मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

टिंग्डि टिडिडिडि

वपाडाव · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
टिंग्डि टिडिडिडि टिंग्डि टिडिडिडि टिंग्डि टिडिडिडि टिंग्डि टिंग्डिटिंग. . 1994 सालची गोष्ट आहे. अर्थात हे सर्व समजण्याचं वयही नव्हतं तेव्हा. फारतर चवथ्या इयत्तेत असेन. आमची आवड त्याकाळी 'हम आपके है कौन' टाइप सिनेमा पुरती मर्यादित होती. आणि आवडते गाणे माइ नी माइ. (किंबहुना तेच दाखवले जात असल्यामुळे आमचा व्यासंगही इतका विस्तृत नसेल. 'अ आ ई, उ ऊ ऊ, मेरा दिल ना तोडो' वगैरे निषिद्ध होतं तिथे हे काय?) . पण तारुण्यात प्रवेश केला आणि ह्या गाण्याची महती समजली. . टिंग्डि टिडिडिडि टिंग्डि टिडिडिडि टिंग्डि टिडिडिडि टिंग्डि टिंग्डिटिंग . ए $$ हे $$ आ $$ हा $$ हा $$ हा हे $$ हे $$ आ $$ हा $$ हा . टिंग्डि टिडिडिडि टिंग्डि टिडिडिडि टिंग्डि टिडिडिडि टिंग्डि टिंग्डिटिंग . हा रिदम ऐकल्यावर ज्याच्या अंगावर शहारे-रोमांच-काटे येत नाहीत असा माणूस विरळा. . पिवळ्या-करड्या रंगाच्या अर्धपारदर्शक शिफॉन साडीत, भरलेल्या अंगाची, उंचपूरी, सौंदर्य-मादकता यांचा मिलाफ असलेली, कमनीय शरीराचं देणं लाभलेली, पहिल्या पावसाच्या सरिंनी भिजलेली, कामातुर रविना डोळ्यासमोर येत नसेल तर नवल! . तब्बल 25 वर्षे. दोन तप झाले. तरीही काल-परवा ऐकल्यासारखं वाटतंय. अगदी परिपूर्ण गाणं आहे हे. गेयता, नर्तनमूल्य व प्रणय या सर्वांनी ओतप्रोत भरून, ओथंबुन वाहणारा प्रपात. गाण्यातील शब्द-अर्थ-लय एकदम सुसंबद्ध आहे. संगीतकाराने चढत्या चालीचा केलेला वापरही अप्रतिम. *ए-हे-आ-हा-हा-हा* ह्या मार्दवात अलकाने आणि त्याचवेळी आपल्या बोलक्या डोळ्यांनी रविनाने कमाल केली आहे. हृदयाची सतत वाढत चाललेली धडधड जाणवणारी. त्यावर कडी केली आहे नृत्यदिग्दर्शकाने. पावसाचा, तिच्या तलम वस्त्राचा, भिजलेल्या केसांचा अन कमनीय बांध्याचा केलेला वापर. उफ़्फ़्फ़. काय सांगु अन किती सांगु!! . त्यावर कहर म्हणजे रांगडा मर्द अक्षयकुमार. तो ज्या सहजतेने तिला कवेत घेतो अन गिरकी मारतो, केवळ अशक्य. अक्षयचं लाजणं देखील सूचक-अर्थपूर्ण आहे. . अंधाऱ्या जागेत फटीतुन झिरपत येणाऱ्या प्रकाशाच्या कवडशांचा, टपकणाऱ्या थेंबांचा, तुटक्या-मोडक्या जिन्याचा आणि सर्वात कहर म्हणजे टेरेसवरील जागेचा, सैरभैर वाऱ्याचा, अमर्याद पावसाचा अन दोन सचेतन कायांचा उस्फुर्त संवाद दिग्दर्शकाने टिपला आहे. . रविना ही काही त्याकाळची आघाडीची नटी नव्हती किंवा तिच्या अभिनयाच्या जोरावर (माधुरी-जूही-श्रीदेवी प्रमाणे) सिनेमे हिट करून देत नव्हती. एक मल्टीस्टारर (नसीर-परेश-सुनिल-अक्षय) सिनेमा, त्यात असावी म्हणून घेतलेली नटी. . पण जे व्हायचं तेच झालं. एक अजरामर कलाकृती घडली. खुद्द डायरेक्टरने देखील विचार केला नसेल इतकं जुळून आलेलं समीकरण आहे हे गाणं. . ह्या गाण्याची फ्रेम-न-फ्रेम, अगदी अक्षय छत्री हातात धरून जिना चढून वर येताना ते रविना धुंद होऊन जलपरीसारखी टेरेसवरील पाण्यात लोळत असेपर्यंत, कोरल्यागत आठवते. बीट-न-बीट, शब्द-न-शब्द, रविनाची अदा-न-अदा लक्षात आहे. मनात घर करून बसले आहे. . मला तरी हे गाणं *वन्स इन अ डिकेड* टाइप वाटते. ह्या संपूर्ण टीमसाठी, अलका याग्निक -उदित नारायण - आनंद बक्षी - विजु शाह - राजीव राय - अक्षय कुमार आणि स्पेशली रविनासाठी एकदा बघाच. . #रसग्रहण #मोहरा #रविना #टिपटिप - काळे पुष्पक

वाचन 22077 प्रतिक्रिया 0