गावात गेलो की नारायण पेठेतल्या दामले काकांची भेट ठरलेली. दोन दिवसांपूर्वी गेलो तेव्हाही त्यांच्या घरी गेलो. पण त्यांच्याशी बोलणे मात्र शक्य झाले नाही कारण आम्ही बोलायला लागलो की मागून डॉल्बीचा मोठ-मोठ्याने आवाज यायचा.
शेवटी दामले काकांनी मला खुणेनीच बाहेर जाऊया असे म्हटले म्हणून मी दारात जाऊन थांबलो.
ते आतल्या खोलीत गेले आणि दोन मिनिटांनी अत्यंत त्रासिक चेहऱ्याने बाहेर आले. आज एकूणच दामले काका चिंताग्रस्त दिसत होते. मग आम्ही खाली पार्किंगमधे आलो. दामले काकांच्या बिल्डिंगच्या समोर एक सरळ रस्ता जातो त्या रस्त्याने काही अंतर चाललो. तिथे अबू निवास नावाचं एक चहाचं दुकान दिसलं. तिथे जाऊन बसलो. तिथेही फारशी गर्दी नव्हती आणि मुख्य म्हणजे लाऊड स्पीकरचा आवाज नव्हता.
तिथे एका टेबलवर समोरासमोर बसलो आणि गप्पांना सुरुवात झाली.
मी सहज बोलून गेलो. सध्या सगळीकडे रस्ते अडवणारे मांडव टाकलेत. वाहतुकीचा खोळंबा होतो आणि मोठ मोठ्याने लावूड स्पीकरही लावलेले असतात. केवढं ध्वनी प्रदूषण सुरू असतं. "ध्वनी प्रदूषण" हा शब्द ऐकल्याबरोबर दामले काका माझ्याशी प्रचंड उसळून बोलू लागले. मला म्हणाले, "हो हो तुम्हाला फक्त आमच्याच सणांच्या वेळचं ध्वनी प्रदूषण दिसतं. आमचेच लाऊड स्पीकर तुम्हाला खूपतात. "त्यां"च्या भोंग्यांबद्दल तुम्ही कधीच बोलणार नाही. तिथे मात्र शेपूट घालून बसणार"
पुढे म्हणाले, "या सगळ्यांना नुसतं लाडावून ठेवलंय. पाकिस्तान निर्माण झाला तेव्हाच यांना तिकडे पाठवून द्यायला हवं होतं"
दामले काका शिरा ताणताणून बोलत होते. तोंडाचा नुसता दांडपट्टा . . .
मग थांबले, समोरच्या ग्लासातलं पाणी प्यायले.
मी त्यांना विचारलं. मगाशी घरातून निघण्यापूर्वी आत काय करत होतात ?
ते म्हणाले, अरे गेले काही दिवस नातू आजारी आहे ना ! अधून मधून ताप येत राहतो त्याला.
त्यांचा नातू दीड वर्षाचा आहे.
मी म्हटलं मग आता कशी आहे त्याची तब्येत ?
ते म्हणाले कसलं काय ? बाहेर आवाज येतो म्हणून त्याला आतल्या खोलीत झोपवलंय. तिथेही आवाज येतो म्हणून दारं खिडक्या लावल्या. पण डॉल्बीचे हादरे जाणवतातच. मग दचकून जागा होतो आणि रडू लागतो.
ते राहतात त्या बिल्डिंगच्या मागे एक बखळ म्हणजे मोकळी जागा आहे. त्यामधे मांडव टाकलेला आहे. तिथे मोठ मोठ्याने डॉल्बी सुरू असतो. ही जागा कुणाची आहे माहित नाही पण ही जागा गेली कित्येक वर्षे आप्पा दरेकर वापरतो. आप्पा दरेकर हा तिथल्या नगरसेवकाचा राईट हॅन्ड. गेली 35 वर्षे नगरसेवक कोणीही असला तरी आप्पा त्याचा राईट हॅन्ड म्हणून काम करतो. हातगाडीवाले आणि इतर व्यावसायिकांकडून त्याला हप्ते मिळतात. जुने वाडे पाडून नवीन बिल्डिंग करायची असेल त्यावेळी काही भाडेकरू अडेलतट्टूपणा करतात. त्यांचंही आप्पा दरेकर समुपदेशन करतो.
मी म्हटलं तुम्हाला घरामधे आवाजाचा इतका त्रास होतो तर मग तुम्ही कम्प्लेंट का नाही करत ? निदान 100 नंबरला फोन करून कळवू तरी शकता ?
ते ऐकल्यावर दामले काका मला म्हणाले आप्पा विरुद्ध मी कसली कंप्लेंट करतोय. मी कंप्लेंट केलीये हे त्याला कळालं तर तो मला सोडेल का ? मर्डर नाही तर किमान हाफ मर्डर तरी नक्कीच करेल माझा. हे बोलत असताना दामले काकांनी खिशातला रुमाल काढला आणि घामाघूम झालेला आपला चेहरा पुसला.
ashutoshjog@yahoo.com
वास्तविक पाहता नारायण पेठेत ज्या भोंग्यांचा दूर दूर पर्यंत कुठलाही आवाज येत नाही त्याविरोधात दामले काका तावातावाने बोलतात. अमके फार माजलेत, तमक्यांना पाकिस्तानात पाठवलं पाहिजे वगैरे बोलून आपलं शौर्य दाखवतात.
पण आपल्या घराच्या बाजूलाच लागून असलेल्या डॉल्बी बद्दल कंप्लेंट करायच्या कल्पनेनेच त्यांना दरदरून घाम फुटतो.
मग मीही तो विषय फारसा न वाढवता तिथून उठलो. काऊंटरवर पैसे दिले आणि माझ्या पुढच्या कामांकरता निघून गेलो.
प्रतिक्रिया
25 Oct 2018 - 8:26 pm | मराठी कथालेखक
आवडलं