सुधारीत जीवनशैलीच्या शोधात....

प्रभाकर पेठकर's picture
प्रभाकर पेठकर in जनातलं, मनातलं
15 Mar 2019 - 7:13 pm

स्वच्छंदी जीवनाची परिणिती, वाढत्या वयाबरोबर रोज नविन दुखण्याचा शोध किंवा नविन समस्या उद्भवल्या नाहीत तर जुन्याच समस्या तिव्रतेने जाणवण्यात होते. ऐन तारूण्यातली जागरणं, अरबट चरबट आणि वेळी अवेळी खाणं त्या त्या वेळी खुप सुखाऊन गेली. पण पन्नाशी नंतर कांही शारीरिक कुरबुरी सुरू झाल्या. तसं गंभीर कांही नव्हतं पण थकवा जाणवायचा म्हणून एकदा डॉक्टरांच्या दवाखान्याची पायरी चढलोच. म्हंटलं कांही तरी मल्टीव्हिटॅमिन वगैरे देतील थोड्या दिवसांकरीता आणि सर्व ठीक होईल. त्यांनी उगीच स्टेथॅस्कोप इथे तिथे लाऊन तपासल्याचे नाटक केले (हा माझा विचार), दंडावर जाड काळा पट्टा बांधून फुस फुस आणि फुस्स्स्स्स्स्स्स्स्स करून रक्तदाब वगैरे तपासला. डॉक्टर त्यांच्या उपकरणात माझा रक्तदाब वाचत होते आणि मी त्यांचा चेहरा.
'काळजी करण्यासारखं कांही नाहीए, पण शंका नको म्हणून ह्या कांही तपासण्या करून घ्या.' असे म्हणून एक कागदाचे चिठोरे त्यांनी माझ्या हाती सरकवले. मी घाबरतच त्यावर नजर टाकली, ४-५ तपासण्यांची यादी होती. मी 'बरं' म्हणून, चिंतित चेहर्‍याने तो कागद घेऊन, डॉक्टरांचा निरोप घेतला. तपासण्यांना मी घाबरत नाही हो, पण त्या आधीचा १४ तासांचा उपास मला जास्त कष्टप्रद वाटतो. शिवाय, शाळेतल्या वयापासून परिक्षा म्हंटली की चिंता आलीच. दूसर्‍या दिवशी, तपासण्यांसाठी त्या प्रयोगशाळेत जाताना, उगीचच, 'आता आपले किती दिवस उरले आहेत?' हा नकारात्मक विचार डोकं वर काढायला लागतो. मी अचानक भाऊक वगैरे होतो. नाक्यावरच्या गणपतीला, पायातली चप्पल काढून नमस्कार वगैरे करतो. मनांत उसळत्या दयाळू भावनेतून, तिथेच कडेला बसलेल्या भिकार्‍याच्या वाडग्यात घवघवीत ५ रुपये टाकतो. एका बेवारशी कुत्र्याला ग्लूकोजची ४ बिस्किटे खाऊ घालतो. तपासण्या होऊन संध्याकाळी रिपोर्ट मिळतो.
रिपोर्ट वरच्या ४-२ लाल रेघांनी मी बावचळत नाही. जुनी गाडी चालवणारा जसा, गाडीतून येणार्‍या प्रत्येक विचित्र आवाजाने अस्वस्थ होत नाही तसा ह्या ४-२ लाल रेघांना मी घाबरत नसतो. रिपोर्ट घेऊन दवाखान्याच्या पायर्‍या चढलो. बर्‍यापैकी गर्दी होती. डॉक्टरांना मी खूप पूर्वी पासून ओळखतो. डॉक्टर अगदीच निरोगी नव्हते. रोग्यांची भरपूर गर्दी असायची. त्यांच्या स्वागतकक्षात बसल्याबसल्या माझं निरिक्षण चालू होतंच. त्यांची सेक्रेटरी फोन मधे बहुतेक फेसबुक फेसबुक खेळत होती. मधेच तिने एक, तोंड वाकडं करून, सेल्फीही काढला. कोणी रुग्ण बाहेर आला की पेपर तपासून ती पैसे सांगायची आणि मी डॉक्टरांच्या कमाईचे अंदाज बांधत होतो. फोटोग्राफरच्या स्टुडीओत जसे अनेक छान छान फोटो लावलेले असतात, हेअर कटींग सलून मधे विविध (आणि विचित्र) हेअर स्टाईलचे फोटो लावले असतात तशी डॉक्टरांच्या स्वागत कक्षात शरीराच्या आतील भागांची चित्र लावली होती. वेळ घालवायला म्हणून मी उठून ती चित्र पाहायला लागलो. पण तंबाखूच्या दु:ष्परीणामांचे तोंडाचे चित्र, धुम्रपानाने खराब झालेल्या फुफ्फुसाचे चित्र पाहील्यावर माझा उत्साहच मावळला. तेवढ्यात माझा नंबर आला. मी डॉक्टरांच्या केबिन मध्ये शिरलो.
'या! या! पेठकर' जीवणी गरजेपेक्षा जास्त रुंदावर डॉक्टर माझे स्वागत करतात. मी तब्येत दाखवायला आलो आहे की डॉक्टरांच्या मुलाच्या लग्नाच्या रिसेप्शनला ह्या विचारात मी बसतो. 'आला बळीचा बकरा' असा विचार तर त्यांच्या डोक्यात चालला नसेल नं? कसनुसं हसत मेडीकल रिपोर्ट डॉक्टरांना सुपूर्द करतो.
'हं!' पहिला गंभीर हुंकार.
'कांही गंभीर आहे का?' मी, घाबरत घाबरत.
'नाही तसं कांही नाही. पण कांही पथ्य पाळली पाहिजेत. मी गोळ्या लिहून देतो. शिवाय साखर, मिठाई, तळलेले पदार्थ वगैरे वगैरे बंद करा. रोज चालायचा व्यायाम करा. ओके?' मी निमूटपणे मान हलवतो. शाळेपासून सवयच होती. माझ्या डोळ्यासमोरुन भजी, समोसे, बटाटावडा, मेदूवडा पाठमोरे, दूर दूर जाताना दिसतात. कोपर्‍यात हिरमुसलेली मिठाई आणि वितळणारे आईस्क्रिम दयार्द नजरेने माझ्याकडे बघत असतात.
पडेल खांद्यांनी मी दवाखान्या बाहेर पडतो. वाटेत मेडीकलच्या दुकानातून गोळ्या घेतो. प्रिस्क्रिप्शन वाचून त्यालाही समजले असणारंच की आता हे कायम स्वरूपी गिर्‍हाईक आहे. औषधे घेऊन घरी आलो तर बायको चिंताग्रस्त चेहर्‍याने म्हणाली, 'काय हो? काय म्हणाले डॉक्टर? सगळं ठीक आहे नं?'
तिच्या प्रश्नांचा भडीमार चुकविण्यासाठी म्हणालो,' डॉक्टर म्हणाले घरी जा आणि बायकोच्या हातचा मस्त पैकी चहा प्या.'
'तो करतेच हो, तो काय चुकलाय मला. मेलं लग्न झाल्यापासून चहा, चहा आणि चहा करण्यातच माझं आयुष्य चाललंय.'
गॅसवर चहाचं पातेलं, मला बाहेरच्या खोलीत ऐकू येईल एव्हढ्या हळूवारपणे, ठेवण्यात आले.
चहा घेता घेताच डॉक्टरांनी केलेले मधूमेहाचे निदान मी तिला सांगितले.
'अग बाई! बरं झालं सांगितलेत. मी उद्यासाठी श्रीखंड करणार होते. पण नको आता.'
असं म्हणतात की Your best dietitian is your wife. युद्धपातळीवर घेतलेल्या ह्या निर्णयाने मी हिरमुसलो. अत्यंत जवळच्या मित्राच्या मृत्यूची बातमी यावी तसे श्रीखंड माझ्या आयुष्यातून दूर गेले.
एक निरस म्हातारपण, तोंडाचे बोळके दाखवत, मला हसतंय असा मला भास झाला.
माझ्या तोंडात तीळ भिजत नाही. (असे बायकोच म्हणते). माझ्या मधुमेहाची बातमी माझ्याकडूनच माझ्या मित्रपरिवारात पसरली.
संध्याकाळच्या भेटीत रेखा, माधुरी, ऐश्वर्या किंवा गेला बाजार भोळीभाबडी राखी सावंत हे विषय मागे पडून मधुमेह, रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, लिपिड प्रोफाईल असे गंभीर विषय चर्चेत येऊ लागले.
जीभेचे चोचले (आमच्या मातॄदेवतेचा आवडता शब्द) ताबडतोब सुटणं तर शक्यच नव्हता. पण उत्साहाच्या भरात आदिदास गुरुंचे जोडे विकत आणले आणि जोडे आणले म्हणून मॉर्निंग वॉक नांवाची फॅशन सुरु केली. सकाळी अनेक जणं चालायला जातात हे पाहून अंमळ नवलच वाटलं. ह्यातले किती जणं खरोखर मॉर्निंग वॉकवाले असतील आणि कितीजणं माझ्यासारखे 'वॉर्निंग वॉक'वाले असतील ह्यावर मी विचार करायचो. कांही जणं तरी नक्कीच असतील नाहीतर कोण पहाटेची साखरझोप सोडून चालायला जाईल? मधुमेहाने एकदा आपली मानगूट पकडली झोपेतली 'साखर'ही वर्ज्य होते. त्यामुळे 'साखरझोपेला पहिली सोडचिठ्ठी. चालून आल्यावर मैदाना पलीकडच्या चहाच्या टपरीवर नव्याने जोडलेल्या मित्रांसमवेत 'विदाऊट शुगर' नांवाचे चहाचे तुरट पाणी मोठ्या चवीने प्यायला शिकलो. वजन कमी करायचे म्हणून बटाटावडा, भजी सारख्या प्राणप्रिय पदार्थांवर घरातून बंदीहुकूम आल्यावर कधीतरी, कधीतरीच हं! चहा बरोबर एखादा बटाटावडा मला सुखवू लागला.

मित्र, सहयोगी, नातेवाईक वगैरे गोंडस नाती अचानक शत्रूपक्षाला सामिल झाली. सल्ल्यांचा भडीमार सुरु झाला. गोड खाऊ नका, भाताला तर अजिबात हात लावायचा नाही. अरे मी काही पुलाव-बिर्याणी मागत नव्हतो पण आपला वाफाळणारा आंबेमोहोर, साधं वरण, घरचे साजूक तुप, लिंबू म्हणजे काय फार मोठी अपेक्षा झाली का? पण नाही. तांदूळ नाही म्हणजे साधा भात, पुलाव, बिर्याणी, बिशी ब्याळी अन्ना, नारळीभात तर नाहीच नाही पण इडली, दावणगीरी लोणी डोश्याचीही आयुष्यात वजाबाकी झाली. बटाटा खायचा नाही म्हणजे घरची पिकनिकची बटाट्याची पिवळी भाजी (अहाहा...!), आलू मटार, आलू पालक, आलू मेथी, बटाटावडा, बटाटाभजी, समोसा, कटलेट, पॅटीस, फ्रेंच फ्राईज काही काही म्हणून खायचे नाही. रक्तदाब म्हणून, गरीबाचे पक्वान्न, लोणचेही खायचे नाही. फ्रूट ज्यूस राहू दे. असाही तो काही रोज रोज परवडत नाहीच पण मराठमोळा उसाचा रस? त्यावरही बंदी. खाण्यापिण्यावरील बंदी पाठोपाठ दिवेकर डाएट, डॉ. दिक्षित डाएट, डॉ. प्रमोद त्रिपाठी डाएट असे नवनविन अभ्यासक्रम आयुष्याला जोडले गेले. शाळेत असताना १ जानेवारीला उत्साहाने लिहायला सुरुवात केलेली रोजनिशी १० जानेवारीच्या पुढे कधी गेली नाही तसेच भवितव्य डाएट प्लानच्या माथी लिहीले होते.
***************************************************************************
आता पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. गेल्या कांही वर्षांत अनेक चविष्ट पदार्थांना 'विश्वामित्री' न्याय देण्यात यश मिळाले आहे. महात्मा गांधींच्या 'सत्याच्या प्रयोगां'प्रमाणे माझे 'व्यायामाचे प्रयोग' चाललेले असतात. पण आता डाएट सांभाळताना सुरुवाती इतका मानसिक त्रास होत नाही. गणपती, दिवाळी सारखे सण माझ्या तपश्चर्येला, रंभेच्या हिरहिरीने, भंग करतात. पण निवांत क्षणी विचार करतो, 'नाही, हे चुकतंय आपलं.' आणि पुन्हा मनापासून सुरू करतो.....

डाएट आणि व्यायाम.

कथालेख

प्रतिक्रिया

डॉ सुहास म्हात्रे's picture

15 Mar 2019 - 8:39 pm | डॉ सुहास म्हात्रे

=)) =)) =))

एखाद दुसर्‍या वाक्याकडे आवडले म्हणून निर्देश केला तर, बाकी अनेक वाक्यांवर अन्याय होईल म्हणूनच केवळ, वाक्ये उधृत केली नाहीत. :)

गवि's picture

15 Mar 2019 - 9:13 pm | गवि

अप्रतिम..

यशोधरा's picture

15 Mar 2019 - 9:15 pm | यशोधरा

छान लिहिलंय. आवडलं.

दादा कोंडके's picture

15 Mar 2019 - 11:11 pm | दादा कोंडके

आवडला लेख.

मिसळ's picture

16 Mar 2019 - 12:48 am | मिसळ

अनुभव कथन अगदी कुरकुरीत, चमचमीत, रसाळ, स्वादीष्ट झाले आहे. :)

फेरफटका's picture

16 Mar 2019 - 2:27 am | फेरफटका

जबरदस्त लेख!! व्वा! क्या बात है!!

प्रचेतस's picture

16 Mar 2019 - 6:34 am | प्रचेतस

एकदम खुसखुशीत लेखन.
गंभीर विषयांवरील हलकंफुलकं लेखन खूप आवडलं.

मित्रहो's picture

16 Mar 2019 - 7:08 am | मित्रहो

बऱ्याच दिवसांनी पेठकर काकांचा लेख वाचला. खुसखुशीत सकाळ झाली. मजा आली वाचताना. या साऱ्या कडे बघण्याचा दृष्टीकोन आवडला. मधुमेह आणि रक्तदाबाचा त्रास न होता करायच्या पाककृती येतील.

उगा काहितरीच's picture

16 Mar 2019 - 9:06 am | उगा काहितरीच

क्या ब्बात है ! अगदी मस्त लिहीलंत . भरपूर दिवस झालेत मिपावर असं काही वाचायलाच मिळालं नाही. तुम्ही लिहीते झालात , बरं वाटलं.

झेन's picture

16 Mar 2019 - 9:07 am | झेन

मजा आली
एक तो सुलझाहुवा इंन्सान उपरसे सरस्वती मेहरबान

सुबोध खरे's picture

16 Mar 2019 - 9:39 am | सुबोध खरे

खुसखुशीत लेख

बाजीप्रभू's picture

16 Mar 2019 - 10:42 am | बाजीप्रभू

आवडला लेख,

प्रसाद_१९८२'s picture

16 Mar 2019 - 2:28 pm | प्रसाद_१९८२

मस्त लिहिलेय.

बबन ताम्बे's picture

16 Mar 2019 - 2:36 pm | बबन ताम्बे

प्रचंड आवडला !!

प्रभाकर पेठकर's picture

16 Mar 2019 - 3:12 pm | प्रभाकर पेठकर

डॉ सुहास म्हात्रे, गवि, यशोधरा, दादा कोंडके, मिसळ, फेरफटका, प्रचेतस, मित्रहो, उगा काहितरीच, झेन, सुबोध खरे, बाजीप्रभू, प्रसाद_१९८२ आणि बबन ताम्बे
सर्वांचे मनापासून धन्यवाद.

स्मिता.'s picture

16 Mar 2019 - 5:56 pm | स्मिता.

पेठकरकाका खूप दिवसांनी लिहीते झाले पण जे लिहीलं ते मस्त खुसखुशीत!!

तुम्हाला एवढ्या नावडत्या गोष्टी कराव्या लागत आहेत तरी आम्ही आवडलं कसं काय म्हणायचं?

त्या हलकट मधुमेहाचा, रक्तदाबाचा नायनाट झालाच पाहिजे. इकडे दोन लेख कमी आले तरी चालतील पण श्रीखंड, बटाटेवड्यांवरची बंदी उठलीच पाहिजे.

डॉ. दीक्षित डायट पाळा
आणि मधुमेहाला पळवा

मग श्रीखंड, बटाटेवडे यांवर ताव मारा... हाकानाका

दुर्गविहारी's picture

16 Mar 2019 - 8:16 pm | दुर्गविहारी

मस्तच लिहीलयं. पु.ले.शु..

अनिता ठाकूर's picture

17 Mar 2019 - 11:44 am | अनिता ठाकूर

माझा प्रतिसाद उडाला की काय ?

प्रभाकर पेठकर's picture

17 Mar 2019 - 2:36 pm | प्रभाकर पेठकर

>>>>>>माझा प्रतिसाद उडाला की काय ?

सहसा असे अपघात होत नाहीत.

पण प्रतिसाद टंकला पण चुकून जोडायचा राहून गेला तर असे होऊ शकते.
तुझा एक प्रतिसाद माझ्या दुसर्‍या लेखावर आहे.

वकील साहेब's picture

17 Mar 2019 - 11:55 am | वकील साहेब

मधुमेहाच्या चाहुलीवर लिहिलेला अतिशय "गोड" लेख. आवडला.

प्रभाकर पेठकर's picture

17 Mar 2019 - 2:40 pm | प्रभाकर पेठकर

स्मिता, कंजूष,चामुंडराय, दुर्गविहारी, वकिल साहेब धन्यवाद.

चामुंडराय,

डॉ. दीक्षित डायट पाळा
आणि मधुमेहाला पळवा

गंभीर प्रयत्न सुरु आहेत.

सोन्या बागलाणकर's picture

18 Mar 2019 - 10:40 am | सोन्या बागलाणकर

गंभीर विषयाचा हलकाफुलका आहार आवडला.

बाकी मधुमेह वगैरे रोग बघितले कि द डेविल्स ऍडव्होकेट मधला अल पचिनोचा तो अफलातून डायलॉग आठवतो

God is a prankster. It's a goof of all time.
Look, but don't touch.

Touch, but don't taste.
Taste, but don't swallow.
And while you're jumping from one foot
to the next, what is He doing?

He's laughing his sick, fucking ass off!

(देव हा एक खोडकर प्राणी आहे. त्याच्या खोडसाळपणाचा हा नमुना पहा.

[देव म्हणतो]
बघा पण स्पर्शू नका
स्पर्श करा पण चव घेऊ नका
चव घ्या पण गिळू नका

आणी तुमची अशी त्रेधातिरपीट उडालेली असताना देव काय करतो?
तो तुमची गम्मत बघत पोट धरधरून हसत असतो. )

खूप दिवसांनी छान हलका फुलका लेख वाचायला मिळाला. धन्यवाद. लिहीते राहा पेठकरकाका!

विजुभाऊ's picture

18 Mar 2019 - 11:05 am | विजुभाऊ

पेठकर काका बॅक इन फॉर्म
वेलकम
मलाही डॉक्टरानी साखर ही मर्यादा रेषेच्या जर्राशी वर आहे सांगितलय.
त्याचबरोबर युरीक अ‍ॅसिड लेव्हल ही जरा वरच दाखवली आहे.
प्रत्येकजण येवून हे खाऊ नका , ते खाऊ नका. ( भात डाळ ब्रेड उसळी , मांसाहार , दूधाचे पदार्थ , बटर , अंडी , गहू, बटाटे , फळे ई.) ( आमचा जीव खाऊ नका हेच फक्त सांगायचं राहीलंय)
काय खावे हे कोणीच सांगत नाही.
डोक्याचा पार भुगा झालाय

चिन्मयी भान्गे's picture

18 Mar 2019 - 12:37 pm | चिन्मयी भान्गे

"डॉक्टर अगदीच निरोगी नव्हते" आणि "माझ्यासारखे 'वॉर्निंग वॉक'वाले असतील ह्यावर मी विचार करायचो" ही वाक्य भन्नाट आहेत!

सस्नेह's picture

18 Mar 2019 - 1:23 pm | सस्नेह

पेठकरकाका तुम्ही दिक्षित सरांचं खरंच मनावर घ्या. सगळं काही दणकून खा , ...दोन वेळा!

शेखर's picture

18 Mar 2019 - 1:29 pm | शेखर

२००८-०९ मधले काका परत आले/दिसले. बरे वाटले..
बाकी लेख उत्तमच....

प्रभाकर पेठकर's picture

19 Mar 2019 - 4:27 pm | प्रभाकर पेठकर

चिन्मयी भांगे, स्नेहांकिता आणि शेखर मनापासून धन्यवाद.
स्नेहांकिता - प्रयत्न चालू आहेतच.
शेखर - आता सतत मिपावर पडिक असण्याचा प्रयत्न करणार आहे.

शेखर's picture

20 Mar 2019 - 12:26 pm | शेखर

आमेन

अभिजीत अवलिया's picture

20 Mar 2019 - 3:29 pm | अभिजीत अवलिया

छान लिहीलय...

राजेंद्र मेहेंदळे's picture

20 Mar 2019 - 6:10 pm | राजेंद्र मेहेंदळे

अशोक कुमारला मधुमेह झालेला असतो आणि त्याची बायको त्याला गोड खाण्यावरुन सतत टोकत असते.

असो. आताशा तिशीतच मधुमेह आणि रक्तदाब असलेले आणि क्वचित हृदयविकाराचा त्रास/ झटका झालेले लोक बरेच दिसु लागल्याने लेख गंभीरपणे वाचला. खाण्यावर ( गोड/तेलकट) पिण्यावर (दारु/सिगारेट) ताबा आणि नियमित व्यायाम केला तरी अनुवंशिक आणि प्रदुषण वगैरे कारणांना कसे ताब्यात ठेवणार? त्यामुळे काय प्रतिक्रिया द्यावी नक्की समजत नाहिये. कॉलिंग मिपा डॉक्टर्स

प्रभाकर पेठकर's picture

23 Mar 2019 - 2:58 pm | प्रभाकर पेठकर

शेखर, अभिजीत अवलिया, राजेंद्र मेहेंदळे धन्यवाद.

राजेंद्र मेहेंदळे - आरोग्यदायी जीवनशैली आणि मुख्य म्हणजे वजन आणि पोटाचा घेर नियंत्रणात ठेवणे हीच यशाची गुरुकिल्ली आहे.

Sanjay Uwach's picture

25 Mar 2019 - 10:56 am | Sanjay Uwach

खूप छान. हलका फुलका लेख मनापासून आवडला.

शेखरमोघे's picture

27 Mar 2019 - 3:14 am | शेखरमोघे

छान लेख! आवडला!!

सविता००१'s picture

27 Mar 2019 - 6:25 am | सविता००१

मस्तच लेख. अगदी खुसखुशीत

प्रभाकर पेठकर's picture

1 Apr 2019 - 9:11 pm | प्रभाकर पेठकर

Sanjay Uwach, शेखरमोघे आणि सविता००१ धन्यवाद.