शिल्हांदरा : पाषाणपर्वतांच्या सानिध्यात - १

Primary tabs

चौथा कोनाडा's picture
चौथा कोनाडा in भटकंती
8 Jan 2019 - 10:42 pm

शिल्हांदरा : पाषाणपर्वतांच्या सानिध्यात - १

ऑफिसमध्ये नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात मिटिंगमध्ये प्रोजेक्ट हेड साहेबांनी घोषित केले की “आपल्या ग्रुपची या वर्षीची सहल व्यवस्थापनाकडून मंजूर झालेली आहे, आता तुम्ही सहलीच्या नियमानुसार तुमची सहल निश्चित करू शकता !” हे ऐकल्यावर ग्रुपमध्ये आंनदाची लहर पसरली.
बंगळूरमधील आमचा ग्रुप म्हणजे एकदम युवा-तरूणांचा सळसळता ग्रुप. वयोगट २६ ते ३२. मीच एकटा फॉर्टी प्लस. लगेच आमचा टीम लिडर कीर्तीनाथने चेल्लनकुमारला सांगितले “चेल्लन, धिस टाईम, आय अम्म बिझी. यू विल ऍरेन्ज द ट्रिप.“ म्हटल्यावर चेल्लन लागला कामाला. दिवसभराचं आऊटींग ठरवत. पहिल्यांद गुहान्तरा रेसॉर्ट ठरवलं, पण काहीजणांचं म्हणणं पडलं की आम्ही तिथं जाऊन आलोय, ते आता खुप कॉमन झालेय, दुसरं बघू. मग आणखी नेटवर शोधाशोध आणि इकडंतिकडं चौकशी करून शिल्हांदरा हेरिटेज रेसॉर्ट ठरवलं. सगळी मंडळी खुष झाली. मला तर हे नविनच. मागच्याच आठवड्य़ात पुण्याहून प्रोजेक्ट बदली होऊन बंगळूरात आलो होतो.

ऑफिस मिटींग :
OFFICE MEETING

आमचा पॅकरटेक ग्रुप दहाजणांचा होता. टीम लिडर कीर्तीनाथ, चेल्लनकुमार गौडा, देवेन्द्रकुमार सारवी, प्रतुल हिरेमठ, जयराज गट्टी, रविन्द्रराजू, वरदप्रसाद, प्रशांतबाबू आयोदी, मुरूगनाथन आणि मी. या पैकी मी, प्रतुल आणि मुरूगनाथन तिघेजण पुण्यातून बदली होऊन या प्रोजेक्टवर काम करायला आलो होतो. प्रतुल हुबळीचा होता, कानडी बरोबरच मराठी देखील छान बोलायचा. त्याने दोन वर्षांपुर्वी याच प्रोजेक्ट मध्ये चार-सहा महिने काम केल्यामुळे टीम मधली इतर मडंळीशी त्याची चांगलीच गट्टी होती. यानं मला प्रोजेक्ट मधले बरेच काम समजावून सांगितले. त्यामुळं मला काम सोपं झालं. काहीही अडचण आली की तो मला मदत करयला तत्पर. मुरूगनाथन हा आयआयटी जबलपूर मधून एमडेस (मास्टर ऑफ डिझाईन) पासाआऊट. टॅलन्टेड. बाइक्स, कार्स, ट्रक्सची चित्रं इतकी सुंदर काढायचा की पहातच रहायचो. युएस मधून पुण्याला दुसऱ्या एका ग्रुपला प्लेस झालेला. तिघेही पुण्याचे, बंगळूरात कंपनीच्या इलेक्ट्रॉनिक सिटी, फेज-२ बदली झाल्यावर कंपनीच्या गेस्ट-हाऊसवर आठ-दहा दिवस एकत्रच रहात होतो. आमच्या तिघांची एक वेगळीच टीम तयार झाली होती.

पीजी हॉस्टेल :
PG HOSTEL

पॅकरटेक हा युएस मधला आमच्या कंपनीचा क्लायंट. काही डिझाईन अक्टिव्हिटिज आमच्याकडून आऊटसोर्स केल्या होत्या.
आमचे पॅकरटेक प्रोजेक्टहेड के बी राजू हे हैदराबाद इथल्या ऑफिसला बसायचे, आणि प्रोजेक्ट मॅनेजर ई. देवांग
चेन्नईच्या ऑफिसला. जेव्हा गरज असेल तेंव्हाच बेंगळूर ऑफिसला यायचे. त्यामुळं अम्हा टीममेम्बर्सना साहेबांच्या उपस्थितीचे अजिबात टेन्शन नसायचे. सगळे मुक्तपणे मजा करत असायचे, अर्थात कामाच्या डेडलाईन्स सांभाळून. वेळा पाळायची कटकटही फार नसायची. कीर्तीनाथला पटवलं की सगळं ऍडजेस्ट होऊन जायचं. एकंदरीत धमाल होती.

ऑफिस बिल्डिंग :
OFFICE Building

आम्ही तिघं पुणेकर ज्या दिवशी जॉइन झालो त्य दिवशी कीर्तीनाथ रजेवर होता. त्या दिवशी आम्हाला कॉम्प्यूटर व जागा अलॉटमेंट, कामाची माहिती, वर्कफ्लो इ. माहिती देवेन्द्रकुमार कडून देण्यात आली. दुसऱ्या दिवशी कीर्तीनाथ आला, त्याला बघितल्यावर गंमतच वाटली. आपण डब केलेल्या साऊथ इंडियन सिनेमे पाहतो ना, त्यातल्या व्हिलनचा दुसरा-तिसरा असिस्टंट, डिट्टो तसा ! शिड्शिडीत बांधा, काळाकुट्ट वर्ण, तोंड भरून हसला की दिसणारे पांढरेशुभ्र दात, अंगावर चित्र-वि-चित्र फेडेड जीन्स, रंगीबेरंगी शर्ट, हातात लेदर ग्लोव्हज, पायात मिठून चक्रवर्तीसारखे घोट्याच्या वर येणारे शुज, साखळ्या लावलेलं जॅकेट, तशीच फॅशनेबल सॅक ! मी तर पहातच राहिलो त्याच्याकडे ! त्याचे लूक्स म्हणजे अतरंगीच ! रोज ३५ किमीचा प्रवास करत स्टाइलिश बाईकवरून यायचा. तो म्हणजे एक स्टाईल आयकॉनच !

कीर्तीनाथ त्रिचीचा होता, मला भॉय म्हणून हाक मारायचा, मुन्नाभाई एमबीबीएस सिनेमाचा फॅन ! माझ्या नावांन हाक मारायला त्याला काय अडचण होती ते कधीच कळले नाही, आधी मुन्नाभॉय आणि नंतर फक्त भॉय असंच संबोधायचा. हायड्रालिक्समध्ये एक्क्सपर्ट होता. पहिल्या चार आठ दिवसांच्या इंटरऍक्शन नंतर आमचं छान ट्युन अप झालं. प्रोजेक्ट डिलिव्हरीची अर्जन्सी झाली की हक्कानं मला थांबवुन घ्यायचा (मी कंपनीच्या जवळ्च पीजी होस्टेलवर रहायला होतो ना!)

प्रोजेक्ट मॅनेजर ई. देवांग चेन्नईच्या ऑफिसला बसायचा. तिथून तो आमचं पॅकरटेक आणि इतर क्लायंट पहायचा. मी इथल्या ऑफिसला असे पर्यंत तो इथं कधीच आला नाही. (नंतर चेन्नईला माझी बदली झाली तेव्हा त्याला प्रत्यक्ष भेटलो) जवळजवळ दररोज प्रोजेक्ट संबधी टेली-मिटींग असायची. तो कायम आमच्या टीमला झापत असायचा. एरर्स आणि रिजेक्शनवर फोनवरच आकांडतांडव करत असायचा. अर्धवट आणि चित्रविचित्र इनपुटस मुळं खुप घोळ व्हायचे. डिलिव्हरी कायम अर्जन्ट असल्यामुळं असं व्हायचं. हे कारण सांगितलं तर तो ऐकून घ्यायचा नाही. ही मिटिंग संपली की आम्ही त्याची टवाळी करत सगळे हसत बसायचो.

प्रोजेक्टहेड के बी राजू मात्र एकदम चांगले होते. त्यांच ऑफिस हैदराबादला, पण नेहमी चेन्नई, बंगळूर आणि क्लायंट लोकेशनला फेऱ्या मारत असायचे. बंगळूरला नेहमी यायचे, आम्हा लोकांच्या अडचणी जाणून घ्यायचे, मार्गदर्शन करायचे. लिडर कॅटेगिरीतला माणूस. जमेल तेव्हढ्यावेळात प्रत्येकाशी बोलायचे, अडीअडचणी जाणून घ्यायचे. समर्पक मार्गदर्शन करायचे. त्यांच्या सहवासात सुखायला व्ह्यायचं. कायम लक्षात राहिल असा प्रोजेक्टहेड. त्यांनी नोव्हेंबर मिटिंगमध्ये सहल मंजूर झाली हे वर सांगितलं आहेच.

तर, आमच्या सहलीचं प्लानिंग चेल्लनकुमार यांन शिल्हांदराला केलं, डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात. कोण कोण येणार कसं जाणार, गाडी कोणती करणार हे लवकर ठरतच नव्हतं. प्रोजेक्टहेड आणि प्रोजेक्ट मॅनेजर येवू शकणार नव्हते हे चार आठ दिवसानंतर स्पष्ट झाले. शिल्हांदराची दिवसाची एन्ट्री फी ८०० रू होती. आमच्या आठजणांच्या ग्रुपला ते डिसकाऊंट द्यायला तयार नव्हते (२० जणांच्या वरच्या ग्रुपसाठी डिसकाऊंट ऑफर होती) पण ओळखी काढून आणि कंपनीचा संदर्भ देवून डिस्काऊंट मिळवण्यात यश आले. ८०० रू ऐवजी ६०० रू !

शिल्हांदरा हेरिटेज रेसॉर्ट:
SHR

सर्वांच्या लाडक्या चेल्लनकुमारचा आवाज लय डेंजर होता, आवाजात प्रचंड बास, त्या आवाजाची सवय व्ह्यायला मला आठ-दहा दिवस जावे लागले. बरेच जण त्याला किरकोळ कामं सांगायचे आणि तो देखील आनंदानं करायचा, त्यामुळं तो सर्वांचा लाडका. स्वभावानं लाघवी होता. मोठ्या उत्साहात त्यानं सहल प्लानिंग केलं म्हैसूरजवळच्या मांड्याच्या सधन घरातून आलेला, मला मांड्या गावाबद्द्ल उत्सुकता असल्यानं मी त्याला कायम काय काय विचारत असे.. वर्क-लोड नसलं की माझ्याशी बोलायला यायचा. मस्त गप्पा रंगायच्या आमच्या.

आमच्यातला जयराज गट्टी तर शिल्हांदराला येवून दंगा करायला खुपच उत्सुक होता. खुप बडबड्या होता हा, बोलताना काही भीडभाड ठेवायचा नाहे आणि मोठ्यांनं बोलत असायचा. नेहमी कश्याला ना कश्याला शिव्या घालत असायचा. कष्ट करत गरीब घरातून आलेला जयराज धारवाडचा होता. दोन-अडीच वर्षे पुण्याला एका प्रेस्ड पार्ट डिझाईन कंपनीत होता. रहायला माझ्या घराच्या लोकॅलिटीजवळ रहायला होता. त्यामुळं त्याची माझी मस्त गट्टी जमली. तिथल्या बऱ्याच आठवणी शेअर करत असायचा. लोकांना पुढं होऊन मदत करायचा. माझ्या पीजी होस्टेलवर पण गप्पा मारायला अधूनमधून यायचा.
अश्या तऱ्हेने ग्रुपमध्ये मिसळत मिसळत मी ग्रुपचा भाग झालो. मला या सहलीत खुप मज्जा येणार हे जाणवलं. मला ही या सहल कधी जातोय असं झालं.

प्रशांतबाबू आयोदी मी येवू शकणार नाही म्हणायला लागला. सगळे मागे लागले चलच म्हणून. हा उंच आणि दिसायला छान होता. कामाला पण भारीच. सिस्टीम्स मधल्या खाचाखोचा पुर्णपणे माहित असलेला. कामांचं गाडं कुठं अडलं किंवा रिजेक्शन आलं की आम्ही त्याला पकडायचो. काही प्रोजेक्टमध्ये चांगला परफॉर्मन्स दाखवून अवॉर्डस मिळवली होती. “ग्रेट जॉब डन” ची सर्टिफिकेटस त्यांनं क्युबिकल मध्ये लटकावुन ठेवली होती. त्यावरनं जयराज नेहमी त्याची खेचायचा. बेळ्ळारीच्या जवळच्या गावचा. भरपूर शेतीवाडी आणि श्रीमंत असलेला. अविवाहित. माझी एक डॉक्टर असलेली पुतणी बेळ्ळारीतच रहायची. ती त्याला माहित होती. ही एक कॉमनलिंक झाली आम्हाला जवळ यायला. तिशी जवळ आली तरी मनासारखी मुलगी मिळत नाही म्हणून चिंतित झालेला. फावल्या वेळात माझ्याशी लग्न आणि संसार या विषयावर गप्पा मारायचा. तो का येणार नव्हता हे नंतर कळालं, त्या दिवशी त्याचा मुलगी बघायचा कार्यक्रम होता.

रविन्द्रराजू देखील येणार नव्हता. त्याला कॉम्पिटिटिव्ह परिक्षांची तयारी करायची होती. हा आंध्रातल्या वैझागचा (विशाखापट्ट्णम). डोळ्यांवर मोठा चष्मा आणि गंभीर, खडूस भासणारा. आमच्या आऊटपुटचं प्रि-डेलिव्हरी चेकिंग करायचा. हे महत्वाचं काम त्यामुळं याला मिटिंग्ज मध्ये विशेष महत्व, म्हणून जरा जास्तच स्ट्रिक्टपणा करायचा. ज्याम अभ्यासू, हुशार होता. तो दुपारी एक ते रात्री साडेदहा अशी ड्युटी करायचा. त्याच्या सोयीसाठी. (आम्ही इतर स.९ ते सायं.६:३०) इतर लोकांनी केलेलं काम दुपारी तीन-चार नंतर चेक करायला सुरूवात करायचा. रात्रीच्या वेळी काही अर्जन्सी आली तर उपलब्ध असायचा. गेल्या तीनचार वर्षातील त्याच्या कंपनीतल्या प्रगतीवर खुष नव्हता. त्यामुळं वेगवेगळ्या कॉम्पिटिटिव्ह परिक्षांची तयारी करत असायचा. ग्रुपमधल्या हास्यविनोद-खेळकरपणात फारसा सामील व्ह्यायचा नाही. पीडीएस सिस्टीमची मला ओळख करून देण्यासाठीचं काम त्याला दिलं होतं. मग बोलता बोलता त्याच्याशी देखिल मैत्री झाली.

वरदप्रसादचंपण कॅन्सल झालं होतं. हा चन्नपटणाचाचा होता. (हे म्हैसुरला जाताना अलिकडं आहे. इथली लाकडी खेळणी प्रसिद्ध आहेत. म्हैसुर ट्रिपला जाताना बऱ्याच जणांनी हे पाहिलं असेल.) चन्नपटणा हे इ.सी. (इलेक्ट्रॉनिक सिटी, बंगळूरमधील) पासून ७०-७२ किमी. बऱ्याच वेळा तिथून अपडाऊन करायचा. त्यांच्या वडिल, काका, आजोबा अश्या मोठ्या कुटंबियांच तिथं बऱ्यापैकी मोठं किराणा दुकान होतं. घरचे मागे लागले होते नोकरी सोड आणि दुकानाला हातभार लाव, पण हा ग्रॅज्युएट इंजिनियर असल्यामुळं हा नोकरी सोडायला नाखुष होता. (नंतर नोकरी सोडलीच त्याने) हिंदी गाण्यांचा जबरा शौकीन. मोबईलमध्ये गाण्यांचा प्रचंड स्टॉक. भसाड्या आवाजात गुणगुणत असायचा. माझ्याशी कायम गाण्यांविषयी बोलायचा. माझा मस्त टाईमपास व्ह्यायचा. याच्या दुकानांचं रिनोव्हेशन त्याच वेळी असणार होतं त्यामुळं तो ट्रिपला येणार नव्हता, पण आम्ही त्याला ट्रिपला यायला भाग पाडलं.

मग आम्ही दहा पैकी आठच जण ट्रिपला राहिलो. शेजारच्या क्युबकल्समध्ये भास्कर आणि महेश जनार्धन बसायचे. त्यांचा वेगळा ग्रुप होता, पण आमच्यात रमायचे. कायम आमच्या बरोबर असायचे, जेवायला, चहाला. कधी कधी बाहेर हिंडायला. महेश जनार्धन जेवायला भला मोठा टिफीन आणायचा. मला हक्कानं त्या डब्यातलं जेवायला द्यायचा. आम्ही राजकारणावर भरपूर बोलायचो. हे दोघेही ट्रिपला यावेत म्हणून आम्ही आग्रह केला, त्यांच्या काही अडचणींमुळे नाही म्हणाले.

डिसेंबर मधल्या दुस़ऱ्या आठवड्यात. शनिवार सोयीचा. रविवारी गर्दी असते म्हणून शनिवारी डे-ट्रिप काढायचं ठरलं. म्हणजे कसं की रविवारी आराम करून सोमवारी फ्रेश कामावर हजर. शिल्हांदरा रेसॉर्ट बेंगळूर शहरापासून ६० किमी दूर. म्हैसूर रोडवर रामनगराच्या जवळ. पोहोचायला साधारण दीड-दोन तास लागणार. माझ्या इ.सी. मधल्या पीजी होस्टेलवर पासून देखील ६२-६२ किमीवर. साधारण तेव्हढाच वेळ लागणार. कीर्तीनाथसोबत त्याच्या कारमधून इतर चार जणांना येणार, दोघं मोटारसायकलवर येणार. मीच एकटा शहराबाहेर इ.सी. मध्ये रहायला. मला कसं पिक-अप करणार किंवा मी कसा जाणार हा प्रश्नच होता. मग रविन्द्रराजूनं सांगितलं तू त्यांच्या भरवश्यावर राहू नकोस, इ.सी. सर्कल पासून एकटंच जायचं, सोयीचं पडेल. इ.सी. सर्कल पासून बीएमटीसी बस (सिटीबस) ३७५ नंबरची केंगेरी बस पकडायची. फोटो आयडी दाखवुन डे-पास काढायची सूचनाही केली. म्हणजे तो पास जाता-येता वापरता येईल.

ट्रिपच्या आदला शुक्रवार. सगळी मंडळी ज्याम उत्साहात होती. दुपारी दोन-तीन पर्यंत वर्क-प्रेशर जास्त नसल्यामुळं काम निवांतपणे चाललं होतं. त्या नंतर अचानक वर्क-लोड आलं. सगळे भराभर कामाला लागले. कोणी एक तास थांबलं, कोणी दोन तास. डिलीव्हरीसाठी रेडी केलं आणि गेले घरी. मी, आणि कीर्तीनाथ निघणार तेव्हढ्यात फोन आला, काही रिजेक्शन सापडलं होतं, मॅनेजर देवांग ओरडला होता. ताबडतोब दुरुस्त करून हवं आहे असं म्हणाला. मग काय, थांबणं आलं. रविन्द्रराजू होताच सोबतीला. आम्ही तिघांनी मिळून ते दुरुस्तीकाम पुर्ण केलं. कीर्तीनाथ तपासलं, रविन्द्रराजूनं आणखी स्ट्रिक्टपणे तपासलं आणि दिलं धाडून. अर्ध्या तासात ओके असा फोन आला. आता जायला मोकळे रात्रीचे अकरा-साडेअकरा वाजले होते. आज १४ तासांची ड्युटी झाली होती. शेवटचे चार-पाच तास खुपच थकवणारे झाले होते. उद्याच्या ट्रिपसाठीचा मूड पार उदास झाला होता.

दुसऱ्या दिवशी म्हंजे शनिवारी उठायला सकाळचे ७ वाजले. जाग आली ती फोनच्या रिंगटोननेच. चेल्लनचा फोन होता. “उठला की नाही? आपल्याला नऊ साडेनऊ पर्यंत रिसॉर्टला पोहोचायचेय. आम्ही निघतोय आता. कीर्तीनाथ येणार नाहीय. आम्ही आमच्या मोटारसायकल्सनं येणार आहोत. पोहोच वेळेत.”
ऐल्ला, खरंच की. उशीरच झाला. पटापट आवरून बंगळूर-होसूर हायवेला जायला निघालो. माझं पीजी हॉस्टेल हायवे पासून सव्वाएक किमी होतं. पीजीच्या मागच्या कोनपण्णा अग्रहारा कॉलनीतून गोविंद पाळळ्या रोडच्या शॉर्टकटने पंधरा मिनिटात हायवेचं इ.सी. सर्कल गाठलं. कॉर्नरच्या हॉटेल रूचीसागरला एक झकास फिल्टर कॉफी मारली. इथल्या फिल्टर कॉफीचा जब्रा फॅन. व्यसनच लागलं. बेंगळूरमधली ही सागर सेरिज मधील हॉटेल्स मस्तच होती. बाहेरच्या बाजूला फास्टफूड काऊंटर (स्टेनलेस स्टीलचं). सेल्फ सर्व्हिस. प्रि-पेड कुपन्स घेवून आपण आपल्या चहा/कॉफी/डिश घ्यायच्या. पाणी सुद्धा कॉमन कूलर मधून घ्यायचं. आणि फूड सुद्धा खुप टेस्टी. रेट परवडेबल. त्यामुळं इथं खूप गर्दी. पटकिनी खाऊन निघायला बरं पडायचं. आतल्या बाजूला किंवा वरच्या मजल्यावर डिसेंट एसी हॉल. ज्याला निवांत जेवणखाण करायचंय ते इथं येणार. दर पण त्यानुसार जास्त होते.

रुची-सागर हॉटेल, सेल्फ सर्व्हिस काऊंटर:
Hotel Ruchi Sagar

फिल्टर कॉफी घेऊन ताजातवाना होऊन इ.सी. सर्कल पार करून बीएमटीसी बस स्टॉपला जाऊन उभा राहिलो. ३७५ नंबरची केंगेरी बस उभीच होती. माझं ड्रायव्हिंग लायसन दाखवून डे-पास काढला. (पुण्यात डे-पास काढायला आधार कार्ड दाखवावं लागतं, मग कंडक्टर आधारचे शेवटचे चार आकडे त्याच्या टिकेटिंग मशीन मध्ये टाकणार अन मग तिकिट देणार. या पासवर बराच हिंडलोय. …. पुण्यात पीएमपीची अवस्था फार भयाण आहे. बऱ्याच बस खिळखिळ्या झाल्यात. कित्येक वाटेत बंद पडतात … काय बोलणार )

बीएमटीसी बस:

BMTC BUS

बस छान होती. नेहमीच्या आवडीप्रमाणे खिडकीतली जागा पकडली. खिडकीतून बाहेरंच आणि बसमधलं आतलं जग बघण, चालू होतं. तीस किमीवरील केंगेरीला पोहोचायला तास-सव्वातास लागणार होता. नाईस रिंग रोड (NICE: Nandi Infrastructure Corridor Enterprises Road ) या रोडचं काम व्ह्यायचं अजून बाकी होतं. बरचसं वेगवेगळे पॅचेस तुकडे टप्प्या-टप्प्यानं तयार होत होते. प्रसन्न सकाळचा प्रवास सुरुवातीस मजेदार होत. पण मध्येच रस्त्याची कामं, पाईपलाईन्स साठी चर, ऊड्डाणपुलाचे खांब असं दिसत गेलं. बस मध्ये चढणारे उतरणारे भाजीवाले, छोटे व्यावसायिक, शाळा-कॉलेजचे विद्यार्थी, त्यांचा ग्रामिण कानडी, तेलगू, हिंदी असा मिश्र कोलाहल उत्सुकता वाढवत होता. खिडकीच्या बाहेरून नविन होणाऱ्या कॉलनीज, टॉवर्स, शॉपींग कॉम्प्लेक्स, छोटे-छोटे मॉल्स हे बघणं चालू होतं. मध्ये लागणारी येळण्णहळ्ळी, दोड्डकम्मनहळ्ळी, बसवनपुरा फाटा, कनकपुरा, सोमपुरा अशी वाढणारी नविन उपनगरं असा प्रवास करत केंगेरी बस स्टॅंडला उतरलो. साडेनऊ पावणे दहा झाले होते. मोठा प्रवास झाल्यासारखं वाटत होतं. एक चहाचा रिचार्ज मारावा म्हणून स्टॅंडचा फेरफटका मारला. स्टॅंड पाहून तबियत खुष झाली. किती स्वच्छ आणि नीटनेटका होता. ले-आऊट प्रवाश्यांसाठी अतिशय सोयीचा होता. परगावनं एसटीनं आलं की सिटीबस शेजारीच. एका बाजूला एसटी स्टॅंड, दुसऱ्या बाजूला सिटीबस स्टॅंड. एका गेटनं एका मागोमाग बसेस शिस्तीत येत होत्या, शिस्तीत बाहेर जात होत्या. जमीनीवर तेल सांडलंय, कागदांचा कचरा आहे असं काही नव्हतं. बाजूला दोन स्वच्छ रेस्टॉरन्टस, दरही माफक. साऊथकडंच ट्रान्सपोर्ट किती सुखावतं नाही?

केंगेरी सॅटेलाईट बस स्टॅण्ड:
Kengeri Stand

(पुण्याबद्दल काय बोलणार, एक धड एसटी स्टॅंड नाही, अन एक धड सिटीबस स्टॅंड नाही) एक कडक चहा मारून रिफ्रेश झालो. मला आता रामनगराची बस पकडायची होती. प्रतुल हिरेमठचा फोन आलाच कुठं पोहोचलाय म्हणून. ते पाचदहा मिनिटातच रेसॉर्टला पोहोचणार होते, मी पोहोचलो की सगळे मिळून आत प्रवेश करणार होतो. मला आता घाई करावी लागणार होती. रामनगराची बस अजून थोड्या वेळाने होती. मग सरळ बाहेर आलो अन खासगी बस पकडली. अर्ध्या-पाऊण तासात पोहोचणार असं ड्रायव्हरनं खात्री दिली होती.

शिल्हांदराला जायचा रस्ते-नकाशा: 600 x 400
SHR MAP

दोन मिनिटातच बेंगळूर-म्हैसूर स्टेट हायवे क्र. १७ ला लागलो. आन्चेपाळ्ळ्या नंतर राजराजेश्वरी इंजीनियरिंग कॉलेजचा सुंदर परिसर लागला. बिडदी मागं टाकेपर्यंत, बरेच लोक छोट्या वाड्या-वस्त्यांच्या फाट्याला उतरून गेले होते. आता बसमध्ये चारपाच जण राहिले. बस स्लो झाली. काहीतरी बिघाड झालेला दिसत होता. बस थांबवून ड्रायव्हर एका सिगरेटच्या टपरीवर गेला. थोड्यावेळानं टपरीच्या मागं गायब झाला. बसमधले चारपाच जण कावकाव करायला लागले. प्रत्येकाला त्याच्या स्टॉपवर वेळेत पोहोचायचं होतं. चेल्लनकुमाचा फोन आलाच. मी बिडदी क्रॉस केलंय सांगितलं, पण रामनगरा अजून किती दूर आहे हे समजत नव्हतं. सव्वादहा वाजून गेले होते. सगळी मंडळी शिल्हांदराच्या गेटवर पोहोचली होती. चेल्लननं सांगितलं, उजव्या बाजूस मोठे डोंगर दिसत असतील तर सरळ उतरून घे, रामनगराच्या मगादी रोड फाट्यावरून शेअर-रिक्षा पकड. शिल्हांदरा स्टॉप सांगितला की रिक्षावाला बरोबर उतरवेल. शिल्हांदराच्या फाट्यावरून लिफ्ट घे आणि पोहोच. पण रामनगरा चालत जायच्या अंतरावर नव्हतं. बसमधले एकदोघं जण खाली उतरून ड्रायव्हरला पकडून घेऊन आले. त्याच्यावर शिव्यांचा भडीमार केला. बस त्याच्या गतीनं एकदाची रामनगराला पोहोचली.

फाट्यापासून शिल्हांदरा रेसॉर्ट दहा किमीवर होतं. हायवेवरच उतरून मघादी फाट्याला रिक्षा पकडायला आलो. बऱ्याच शेअर-रिक्षा उभ्या होत्या. शिल्हांदराची चौकशी करत एका ऑलरेडी फुल्ल रिक्षात बसलो. मध्येच उतरणाऱ्या लोकांनी मला मागच्या रांगेत बरोबर मध्ये बसवलं. रिक्षात एकूण अकरा माणसं. पुढे ड्रायव्हरच्या डाव्याबाजूला एक, अन उजव्याबाजूला एक अशी तीन. पॅसेन्जर भागात पुढच्या रांगेत चार आणि मागच्या रांगेत चार. एकूण अकरा. बायकाच जास्त. वयस्क काक्या, मावश्या., आठवड्याच्या बाजारात घेतलेलं सामान, भाजीपाला वै घेवून जाणाऱ्या. कोवळ्या भाज्यांचा मस्त वास दरवळत होता. एक बाई तर डिट्टो माझ्या मावशीसारखी दिसत होती. अगदी मायाळू. तिचं बोलणं, मान हलवणं मला मावशीची आठवण करून देत होतं माझी मावशी माझ्यावर खुप माया करायची. खुप मदत केली होती तिनं आम्हाला. रिक्षावाली मावशी माझ्या कायम लक्षात राहिल. पहिले चारपाच किमी गेल्यावर वस्ती विरळ होत गेली. मस्त शितल वारा सुखावत होता. बाहेर डोंगर दिसायला लागले होते. मोजके एकदोन पॅसेन्जर राहिले होते. ऐसपैस बसून घेतलं मग. शिल्हांदराचा फाटा येताच, ड्रायव्हरनं रिक्षा थांबवली. त्याच्या हातावर २०रू टिकवले. घड्याळात पाहिलं तर ११ वाजत आले होते. माझ्या पीजी होस्टेलपासून इथं पोहोचायला तीन तास लागले होते. कोपऱ्यावर बोर्ड दिसताच शिल्हांदरा रेसॉर्टच्या दिशेनं अतिशय एक्साईट होऊन निघालो.

क्रमश:
*सर्व फोटोज प्रातिनिधिक; आंजावरून साभार.

प्रतिक्रिया

बबन ताम्बे's picture

8 Jan 2019 - 11:50 pm | बबन ताम्बे

अगदी डिटेलवार माहिती दिलीये. ओघवते लेखन असल्यामुळे जेव्हढे पुढे वाचावे तेव्हढी उत्सुकता वाढली जाते. येऊ द्या पुढचा भाग लवकर !!

चौथा कोनाडा's picture

10 Jan 2019 - 1:46 pm | चौथा कोनाडा

धन्यू बबन ताम्बे.

कपिलमुनी's picture

9 Jan 2019 - 12:42 am | कपिलमुनी

नमनालाच घडाभर तेल झाले

विजुभाऊ's picture

9 Jan 2019 - 10:54 am | विजुभाऊ

नमनातच तेल संपलंय बहुतेक

यशोधरा's picture

9 Jan 2019 - 6:43 pm | यशोधरा

उगाच काय विजुभाऊ! मस्त समोरासमोर बसून गप्पा मारल्या प्रमाणे लिहिलंय की.

चौथा कोनाडा's picture

22 Jan 2019 - 1:22 pm | चौथा कोनाडा

थॅक्यू, थॅक्यू, यशोधरा !
ऍप्रिसियेशन पायजेल तर असं !
(स्व: चला, मला छान गप्पा मारता येतात तर !)

चौथा कोनाडा's picture

11 Jan 2019 - 7:00 am | चौथा कोनाडा

झालंय खरं, पण घ्या चालवून !
तेव्हढं तर चालायचंच !
:-)

धन्यू कपिलमुनी !

कंजूस's picture

9 Jan 2019 - 10:35 am | कंजूस

पब्लिक ट्रान्सपोर्ट, बसेसबद्दल पूर्ण सहमत.
नमनाचंतेलआवडलं.

चौथा कोनाडा's picture

14 Jan 2019 - 3:48 pm | चौथा कोनाडा

हो, आणिक तिथल्या पब्लिक ट्रान्सपोर्ट मधील सेवकांमध्येही प्रवाश्यांच्या सेवेची आत्मीयता जाणवते.
नमनाचं तेल आवडून घेतल्याबद्दल धन्यवाद, कंजूस साहेब !

चौथा कोनाडा's picture

14 Jan 2019 - 3:49 pm | चौथा कोनाडा

हो, आणिक तिथल्या पब्लिक ट्रान्सपोर्ट मधील सेवकांमध्येही प्रवाश्यांच्या सेवेची आत्मीयता जाणवते.
नमनाचं तेल आवडून घेतल्याबद्दल धन्यवाद, कंजूस साहेब !

दुर्गविहारी's picture

9 Jan 2019 - 1:09 pm | दुर्गविहारी

मस्तच लिहीलयं. अगदी जिवंत झाले आहे, प्रवासवर्णन. बाकी मागादी म्हणजे "मागदीचा चित्ता" या शिकारकथेतील मागादी का ? आणखी एक वैयक्तिक प्रश्न, तुमचा आय.डी. "चौथा कोनाडा" हा नेमका असा का ? याचा अर्थ.काय आहे ?
बाकी पुढचा भाग लवकर टाका, उत्सुकता वाढली आहे.

धन्यवाद, दुर्गविहारी.
मागदीचा चित्ता : हा धडा शाळेत असताना मराठीला वाचल्याचा मलाही आठवतोय. बहुधा जिम कार्बेटचा असावा का? आंजावर याबद्दल काही सापडलं नाही मला. बरंच शोधलं मित्रमंडळीमध्ये, बघु काही मिळतंय का.
मी चौथा कोनाडा हे नांव का घेतलं ? मिपाच्या जन्मापासून मिपावाचक आहे. इतर सभासदांनी नानाविध अतरंगी नांव घेतली तसं माझंही नांव काहीतरी वेगळं असावं असं वाटायचं मिपा जन्मा नंतर ५-६ वर्षांनंतर मिपाकर झालो. बालपण वाडा-सिस्टीम आणि गल्ल्यांमध्ये गेले. कोनाडा हा त्या जीवनाचा फार महत्वाचा भाग होता. त्याकाळी कपाटं नसायची बालपणीचा स्व:तचा मौल्यवान ऐवज कोनाड्यातच ठेवायचो. पहिले तीन कोनाडे माझ्या भावंडानी बळकावले होते. कसा बसा दुर्लक्षित छोटासा असा चौथा कोनाडा माझ्या वाटयाला आला होता. तसाही मी घरच्या भावंडांमध्ये दुर्लक्षितच. स्व:तच किरकोळपण दाखवायला मग इथंही चौथा कोनाडा झालो.
धन्यू, दुर्गविहारी. हे लिहिताना बालपणात गेलो, मागोवा घेताना मजा आली. पुढचा भाग लवकरच टाकत आहे.

दुर्गविहारी's picture

23 Feb 2019 - 9:11 pm | दुर्गविहारी

सविस्तर प्रतिसादाबध्दल धन्यवाद. मला आपला आय.डी कोणत्या पुस्तकासंदर्न्र्भ आहे कि काय असे वाटले. बाकी मागाडीचा चित्ता हि कथा मि.पा.वर आहे. लिंक देतो.
मुनुस्वामी आणि मागाडीचा चित्ता

चौथा कोनाडा's picture

26 Feb 2019 - 5:18 pm | चौथा कोनाडा

मागाडीचा चित्त्याची कथा थरारकच आहे. (आता स्पार्टाकस यांचे लेखन वेळ काढुन वाचले पाहिजे) बेंगलोर परिसराचे तपशिल खुप रोचक आहेत ! धन्यु दुर्गविहारी हा सुंदर धागा आणि स्पार्टाकस यांची लेखमाला दाखवल्याबद्दल !

मागाडीचा चित्ता या शिकारकथेत उल्लेख केलेलं मागादी ते हेच दिसतंय. (कथेतील वर्णनानुसार अर्कावती नदीचा उगम, मागादीजवळून वाहणारा प्रवाह आणि दक्षिणेस कावेरीशी होणार संगम अभ्यासला (गुगल मॅप) तर हेच ते मागादी हे लक्षात येतं. या परिसरात रामदेवराबेट्टा गिधाडी अभयारण्य (भारतातील एकमेव) आहे.

धन्यु दुर्गविहारी, या प्रतिसादाने आणखी माहिती मिळाली.

चौथा कोनाडा's picture

5 Mar 2019 - 5:18 pm | चौथा कोनाडा

या प्रतिसादाच्या निमित्ताने रामनगरा परिसरात डोकवणं झालं.

गिधा

ब्राउझता ब्राउझता रामदेवराबेट्टा गिधाड अभयारण्य (भारतातील एकमेव) वरची एक यू ट्युबवर पाहिली तर या परिसराची कल्पना येते. हे गिधाड अभयारण्य चार-पाच वर्षांपुर्वी निसर्गप्रेमी युवकानी हा परिसर प्लास्टिकमुक्त करून गिधाडांसाठी हा अधिवास तयार करण्यासाठी पुढाकार घेतला.

ऑल टाईम हिट हिंदी सिनेमा शोले (रामगढ हे गाव) आणि मुख्यत्वे चायना गेट या सिनेमांचे चित्रीकरण याच रामनगराच्या परिसरात झालेले आहे. चायना गेट मध्ये गिधाडांचे विशेष संदर्भ वापरलेत. वर घिरट्या घालणाऱ्या गिधाडांचा परिणामकारक वापर, मासांच्या शोधात असलेले आकाशात घिरट्या घालणारी गिधाडे महत्वाचे पात्र बनून सिनेमात येतात.
सिनेमातला खलनायक डाकू जगीरा याची काही दृष्ये क्रुर आहेत आणि अंगावर काटा आणतात.

अभ्या..'s picture

2 Mar 2019 - 10:49 pm | अभ्या..

आयडीची जन्मकथा रोचक आहे,
इथे मात्र तुम्हचा मानाचा आणि स्नेहाचा कोनाडा आहे हं. मखरवाला म्हणालात तरी चालेल.

चौथा कोनाडा's picture

3 Mar 2019 - 12:58 pm | चौथा कोनाडा

आयडीची जन्मकथा रोचक आहे,

_/\_

इथे मात्र तुम्हचा मानाचा आणि स्नेहाचा कोनाडा आहे हं. मखरवाला म्हणालात तरी चालेल.

व्वा क्या बात हैं ! धन्यू अभ्यासाहेब !

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Jan 2019 - 1:45 pm | डॉ सुहास म्हात्रे

लिखाणाची पाल्हाळशैली आवडली. तुमच्या ऑफिसमध्ये काही दिवस काम करून, एका सकाळी उशीरा उठून, धावपळ करत रुची-सागर हॉटेलमधली सकाळची कॉफी घेऊन, तुमच्याबरोबरच शिल्हांदरा रेसॉर्टच्या गेटकडे निघालो आहोत. :) पुढचा भाग लवकर टाका.

चौथा कोनाडा's picture

22 Jan 2019 - 1:24 pm | चौथा कोनाडा

धन्यू डॉ साहेब.
पुढचा भाग लवकरच टाकेन.

टर्मीनेटर's picture

9 Jan 2019 - 4:24 pm | टर्मीनेटर

झकास सुरुवात. फिल्टर कॉफी हा माझा विक पॉइंट आहे तिचा उल्लेख करून माझी जिव्हा चळवळीत, आता नेसकॅफे पिऊन दुधाची तहान ताकावर भागवावी लागणार :)

चौथा कोनाडा's picture

22 Jan 2019 - 1:32 pm | चौथा कोनाडा

हो ना, फिल्टर कॉफी हा औरच प्रकार आहे. मला तर व्यसनच जडल्या सारखं झालं होतं, पुण्याला परत आल्यावर सुटलं (….आणि परत चहाचं लागलं)
(मला सुद्धा तुमची कमेंट वाचून जिव्हा आणि नाक दोन्ही चळवळलं) मी कूर्गला गेलो होतो तेंव्हा, आवर्जून ही कॉफी आणली होती. मग नातेवाईकाकडून छोटा कॉफी पॉट देखिल आणला (ते वापरत नव्हते, पडून होता घरी) सुरवातीच्या काही दिवसांनंतर वेळा जमेनाश्या झाल्या, चव ही तशी जमेना, मग दिलं सोडून. अन परत चहा मार्ग धरला.
धन्यवाद, टर्मीनेटर.

प्रचेतस's picture

9 Jan 2019 - 5:47 pm | प्रचेतस

भटकंतीच्या मिषाने व्यक्तिचित्रणालाही हात घातलायत तुम्ही. जबरदस्त उभी केलेली आहेत. सर्व व्यक्ती डोळयांसमोर उभ्या राहत आहेत.

नाखु's picture

15 Jan 2019 - 7:30 am | नाखु

तंतोतंत सहमत.
नेमके हेच मलाही म्हणायचे होते.

प्रत्येक वल्ली (आपल्या कार्यालयात असलेली) एकापेक्षा एक सरस आहेत.
शहरी व राज्य परिवहन कर्नाटक ,आंध्र प्रदेश इथे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या पेक्षा कैकपटीने उत्तम,स्वच्छ आहे.

पुलेशु, सगळ्यांना राजहंस होता येत नाही म्हणून साध्या पक्षाने भरारी घेऊच नये असं नाही, हे माहीत असलेला वाचकांची पत्रेवाला नाखु पांढरपेशा

चौथा कोनाडा's picture

21 Feb 2019 - 6:19 pm | चौथा कोनाडा

खुप खुप धन्यवाद, नाखु साहेब.

खरंच आमच्या या हापिसातली एकएक जण अर्कच होते. विस्तार भयास्तव मी मर्यादितच लिहिलं.
आणि त्या राज्यांतून प्रवास करताना आपली एसटी आठवली की निराश व्ह्यायला होते.

चौथा कोनाडा's picture

24 Jan 2019 - 1:23 pm | चौथा कोनाडा

थॅन्क-यू प्रचेतस.
व्यक्तिचित्रण बऱ्यापैकी जमलंय हे वाचून छान वाटले.

मनापासून धन्यवाद !

यशोधरा's picture

9 Jan 2019 - 6:40 pm | यशोधरा

मस्तच लिहिलंय. अगदी असंच बैजवार येऊदेत. माझ्या बंगळूरू टीम ची आठवण करून दिलीत.

चौथा कोनाडा's picture

23 Feb 2019 - 1:13 pm | चौथा कोनाडा

धन्यू, @यशोधरा !
मस्त ऍप्रिसियेशन !
तुमच्याही बंगळूरू टीमच्या आठवणींवर होऊन जाऊ देत एक लेख !

राजेंद्र मेहेंदळे's picture

1 Mar 2019 - 4:46 pm | राजेंद्र मेहेंदळे

निघालोय तुमच्याबरोबर आम्हीपण शिल्हांदरा रिसॉर्टला. आपल्याकडे पण ताम्हिणी घाटात अशी रिसॉर्ट आहेत (गरुडमाची / मल्हारमाची).

एकुणच घरापासुन लांब असताना आपण जरा जास्त ओपन्/अ‍ॅब्सोर्बिंग असतो आणि अशी आगळी भटकंती/ मित्र मंडळी आपल्या अनुभवात जास्त भर टाकतात. मी स्वतः बँगलोर/ दिल्ली/हैदराबाद अशा ठिकाणी आणि परदेशात हे अनुभवतोच पण पुण्यात असताना माझ्याबरोबर जेव्हा परराज्यातील मंडळी ट्रेकिंगला वगैरे येतात तेव्हा त्यांच्या नजरेतही हे दिसुन येते.

रच्याकने - जरा शुद्ध लेखनाकडे लक्ष दिलेत तर बरे होईल.

चौथा कोनाडा's picture

2 Mar 2019 - 10:42 pm | चौथा कोनाडा

निघालोय तुमच्याबरोबर आम्हीपण शिल्हांदरा रिसॉर्टला.

वा, वा. थॅन्क्यू _/\_

प्रतिसादातल्या दुसऱ्या परिच्छेदाला तंतोतंत सहमती. आपल्या जवळंच आऊटिंग म्हणजे जरा परिचित मामलाच असतो. मजा येते दुसऱ्या राज्यात / प्रांतात फिरायला. नविन परिसर, नविन इतिहास, नविन भूगोल ! आंध्रात विजयवाड्या जवळ कोंडापल्ली किल्ला पहायला अशीच मजा आली होती.
शुद्धलेखना बाबतीत घेईन काळजी (स्वगत: च्यामारी काळजी घेऊन लिहिलंय, आता काय बरं चुका झाल्या असतिल, वेळ काढून प्रुफ-रिडिंग करावं लागेल आता. [ मदत करा रे कुणीतरी, चुका शोधायला]

धन्यवाद, राजेंद्र मेहेंदळे, सुंदर प्रतिसादासाठी !

jo_s's picture

1 May 2019 - 3:39 pm | jo_s

मस्तच लिहिलंय
अनुभव छान मांडलाय

चौथा कोनाडा's picture

10 Jun 2019 - 5:32 pm | चौथा कोनाडा

धन्यवाद, जो_एस !

आता दुसरा ही भाग वाचा !
:-)

जॉनविक्क's picture

6 Jun 2019 - 10:00 pm | जॉनविक्क

जरा आधी समजले असते तर बरं झालं असतं, गेले दीड वर्षे मी कोरमंगलात नॅशनल गेम्स व्हिलेज मधेच मुक्कामी होतो.

बाकी बंगळुरू शहर आणि पंचक्रोशी म्हणजे भारतीयांचे हनिमून डेस्टिनशनच म्हणून नमनाचे घडाभर तेलही कमीच वाटतं.

चौथा कोनाडा's picture

10 Jun 2019 - 5:43 pm | चौथा कोनाडा

धन्यवाद, जॉनविक्क !
बंगळुरूला होतो, आता बॅक टू पुणे.

जरा आधी समजले असते तर बरं झालं असतं,

असतात काही योग, काही योग नसतात ही !

जयानगरात यायचो तेव्हा दोन तीनदा कोरमंगलात नॅशनल गेम्स व्हिलेज जवळून गेलो होतो. आत जाण्याचा योग आला नाही

बाकी बंगळुरू शहर आणि पंचक्रोशी म्हणजे भारतीयांचे हनिमून डेस्टिनशनच म्हणून नमनाचे घडाभर तेलही कमीच वाटतं.
खरंच, बंगळुरू भारी आहे ! तिथं काही काळ राहून अनुभवता आलं, मस्त अनुभव होता !
(बाकी, काही वर्षांपूर्वी आम्ही आमचा हनिमून इथं आणि उटी, कोडाईकन्नल इथं साजरा केला होताच :-)

आता याचा दुसरा ही भाग वाचा ! :-)
https://www.misalpav.com/node/44181