लेले आनंदले

कुमार जावडेकर's picture
कुमार जावडेकर in जनातलं, मनातलं
16 Sep 2018 - 12:34 pm

सचिन पिळगावकर आणि वसंत सबनीस जर लेले आजोबांना भेटले असते, तर 'अशी ही बनवाबनवी'च्या पूर्वार्धात दाखवलेल्या पुणेरी घरमालकाच्या पात्रात त्यांनी बदल केला असता. इतका प्रेमळ, आतिथ्यशील आणि विनोदी पुणेकर माझ्या तरी पाहण्यात नाही. (ही कथा काल्पनिक आहे. घटना, स्थळं आणि पात्रं प्रत्यक्षात आढळली तर केवळ योगायोगच समजू नये, अयोग्यही समजावं ही विनंती.) खुलासा - इतर पुणेकर प्रेमळ, आतिथ्यशील आणि विनोदीच असतात, लेले आजोबांइतके नसले तरी. ते स्वतः वर आणि पुण्यावर प्रेम करतात (कुण्या सोम्यागोम्या व्यक्ती किंवा शहरावर करत नाहीत), आतिथ्य वेळ पाहून करतात (म्हणजे दुपारचे एक ते चार आणि रात्री आठनंतरची वेळ टाळून) आणि त्यांचा विनोद पाट्या-पाट्यांमधून काळ्या दगडावरची रेघ म्हणून आपल्या दृष्टीस पडत असतो.

फक्त सबनीस / पिळगावकरांना हे का जाणवलं नाही हा खरा प्रश्न आहे. कदाचित, सचिन एक 'रीमेक'काढून चुकीची दुरुस्ती करतीलही. हल्ली रीमेक / सिक्वलची फॅशन आहे. ('संजू' चं नाव 'संजू बन गया जंटलमन' असं ठेवायला हवं होतं असं अलीकडेच राजू हिरानी म्हणाल्याचं कळतं. आता ते खरा संजय दत्त म्हणून उभा करण्यासाठी 'लगे रहो संजूभाई' आणतायत. त्यामध्ये तो 'खलनायक' होऊन 'मान्यता' पावेल असं दाखवण्याविषयी त्यांचा खल चालला आहे असंही ऐकण्यात आलं आहे.)

असो...माझी पुण्याबद्दलची, त्यातून तिथल्या माणसांबद्दलची आणि विशेषतः तिथे आपल्याला लाभणाऱ्या शेजाऱ्यांबद्दलची धाकधूक घालवण्याचं मोठं श्रेय लेले आजोबांना जातं. कार्तिकी एकादशीच्या दिवशी मी प्रथम त्यांना भेटलो होतो. मी सकाळी 'इंद्रायणी'त चांगला ऑम्लेट/कटलेटचा नाश्ता केलेला असूनही मला आजींनी आग्रहानं साबुदाण्याची खिचडी खायला घातली होती... आपल्या पुण्यातल्या मुक्कामाच्या पहिल्याच दिवशी उपासाच्या मुहुर्ताला न जुमानता कुणी मला खायला घातलं होतं ही माझी पुण्याई मी अत्यंत अभिमानाने अनुभवी लोकांना सांगितली आहे. किंबहुना मी ती तशी सांगावी हे लेले आजोबांनी तितक्याच हट्टानं मला बजावलं होतं.

"आता पुढच्या वेळी मटार-उसळ, वरण-भात आणि शिकरणीचा बेत करूया, " असं मी माझ्या त्यांच्या शेजारच्याच घरात आलेल्या सामानाचं स्वागत करायला जाण्यापूर्वी त्यांनी डोळे मिचकावत मला सांगितलं होतं.

"ह्यांचं काय ऐकतोस रे.... गंमत करतायत तुझी. स्वतः जाऊन श्रीखंड घेऊन येतील बघ ते चितळ्यांचं." आजी हसत म्हणाल्या होत्या....आणि खरंच, काही दिवसांनी, चक्क (चक्का नव्हे) चितळ्यांचं आम्रखंड, वर त्यात आजोबांनी स्वतः केळी, सफरचंद, द्राक्षं इत्यादी फळ घालून केलेलं 'फ्रूट सॅलड' खायचं भाग्य मला लाभलं होतं. आजोबांनाही मधुमेह असल्याचं आजींनी याच वेळी मला सांगितलं होतं... 'बनवाबनवी'शी अजून एक संबंध.

"तुझा नाही का रे इस्रायलला एखादा मित्र? " त्याच वेळी आजोबांनी मनातलं ओळखून मला विचारलं होतं; आणि वर लगेच मला सावध केलं होतं,

"मला फसवू शकणार नाहीस हं तू औषधांच्या बाबतीत. हिंदुस्थान अँटिबायोटिक्समध्ये नोकरीला होतो मी."

"तो कशाला फसवणार आहे तुम्हांला? त्याचीच बहुधा इथे येऊन फसगत झाल्यासारखी अवस्था झालीये," आजी माझी बाजू घेऊन म्हणाल्या होत्या. पण आजोबा स्वतःच्याच विनोदावर हसत होते.

... लेले आजोबांबद्दल अजून काही सांगण्याआधी आनंद दामले या वल्लीची ओळख करून घेणं भाग आहे. त्यांची माझी भेट होण्यासाठी तोच कारणीभूत ठरला होता. काही व्यक्ती काही पुण्यं अगदी बेमालूमपणे करून जातात, त्यातलंच त्याचं हे एक.

आत्ताही तो समोर आल्यामुळेच मला हे सगळं क्षणार्धात आठवलं होतं.

मी पुणं सोडल्यानंतर पहिल्यांदाच तो भेटत होता, तोही परदेशात. त्याला मी कुठूनही ओळखेन. अजूनही तेच केस, तोच भांग, आणि तीच (...ते पुढे येईल. ) आनंदची आणि माझी नजरानजर झाली तेव्हा आम्ही मँचेस्टरच्या ट्रॅफोर्ड सेंटर या मॉलमध्ये शिरत होतो. मी 'आनंद!' म्हणून आनंदाश्चर्यानं ओरडलो. त्यानं ओळखल्यासारखं करून फक्त 'भेटू' अशी खूण केली.

आनंद असा अचानक उगवल्याचा मला झालेला आनंद त्याच्या पहिल्याच वाक्यानं मावळला.

"किती वर्षांनी."

तो फार तुटक बोलतो. तो जरी बरोबर बोलत असला तरी (तो नेहमी बरोबरच बोलतो) मला उगाचच त्याचं बोलणं विचित्र वाटत आलं आहे. वास्तविक मीही 'किती वर्षांनी!?' हेच म्हणार होतो, पण त्यात उद्गारवाचक, प्रश्नचिन्ह इत्यादी भाव आले असते. आनंदची सगळी वाक्यं (म्हणजे मोजके शब्द) पूर्णविरामात संपतात, जणू स्थितप्रज्ञानं म्हटल्यासारखी.... आणि तरीही तो दुसऱ्याच्या आधी आपलं बोलून टाकू शकतो.

हा मनुष्य कॉलेजच्या पहिल्या वर्षापासून माझ्या वसतिगृहाच्या खोलीत, वर्गात आणि राशीत वास्तव्य करून बसला होता. अगदी आमचं अभियांत्रिकीचं शिक्षण होईपर्यंत. हॉस्टेलचे काही नियम आणि शिस्ती असतात. उदाहरणार्थ, पार्टनरला कधीही 'कुठे गेला होतास' असं न विचारणं, खोलीतला पसारा न आवरणं, (मुंबईत राहत असल्यामुळे) अंगावर अतिशय मोजके कपडे घालणं इत्यादी. पण आनंद कधीच यांत सामील झाला नाही. रात्री दहा वाजले की 'उशीर झाला' असं म्हणायचा. मला उगाचच अपराध्यासारखं वाटायचं. मग मी शेजारच्या खोल्यांमधल्या मित्रांबरोबर इराण्याकडे चहा प्यायला पळायचो आणि बाहेर गॅलरीत अभ्यासाच्या नावाखाली बारा वाजेपर्यंत तरी मस्त्या करायचो. भल्या पहाटे पाचला त्याचा गजर वाजायचा आणि 'सकाळी चांगला अभ्यास होतो' हे मला दिवसातून एकदा तरी ऐकायला लागायचं.

"पुढच्या वर्षीची रूम मिळाली आहे. तू उजवीकडची कॉट घे," या वाक्यानं तो प्रत्येक वर्षी माझी विकेट काढून मला फक्त क्षेत्ररक्षक म्हणून घेतल्यासारखा पार्टनर म्हणून नवीन रूममध्ये वर्षभर ठेवायचा.

एकदाच मी 'का?' असं विचारलं होतं. त्या 'का?' मध्ये अनेक प्रश्न होते. उदाहरणार्थ, पण 'आपणच का पार्टनर्स?', किंवा 'हीच रूम का घेतलीस?', किंवा 'उजवीकडचीच बेड का?'. त्यानं फक्त तिसऱ्याच प्रश्नाचं उत्तर दिलं होतं.

"तू डाव्या कुशीवर कमी घोरतोस."

असंच मी त्याला कोकणात आमच्या घरी सुट्टीत नेलं होतं. तो शुद्ध शाकाहारी असल्यामुळे मासे वगैरे खायचा प्रश्नच नव्हता. पण त्याला आंबे खाताना बघतानाही आंब्यांचं भाग्य चांगलं असावं असं काहीसं मला त्याच्याकडे बघून वाटलं होतं.

पुण्याला एकदा त्याच्या घरी जायचा सुदिनही माझ्यावर आला होता, तो नोकरीला लागल्यावर. वर्गमैत्रिणीचं लग्न हा एक नशिबाचा भोग 'सुयोग मंगल कार्यालया'त आम्ही साहिला होता. (पुण्यात प्रसंग या शब्दाला सुयोग हा पर्याय वापरतात हे तेव्हा कळलं होतं.) पण आनंदला त्याचं काही सोयर-सुतक नसावं, तो पंगतीतल्या जेवणातली अळूची भाजी, मठ्ठा आणि जिलबी खाताना समाधी लावल्यासारखा दिसत होता. शाळेत असताना साने गुरुजींचं 'यती की पती? ' हे पुस्तक मी वाचलं होतं. इथे एकीकडे आपली पती होण्याची संधी एक हिरावून नेतेय आणि दुसरीकडे आपल्यात यती होण्याचंही कसं धारिष्ट्य नाहीये हे दुसरा दाखवून देतोय अशा दुहेरी न्यूनगंडांत मी 'मसालेभात पाहिजे का?' हा वाढप्याचा क्षणभंगुर पण त्यातल्या त्यात उपयुक्त प्रश्न हेरू न शकल्यामुळे (म्हणजे तो वाढायचं नाही या निर्धारानं धावत जाताना त्याला वेळीच अडवता न आल्यामुळे) अर्धपोटी उठलो होतो.

'संध्याकाळी ये' असं सांगून शेजारचा आनंद यानंतर अचानक गायब झाला होता. मी उगाचच भिकारदास मारुतीपासून दगडूशेठ गणपतीपर्यंत-जमिनीवरच्या (रस्त्यात पडलेले-सापडलेले अनेक धरून), पाण्यातल्या (सारसबाग... ते पाणी रसदार असतं का - पंजाब हे पंच आब तसं सहा रस ते सारस -, असा माझ्या मनात वायफळ प्रश्न आला होता. एक गुजराथी मित्र या बागेला 'सरस छे' असं म्हणाला होता) आणि आकाशातल्या (पर्वतीलाही जाऊन आलो) देवांना कौल लावत घेत वेळ घालवून त्याच्याकडे सात-साडेसातला पोहोचलो होतो.

पुण्यातली भाषा त्याच्यासोबत राहूनही मला फारशी आकलन झाली नाहीये हे मला या वेळेला अगदी नेमकं कळलं. "जेवायचं आहे ना?" या त्याच्या आईचा प्रश्नाला "जेवण व्ह्यायचं आहे ना? " असं न समजता मी "पुरेसं झालंय ना खाणं येण्यापूर्वीच?' असं चुकीचं समजलो होतो.

"म्हणजे दुपारी लग्नाचं जेवण... " असं अर्धवट उत्तर देऊन आपल्या, अगदी पायावर नसला तरी, पोटावर धोंडा मारून घेतला होता.

माणसानं पुण्यात कधी संकोच करायचा नसतो ही शिकवण म्या पापभीरू पामराला तेव्हा मिळाली होती.

"किती पदार्थं असतात ना हल्ली पंगतीत" हेही वर ऐकायला मिळालं होतं.

"चहा घेऊया. " या आनंदच्या वाक्यानं मला पुनः ट्रॅफोर्ड सेंटरच्या जमिनीवर (का आकाशात) आणलं, आम्ही गच्चीवरच्या कार पार्कमध्ये होतो आणि आता दारात भेटत होतो. मँचेस्टरमध्ये असं पुणेरी अस्तराचं मराठी वाक्य इतक्या वर्षांनी ऐकून मला धन्य धन्य वाटलं. पुण्याचं पाणी आणि मराठी दोन्ही निराळं. इतर महाराष्ट्रात सकाळ होते, पण पुण्यात 'सकाळ' येतो. 'सकाळ झाली का' असं विचारण्याऐवजी पुण्यात 'सकाळ आला का' हा प्रश्न आपल्याला उठल्या उठल्याच पडतो. आणि असे आपण सतत पडतच असतो पुण्यात.

"इकडे कुठे?" या विचारांत चालत असताना मी आनंदला विचारलं.

"थोडी खरेदी. " तीच जुनी जीवघेणी सवय. ह्याचं नाव स्वानंद का नाही ठेवलं त्याच्या जन्मदात्यांनी?

"इंग्लंडमध्ये कसा आलास? " मी माझ्या चुकीची दुरुस्ती केली.

"तीन महिने डेप्युटेशन. " निदान आता तरी सरळ उत्तर मिळालं म्हणून मी खूष. मला विचारल्यावर वाटलं होतं तो 'विमानानं' म्हणून सांगेल असं.

"मी इथेच आहे गेली दहा वर्षं". तो विचारेल की नाही याची खात्री नव्हती म्हणून मी सांगून टाकलं.

"मला कंटाळा आला तीन आठवड्यांत. " त्यानं पुनः मला चकवलं.

"मला नाही आला." मी आता याला घाबरत नाही असं मी स्वतःला बजावलं.

"वन टी प्लीज, विथ हॉट मिल्क, " त्यानं ऑर्डर दिली. पुनः एकदा शहाण्यानं एका दगडात तीन पक्षी मारले. (किंवा एका चेंडूत तीन दांड्या गुल केल्या. ) माझ्या म्हणण्याकडे दुर्लक्ष, इंग्रजांना आपल्या अस्स्ल चहाची शिकवण आणि सर्वांत महत्वाचं म्हणजे अजूनही हॉस्टेलमधल्यासारखी फक्त स्वतःच्या चहाची ऑर्डर!

मी माझी कॉफी घेतली आणि आम्ही एका कोपऱ्यात स्थानापन्न झालो. प्रत्येकानं आपापल्या पेयाचा एक घोट गिळंकृत केला आणि -

"लेले आजोबा कसे आहेत? " हे मी आणि तो "लेले आजोबा गेले रे..." हे वाक्य दोन्ही आम्ही एकदमच बोललो...

"काय सांगतोस? " मी धक्का बसून म्हटलं. त्याच्या बोलण्यातला "रे" हा सूर ऐकून त्यालाही काही भावना आहेत याची मला पहिल्यांदाच इतक्या वर्षांनी जाणीव झाली.

"गूढच आहे सगळं. " तो पुनः कोड्यात म्हणाला.

"आनंद, हे तरी आता नीट सांगशील का? " मी कळकळीनं म्हणालो.

"वेळ लागेल. तुझं इथलं काम झालं की जेवायला भेटू."

संध्याकाळचे सुमारे सहा वाजले होते. तिथल्या 'Apple' च्या दुकानात माझा आय-फोन दुरुस्त करायला देऊन मी त्यांनी बोलवायची वाट बघत बसलो. 'इथेच येतो' सांगून आनंद निघून गेला.

आनंद लेले आजोबांच्याच इमारतीत राहत असे. आनंद पहिल्या मजल्यावर तर आजोबा तिसऱ्या. पहिल्या वेळी त्याच्या घरी गेलो होतो तेव्हा मला हे माहिती नव्हतं; पण माझी जेव्हा पुण्याला बदली झाली तेव्हा त्याच्या इमारतीतही एक घर बघितलं होतं. खरं तर त्यानंच ते सुचवलं होतं.

"वरच्या लेले आजोबांना फ्लॅट भाड्यानं द्यायचा आहे. "

कोथरूडच्या डहाणूकर कॉलनीतल्या त्या इमारतीत तिसऱ्या मजल्यावर दोनच फ्लॅटस होते. एक आजोबांचा आणि दुसरा त्यांचाच, पण भाड्यानं देण्याचा. मी दारावरची पाटी वाचून बेल वाजवली होती. "श्री. र. स. लेले आणि सौ. स. र. लेले" अशी सुवर्णाक्षरात (तुळशीबागेत अशी पितळी अक्षरं करून मिळतात हे नंतर कळलं) लिहिलेली अक्षरं न्याहाळात आणि काय नावं असावीत असा विचार करत असतानाच आजोबांनी आतून मारलेली हाक ऐकू आली होती. "येतोय, तोपर्यंत दारावरची पाटी वाचा आणि हसा. "

गोलगरगरीत चेहेरा (आणि पोट), घारे डोळे, गोरापान रंग, स्वच्छ टक्कल, भरपूर मिशी, कानाच्या आजूबाजूचे पांढरे केस, काळ्या जाड काड्यांचा चष्मा आणि या सगळ्याला साजेसे असे पांढरे कपडे. आनंदसुद्धा असाच पांढरी बंडी आणि लेंगा घालायचा पण आजोबांना ते अगदी शोभून दिसत होते.

"रमेश सचिन लेले... तुम्हांला सचिन रमेश तेंडुलकर ऐकायची सवय असणार. आमचं उलटं आहे." त्यांनी माझं स्वागत केलं होतं, घर दाखवायला बाहेर पडता पडता.

"वडिलांचं खरं नाव सचिंद्र असं होतं. पण मी लाडानं सचिन म्हणतो." त्यांनी पुढे टिप्पणी केली.

"आणि आजींचं - म्हणजे हीचं - नाव सरिता आहे, ". मनकवडेपणा आजोबांमध्ये पुरेपूर भरला होता.

"माझा मुलगा उदय. अर्थात -"

"'उ. र. लेले, " मी म्हटलं. आता त्यांनी मला बोलायला संधी दिली होती.

"चूक. 'उरलेले लेले'. एकच मुलगा आहे मला! ... अर्थात, त्याला आता एकच बायको आणि त्यांना एकच मुलगाही आहे."

एवढ्या बडबडीत घर बघून झाल्यावर मी "लवकरच कळवतो" असं सांगितलं होतं. त्यावर तेवढ्यात बाहेर आलेल्या आजी "ह्यांचा दंगा सहन होणार असेल तरच ये हो" असं म्हणाल्या होत्या.

मी थोड्याच दिवसांत तिथे मुक्काम हलवला. लेले आजोबा, आजी, आनंद आणि मी ब्रिज खेळायला रात्री त्यांच्या घरी जमायला लागलो. ह्या एकाच जागी आनंद रात्रीचे दहा वाजले तर 'उशीर झाला' असं म्हणत नसे. (पुणेकर पुणेकरांशी पुण्यात फार वेगळे वागतात.) 'चला जेवणं झाली, आता उद्या उठायचं लायसन्स काढू' असं म्हणून आजोबा एकीकडे त्यांच्या काचेच्या दोन मोठ्या बरण्यांतल्या गोळ्या काढायचे, एकीतल्या स्वतः घ्यायचे आणि दुसरीतल्या आजींना द्यायचे. तोपर्यंत आम्ही पत्ते वाटायचो.

आजोबांचा मुलगा उदय आणि त्याची बायको उमा आणि चि. उन्मेश यायचे तेव्हा आम्ही बदाम सत्ती खेळायचो. ते मुंबईत असायचे. आनंदचं आणि या सर्वांचं काहीतरी नातं होतं. पण मीदेखील त्यांच्या घरचाच झालो होतो.

आनंद डमी असला की मी हरायचं, मी डमी असलो की आनंदनी मात्र जिंकायचं ही आमची रोजची रीत झाली होती; आजोबा तर कायम जास्तच हात बोलून, "मला वाटलं झाले असते" असं हरल्यावर आजींना म्हणायचे.

"सिली मिस्टेक्स करतोस. " आनंद मला म्हणायचा. बाकी डावाबद्दलच्या चर्चेत त्याचा सहभाग नसे.

"पुणेकर आहेस." हे आजोबा मग आनंदला बोलून दाखवायचे.

"आम्ही 'कसले' पुणेकर आणि हे 'कसलेले' पुणेकर, " हे वर माझ्याकडे वळून म्हणायचे. "माझ्या 'लेले'तला एक 'ले' त्याला दिलाय. त्यामुळे मी एकदम लेचापेचा पुणेकर झालो आहे. 'ले'चा पेच... आलं ना लक्षात?"

"आजोबा, तुम्ही एवढे मजेत कसे असता नेहेमी? " मी विचारायचो.

"सांगेन कधीतरी. " ते स्वतःशीच हसायचे. त्यांनी सांगितलं कधीच नाही.

"बसूया." ... आनंदच्या या शब्दांनी मी पुनः भानावर आलो. माझा फोनही दुरुस्त झाला होता. आम्ही निघालो आणि एका त्यातल्या त्यात शांत खाद्यगृहात जेवायला बसलो.

"बोल."

आनंद प्रथमच जरा सविस्तर बोलला.

"आजोबांना मधुमेह होता, तरी रोज गोड खायचे आणि रात्री औषधाच्या गोळ्या घ्यायचे, स्वतःच्या आणि शिवाय आजींनाही द्यायचे. आठवतं?"

"हो! "

"गेल्या वर्षी त्यांचा शहात्तरावा वाढदिवस झाला. पंच्याहत्तरी उदयनं जोरात केली होती. शहात्तरावा वाढदिवस मात्र घरगुती होता. रात्री उदय, मी आणि आजी-आजोबा ब्रिज खेळायला बसलो होतो. तुझी खूप आठवण काढायचे ते. "

"अरे, मलाही... "

"तू विचारायचास त्यांना, 'एवढे कसे मजेत असता तुम्ही नेहेमी? ' असं."

"त्यांनी कधीच उत्तर नाही दिलं. "

"त्या दिवशी दिलं. म्हणाले ही की तुलाही ते कधीतरी सांगणार होते; पण कधी योग येईल काय माहिती."

"काय म्हणाले? "

"त्यांनी त्यांची बरणी दाखवली. खरं-खोटं माहिती नाही; पण म्हणाले की त्यांत एक गोळी अशी आहे की ती घेतल्यावर ते दुसऱ्या दिवशी सकाळी उठणार नाहीत. आणि गंमत म्हणजे त्या असंख्य गोळ्यांमधली कोणती गोळी ती आहे हे त्यांना माहिती नाहीये. त्यामुळे ते प्रत्येक दिवस शेवटचा असल्यासारखा संपूर्ण आनंदात जगतात."

मला बसल्या जागीच अंगावर शहारा आला.

"तुला खरं वाटलं हे? तू त्यांना परावृत्त करायचा प्रयत्न नाही केलास? "

"उदय औषधं टाकून द्यायला निघाला होता. पण आजी म्हणाल्या लगेच आजोबांना,'उगाचच काहीतरी सांगू नका मुलांना' म्हणून. आजोबाही 'कशी गंमत केली' असं म्हणाले, आणि वर 'अरे, हा माझा स्वभाव आहे, दुसरं काय? मी माझ्या पद्धतीनं जगणार. अशी कारणं थोडीच सांगता येतात मजेत जगण्याची?' असं म्हणून त्यांनी तो विषय संपवला. "

"यानंतर काही दिवस मी त्यांच्यावर पाळत ठेवून होतो. उदयशीही बोलायचो रोज. त्यानं त्या बरण्या उलट्या पालट्या करून कुठली गोळी वेगळी दिसतेय का वगैरेही बघितलं होतं. मी दर सकाळी काही तरी कारणासाठी वर जाऊन यायचो. दोन-तीन महिने असेच गेले. मग माझं असं जाणं थोडं कमी झालं. त्यांनाही संशय यायचा.....आणि अचानक एका सकाळी उठलेच नाहीत."

माझा अजूनही ऐकतानाच थरकाप होत होता.

"डॉक्टरांनी सर्टिफिकेट दिलं. आजींनी स्पष्ट ताकीद दिली होती - 'उगाच पोस्ट मॉर्टम' वगैरे विचारू नका म्हणून."

दोघेही काही वेळ एकमेकांकडे हतबलपणे बघत होतो. जेवण बाजूला तसंच होतं.

"आणि आजी? " मी विचारलं.

"त्या आणि त्यांची औषधांची बरणी दोन्ही शाबूत आहेत. रोज त्यातली एक गोळी घेतात."

मी काही बोलणार या आधीच तो म्हणाला -

"त्यांनी बजावलंय अनेकदा. 'औषधं माझी आहेत. तुम्ही रोज थोडेच येणार आहात बदलायला ? ' असं."

"भयंकर आहे. " मी म्हटलं.

"गूढच आहे. " तो पुनः म्हणाला.

"मग? " मी विचारलं.

"मग काय."

त्या तीन महिन्यांच्या आनंदच्या मुक्कामात आम्ही अनेकदा भेटलो. एक-दोनवेळा उदयशीही स्काइपवर बोललो. आनंद निघायच्या दिवशी सकाळी उदयचा 'What's App'वर निरोप आला.

"काल रात्री झोपेत आईला देवाज्ञा झाली. आत्ताच पुण्याला पोहोचलो."

- कुमार जावडेकर

विनोदलेखप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

आनन्दा's picture

16 Sep 2018 - 2:10 pm | आनन्दा

नि:शब्द

डॉ सुहास म्हात्रे's picture

16 Sep 2018 - 3:35 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुरुवात छान आहे. शेवट भारी असा तरी कसा म्हणावा ?!

नाखु's picture

16 Sep 2018 - 6:56 pm | नाखु

कथा

ऋणानुबंधाच्या गाठी

बापरे.. ही खरी गोष्ट नाही ना?

कंजूस's picture

16 Sep 2018 - 5:45 pm | कंजूस

टोचलेली कथा.

कुमार जावडेकर's picture

17 Sep 2018 - 2:09 am | कुमार जावडेकर

प्रतिसादांबद्दल धन्यवाद... कथा /व्यक्ती काल्पनिक आहेत. (फमँचेस्टर, मुंबई आणि मँचेस्टर खरे आहेत.:))

कुमार जावडेकर's picture

17 Sep 2018 - 2:10 am | कुमार जावडेकर

फक्त पुणे, मुंबई आणि मँचेस्टर असं म्हणायचं होतं:)

यशोधरा's picture

17 Sep 2018 - 11:55 am | यशोधरा

ओह, मग ठीक.
उगाच त्या आजी आजोबांना मारून टाकले ते!

अथांग आकाश's picture

17 Sep 2018 - 9:40 am | अथांग आकाश

कथा खुप आवडली!

pill

सिरुसेरि's picture

17 Sep 2018 - 10:22 am | सिरुसेरि

मजेशीर लेखन .

संजय पाटिल's picture

17 Sep 2018 - 11:05 am | संजय पाटिल

आनंदी जिवनाचं रहस्य... चटका लाऊन गेलं!
लेखनशैली आवडली!

अनन्त्_यात्री's picture

17 Sep 2018 - 12:39 pm | अनन्त्_यात्री

गोळ्या असाव्यात ज्यांना expiry date / नाव नसते व खराब न होता बरणीत साठवून ठेवता येतात?

एक गूढ इशारा ,, सर्वांनाच . यशस्वी जीवनाचा मंत्र , पुढचा क्षण कसा आहे त्यापेक्षा आहे तो क्षण सुखात व्यतीत करा .. छान

प्रमोद देर्देकर's picture

17 Sep 2018 - 7:33 pm | प्रमोद देर्देकर

मिश्किल लेखन आवडलं . शेवटचा ट्विस्ट जबरी .