घात

चॅट्सवूड's picture
चॅट्सवूड in दिवाळी अंक
6 Nov 2018 - 12:00 am

H

घात

"मला वाच...."
सोमनाथ एवढंच म्हणू शकला, मग तो खोकू लागला.
मला वाच... का मला वाचव? याला नेमकं काय म्हणायचं?
सोमनाथची खोकल्याची उबळ कमी झाली. त्याच्या आईने त्याला पाणी दिलं. तो खोकत कसंतरी पाणी पिऊ लागला. खोलीभर औषधांचा वास पसरला होता. मी सोमनाथकडे बघितलं. त्याच्या डोळ्यांच्या खाचा झाल्या होत्या. गालफडं बसली होती. चेहऱ्यावर सुरकुत्या वाढल्या होत्या. केस गळून पडले होते. हातापायांच्या काड्या झाल्या होत्या. सोमनाथ कण्हत होता का काही म्हणत होता?

सोमनाथने खोकल्याचं औषध घेतलं. मी त्याला झोपून राहायला सांगितलं. त्याच्या आईला काही पैसे देऊ लागलो, पण त्याच्या आईने हात जोडले, "आता नको" असं म्हणाली. मी निरोप घेऊन बाहेरच्या खोलीत आलो. तिथे रुपेश बसला होता. मोबाइलवर काहीतरी करत होता. मला बघताच रुपेश उभा राहिला. आम्ही सोमनाथच्या घराबाहेर आलो. सूर्यास्त झाला होता. अंधार पडायच्या आत घरी पोहोचावं, असा विचार करत मी किक मारून बाइक सुरू केली. रुपेश माझ्यामागे बाइकवर बसला. सोमनाथची अवस्था बघून तो सुद्धा घाबरला होता. सोमनाथची अशी अवस्था का झाली? काय झालं असेल? आम्ही बाइकवरून हायवेला आलो, एका चहाच्या टपरीवर थांबलो.

"याला काय झालंय??" मी बाइकवरून उतरत रुपेशला विचारलं.
"निपारीच्या घाटात अडकला होता." रुपेशने उत्तर दिलं.
"मग?"
"तेव्हापासून आजारी ए..." रुपेश तोंड धूत म्हणाला.
"घाटात काही दिसलं का?"
"काय माईत, नीट सांगितलचं नाय" रुमालाने चेहरा पुसत रुपेश म्हणाला.
"मला म्हणत होता... मला वाचव.."
"हा.. मला पन म्हणाला, मला वाचव, तो मागे लागलाय..." रुपेश पटकन म्हणाला.
"तो मागे लागलाय? तो कोण?"
"काय माईत.."
सोमनाथच्या मागे कोण लागलं आहे?

निपारीचा घाट!! अरुंद रस्ता, नागमोडी वळणं, दुतर्फा वाहतूक, खड्डे. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला कठडा नव्हता, खोल दरी होती. हिवाळ्यात धुकं आणि पावसाळ्यात दरड कोसळत असे. आमच्या गावाला एकच एसटी येत असे. एकदा रात्र झाली तरी एसटी स्टेशनला पोहोचली नाही, म्हणून शोधाशोध सुरू झाली, तरी एसटी काही मिळेना. एक आख्खी एसटी गायब? कशी काय? तेव्हा दिसलं की दरीने एसटी केव्हाच गिळून टाकली होती!! लोकांना दरीच्या तळाशी एसटीचे अवशेष दिसले. महामंडळ एका एसटीला अन गाव सत्तावीस लोकांना मुकलं.
अशी या घाटाने बरीच माणसं मार्गी लावली होती.

रात्री निपारीच्या घाटातून जाताना एकाला चार फूट उंच बेडूक दिसला होता. हो, बेडूकच!! एकाला तर लहान मूल रडताना दिसलं होतं. तुम्हाला जर घाटात रात्रीच्या वेळी एखादं लहान मूल रडताना दिसलं, तर तुम्ही काय कराल? त्याची विचारपूस कराल? का त्याला लिफ्ट द्याल? का दुर्लक्ष कराल?
कारण घाटात कधी थांबायचं नसतं. जो थांबला तो खपला.

सोमनाथ आणि रुपेशकडे स्वतःच्या चारचाकी गाड्या होत्या. गावातल्या लोकांना शहराकडे, शहरातल्या लोकांना गावाकडे पोहोचवत असत. हे त्यांचं रोजचं काम होतं. त्यांना रोज निपारीच्या घाटातून ये-जा करावी लागे. मी सुद्धा या दोघांसारखा ड्रायव्हर होतो. माझ्याकडेसुद्धा स्वतःची चारचाकी गाडी होती.

एकदा रात्रीच्या वेळी माझ्या गाडीतून निपारीच्या घाटातून जात होतो.
एकटाच गाडी होतो. घरी परत निघालो होतो. घाट लागला, अंधार वाढला. हेडलाइटच्या प्रकाशात पुढचं काही दिसत नव्हतं. कसातरी, हळू गाडी चालवत होतो. पंधरा-सोळा तास गाडी चालवून थकलो होतो. मान, पाठ अवघडली होती, भूक लागली होती. पाणी नव्हतं, घसा कोरडा होता. घरी पोहोचायचं होतं, म्हणून गाडीचा वेग वाढवला, पण तेवढ्यात....

समोरून एक आकृती माझ्या गाडीकडे येत होती.
अंधार होता. ती आकृती अस्पष्ट दिसत होती. बाई आहे का माणूस? बहुतेक माणूस असावा. त्याचे कपडे फाटले होते, पाय अनवाणी होते. चेहऱ्यावर रक्त होतं? का आणखी काही? चेहरा नीट दिसत नव्हता. ही आकृती माझ्या गाडीकडे वेगाने सरकत होती? का चालत होती? का धावत येत होती? मी गाडीचा वेग कमी केला, हॉर्न वाजवला, पण आकृतीने प्रतिक्रिया दिली नाही. मग मी गाडी थांबवली. पण आकृतीचं माझ्या गाडीकडे लक्षच नव्हतं. मी नीट बघितलं, ती आकृती मागे बघत पुढे धावत होती.
आकृती गाडीजवळ आली, तसं स्पष्ट दिसलं - ती आकृती मागे बघत नव्हती, तर तिची मानच तशीच होती!! मान सरळ नव्हती, डाव्या बाजूला कलंडली होती, वाकडी झाली होती. डोक्याचा मागचा भाग, केस दिसत होते. चेहरा दिसतच नव्हता, त्यामुळे ती आकृती मागे बघत आहे असं वाटलं...
मी हे बघून शहारलो. हात कापू लागले. स्नायू जखडले. पोटात गोळा आला, घाम फुटला. छातीतली धडधड वाढली. डोळे मिटून घेतले, देवाचा धावा केला, तेवढ्यात.... मोठा आवाज झाला. माझं डोकं स्टिअरिंगवर आपटलं. कमरेतून सणक थेट मेंदूत गेली. मेंदू बधिर झाला. झिणझिण्या आल्या. काही कळायच्या आत सगळं धूसर झालं, गुंगी आली... माझ्या गाडीला दुसऱ्या गाडीने मागच्या बाजूने धडक दिली होती.
या अपघातामुळे माझा मणका हलला. मानेला फ्रॅक्चर झालं. त्यामुळे दोन महिने बेडवरच होतो, माझी अवस्था बघून रेश्मा खचली. रेश्माने मला गाडी विकायला लावली. तिच्या डोक्यावर हात ठेवून, "स्टियरिंगला हात लावणार नाही" असं वचन मागितलं. बायकोचं ऐकलं, गाडी विकली, बाइक घेतली, गावातल्या साखर कारखान्यात नोकरी करू लागलो.

तो वाकड्या मानेचा माणूस परत कधी दिसला नाही.
तो कोण होता? माझा भास? का ते भूत होतं? का आणखी काही? त्याचं काय झालं असेल? तो असा घाटात का पळत असेल? बराच विचार केला, पण उत्तर कधी मिळालं नाही.

रुपेशला त्याच्या घरी सोडलं. मी माझ्या घरी परत आलो. रात्र झाली होती. घरी कोणी नव्हतं, कारण रेश्मा माहेरी गेली होती. रेश्माला फोन केला, वरण भातासाठी कुकर लावला. तिला सोमनाथबद्दल सांगितलं. "त्याला बाधा झाली असेल" असं रेश्मा म्हणाली. कसली बाधा? कशामुळे होणार?
रेश्मा तिच्या माहेरी बोलवत होती. मलाही जायचं होतं, पण रेश्माच्या घरी जायचं म्हणजे निपारीच्या घाटातून जावं लागणार, म्हणून तो विषय टाळून तिला गुड नाइट करून झोपी गेलो.

रात्री गाढ झोपलो होतो. पण.. हा कसला आवाज? कुठून येत आहे? दारातून? कोणी दार वाजवत आहे का? म्हणून हळूच हलकेच दार उघडलं, दाराच्या फटीतून बाहेर बघितलं, बाहेर कोणी नव्हतं. संथ पाऊस पडत होता. बाहेर जाऊन बघायची हिम्मत झाली नाही. मी दार लावलं, परत येऊन झोपी गेलो.
रात्री स्वप्न पडलं. स्वप्नात निपारीच्या मी घाटातून धावत होतो. जोरात, वेगात, जीव तोडून. धावत असताना मी मागे वळून बघितलं आणि.... मला जाग आली.

सोमनाथच्या घरी जाऊन दोन दिवस झाले होते. सोमनाथच्या प्रकृतीत थोडा सुधार झाला होता. त्याच्या आईने फोनवर कळवलं, तसं मलाही बरं वाटलं. रेश्मालासुद्धा घरी परत आणायचं होतं, पण परत त्याच घाटातून जायला लागणार. आता काय करायचं?

त्या दिवशी कारखान्यातून उशिरा घरी आलो. दमलो होतो म्हणून लगेच झोपलो. स्वप्न काही पडलं नाही, पण मला जाग आली. कसला आवाज आहे? रात्री पाऊस पडत होता, त्यात हा असा आवाज. कोणीतरी दार वाजवत आहे? उघडून बघू? नको, कशाला उगीच.. असा विचार करत आवाजाकडे दुर्लक्ष केलं. पण आवाज वाढला, तसा खडबडून जागा झालो. हळूच दार उघडलं, बाहेर बघितलं.....

"मला वाचव" रुपेश म्हणाला. तो बाहेर पावसात उभा होता. पूर्ण भिजला होता. त्याला थंडी वाजत होती. डोळे लाल झाले होते. हा का घाबरला आहे? काय झालं?
"तो मागे लागलाय..." रुपेश बरळला. कोण तो? कोण मागे लागलाय? रुपेशचा टीशर्ट चुरगळला, फाटला, मळला होता. त्याच्या चपलांना चिखल लागला होता. त्याने धडपडत चपला काढल्या. मी त्याला घरात घेतलं, दार लावलं, तेवढ्यात रुपेशचा तोल गेला, तसं त्याला सावरलं, आधार देत खुर्चीत बसवलं.
"काय झालं?" मी परत विचारलं, पण उत्तर मिळालं नाही. रुपेशने पिण्यासाठी पाणी मागितलं. मी पाणी दिलं, त्याने एका घोटात ग्लास रिकामा केला, तसा त्याला ठसका लागला.
"अरे, काय झालं? कोण मागे लागलंय?" मी विचारले.
"घाट..." रुपेश एवढंच म्हणू शकला.
"घाट??"

रुपेश पुढे काही बोलू शकला नाही. त्याने वेळ घेतला. मी त्याला अंग पुसायला टॉवेल, मग कोरडा शर्ट दिला. अंग पुसताना त्याचे हात कापत होते. याने काय बघितलं? रुपेश माझ्यापेक्षा चार-पाच वर्षांनी लहान होता. बलदंड होता. एवढा पैलवान गडी कशाला घाबरला?
रुपेश खुर्चीत बसला होता. त्याने डोळ्याच्या कोपऱ्यातून दाराकडे बघितलं, मग माझ्याकडे बघितलं. मी त्याला शांत व्हायला वेळ दिला. रुपेश सांगू लागला. "मला भाडं मिळालं होतं..."
"गावातून?" मी विचारले
"नाय.. स्टेशनवरून"
"मग?"
"मी नऊच्या सुमारास घरून स्टेशनला निघालो, घाट लागला..." रुपेश दोन्ही तळहात एकमेकांवर घासत म्हणाला. त्याला थंडी वाजत होती. मी त्याला पटकन चादर दिली. त्याने लहान मुलासारखी चादर पांघरून घेतली. मी उठलो, गॅस सुरू केला. त्यावर तवा तापायला ठेवून रुपेशला विचारलं, "घाटात काय?"
"तिथं एकाने थांबवलं" रुपेश म्हणाला, तसा मी त्याच्यासमोर येऊन थांबलो.
"कोणी?"
"माईत नाय.. गावातला नव्हता"
"मग?"
"तो म्हणाला स्टेशनपर्यंत सोडा.. दोनशे देतो"
"तू त्याला गाडीत घेतलं?" मी पटकन विचारले.
"हा.. एकटाच होता, त्याच्याकडे एक बॅगसुद्धा होती" रुपेश म्हणाला.
"बॅग? कसली बॅग?"
"चौकोनी बॅग"
"सूटकेस?"
"हा... तो बॅग घेऊन मागं बसला. फोनवर सारखा बोलत होता." रुपेश म्हणाला, तसा मी गॅस बंद केला, बेडवरची दुसरी चादर काढली, तव्याभोवती गुंडाळली. रुपेशला तवा दिला. रुपेश तव्यावर हात ठेवून शेकू लागला, पुढे सांगू लागला. "तो फोनवर कोणासंगं तरी बोलत होता, रडत बी होता..."
"रडत होता?"
"हा.. रडत सॉरी म्हणत होता"
"कोणाशी बोलत होता?"
"सगळं नाय कळलं, कन्नड का काय बोलत होता"
"मराठी नव्हता?"
"नाय"
"मग?"
"कॉल कट झाला, तसा तो बिथरला.. सारखा कॉल लावू लागला" असं म्हणून रुपेश त्या गरम तव्याने छाती शेकू लागला.
"कॉल लागला?"
"नाय ना.. मग त्याने मला माझा फोन मागितला"
"तू दिला?"
"हा.. कायतरी मॅटर व्हता.. मी माझा फोन दिला, पन माझ्या फोनने कॉल लागला नाय"
"मग?"
"मग त्यानं पानी मागितलं, मी दिलं तर पानी पितानाच....." एवढं म्हणून रुपेश थांबला, त्याने परत घराच्या बंद दरवाजाकडे बघितलं.
"काय झालं?"
"पानी पितानाच, तो छाती चोळायला लागला..." रुपेश स्वतःची छाती चोळत म्हणाला.
छाती चोळायला लागला? म्हणजे? "अटॅक आला?"
"हा अटॅकचं असंल"
फोन कट झाल्यावर अटॅक आला? काय झालं असेल? का त्याला घाटात काही भयंकर दिसलं? मला जसं दिसलं होतं तसं काही?
"माझी टरकली, मी लगोलग गाडी थांबवली" रुपेश म्हणाला.
"कुठं?"
"घाटातच"
"तू दवाखान्यात नेलं का?" मी विचारलं.
रुपेशने नाही म्हणून मान हलवली.
"मग काय केलंस?" मी वैतागलो.
"त्याची नाडी बंद झाल्ती" रुपेश मान खाली करून म्हणाला.
"दवाखान्यात का नाही गेला?" मी परत विचारलं.
"मी लय घाबरलो होतो..." रुपेश खुर्चीतून उठत म्हणाला. त्याने तवा हातात घेतला, त्यातून चादर बाजूला केली. गॅस परत चालू केला, त्यावर तवा ठेवला. त्याने खोलीभर एकदा नजर फिरवली. माझ्या खोलीतली एकुलती एक खिडकी त्याला दिसली, खिडकी अर्धवट उघडी होती. रुपेशने पटकन खिडकी पूर्ण लावली.
"मग केलं काय?" मी विचारलं.
"चूक झाली मान्य ए, पन मला वाचव" माझा हात पकडत रुपेश म्हणाला.
"तू त्याला गाडीतून बाहेर काढलं??" मी माझा हात त्याच्या हातातून सोडवत म्हणालो.
रुपेश काही म्हणाला नाही, मला उत्तर मिळालं होतं.
"तू नीट चेक केलं का? मी विचारले
"मी चेक केलं, त्याला हलवलं, त्याच्या छातीवर भार देऊन बघितला, सगळं केलं.. पन तो उठलाच नाय" रुपेश एका दमात म्हणाला, त्याच्या डोळ्यात पाणी आलं. रुपेशने जे केलं ते चुकीचं होतं. त्या माणसाला दवाखान्यात घेऊन जायला हवं होतं. त्याला मेलेला बघून रुपेश घाबरला. अनवधानाने चूक घडली. आता अपराधी, वाईट वाटतं होतं. सोमनाथबरोबर असच झालं असणार. याच अपराधीपणाची भावना सोमनाथ मध्ये रुतत गेली. त्यामुळे तो आजारी पडला. म्हणजे तो अटॅक आलेला माणूस सोमनाथच्या गाडीतसुद्धा होता? तो भूत आहे?

"पण मग.." असं म्हणून मी उभा राहिलो, माझ्या घराच्या दाराकडे जाऊ लागलो, तेवढ्यात रुपेश ओरडला
"नको उघडू"
मी रुपेशकडे बघितलं. रुपेश हात जोडत म्हणाला, "लेका पाया पडतो, पन दार नको उघडू.."
"अरे पण..."
"माघारी येताना त्यो प्रत्येक वळणावर दिसला"
"तोच दिसला?"
"हा.. तो मागे लागलाय" रुपेश कापऱ्या आवाजात म्हणाला.

मी जागच्या जागी थबकलो, सोमनाथसुद्धा असं म्हणत होता, "मला वाचव, तो मागे लागलाय" म्हणजे सोमनाथची जी अवस्था झाली, तशीच रुपेशची होईल? मी रुपेशकडे बघितलं. तो मोठ्या आशेने माझ्याकडे बघत होता. रुपेशने मोठी चूक केली होती, पण त्यासाठी एवढी मोठी शिक्षा? मी मोबाइल काढून बघितला, रेश्माचे 'मिस यू'चे काही मेसेजेस आले होते. रेश्माची आठवण येत होती. तिच्याकडे जायचं होतं, पण त्या आधी या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावायला हवा.
मी पटकन दार उघडलं. रुपेश दार बंद करायची विनवणी करत होता. बाहेर मुसळधार पाऊस कोसळत होता, विजा चमकत होत्या. पावसाला कसला सूड घ्यायचा आहे? रुपेशची चारचाकी गाडी पावसात भिजत होती. मी गाडीकडे नीट बघितलं. गाडीच्या मागच्या सीटवर.... कोणी होतं का? मी थिजलो. काय करावं ते कळेना. घराचा दरवाजा पटकन बंद केला, मागे फिरलो... रुपेश अवघडत दारापाशी बसला. मी घरातून छत्री शोधून काढली, दाराजवळ गेलो, तसं एकदम आठवलं, छत्री रुपेशला दिली, मागे फिरलो, एक हातोडा शोधून काढला. तो हातोडा बघून रुपेशने माझ्याकडे बघितलं. मी मनातल्या मनात म्हणालो, घाबरायचं नाही.
आता कोणी आडवा आला की त्याला आडवा करायचा.

उजव्या हाताने हातोडा पकडून, डाव्या हाताने दरवाजा उघडला. रुपेश बिचकत होता. त्याने कशीतरी छत्री उघडली. आम्ही घराबाहेर आलो. मी गाडीकडे बघत होतो. मनातल्या मनात देवाचं नाव घेत गाडीच्या दिशेने जाऊ लागलो. खूप पाऊस होता. आम्ही लगेच भिजलो. मग गाडीजवळ पोहोचलो. गाडीत डोकावून बघितलं, आत तसं कोणी नव्हतं. रुपेशने गाडीचा मागचा दरवाजा उघडला, तसा कुबट वास नाकात शिरला. पण हा वास कुबट होता? का लाकूड जळल्यावर येतो तसा वास होता? मी गाडीची मागची सीट नीट बघितली. तिथे काही नव्हतं. सीटखाली करड्या रंगाची एक सूटकेस पडली होती. मी पटकन उचलली आणि पळत माघारी घरात आलो.

आम्ही घरात आलो. दार लावून घेतलं. ही सूटकेस जड, भारीतली होती. सूटकेसला नंबर लॉक होतं. मी काहीतरी नंबर फिरवून सूटकेस उघडायचा प्रयत्न केला. सूटकेस उघडली नाही, तसं रुपेशने माझ्या हातातून हातोडा घेतला, सुटकेस जमिनीवर खाली ठेवली. तो सुटकेसवर हातोडा मारणार, तेवढ्यात मी त्याला थांबवत म्हणालो, "जर पोलीस आले, त्यांना ही उघडलेली सूटकेस मिळाली तर?" मी रुपेशला शांतपणे म्हणालो.
"पोलीस कशे येतील?" रुपेशने विचारलं.
"उद्या सकाळी ती डेड बॉडी कोणाला तरी दिसेल, पोलिसांना खबर मिळेल, शोध सुरू होईल. ते तुझ्यापर्यंत पोहोचू शकतात. कशाला उगीच रिस्क घ्यायची?" मी रुपेशला समजावलं, तसा रुपेशने हातोडा खाली ठेवला. डोक्याला हात लावून विचार करू लागला. सूटकेस उघडून बघणं धोक्याचं होतं. काय असेल या सूटकेसमध्ये? पैसे? सोनं? का आणखी काही?

तो माणूस कन्नड बोलत होता, फोनवर कोणाला तरी विनवणी करत होता, सॉरी म्हणत होता, फोनवर असं काही बोलणं झालं की त्याच्या जिव्हारी लागलं, त्याला अटॅक आला. ही सूटकेस महत्त्वाची असू शकते. कदाचित त्या माणसाला ही सूटकेस कोणाला तरी द्यायची असेल.
"ही सूटकेस परत जाऊन डेड बॉडीजवळ ठेवायला हवी." मी सूटकेस हातात घेत म्हणालो.
"कशाला?" रुपेश चरफडला.
"हे बघ.. आधी त्याच्या घरातले, मग पोलीस, त्याला शोधणार, सूटकेसला शोधणार. आपल्या गावात चौकशी होणार." मी परत एकदा रुपेशला समजावलं. तो बधिर झाला होता. त्याला लवकरात लवकर या सगळ्यातून बाहेर पडायचं होतं. मलाही तेच हवं होतं.

रुपेशला घाटात जायचं नव्हतं. त्याला भीती वाटत होती. ती डेडबॉडी अजून घाटातच असणार. जर डेडबॉडी सापडली, तर सूटकेस त्याच्याशेजारी गुपचुप ठेवून द्यावी. म्हणजे कोणाला काही संशय येणार नाही. जर डेडबॉडी मिळाली नाही, तर ही सूटकेस कुठेतरी घाटात फेकून द्यावी. अरे हो.. सूटकेसवरचे फिंगरप्रिंट्स पुसायला हवेत.
मी रुपेशला धीर दिला. सगळं काही ठीक होईल असं सांगितलं. पण पुढे काय होणार? हा मॅटर सॉल्व्ह झाला की रेश्माच्या घरी जावं, तिला सरप्राइझ द्यावं असा विचार करत आम्ही घराच्या बाहेर आलो. घराला कुलूप लावलं. पाऊस कमी झाला नव्हता. आम्ही परत भिजलो. तसेच ओल्या कपड्याने गाडीत बसलो.

रुपेश नीट गाडी चालवेल ना? एवढ्या पावसात मला गाडी चालवता आली नसती. सवय राहिली नव्हती. रुपेशने गाडी सुरू केली. मी रुपेशच्या बाजूच्या सीटवर बसलो, सूटकेस मांडीवर ठेवली. उजव्या हातात हातोडा होताच. रुपेशकडे रोखून बघत म्हणालो, "सावकाश..."
तशी रुपेशने मान डोलवली. तो काही न बोलता गाडी चालवू लागला.

डोक्यातले विचार भुंग्यासारखे सतावत होते. मी त्या सूटकेसकडे बघत विचार करू लागलो, यात काय असेल? काहीतरी महत्त्वाचं? म्हणजे पैसेच असतील. किती असतील? कुठल्या नोटा आहेत त्यावर ठरणार. सूटकेस तर जड होती. एवढी कॅश? म्हणजे हा दोन नंबरचा, घरात लपवून ठेवलेला काळा पैसा असणार.
एवढ्या रात्री एवढे पैसे? काहीतरी विकत घ्यायला? नाही.. मग? हे पैसे कोणाला तरी द्यायचे असतील.
एखाद्याला एवढे पैसे अशा वेळी द्यायचे? मदत म्हणून? शक्यच नाही.
रात्रीचा तो माणूस एवढे पैसे घेऊन घाटात का आला असेल? त्याला कोणीतरी ब्लॅकमेल करत होतं का?
तो माणूस फोनवर ब्लॅकमेलरशी बोलत असणार, त्यालाच विनवणी करत असणार, म्हणजे ब्लॅकमेलरने त्याला पैसे घेऊन घाटात बोलावलं.

पण तो तर आधीच मेला. सूटकेस रुपेशच्या गाडीतच राहिली. ब्लॅकमेलरला पैसे मिळाले नाहीत, म्हणजे ब्लॅकमेलर त्याला आणि सूटकेसला शोधत असणार.
हा विचार करत असताना, निपारीचा घाट सुरू झाला. रुपेश गाडी सावकाश चालवत होता. घाटात बाकी कोणी नव्हतं. फक्त अंधार होता. मधूनच काजवे चमकत होते. मला भीती वाटत होती. मी घाटाकडे बघण्याचं टाळलं आणि रुपेशकडे बघितलं. त्याचे हात अजूनही थरथरत होते.

पण मग ब्लॅकमेलर त्याला असं काय म्हणाला की त्याला अटॅक आला? का ब्लॅकमेलरला हे पैसे नको होते? असं कसं होईल? पैसे नको होते तर काय हवं होतं? त्याने हा सगळा खटाटोप पैशासाठी केला नव्हता? मग कशासाठी केला होता?
ब्लॅकमेलरसाठी पैशापेक्षा जास्त महत्त्वाचं काय असणार?
पैशापेक्षा जास्त महत्त्वाचं काय असणार?

पैशापेक्षा जास्त महत्त्वाचं...
सूड...

मी डोळे मिटले, डोकं शांत करायचा प्रयत्न केला, दीर्घ श्वास घेऊन स्वतःला सावरलं.
"मर्डर..." मी पुटपुटलो.
तसा रुपेश दचकला.
"त्या माणसाचा मर्डर झाला" मी रुपेशकडे बघत म्हणालो.
"काय?" रुपेशने विचारलं.
"हे बघ, आधी त्या माणसाला घाटात चालायला लावलं. तो दमला, त्याच्या हार्टवर प्रेशर आलं..." मी रुपेशला समजावून सांगू लागलो "मग त्याला फोनवरून शॉकिंग बातमी दिली गेली"
"हां बरोबर..."
"म्हणून त्याला अटॅक आला" मी म्हणालो.
रुपेश यावर काही म्हणाला नाही. त्याला हे काही झेपत नव्हतं.
"फोनवरच्या माणसाला माहीत होतं की हा हार्ट पेशंट आहे" येस्स.. मी हा गुंता सोडवला होता. तसं म्हणायला गेलं तर रुपेशचा यात काही दोष नव्हता, पण नकळत रुपेश या खुनाचा भाग झाला होता. खुनी चलाख होता. पोलीस त्याच्यापर्यंत कधी पोहोचणार नाहीत. 'घाटात चालत असताना अटॅक आला, दुर्देवी अपघात आहे' असं ठरवून पोलीस केस क्लोज करतील.

कोणाला कधी कळणार नाही की हा "परफेक्ट मर्डर होता" असं म्हणून मी स्वतःशीच हसलो.

मी हसत असताना रुपेशने गाडीचा गियर बदलला. गाडीचा वेग वाढवला, तसं मी रुपेशकडे बघितलं. रुपेशने स्टीयरिंग पटकन डाव्या बाजूला वळवलं. गाडीने रस्ता सोडला. ती दरीच्या दिशेने जाऊ लागली. मला काही कळायच्या आत रुपेशने त्याच्या बाजूचा दरवाजा उघडला आणि गाडीबाहेर उडी मारली.....
माझ्यासकट गाडी थेट दरीत कोसळली....

कोसळण्याआधी दोन एक सेकंद गाडी हवेत होती. मग गाडी बम्परवर पडली, मग उपडी रूफवर आदळली, मग कोलांट्या उड्या घेत कर्कश आवाज करत दरीच्या तळाशी जाऊ लागली. विण्डशिल्डची काच फुटून माझ्या अंगात घुसली. गाडीतून धूर येऊ लागला. मी गाडीच्या आतमध्ये वाकडातिकडा फेकला गेलो, तेवढ्यात विण्डशिल्डच्या फुटलेल्या काचेतून बाहेर फेकला गेलो.
मी बाहेर जमिनीवर डोक्यावर आदळलो, पण दरीत बरीच झाडं होती. मी कसंतरी झाडाझुडपांना पकडलं, त्यांचा आधार घेतला, तसा स्थिरावलो. मी खाली बघितलं, रुपेशची गाडी कोसळत थेट दरीच्या तळाशी गेली. माझ्या डोक्यावरून गरम असं काहीतरी तोंडापर्यंत येत होतं. सर्वांगातून वेदना येत होत्या, पण अजिबात हलता येत नव्हतं, कारण त्राणच नव्हतं, मी बेशुद्ध झालो....

घाटात काहीतरी भयानक बघून सोमनाथ आजारी पडला. रुपेशने या गोष्टीचा फायदा घेतला. "तो मागे लागलाय" असं रुपेश म्हणाला, पण सोमनाथ असं कधी म्हणाला नाही. रुपेशने 'तो' चा बनाव रचला. तो माणूस, त्याला अटॅक येऊन मरणं हे सारं झूठ, खोटं होतं. असं काही घडलंच नाही.
रुपेशने जी काही ऑस्कर विंनिंग अ‍ॅक्टिंग केली, ते मला सगळं खरं वाटलं. पण रुपेश घाबरला का होता? कारण त्याला मला मारायची भीती वाटत होती. पण त्या सूटकेसचा काय संबंध? कारण रुपेशला अशा वेळी मला घाटात आणायचं होतं. सूटकेस नसती, तर मी रात्रीचा घाटात आलोच नसतो.

परफेक्ट मर्डर....

दरीत कोसळलेली गाडी रुपेशची होती, त्यामुळे कोणी त्याच्यावर संशय घेणार नव्हतं. कोणालाही हा अपघातच वाटणार. आता रुपेश पोलिसांना सांगणार, बायकोला भेटायला जायचं म्हणून मी त्याची गाडी घेऊन गेलो, कारण रुपेशला माहीत होतं की मला रेश्माकडे.....
एक मिनिट..
रेश्मा..
रुपेशचं कुठे एवढं डोकं चालणार?
म्हणून रेश्मा एवढे सारे 'मिस यू'चे मेसेज करत होती, मला तिच्या घरी बोलवत होती. तिलासुद्धा हवं होतं की आज मी घाटात यावं. या दोघांनी जाळं विणलं, मी त्या जाळ्यात अलगद अडकलो.

मी डोळे उघडले, तशा वेदना सुरु झाल्या. पण मला मरायचं नव्हतं. असं मरणं तर अजिबात नको...
मी कसातरी, धडपडत, हळूहळू, झाडांचा आधार घेऊन रांगत होतो, वर चढत होतो. पाऊस थांबला होता. चिखल झाला होता. त्यामुळे घसरून खाली पडत होतो. परत रांगत होतो, पुढे सरकत होतो. चिखलाने बरबटलो होतो. तोच चिखल जखमांवर लावला, तसं रक्त थांबलं. वेदना सहन केल्या. डावा हात हलवता येत नव्हता, सुजत चालला होता. बहुतेक मोडला असावा. डाव्या डोळ्याने दिसत नव्हतं, उजव्या डोळ्याने पुसट दिसत होतं. प्रत्येक पावलागणिक पाठीतून वेदनेची सणक डोक्यात शिरत होती, डोकं बधिर करत होती, म्हणून किंचाळत होतो. पण ओरडल्यामुळे आणखी थकवा येत होता, म्हणून एका झाडाची बारीक काडी मोडली, दातांच्या मध्ये ठेवली. वेदना वाढल्या की तोंडातली काडी जोरात चावायचो. त्या काडीचा कडूशार रस कसातरी गिळत होतो.. मरायचं नाही.. आता फक्त मारायचं.

कसातरी घाटाच्या रस्त्यावर आलो, तसं बरं वाटलं. घाटाकडे बघितलं. कोणीच नव्हतं. आणखी थोड्या वेळाने सूर्योदय होईल, मग कोणीतरी मदत करेल... पण तेवढ्यात रस्त्याच्या कडेला कोसळलो, तसाच पडून राहिलो. काही वेळाने उठावं लागलं, कारण परत पाऊस सुरू झाला. स्वतःला सावरत उभा राहिलो. काही करून मला या घाटातून बाहेर पडायचं होतं. मी कुठे जाऊ? आधी सूड घेऊ? का दवाखान्यात जाऊ? आधी दवाखान्यात जायला हवं, म्हणून मी भरभर चालू लागलो. माझ्या एकाच पायात चप्पल होती, ती काढून फेकून दिली..

मी अनवाणी धावू लागलो, जोरात.. पण अचानक माझी मान डाव्या बाजूला कलंडली. सरळ होतं नव्हती. मानेमधल्या हाडाला काय झालं? दुखत तर नव्हतं. उजव्या हाताने मान सरळ करायचा प्रयत्न केला, पण ती वाकडीच राहिली. एका बाजूला कलंडली होती. सरळ काही होतं नव्हती. मी तसाच धावत राहिलो. धावताना लक्षात आलं की समोरून वेगात काहीतरी येत आहे... गाडी? ट्रक? पण मला दिसत कसं नाही? कारण वाकड्या मानेमुळे मला समोरच दिसतंच नव्हतं, मागचं दिसत होतं...
माझी मान..
माझ्या लक्षात आलं..
तसा मी धावायचो थांबलो..
ती गाडी माझ्या बाजूने निघून गेली..
माझ्या लक्षात आलं की मी हे सगळं आधी बघितलं आहे. हो.. त्या दिवशी घाटात एका मान मोडलेल्या माणसाला धावताना बघितलं, तो माणूस मीच होतो!! तेव्हा हा घाट मला माझं भविष्य दाखवत होता, पुढे होणाऱ्या संकटाची जाणीव करून देत होता.

हे लक्षात येताच मी खाली कोसळलो. दमलो होतो. आता उठता येणार नाही. मी डोळे मिटून घेतले, ते कायमचे...
घाटाला आणखी एक बळी मिळाला होता!

-चैतन्य रासकर
chaitanyaras@gmail.com

H

दिवाळी अंक २०१८

प्रतिक्रिया

तुषार काळभोर's picture

6 Nov 2018 - 9:34 pm | तुषार काळभोर

कडक!!

सविता००१'s picture

7 Nov 2018 - 7:24 am | सविता००१
साबु's picture

7 Nov 2018 - 2:08 pm | साबु

अफलातुन चैतन्य... +१

यशोधरा's picture

7 Nov 2018 - 2:38 pm | यशोधरा

ड्यांजर!!!

टर्मीनेटर's picture

7 Nov 2018 - 2:49 pm | टर्मीनेटर

रोमांचक कथा. शेवट मात्र अनपेक्षितरीत्या झाला.

सिरुसेरि's picture

8 Nov 2018 - 12:58 pm | सिरुसेरि

एकदम क ड क .

Jayant Naik's picture

8 Nov 2018 - 2:16 pm | Jayant Naik

आवडली कथा.

सौन्दर्य's picture

8 Nov 2018 - 10:29 pm | सौन्दर्य

एकदम छान कथा, आवडली.

नूतन सावंत's picture

8 Nov 2018 - 10:44 pm | नूतन सावंत
नूतन सावंत's picture

8 Nov 2018 - 10:45 pm | नूतन सावंत
चॅट्सवूड's picture

11 Nov 2018 - 12:09 pm | चॅट्सवूड

हे वाक्य अर्धच दिसत आहे

चॅट्सवूड's picture

11 Nov 2018 - 12:19 pm | चॅट्सवूड

सर्व वाचकांचे मनापासून धन्यवाद : ) प्रतिक्रिया वाचून छान वाटले, या प्रतिक्रियांमुळे नवीन लेखन करण्याचा उत्साह शतपटीने वाढतो.
मिपाच्या संपादक मंडळाचा मी मन:पूर्वक आभारी आहे, आपल्यामुळेच ही कथा उत्तम वाचकांपर्यंत पोहचली.

पद्मावति's picture

11 Nov 2018 - 11:52 pm | पद्मावति

जबरदस्त!!

प्राची अश्विनी's picture

12 Nov 2018 - 10:33 am | प्राची अश्विनी

+१११

दुर्गविहारी's picture

12 Nov 2018 - 11:07 am | दुर्गविहारी

कथेचा प्लॉट चांगला आहे, पण काही गोष्टी तार्किक द्रुष्ट्या पटत नाहीत. एकतर छोट्या गावात रहात असताना रूपेश-रेशमाचे प्रेमप्रकरण कथानायकाला समजणार नाही हे पटण्यासारखे नाही. ते ही ग्रूहित धरले तरी धोकादायक निपारी घाटात पावसाळी रात्री जाण्याचा प्रयत्न कथानायक करेल असे वाटत नाही.
असो. पहिला प्रयत्न असेल तर कच्चे दुवे बाजूला ठेउन उत्तम लिखाण करीत आहात, ईतकेच म्हणेन. आणखी लिहा. पु.ले. शु.

डॉ सुहास म्हात्रे's picture

13 Nov 2018 - 12:01 pm | डॉ सुहास म्हात्रे

मस्तं कथा, आवडली !

एमी's picture

18 Nov 2018 - 3:52 pm | एमी

मस्त आहे!
फोबिया सिनेमा आठवला.

चॅट्सवूड's picture

20 Nov 2018 - 12:34 pm | चॅट्सवूड

@पद्मावति @प्राची अश्विनी @डॉ सुहास म्हात्रे
मनापासून धन्यवाद :)

@दुर्गविहारी
आपण इतक्या आपुलकीने कथा वाचली, या बद्दल मनापासून आभार.
आपण सांगितलेल्या मुद्द्यांवर खालीप्रमाणे स्पष्टीकरण देतो.

१. रूपेश-रेशमाचे प्रेमप्रकरण जर कथानायकाला आधीच कळलं असतं, तर ही कथाच घडली नसती. रुपेश आणि रेश्मा हे प्रकरण लपवून ठेवण्यात यशस्वी झाले, त्यामुळेच त्यांना हा ट्रॅप करता आला, याची कबुली कथानायक शेवटी देतोच.
२. रुपेश ला मदत करावी या चांगल्या हेतूने कथानायक रात्री घाटात जातो, कथानायक "सुटकेस ठेवण्यासाठी मी घाटात आलो" असं स्पष्ट सांगतो.

@अॅमी
फोबिया सिनेमा बघितला आहे, आवडला होता.

खिलजि's picture

2 Jan 2019 - 8:18 pm | खिलजि

मस्त होती