- डॉ. सुधीर रा. देवरे
(‘मी गोष्टीत मावत नाही’ - पद्मगंधा प्रकाशनातर्फे नुकत्याच प्रकाशित झालेल्या कादंबरीचा विशिष्ट संपादित अंश.)
करमणूक: आपली करमणूक करून घेण्यासाठी काय काय करता येईल माणसाला? कोणत्याही दोन देशांतील युद्धाचे टी.व्ही. ने थेट प्रक्षेपण केले तर किती भव्य करमणूक होईल शांतताप्रेमी देशातील माणसांची! अशा कार्यक्रमावर प्रायोजकांच्या नुसत्या उड्या पडतील. मग जाहिरातींचा भाव पाच सेकंदांसाठी पाच कोटी रुपये. अणुबाँम्ब टाकण्याच्या दृश्याआधीच्या जाहिरातीसाठी एका सेकंदाला पंचवीस कोटी रुपये पडतील. बोला. एक वार. दोन वार. तीन वार. युद्धाच्या समर प्रसंगी थेट प्रक्षेपणासाठी जास्तीत जास्त युद्ध दाखवता यावे म्हणून मोजक्याच मिनिटांच्या जाहिराती उपलब्ध. त्वरा करा. संपर्क साधा.
भारत-पाक युद्ध झाल्यास अमेरिका तटस्थ
न्यूयॉर्क, दि. १ (वृत्तसंस्था): भारत व पाकिस्तान या दोन्ही देशांत निर्माण झालेल्या तणावातून भारत-पाक अणुयुद्ध सुरू झाल्यास अमेरिका युद्धात हस्तक्षेप करणार नाही, पण या युद्धात जगलेल्या वाचलेल्यांना मदतीचा हात पुढे करील, असे अमेरिकेतील प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे.
भारत-पाक संघर्षाला सुरूवात झाली तरीही अमेरिका कोणत्याही बाजूने आपले शस्रसामर्थ्य वापरणार नाही, असे अमेरिकेतील नियतकालिक न्यूजवीकने यासंदर्भात केलेल्या विश्लेषणात म्हटलेले आहे. पण युद्धात वाचलेल्यांसाठी मदतीचा हात मात्र पुढे करू. व्हाईट हाऊसच्या वरिष्ठ अधिकार्याचा दाखला देऊन न्यूजवीकने हे वृत्त दिलेले आहे. अमेरिकेतील दुसरे प्रसिद्ध नियतकालिक 'टाईम' नेही भारत-पाक युद्धाचा संभाव्य अंदाज व्यक्त केलेला आहे... अमेरिकन लष्कर पेंटॅगॉनने भारत-पाक अणुयुद्ध सुरू झाले तर अमेरिकेची प्रतिक्रिया काय असावी याचा विचार केलेला होता. भारत व पाकिस्तान यांच्यात काश्मीर प्रश्नावरून अणुयुद्ध सुरू झाले तर अण्वस्त्रांचा वापर होऊ नये म्हणून काय करता येईल यावरही पेंटॅगॉनने विचार केलेला होता. पण भारत पाक युद्ध सुरू झालेच तर अणुयुद्ध रोखता येणार नाही असाच या विश्लेषणाचा निष्कर्ष निघाला. अशी माहिती टाईमच्या अंकात देण्यात आलेली आहे. भारत व पाकिस्तान यांच्यावर घातलेले आर्थिक निर्बंध पाकिस्तानला अधिक जाचक ठरतील हे अमेरिकन तज्ञांनी मान्य केले. पण परिणामी आर्थिक अडचणीत आलेला पाकिस्तान ही अण्वस्त्रे व तंत्रज्ञान अरब देशांना विकू शकतो, असे एका अधिकार्याने सांगितले.
सृष्टीकडून उंदराकडे
एक अब्ज म्हणजे १०० कोटी. भारतातील उंदरांची संख्या माणसांच्या तीस पट आहे. तीन हजार कोटी उंदीर म्हणजे दरडोई तीस उंदीर. माणूस आणि उंदीर यांच्यातील गुणोत्तर ध्यानात घेण्यासारखे आहे. उंदीर आपल्या देशातील तीस टक्के अन्नधान्याचा फडशा पाडतात. भारताचे धान्य उत्पादन वीस कोटी टन आहे. म्हणजे तीस पट आधिक. संख्येच्या मानाने उंदीर कमीच खातात. उंदरांना दारिद्र्यरेषा ओलांडता येत नाही आणि माणसांना बीळ... लोकसंख्येचा टाईम साधून आलेला बॉम्ब आणि अग्रलेखात अलंकारीक भाषेत लेख. सेकंदागणिक तुरूतुरू पळणारे उंदीर प्रश्नांसारखे दबा धरून लपून.
धार्मिकता:
टोकाची धार्मिकता पाळणारे लोकच सर्व नैतिकता धुळीला मिळवताना दिसतात. मुंबईची दंगल ही दोन्ही बाजुंच्या आस्तिक लोकांची दंगल होती. सगळ्याच धार्मिक दंगली आस्तिकतेमुळे होतात. बॉम्बस्फोट धार्मिक एकांगीकतेमुळे झालेले आहेत. बाबरी मशीद आणि आस्तिकता. पॅलिस्टीनी अतिरेकी मुस्लीम धार्मिक आस्तिक आहेत. काश्मिरी दहशतवादी आस्तिक आहेत. आणि मतांसाठी लोकांच्या धार्मिक भावना भडकविणारे राजकीय पक्षही आस्तिक आहेत. खूनांपासून पैशाने फसवणुकीचे आरोप ज्या चंद्रास्वामी नावाच्या साधूवर झालेत तो आस्तिक होता. धिरेन्द्र ब्रम्हचारी नावाचा एक आस्तिक. सत्यसाईबाबा नावाचा भोंदू आस्तिक होता. हिटलरसारखा नरभक्षक आस्तिक होता आणि त्याचे गोडवे गाणारे लोकही आस्तिकच आहेत. भिद्रनवाला नावाचा मस्तवाल अतिरेकी आस्तिक होता. अतिरेक्यांना धर्माची अफू देवून आस्तिकाचे उदाहरण पाहिले तर जग निरिश्वरवादी झाल्यावर संहार करणारे लोक कधीच यशस्वी होणार नाहीत. कारण त्यांना धार्मिक प्रतिष्ठा प्राप्त न झाल्याने त्यांना लौकीक यश कधीच मिळणार नाही.
देवभोळा:
विशिष्ट ग्रहावर चराचर सृष्टी असावी. मानवी अस्तित्वामागे अशी काही खरोखरच ईश्वरी प्रेरणा वगैरे असती तर एकाच ग्रहावर धर्म- पंथांची इतकी बजबजपुरी माजली नसती. माझा एक देवभोळा मित्र, ज्याला अतिसामान्य आचरणही पाळणे शक्य होत नाही, त्याला दृष्टांत झाला, "तू ज्याची प्रार्थना करतो तो अस्तित्वात नाही म्हणून बरे, नाहीतर त्याने पहिल्यांदा तुझ्याच मुस्कटात मारली असती.’’
सत्कार दखलपात्र गुन्हा:
दर पाच वर्षांनी नवे (काही जुनेच) लोकप्रतिनिधी म्हणजे आमदार-खासदार निवडून येतात. काही प्रामाणिक प्रतिनिधींचा अपवाद वगळता निवडून येण्यासाठी अनेक उठाठेवी, तडजोड, भेद, लाचखोरी, सौदेबाजी, दारूबाजी, पार्टीबाजी वगैरे प्रयत्न केले जातात. आणि खर्या अर्थाने लोकप्रतिनिधी नसूनही वीस-पंचवीस टक्क्याच्या मतांनी पण इतर विरोधकाच्या तुलनेत जास्त मते मिळाली म्हणून अमूक एक लोकप्रतिनिधी लादून घेण्याचा प्रसंग मतदारांवर येत असतो. अशा प्रकारची निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींचा अनुनय करण्यासाठी 'सत्कार' अंक सुरू होतो. स्वार्थाची पोळी भाजून घेण्यासाठी अशा लोकप्रतिनिधींजवळ जाण्याचा सरळ आणि सोपा मार्ग म्हणजे त्या लोकप्रतिनिधींचा जाहीर सत्कार घडवून आणणे. हा एककलमी कार्यक्रम मतदारातील महत्वाकांक्षी लोकांकडून सुरू होतो. आणि निवडणूक संपून सहा महिने उलटून जातात तरी हे प्रतिनिधी सत्कारच घेत राहतात. या सत्कार प्रसंगी भाषण बाजीचे बार फुटत राहतात. 'हुजरेगिरी' करणार्यांची एक लांबलचक रांग तयार होते. देवाच्या आरतीत जशी अवास्तव स्तुती ठासून भरलेली असते तसे हे लोक स्तुतीचे फुगे प्रतिनिधींवर सोडत राहतात. लोकशाहीचे असे विडंबन टाळण्यासाठी असा सत्कार घडवून आणणे हा कायदेशीर दखलपात्र गुन्हा ठरायला हवा. ज्या जनतेने आपल्याला निवडून दिले तिच्याकडूनच सत्कार घेणे हे लोकप्रतिनिधींनाच लज्जास्पद वाटायला हवं. खरं तर लोकप्रतिनिधीने नागरिकांचा सत्कार करायला हवा. म्हणजे त्यांची कामे मार्गी लावायला हवीत.
साखळी:
समन्वयवादी लोक यशस्वी होतात... समन्वयवादी लोक महात्मे होतात... तत्वज्ञ होतात... संतही होतात... देवही होतात... समन्वयवादी लोक समाजात पुजले जातात... लोकांना धक्के सहन होत नाहीत... लोक दगड आणि देवातला फरक नीट ओळखत नाहीत... लोक देवाला दगड म्हणत नाहीत आणि दगडाला देव! योग्य आकाराचे दगड योग्य वेळी देव होऊन बसतात! लोक कोणत्याही काळात फक्त लोकच राहतात. लोक देव निर्माण करतात... देव लोकांचे आभार मानत नाहीत... लोकांना आपले लोकपण कळत नाही... लोक देवपूजा करत सुखात अथवा भ्रमात मरून जातात...
विकास:
समजा बकर्यांच्या मेंदूचा विकास झाला असता... म्हशींच्या मेंदूचा विकास झाला असता... बैलांच्या मेंदूचा विकास झाला असता... माणसांऐवजी... तर त्यांनीही लावले असते शोध, त्यांच्याचसाठी उपयुक्त असे... त्यांच्या बाह्यरूपासारखेच दिसले असते देव... त्यांच्या कल्पनेप्रमाणेच चितारल्या असत्या त्यांच्या देवतांच्या लीला... त्यांच्या सारख्याच लिहिल्या गेल्या असत्या पोथ्या. आणि आपण म्हणजे माणूस, जसा पाळतो घोडा... बैल... म्हैस... बकरी. तसे त्यांनीही पाळले असते कदाचित माणसं... गळ्यात कुत्र्यासारखा पट्टा बांधून... त्यांनीही सांगितली असती मग एखाद्या पुराणातली कथा. या जन्मात पाप केलं की माणसाचा जन्म मिळतो... पण माणसाच्या मेंदूचा विकास झाला आणि सर्व उल्टंपाल्टं झालं...
अथवा
एक बैल दुसर्या बैलाला जिवानिशी ठार मारत नाही... एक हत्ती दुसर्या हत्तीला जिवानिशी ठार मारत नाही... एक म्हैस... एक वाघ... एक सिंह... एक मेंढी... एक बकरी... दुसर्या म्हैस... कुत्रा... वाघ... सिंह... मेंढी... बकरीला ठार मारत नाही... एक माणूस दुसर्या माणसाला शांतचित्तपणे ठार मारू शकतो...
बैल बैलाशी बोलत नाही... हत्ती हत्तीशी भाषा करत नाही... वाघ वाघाशी... सिंह सिंहाशी विशिष्ट भाषेत सलग संवादत नाहीत. म्हैस... मेंढी... बकरी आणि सर्व प्राण्यांचे काही सांकेतिक हुंकार सोडले तर ते एकमेकांशी सलग संवाद साधत नाहीत... प्राण्यातल्या भाषेत लिपी नाही... व्याकरण नाही... नियम नाहीत... प्राण्यात स्तुतीची भाषा नाही आणि द्वेषाची... मत्सराची वर्मी लागेल अशी कठोर भाषा नाही... एक प्राणी दुसर्या प्राण्याची तिसर्या प्राण्याजवळ चुगली करत नाही आणि निंदाही करू शकत नाही... भाषा अस्तित्वात नसल्यामुळे... कोणताच प्राणी कोणत्याच प्राण्याचे चारित्र्य हनन करत नाही. आणि... कोणताच नर कोणत्याच मादीशी चोरून व्यभिचार करत नाही... संबंध राजरोस अनुनयाने ठेवले जातात... ते एकमेकांच्या जीवावर उठत नाहीत... प्राणी भाषणं करत नाही. माणूस माणसाच्या जिवावर उठायला भाषा कारणीभूत ठरत असेल तर माणसाची भाषा नष्ट करायला हवी का!!!...
(कादंबरीतल्या मजकुराचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)
– डॉ. सुधीर रा. देवरे
ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
प्रतिक्रिया
1 Apr 2019 - 5:04 pm | ज्ञानोबाचे पैजार
मस्त बातमी... अभिनंदन
पैजारबुवा,
4 Apr 2019 - 4:45 pm | डॉ. सुधीर राजार...
धन्यवाद सर
1 Apr 2019 - 7:05 pm | सुबोध खरे
एक बैल दुसर्या बैलाला जिवानिशी ठार मारत नाही... एक हत्ती दुसर्या हत्तीला जिवानिशी ठार मारत नाही... एक म्हैस... एक वाघ... एक सिंह... एक मेंढी... एक बकरी... दुसर्या म्हैस... कुत्रा... वाघ... सिंह... मेंढी... बकरीला ठार मारत नाही... एक माणूस दुसर्या माणसाला शांतचित्तपणे ठार मारू शकतो...
बैल बैलाशी बोलत नाही... हत्ती हत्तीशी भाषा करत नाही... वाघ वाघाशी... सिंह सिंहाशी विशिष्ट भाषेत सलग संवादत नाहीत. म्हैस... मेंढी... बकरी आणि सर्व प्राण्यांचे काही सांकेतिक हुंकार सोडले तर ते एकमेकांशी सलग संवाद साधत नाहीत... प्राण्यातल्या भाषेत लिपी नाही... व्याकरण नाही... नियम नाहीत... प्राण्यात स्तुतीची भाषा नाही आणि द्वेषाची... मत्सराची वर्मी लागेल अशी कठोर भाषा नाही... एक प्राणी दुसर्या प्राण्याची तिसर्या प्राण्याजवळ चुगली करत नाही आणि निंदाही करू शकत नाही... भाषा अस्तित्वात नसल्यामुळे... कोणताच प्राणी कोणत्याच प्राण्याचे चारित्र्य हनन करत नाही. आणि... कोणताच नर कोणत्याच मादीशी चोरून व्यभिचार करत नाही... संबंध राजरोस अनुनयाने ठेवले जातात... ते एकमेकांच्या जीवावर उठत नाहीत...
संपूर्ण गैरसमज
4 Apr 2019 - 4:46 pm | डॉ. सुधीर राजार...
हरकत नाही. धन्यवाद
1 Apr 2019 - 7:17 pm | सुबोध खरे
टोकाची धार्मिकता पाळणारे लोकच सर्व नैतिकता धुळीला मिळवताना दिसतात.
अजून एक प्रचंड गैरसमजावर आधारित विधान.
जगभरात सर्वात जास्त नृशंस हत्या आणि अत्याचार या निधर्मी/कम्युनिस्ट लोकांनीच केलेल्या आहेत.
गेल्या शतकात अंदाजे ७ ते ११ कोटी लोकांची साम्यवादी लोकांनी हत्या केलेली आहे
According to Benjamin Valentino in 2005, the number of non-combatants killed by Communist regimes in the Soviet Union, People's Republic of China and Cambodia alone ranged from a low of 21 million to a high of 70 million.[q][r] Citing Rummel and others, Valentino stated that the "highest end of the plausible range of deaths attributed to communist regimes" was up to 110 million".
https://en.wikipedia.org/wiki/Mass_killings_under_communist_regimes
हा आकडा इस्लामी दहशतवाद्यांनी केलेल्या हत्यांपेक्षा कितीतरी जास्त आहे.
अगदी अलीकडे --निधर्मी चीन मध्ये १० लाखपेक्षा जास्त उइगूर मुसलमान लोक अटकेत आहेत
https://www.vox.com/2018/8/15/17684226/uighur-china-camps-united-nations
4 Apr 2019 - 4:48 pm | डॉ. सुधीर राजार...
दुसरी बाजू अशीही असू शकते. धन्यवाद
1 Apr 2019 - 8:12 pm | वामन देशमुख
मस्त लिहिलंय हं, वाचून खूप करमणूक झाली... एप्रिल फुलच्या दिवशी! ;)
4 Apr 2019 - 4:48 pm | डॉ. सुधीर राजार...
धन्यवाद
1 Apr 2019 - 10:01 pm | तेजस आठवले
बुकगंगा वर तुमची चार पुस्तके दिसली. तुमचे अभिनंदन.
परंतु, माझ्या मते, तुम्ही मिपावर जे काही लिहिता किंवा प्रकाशित करता ते भाबडे लेखन असते. रटाळपणा बरेचदा जाणवतो.
हे 'मी गोष्टीत मावत नाही' पुस्तक तुम्ही लिहिले आहेत हे तुम्ही लेखात सांगितले नाही.असो.
वाघ/सिंह आणि इतर बरेच प्राणी मादीवरून/समागम कोणी करायचा म्हणून/ आपल्या हद्दीसाठी जीवघेण्या माऱ्यामाऱ्या करतात आणि एकमेकांचे जीवही घेतात. प्राण्यांमध्ये बलात्कारही होतात.वाघ/सिंह आपला वंश चालू ठेवण्यासाठी मादीशी समागम करतात आणि तिचे आधीचे बछडे मारून टाकतात.
मगरबाई अंडी घालतात आणि ती उबवता उबवता जागा सोडता न आल्याने उपाशी राहतात. ह्याची कसर भरून काढण्यासाठी अंडी फोडून पिल्ले बाहेर येताना स्वतःचीच अर्धी पिल्ले त्या खाऊन टाकतात.
बाबरी मशीद घटनेचा उल्लेख ठीक आहे पण त्याआधी दहा दशके इस्लामी राक्षसाने भारतवर्षाच्या आणि हिंदू धर्माची जी अगणित हानी केली ती विसरता येत नाही.वाईट मुलाने वाट्टेल ते अपराध करावे आणि चांगल्याचा एका अपराधाबद्दल त्याला दरवेळी टोकावे तसे झाले आहे बाबरी घटनेचे.
असो, तुमच्या लेखन कार्याला शुभेच्छा.
3 Apr 2019 - 7:13 pm | सुबोध खरे
मगरी स्वतःचीच अर्धी पिल्ले त्या खाऊन टाकतात.
याला कोणताही शास्त्राधार नाही.
मगरीचे अंडी हि जमिनीवर( आत पुरलेली) घातलेली असतात. तेथून पिल्ले पाण्या पर्यंत पोहोचे पर्यंत अनेक वेळेस परभक्षी पक्षी त्यांना खाऊन टाकतात यापासून पिल्लांचा बचाव होण्यासाठी बऱ्याच वेळेस मगरी आपल्या पिल्लाना दातात पकडून पाण्यात सोडतात.
हे पाहून लोकांचे आणि पूर्वीच्या काही प्राणिशास्त्रज्ञांचे गैरसमज झालेले आहेत कि मगरी आपल्या पिल्लाना खाऊन टाकतात.
4 Apr 2019 - 4:50 pm | डॉ. सुधीर राजार...
दुसरी बाजू आपण चांगल्या पध्दतीने मांडली. आवडले युक्तीवाद. धन्यवाद
1 Apr 2019 - 11:53 pm | भंकस बाबा
कासोट्याला हात घालणारे प्रतिसाद आल्यामुळे लेखक महोदय अंतर्धान पावतील.
सदर लेखन हे जर एखादा विनोदी लेख म्हणून वाचले तर करमणुक होईल अन्यथा त्यातील आशय शोधताना डोक्याची भुसकटे पडतील
4 Apr 2019 - 4:51 pm | डॉ. सुधीर राजार...
आपण सडेतोड बोलल्याने धन्यवाद