राजस्थान सफर....(वाळवंटातील सौंदर्य....)

मॅक's picture
मॅक in भटकंती
17 Dec 2018 - 11:36 am

राजस्थान सफर ...( वाळवंटातील सौंदर्य....एक स्वप्न)
भाग-पहीला..... पुर्वतयारी..........

२०१४ नंतर देवभूमी केरळची सफर केल्यानंतर गेली तीन वर्ष छोट्यामोठ्या सहली सोडल्यातर कुठे मोठ्या सहलीसाठी जाण झाल नव्हत. त्यांच कारणही तसच होत मध्यल्या काळात ब-याच घडामोडी घडल्या आणि सहलीसाठी जाण्यासाठी लागणार आर्थिक गणित सुध्दा जुळत नव्हतं. तसही मी अशा सहलीसाठी स्वतंत्र SIP केली आहे पण अनेक अडचणी आल्यामुळे ते काही शक्य झाल नाही. असो.....
त्यापैकी एक महत्वाच कारण म्हणजे २०१६ च्या शेवटी आम्ही नवीन घर खरेदी केलं आणि जानेवारी-२०१७ मध्ये तिकडे रहायला गेलो. त्यामुळे पैस्याचे गणित काही जुळत नव्हत आणि नवीन ठिकाणी असल्यामुळे अजुन इतक्या ओळखी पण झाल्या नव्हत्या. त्यामुळे सहलीसाठी बरोबर यायला कोणी मित्र किंवा ग्रुप तयार होत नव्हता. त्यामुळे तेही वर्ष तसच गेल. शेवटी एक वर्षभरानंतर नवीन सोसायटीमध्ये जरा ओळखी वाढल्या आणि दोन-तीन चांगले मित्र जमले आणि त्यांच्या कुटूंबासोबत सुध्दा माझ्या घरच्याची चांगली मैत्री झाली. ते सर्वजन समवयस्क असल्याने आमच्यात चांगली मैत्री झाली. आणि त्यामध्ये माझ्या पहील्या सोसायटीमध्ये राहणारे माझे एक जुने मित्र (माने साहेब) आमच्या नवीन सोसायटीमध्ये रहायला आले म्हणजे खर तर आम्ही तिथं राहतो म्हणूनच ते तिथं आले. आणि मग आमचा एक चांगला ग्रुप जमला. मानेसाहेब माझे जुने मित्र आमची संपूर्ण फॅमिली आणि त्यांची संपूर्ण फॅमिलीमध्ये गेल्या चार-पाच वर्षापासून चांगली मैत्री आहे. माझा मुलगा आणि त्यांचा मुलगा एकाच शाळेत आणि एकाच वर्गात आहेत आणि दोघेही एक दुस-याशिवाय राहत नाहीत.
नवीन सोसायटीमध्ये आमचे दिनेशभाई, शिंदेसाहेब आणि राणाजी हे तिघे नवीन मित्र भेटले त्यांच्या बरोबर सुध्दा अगदी कमी कालावधीमध्ये चांगली गट्टी जमली. त्यामध्ये आम्ही तिघेजन म्हणजे मानेसाहेब, दिनेशभाई व मी आणि आमची संपूर्ण कुटूंबासह दोन दिवसाची रायगड सहल करून आलो. मानेसाहेबांनी सर्व व्यवस्था केली होती. खूपच मजा आली आणि आमची मैत्री आणखीनच मजबूत झाली.
मग त्यानंतर आम्ही एक मोठी सहल काढायच ठरवल. पण बरेच दिवस नुसत जाऊया-जाऊया असच चाललं होत. मग एक दिवस मीच पुढाकार घेऊन सर्वांना एकत्र करून बोलत केलं आणि मग जायचं पक्क केलं, पण परत जायचं कुठे आणि कधी या बाबत पुन्हा विचार मथंन चालू आणि जिथं दोन पेक्षा जास्त डोकी एकत्र येतात तिथं मत-मतांतर आलीच. शेवटी बराच विचार-विनिमय केल्यानंतर राजस्थानला जायचं पक्क केल. कोठे जायचं हे पक्क झाल तरी, कधी जायचं हा प्रश्न मात्र लगेच सुटला कारण आमची प्रत्येकाची मुलं दहा वर्षाच्या आतमधिल आहेत आणि सर्वांच्या शाळा असल्यांने त्यांना सुटटी असेल तेव्हा म्हणजे दिवाळी किंवा नाताळच्या कालावधीमध्ये जायचं ठरल पण पुन्हा दिवाळीच्या सुट्टीमध्ये बरेच जन गावी जाणार असल्याने त्यावेळी त्यावेळी पण काही जमल नाही आणि महत्वाच म्हणजे राजस्थानला भेट देण्यासाठी ती वेळ सुध्दा योग्य नव्हती. म्हणून मग डिसेंबर महीना नक्की केला मुलांना २२ डिसेंबर पासून नातळची १० दिवस सुटटी असल्याने २२ डिसेंबर ते ३१ डिसेंबर हा कालावधी नक्की झाला. ठिकाण आणि वेळ नक्की झालं होतं. आता महत्वाचं काम बाकी होत म्हणजे कसं जायचं ते ठरवणं.
सहलीसाठी कोठेही जायचं झाल तर तिथे कस जायचं हा नेहमीच वादाचा आणि चर्चेचा विषय आसतो. आमचंही तसच झालं. कारण मगाशी बोलल्याप्रमाणे जिथं दोन पेक्षा जास्त डोकी एकत्र येतात तेव्हा चर्चातर होणारचं....
राजस्थानला जाण्यासाठी आमच्याकडे तसे बरेच पर्याय उपलब्ध होते. एक म्हणजे सरळ कोणत्यातरी ट्रॅव्हल एजन्सीला पकडून बुकींग करून त्यांच्या मार्फत जाणे...... दुसरा म्हणजे अशाच एखाद्या एजन्सीकडून नियोजन करून घेणे आणि त्यानुसार त्यांच्याकडून सर्व व्यवस्था करून घेणे...... तिसरा पर्याय म्हणजे स्वत: सर्व नियोजन करून सर्व बुकींग स्वत: करून जाणे.
यापैकी पहील्या पर्यायाचा आम्हाला थोडाफार अनुभव होता कारण सार्वजन या पुर्वी कुठेतरी जाऊन आले होते. हा पर्याय साधा सोपा असला तरी आर्थिक बाबीत खुपच महाग पडणार होता.... त्यामुळे तो पहील्याच चर्चेच्यावेळी बाद करण्यात आला. दुस-या पर्यायाबाबत ब-याच एजन्सीकडून माहीती घेतली त्यापैकी एक-दोन पर्याय बरे वाटले होते.पण तोही शेवटी बाद झाला.....
त्यामध्ये आम्ही मागचा पुढचा विचार न करता ३० डिसेंबरचे विमानाची जयपूर ते मुंबई परतीची जवळ-जवळ १७ तिकीटं २१ जुलैलाच बुक करून टाकली. आम्ही असे पहीलेचं असू ज्यांनी सहलीसाठी जायचं ठरल्यावर सर्वात आधी काय काम केलं असेल तर ते परतीचं तिकीट बुकींग केलं असेल.
आमच्या या चुकीमुळे आम्हाला आमची सहल २९ डिसेंबरला कोणत्याही परिस्थितीत संपवावी लागणार होती कारण विमानाची तिकीटं रद्द करण आम्हाला परवडण्यासारखं नव्हतं. त्यामध्ये माझं मत अस होतं की जाण्यासाठी ट्रेनचा पर्याय घ्यायचा आणि येताना विमानाचा पर्याय घ्यायचा पण मी आणि राणाजी सोडून या पर्यायाबद्दल कोणाचीच इच्छा नव्हती सर्वांचे मत असे होती दोन्ही वेळा विमानानेच प्रवास करायचा. परंतू आमच्या नियोजनानुसार सर्वजन जाताना रेल्वेने जायला तयार झाले.
त्यानुसार आम्ही २२ डिसेंबर ते २९ डिसेंबर असे नियोजन नक्की केले. इतर सर्व तयारी जोरदार चालू झाली, पण त्यामध्ये कुठेतरी पुन्हा माशी शिंकली आणि दिनेशभाई ने एक नवीन पर्याय सुचवला... त्यामध्ये मुंबई - अहमदाबाद असा विमान प्रवास करायचा कारण पहीली गोष्ट म्हणजे ते खुपच स्वस्त पडत होत आणि दुसर म्हणजे माझ्या पर्यायाबद्दल सर्वजन तयार झाले असले तरी आतून कुणाला ते आवडलं नव्हतं मग मी ही तो पर्याय सोडून या नव्या पर्यायाला तयार झालो. आणि मागचा पुढचा विचार न करता मी... मानेसाहेब आणि दिनेशभाई आणि त्यांचे एक मित्र पाटीलसाहेब (आता तेही चांगले मित्र झालेत आमचे) अशी चौघांची मिळून १३ विमानाची तिकीटं बूक करून टाकली आणि त्याच विमानाची तिकटं राणाजी आणि त्यांचे मित्र यांना बुक करायला सांगितलं….
आणि इथचं गडबड झाली आमची ती गोष्ट त्यांना आवडली नाही त्यांनी आम्हाला सरळ सांगून टाकलं की त्यांना आमच्या बरोबर यायला जमणार नाही. आम्ही नंतर त्यांना समजाविण्याचा प्रयत्न केला पण काही फायदा झाला नाही. ते तयार झाले नाहीत. शेवटी आत्ता आम्ही चारच फॅमिली फिक्स झालो.(एकूण १३ जण).
त्यांनतर पुढच्या १५ दिवसात आम्ही सर्व मार्ग निश्चित करून, ठिकाणं निश्चित करून त्यानुसार Make My Trip आणि Goibibo वरून राहण्यासाठी हॉटेल आणि तिथल्या प्रवासाठी Traveler गाडी बुक केली.
आता सर्व काही नक्की झालं असल्यामुळे सर्वांची जोरदार तयारी चालू आहे आणि त्यामध्ये महीलामंडळ सर्वात आघाडीवर असून खरेदीसाठी दुकानात फे-या मरणं चालू आहे. आता तिही जवळ-जवळ पूर्ण होत आली असून, आता घरी बरोबर घ्यायच्या सामानाची यादी चालू चालू झाली आहे.
महीला मंडळाची कपड्यांची जोरदार खरेदी चालू आहे. त्यामध्ये एक असा विचार आला की एक दिवस (म्हणजे रनथंबोर पार्कच्या भेटी दिवशी) सर्वांनी एकाच रंगाचे एक सारखे कपडे घालायचे. त्यासाठी सर्वजन एका सुट्टीच्या दिवशी एकत्र जमून खरेदीला जायचं ठरल. त्याप्रमाणे एकत्र जमलोसुध्दा पण एकूण तेरा जणांना एकाच रंगाचे T-Shirt काही केल्या मिळत नव्हते. प्रत्येकाची साईज वेगळी असल्याने जरा अवघडचं होत ते काम. आम्ही BigBazaar, Max इतकच काय Flipkart सुध्दा सोडल नाही पण शेवटी आमची इच्छा काही पुर्ण झाली नाही. असो......
त्यामध्ये आणखी एक मोठी अडचण आली आहे म्हणजे आमच्या ग्रुप मध्ये मी सोडून कोणाकडेही कॅमेरा नाही. माझ्याकडे NIKON P600आहे. पण मागच्या वेळी आम्ही रायगडला गेलो होतो तेव्हा तो चार्जीगसाठी गाडीतल्या चार्जला लावला आणि गाडी बंद केल्यानंतर तो काढला नाही आणि नंतर पुन्हा गाडी चालू करताना बहूतेक Spark झाला असावा आता त्याने मान टाकली आहे. दुरूस्त करण्याचा खूप प्रयत्न केला पण काहीही उपयोग होत नाही. नवीन घेण्याइतपत आता बजेट नाही. अजूनपर्यंत तरी काहीही पर्याय सापडत नाही. बहूतेक मोबाईल कॅमे-यावरचं काम चालवावं लागणार अस वातटतयं......(पण रनथंबोरला जाणार आहे म्हटल्यावर चांगला कॅमेरा असणं आवश्यक आहे असं मला वाटतं शेवटी तो ज्याच्या त्याच्या आवडीचा प्रश्न आहे.)

सहलीसाठी निघण्यापुर्वी जेमतेम दहा दिवस राहीले असताना आलेला एक अनुभव (तो सर्वाना उपयोगी पडेल म्हणून येथे उल्लेख करत आहे.)
आम्हाला आता सर्व नियोजनानुसार निघण्यासाठी १०-१२ दिवसचं बाकी राहीले होते. त्यामुळे आम्ही तिथे फिरण्यासाठी जी Traveler ठरविली होती त्या एजन्सीबरोबर संपर्कात होतो. तसेच रनथंबोर येथील Booking केले होते त्या व्यक्तीशीही संपर्कात होतो. कारण आमची ही पहीलीच वेळ असल्याने आम्ही असा त्यांच्यावर विश्वास टाकायला तयार नव्हतो, कारण आम्ही त्यांना आधिच काही पैसे दिले होते. त्यामानाने आम्ही हॉटेल बुकींग बाबत जरा निश्चिंत होतो कारण ती आम्ही Make My Trip आणि Goibibo वरून बुक केली होती.
तरीही आम्ही असं ठरवल की सर्व हॉटेलवर फोन करून खात्री करून घ्यायला पाहीजे आणि मग आम्ही सर्व ठिकाणी फोन करायला सुरवात केली आणि पहील्याच ठिकाणी आम्हाला जोरदार फटका बसला. उदयपूर येथे आम्ही जे हॉटेल बूक केल होत त्याचा नंबर लागत नव्हता. म्हणून मग दिनेशभाईने MMT ला फोन लावला तर त्यांनी सरळ सागून टाकलं की अस कोणतीही Booking त्यांच्याकडे नाही….
हा आमच्यासाठी एक जबरदस्त धक्का होता, त्याच वेळी मी इंटरनेटवर ज्या हॉटेलच बुकींग केलं होत त्या नावाने सर्च केल्यानंतर आम्हाला एक नवीन नंबर मिळाला. त्यावर फोन केल्यानंतर समजल की आम्ही ज्या हॉटेलच्या नावाने बुकींग केलं आहे तेच ते हॉटेल आहे, पण ते हॉटेल आता दुस-या नावाने आहे. कारण ते दुस-याने सहा महीन्यापूर्वी विकत घेतलं असू त्यांनी नाव बदल्याबाबत व MMT च्या App वरून ते काढून टाकण्याबाबत कळवल होतं पण MMT ने तस केल नव्हतं. आता हा नवीन मालक त्या जून्या नावाचे बुकींग घ्यायला तयार नव्हता.
शेवटी आमच्याकडे एकचं पर्याय राहीला होता तो म्हणजे दुसर हॉटेल शोधून तिथं बुकिंग करणं आणि त्याशिवाय आमच्याकडे दुसरा कोणताच मार्ग राहीला नाही. शेवटी जादा पैसे देऊन तो आम्ही स्विकारला....... पण त्यामधून एक चांगला धडा मिळाला.
त्यामुळे सर्वांना विनंती आहे की, Make My Trip आणि Goibibo वरून राहण्यासाठी हॉटेल Booking करत असाल तर ते Confirm करण्यासाठी प्रत्यक्ष संबंधित हॉटेलला फोन करून खात्री करून घ्या.
आता बघुया अजून काय-काय अनुभव येतात ते.... नक्की सांगतो.... पुढच्या भागात..

(जाणकारांनी आणखी मदत करावी...माहीती द्यावी... ही विनंती... जेणेकरून आमची सहल व्यवस्थित आणि जास्तीत-जास्त चांगली होईल)

प्रतिक्रिया

कंजूस's picture

17 Dec 2018 - 3:02 pm | कंजूस

अशा प्रकारे जे जातात ते माहिती देतीलच, मी प्रथम तुम्हा सर्वांना सहलीच्या शुभेच्छा देतो.

( आम्ही ओफसिझन स्वतंत्र जातो आणि कोणतेच हॅाटेल बुकिंग करत नसल्याने निश्चिंत असतो.)

कंजूस's picture

17 Dec 2018 - 3:10 pm | कंजूस

प्रत्येकाच्या पाचसहा आधारकार्ड फोटोकॅापीज, अरिजनलसह, फोन /वीज बिल तीन फ्याम्लींचे. इथूनच जवळ ठेवा. ओनलाइन बुकिंग असले तरीही.

दीपक सालुंके's picture

17 Dec 2018 - 4:10 pm | दीपक सालुंके

सहलीसाठी शुभेच्या

प्रमोद देर्देकर's picture

18 Dec 2018 - 9:25 am | प्रमोद देर्देकर

येवू दे अजून मला उपयोगी पडेल .

AKSHAY NAIK's picture

18 Dec 2018 - 7:45 pm | AKSHAY NAIK

आपणास एक सुचवू इच्छितो की, होटेल online बुक करताना GOIBIBO/MMT सारख्या कंपन्याच्या संकेतस्थळावर FREE CANCELLATION या श्रेणीतील हॉटेल बुक करावीत. जेणेकरून हॉटेल व बुकिंग कंपनी यांच्यामधील समन्वयात गडबड झाली तरी आपण बुकिंग सरळ रद्द करून आपली रक्कम सहज प्राप्त करू शकतो. तसेच वरील संकेतस्थळावरून हॉटेल बुकिंग करताना GOIBIBO CERTIFED किंवा MMT ASSURED याच प्रकारातील निवडावीत. हे सांगण्याचे विशेष प्रयोजन म्हणजे मागे मी एकदा गोवा ट्रीप ला जाताना online हॉटेल बुक केले व खात्री करण्यासाठी हॉटेल मध्ये फोने लावला तेव्हा कळले की माझे नावे कोणतेही बुकिंग त्यांचेकडे उपलब्ध नाही. झालाप्रकार मी संबधित कंपनीच्या CUSTOMER CARE सोबत SHARE केला. तेव्हा त्यांच्याकडून आपणास जे उत्तर हॉटेल कडून मिळाले तेच त्या कंपनीच्या प्रतिनिधीने दिले व आपणास गोव्याला आल्यावर दुसरे हॉटेल बुक करून देण्याची हमी दिली. माझे सुदैव हे की मी बुक केलेले हॉटेल FREE CANCELLATION ऑफर मधील होते, सरळ ते हॉटेल CANCEL केले व दुसरे बुक केले. REFUND दोन दिवसात खात्यावर प्राप्त झाला. बाकी आपण म्हणल्याप्रमाणे बुकिंग नंतर हॉटेल बुक झाल्याची खात्री करणे केव्हाही चांगले.

मॅक's picture

19 Dec 2018 - 1:11 pm | मॅक

नाईक साहेब,
खूपच छान माहिती ...अनुभव सांगितले त्या बद्दल धन्यवाद

टर्मीनेटर's picture

19 Dec 2018 - 1:21 pm | टर्मीनेटर

रॉयल राजस्थान, माझं आवडते डेस्टीनेशन! बाकी सर्व बघाच पण कुंभलगढ, हल्दीघाटी आणि चितोडगढ बघायचे चुकवू नका.
प्रवासासाठी आणि पुढच्या भागांसाठी शुभेच्छा.

विकास...'s picture

23 Dec 2018 - 8:58 am | विकास...

OCT मध्ये गेलो होतो.
पुणे - अहमदाबाद - उदयपूर - जोधपूर - अहमदाबाद - पुणे - चार दिवस

खालील माहिती उपयोगी पडेल

उदयपूर - ऍक्टिवा २५०/- Day, Honda Shine ५००/- वाहतूक पोलीस स्टेशन समोर मिळते
उदयपूर - CITY PALACE ३००/- जेवण करूनच आत जावे, आतमध्ये जाताना वॉशरूम्स आहेत परत पुढे गेल्यावर नाहीत. बाहेर आलात तर परत आत सोडत नाहीत.
जोधपूर - मेहरानगड वर जाताना बरोबर फक्त छोटी हॅन्डबॅग घ्यावी. खायचे पदार्थ नेऊ देत नाहीत
उदयपूर ते जोधपूर - Govt वोल्वो बस सकाळी उदयपूर मधून ६ ला आहे ११ ला जोधपूर ला पोहोचते
जोधपूर: ओला / रिक्षा आहेत - बसलात कि १५०/-

अधिक माहितीसाठी व्यनी करा