सहा दिवस सायकल भ्रमंती : भाग 4 : खेड ते हरिहरेश्वर

अन्या बुद्धे's picture
अन्या बुद्धे in भटकंती
30 Mar 2019 - 12:49 pm

17.03.2019

सकाळी साडेसहाला खेड सोडलं तेंव्हा श्रीनि कार ने, अप्पा आणि सूरज सायकलवर माझ्या सोबत होते. अप्पा 5एक km नंतर परत फिरले. काही अंतराने श्रीनि पण निघून गेले आणि मग आम्ही दोघेच उरलो. सूरज आणि खेड सायकल ग्रुपचा हा नेहमीचा रूट. त्यांच्या नेहमीच्या खुणा दाखवत सूरज सोबत होते. झकास वातावरणात प्रवास सुरु होता. 15 कमी नंतर कुवे घाट सुरू झाला. घाट संपायच्या थोडं आधी सूरज दरीकडे पहात उभे दिसले. जवळ गेल्यावर दरीपलीकडच्या चढावर रान डुकरांचा मोठा कळप दाखवला. ते उत्साहाने 'तो बघा! बाब्बो!' वगैरे म्हणत होते पण मला काहीच समजत नव्हतं. तरी 'ओह! हम्म!' असे काही उद्गार काढत होतो. सूरज च्या ते लक्षात आलं असावं. त्यांनी एक दगड त्या दिशेने भिरकावला आणि अचानक समोरची जमीन हलली, पळायला लागली. 15 तरी मी मोजली. स्थिर असताना ती आसपासच्या वातावरणात अगदीच मिसळून अदृश्य होती. घाटाचा टॉप गाठला. आणि आता दापोलीकडे वळलो. वास्तविक सूरज दापोली पर्यंत यायचे होते पण बहुदा माझ्या रटाळ वेगळा कंटाळून इथूनच परत जातो म्हणाले. ते परत गेल्यावर मी नेहमीप्रमाणे एकला चालो रे म्हणत निघालो.

खेड मध्ये आल्यापासून सरळ रस्ता दुमिळ झाला होता. सततचे चढ उतार. पण आता दापोली हर्णे कडे निघालो होतो म्हणजे समुद्राकडे, म्हणून एकूणात उंचावरून खालीच. झकास प्रवास सुरु होता. टिपिकल रानाचा वास होता. अधून मधून 200 मॅक्स घरांची गावं येत जात होती. या वातावरणात निवांत कॉफी वगैरे घ्यायची इच्छा होती पण दुकानं अजून कुलपात घोंगडी पांघरून साखरझोपेत होती. म्हणून न थांबता झूम निघालो.

काही काळाने स्वच्छ पाण्याचा 20 एक फूट रुंद प्रवाह, दोन्ही बाजूला त्यात आपलं प्रतिबिंब पाहणारी झाडं घेऊन सोबत करत होता. रस्त्यावरून 15एक फूट खाली उतरून पाण्यात पाय सोडून बसावं अशी अतिव इच्छा झाली म्हणून सखी सोबत रस्ता सोडून खाली उतरलो.
1

2
काही अंतरावर तिला उभं करून अर्धा पाण्यात आणि अर्धा बाहेर असा दगड दिसला तिकडे निघालो. किनारा अगदी उताराचा आणि सुक्या पानांनी भरलेला. त्यावर पाय टाकला आणि काही समजायच्या आत सरकलो. प्रतिक्षिप्त क्रियेने मागे टेकवलेले हात मनगटापर्यंत लोण्यासारख्या मातीत रुतले. त्यावर स्वतःला तोलून अर्धा एक सेकंद थांबलो. कष्टाने सावरत परत बाहेर आलो. हसत हसत झाडाच्या पानांना हात पुसले पाय चिखलात माखलेले ते शक्य तितके दगडावर घासून हलके केले. गप सखीला उचलून रस्त्यावर आलो आणि निघालो. एखाद km वर जलशुद्धीकरण केंद्र वगैरे होतं त्याच प्रवाहावर. तिकडे जोरदार फोर्स असलेल्या नळावर हात पाय स्वच्छ केले. इतक्यात तिथला कर्मचारी आला. माझ्याकडे विचित्र नजरेने पाहणाऱ्या त्याच्या प्रश्नांची उत्तरं दिली, माझी फजिती सांगितली, झालेला आणि पुढला प्रवास सांगितला. त्याच्या थर्मासमधला चहा घेतला आणि दापोलीकडे निघालो.

आता दापोली 8 km उरलेलं. कधी एकदा आसूद पुलावर मिसळ चापतो असं झालेलं. आता चढ उतार देखील कमी होते. मग चांगल्या वेगात दापोली गाठलं. तिथे उगाच 5 मिनिट tp करून उताराला लागलो. निवांत तरंगत आसूद पुलावर पोचलो. मिसळ लस्सी झाल्यावर सखी सोबतच्या बाटलीत भरायला लिंबूसरबत मागितलं तर नाही मिळत म्हणाले. या उत्तराची खरंच कमाल वाटते! मग मीच लिंबू साखर मीठ मागवून सरबत बनवून घेतलं. सॅक मध्ये थंड पाण्याची बाटली घेऊन साडेनऊ नन्तर तिथून निघालो. हा परिसर माझ्या चांगल्या परिचयाचा. इथे भरपूर धमाल केली आहे एकेकाळी. त्या जुन्या आठवणीत रमलो आणि हर्णे कधी आलं समजलच नाही. कोकणातल्या खराब रस्त्यांचा पहिला अनुभव इथे आला आणि नंतर येतच राहिला. इथून पुढे चांगला रस्ता अपवादानेच मिळाला.
3
हर्णे आंजर्ला पार झालं आणि एक कुवे घाटासारखाच 5एक km चा घाट आला. आता ऊन तापायला सुरवात झाली होती. घाट संपायला एखाद km बाकी असताना थकून एका झाडाच्या सावलीत चिक्की ब्रेक घेतला. तब्बल 20 मिनिट. आता इथून केळशी मार्गे वेळास करून वेस्वी जेट्टी की 10 मिनिटात पलीकडे. पुढे 5-7 km वर हरिहरेश्वर. सो पहिला टप्पा म्हणजे साडेबारा पर्यंत केळशी गाठणे. तिथे जेऊन आराम करून 3ला निघालो की पुढल्या 3 तासात 35 km अंतर पार करणे सहज जमेल. या चढ उताराच्या रस्त्याने देखील.. चिक्की आणि लिंबू सरबत पिऊन ताजा झालो होतो. आता केळशी गाठूनच थांबायचं नक्की केलं आणि निघालो. घाट पार झाला आणि रस्ता अगदी अरुंद झाला. एका वेळी एकच बस जाईल इतकाच. रस्त्याचं काम सुरू होतं अधेमधे म्हणून मधेच बरा वेग मधेच खडखडत असा प्रवास सुरु होता. दुतर्फ़ा छान झाडी होती पण आता सूर्य डोक्यावर आला होता. या 15 km ने चांगलाच कस काढला. पण दीड तासाने केळशीत एन्ट्री घेतली. हॉटेलांची नावं वाचत एकूण अंदाज घेत पूर्ण गाव पार केलं आणि परत मागे फिरलो. आणि एका घरगुती खानावळीत चौकशी केली. त्यांच्या घराच्या पडवीत सखीला उभं रहायला सावलीची जागा मिळाली. आणि मला मागल्या अंगणात पसरायला उशी आणि सतरंजी मिळाली. अजून काय हवं! अर्ध्यातासाने अर्धवट झोपेत असताना जेवण तयार आहे अशी सूचना मिळाली. टेबल लावतो ही सूचना धुडकावून तिथेच जमिनीवर मांडी ठोकून परमेश्वराच्या प्रथमावताराला मोक्ष दिला. इतक्यात दुसरी गिर्हाईक आली. म्हणून उशी सतरंजी घेऊन अंगणापलीकडच आंब्याचं झाड गाठलं. पावणेतीन चा गजर लावून विकेट फेकली.

जवळचं पाणी लिंबू सरबत परत रिप्लेनिश करून 3 वाजता निघालो. दुपारच्या झोपेन थकवा निघून गेला होता. परत तशाच अरुंद रस्त्याने प्रवास सुरु झाला. 15-20 मिनिटांनी एखादी बाईक क्रॉस व्हायची. बाकी मी आणि निरव शांतता. रस्त्यावर सखीचा चाकाचा आवाज देखील स्पष्ट ऐकू येत होता. नंतर 3एक km नुकतंच डाम्बर टाकलेल्या भागातून गेलो. या पॅच ने जीव काढला. रस्ता चाक धरून ठेवत होता. आणि उतारावर देखील पेडल केल्याशिवाय सखी पळू शकत नव्हती. साधारण 15 km नंतर झाडीतून बाहेर पडलो. रस्ता तितकाच अरुंद होता पण आसपास मोकळं झालं आणि नदी सामोरी आली. पाणी अगदीच गुडघाभर पण स्वच्छ, अगदी तळ स्पष्ट दिसेल अस आणि वाहतं होतं. पुलाच्या पलीकडे उजवीकडे 25एक बकऱ्या घेऊन एक आजोबा निवांत बसले होते. सकाळी चिखलात पडल्याचं आठवून परत हसू आलं. पण ही जागा खास होती. इथे न थांबता जाणं त्या जागेचा अपमान झाला असता. सखीला आजोबाजवळ उभं केलं. सॅक उतरवली, टीशर्ट सॅक वर टाकला चश्मा वगैरे व्यवधानं बाजूला केली आणि छान दगड बघून त्या गुडघाभर पाण्यात बसलो. ओंजळीत पाणी घेत मिनी अंघोळच केली. समोर पलीकडल्या तीरावर खंडया मासेमारी करत होता. त्याच्या कौशल्याचं कौतुक केलं. ओल्या अंगाडोक्यावर हलका वारा मस्त वाटत होता. शेवटी वेळेचं भान ठेवत नाईलाजाने तिथून निघालो.

केळशीत चौकशी केली त्यानुसार पुढल्या प्रवासात घाट नव्हता. चढ उतार असणार ते ठीकच. पण इथून निघालो तो थेट घाटालाच भिडलो. 7 kmचा घाट. अरुंद रस्ता. वाऱ्याचा मागमूस नाही. या घाटाचं नाव माहीत नाही. याला देव्हारे घाट म्हणू. कारण टॉप ला देव्हारे गावात T फाटा आहे. उजवीकडे मंडणगड डावीकडे वेस्वी. या घाटाने अनपेक्षित असल्याने त्रास दिला. नन्तर 2एक km रस्ता टॉपवरूनच वळवळत जात होता. याच काम नुकतंच पूर्ण झालेलं दिसत होतं. त्यावरून सुसाट निघालो. शिवाय पलीकडे लगेच जेट्टी. म्हणजे जितका घाट चढलो तितका उतार असणार. मस्त तरंगत उतरायचं. मांडे खात होतो फुकट. कारण उतार सुरू झाल्याक्षणी रस्त्याची अवस्था उत्तम वरून बकवास झाली. खडकाळ आणि खड्याळ असच त्याचं वर्णन करावं लागेल. तिकडे झाडं नाहीत म्हणूनच फक्त त्याला रस्ता म्हणायचं. उतार असल्याने सखी पळायला उत्सुक पण अशा रस्त्यावर पळवणे म्हणजे बुडाचं धिरड होणार आणि पंक्चर झालं म्हणजे आणखी बला. म्हणून ब्रेक दाबत 4-5च्या स्पीडला उतरत होतो.
4
घाट संपला तरी उतार सुरूच. पेडलिंग करायला लागत नव्हतं हेच त्यातल्या त्यात बरं. पावणे सहाला एकदाचा जेट्टीवर पोचलो. 6 ला लॉन्च सुटली. 15 मिनिटात पलीकडे. या लॉन्च प्रवासात एक तरुण भेटला. सायकल एनथु. त्याच्याशी छान गप्पा झाल्या. त्याला सायकल बद्दल बरीच टेक्निकल माहिती होती. बर्याच शंका होत्या. थोड्या वेळाने, जे मी सुरवातीपासून सांगत होतो, की मी सायक्लिस्ट नाहीए फक्त सायकलवर फिरणारा भटक्या आहे, हे त्यालाही पटलं. माझं अज्ञान आहेच तसं भक्कम!
5
पलीकडे पोचल्यावर 5एक km हरिहरेश्वर. 3 km मधेच उजवीकडे एक हॉटेल/घर दिसलं. साधंसं. किंमत देखील मला झेपणारी. जेवण तिथेच. मग मुक्काम तिथेच केला. सखी उचलून खोलीत नेली. पाचगणीत खोलीत तिला खोलीत नेता न आल्याने झोप नीट नव्हती झाली. 3एकदा उठून खाली येऊन बघून गेलो होतो. इथे आता तो प्रश्न उरला नव्हता..
6
क्रमशः

-अनुप

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

30 Mar 2019 - 1:17 pm | यशोधरा

मस्त.

दुर्गविहारी's picture

30 Mar 2019 - 4:15 pm | दुर्गविहारी

छान फोटो टाकले असते तर बरे झाले असते.

अन्या बुद्धे's picture

30 Mar 2019 - 9:25 pm | अन्या बुद्धे

फोटो आहेत पण मला जमत नाहीयेत अप्लोडायला. मित्राला सांगितलं आहे. करतील ते त्यांच्या सवडीने.

प्रसाद_१९८२'s picture

30 Mar 2019 - 6:42 pm | प्रसाद_१९८२

अरे व्वा !
आधी ओळख असती तर तुम्हाला भेटता आले असते.
--
खेड-दापोली रस्त्यावर, दापोलीच्या (3 KM) आधीचे "टाळसूरे" माझे गाव आहे.

अन्या बुद्धे's picture

30 Mar 2019 - 9:28 pm | अन्या बुद्धे

ओह! नावाची पाटी पहिल्याच आठवतंय.. तिथल्या कलव्हर्ट वर एका सायकलिस्ट शी बोलायला थांबलेलो बहुदा..

चौथा कोनाडा's picture

31 Mar 2019 - 6:14 pm | चौथा कोनाडा

वाह, हा पण भाग थरारक ! ज ब र द स्त !

काही ठिकाणी वाचताना देखील अंगावर काटा येत होता.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

31 Mar 2019 - 6:21 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वर्णन भारी फोटो नसतील तर पुढील धाग्यात वाचल्याची पोच मिळणार नाही.
धन्यवाद.

-दिलीप बिरुटे

चौथा कोनाडा's picture

31 Mar 2019 - 6:27 pm | चौथा कोनाडा

+१ येस, फो टो ज आर मिस्सिंग !

अन्या बुद्धे's picture

31 Mar 2019 - 8:59 pm | अन्या बुद्धे

खरंय.. पण फोटो लोड करणं येत नाही मला. शिकून घ्यावं लागेल. दरम्यान मित्राने लोड केले तर कळवेन तसं..

अन्या बुद्धे's picture

31 Mar 2019 - 8:59 pm | अन्या बुद्धे

खरंय.. पण फोटो लोड करणं येत नाही मला. शिकून घ्यावं लागेल. दरम्यान मित्राने लोड केले तर कळवेन तसं..

चौथा कोनाडा's picture

31 Mar 2019 - 9:24 pm | चौथा कोनाडा

या मदत पानाच्या महिती नुसार तुम्हला फोटो अपलोड करता येतील

मदत -मिपावर फोटो चिकटवणे.

विजुभाऊ's picture

1 Apr 2019 - 10:19 am | विजुभाऊ

छान लिहीताय हो.
तुमच्या सोबत सायकलसफर केल्यासारखे वाटतेय