सहा दिवस सायकल भ्रमंती: भाग 1: बदलापूर ते पुणे

अन्या बुद्धे's picture
अन्या बुद्धे in भटकंती
27 Mar 2019 - 2:25 pm

१४-०३-२०१९

सकाळी 5:15लाच गजराशिवायच जाग आली. झपाझप आवरून 5:45ला घर सोडलं. स्टेशनवर माझं आणि सखीचं तिकीट काढलं आणि फलाटावर आलो. कर्जत पर्यंत रस्ता खराब असल्याने ट्रेनने खोपोली गाठायचं ठरवलं होतं. सुरवातच वैतागाची नको. 6:10 ला ट्रेन आली. लगेज डब्बा खच्चून भरलेला! धावत पळत नॉर्मल डबा गाठला. रिकामाच होता. 5-7 जण तर आडवे पडून घोरत होते. सखीला शेजारी उभी करून दरवाज्याजवळ बसलो. एकेक स्टेशन मागे पडत होतं आणि वातावरण उजळत होतं. कर्जत अलीकडे यथावकाश रखडून 7:20 नन्तर खोपोलीत उतरलो.

आत्ताशी सूर्य वर येत होता आणि हवेत मस्त गारवा. हायवेला आल्यावर लगेच वेग घेतला. सखी मस्त पळत होती. त्याचा मजा घेईतो घाटच सुरू झाला. गरजेप्रमाणे गियर बदलत निघालो. गेल्यावेळी इथे पोचेतो 10 होऊन गेलेले आणि गियर्स तितके एफिशियन्टली वापरताही येत नव्हते म्हणून भरपूर वेळा थांबावं लागलेलं. पण यंदा ते प्रॉब्लेम नव्हते म्हणून एका लयीत फासफूस न होता घाट चढवत होतो. मंदिराचा मोठा चढ पार केला आणि दम खायला थांबलो. चांगला 10 मिनिटांचा थांबा घेऊन परत प्रवास सुरु झाला.
2
आणखी एकदोन वळणानंतर एक्सप्रेस वे वर उतरलो. आता तर चढाचा कोन देखील कमी होता. आता वेग देखील वाढला थोडा. बोगद्या अलीकडे ट्रॅफिकमुळे वहानं अगदी सावकाश जात होती. त्यांना ओव्हरटेक करून बोगदा पार करूनच थांबलो. इथे डाव्या बाजूला रेलिंग पलीकडे 20एक फूट मोकळी जागा होती. समोर दरी पलीकडे राजमाचीचे जोडकिल्ले दिसत होते. सखीला तिकडे उचलून नेलं आणि तिच्यासोबत थोडं फोटो सेशन करून परत निघालो. वेगात लोणावळा पार करून मन:शक्ती ला नाश्ता करायला थांबलो तेंव्हा साडेनऊ होत होते. आता पुणे फक्त 60एक km उरलं होतं
1

आता उपमा लस्सी ची पोटपूजा करून परत प्रवास सुरु केला. ऊन जाणवायला लागलं होतं पण हवेत अजून गारवा होता. आता बऱ्यापैकी सपाटी असणार होती. फक्त दोन मोठे चढ.. एक कामशेत चा आणि एक देहूरोड चा. उजवीकडे दिसणाऱ्या लोहगडाला अच्छा करून वेगाने कामशेत ओलांडलं आणि थोडं दमल्यासारखं वाटायला लागलं. अजून 40 km अंतर बाकी होतं. एका गुर्हाळा कडे वळलो आणि शांतपणे घोटाघोटाने रस संपवला. सायकलच्या बाटलीतलं पाणी गरम झालं होतं त्यात बर्फ घालून घेतला आणि परत निघालो. बारा आसपास देहूरोड गाठलं. इथे लिंबू सरबत घेऊन निघायचं होतं पण हा थांबा तसा लांबला. बक्कळ अर्ध्या तासाने परत निघालो.

ऊन आता डोक्यावर तापत होतं. पायडल मारताना मनाशी नक्की केलं की उद्यापासून ही सावलीत आराम करायची वेळ असणार. मोदकचे फोन येऊन गेले 2दा. आम्ही जेवायला भेटणार होतो. नाहीतर मी एखादी छानशी सावली बघून झोप काढली असती. प्रवासात एक लिटर पाणी, एक उसाचा रस आणि एक लिंबू सरबत इतकंच झालेलं. त्यामुळे डीहायड्रेशन पण जाणवायला लागलेलं. पण तरी न थांबता 'धर हँडल मार पायडल' या मंत्राचा वापर करत पुणे जवळ करत होतो. शेवटी दीड आसपास चांदणी चौक कडून पुण्यात एन्ट्री घेतली.

आजच्या प्रवासात पुढला प्रवास कसा असावा याचं नियोजन डोक्यात तयार झालं. उद्या खम्बाटकी आणि भारदस्त पसरणी असे दोन मोठे घाट पार करायचे होते. मला पाणी कमीच प्यायची सवय आहे. त्याचा त्रास भोगला होता. यापुढे जाणीवपूर्वक लिक्विडस घेत रहायचं हा पहिला मुद्दा आणि दुसरं म्हणजे दुपारी साडेबारा ते तीन नो रायडिंग. हे केलं तर पुढला प्रवास नीट होईल असा विश्वास मनात तयार झाला. रात्री साडेनऊ आसपास पुण्यातले महारथी सायकलिस्ट आबांशी बोलून पुढल्या प्रवासासाठी महत्वाच्या टिप्स घेतल्या. मित्राचा मुलगा, तोही मित्रच सदाशिव पेठेत रहायला होता. त्याच्याकडे रात्री मुक्काम केला. सकाळी साडेपाच चा गजर लावून अकरा आसपास झोपून गेलो.

क्रमशः

-अनुप

प्रतिक्रिया

किरण कुमार's picture

27 Mar 2019 - 2:49 pm | किरण कुमार

रखरखीत उन आणि साकलींग ते ही सोलो ..........ग्रेट

पुणे ते कन्याकुमारी सहली अगोदरची पायडलपीठ?

अन्या बुद्धे's picture

27 Mar 2019 - 7:07 pm | अन्या बुद्धे

नाही हो.. सुट्टी घेतली नाही तर लॅप्स होणार म्हणून 10 दिवस घेतली. मग त्यात 6 दिवस हा कार्यक्रम साधला. ऐनवेळी सुट्टी घेतल्याने सोबत कुणी येऊ शकलं नाही. म्हणून एकला चालो रे!

राजेंद्र मेहेंदळे's picture

27 Mar 2019 - 7:31 pm | राजेंद्र मेहेंदळे

पण सोलो सायकलिंग तेही उन्हाळ्यात म्हणजे जरा रिस्की नाही का?

बादवे कुठवर झाली भ्रमंती? बेळगाव वगैरे की थेट बंगलोर?

अन्या बुद्धे's picture

27 Mar 2019 - 11:47 pm | अन्या बुद्धे

बदलापूर.....-पुणे-पाचगणी-खेड-हरिहरेश्वर-अलिबाग

या मुक्कामाच्या जागा.. पुढले लेख येतील लौकरच

चौथा कोनाडा's picture

28 Mar 2019 - 5:21 pm | चौथा कोनाडा

भारी थरारक आहे, सायकल ट्रिप !
पुढील टप्प्यासाठी शुभेच्छा !

दुर्गविहारी's picture

28 Mar 2019 - 8:08 pm | दुर्गविहारी

अनुपभौ ! सर्वप्रथम मि.पा.वर स्वागत. मस्तच लिहीताय. पुढचे भाग पटापट येउ देत. :-)

झेन's picture

29 Mar 2019 - 8:09 am | झेन

छान सुरुवात