ट्रायोपॉनिक्स : स्वयंपूर्ण अन्ननिर्मितीची गुरुकिल्ली

टर्मीनेटर's picture
टर्मीनेटर in दिवाळी अंक
6 Nov 2018 - 12:00 am

H

हायड्रोपॉनिक्स + ॲक्वापॉनिक्स + बायोपॉनिक्स = ट्रायोपॉनिक्स
अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या मानवाच्या तीन मूलभूत गरजा मानल्या जातात. अन्नपाण्यावाचून जीवन नाही आणि निर्जिवांना वस्त्र आणि निवारा यांची गरज नसल्याने मानवाच्या उत्पत्तीपासून त्यांत अन्नाचा क्रमांक सर्वात पहिलाच राहिला आहे.
अगदी सुरुवातीच्या काळातला (आदि)मानव हाताने जमीन उकरून कंदमुळे व झाडावरची फळे तोडून खाऊन आपली अन्नाची गरज भागवत होता. हळूहळू लहानसहान प्राणी पकडून व नंतर दगडापासून आणि लाकडापासून हत्यारे बनवायला शिकल्यावर मग मध्यम आकाराच्या प्राण्यांची शिकार करून त्यांचे मांसभक्षण करून आपली पोटाची खळगी भरू लागला.
सुमारे दहा ते बारा हजार वर्षांपूर्वी शेतीचे तंत्र अवगत झाल्यावर धान्यनिर्मिती आणि अतिरिक्त धान्याची साठवण करू लागल्यावर मग त्याची अन्नासाठीची वणवण संपुष्टात येऊन तो जरा स्थिरस्थावर झाला.farming
शेतीचे तंत्र उत्तरोत्तर विकसित होत गेले, तशी सुरुवातीला नैसर्गिकरीत्या उपलब्ध संसाधनांचा वापर करून सेंद्रिय (Organic) पद्धतीने केली जाणारी शेती नंतरच्या काळात रसायनांचा शोध लागल्यावर अन्नधान्याच्या व भाजीपाल्याच्या भरघोस उत्पादनासाठी रासायनिक खतांचा वापर करून केली जाऊ लागली. त्याच्या जोडीला कीड नियंत्रणासाठी रासायनिक कीटकनाशकांचाही वापर होऊ लागला.
रासायनिक खतांच्या व कीटकनाशकांच्या वापराने पिकवलेला भाजीपाला, फळे आणि धान्ये खाल्ल्याने मनुष्याच्या आरोग्यावर घातक परिणाम होतात. नक्की काय काय आणि किती दुष्परिणाम होतात हा संशोधनाचा आणि वादाचा मुद्दा असला, तरी कमी क्षेत्रात उत्पादनवाढीसाठी रासायनिक द्रव्यांच्या अशा अतिरेकी आणि अविवेकी वापराने जमिनीत वनस्पतींच्या सुदृढ वाढीसाठी नैसर्गिकरीत्या उपलब्ध असलेली पोषकद्रव्ये वनस्पतींच्या मुळांद्वारे शोषली जाण्यासाठी त्यांच्यावर प्रक्रिया करणाऱ्या सूक्ष्मजीवांचा नाश होतो, हे सत्य आहे. पर्यायाने सुपीक जमिनीचे रूपांतर नापीक जमिनीत होते, तसेच ही (विषारी) रासायनिक द्रव्ये भूजलात मिसळून त्याद्वारे विहिरी, तळी, बोअर वेल व नद्या यांचे पाणीही प्रदूषित होते. असे प्रदूषित पाणी प्यायल्याने माणसांचे आणि जनावरांचे आरोग्य धोक्यात येते.
रसायनांचा वापर टाळून नैसर्गिक खते - उदा., शेणखत, कंपोस्ट खत, हिरवळीचे खत इत्यादी आणि कीड निवारणासाठी जंतुनाशक गुण असलेल्या कडुलिंबाचा पाला, पपईचा पाला, रुई, एरंड, कण्हेर, सीताफळ, करंज, धोत्रा, टणटणी, निरगुडी, गुळवेल अशा विविध वनस्पतींच्या पानांचा अर्क (दशपर्णी अर्क) तसेच मिरची, तंबाखू, गोमूत्र किंवा गोमूत्रापासून तयार केलेली औषधे यांची फवारणी करून केली जाणारी शेती सेंद्रिय शेती (Organic Farming) म्हणून ओळखली जाते.
सेंद्रिय शेतीद्वारे पिकवलेला भाजीपाला, फळे आणि धान्ये पौष्टिक, चवीला अधिक चांगली व आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर असली, तरी रासायनिक पदार्थ वापरून केलेल्या शेतीपेक्षा (तुलनात्मक कमी उत्पादनामुळे) त्यांचा उत्पादनखर्च जास्त असतो. त्यामुळे त्यांच्या किमतीही थोड्या जास्त असतात.
शेतीसाठी रासायनिक वा सेंद्रिय यापैकी कोणतीही पद्धत वापरली, तरी दुष्काळ, अतिवृष्टी किंवा गारपीट अशा नैसर्गिक आपत्ती आल्या तर अखेरीस हाती पडणारे शेतमालाचे उत्पादन किती असेल, ह्याची कोणतीही शाश्वती नसल्याने शेतकऱ्यांमध्ये वाढत असलेली उदासीनता, कर्जबाजारीपणा, त्यातून होणाऱ्या त्यांच्या आत्महत्या तसेच वाढते औद्योगिकीकरण आणि शहरीकरण ह्यामुळे कमी होत चाललेले लागवडीखालील क्षेत्र ह्या सगळ्याची परिणती भविष्यात देशाच्या अन्नधान्याच्या गरजेपेक्षा कमी होत जाणाऱ्या उत्पादनामुळे अनियंत्रित भाववाढीत होण्याचा मोठा धोका उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मागल्या काही दशकांत तंत्रज्ञानाच्या मदतीने कमीत कमी पाण्यात आणि जागेत ‘मातीविना शेती’ करण्याच्या पद्धती काही देशांमध्ये विकसित झाल्या आहेत. इस्रायलसारख्या वाळवंटी प्रदेशातील शेतीसाठी प्रतिकूल हवामान, पाण्याची कमतरता आणि अल्प शेतीयोग्य जमीन लाभलेल्या ह्या देशाने सर्व नैसर्गिक कमतरतांवर मात करून अन्ननिर्मिती करण्यात नेत्रदीपक कामगिरी बजावली आहे. देशाच्या एकूण गरजेपैकी ९५% अन्नपदार्थांच्या निर्मितीत स्वावलंबित्व मिळवतानाच ताज्या भाज्या आणि फळे इतर देशांना निर्यात करण्याची क्षमताही प्राप्त केली आहे.
कोणत्याही वनस्पतींच्या वाढीसाठी तीन गोष्टींची आवश्यकता असते - पाणी, पोषक द्रव्ये आणि प्रकाश. या तिन्ही गोष्टी योग्य प्रमाणात मिळाल्या तर त्यांची वाढ जोमाने होते. माती ही रोपांच्या वाढीसाठी आवश्यक नसून वनस्पती तिच्यात आपली मुळे खोलवर पसरून आधार मिळवण्यासाठी आणि त्यांच्याद्वारे जमिनीतील पाणी आणि इतर पोषक द्रव्ये शोषून घेण्यासाठी तिचा उपयोग करतात. तर पाने प्रकाशातील ऊर्जेचा वापर करून त्यापासून वनस्पतीच्या वाढीसाठी अन्ननिर्मिती करतात.
मातीविना शेतीमध्ये मूळ तंत्र जवळपास सारखेच असले, तरी ती मुख्यत्वे तीन प्रकारांनी केली जाते. तसेच त्यात डीप वॉटर कल्चर, डच बकेट सिस्टिम, व्हर्टिकल टॉवर सिस्टिम, रेल सिस्टिम आणि ग्रो बेड सिस्टिम अशा विविध पद्धतीही आहेत. रोपांच्या मुळांना ऑक्सिजनचा पुरवठा करणारे एअर पंप आणि पुनर्वापरासाठी पाणी खेळते ठेवण्यासाठी लागणारे पंप चालवण्यासाठी विजेची गरज भासते, ती सौर ऊर्जेतून भागवली जाते. ह्या तिन्ही प्रकारांत लागणाऱ्या पाण्याचे प्रमाण पारंपरिक शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याच्या केवळ १०% असते. तसेच बंदिस्त वातावरणात केली गेल्यामुळे बाष्पीभवन होऊन वाया जाणाऱ्या पाण्याचे प्रमाणही जवळपास ०% राहते.
मातीविना शेतीचे तीन मुख्य प्रकार :

  1. हायड्रोपॉनिक्स
  2. ॲक्वापॉनिक्स
  3. बायोपॉनिक्स

हायड्रोपॉनिक्स :
हायड्रोपॉनिक्स तंत्रामध्ये एअर पंपाद्वारे ऑक्सिजन आणि वनस्पतींच्या वाढीसाठी आवश्यक असलेली पोषक द्रव्ये मिसळलेल्या पाण्यात त्यांची मुळे बुडालेली राहतील अशा पद्धतीने ठेवून वरून पानांना प्रकाश मिळेल अशी व्यवस्था केली जाते. परंतु ह्या तंत्रात पाण्यात मिसळण्यासाठी वापरली जाणारी पोषक द्रव्ये बहुतांश रासायनिक द्रव्ये असून ती थोडी खर्चीक असल्याने शेतमालाच्या व्यावसायिक उत्पादनासाठी हा प्रकार व्यवहार्य ठरत नाही. तसेच ही उत्पादने सेंद्रिय म्हणूनही गणली जात नाहीत. मात्र कोणतीही रासायनिक द्रव्ये न वापरता, अल्प जागेत गहू अथवा मका यापासून केवळ ८ ते १० दिवसांत कोंबड्या-शेळ्या-मेंढ्या-गायी-म्हशी-घोड्यांसाठी बाराही महिने सेंद्रिय पौष्टिक हिरवा चारा तयार करण्यासाठी ही पद्धत अत्यंत किफायतशीर आहे.(हायड्रोपॉनिक्स तंत्राचा वापर करून चारा निर्मिती)ॲक्वापॉनिक्स:
हायड्रोपॉनिक्स + ॲक्वाकल्चर = ॲक्वापॉनिक्स.
हायड्रोपॉनिक्समध्ये पाण्यात मिसळावी लागणारी रासायनिक पोषकद्रव्ये टाळून सेंद्रिय पद्धतीने उत्पादन घेण्यासाठी त्याला मत्स्य-पालनाची जोड ह्या तंत्रात देण्यात आली. या पद्धतीत शेतीबरोबर मासेपालनही केले जात असून दुहेरी उत्पादन घेतले जाते. ह्या तंत्रातली रोचक बाब म्हणजे मासे ठेवलेल्या टाक्यांमधील पाणी डीप वॉटर कल्चर, डच बकेट, व्हर्टिकल टॉवर, रेल आणि ग्रो बेड अशा विविध सिस्टिम्समधून फिरवून खेळते ठेवून बायो फिल्टरमधून गाळले जाऊन परत माशांच्या टाकीत सोडले जाते. ह्या पद्धतीत माशांचे मलमूत्र, त्यांनी न खाल्लेले वा अर्धवट खाल्लेले अन्न अशा विघटनशील पदार्थांवर सूक्ष्मजीवांकडून प्रक्रिया होऊन वनस्पतींसाठी पोषक द्रव्ये निर्माण होतात. पाण्यातले माशांसाठी हानिकारक असलेले घटक वनस्पतींसाठी मात्र पोषक असल्याने त्या मुळांद्वारे ते शोषून घेतात. बायोफिल्टरमधून गाळले जाऊन स्वच्छ (माशांसाठी योग्य) झालेले पाणी परत टाकीत सोडल्याने तेच पाणी सतत न बदलता रीसर्क्युलेट करत राहिल्याने पाण्याची फार मोठी बचत होते.(ॲक्वापॉनिक्स.)(ॲक्वापॉनिक्स.) बायोपॉनिक्स :
ॲक्वापॉनिक्सप्रमाणेच केवळ माशांच्या टाकीतले पाणी न वापरता त्याच्या जोडीला विविध पाणवनस्पती, शेवाळे, मासे वाढवण्यासाठी वापरलेले पाणी, बायोगॅस निर्मिती प्रक्रियेतून बाहेर पडणारी डायजेस्टेड स्लरी ह्यांचा वापर या पद्धतीत केला जातो. जवळपास सर्व पालेभाज्या आणि काही फळझाडे व फुलझाडे यांसाठी ॲक्वापॉनिक्स तंत्र आदर्श असले, तरी मोठ्या फळभाज्यांसाठी व फुलांसाठी आवश्यक पोषकद्रव्ये त्यात कमी असतात. बायोपॉनिक्स पद्धतीत ही कमतरता भरून निघते. ॲक्वापॉनिक्सप्रमाणेच बायोपॉनिक्सचा वापर करून १००% सेंद्रिय शेतमालाचे उत्पादन घेणे शक्य होते.
हायड्रोपॉनिक्स, ॲक्वापॉनिक्स आणि बायोपॉनिक्स या तिन्ही प्रकारांत वापरल्या जाणाऱ्या विविध पद्धतींची काही छायाचित्रे.(डीप वॉटर कल्चर १) (डीप वॉटर कल्चर २) (डीप वॉटर कल्चर ३) (डीप वॉटर कल्चर ४)(डच बकेट सिस्टिम)(डच बकेट सिस्टिम) (डच बकेट सिस्टिम) (डच बकेट सिस्टिम)(डच बकेट सिस्टिम)(डच बकेट सिस्टिम) (व्हर्टिकल टॉवर सिस्टिम)(व्हर्टीकल टॉवर सिस्टिम)(व्हर्टिकल टॉवर सिस्टिम)(व्हर्टिकल टॉवर सिस्टिम) (व्हर्टिकल टॉवर सिस्टिम)(व्हर्टिकल टॉवर सिस्टिम) (रेल सिस्टिम)(रेल सिस्टिम) (रेल सिस्टिम)(रेल सिस्टिम) (ग्रो बेड सिस्टिम)(ग्रो बेड सिस्टिम) (ग्रो बेड सिस्टिम) (ग्रो बेड सिस्टिम)तंत्रज्ञानाचा वापर करून बाराही महिने बंदिस्त पण नियंत्रित वातावरणात हायड्रोपॉनिक्स, ॲक्वापॉनिक्स आणि बायोपॉनिक्स या तिन्ही पद्धतींचा वापर करून केली जाणारी ही आधुनिक शेती भारतासारख्या प्रचंड लोकसंख्येच्या पण निसर्गाचा चांगला वरदहस्त लाभलेल्या देशासाठी नक्कीच फायदेशीर ठरेल.
अशा प्रकारच्या शेतीला गायी, म्हशी, शेळ्या-मेंढ्या असे उपयुक्त पशू आणि कोंबड्या, लावरी यासारखे पक्षिपालन आणि पारंपरिक शेतीची जोड दिली, तर समाज दर्जेदार अन्न-धान्य, फळे, फुले, औषधी वनस्पती तसेच दूध व दही, लोणी, पनीर, चीज यासारखे दुग्धजन्य पदार्थ, मांस, मासे, अंडी अशा जवळपास सर्वच खाद्यपदार्थांच्या निर्मितीत स्वयंपूर्ण होऊ शकतो.
रेन वॉटर हार्वेस्टिंगद्वारे पावसाच्या पाण्याची साठवण, त्याचा वापर करून ट्रायोपॉनिक्स आणि पारंपरिक शेतीतून पशुधनासाठी चारा निर्मिती, टाकाऊ बायोमास आणि जनावरांच्या मल-मूत्र यापासून बायोगॅसची निर्मिती, त्या बायोगॅसपासून आणि सौर ऊर्जेपासून प्रकल्पासाठी आवश्यक असलेली वीजनिर्मिती, बायोगॅस निर्मिती प्रक्रियेतून तयार होणाऱ्या डायजेस्टेड स्लरीचा उत्कृष्ट खत म्हणून आणि बायोपॉनिक्ससाठी वापर, सकस, दर्जेदार शेतमालाचे व अन्य खाद्यपदार्थांचे उत्पादन असे हे स्वयंचलित चक्र आहे.
अशा प्रकारचे आधुनिक व्यावसायिक शेती प्रकल्प उभारणीसाठी सुरुवातीला मोठा खर्च येत असल्याने हे एकट्या-दुकट्या माणसाचे काम नक्कीच नाही. शेतीची आणि बागकामाची आवड असणाऱ्या अनेक व्यक्ती एकत्र आल्या आणि स्वतःच्या कुटुंबाची दर्जेदार अन्न-धान्य, फळे, फुले, दुध, दुग्धजन्य पदार्थ, मांस, मासे, अंडी अशा कित्येक अन्न घटकांची गरज भागवण्यासाठी असे प्रकल्प उभारण्यात त्यांनी आपापला खारीचा वाटा (आर्थिक) उचलला, तर ती गोष्ट अशक्य नक्कीच नाही.
ट्रायोपॉनिक्स प्रकल्पांच्या उभारणीसाठी महाराष्ट्रातून एका व्यावसायिक पद्धतीच्या चळवळीला सुरुवात होत असून सुदैवाने अगदी सुरुवातीपासूनच त्या कार्यात सहभागी होण्याची संधी मला मिळाली आहे. ह्या चळवळीची पुढील वाटचाल आणि त्यात सहभागी होण्याविषयीची माहिती लवकरच आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी कटिबद्ध आहे.
(लेखातील सर्व चित्रे जालावरून साभार.)
संजय भावे.
(उर्फ ‘टर्मीनेटर’)

H

दिवाळी अंक २०१८

प्रतिक्रिया

कुमार१'s picture

6 Nov 2018 - 11:44 am | कुमार१

सुंदर सादरीकरण.
उपक्रमास शुभेच्छा !

यशोधरा's picture

6 Nov 2018 - 12:35 pm | यशोधरा

माहितीपूर्ण, सुरेख लेख.
वाचनखूण साठवली आहे.

कुमार१ आणि यशोधराजी आपले मनःपूर्वक आभार.

मेधा..'s picture

6 Nov 2018 - 1:22 pm | मेधा..

या विषयावर अजुन माहिती हवी आहे.एक प्रोजेक्ट समोर आहे त्या साठी चौकशी करत आहे.मला व्यक्तिगत सम्पर्क करु शकाल का?

टर्मीनेटर's picture

6 Nov 2018 - 1:52 pm | टर्मीनेटर

धन्यवाद मेधाजी. व्यक्तिगत सम्पर्क जरूर करू शकतो.

अप्रतिम माहितीपूर्ण लेख.
आवडला

टर्मीनेटर's picture

6 Nov 2018 - 5:02 pm | टर्मीनेटर

धन्यवाद. तुम्ही सांगितल्या प्रमाणे नुसते अभ्या.. म्हणायचा प्रयास केलाय :)

सुधीर कांदळकर's picture

6 Nov 2018 - 5:09 pm | सुधीर कांदळकर

उपयुक्त माहिती मुद्देसूदपणे आणि आकर्षकपणे मांडली आहे. लेख खूपच आवडला.

सेंद्रिय शेतीद्वारे पिकवलेला भाजीपाला, फळे आणि धान्ये पौष्टिक, चवीला अधिक चांगली व आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर असली, तरी रासायनिक पदार्थ वापरून केलेल्या शेतीपेक्षा (तुलनात्मक कमी उत्पादनामुळे) त्यांचा उत्पादनखर्च जास्त असतो. त्यामुळे त्यांच्या किमतीही थोड्या जास्त असतात.

या परिच्छेदाशी माझी जोरदार असहमती.

शेणखत, कंपोस्ट खत, हिरवळीचे खत इत्यादी आणि कीड निवारणासाठी जंतुनाशक गुण असलेल्या कडुलिंबाचा पाला, पपईचा पाला, रुई, एरंड, कण्हेर, सीताफळ, करंज, धोत्रा, टणटणी, निरगुडी, गुळवेल अशा विविध वनस्पतींच्या पानांचा अर्क (दशपर्णी अर्क) तसेच मिरची, तंबाखू, गोमूत्र किंवा गोमूत्रापासून तयार केलेली औषधे

या वस्तू शेतकर्‍याला जवळजवळ विनामूल्य उपलब्ध होतात. या वस्तूंचे रासायनिक पर्याय फार खर्चिक आणि शेतकर्‍याला आर्थिक नुकसानात टाकणारे आहेत. या सेंद्रीय शेती पद्धतीवर विशेष संशोधन करून आयुष्य वेचलेले महाराष्ट्रातील अमरावतीचे पद्मश्री सुभाष पाळेकर हे रासायनिक खत निर्मिती उद्योग लॉबीला आणि रासायनिक कीटकनाशक निर्मिती उद्योगाला तसेच महाराष्ट्रातल्या सरकारला जरी नकोसे असले तरी सेंद्रीय शेती पद्धतीचा अवलंब आंध्र प्रदेश सरकारने स्वीकारला आहे. त्यांच्या पद्मश्रीची शिफारस देखील आंध्र प्रदेश सरकारने केली होती. हिमाचल प्रदेश तसेच आसाम सरकारने देखील यात स्वारस्य दाखविले आहे. 'झीरो बजेट नैसर्गिक शेती' हे शीर्षकच या पद्धतीच्या आर्थिक अंदाजपत्रकाची कल्पना देणारे आहे. या पद्धतीचे बहुतेक प्रयोग १०० टक्के यशस्वी झालेले आहेत. आपल्या ज्ञानाबद्दल मी शंका उपस्थित करीत नाही परंतु माझी आपणांस नम्र विनंती आहे की जसा आपण लेखातील पद्धतींचा अभ्यास करून आपले (निर्विवादपणे योग्य असे) मत बनवले आहे तसेच सेंद्रीय पद्धतीचा, कन्ट्रोल्ड ट्रायल्सचा पण शास्त्रीय अभ्यास करून, जमिनीतील सूक्ष्मजीवशास्त्राचा, जीवरसायनशास्त्राचा, वनस्पतीशरीरशास्त्राचा पद्धतशीर अभ्यास करून अमृतपाण्यासारखी अशास्त्रीय थोतांडे टाळूनच आपले मत बनवा.

टर्मीनेटर's picture

6 Nov 2018 - 6:48 pm | टर्मीनेटर

पद्मश्री सुभाष पाळेकरांचे 'झीरो बजेट नैसर्गिक शेती' ह्या विषयावरचे काही व्हीडीओज युट्यूब वर पहिले आहेत, तसेच काही लेखही वाचले आहेत. सैंद्रीय पद्धतीने पारंपारिक शेती मधील त्यांच्या कार्याविषयी आणि ज्ञानाविषयी कोणतीही शंका नाही. ते ग्रेट आहेत, त्यांच्या सल्ल्याने देशातील कितीतरी शेतकरी झीरो बजेट नैसर्गिक शेती पद्धतीचा अवलंब करत आहेत हि गोष्टही आशादायक आहे. पण तो पारंपारिक शेतीचा भाग असल्याने तो विषय तंत्रज्ञानाचा वापर करून केल्या जाणाऱ्या ट्रायोपॉनिक्स पेक्षा भिन्न आहे. त्याबद्दलही नक्कीच जास्त अभ्यास करण्यात येईल.
तसेच दुकानांतून विकला जाणारा सैंद्रीय पद्धतीने पिकवलेला भाजीपाला चढ्या किमतीने विकला जाण्यामागे रासायनिक पदार्थ वापरून केलेल्या शेतीपेक्षा (तुलनात्मक कमी उत्पादनामुळे) त्यांचा उत्पादनखर्च जास्त असल्याचे कारणच दिले जाते.

हॅाटेल्सना लागणारी फळे/ भाजी यासाठी उत्तम आहे.
धान्य,कडधान्य ,तेलबिया याकरता नाही.

टर्मीनेटर's picture

6 Nov 2018 - 6:55 pm | टर्मीनेटर

आपण घरातही फळे/भाजी खातो कि :)

धान्य,कडधान्य ,तेलबिया याकरता नाही.

तांदूळ, मका हि धान्ये पिकवली जातात ह्या पद्धतीत.
कडधान्य ,तेलबियां साठी सहमत, अर्थात त्यावरही संशोधन चालूच आहे.

तसं नाही म्हणत. खूप उत्पादन करावं लागतं त्यासाठी. शंभर,चारशे,हजार,दहा हजार चौरस मिटरस असे वाढते कृत्रिम क्षेत्र बनवणे सर्वांनाच परवडणार नाही. शिवाय रस्ता वाहतुक खात्रीशिर लागते.

टर्मीनेटर's picture

8 Nov 2018 - 7:27 pm | टर्मीनेटर

+१००
म्हणूनच लेखात म्हंटलय

अशा प्रकारचे आधुनिक व्यावसायिक शेती प्रकल्प उभारणीसाठी सुरुवातीला मोठा खर्च येत असल्याने हे एकट्या-दुकट्या माणसाचे काम नक्कीच नाही. शेतीची आणि बागकामाची आवड असणाऱ्या अनेक व्यक्ती एकत्र आल्या आणि स्वतःच्या कुटुंबाची दर्जेदार अन्न-धान्य, फळे, फुले, दुध, दुग्धजन्य पदार्थ, मांस, मासे, अंडी अशा कित्येक अन्न घटकांची गरज भागवण्यासाठी असे प्रकल्प उभारण्यात त्यांनी आपापला खारीचा वाटा (आर्थिक) उचलला, तर ती गोष्ट अशक्य नक्कीच नाही.

सविता००१'s picture

7 Nov 2018 - 7:14 am | सविता००१

फोटो तर झकास

सरनौबत's picture

7 Nov 2018 - 10:11 am | सरनौबत

अतिशय सुंदर, माहितीपूर्ण वाचनीय लेख!

सविता००१ आणि सरनौबत आपले मनःपूर्वक आभार.

डँबिस००७'s picture

7 Nov 2018 - 1:22 pm | डँबिस००७

अतिशय सुंदर सादरीकरण , चांगल्या प्रकारे संकलीत केलेली माहितीपूर्ण वाचनीय लेख !
ह्या विषयावर काम करायचे आहे, मला व्यक्तिगत सम्पर्क करु शकाल का?

मुक्त विहारि's picture

7 Nov 2018 - 10:07 pm | मुक्त विहारि

उपयुक्त माहिती बद्दल मनापासून धन्यवाद...

प्राची अश्विनी's picture

8 Nov 2018 - 7:16 am | प्राची अश्विनी

छान माहितीपूर्ण लेख.

प्रचेतस's picture

8 Nov 2018 - 8:58 am | प्रचेतस

बरीच नवीन माहिती मिळाली.

मित्रहो's picture

8 Nov 2018 - 9:26 am | मित्रहो

नवीन माहीती मिळाली.
तुमच्या प्रोजेक्ट विषयी वाचायला आवडेल. तसेच साधारणतः काय गुंतवणुक लागते याची माहीती मिळाली असती तर आणखीन बरे झाले असते. विशेषतः भाजी आणि फळांसाठी.

डँबिस००७, मुक्त विहारि, प्राची अश्विनी, प्रचेतस, मित्रहो आपणा सर्वांचे मनःपूर्वक आभार.
@ मेधा, डँबिस००७ आणि मित्रहो तुमच्याशी लवकरच संपर्क साधतो, धन्यवाद.

vcdatrange's picture

8 Nov 2018 - 3:12 pm | vcdatrange

मजा आली वाचायला. . .

पण छोटे मॉडेल वापरले जात नाही. . विदर्भ तसेच पश्चिम महाराष्ट्रात सुमारे ५० शेतकर्‍यांकडे चारा उत्पादनासाठी हायड्रोपोनिक्स बसवलं, पण सुरुवातीचे कुतुहल संपल्यावर गुंडाळुन ठेवले त्यांनी. .

बदल स्विकारायचा कंट‍ाळा हे महत्वाचे कारण. .

टर्मीनेटर's picture

8 Nov 2018 - 7:19 pm | टर्मीनेटर

पण छोटे मॉडेल वापरले जात नाही. . विदर्भ तसेच पश्चिम महाराष्ट्रात सुमारे ५० शेतकर्‍यांकडे चारा उत्पादनासाठी हायड्रोपोनिक्स बसवलं, पण सुरुवातीचे कुतुहल संपल्यावर गुंडाळुन ठेवले त्यांनी. .

बदल स्विकारायचा कंट‍ाळा हे महत्वाचे कारण. .

अगदी खरं आहे. बदल स्वीकारण्याची मानसिक तयारी नसणे हे एक कारण आहेच, त्याबरोबर पाण्याचे व्य्स्वस्थापन नसणे तसेच ऑटोमेशन नसल्याने दर दोन चार तासांनी स्वतः स्प्रिंकलर्स सुरु करण्याचा कंटाळा ह्या गोष्टीही आहेत. छोटे मॉडेल वापरण्यात ह्या त्रुटी प्रामुख्याने आढळतात.

डॉ सुहास म्हात्रे's picture

8 Nov 2018 - 9:02 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर उपयुक्त माहिती !

तुमच्या प्रकल्पांच्या यशाकरिता शुभेच्छा !

टर्मीनेटर's picture

11 Nov 2018 - 11:20 am | टर्मीनेटर

धन्यवाद डॉक्टर. _/\_

ज्योति अळवणी's picture

9 Nov 2018 - 6:23 pm | ज्योति अळवणी

खूप माहितीपूर्ण लेख आहे. वाचताना वाटत होतं आपण देखील प्रयोग करून बघावा.

अनिंद्य's picture

9 Nov 2018 - 8:36 pm | अनिंद्य

उत्तम माहिती आणि उपक्रम.
ह्याविषयी होत असलेल्या प्रगतीबद्दल अधिक वाचायला आवडेल, अवश्य लिहा.

टर्मीनेटर's picture

11 Nov 2018 - 11:21 am | टर्मीनेटर

धन्यवाद ज्योतीजी आणि अनिंद्य.

टर्मीनेटर's picture

11 Nov 2018 - 11:31 am | टर्मीनेटर

कदाचित काही तांत्रिक समस्येमुळे आत्ता व्य.नि. ना उत्तरे जात नाहीयेत. काही वेळानंतर पुन्हा प्रयत्न करतो.

झेन's picture

11 Nov 2018 - 1:39 pm | झेन

शेतीचा वैयक्तिक अनुभव नाही पण तंत्रज्ञानाचा वापर करून प्रॅक्टिकल, फिजिबल काही तरी मूलभूत होणे फार गरजेचे वाटते. जामुळे रासायनिक दुष्परिणाम टाळले जातील आणि पारंपरिक शेतकऱ्यांचे दुष्टचक्र थांबेल. अजून खूप वाचायला आवडेल.

जाता जाता. . . ते टर्मीनेटर ऐवजी जर्मीनेटर कसे वाटेल :-)

टर्मीनेटर's picture

12 Nov 2018 - 10:44 am | टर्मीनेटर

सविस्तर माहिती लवकरच सर्वांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न सुरु आहे.

जाता जाता. . . ते टर्मीनेटर ऐवजी जर्मीनेटर कसे वाटेल :-)

लेखातील विषयाशी सुसंगत कोटी खूप आवडली :)
धन्यवाद.

दुर्गविहारी's picture

12 Nov 2018 - 4:00 pm | दुर्गविहारी

खुपच छान माहिती. हि ईतरत्र सोशल मेडीयावर शेअर करतो. कदाचित प्रयोगशील व्यक्तींपर्यंत पोहचेल.

गुल्लू दादा's picture

15 Nov 2018 - 9:19 am | गुल्लू दादा

खुप खुप आभारी आहे.

धन्यवाद दुर्गविहारी आणि गुल्लु दादा _/\_

पद्मावति's picture

15 Nov 2018 - 6:26 pm | पद्मावति

सुंदर आणि माहीतीपुर्ण लेख.

टर्मीनेटर's picture

20 Nov 2018 - 10:48 am | टर्मीनेटर

धन्यवाद पद्मावतिजी. _/\_

शान्तिप्रिय's picture

20 Nov 2018 - 4:25 pm | शान्तिप्रिय

माहितीपूर्ण लेख

टर्मीनेटर's picture

24 Nov 2018 - 4:34 pm | टर्मीनेटर

धन्यवाद शान्तिप्रिय.

व्यवसायिक स्तरावर शेतीमाल उत्पादन करायचे असेल तर ट्रायोपॉनिक्स हा योग्य पर्याय आहे आणि जिथे शेतीयोग्य जमिन/वातावरण नाही, तिथे हा पर्याय फायदेशीर आहे.
बाकी आपल्या इथे हा पर्याय फक्त परदेशी भाजीपाल्यासाठी वापरला तर उपयुक्त ठरेल. कारण ट्रायपॉनिक्स उत्पादित देशी भाजीपाल्याला तेवढी किंमत मिळणार नाही.

टर्मीनेटर's picture

1 Dec 2018 - 1:22 pm | टर्मीनेटर

व्यवसायिक स्तरावर (मोठ्याप्रमाणात) ट्रायपॉनिक्स पद्धतीने देशी भाजीपाला उत्पादित केला तर उत्पादन खर्च कमी येत असल्याने किमती न वाढवताही नफा मिळू शकतो.

चित्रगुप्त's picture

29 Nov 2018 - 5:24 am | चित्रगुप्त

उत्तम माहितीपूर्ण लेख. हे वाचून आठवले, अलिकडे अमेरिकेत - विशेषतः तिथल्या भारतीय-पटेल स्टोर्स मधे - अगदी साच्यातून काढल्यासारखे एकसारखे, गुळगुळीत, चकचकीत जणूकाय प्लास्टिकचे वाटणारे आणि अजिबात वेडेवाकडेपणा नसलेले दुधी भोपळ्यांचे ढीग बघायला मिळतात. हा काय प्रकार आहे ? मला तर ते घेण्याची भितीच वाटते. याउलट 'ऑर्गॅनिक' दुकानातून मिळणार्‍या प्रत्येक फळ-भाजीचा आकार, रंग वेगवेगळा असतो, आकारही लहान आणि वेडावाकडा असतो, त्यामुळे ते 'नैसर्गिक' वाटतात.

जागु's picture

29 Nov 2018 - 4:03 pm | जागु

छान माहितीपूर्ण लेख.

@ चित्रगुप्त: आपण पाहिलेले दुधी भोपळे कदाचित जेनेटीकली मॉडीफाईड (GM) पद्धतीने पिकवले असण्याची शक्यता आहे.

याउलट 'ऑर्गॅनिक' दुकानातून मिळणार्‍या प्रत्येक फळ-भाजीचा आकार, रंग वेगवेगळा असतो, आकारही लहान आणि वेडावाकडा असतो, त्यामुळे ते 'नैसर्गिक' वाटतात.

+१००