"मोहिम बागलाणची" भाग तिसरा

Primary tabs

दिलीप वाटवे's picture
दिलीप वाटवे in भटकंती
4 Jan 2019 - 2:34 pm

"मोहिम बागलाणची"

दिवस तिसरा

भिलाई, चौल्हेर, प्रेमगिरी

पुणेकरांना नाशिक तसं थोडं लांबच पडतं. त्यामुळे सहज उठलं आणि नाशिककडचे किल्ले पाहून आलो असं सहसा होत नाही. आता आलोच आहोत तर जास्तीतजास्त किल्ले पाहून घेऊ म्हणून आज ट्रेकच्या आजच्या तिसर्‍या आणि शेवटच्या दिवशी भिलाई आणि चौल्हेर पाहिल्यानंतर घरी जाताजाता प्रेमगिरी किंवा रामजी पांगेराचा कण्हेरगडही बघून जाऊ असं ठरवलं होतं. असं जमवायचं असेल तर सकाळचा वेळ अजिबात वाया घालवून चालणार नव्हतं त्यामुळे आज थोडं लवकरच आवरलं. झटपट कालचा उरलेला मसाले भाताचाच गरम करुन नाश्ता केला आणि उजाडताउजाडता गाडीनेच भिलाई (१०६० मी.) किल्ल्यावर चढून जाणार्‍या वाटेवरल्या खिंडीत पोहोचलो.

.

.

सरळ जाणारा रस्ता हाकेच्या अंतरावरच्या साखरपाडा गावात जातो. तिथं दोघं गावकरी मॉर्निंग वॉकला आले होते. मंडळी इकडं कशीकाय चुकली म्हणायची? असं त्यांच्या चेहर्‍यावर स्पष्ट दिसत होतं. त्यांना फारवेळ अंधारात न ठेवता आम्ही त्यांना रामराम करुन इथे किल्ला बघायला आल्याचं सांगितलं. ते ऐकून त्यांना काय वाटलं कोण जाणे पण त्यांनी 'किल्ला पाहून आल्यावर चहापाण्याला या' असं आग्रहाचं आमंत्रण दिलं. आजच्या दिवसभराच्या व्यस्त कार्यक्रमामुळं अर्थातच ते स्विकारणं शक्य नव्हतं.
गाववाल्यांना गडावरची पाहण्याची ठिकाणं विचारली. खिंडीतुन माथ्यावर जाणारी धार स्पष्ट दिसत होती. त्या धारेवरल्या मळलेल्या पायवाटेने माथ्याकडे निघालो.

.

तासाभरात शेवटचा घसाऱ्याचा कातळटप्पा आला तो सहज पार करून माथ्यावर पोहोचलो. माथ्यावरुन आम्ही नुकतेच पाहिलेले साल्हेर, सालोटा, मुल्हेर, मोरा, हरगड स्पष्ट दिसत होते.

.

.

.

तसं आता गडावर पाण्याच्या टाक्या आणि रेणुका देवीचं छोटसं गुहामंदिर सोडलं तर फारसं काहीच शिल्लक नाही.

.

आल्यापावली खिंडीत परत येऊन मधल्या वाटेने निकवेल, तिळवण मार्गे वाडीचौल्हेरला पोहोचलो. वाटेतुन चौल्हेर किल्ला आणि दिर-भावजय डोंगर सुरेख दिसत होते.

.

.

आज मला पुण्यापर्यंत ड्रायव्हींग करायचं होतं आणि तसंही बागलाणातले हे सगळे किल्ले यापूर्वी मी दोनवेळा पाहिले होते त्यामुळं या किल्ल्यावर न जाता एक झोप काढणं मी पसंत केलं. या डोंगरयात्रेत मी स्वतः चौल्हेरवर गेलो नसल्यानं या किल्ल्याचा वृत्तांत सोबत असलेल्या 'सेकंड इन कमांड' जितेंद्र परदेशीने लिहिलाय. तो त्याच्याच शब्दांत...

भिलाईहून जवळजवळ तासाभराचा प्रवास केल्यावर वाडीचौल्हेरला सकाळी ९.२० ला पोहोचलो.

.

.

वाटेत सोबत असलेल्या दिपकने बराच वेळ बोरी झोडत १०-१५ बोरंच आणली आणि २-४ जणांना देवून बाकीच्यांच्या शिव्या खाल्या.

.

.

वाडीचौल्हेरला पोहोचल्यावर गावकरी कुतुहलाने आमच्या 'Yellow army' कडे बघत होते. गाडी पार्क केल्यावर दिलीपने जाहीर करुन टाकले कि हा किल्ला माझा दोनदा पाहून झालाय आणि नंतर पुण्यापर्यंत ड्रायव्हींग करायची असल्याने मी येणार नाही. क्षणात मी कान टवकारले, दिलीप नाही म्हणजे बरेचजण जागीच गाळठतात. तशीही दिलीपची विश्रांती गरजेचीच होती, दोन दिवसांपासून आम्ही भटकत होतो. चौल्हेर नंतर प्रेमगिरी किल्ला करायचा होता. इथे उशिर झाला तर पुढचा किल्ला कदाचित टाळला जाईल असे मनात आले कारण सर्वजण लवकर निघण्याची भाषा करत होते. त्यामुळे लहान सँक घेवून लगेच निघालो. Yellow army एका लाईनीत चालती झाली. वाट स्पष्ट दिसत असतांनासुद्धा एकाला विचारुन घेतले. वेळ वाया जाऊ नये म्हणून खबरदारी. हा आमचा सातवा किल्ला होता पण सहट्रेकर्सना पाहून तसे वाटत नव्हते, कुणीच थकलेले वाटत नव्हते, फक्त वेळेचा प्रश्न होता.

.

आम्ही भरभर चालू लागलो, हमरस्ता असल्यासारखी वाट होती.

.

एक टेकडी पार केल्यावर किल्याची मुख्य चढाई सुरु झाली. चढाई एवढी अवघड नव्हती एक ट्रँव्हर्स होती त्याला रेलिंग लावलेले होते.

.

बर्‍यापैकी मळलेली वाट होती. मधेमधे पायर्‍याही होत्या. आत्तापर्यंत ऊन्हातुन वाट होती. उजवीकडे ट्रँव्हर्स घेतल्यावर सावलीतून वाट होती त्यामुळे सुखावह वाटत होते.येथे सिताफळीची अनेक झाडे दिसली पण पाण्याअभावी सिताफळं सुकली होती.

.

आत्ता पर्यंत प्रत्येक किल्ल्याला तटबंदी होती त्याप्रमाणे येथेही होती. हा सुद्धा महत्वाचा किल्ला होता असे जाणवले. समोरच एक लहान दरवाजा दिसू लागला. पायर्‍या सुरु झाल्या होत्या, मी, शिवम, मंदार, दयानंद, एकनाथ पुढे आलो. पहिला दरवाजा पार केल्यावर डावीकडे अतिशय सुंदर असे बुरुज आणि मुख्य दरवाजा दिसला. अजुनही तटस्थ उभा होता, आश्चर्याची गोष्ट म्हणजे खालून इथे दरवाजा असेल अशी कल्पनासुद्धा आली नाही. मुख्य दरवाज्यातुनही पहिला दरवाजा दिसत नव्हता. सर्वजण येईतोपर्यंत येथे पायर्‍यांवर बसुन थोडे फोटो शुट केले, पायर्‍यांजवळच मधमाशांचे पोळे होते, नीट निरखुन पाहीले तर तेथुन पाणी झिरपत होते आणि पिण्यासाठी मधमाश्या गोळा झाल्या होत्या. सर्वांना सावध करुन चढाई चालू केली.

.

.

.

पाऊण तासात एक टप्पा चढुन गेल्यावर उभा कातळ लागला. वर मोठी सपाट जागा होती. डाव्याबाजूला एक मंदीर दिसले पण वेळ कमी असल्याकारणाने प्रथम किल्ल्यावर जाऊन यायचे ठरवले. तोपर्यंत मागे राहीलेले एकत्र जमा होतील व एकत्र आरती करता येईल. परत उजवीकडे ट्रँव्हर्स घेवून पश्चिमेकडुन वर जाण्याची वाट होती. वाटेत दोन मोठे पाण्याचे बंदिस्त टाके होते याचा अर्थ राबता किल्ला होता. मागच्या वाटेने राजगडासारखा लहान दरवाजा होता तेथुन किल्ल्यावर प्रवेश केला. वर बांधकामाचे भरपूर अवशेष होते. दोन पिण्यायोग्य पाण्याचे टाके होते. चढाईला सुरुवात केल्यापासुन एका तासाच्या आत आम्ही भगव्याजवळ होतो. तेथुन आसपासचा निसर्गरम्य परीसर मनात साठवून घेतला अर्थात फोटोही काढले लगेच परतलो. नंतर येणार्‍यांना लवकर मंदिराजवळ येण्यास सांगितले. मंदिरात एक आश्चर्यकारक गोष्ट दिसली, हनुमानाच्या मुर्ती सोबत शिवरायांचीही मुर्ती होती. आमचा पुजारी राहुल आल्यावर सर्वांनी आरती केली आणि परतीचा प्रवास सुरु केला. महादेव, नाना, शिंदेसर पहिलेच निघाले होते. ऊन वाढत होते. उतरताना जणूकाही रेस लागली असल्यासारखे अर्ध्या तासात सगळे खाली उतरले. आता एक गोष्ट नक्की होती ती म्हणजे शेवटचा प्रेमगिरी किल्ला निश्चितच होणार होता.

.

.

सोमवारी बऱ्याच जणांना फर्स्ट शिफ्टला कामाला जायचं असल्यामुळं जेवढ्या लवकर घरी पोहचू तेवढं चांगलं होतं म्हणून कण्हेर ऐवजी प्रेमगिरी पहायचं सर्वानुमते ठरलं होतं. त्यासाठी वाडी चौल्हेरहून परत तिळवण, निकवेल, डांगसैंदाणे, मोकभणगीवरून सरळ हिंगुळवाडीलाच गेलो. तसं वाटेत असलेल्या पाठविहीरच्या फाट्यावरून पाठविहीर मार्गानेही गडावर जाता येतं पण हिंगुळवाडीतुन प्रेमगिरी जवळ आहे. कमी अंतर चालावं लागत असल्यामुळं अर्थातच वेळ वाचणार होता. हिंगुळवाडीच्या पुढे शेतातल्या कच्च्या गाडीरस्त्याने गडाचा पायथा गाठला. पायथ्याशी असलेल्या एका घराजवळ गाडी लावली.

.

.

पाणपिशव्या भरून घेतल्या आणि गडाशेजारून घसाऱ्याच्या वाटेनं आडवं जात पलिकडच्या खिंडीत पोहोचलो. खिंडीतुन गडावर जाण्यासाठी इथं पायऱ्या खोदलेल्या आहेत. हिला स्थानिक बारा पायऱ्यांची वाट म्हणतात. पुढच्या दहा मिनिटांत प्रेमगिरी(८१० मी.) माथ्यावर पोहोचलो.

.

.

रामकुंड, सीताकुंड टाक्या पाहून हनुमान मंदिरात गेलो. तिथं नैवेद्य दाखवून आरती केली.

.

.

.

आज आमच्या सोबत असलेल्या मंदार दंडवतेच्या लग्नाचा वाढदिवस होता. संसारी माणसाने अशा 'महत्वाच्या दिवशी' ट्रेकला जाण्याची परवानगी कशी काय मिळवायची? हे त्याच्याकडून एकदा माहिती करुन घ्यावंच लागेल. आपल्यासोबत असा 'माहितगार' माणुस असल्याचा आनंद सर्वांना इतका झाला की, सगळ्यांनी त्याला खांद्यावर उचलून घेऊन तो व्यक्त केला.

.

.

गडावरून गाडीपाशी आलो. जिथं गाडी लावली होती त्यांनी हातपाय धुण्यासाठी पाण्याची मोटर सुरू करून दिली. हातपाय धुवून प्रसन्न मनाने परतीच्या मार्गाला लागलो ते या भागात परत येऊन असाच एखादा 'रेंज ट्रेक' करण्यासाठीच.

समाप्त

फोटो सौजन्य - मंदार दंडवते, आकाश गुप्ता

संदर्भ:-

१) आज्ञापत्र - रामचंद्र पंडीत अमात्य लिखित
२) सांगाती सह्याद्रीचा - यंग झिंगारो ट्रेकर्स
३) शि.प.सा.सं.क्र. १३७८
४) शिवराजभूषण १०७
५) जेधे शकावली
६) सभासद बखर
७) शि.प.सा.सं.क्र. १४४७/१४६३
८) शिवापूरकर देशपांडे शकावली
९) डोंगरयात्रा - आनंद पाळंदे

प्रतिक्रिया

मस्त झाला आहे हा भाग सुद्धा.
समाप्त वाचून जरा हिरमुसायला झालं, पण पुढचा ट्रेक लवकर होऊ देत आणि आम्हांला वर्णन वाचायला मिळू देत, ह्या शुभेच्छा!

दिलीप वाटवे's picture

4 Jan 2019 - 8:19 pm | दिलीप वाटवे

पुढचा ट्रेक आधीच झालाय. रतनगडाच्या चिकणदर्‍याच्या वाटेबद्दल मागे मी एक लेख लिहिलाय मिपावर. त्या ट्रेकला ती वाट आम्हाला पूर्ण करता आली नव्हती. ती नुकतीच केली. त्यासाठी जवळजवळ १७५ फुट रॅपलिंग केलं. त्या ट्रेकचं लिखाण चालू आहे. लवकरच पोस्ट करेन.

प्रचेतस's picture

11 Jan 2019 - 2:50 pm | प्रचेतस

लवकर लिहा ह्या वाटेबद्दल.
रतनगड आणि आसपासचा सह्याद्री अतिशय अद्भुतरम्य आहे.

ही भटकंती प्रचंड आवडली. सेलबारी, डोलबारी रांग म्हणजे ओसाड रखरखीत प्रदेश. उन्हाळ्यात तर इथे रेंज ट्रेक जवळपास अशक्यच. पण येथील किल्ले अफाट, राकट, दणकट. मजा आली वाचून.

दुर्गविहारी's picture

4 Jan 2019 - 7:46 pm | दुर्गविहारी

खुपच छान ट्रेक वर्णन. मजा आली वाचायला. पु.ले.शु.

दिलीप वाटवे's picture

4 Jan 2019 - 8:20 pm | दिलीप वाटवे

धन्यवाद

प्रशांत's picture

5 Jan 2019 - 2:35 pm | प्रशांत

मस्त हो दिलिप दादा
एखादा सोपा (?) ट्रेक करायचा असल्यास कळवा

- प्रशांत

अनिरुद्ध.वैद्य's picture

12 Jan 2019 - 8:37 am | अनिरुद्ध.वैद्य

वाचायला खुप छान वाटली. ओघवते वर्णन !

डॉ सुहास म्हात्रे's picture

12 Jan 2019 - 2:02 pm | डॉ सुहास म्हात्रे

भन्नाट भटकंती आणि सुंदर सचित्र वर्णन !

अजून काही येऊद्या.