायर पान आणि धुवा पान आताशा मिळायला लागलेत. त्यामुळे काही मोजक्याच पदार्थांचा आस्वाद घेऊन आणि तृप्त होऊन आम्ही सराफा बाजाराचा निरोप घेतला. बाकी सराफा बाजारात जाऊन सोन्यासारखं अन्न खाण्याची ही एकमेव जागा भारतात असावी असा मला दाट संशय आहे.
श्री अन्नपूर्णा प्रसन्न!
वाचन
24597
प्रतिक्रिया
0