शिल्हांदरा : पाषाणपर्वतांच्या सानिध्यात – २ (उत्तरार्ध)

Primary tabs

चौथा कोनाडा's picture
चौथा कोनाडा in भटकंती
23 Feb 2019 - 11:41 pm

आधीचा धागा: शिल्हांदरा : पाषाणपर्वतांच्या सानिध्यात – १ (पुर्वार्ध)

पुर्वसुत्रः
......ड्रायव्हरनं रिक्षा थांबवली. त्याच्या हातावर २०रू टिकवले. घड्याळात पाहिलं तर ११ वाजत आले होते. माझ्या पीजी होस्टेलपासून इथं पोहोचायला तीन तास लागले होते. कोपऱ्यावर बोर्ड दिसताच शिल्हांदरा रेसॉर्टच्या दिशेनं अतिशय एक्साईट होऊन निघालो …… पुढे

शिल्हांदराचा बोर्ड : आता आलं जवळ

shr02

या निर्मनुष्य फाट्यावरून आत जाताना खुप मस्त वाटत होतं. एखाद दुसरी दुचाकी आत जाताना दिसत होती. मस्त शितल वारा सुखावत होता. खुप वर्षांनी ट्रेकिंगला बाहेर पडल्यांच जाणवत होतं. मित्रांबरोबरचे जुने ट्रेक आठवायला लागले. कंपनी, टारगेट, अर्जन्सी, डेलिव्हरी श्चेड्युल असले शब्द विसरून गेलो. घर, बायको, पोरगं विसरून गेलो होतो. मुक्तपणे “पंछी बनू, उडता फिरू, हर फिक्रको धुंएमें उडाता चला” असली गाणी आठवायला लागली.

सुरेख वाट : फिक्रको धुंएमें उडाता ……

shr02111

आणखी आत गेल्यावर डोंगरा पाठोपाठ भव्य पाषाणपर्वतांनी आजूबाजूचं आकाश व्यापायला सुरुवात केली होती. टवटवीत करणारी हिरवाई, निळं निरभ्र आकाश, त्यात विहरणारे काही ढग, या सगळ्यात मला पिटूकलं असल्याचा फील देत अमाप सुख देऊन जात होता. सुख, सुख म्हण्जे ते हेच!

पाषाण सुळके ….

shr02222
आंजा०१

एखाद्या कुशल कलाकाराने तासल्याप्रमाणे साक्षात देवानं निर्माण केलेली पाषाणशिल्पे ...

shr0३३३३
आंजा०२

शे-दोनशे मीटर अंतर जातोय ना जातोय तोच, चेल्लनकुमारचा फोन, कुठं पोहोचलाय, लवकर ये, आम्ही तुझी आतुरतेने वाट पाहतोय. पाठोपाठ देवेन्द्रकुमार सारवीचा फोन, येणाऱ्या जाणाऱ्या टू-व्हीलरची लिफ्ट घे. सोडतील तुला ते रेसॉर्टच्या गेट वर. मी आपलं रमत गमत चाललो होतो, वरून म्हटलं कश्याला लिफ्टबिफ्ट घ्यायची जाऊ असंच मजेत चालत. एक दोन व्हीलरवाले गेले. मी फारसं लक्ष न देता चालत राहिलो. वरून एक बांधीव स्टक्चर दिसत होतं. हेच ते असावं असं वाटून गेलं.

हेच शिल्हांदरा ….?

shr05555
आंजा०२अ

पडकं काहीतरी …..

थोडं पुढं गेल्यावर असंही पडकं काहीतरी दिसलं.

shr04444
आंजा०३

तेवढ्यात पुढं जाणाऱ्या एका गावकरी टू-व्हीलरवाल्याने गाडी माझ्याजवळ येऊन थांबवली, मला खुणेनंच कुठं असं विचारलं. मी शिलांद्रा (शिल्हांदराचा सोपा स्थानिक उच्चार) रेसॉर्ट सांगितल्यावर लगेच मागं बसायला सांगितलं आणि रेसॉर्टच्या जवळ सोडलं. डाव्या हाताचा एक मोठा पाषणखडक पुढं गेल्यावर रेसॉर्टचं प्रवेशद्वार लागलं. पाषाणरचनेचा वापर करून बांधलेलं प्रवेशद्वारानं लक्ष वेधून घेतलं.

रेसॉर्टचं प्रवेशद्वार

shr06666

माहिती देणारे फलक

आतल्या बाजूला शिल्हांदरा रेसॉर्ट आणि रामनगराची माहिती देणारे फलक दृष्टीस पडले. परिसरात असलेले ७ पर्वत, प्रभू रामचंद्रांचे वास्तव्य, पाषाणयुगाशी नातं सांगणाऱ्या शिलालेखांचं अस्तित्व या विषयीची माहिती जुन्या काळात घेवून जात होती.

shr07777

shr08888

वाड्याच्या चौकटी सारख्या दिसणाऱ्या आणखी एका प्रवेशद्वारातून आत गेल्यावर चिंचोळ्या मार्गातून आता जाताना कोरीव लेण्यांमधून जात आहोत असा भास होत होता, भारी वाटतं होतं.

कोरीव लेण्यांसारखं

shr09999

आत जाताना एक दोघंच दृष्टीस पडले. बाकी निवांत होतं.

shr0999

shr0888

डाव्या बाजूला रेस्टॉरन्ट सारखं दिसलं म्हणून तिकडं शिरलो तर मोठा गलका झाला. माझ्य़ा भिडूंनी माझं जोरदार स्वागत केलं होतं. मिठ्या मारून झाल, येताना अडचण तर नाही आली अश्या प्रेमानं चौकश्या करत असतानाच त्यांनी टाळ्यांचा गजर देखिल केला, या टाळ्या आमचा चेन्नईचा भिडू मुरूगनाथन आणि त्याची पत्नि अनुप्रिता या नवदाम्पत्यासाठी होत्या. तो सपत्निक आल्यामुळं मला थोडं आश्चर्यच वाटलं. त्यानं सकाळीच चेल्लनकुमारला कल्पना दिली होती की अनुप्रिता देखील येणार आहे. तरतरीत, हसतमुख चेहऱ्याची अनुप्रिता आम्हा सर्वांची ओळख झाल्यावर पटकन मिसळून गेली आणि सर्वांचा संकोच गेला. ती देखील चेन्नईचीच होती, सी.ए.च्या फ़ायनल इय़रला होती.

ते रेस्टॉरन्टचं होतं. बाजुला लक्ष गेलं तर भव्य पाषाणपर्वत दृष्टीस पडला. भव्यतेची अशी दृष्यं गारूड करत खिळवून ठेवत होते. .

shr0777
आंजा०४

रेस्टॉरन्टच्याच बाजूला सुंदर टेरेस

रेस्टॉरन्टच्याच बाजूला सुंदर टेरेस होता. स्तंभाच्यावर फुलं-वेली लावलेले समईच्या आकारांचे पॉटस होते. छान दिसत होते.

shr0666

भुकतर लागलीच होती, रेस्टॉरन्टकडं परतलो. तिथं बुफेट पद्धतीनं टेबल्सवर वेलकम ड्रिंक आणि नाश्ता मांडून ठेवला होता. दोन तीन प्रकारची सरबतं, इडलीडोसे, उपमा, वडे, खिचडी, पराठे, ब्रेड सॅण्डविचेस, ज्याम्स इ. असे चिक्कार पदार्थ होते, चहा, वाफाळती कॉफी ही पेय हजर होती. (मी डबल फिल्टर कॉफी मारली हे सांगायलाच नको) टेस्टी आणि अनलिमिटेड. किती बी खा. भरपेट खाऊन झाल्यावर आम्ही गेम्सकडे मोर्चा वळवला.

इनडोअर गेम्स कडे

shr0555

पाषाणपर्वताच्या पायथ्याशी लॉन-सपाटीवर डाव्याबाजूला इनडोअर गेम्स, उजव्या बाजूला स्विमिंग पुल, समोर मध्यभागी पाषाण पद्धतीचं चौकटी-स्तंभवालं सुंदर आकर्षक स्टेज होतं.

पाषाण पद्धतीचं चौकटी-स्तंभवालं सुंदर आकर्षक स्टेज

shr0444
आंजा०५

इन-डोअर गेम्स मध्ये टेबल टेनिस, कॅरम, चेस, डार्टस असले बरेच गेम्स होते. लहान मुलांसाठी देखील भरपूर. टेटे-कॅरमचा डिव्हिजलनल चॅम्प होता. त्यांन आपलं कौशल्य दाखवत इथं देखील चकित केलं. अनुप्रितानं टेटे मध्ये कसब दाखवत त्याला चांगलच झुंजवलं. हा आनंदाचा सेशन संपल्यावर एक झकास ग्रुप फोटो झाला. (फोटोत अनुप्रिता आणि एकजण नाहीय) पार्श्वभुमीवर सुंदर आकर्षक स्टेज दिसतंय.

आम्ही

shr03331

तास-दीडतास असा टाईमपास झाल्यावर प्रतुल हिरेमठ, जयराज गट्टी आणि वरदप्रसाद क्रिकेटचं किट घ्यायला ऑफिसमध्ये धावले. औपचारिकता पुर्ण करून पलीकडच्या प्रशस्त मैदानात क्रिकेटचा आनंद घेणं चालू झालं.
अनुप्रिता देखील हौसेने सामील झाली आणि खेळाला आणखी मजा आली.

क्रिकेट ..... क्रिकेट

shr0222

shr0111

अर्धाएक तास खेळून झाल्यावर आणखी आठदहाजणांचा चमू क्रिकेट किट घेऊन आला. हा आमच्याच आयटी पार्क मधले दुसऱ्या कंपनीवाला ग्रुप होता. प्राथमिक बोलणी केल्यानंतर त्यांच्याशी १०-१० ओव्हर्सची मॅच ठरली. विजेत्यांना कप म्हणून एक बिस्किटपुडा ! कारण आम्हा दोन टीमच्या सॅकमध्ये तेच एक कॉमन सापडलं.
टॉस जिंकून त्यानां बॅटिंग दिली. प्रतुल हिरेमठ, प्रशांतबाबू, जयराजनं गुगली, स्पीन्स टाकत त्यांचा ८६ धावात ऑल आऊट केलं. आमची फिल्डिंग झकास झाली. अनुप्रितानं पण सुरेख साथ दिली. आमची इनिंग सुरू झाल्यावर पहिले चारपाच जण (त्यात मी ही होतो) २० धावातच आऊट. संघनायक वरदप्रसाद आणि मुरूगनाथन हे ताज्या दमाचे खेळायला आले आणि सामन्याचा रंग बदलून पालटला. वरदप्रसादच्या चौकार षटकारांनी आम्हाला चेअरिंग करायला चेव चढला. मुरूगनाथनचा देखील फॉर्मात येऊन छान खेळ चालला असल्यामुळं अनुप्रिता आणखी चेअरिंग करत होती. एक उंच उडालेला चौकार झेलण्यासाठी प्रतिस्पर्धी क्षेत्ररकक्षक धावला. झेल त्याच्या हातातून निसटला, आणि तो देखील पडला तो उठलाच नाही. बाकीच्यांच्या हाकाऱ्यांनाही प्रतिसाद देईना. ती टीम आणि आम्ही सर्व त्याकडे धावलो. कोडाळं करून चेहऱ्यावर पाणी वै मारणं सुरु झालं. हूं नाही की चूं नाही. घाबरलो ना आम्ही. दिड-दोन मिनिट असेच गेले असतील, त्यानं मंदपणे डोळे उघडले ……… आणि जोरात हसायला लागला. साल्यांनं आम्हाला शेंडी लावली होती

प्रतिस्पर्धी क्षेत्ररकक्षक बेशुद्ध, वातावरण टाईट.

shr011

…मग सगळेच हसत सुटले, वातावरण खेळीमेळीचे झाले. वरदप्रसाद- मुरूगनाथन जोडीनं वेग पकडला अन साडेसात ओव्हर्समध्येच ९० धावा करून सामना संपवला. वरदप्रसाद ४२ धावा करून मॅन ऑफ द मॅच किताब झाला. या दरम्यान अनुप्रिता हौसेनं फोटोग्राफी केली.

खालच्या फोटोत खुष झालेला वरदप्रसाद आणि टीम विजेत्यांचा कप अर्थात एक बिस्किटपुडड्यासह !

SHIL_005

shr022

दोन वाजत आले होते. कांऊन्टरवर क्रिकेट किट परत मस्तपैकी घामाघुम झालो होतो. उजव्या हाताला असलेला नितळ पाणीवाला स्विमिंग पुल खुणावत होताच, स्विमिंग कांऊन्टरवर मधून पटापट कॉश्चुमस भाड्याने घेतल्या, कपडे लॉकर-रूमला टाकले. कॉश्च्यूम्स अंगावर चढवल्या आणि पाण्यात सूर मारले. अर्थात अनुप्रिता पाण्याला बिचकून असल्यामुळं ती पुलमध्ये उतरली नाही.

स्विमिंग पुल

shr033

मग काय, पुढचा तासभर पाण्यात नुसती धमाल. एका बाजूला उंच पर्वत आणि खाली नितळ पाणी … लै भारी वाटतं होतं.
पुलमध्ये फुल्ल धमाल करताना आम्ही.

एका बाजूला उंच पर्वत आणि खाली नितळ पाणी …

shr044

आमचं सुखदायी पोहणं. पुलच्या डाव्या हाताच्या स्तंभवाल्या स्ट्रक्चरच्या खिडक्यांमधून खालच्या दऱ्यांचं विलोभनिय दर्शन होत होतं

shr055

जयराज गट्टी, प्रतुल हिरेमठ, , मुरूगनाथन आणि चेल्लनकुमार गौडा यांचे आनंदी चेहरे

shr066

आम्ही स्विमिंगचा आनंद घेत असताना आमचा धारवाडीयन जयराज गट्टी डुंबण्यात जरा जास्तच रमला होता. पोहणं थांबवून वेळ होत असतानच त्याला पाण्याखाली कोणीतरी धडकलं अन त्याचं धारवाडी रक्त उसळलं. आधीच आवाज मोठ्ठा अन वर आक्रमक आवेश. यानं त्याच्याशी जोरात भांडायला सुरुवात केली. तो बिचारा या अचानक घाबरला. पण त्याचे दोन चार भिडू ते धावून आले अन सुरु झाली वादावादी. आख्खा पुल मधली सगळी पोहणं थांबवून या भांडणाकडॆ बघत बसले. वातावरण आणखी तापणार हे पाहून देवेन्द्रकुमार सारवीमध्ये पडला. निगोसियेशन स्किल्स वापरून जयराजला शांत केलं (जयराज याचं ऐकायचा, भांडणखोर स्वभावामुळं पडी झाली की बऱ्याच वेळी देवेन्द्रकुमार वाचवायचा. एकदा तर प्रोजेक्ट टेली-रिव्हिव्य सुरू असताना पी.एम. ई. देवांगनं याच्यावर आरडाओरडा केला म्हणून जे दंगा केला तो निस्तरता निस्तरता मिटिंगम्ध्ये नाकी नऊ आले होते. इथंपण देवेन्द्रकुमारनं संयमित पणे जयराजची बाजू घेऊन मिटिंग कूल केली होती. रिव्हिव्य मिटिंग यशस्वी झाली म्हणून आम्ही सर्वजण खुष!)

वरील सगळं झाल्यावर आम्ही आमचा मोर्चा रेस्टॉरन्टचं वळवला. बुफे पद्धतीनं ठेवलेल्या टेबल्सवर सुप, सॅलड, रायते, व्हेज-भाज्या, नॉन व्हेजमध्ये चिकन हंडी, बिर्याणी, रसम, रोटी, भाताचे चारपाच प्रकार, काही स्वीटस कर्ड राईस, डेझर्ट्स, आइस्क्रीम्स असा भरगच्च जामानिमा मांडला होता. स्विमींग करून सॉलिड भूका लागल्या होत्या सगळ्यांना. पटापट डिश भरून एका झाडाखाली कट्ट्यावर बसलो. मी आपलं पक्का व्हेज म्हणून मोजकं व्हेज घेवून आलो. मुरूगनाथन , अनुप्रिता ते सुद्धा व्हेज. मग आम्ही तिघं एका बाजूला बसलो. मग मघाचं पुल मधलं भांडण आणि जयराजच्या असा विषय सुरु झाला. काही मिनिटं जातायत तोच कुणाच्या तरी लक्षात आले, जयराज आणि प्रतुल कुठं दिसत नाहीयत. देवेन्द्रकुमार त्यांना पहायला बुफे कांऊंटरकडे गेला. तिथं कांऊंटरवाल्यांशी बोलताना दिसले दोघेही. देवेन्द्रकुमार हसत परतला. त्या दोघांनाही प्यायची हुक्की आली होती. कांऊंटरवर बीयरही मिळत नाही म्हटल्यावर जयराज वैतागून कावकाव करत होता. त्यांच्या मित्रानं त्याला इथं हमखास मिळते असं सांगितलं होतं, नाही म्हटल्यावर परत मित्राला फोन करून दोघंही अर्धा तास रेसॉर्टच्या खालच्या अंगाला जाऊन तहान भागवून आले. तो पर्यंत देवेन्द्रकुमार कडून जयराजच्या तरहेवाईकपणाचे किस्से ऐकताना ज्याम मजा आली.

रेस्टॉरन्ट

shr077
आंजा०६

जेवण पुर्ण होई पर्यंत तीन वाजलेच होते. जेवणाची सुस्ती डोळ्यांवर येतच होती. विश्रांती नंतर मोर्चा रेन डान्सकडे वळवला. या भागाचे इंटेरियर देखील चौरसाकृती दगडी स्तंभासारखे बनवले होते. अंधारामुळे एखाद्या प्राचिन गुहे प्रमाणे भासत होते. छतावर वडाच्या पारंब्याची रचना होती, त्यातून रेन डान्ससाठीच्या पाण्याचा वर्षाव होत होता.

अन त्याखाली एका शाळेच्या सहलीच्या मुलांची गाण्याच्या तालावर त्या पावसात भारी धमाल सुरू होती.

पावसात भारी धमाल

shr088
आंजा०७

आमच्या सारखेच अजून दोन ग्रुप्स त्या मुलांचा रेन डान्स संपण्याची वाट पहात होता. आम्ही शॉर्टस घालून तयारच होतो. त्यांचं संपलं की सर्वांची जोषात एन्ट्री झाली. विविध रंगांचे फ्लड लाईट फोकस यांनं वातावरण एकदम झिंगाट करून टाकले. प्रत्येक जण आपले नृत्यकौशल्य दाखवत होता. वरदप्रसाद, चेल्लनकुमार आणि जयराज यांनी झकास गावरान डान्स करून जबरी करमणूक केली. मी ही डान्समध्ये (बऱ्यापैकी) वाकबगार असल्यामुळं माझंही कौतुक झालं.
एकंदरीत जबरी धमाल आली.

आमची धमाल

SHIL_006

shr099
आंजा०८

अर्ध्या पाऊण तासानंतर वेळ संपल्यामुळे रेनडान्सच्या बाहेर आलो. आता उन्हं कलायला लागली होती.
बाजूचा पर्वत सोनेरी दिसायला लागला होता. काही जणांची त्याकडे जाण्या साठी लगभग सुरू होती. लक्षात आलं की रोप ऍक्टीव्हिटी सुरू होणार होती. खालच्या फोटोत पर्वताचा मानवीकवटी सारखा आकार दिसतोय, त्यात डोळ्यांची खोबण दिसतेय. तिथून रोपनं व्हॅली क्रॉसींग साठी सोडत होते (फोटोत आकाशाकडे जाणारे रोप फिकट रंगात दिसताहेत) आमच्यापैकी काहीजणांनी दमले असल्यामुळं रोप ऍक्टीव्हिटी करणार नाही असं जाहीर केलं. मी, वरदप्रसाद, चेल्लनकुमार, मुरूगनाथन आणि अनुप्रिता (हो, तिला मुरूगनाथन कसं पटवलं काय माहित पण तयार झाली)

कलायला लागलेली उन्हं

SHIL_001

काऊंटर वरून व्हॅली क्रॉसींगचं कुपन विकत घेऊन आम्ही पाच जण त्या डोळ्यांच्या खोबणी सारख्या दिसणाऱ्या टप्प्यावर गेलो. बऱ्यापैकी चढून जावं लागली. थोडीफार दमछाक झाली. ऍक्टीव्हिटी को-ऑर्डिनेटर्स प्रत्येकाला सेफ्टी बेल्टस, स्लिंग्ज लावून सज्ज करत होते. आणि नंबर आला की रोपमध्ये अडकवून एक झोका देऊन पैलतीरी ढकलत होते.

व्हॅली क्रॉसींग

SHIL_002
आंजा०९

या ठिकाणाहून खालचे दृष्य अतिशय सुंदर दिसत होते. पुर्ण रेसॉर्ट, त्यातल्या लॉन्स, स्विमिंग पूल, सुंदर दगडी स्ट्रक्चर्स, बाजूच्या दऱ्या नजर खिळवून ठेवत होते. हिवाळ्याचं कोवळे सोनेरी मावळतीचे ऊन हा नजारा अप्रतिम, संस्मरणीय. थोड्यावेळात माझा नंबर आला. सेफ्टी बेल्टस, स्लिंग्ज लावून सज्ज होतोच पण दोरावर अडकवल्यावर खाली खोल पाहून घाम फुटला. को-ऑर्डिनेटर्सनी पटापट सुचना देऊन ढकललं सुद्धा !

नजर खिळवून ठेवणारे

SHIL_003
आंजा१०

पहिली एक-दोन मिनिटं घाबरायला झालं पण नंतर मजा वाटायला लागली. पाच सहा मिनिटातच पैलतीरी पोहोचलो. मस्त एक्सायटिंग राईड. झकास वाटतं होतं. पैलतीरी को-ऑर्डिनेटर्स बेल्टस काढायला तयारच होते. काढून झाले की हे सर्व साहित्य दुसऱ्या एका रोपने मुख्य स्टेशनला (डोळ्यांच्या खोबणी सारख्या दिसणाऱ्या ठिकाणी) परत पाठवून देत होते. ज्या टेकाडावर आम्ही पोहोचलो होतो तिथून मुख्य रिसॉर्टकडे आम्ही पाचीजण या थरारक सुंदर अनुभवाबद्दल गप्पा मारत खाली उतरलो. अनुप्रिता तर खुपच भारून गेली होती.

व्हॅली क्रॉसींग नंतरची चेल्लनकुमारची आनंदी मुद्रा.

SHIL_004

व्हॅली क्रॉसींगचं शोर्य गाजवलं म्हणून बाकीच्यांनी टाळ्याच्या गजरात स्वागत केलं. आता हळूहळू सुर्य मावळून काळोख पडायला सुरूवात झाली. परतीची वेळ झाली होती. चेहऱ्यावर दमणूक तरीही आनंद होता. काऊंटरवर बील पेमेंट करून रिसॉर्टच्या बाहेर पडलो. मुरूगनाथननं अनुप्रितासह त्याची मोटार-सायकल पार्किंग मधून बाहेर काढली, दोघांनाही बाय केलं. अनुप्रितानं हा ग्रुप आवडला आणि आजच्या दिवसाचा धमाल अनुभव आली म्हणून सर्वांना विशेष धन्यवाद दिले.
येताना रामनगरा, केंगेरी असं बस बदलत इ.सी. सर्कलला परतलो. जातेवेळी सारखा अवलीया ड्रायव्हर नसल्यामुळं आणि ट्रॅफिक सुरळीत असल्यामुळं दोन-सव्वादोन तासातच पोहोचलो. इ.सी. सर्कलच्या कॉर्नरच्याच हॉटेल रूचीसागरला साऊथ इंडियन डिशेश माझी वाटच पहात होत्या. नीर डोसा, रस्सम आणि बीसी ब्याळी भात खाऊन तुडुंब झालो. नंतर डेझर्ट म्हणून माझी आवडती फिल्टर कॉफी होतीच. होस्टेलला परतलो तेंव्हा ११ वाजले होते. रात्री डोळ्यांवर झोप अंमल दाटत असतानाच स्वप्नांच्या दारवर टकटक झाली. उठून दार उघडतोय तर समोर साक्षात ती, माझी प्रियपत्नी तिलोत्तमा! विलोभनीय चेहऱ्यावरचा केशसंभार सावरत नजर झुकवून अस्फुटशी म्हणाली असा स्वप्नात असल्यासारखा काय पाहतोयस, मी आलेय अन हळूवारपणे माझ्या हातात हात गुंफले….. आणि पाषाणपर्वतांच्या सानिध्यात पुन: एकदा तिच्या बरोबर स्वर्गीय अश्या चंद्रप्रकाशात विहरायला घेऊन गेली.

-समाप्त-
+++++++++++++++++++++++++++++++
आंजा०१ ते आंजा१० हे फोटो आंजावरून साभार.

प्रतिक्रिया

दुर्गविहारी's picture

24 Feb 2019 - 10:54 am | दुर्गविहारी

मजा आली वाचायला ! एकदा हा अनुभव घ्यायलाच हवा. महाराष्ट्रातही डोंगराचा फायदा घेउन असे एखादे रिसॉर्ट करायला हवे. पु.ले.शु.

चौथा कोनाडा's picture

25 Feb 2019 - 4:30 pm | चौथा कोनाडा

धन्यू दुर्गविहारी.
महाराष्ट्रात देखील टुरिझम / ऍडव्हेन्चर टुरिझम बऱ्यापैकी तेजीत आहे. पुढंमागं असं होईल एखादं रेसॉर्ट.

कंजूस's picture

24 Feb 2019 - 11:16 am | कंजूस

सुंदर!!
(( फोटो फार झालेत, लवकर उघडत नाहीत.))
-----

प्रबळगडाच्या पायथ्याशी( पनवेल १५किमी) एक वेलनेस रिझॅाट आहे बरेच वर्षं. आत कायकाय सोयी आहुत माहीत नाहनापण तिथे राहिलेला एकजण वर गडावर गाइडला घेऊन आलेला भेटला होता.

चौथा कोनाडा's picture

25 Feb 2019 - 5:09 pm | चौथा कोनाडा

हो, फोटो जास्त झालेत खरे. (मलाही इतके अपलोड करताना जरा जडच गेलं)
संपुर्ण परिसराची कल्पना यावी यासाठी आवश्यक वाटत होते, त्यामुळं हे सगळे टाकयचा मोह आवरला नाही.

प्रबळगडाच्या पायथ्याशी कुठलं रिझॅार्ट आहे पहायला पाहिजे.

धन्यवाद, कंजूससाहेब.

डॉ सुहास म्हात्रे's picture

24 Feb 2019 - 2:56 pm | डॉ सुहास म्हात्रे

मस्तं सहल ! फोटोही सुंदर आहेत.

चौथा कोनाडा's picture

28 Feb 2019 - 1:20 pm | चौथा कोनाडा

धन्यवाद, डॉ सुहास म्हात्रे !

बबन ताम्बे's picture

24 Feb 2019 - 3:13 pm | बबन ताम्बे

मस्त सहल आणि फोटो . एक छान सफर !!

चौथा कोनाडा's picture

4 Mar 2019 - 3:56 pm | चौथा कोनाडा

धन्यवाद, बबन ताम्बे.

जॉनविक्क's picture

12 Jun 2019 - 9:38 pm | जॉनविक्क

_/\_

चौथा कोनाडा's picture

11 Jul 2019 - 5:38 pm | चौथा कोनाडा

धन्यवाद, जॉनविक्क.

jo_s's picture

25 Jun 2019 - 5:29 pm | jo_s

मस्त सहल
छानच वर्णन, आणि फोटो

चौथा कोनाडा's picture

7 Jul 2019 - 6:25 pm | चौथा कोनाडा

धन्यवाद, जो_एस साहेब !

सुधीर कांदळकर's picture

12 Jul 2019 - 6:58 am | सुधीर कांदळकर

वर्णन, फोटो छान जमले आहे. धन्यवाद.

चौथा कोनाडा's picture

16 Jul 2019 - 4:19 pm | चौथा कोनाडा

धन्यवाद, सुधीर कांदळकर !

जालिम लोशन's picture

16 Jul 2019 - 6:06 pm | जालिम लोशन

सुरेख

चौथा कोनाडा's picture

20 Jul 2019 - 5:39 pm | चौथा कोनाडा

धन्यवाद, जालो साहेब !

श्वेता२४'s picture

20 Jul 2019 - 5:49 pm | श्वेता२४

छान वर्णन केले आहे. फोटोही सुरेख

चौथा कोनाडा's picture

24 Jul 2019 - 1:37 pm | चौथा कोनाडा

धन्यू श्वेता२४ !

दगड धोंड्यांचे फार आकर्षण आहे मला, प्रत्येकात काहीतरी आकार शोधात असतो.
हे रीसॉर्ट आवडल, विशेषतः त्या दगडी बांधकामामुळे छान वाटतंय.
चांगलं लिहिलंय, पुढील लेखनास शुभेच्छा!

चौथा कोनाडा's picture

28 Jul 2019 - 6:33 pm | चौथा कोनाडा

खरंय ! दगड धोंड्यांचे आकार, त्यांचे रंग, पोत म्हणजे साक्षात निसर्गाने घडवलेल्या शिल्पकृती !
त्यांचा आनंद घेताना भान हरपून जायला होते !

धन्यु, टर्मीनेटर हा सुंदर प्रतिसाद दिल्याबद्दल !