सहा दिवस सायकल भ्रमंती : भाग 2 : पुणे ते पाचगणी

अन्या बुद्धे's picture
अन्या बुद्धे in भटकंती
28 Mar 2019 - 1:24 pm

15.03.2019

नॉर्मली पाठ टेकली की पाच मिनिटात झोप लागते. पण काल तसं नव्हतं झालं. आजचा प्रवास याही आधी सायकलने केलेला होता पण उद्याचा प्रवास जिथे व्हायचा तो पहिल्यांदाच. म्हणजे बाईक किंवा कार ने जरी तिकडे गेलेलो असली तरी सायकल प्रवास हाच पहिला. म्हणून ती दृश्य अर्धवटपणे नजरेपुढे येत होती.

सकाळी पहिल्या गजरात जाग आली आणि भराभर आवरून सव्वासहा ला बाहेर पडलो. मुक्काम पेठेत असल्याने गावाबाहेर पडून हायवे वर येईतो 7 km झाले. मग आता प्रवास सुरु हा फील यावा यासाठी केवळ एका शेकोटी लावलेल्या ठेल्यावर चहा घेतला. इथून पुढे 15एक km कात्रज टनेल्स. हे अंतर त्रासदायक होणार होतं. आणि तसं ते झालं ही. धड घाट नाही पण सतत 10-15 च्या कोनात चढ. नजरेला फार चढ जाणवत नाही. पण पायाला सतत जाणवत राहतो. पेडल बंद की लगेच सायकल बंद असा मामला. त्यात हेड विंड असेल तर विचारूच नका. मरतुकड्या 12 वगैरेच्या वेगाने तो चढ पार करून पलीकडच्या उताराला लागेतो सूर्य वर आलेला. पण हवेत मस्त गारवा.

पहिल्या km मधेच एकूण ट्रेंड समजला. इथून पुढे घाट उतरल्यासारखा उतार नाही अगदी, मध्ये चढ ही आहेत पण ते उताराला लागून लगेच आहेत. त्यामुळे आधीच्या मोमेंटम वर 80 टक्के चढ पार झालेला असायचा. प्रवास मजेत सुरू होता. पुण्यापासून खंबाटकी 60 km.. म्हणजे घाट सुरू व्हायला किमान साडे नऊ. त्याहून लेट होऊ नये या उद्देशाने कुठेही न थांबता सुटलो होतो. पहिला थांबा थेट शिरवळलाच केला. एक मोठा उसाचा रस घेऊन निघालो.
1
आता घाटा पर्यंत साधारण 20 km. सायकल ग्रुप कडून हट्ट वजा सूचना होती की घाटाच्या सुरवातीलाच भैरवनाथ हॉटेलात थांबून कढी वड्यावर ताव मारल्याखेरीज पुढे जाऊ नये. पण तो मी मानला नाही. असं पोटभर खाल्यावर ताण येईल असं सायकल चालवणं मला जडच जातं. म्हणजे घाटात कुठेतरी झोप काढणं आलं. म्हणजे मग उठून आळसात परत उरलेला घाट चढवायचा आणि तोवर ऊन आणखी वाढणार. नकोच ते. नाश्ता घाट पार करूनच. पण आराम हवाच होता म्हणून आता घाट एखाद km वर असेल अशा गावात थांबलो. 2 लिंबू सरबत सावकाश पीत लोकांच्या प्रश्नांना उत्तरं देत अर्धातास काढला. सखीकडची बाटली भरून घेतली परत आणि एक थंड पाण्याची पाठीवर सॅक मध्ये टाकून जाता जाता भैरवनाथला अच्छा करून निघालो.
2
घाट सुरू झाला.. 6 km.. 10 वाजलेच होते अलमोस्ट. ऊन तापायला सुरवात झालेली. आधी 2-2 नंतरच्या सपाटीवर 2-5 आणि नन्तर परत जोरदार चढ आल्यावर 1-7 वरून उतरत 1-4 वर सेट झालो.50 टक्के घाट पार झाला असेल. रस्ते वळताना कडा सूर्याच्या रस्त्यात आला की आता थांबावं बसावं वाटायला लागलं होतं. पण डोंगरातली पॉलिसी इथेही वापरली. 'आता बास.. बसलच पाहिजे' असं वाटलं की त्यानंतर 5 मिनिटांनी बसायचं. तस आता थांबू वाटायला लागल्यावर एखाद km काढून सावली बघून बसलो. रिकामपोटी 60+ अंतर चालवून आता भूक लागायला लागलेली. भैरवनाथला अच्छा करणे ही चूक तर नाही झाली? असा पाणी पीत विचार करत होतो एवढ्यात सॅक मधले खजूर आठवले. ते अशाच वेळासाठी तर घेतलेले. कमी ऐवजात भरपूर आणि चटकन एनर्जी! निवांत 10-12 खाऊन पाणी ढोसलं 10 मिनिट आराम करून पुढे निघालो. आता घाट संपत आला होता. एखाद km बाकी असताना डाव्या हाताला कपारीत एक मंदिर दिसलं. शेजारी एक साधू बसलेला. मग थांबलोच तिथे दमलो नसतानाही. उरलेलं सखींसोबतच पाणी संपवलं आणि सॅक मधलं तिथे रिप्लेस केलं. शेजारी डोंगरातून झिरपून येणारं पाणी कपारीत जमा होत होतं ते बादलीने शेंदून घेतलं आणि तोंड हात पाय धुतले. थोडं गार पाणी डोक्यावर ओतून घेतलं. थोडावेळ त्या साधूशी गप्पा मारल्या नमस्कार केला आणि अगदी ताजा होऊन पुढे निघालो. अपेक्षेप्रमाणे अर्ध्या km मध्ये घाट माथा आला. आता उतारच होता. ओल्या अंगावर वारं मस्त वाटत होतं. अगदी हलकं फुलकं! तसाच तरंगत खाली उतरलो आणि रस्त्याकडेला असलेल्या हॉटेल बाहेर थांबलो.

निवांत एक ओनीयन उत्तपा आणि कॉफी रिचवून डॉ. कैलास वैद्य, वाई यांना फोन लावला. ते माझा मित्र डॉ.पटवर्धन यांचे सख्खे मित्र. वाईत 3 आसपास पोचलो तर पसरणी आज न करता उद्या पहाटे करायचा आणि मुक्काम वाईत डॉ. वैद्य यांच्याकडे. त्यांना म्हटलं तुमच्या कडचा मुक्काम फेलसेफ म्हणून ठेवलेला पण आता मॅक्स साडेबारा वाईत पोचेन. नातू फार्म्स मध्ये जेऊन झोप काढेन आणि 4ला घाट चढवायला घेईन. पण आपण भेटून गप्पा नक्की मारू. ते म्हणाले की नातू फार्म्स ला आलो की कळवा. लगेच पोचतो तिकडे. पुढे सुरुर फाटा 3 km आणि तिथून 12 km वाई. सपाट रस्ता, दूतर्फा शेती आणि रस्त्यावर सावली धरणारी झाडं. तासाभरात नातू फार्म्सला पोचलो.
3
आमटी भात आणि ताक अशी ऑर्डर दिली आणि मालकांशी गप्पा करत होतो तोच वैद्य आलेच. मैत्री काय भारी गोष्टय. आम्ही पहिल्यांदाच भेटत होतो पण नवखेपणाचा मागमूस नव्हता त्यांच्या बोलण्यात. जेऊन झाल्यावर घरी घेऊन गेले. आमच्या फोनवरच्या बोलण्यात काही गैरसमज झालेले. त्यांना वाटलेलं नातू फार्म्स मीटिंग पॉईंट असेल आणि जेवण त्यांच्याकडेच. त्यांनी पुरणपोळीचा बेत केलेला. म्हटलं एका अर्थी बोलण्या समजण्यात गडबड झाली ते बरंच झालं. नैतर पुरणपोळ्या चेपून पसरणी चढवण काही जमलं नसतं. दुपारी त्यांच्या घरी दिडतास झोप काढून ताजा झालो. घाटावर कृष्णामाईच्या उत्सवाची तयारी सुरू होती. साडेतीनला तिकडे जाऊन दर्शन घेऊन आलो. डॉक भेटणाऱ्या प्रत्येकाला 'हा गडी बदलापुरातून सायकल चालवत आलाय आणि आता महाबळेश्वर, खेड, दिवेआगर, अलिबाग असा प्रवास करून परत जाणारे' असं कौतुकाने उत्साहाने सांगत होते. शेवटी त्यांच्याकडून निघालो. उसाचा रस पिऊन एक थंड पाण्याची बाटली सॅक मध्ये टाकून घाटाकडे निघालो..

तर पसरणी घाट..

वाईत साडेबारा आसपास पोचलो तेंव्हाच पसरणी आजच करायचा हे फायनल झालेलं.

नेहमी 11 km साठी अर्धातास लागतो. हा घाट आणि त्यात मातब्बर पसरणी चा म्हणून चौपट म्हणजे 2 तास राखून ठेवले. साडेसहा नंतर नो सायकलिंग म्हणून 6 आधी 2 तास असा 4 ते 6 वेळ ठरवून ठेवला.. सोबत 4 केळी होती.. दर अर्ध्या तासाने एक खायचं 4 घोट पाणी निवांत घ्यायचं की निघालो असं ठरवून टाकलं..

या घाट डोंगर दर्याचं एक असतं की ते जितके असतात तितकेच अवघड डेंजर वगैरे असतात पण त्यात वाढ नाही होत. पण आपल्या क्षमतेत वाढ होऊ शकते. पसरणी म्हणजे एव्हरेस्ट नव्हे की फारच कमी सायकलिस्ट नी केला असेल.. सो इट्स डूएबल. आपली त्रास काढायची मानसिक ताकद वाढवून ठेवायची की जमून जातं.. कदाचित ही माझी काल आबांशी बोलल्यापासून मानसिक तयारी सुरू होती ती जरा जास्तच झाली..

घाट चढवायला सुरवात केली.. गुडघ्यावर ताण घ्यायचाच नाही इतका गियर उतरवून म्हणजे 2-4 रेशो मध्ये सेट झालो. एखाद km नन्तर ड्रेनिंग सुरू झालं आणि 1-5, 1-4, 1-3 पर्यंत उतरलो.. एव्हाना पहिल्या डोंगराला फेरी करून झाली आणि एकूण घाटाचा पसारा नजरेपुढे आला. कल्पनेने त्या 10 km चे 3 तुकडे करून थांबायच्या जागा ठरवल्या.

पहिला थांबा आला पण 1-3 ला सेट झालेलो. सायकल आणि माझी सीट एकजीव झालेली तो टेम्पो मोडवेना.. म्हणून जिथे छान जागा असेल छान दृश्य दिसेल किंवा दमणूक होईल यापैकी जे आधी होईल तेंव्हा थांबू असं ठरवून पेडल मारत राहिलो. साधारण 5 km झाले असतील आणि तिथे उजवीकडे प्रशस्त कट्टा दिसला खाली वाई आणि पसरणी वगैरे इतर गावं मस्त दिसत होती म्हणून थांबलो. आणि केळं ब्रेक घेतला. लगेच निघालो.
4 5
आता सायकल माझाच भाग झाल्यागत वाटत होती. रहदारी खूप नव्हती म्हणून सगळं लक्ष रस्त्याकडे द्यायची गरज नव्हती.. मस्त मोसम पकडला होता. 2एक km झाले आणि डोंगराला उजवीकडे फेरी मारून रस्ता वळतो बहुदा बराचसा लेवलाउत होतो ती जागा 2एक km उरली असताना डाव्या हाताला मस्त दत्त मंदिर दिसलं. समोर ओट्यावर मस्त टाईल्स लावलेल्या होत्या. न थांबता जाववेना म्हणून थकलो नव्हतो तरी थांबलो.

6
7
आत्ताशी 5 वाजत होते. अख्खा तास हातात होता आणि 5 एक km घाट असणार बाकी अस गणित सांगत होत म्हणून जरा निवांत 10 मिनिट आडवं पडून आराम केला. परत निघालो आणि एखाद km मधेच तो मोसम तुटलाय असं लक्षात आलं. डावा गुडघा हलका दुखतोय असं जाणवायला लागलं. बुड तक्रार करायला लागलं. मग बुडाचा त्रास जास्त म्हणून न बसता सायकल हानायच ठरवलं. एव्हाना ते शेवटलं वळण पण मागे पडलं. एकाला विचारलं तर पाचगणी 4 km म्हणाला. मुक्कामाचं हॉटेल मुख्य पाचगणी पासून 2 km असं साईटवर समजलेलं. मग सायकल वरून उतरून चालताचालता हॉटेलवर कॉल लावला डायरेक्शन्स विचारायला. तो पाठवतो म्हणाला. आलेला मेसेज बघितला तर त्यात मॅप्रो गार्डन पुढे 6 km असं लिहिलेलं. एकाला विचारलं तर मॅप्रो गार्डन 9 km म्हणाला.

आयला.. म्हणजे अलमोस्ट महाबळेश्वरच की! चिडचिड झाली. पाचगणीत मुक्काम म्हणून मनाची तयारी केलेली. रिलॅक्स झालेलो. आता 5:15 होऊन गेले. घाट संपल्यात जमा तरी चढ होतेच. आणि 9 km अजून जायचं आणि त्यापुढे कुठेतरी मुक्काम! 2 मिनिटात स्वतःला सांगितलं ठिके उद्याची सायकलिंग कमी होईल. लवकर आंबेनळीत उतरू.. परत सायकलवर टांग मारली. गियर 3-5 केले आणि उभ्याने पेडल हाणू लागलो 15 पेडल झाले की एका पायावर येऊन दम खायचा. की पुढले 15. बघताबघता पाचगणी मागे पडलं. हा मोसम छान जमला. आणखी 2 km झाले आणि नजरेच्या कोपर्यातून माझ्या हॉटेलचं नाव दिसल्यासारखं वाटलं. नीट बघितलं तर हो! त्यांच्या माणसाने मला महाबळेश्वरातून यायच्या डायरेक्शन्स दिलेल्या म्हणजे!

लैच खुश झालो. लगेच वळवलीच तिकडं सायकल..

धमाल आली एकूण

क्रमशः

-अनुप

प्रतिक्रिया

प्रशांत's picture

28 Mar 2019 - 4:21 pm | प्रशांत

खंबाटकी एकदा न थांबता केला तसाच पसरणी घाट करायचा आहे, बघु कधी योग येतो.

राजेंद्र मेहेंदळे's picture

28 Mar 2019 - 5:19 pm | राजेंद्र मेहेंदळे

पुभाप्र आणि मोहिमेला शुभेच्छा!!
a

अन्या बुद्धे's picture

28 Mar 2019 - 6:19 pm | अन्या बुद्धे

सफर 14 ते 19 होती. रोज एक मुक्काम पोस्ट करेन म्हणतो. टॉपला डेट आहे

दुर्गविहारी's picture

28 Mar 2019 - 8:14 pm | दुर्गविहारी

मस्त ! पुन्हा वाचतोय , तरी मजा येते आहे.

वाचतोय. भैरवनाथाला पार्सल घेतले असते तर?

चौथा कोनाडा's picture

29 Mar 2019 - 2:04 pm | चौथा कोनाडा

वाह, मजा आली वाचायला. स्वतःच सायकल चालावतोय आनि दमतोय असं फीलिंग आलं वाचताना. सुपर्ब लिहिलंय. रोज एक भाग वाचतोय. , हे पण एक्सायट्ञ्टींग वाटतयं !

अन्या बुद्धे's picture

29 Mar 2019 - 7:10 pm | अन्या बुद्धे

थांकू!