सहा दिवस सायकल भ्रमंती : भाग 3 : पाचगणी ते खेड

अन्या बुद्धे's picture
अन्या बुद्धे in भटकंती
29 Mar 2019 - 11:51 am

16.03.2019

आज तसा रिलॅक्स दिवस.. अशी माझी समजूत होती कारण महाबळेश्वर पर्यंत चढाचे 20 km झाले की पुढले 40 km नुसता आंबेनळीचा घाट उतरायचा होता. एकच गडबड ही होती की दुपारी कशेडी घाटाच्या टॉप वर भ खे काका माझ्यासाठी येऊन थांबणार होते. आणि दुपारचं जेवण त्यांच्यासोबत खेड मध्ये व्हायचं होतं. म्हणजे आज दुपारी सायकल चालवायची नाही हे ठरलेलं बाजूला ठेवायला लागणार होतं.

सकाळी सव्वा सहाला हॉटेलातून बाहेर आलो तेंव्हा हवेत चांगलाच गारवा होता. पक्षांची किलबिल सुरू झाली होती. पण सूर्य अजून उगवला नव्हता. मधेच थांबून ती किलबिल रेकॉर्ड करून घेतली. आणि निघालो. दहा मिनिटातच अंग छान गरम झालं पण हाताची बोटं छान गारठून गेली होती. सकाळच्या ताज्या वेळी 18 km कधी पार झाले समजलच नाही.. टपरीवर कॉफीची ऑर्डर दिली. येताना स्पीड मनाजोगता नव्हता म्हणून सहज टायर दाबून पाहिले तर हवा थोडी कमी वाटली. तिकडे लाईट गेले होते म्हणून पेट्रोल पंपवर हवा भरता आली नाही. मग म्हटलं ठिके.. आता उतारच आहे. उतरून पोलादपूर मध्ये भरू हवा. कॉफी पिऊन निघालो.
3

4
गेल्या वर्षी सरोज पूर्वा सोबत इथे आलो होतो तेंव्हा वाटलेलं इथे सायकल हाणायला काय मजा येईल! पण माझी लायकी नाही अजून.. आणि आज त्याच भागात मी सखीसोबत आलो होतो. पसरणी घाट चढवून आज आंबेनळीचा घाट उतरवायचं दामदुप्पट बक्षीस वसूल करणार होतो! पहिल्या 2-4 km नंतर दरी आणि प्रतापगडाचा फोटो घ्यायला थांबलो. माझ्यापासून अर्धा km पुढे एक डायवर त्याच्या ट्रक च्या बोनेट मध्ये डोकं घालून काही खुडबुड करत होता. माझ्याकडे लक्ष गेल्यावर चालत आला माझ्याकडे. सगळ्या प्रवासाची चौकशी केली आणि म्हणाला 'शेल्फी घेऊ आपण'. मी माझी खाज भागवायला भटकत होतो. त्याला कौतुक वाटायचं काय कारण तसं.. तसे शेल्फी घेऊन निघालो.

सखीला पेडल्स च ओझं उगाचच आहे, नसते तरी चालेलं असतं असं वाटायला लागलं होतं तो सततचा उतार सुरू असताना. प्रतापगड जवळ आल्यावर काही छोटे चढ लागले आणि नंतर त्याला डाव्या हाताला ठेऊन फाट्यावरून निघाल्यावर परत उतारावर तरंगणे सुरू! 40 km चा एकूण उतार. सतत वळणं. त्यामुळे नीट लक्ष देऊन घाट उतरत होतो. काही बघावं वाटलं आजूबाजूला तर ब्रेकिंग करून वेग अगदी कमी करून किंवा गप थांबून निवांत बघत होतो.
6
आता 9 वाजले होते आणि घाट संपला होता. आतापर्यंत 60 आसपास अंतर पार झालेलं पण दमणूक शून्य होती. उठल्यापासून कॉफी आणि 4-5 घोट पाणी सोडल्यास काही हायड्रेशन नव्हतं. ती काळजी घेतली नाही तर कशेडी जीव खाणार हे उघड होतं. म्हणून दर 5 मिनिटांनी 2 घोट प्यायला सुरवात केली होती. घाट उतरून पहिली टपरी दिसली आणि लगेच सरबत प्यायला थांबलो. तेंव्हा गरज नव्हती तरीही. तिथला मालक जुना मिल्ट्रीमन होता. त्याच्याशी छान गप्पा रंगल्या. 15 मिनिटांनी निघालो.
5
आता पोलादपूर 8 km. हवा कमी असल्याने मनाजोगता स्पीड मिळत नव्हता. 4-5 km मधेच एक पंप दिसला. तिथे हवा भरून झूम निघालो. बघताबघता पोलादपूर आलंच. इथे मेडिकल मधून मूव्ह ची छोटी ट्यूब आणि निकॅप घेतली. काल पसरणी चढताना शेवटी गुडघा हलका दुखत होता. रिस्क नको म्हणून आता दुखत नव्हतं तरी मूव्ह रगडून नीकॅप चढवली. एक उसाचा रस रिचवला, सखीची बाटली बर्फ पाण्याने भरली आणि एक थंड बाटली सॅक मध्ये भरून निघालो. महाबळेश्वर सोडताना भखे काकांना सांगितलेलं नन्तर नेटवर्क मेलेलं तरी अंदाज करून ते कशेडी चढवून माझी वाट बघत बसतील. त्यांना फार वाट पहायला लावायला नको म्हणून एक जबरदस्त मोह आवरला होता. पोलादपूर अलीकडे एक स्वच्छ पाण्याचा प्रवाह दिसला होता. आणि पुढे एका डोहात काहीजण पोहतानाही दिसलेले. वेळेचं बंधन नसतं तर पाण्यात किमान अर्धापाऊण तास नक्की काढला असता.

घाट सुरू झाला आणि पहिल्यांदा जाणवल्या त्या 2 गोष्टी. एक म्हणजे घाट एका सेट लयीत चढत नाहीए पसरणी सारखा आणि दुसरं घाटाला अप्रोच होताना घाटाचा पसारा नजरेत येत नाहीये. त्यामुळे मनात कुठे थांबायचं, कितीवेळा वगैरे काही ठरवता येत नाहीये. शिवाय घाट रुंदीकरण सुरू असल्याने झाडांची कत्तल झालीये. सावली दुर्मिळ असणारे. घाट सुरू झाला तेंव्हा साडेदहा होऊन गेले होते. ऊन चांगलंच तापायला लागलं होतं. पहिल्या 3 km नंतरच केवळ छान सावली दिसली आणि पुढली कधी येईल माहीत नाही म्हणून अगदी गरजेचा नव्हता तरी खजूर थांबा घेतला. सखीच्या बाटलीत इलेक्ट्रोल मिसळून ते पाणी प्यालो. पूर्ण दम नीट करून परत निघालो. काही वेळातच सपाटी आली. जिथे 2-5 ने जाऊ शकत होतो. म्हणून वाटलं घाट संपत आला की काय? अस वाटे पर्यंत परत जोरदार चढ सुरू झाले. स्पीड अगदी कमी असल्याने अंतराचा अंदाज हुकला होता आणि उरलेला घाट दिसत नसल्याने अजून घाट किती बाकी ते समजत नव्हतं. त्यामुळे एकूण 2 खजूर थांबे आणि 5 फक्त पाणी थांबे घेऊन एकदाचा टॉप गाठलाच. आता लक्षात येतंय की 3 पाणी थांबे अनावश्यक होते. अजून किती माहीत नाही आणि पुढे सावली नसली तर? या भीतीने घेतलेले. नेक्स्ट टाइम रस्ता माहीत झाल्याने अस होणार नाही.

घाट चढवून आलो आणि समोर हसऱ्या चेहऱ्याने स्वागत करणारे भ खे काका दिसले. त्यांना पाहूनच अर्धा थकवा गेला. रीतसर गळाभेट घेऊन निवांत कोकम सरबत आणि त्यांनी दिलेली चिक्की यांचा आस्वाद घेत मस्त गप्पा रंगल्या. बक्कळ अर्धातास आराम करून निघालो.
1
घाट तरंगत उतरून आलो आणि खालच्या सपाटीने ही जीव खायला सुरवात केली. रस्त्याची कामं सुरू होती त्यामुळे अनेकदा खडबडीत रस्ता, जिथे चांगला रस्ता होता तो सिमेंटचा आणि वर दिडचा सूर्य आग ओकत होता. ज्या पहिल्या हॉटेलवर जेवायला थांबलो ते खचून भरलेलं होतं मग तिकडे फक्त एक थंडगार बाटली पाणी संपवून दुसऱ्या हॉटेलकडे निघालो. दरम्यान खेड सायकल क्लब तरुण गडी सूरज भेटायला आला. माझी नवी सायकल पाहून फुरफुरत आता ती मी चालवतो म्हणाला. मग पुढले 4 km त्याची बाईक माझ्याकडे आणि तो माझी सायकल घेऊन असे दुसऱ्या हॉटेलवर पोचलो. तिकडे तुडुंब जेवण झालं. त्यानंतर परत सायकल मारायचं जीवावर आलेलं पण 4एकच km बाकी होते. सूरज संध्याकाळी भेटतो म्हणत कामावर परत रुजू झाला आणि 3 आसपास आम्ही भ खे काकांच्या घरी पोचलो.

संध्याकाळी पोपटी करायचा बेत होता. तोवर तासभर झोप काढून आणि अंघोळ करून मी ताजा झालो. तोवर पोपटीची सगळी तयारी झाली होती. संध्याकाळी सात आसपास श्रीनि त्यांच्या सौ ना कोळथरे मध्ये सोडून इकडे हजर झाले. शेजारचे नवे सायकल खेळाडू अप्पा ही सामील झाले. मग गप्पा सोबत ठेऊन पोपटीचा फन्ना उडवणे, त्यानंतर रात्रीचं जेवण नंतर सखीची जुजबी डागडुजी, सीट थोडी पुढे सरकवणे वगैरे कामं सुरू राहिली. शेवटी साडे अकरा वाजता आता गप्पा आवरून झोपलंच पाहिजे म्हणत आडवे झालो. तेंव्हाही श्रीनि मला हायड्रेशन नीट कर, वजन खांद्यावर नको, ते सायकलवर राहील अशी व्यवस्था लौकरात लौकर करणे वगैरे सूचना देतच होते. त्या अगदी बरोबरच आणि गरजेच्याच होत्या पण माझे डोळे मिटल्याने तिकडे दुर्लक्ष होतंय असं लक्षात आल्यावर ते नाईलाजाने गप झाले आणि झोपले.
2
आता उद्या हरिहरेश्वर गाठायचे होते. पैकी हर्णे पर्यंतचा भाग ओळखीचा होता. ती दृश्य नजरेपुढे घेऊन मी झोपून गेलो..

क्रमशः

-अनुप

प्रतिक्रिया

सिरुसेरि's picture

29 Mar 2019 - 12:14 pm | सिरुसेरि

मस्त धावते प्रवाही वर्णन . शुभेच्छा .

अन्या बुद्धे's picture

29 Mar 2019 - 12:59 pm | अन्या बुद्धे

धन्यवाद!

प्रचेतस's picture

29 Mar 2019 - 2:04 pm | प्रचेतस

मस्तच लिहिताय.
सर्व काही डोळ्यांसमोर उभं राहतंय.

यशोधरा's picture

29 Mar 2019 - 3:52 pm | यशोधरा

तीनही भाग वाचलेत, आवडले.

झेन's picture

30 Mar 2019 - 7:07 am | झेन

वाचायला मजा येत आहे.

चौथा कोनाडा's picture

30 Mar 2019 - 1:06 pm | चौथा कोनाडा

वाह, हा भाग पण भन्न्नाटच ! झकास लिहिलंय !

अन्या बुद्धे's picture

2 Apr 2019 - 6:38 pm | अन्या बुद्धे

भाग 3 आणि 4 फोटो अपलोड झालेत.. 5 आणि 6 ही होतील लौकरच