आयुबोवेन रत्नद्वीप -- भाग ५

राजेंद्र मेहेंदळे's picture
राजेंद्र मेहेंदळे in भटकंती
24 Nov 2018 - 4:19 pm

श्रीलंका हा भारताच्या पूर्वेकडील भाग आहे त्यामुळे दिवस लवकरच उगवतोय.जागही लवकर येतेय.
मोबाईलला सिग्नल नाही, टी व्ही फक्त मुलांनी कार्टून बघायला लावला तरच त्यामुळे मस्त जगापासून तुटल्याचे फिलिंग येतेय.मुख्य म्हणजे मोबाईलवर व्हॉट्सअप ,जी मेल आणि ऑफिस मेल चा उच्छाद नाही त्यामुळे समोर असलेल्या गोष्टीवर पूर्ण लक्ष देता येतेय. नाहीतर बायको किंवा मुले बोलताहेत आणि आपण हू हू करत मोबाईल बघतोय हे चित्र घराघरात दिसते.
नुवा एलीयाची प्रसन्न सकाळ उगवली. गॅलरीत आलो आणि समोरच नयनरम्य कॅंडी तलाव उन्हात चमचमत होता.चहाचा वाफाळता कप घेऊन बोचऱ्या थन्डीचा आस्वाद घेत समोरचे दृश्य बघत रमून गेलो.

q

पण लवकरच किचनमधून नाश्त्याचे वास दरवळू लागले आणि पोटातल्या कावळ्यांनी भुकेची जाणीव करून दिली. पटापट आन्हिके आवरून नाश्त्याच्या टेबलावर आलो. आज डोसा सांबार आणि बाकी सर्व नेहमीचेच म्हणजे ज्यूस फळे ब्रेड वगैरे होते.भरपेट नाश्ता करून निघालो.
आजचा कार्यक्रम म्हणजे वाटेत सीतामाईचे देऊळ रावण फॉल्स बघत याला नॅशनल पार्कला पोचणे आणि जन्गल सफारी करणे हा होता. घाट उतरून खाली जायचे होते आणि अंतरही बऱ्यापैकी होते त्यामुळे वेळेतच निघालो.घाट उतरताना सुंदर हिरवाईने आच्छादलेले डोंगर मनाला मोहवीत होते.थोडे खाली उतरलो आणि उपुलने गाडी रस्त्याकडेला लावली. डाव्या बाजूलाच दक्षिण भारतीय पद्धतीचे बांधकाम केले सीतामाईचे देऊळ होते.
रावणाने सीतेला जिथे बंदिवान करून ठेवले होते ती हि जागा. तिथेच आजूबाजूला जी झाडी आहे ती अशोक वाटिका.
देऊळ सुंदर होतेच पण खालच्या बाजूला जो छोटा पाण्याचा प्रवाह वाहत होता त्याचे पाणी नितळ होते आणि त्यात निघोज ला दिसतात तसे रांजण खळगे तयार झाले होते.पलीकडे जायला छोटासा पूल होता आणि त्यावरून खाली पाण्यात उतरता येत होते.
पण खरे सांगू का? रावणासारखा लंकेचा राजा सीतेसारख्या राजपत्नीला हजारो मैलांवरून आणून या रस्त्याकडेच्या अडनिड्या जागेत ठेवेल असे मला तरी पटले नाही. पण निसर्ग सौंदर्याच्या दृष्टीने हा सर्व भाग लाजवाब होता हे मात्र मान्य करावेच लागेल.
इथेच आम्हाला कोणीतरी मोठ्याने भीमरूपी महारुद्रा म्हणताना ऐकू आले आणि थोडे नमस्कार चमत्कार झाल्यावर ते पुण्याचे पटवर्धन काका आणि काकू निघाले. थोड्या गप्पा टप्पा करून आम्ही पुढे निघालो.

q

आता पुढचा टप्पा होता रावण फॉल्स. पुन्हा एका वळणावर उपुलने गाडी थांबवली आणि उजव्या हाताला सहस्त्र धारांनी कोसळणाऱ्या रावण फॉल्सने आमचे स्वागत केले.

q

काही लोक आतपर्यंत गेले होते पण आमचा आजचा मुख्य उद्देश याला नॅशनल पार्कला भेट देण्याचा असल्याने थोडेफार फोटो सेशन करून आम्ही पुढे सटकलो.

वाटेत चांगली हॉटेल्स वगैरे दिसत नव्हती आणि आम्हाला जंगल सफारी साठी ४-५ तास तरी लागणार होते. त्यामुळे एका हॉटेल मध्ये पॅक फूड घेऊन आम्ही पुढे निघालो आणि वाटेत लुनूगानवेहेर तळ्याच्या काठी बसून जेवलो. तोवर उपुलने फोनाफोनी करून एका जीपवाल्याला बोलावून घेतले होते.मुलांना शाळेतून पीक अप करायचे असल्याने त्याला थोडा वेळ लागणार होता. तेव्हढ्यात आमचे जेवण झालेच. मग जीपवाल्याशी बोलणी करून आमची जंगल सफारी बुक केली.४-५ तासांच्या सफारीसाठी तिकिटे आणि जीपचे भाडे मिळून २०० यु.एस.डी. जरा जास्तच होते. पण आपण पुन्हा पुन्हा थोडीच श्रीलन्केला येतोय असा विचार करून त्याला पैसे देऊन वाटेला लावले.
लवकरच जीप आली आणि ४ च्या सुमारास फॉरेस्ट चेक होऊन आम्ही जंगलात शिरलो. ९८० चौरस किलोमीटरच्या भागात हे प्रचंड जंगल पसरले आहे आणि त्याच्या ५ पैकी केवळ २ भागच पर्यटकांसाठी खुले आहेत.बहुतेक समुद्राला लागून असलेले हे एकमेव जंगल असावे. २००४ च्या सुनामीमध्ये यातील समुद्रकाठच्या भागांचे बरेच नुकसान झाले पण आता हे जंगल त्यातून सावरले आहे. इथे हत्ती गवे सांबर रानडुक्कर कोल्हे ससे आणि भरपूर मोर आहेतच पण इथले मुख्य आकर्षण म्हणजे बिबट्या. २५ बिबट्यांच्या जोड्या या जंगलात सोडल्या आहेत आणि नशीब चांगले असेल तर त्या आपल्याला दर्शन देतात.

q

आमच्या ट्रीपच्या सुरुवातीलाच एका घोरपडीच्या जवळून दर्शन दिलेले आणि पुढचा अंदाज आला.मुंग्या जशा थांबून एकमेकींशी कुजबुजतात तसे वाटेत ठिकठिकाणी जीपवाले थांबून एकमेकांशी चौकशी करत होते कि कुठे काय दिसले. पिसारे फुलवून नाचणारे मोर गवताळ भागात दूरवर चरणारी हरणे आणि सांबर, पाण्यात निवांत पहुडलेली रानडुकरे बघत बघत जीप पुढे चालली होती,

q

q

अचानक एका ठिकाणी सर्व जीपचा घोळका थांबलेला दिसला. आम्हीही तिकडे जाऊन थांबलो. डाव्या बाजूच्या झाडीत हत्तीचे एक कुटुंब रमत गमत चरत होते . मंडळी कॅमेरे सरसावून फोटो काढण्यात दंग असतानाच त्यातल्या एका मोठ्या हत्तीने सरळ रस्ता ओलांडला आणि उजवीकडच्या झाडीत शिरला. तो इतका जवळून गेला कि फोटो काढणाऱ्या आणि अर्थातच न काढणाऱ्या सर्व लोकांची पाचावर धारण बसली आणि सर्वजण चिडीचूप झाले.

q

q

हे कमी की काय म्हणून मोठ्या हत्ती पाठोपाठ इतर हत्तीनी सुद्धा रस्ता पार करायचे मनावर घेतले आणि त्यांना जायला जागा सापडेना.एकदम जुरासिक पार्क सारखे गंभीर वातावरण तयार झाले आणि ट्रिप मूड मधून पहिल्यांदाच लोक बाहेर आलेले दिसले.जीपवाल्याच्या कपाळावरही घाम आल्यासारखा दिसू लागला. २-३ जीपवाल्यानी गाडी रिव्हर्स घेतली आणि २-३ जणांनी फॉरवर्ड जेणेकरून इतर हत्ती रस्ता पार करू शकतील. हे सर्व होईपर्यंत मोठा हत्ती आमच्यावरच नजर रोखून पवित्रा घेऊन उभा राहिला जेणेकरून काही गडबड झालीच तर एका धडकेत जीप उलटवून टाकता यावी. श्वास रोखून एक एक हत्ती रस्ता पार करायची वाट बघत बसण्याशिवाय काही पर्यायच नव्हता. शेवटी एकदाचे सर्व जण पार झाले आणि जीपगाड्या पुढच्या मार्गाला लागल्या.

आतापर्यंत बरेच प्राणी दिसले होते पण ज्याचे मुख्य आकर्षण होते तो बिबट्या मात्र दर्शन देईना.आमच्यापेक्षा जीपवालाच त्यामुळे जास्त अस्वस्थ झाला होता आणि वाटेत इतर सगळ्या जीपवाल्यांना विचारात चालला होता. अचानक लेपर्ड लेपर्ड अशी कुजबुज सुरु झाली आणि उजवीकडच्या झाडीत धावणारा बिबट्या त्याला दिसला. आमच्या शहरी नजरेला मात्र तो दिसेना. आता बिबट्या आणि जीप यांची जणू रेस लागली आणि जीप बिबट्याच्या समांतर नेऊन आम्हाला तो दिसावा अशी जीपवाल्याची धडपड सुरु झाली. दोघेही इरेला पेटलेले आणि आम्ही कॅमेरे सरसावून उत्सुक बसलेलो. शेवटी बिबट्यालाच आमची दया आली असावी कारण त्याने अचानक पवित्रा बदलला आणि आमच्या जीप पासून २० फुटांवर सण्णकन उडी मारून रस्ता पार करून डावीकडच्या झाडीत घुसला. हे इतके पटकन घडले कि कॅमेरे उचलायचेही भान राहिले नाही.जीप करकचून ब्रेक लावून जागीच थांबली आणि आम्ही अवाक बसून राहिलो.मिनिटभराने सगळे सावरले आणि आपली ट्रिप सुफळ झाल्याची भावना प्रत्येकाच्या मनात दाटून आली.

q

आता जीपवाल्याची कॉलर ताठ झाली होती आणि वाटेत भेटणाऱ्या सगळ्या मित्रांना तो हि बातमी सांगू लागला.मुख्य काम झाल्याने आम्ही हत्ती खडकाच्या समुद्रकाठच्या भागात क्षणभर विश्रांतीसाठी थांबलो.
आता पुढची ट्रिप चालू झाली आणि अजून काही मोर ससे हरणे आणि शेणकिडे कोळी वगैरे काही कीटक तसेच धनेश बुलबुल बगळे असे काही पक्षी बघून आम्ही पुढे निघालो.

q

अंधार होत चालला होता आणि पोटातही कावळे कोकलू लागले होते. त्यामुळे जीपवाल्याला आवरते घ्यायला सांगून आम्ही परतीचा प्रवास सुरु केला आणि २० कि.मी. बाहेर येऊन आमच्या नेहमीच्या गाडीत बसलो.आमचे आजचे हॉटेल तिस्स महारामा गावातच होते , फार दूर नव्हते त्यामुळे १५ मिनिटातच आमच्या हॉटेलवर पोचलो आणि गरमागरम जेऊन गुडूप झालो.

प्रतिक्रिया

श्वेता२४'s picture

24 Nov 2018 - 5:17 pm | श्वेता२४

सुरुवातीची काही चित्रे मोबाईल वर दिसत नाहीयेत

डॉ सुहास म्हात्रे's picture

24 Nov 2018 - 9:19 pm | डॉ सुहास म्हात्रे

पहिल्या ४ चित्रांना पब्लिक अ‍ॅक्सेस नसल्याने ती दिसत नाहीत. त्यांना पब्लिक अ‍ॅक्सेस देऊन त्यांचे नवीन दुवे वापरून ती चित्रे परत टाकावी लागतील.

सुधीर कांदळकर's picture

25 Nov 2018 - 8:21 am | सुधीर कांदळकर

वर्णन, चित्रे, छान जमले आहे. आमच्या श्रीलंका दौर्‍याची आठवण झाली. धन्यवाद.

रच्याकने ... अगोदरचे भाग अतिशय त्रोटक वाटले. वरणभाताच्या जेवणाची अपेक्षा करावी आणि फक्त एखादी चटणी समोर यावी तसे.

राजेंद्र मेहेंदळे's picture

25 Nov 2018 - 12:44 pm | राजेंद्र मेहेंदळे

ऑफिसच्या आणि ईतर गडबडीत मोठे भाग टंकायला वेळ होत नाहिये.

दुर्गविहारी's picture

25 Nov 2018 - 10:40 am | दुर्गविहारी

मोबाईलवर बघताना फोटो ताणले गेल्यासारखे दिसत आहेत. फोटो टाकताना विड्थत , हाईट देउ नका.
बाकी वर्णन वाचताना मजा येते आहे.शेवटच्या फोटोत लांबवर दिसणारा सुळका कोणता आहे. त्याला पाहून माळशेज घाटातील भैरवगडाची आठवण झाली.

राजेंद्र मेहेंदळे's picture

25 Nov 2018 - 12:43 pm | राजेंद्र मेहेंदळे

एकतर पब्लिक अक्सेस देण्यची गडबड आणि काही फोटो अगदी लहान तर काहि मोठे दिसत होते म्हणुन हाईट आणि विड्थ देत गेलो.

डॉ सुहास म्हात्रे's picture

25 Nov 2018 - 1:35 pm | डॉ सुहास म्हात्रे

या बाबतीत मिपावर चित्रे टाकण्याची कृती हा धागा उपयोगी होऊ शकेल.

समर्पक's picture

27 Nov 2018 - 11:52 pm | समर्पक

शेवटचा फोटो बघून सिगिरियाची आठवण झाली... तिथले फोटो पुढे येणारेत का? उत्सुकता आहे... अजिंठ्यानंतर त्या ठिकाणाची महती आहे

राजेंद्र मेहेंदळे's picture

28 Nov 2018 - 11:38 am | राजेंद्र मेहेंदळे

आणि डम्बुला गुहा हे या ट्रिप् मध्ये बसत नव्हते. वेळेच्या दृष्टीने एक मुक्काम वाढला असता. त्यामुळे केले नाही.