सह्याद्रीतील शब्दचित्रे - भाग २

स्वच्छंदी_मनोज's picture
स्वच्छंदी_मनोज in भटकंती
24 Jul 2018 - 10:45 am

पहील्या भागात मला माझ्या भटकंती दरम्यान भेटलेल्या माणसांविषयी, दिसलेल्या गावांविषयी, सह्याद्री विषयी लिहीले. या भागात अजून काही शब्दचित्रे:
पहील्या भागाची ही लिंक

----------------

शब्दचित्र चौथे: संतोष जंगम - मु. पो. चकदेव पर्वत किवा वळवण गाव किंवा पुणे किंवा मुंबई किंवा कुठेही

वर्ष बहुदा २०१४. वार्षिक मेगा रेंज ट्रेक ठरलेला. थोडासा अवघड, दुर्गम भागात. पहील्या दिवशीचा मुक्काम चकदेव पायथ्याच्या वळवण गावात करायचे प्लॅनिंग होते. कुणाकडे ते ठरले नव्हते. तसे वळवण गावात कोणालाच ओळखत नव्हतो. पण ट्रेक मित्र योगेश (पुलं जसे अगणित वश्यांना ओळखतात त्याप्रमाणे मी देखील चिक्कार योगेशना ओळखतो पण आपला ह्यातला रे....कल्याण वाला.. :) ) कडून चकदेवच्या संतोषचा नंबर मिळाला आणि त्याला कॉल केला. पहील्या कॉलमध्येच कळले की हा माणूस हरहुन्नरी असणार. आहेच तसा तो. बहुढंगी व्यक्तीमत्वाचा.

त्याच्याशी बोलताना ठरले होते की आम्ही चकदेवला वस्ती न करता वळवणला करतो आहे ते उत्तम आहे कारण संतोषचे चकदेवला मुळ मोठे घर आहेच पण वळवणलाही त्याने नवीन घर बांधले आहे. आता चकदेव आहे उंचावर आणि वळवण आहे पायथ्याशी. पण त्याला, वैनीला, ताईला त्याचे काही नाही. आपण जसे सहज नाक्यावर जाऊन येतो तशी हे लोक चढ उतार करतात. दररोज.. किमान दोन वेळा.. आमच्या ट्रेकच्या आधी त्याच्याशी बोलणे झाल्याप्रमाणे आम्ही नवीमोरणी गावातून त्याच्या घरी वळवणला जाणार होतो. संध्याकाळ होणार होती. पण कसचे काय, कोयनेच्या जंगलात गुरफटून वाटेचा गुंतावळा सोडवता सोडवता नवी मोरणीला पोचायला ७.३० वाजले. अंदाज होता की इथून वळवण अंतर ३ किमी असेल ते चालत जाऊ (तसे पायाचे तुकडेच पडायचे बाकी होते. चालत कसे जाणार होतो देवाला ठाऊक :) ) पण उतरल्यावर कळले की इथून वळवण किमान ६ किमी आहे. आम्ही धक्क्याने तिथेच बसलो. ठार अंधार पडला होता. आमचा बोटवाला परत अकल्प्यात निघून गेला सो तोही सहारा निघून गेला होता. शेवटी सतत येणार्‍या/जाणार्‍या एक नेटवर्क काडीवरून संतोषला फोन लावला. बोलणे असे झाले -

मी: हॅलो, संतोष?
संतोषः हा बोलतोय
मी: मी मनोज बोलतोय रे
संतोषः बोला दादा
मी: अरे मी आत्ता पोचलोय मोरणीत. प्रचंड थकलोय. आता वळवण पर्यंत चालूच.....
(कट). नेटवर्क गायब...

करता काय पायावर धोंडा किंवा धोंड्यावर पाय काहीही म्हणा आम्हाला आज कसेही वळवणला पोचणे आवश्यकच होते कारण आमचे पुण्याचे दोघे सकाळी आम्हाला वळवणला भेटणार होते (त्यांना खोपीवरून रघूवीर घाटातून वर यायला संतोषनेच गाडी करून दिली होती :)) आम्ही पुढे महीमंडण चकदेव करून कोकणात उतरणार होतो. तसेच पाय ओढत पुढे निघालो. अंदाजे १० मि. चाललो असेन तर समोरून एक महींद्रा मॅक्स आली आणि त्यातून चक्क संतोषच उतरला. आम्ही उडालोच. म्हटले कसे काय तर म्हणाला की तुम्ही बोलला तेव्हाच कळले की हे खुप दमले असणार तेव्हा त्याच वेळी खोपितून येणार्‍या एका जीपला थांबवून आम्हाला घ्यायला आला होता. जीप घरबांधकामाच्या सामानाने खचाखच भरली होती तर आतले सामान माणसे त्याच्या घरी ठेवून आम्हाला न्यायला रिकामी जीप घेऊन आला होता. त्याच्या घरी पोचायला ८.३० झाले. थंडी रंगात यायला लागली होती. प्रचंड गारठा. घरी पोचलो तर बादलीभरून गरम पाणी. आहा. सुखच... पैसे टाका, जेवा आणि निघाच्या आजच्या जमान्यात हे असे काही कुणासाठी स्वतःहून न सांगता करणे हाच एक दुर्मीळ गुण झालाय. संतोषकडे असे अनेक दुर्मीळ गुण आहेत.

रात्री फक्कड पिठले भाकरी जेवून सकाळी गरमागरम पोहे खाऊन आम्ही महीमंडणकडे निघालो. किल्ला करून जेव्हा शिंदीतून चकदेवला त्याच्या घरी गेलो तेव्हा तो, वैनी अगोदरच हजर होत्या (वैनी तर पहाटे ५ ला वळवणहून चकदेवला आल्या होत्या). मस्तपैकी त्याच्या घरापुढच्या सारवलेल्या अंगणात बैठक मारली, त्याच्या बाबांबरोबर गप्पा मारल्या. चकदेव हा जावळीतला सप्तशिवपुरीतला दुसरा उंच डोंगर. वरती प्राचीन दगडी शिवमंदीर. एकूणच परीसर वेड लावणारा. ह्याच डोंगराला असणार्‍या शिडीने कोकणात उतरणे हा एक अप्रतीम थरार आहे. दुपारी त्याच्या घरून निघालो पण कोकणात आंबीवलीला उतरायला संध्याकाळ झाली. जराश्यानेच बस चुकली आणि आम्ही तिथेच अडकून पडण्याची शक्यता निर्माण झाली. पण आम्हाला तर कसेही करून त्या रात्री रसाळगडावर पोचायचे होतेच. मग संतोषला फोन लावला. त्याने गावातल्या भरतशेट ला फोन लावला (त्याचे शाळा सोबती). मग काम झाले भरतशेटच्या किराणा दुकानावर जातोय तो एका टेंपोची सोय त्यानी करून दिली आणि आम्ही रसाळगडावर पोचू शकलो.

असा हा जगमित्र संतोष नंतरही मला मदतीला आला. आमच्या दुसर्‍या एका ट्रेकला त्यानेच एका माणसाला गाठून दिले त्यामुळे आमचा तो ट्रेक उत्तम झाला. फक्त एवढेच नव्हे तर वळवण घाटाने उतरायच्या वेळेला घाटाच्या सुरुवातीपर्यंत आला. वळवण, शिंदी, चकदेवच नव्हे तर त्या रहाळात, पंचक्रोशीत त्याला बराच मान आहे. एकतर हे सगळे जन्माला येताना नाळेबरोबर गळ्यात वारकरी माळही घालून येतात त्यामुळे सगळे जंगम कट्टर शाकाहारी. तसाच संतोषही. त्यामुळे त्याचे काही अडत नाही. पण नुसताच चकदेवच्या चौकेश्वरचा जंगम अशी ओळख ठेवता, सगळ्या जंगम समाजाचे धार्मीक विधी माहीत असणारा, त्याकरीता पंचक्रोशीच नव्हे तर मुंबई, पुणे सगळीकडे फिरणारा आणि मुख्य म्हणजे एक पाय घरात असेल तर एक पाय मदती करता कायम घराबाहेर असणारा अशी काहीशी त्याची ओळख आहे.

त्याच्या घरी जायला फार काय करावे लागत नाही. त्याला फोन करायचा, आणि सांगायचे येतोय. बस्स झाले. तो नसला तरी वैनी असतेच (बाबा दोन वर्षांपुर्वी दिवाळीच्या वेळेला वारले आणि ताई हल्ली पुण्याला शिकायला असते) तेवढे आपल्याला पुरते. मस्त त्याच्या वळवणच्या किंवा चकदेवच्या घरासमोरच्या मांडवाखाली सारवलेल्या अंगणात चटईवर बसून गफ्फा हाणायच्या. थंडी असेल तर कुडकुडायचे, पाउस असेल तर भिजायचे पण एकदातरी जायलाच पाहीजे अश्या भागात गेलो तर एकदातरी भेटायलाच पाहीजे अश्या संतोषला भेटल्याशिवाय परत यायचे नाही.

सगळे काही गुडी गुडी नसते किंवा सगळे काही पिक्चर पर्फेक्ट नसते तसे हल्ली संतोषच्याही मध्ये थोडासा बदल होतोय की काय असे वाटायला शंका/जागा आहे. पुर्वी कधीही मोबदल्याची भाषा स्वतःहून न करणारा हळूहळू पैश्याची भाषा बोलणार कि काय असे वाटायला लागणारे एक दोन किस्से त्याच्या बरोबर घडलेत. काळाच्या रेट्याबरोबर त्यानेही बदलावे की नाही हा त्याचा प्रश्ण आहे पण हा बदल त्याच्या होणार्‍या पुणे/मुंबई हया शहरी वार्‍यांतून होऊ नये असे वाटते. शहराचीच, पैश्याचीच भाषा जर ऐकायला मिळणार असेल तर चकदेव काय किंवा चांदीवली काय, वळवण काय किंवा वागळे इस्टेट काय... सगळेच सारखे... नाही का? असो.. चकदेवचा चौकेश्वर समर्थ आहे.

---------------------

मागच्या चार शब्दचित्रांमध्ये मला ट्रे़कींगदरम्यान भेटलेल्या, भावलेल्या काही लोकांवर लिहीले. आज काय आणि कुणावरती लिहावे असा विचार करत होतो त्याच दरम्यान whatsapp ग्रुपवर सायकलींग बीआरएम वर चर्चा चालली होती. माझा एक ट्रेक मित्र सिदने १२०० किमी च्या ब्रेवेमध्ये भाग घेतला होता पण त्याला १४ मि.च्या उशीराने ब्रेवे सोडावी लागली :( . विचार करा गेले काही तास तुम्ही ६००+ किमी पाऊसपाण्यात, बेशीस्त, बेदरकार ट्रॅफीक मधून (इथे ह्याबद्दल अत्यंत प्रचलीत शब्द लिहायचा मोह होतोय पण तो टाळतो :) ) अल्मोस्ट नॉनस्टॉप सायकल चालवत आलाय आणि समोरचा माणुस तुम्हाला तुम्ही ८४० सेकंद लेट झाला म्हणून डिएनेफ म्हटतो. अत्यंत निराशावादी क्षण... पण सिद मुळात कसलेला ट्रेकर आहे, त्याने हार न मानता ब्रेवे नाहीतर नाही पण १२०० किमी करूच म्हणून पुढे सुरु ठेवले. ह्याला म्हणतात जिगर, पॅशन, दृढनिश्चय.

हिच आणि अशीच जिगर, कणखरपणा सह्याद्रीत फिरताना मला दुर्गम भागात राहणार्‍या वाड्यावस्तीवरल्या माणसांमधून दिसलीय. त्यांच्यातल्याच काहींविशयी आज -

शब्दचित्र पाचवे (अ): आसनवडी: जवळचे गाव घुटका, ता. मुळशी, पुणे.

ह्या गावात पहील्यांदा मी २०१३ ला गेलो, प्लॅन होता ह्याच गावाच्या पाठीमागून कोकणात उतरणार्‍या एका वाटेने कोकणात नागशेतला उतरायचे. महिना जुलैचा. आभाळ फाटल्यागत पाऊस चालू होता आम्ही वाघजाई घाट करून घुटका गावात वस्तीला गेलो. तेव्हा कळले की कोकणात जाणारी वाट आसनवडी गावातून जाते. दुसर्‍या दिवशी पाउणएक तासाची चाल चालून आसनवडीला पोचलो तर त्या गावाच्या दुर्गमतेने थक्क झालो होतो. वाडीतल्या (गाव म्हणू शकत नाही कारण मोजून तिन घरे चालू) लोकांना सांगीतले की कोकणात जायचेय तर त्यांनी वेड्यातच काढले म्हाणाले की विचारच करू नका. एकतर आलात तसे परत जा :) किंवा हिरडीला जा. तिथून हिरडी किमान ६ किमी आणि तेही तितकेच दुर्गम गाव. त्यावेळी आम्ही जरी कोकणात न जाता हिरडीला गेलो तरी आसनवडी गाव काही डोक्यातून जाईना.

चालू घरे तिनच पण अडचणी अनंत. शेती मर्यादीत. पाणी मर्यादीत. रस्ते जवळ जवळ नाहीच. जवळचे दुकानाचे ठिकाण घुटका गाव, ते गावही छोटेसेच पण निदान रस्ता पोचलेले. आसनवडीला दुसरे जवळचे गाव म्हणजे कोकणातले नागशेत. तिथे जायचे म्हणजे किमान अडीच तासाची उतराई अधीक चाल आणि परत यायचे म्हणजे तेवढीच चाल अधीक चढाई. ही लोक हे सर्व पिढ्यान पिढ्या करत आलेत. असलेल्या दुर्गमतेशी ह्यांना तक्रार नाही. आणि असलीच तरी कोणाजवळ करणार. तिन घरांच्या वाडीला सुधारणेच्या मोजमापात शेवटचेच दान मिळणार हे नक्कीच.

तिन वर्षांनी परत एकदा प्लॅन बनवला तो मार्चच्या रणरणत्या उन्हात. वाडीत पोचलो तो डोक्यावरून पाण्याचे हंडे घेऊन लोक जात होते. आम्हीही तहानलेलेच होतो पण अश्या स्थितीत त्यांच्याजवळ पाणी मागायचे जिवावर आले. चार महीने न मागता उदंड दान मिळणारे पाणी वर्षाचे सहा महीने थेंब थेंब वापरायचे म्हणजे दुर्विलासच. गावातून पाठीमागे कोकणात नागशेतला उतरलो तेव्हा भट्टितून लाह्या बाहेर फुटतात तसे फुटायचेच फक्त बाकी होतो. त्या तश्या जाळ कहारात आसनवडीचे लोक कोकणात येजा करतात हे बघून खिन्नता आली. पण तसेच पाय ओढीत शहराकडे जाण्याशिवाय आम्हाला पर्यायही नव्हता.

शब्दचित्र पाचवे (ब). ढेबेवाडी: जवळचे गाव हातलोट, ता. महाबळेश्वर, सातारा.

महाबळेश्वर म्हटले की बर्‍याच जणाना स्टॉबेरी, थंड हवेचे ठिकाण, बोटींग, सुर्योदय, सुर्यास्त घोडे सवारी किंवा आमच्या सारख्यांना ट्रेकर्सना प्रतापगड, जावळी, जंगल, खोल दरीतील वाटा असे काय काय आठवेल पण ह्याच तालुक्यात अशी काही दुर्गम गावे आहेत की तिथे राहणार्‍या लोकांना ह्या कशाशी काहीही देणे घेणे नसते. ढेबेवाडी असेच एक. आता ढेबेवाडी म्हणजे लौकिकार्थाने गाव नव्हे किंवा मोठी वाडी नव्हे. मोजून तोन घरे. आता तिन झालीत पण मी २००७ च्या मार्चला इथे गेलो होतो तेव्हा एकच होते. माझ्या मधु मकरंद हातलोट घाट ट्रेक मधे मि प्रथम इथे गेलो ते रस्ता चुकूनच. हातलोट गावातून निघालो तो तासभर चालूनही हातलोट घाटाची सुरुवात येईना. मधू-मकरंद मधला मधुही बराच पाठी गेला होता. समोर एक छोटी डोंगर रांग आडवी होती. आता इथे कुठून शिरायचे असा विचार करत होतो तो समोर एक घर आले. अचानकच. हीच ढेबेवाडी.

घरात पाच लोक. दोन म्हातारी, तिन मुले. बास. बाकी सगळे जंगलात म्हणजे ऑन जॉब गेलेले आणि संध्याकाळी परत येणारे. गावात पाणी प्यायला थांबलो तो वाडीचे लोकेशन बघून उडालोच. एक पाय गावात ठेवलात तर दुसरा पाय सरळ कोकणात टाकता येईल अश्या जागी ही ढेबेवस्ती होती. पाणी पिता पिता नेहेमीच्या सवईने चौकशी केले तेव्हा कळले की आत्ता आत्ता हे लोक हातलोटला वाण सामानाला जातात (कारण हातलोट पर्यंत गाडीरस्ता झालाय) नाहीतर मीठ मिरची सगळे कोकणातून बिरवाडी गावातून. धन्य. बा़की पावसाळा सोडल्यास सगळ्याचीच बोंब. पाणी, शेती, किराणा दुकान, शाळा, दवाखाना ह्या सगळ्याचेच उत्तर "नाही".

स्वतःवरच चरफडून तसेच पुढे जाण्याशीवाय मी काहीही करु शकत नव्हतो. मी शहाराकडे परतलो पण तिथल्या लोकांच्या जगण्यात काहीच बदल झाला नाही.

शब्दचित्र पाचवे (क):. खानू: जवळचे गाव वारंगी. ता. वेल्हे, पुणे.

मी बघीतलेल्या दुर्गम गावामध्ये जर क्रमवारी लावायची झाली तर याचा नंबर बराच वर लागेल. एकतर हे गाव अश्या ठिकाणी आहे की तिथे जायला किमान ३ तासांची तंगडातोड हवी. जिल्हा पुणे जरी असला तरी इथल्या लोकांना सरकारी कामासाठी पुण्याला जायचे तर जाण्यायेण्यातच एक दिवस जातो. चारी बाजूनी उंच डोंगर रांगा आणि मध्येच बेचक्यात असलेले हे गाव. एका डोंगर रांगेपलीकडे पानशेत धरण तर दुसर्‍या डोंगर रांगेपलीकडे कोकण. मी टेकपावळे वरून कोकणात उतरायचे म्हणून ह्या गावात आलो तर अश्या ठिकाणी असे एखादे गाव असू शकेल हा विचारही केला नव्हता.

इथल्या लोकांना किराणा, शाळा, दवाखाना सगळ्यासाठी कोकणात उतरणे भाग पडते. भाग पडते म्हटले मी सोईचे नक्कीच नव्हे. साधी रुपयाची मिरची आणि रुपयाचे तेलही कोकणातल्या वारंगी गावात उतरल्याशिवाय मिळायचे नाही अशी अवस्था. दोन तास घाटाने कोकणात उतरणे सोईचे वाटेल इतके कठीण शेजारच्या गावात जाणे. कोकणातले वारंगी सोडले तर अगदीच जवळचे गाव चांदर तेदेखील तासभर अंतरावर म्हणजे विचार करा. गाव तसे मोठे २०एक घरांचे. पण गावात शाळा, वि़ज, वैद्यकीय सुवीधा, किराणा काहीही नाही. फक्त पावसाच्या पाण्यावरची दैवावर अवलंबून असलेली शेती सोडली तर गावात काहीही काम नाही. अश्याच अवस्थेत पिढ्यान पिढ्या तिथे राहणार्‍या लोकांची ही जिगर म्हणायची की अगतीकता असा प्रश्ण मला पडलाय. गावात तरुण मंडळी जवळ जवळ नाहीतच. गावातल्या स्त्रियाच शेती करतात, लाकडांसाठी जंगलात जातात, घर सांभाळतात. सलाम ह्या जिद्दीला. म्हातारी माणसे एकतर गुरांच्या मागे किंवा घरातल्या बाजल्यावर. (तरूण मुले मुलींनी केव्हाच गाव सोडून शहर जवळ केलेय).

मी वर म्हटले तसे डीएनेफ होऊनही सिद ने दाखवलेली कणखर मानसीकता ह्या अश्याच लोकांकडून आपल्याकडे आलेय काय?

वरची तीन गावे फक्त प्रातीनीधीक आहेत. मी फारच थोडी बघीतली असतील पण अशी अनेक गावे सह्याद्रीत आहेत जी सह्याद्रीत विरघळून जगताहेत ते केवळ तिथे राहणार्‍या लोकांच्या जिद्दीमुळेच. एकतर तिथे अजून लोक राहतात म्हणून ती गावे आहेत नाहीतर गारजाईसारख्या गावातला म्हातारा "इथ फक्त मढी राहतात मढी" असे उदासीनतेने म्हणतो कारण पन्नाशीच्या खालचे गावात कुणीच नसते. कोकण किंवा देश एकवेळ बरे पण पदरवाडी, हेडमाची, आडराई, नाणेमाची आश्या अनेक अनेक सह्यपदरातल्या गावांचे तर अगदीच हाल असतात. कागदोपत्री बरीचशी गावे देशावर असतात पण बर्‍याच गावांचे रोटीबेटी व्यवहार कोकणात. न घर का ना घाट का अशी अवस्था.

पण चित्र अगदीच ब्लॅक अँड व्हाईट नाहीये. थोडे रंगीतही आहे, होतेय. हळू हळू ह्यातील काही गावे शहराशी जोडली जाताहेत. कच्चे मातीचे का होईना काही ठिकाणि रस्ते बनताहेत (पण ह्याच रस्त्यावरून स्कॉर्पीयो, फॉर्च्युनर गावात येताहेत हेही वास्तव आहे. सुज्ञांस अधीक सांगणे न लगे), कुठेतरी एकाच झाडाखाली का होईना पण मोबाईल रेंज येतेय. पण ह्या सगळ्याचा वेग इतका धिमा आहे की हे लोक शहरी प्रवाहात सामील होई पर्यंत शहरी प्रवाहाचा वेग इतका वाढला असेल की त्यांना इथेही ऑड मॅन आउट वाटेल की काय अशी भीती वाटतेय.

ह्या लोकांनी शहराचा दरवाजा ठोठावलाय, त्यांना आत घ्यायचे की कुंपणावरून बाहेरच हाकलायचे हे आपण ठरवायचे आहे.

-------------------

सह्याद्रीतील शब्दचित्रांतल्या मागच्या भागात दुर्गम खेड्यात, वाड्यावस्तीवर राहणार्‍या आणि अंगातल्या जिगरीवर घट्ट पाय रोवून निसर्गासमवेत राहणार्‍या काहींविषयी लिहीले पण सह्याद्रीत अगदी अंतर्भागात राहणार्‍या सगळ्याच घरांच्या, गावांच्या नशीबी असे जगणे येत नाही. काहींना निसर्ग विस्थापीत करतो (आठवा: माळीण, साखरमाची) तर काहींना आपणच. निसर्गच जर क्रूर झाला तर कोणाजवळ तक्रार करणार, म्हणजे ज्याच्या कुशीत आसरा घ्यायचा तोच बुडाला तर आश्रय घेणारा पण बुडणारच की. पण प्रत्येक वेळा अस्मानीच हवी असे काही नाहीये. मला (सुदैवाने म्हणायचे की दुर्दैवाने ते माहीत नाही) अश्याच एका गावाचे विस्थापन अचानकच बघायला मिळाले. त्याविषयीच काही आज

शब्दचित्र सहावे: एका गावाची मरणकथा. मु.पो. माडोशी, कोयना अभायारण्य, सातारा.

पिढ्यान पिढ्या एक गाव जंगलात जंगलाचाच एक भाग म्हणून राहतेय. ऊन, वारा, पाउस (ह्या भागात जरा जास्तच), थंडी (ह्या भागात जरा अतीच) हा जगण्याचाच एक भाग बनवून अनेक पिढ्या येथे नांदल्या आणि एके दिवशी काहीतरी वेगळ घडलं. गावात बाहेरची माणसं आली म्हणाली तुमच्या गावाला अभय मिळतेय पण तुमच्या इतके भाग्यवान तुमची शेजारी गावे नाहीत. शहरात कमी पडणार्‍या विजेसाठी त्यांचा बळी द्यावा लागतोय. मग काय एका हिरव्या निसर्गचित्रात जिथे फक्त गावे, जंगले होती तिथे एक मोठा जलाशय रंगवला गेला. निसर्गाचेच नशीब असे की त्याला फार ओरबाडले गेले नाही. नाव दिले गेले शिवसागर.

पण ह्या सगळ्यात इतकी वर्षे नदीच्या अल्याड पल्याड असलेली गावे आता जलाशयाच्या अल्याड पल्याड झाली. चालत ओलांडायची नदी आता बोटीने ओलांडायला लागली. इथपर्यंत सगळे बरे होते म्हणूया. पण हळू हळू ह्या जलाशयाच्या अल्याड असलेल्या गावांना कळले की पल्याड मातीचे रस्ते झालेत, शाळा झाल्यात, विज येऊ घातलीय पण अल्याड मात्र चारी ठाव अंधारच होता. तरीही ठीक होते म्हणू. पण लवकरच त्यांना कळले की त्यांच्या कुशीत असणारा निसर्ग बाकीच्यांनी त्यांच्याकडचा संपवलाय आणि मग सुरु झाली ह्या गावाची मरणकहाणी. इतके वर्ष वरदान असलेले अचानक शाप झाले आणि बाहेरून ऑडर्स आल्या की निसर्ग जपा. इतकी वर्ष हे सगळे गावातली माणसे, झाडे, वेली, पक्षी, प्राणी ह्यात भेद न करता एकत्र राहत होते. निसर्गानेही कधी भेद केला नाही कारण त्याने ह्यांना परके मानलेच नाही. पण कुठेतरी काही शे किंवा हजार किमीवर निर्णय झाला की ह्या सगळ्यांतून माणसांना वगळा, बाहेर काढा. शहरात दुर्मिळ झालेला निसर्ग, पक्षी, प्राणी इथे जगवा. मग काय शे विरुद्ध हजार अश्या ह्या सामन्यात गावकरी हरणार हे क्रमप्राप्तच होते. गावात परसअंगण असावे असा फिरणारा बिबट्या, खेटून असलेल्या जंगलातली जैव विवीधता जपण्यासाठी कुणाचातरी बळीचा नैवैद्य द्यावाच लागणार होता. विरोधाची धारपण नियमांच्या घावांनी बोथट झाली आणि अल्याडची सगळी गावे मोडीत निघाले. माडोशीबाबतही तसेच झाले.

चार वर्षांपुर्वीच्या माझ्या रेंजट्रेक मध्ये चोरवण्याहून नागेश्वरमार्गे नागनाथने (ह्याच्या बद्दल पुन्हा केव्हातरी) जेव्ह्या माडोशीला नेले तेव्हा असे काही बघायला मिळेल असे वाटले नव्हते. कोयनेच्या गच्च जंगलातून जेव्हा वाट काढत आम्ही माडोशीपाठच्या जननीच्या टेंभ्यापाशी बसलो होतो तेव्हा अफाट अफलातून निसर्गाचा कॅनव्हास समोर होता. पायाशी, पाठीमागे, सभोवताली कोयनेचे घनदाट जंगल आणि मध्येच आमचे सहा ठिपके :). तळात माडोशी गावाची घरे आणि काम करणारी माणसे दिसत होती. त्याहून तळाशी कोयना जलाशयचे पाणी होते. समोर अकल्पे गाव, पाठीमागे उत्तरेश्वर मंदीर, डावीकडे उचाट गावाकडे घुसलेले शिवसागरचे पाणी, उजवीकडे दुर बामणोली ची घरे, कास पठार. अश्या निरव शांततेच आमचा चालणारा श्वासदेखील मोठा आवाज करत होता अशी स्थब्धता. थोडा वेळ तिथे थांबून जेव्हा माडोशी गावाजवळ उतरलो तेव्हा प्रथम जाणवले ते बेवसाऊ झालेल्या शेतमळी. तसे ह्याला मला नवीन नव्हते आजकाल बहुतांश गावात हिच स्थीती आहे पण इथे जाणवले की इथे ह्यावर्षी शेतीच झाली नसावी किंवा केलीच नसावी.

असे कसे हा विचार करत गावात दाखल झालो. प्यायला पाणी मागीतले आणी नेहेमीच्या सवयीने गप्पांना विषय काढला. तेव्हा कळले की माडोशी गाव शेवटचा घटका मोजत आहे. पुढच्या पंधरवड्यात सगळ्यांना इथून निघून जायचे आहे. कायमचे. "कायमचे" बरं का. पुन्हा कधीही परत न येण्यासाठी. म्हणजे सगळे गावच जणू व्हेंटीलेटरवर आहे आणी सप्लाय बंद करायची तारीख ठरवली गेली आहे. ज्या निराकार भावनेनी समोरच्या आजोबांनी आम्हाला हे सांगीतले ते ऐकून आम्हालाही चरकायला झाले. आम्ही तर इथून निघून पुढे मोरणीला जाणार होते पण गावातल्या लोकांचा विचार काही मनातून जाईना.

बरे माडोशी गावही काही एखाद दुसर्‍या घराचे नव्हे. गावात चौथीपर्यंत (आता मात्र बंद पडलेली, किंवा पाडलेली म्हना हवी तर) शाळा होती. विसेक कौलारू घरे होती, सारवलेली अंगणे, समोर आंब्याची झाडे, परसावात भाजीपाला, गाई, म्हशी, कोंबड्या असा कुठल्याही भारदस्त गावाचा असतो असा माडोशीचा साज होता. इतके वर्ष हे गाव कुणाला धक्का न लावता जगत होते पण एके दिवशी त्यांना सरकारी नोटीस आली आणि ज्या जंगलाच्या आधारावर हे गाव जगले तेच त्यांना विस्थापीत होण्यास कारणीभूत ठरले. गावतली माणसे सांगत होती की हल्ली कंबरेला नुसता कोयता लावून बाहेर पडणेपण गुन्हा झालाय. स्वतःच्या परसदारातली काठीपण तोडणे जर गुन्हा झाला तर त्यांनी गाव सोडावे नाहीतर जगावे कसे. पण गावाचा, गावकर्‍यांचा अपराध एकच होता. हे जलाशयाच्या अल्याड होते. पल्याड असते तर आज गावात विज असती, डांबरी रस्ते असते, शाळा, किराणा दुकान असते आणि गावात गुंठामंत्रीही गाड्या उडवत जमिनी विकत/विकत घेत फिरले असते. माडोशीच्या समोरच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या निवळी, अकल्पे गावात हे सगळे झालेच की. पण माडोशी गावाला मात्र सरणावर चढावे लागले.

आम्ही तासभर त्यांच्याशी गप्पा मारून पुढे गेलो, ट्रेक पुर्ण झाला तरी माडोशी गावाची अवस्था काय मनातून उतरली नाही. पुढे आठपंधरा दिवसांनी जेव्हा वर्तमानपत्रात माडोशीच्या विस्थापनेची बातमी वाचली तेव्हा तिथे झालेल्या शेवटच्या स्थलांतराला चांगलेच अनुभवू शकलो. आठेक दिवसांपुर्वी तिथेच होतो की. आता परत तिथे गेल्यावर बंद पडलेली शाळा, बंद घरे, निर्जीव शेतमळेच दिसणार. जिवंतपणाचे लक्षण असणारे काहीही दिसणार नाही. पण सरकार दरबारी मात्र कोयना व्याघ्र्यप्रकल्पात आणि युनेस्को बायोडायवर्सीटीत असलेला एक अडथळा दुर झाला अशीच नोंद होणार :(.

मी फक्त माडोशी गाव विस्थापित होताना बघीतले पण जलाशयाच्या अलीकडील असलेली रवदी, आडोशी, माडोशी, कुसापुर, इंदवली, तांबी, मळदेव, नवजा अशी सगळीच गावे अशीच मरणपंथाला गेली. अस्मानी जरी साथ देणारी असली तरी सुलतानी विरोधात गेली. तिकडे चांदोली अभयारण्यातही फार वेगळे घडले नाही. मी फक्त माडोशी गावाला अनुभवले. मी कोयनाधरण, त्यामुळे पाण्याखाली गेलेली गावे, ह्याविरोधात नाही. कोयना धरणाने आणि त्यामुळे निर्माण झालेल्या विजेने झालेले अनंत फायदे, नामशेष होत चाललेली जंगलसंपदा, प्राणि, पक्षी, हे सगळे जपायला हवे, वाचायला हवे तर कुणीतरी त्याग करायला लागेलच पण एक गाव उध्वस्त होताना जो ओरखडा उमटायचा तो उमटणारच. आज आपण वापरणार्‍या विजेचा काही भाग कोयनेने निर्माण केलेल्या विजेचा आहे आणि त्यामागे काही गावांचे नामशेष होणे आहे हे जरी ध्यानात ठेवले तरी वापरणार्‍या विजेचा आपण आदर करायला लागू.

लगेच पुढच्या वर्षी परत त्या भागात ट्रेक केला तेव्हा कळले की माडोशी गाव संपुर्ण विस्थापित झाले नाहीये. एक घर आणि त्यात राहणारे एक छोटे कुटुंब अजुनही गाव चालू ठेवते आहे. ऐकून बरे वाटले तरी अजून किती दिवस हे काही मला माहीत नाही पण तुर्तासतरी मु. पो. माडोशी, ता. महाबळेश्वर, जि. सातारा हा पत्ता व्हॅलीड आहे :).

-----------------

आता पर्यंत सहा भागातून सह्याद्रीत मला भेटलेल्या माणसांबद्दल, गावांबद्दल परीस्थीतीबद्दल थोडेसे लिहायचा प्रयत्न केला. आता स्वल्पविराम घेतो. पुन्हा कधीतरी सह्याद्रीवर लिहीनच तेव्हा भेटू.

<समाप्त>

-----------------

trekking sahyadri villeage

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

24 Jul 2018 - 6:43 pm | प्रचेतस

अप्रतिम लिहिलंस रे.
सह्याद्रीतली गावं अतीव सुंदर, पण देखणेपण हळूहळू कमी होत चाललंय. माडोशी गावाचा होत असलेला अंत चटका लाऊन जातोय.

charming atheist's picture

24 Jul 2018 - 10:20 pm | charming atheist

फोटो असते तर मजा आली असती.

प्रसाद गोडबोले's picture

25 Jul 2018 - 3:11 am | प्रसाद गोडबोले

छानच !

पण तरीही सह्याद्री व्याघ्र प्रकल्पासाठी जंगले मानव विरहीत करणे अनिवार्य आहे , त्याला पर्याय नाही ! माणुस हाच जगातला सर्वात खतरनाक प्राणी आहे , तो हटवल्याशिवाय इतरांचे जगणे मुश्कील !

अवांतर : कुसापुर मार्गे वासोटा ट्रेक केला होता अगदी लहानपणी ! कुसापुरात राहिलो होतो त्या आठवणी जाग्या झाल्या !!

स्वच्छंदी_मनोज's picture

25 Jul 2018 - 12:21 pm | स्वच्छंदी_मनोज

जंगले वाचवायची तर काहीतरी गमावावे लागेल. मला मांडायचे होते की जंगले वाचवताना, व्याघ्रप्रकल्प करताना कशा कशाला आपण गमावलेय. गावे जी अनेक वर्षे जंगलात मिसळून राहीली त्यांना बाहेर काढावे लागले.

तुम्ही कुसापुरला राहीलात तेव्हा नांदते असलेले ते गाव आता कोणीही नाही तिथे. हे आपल्याला जितके वाईटवाटणारे आहे तर त्यांना जे तिथे आयुष्य घालवले किती क्लेशकारक असेल.

बाकी माणुस हाच जगातला स्रवात खतरनाक प्राणी ह्या बद्दल अनुमोदन :) :)

संतोष जंगमांची स्वतःची काही बाजू असेलच की वागण्यातल्या बदलाची. नक्की असतील.

माडोशी बद्दल वाचून वाईट वाटले. सारा तिढाच आहे..

स्वच्छंदी_मनोज's picture

25 Jul 2018 - 12:14 pm | स्वच्छंदी_मनोज

आणि थोडेफार त्याला आपणच कारणीभुत आहोत.

पद्मावति's picture

25 Jul 2018 - 2:08 pm | पद्मावति

फार सुरेख लिहिताय.

अपेक्षेप्रमाणेच अप्रतिम व्यक्तिचित्रे . अर्थात तुमच्याकडून अजुन अपेक्षा आहेतच. महिमंडणगड, चकदेव हा परिसर अजून पहायचा आहे, मात्र संतोष जंगमविषयी माझ्या ट्रेकमित्रांकडून माहिती होती. माझा एक मित्र नुकताच नुसता चकदेव पाहून आला, त्यावेळी त्यालाही संतोषच्या या व्यवहारीपणाचा अनुभव आला. सविस्तर इथे लिहीत नाही, पण सह्याद्रीच्या कुशीतील लोकांमधे झपाट्याने हे बदल जाणवत आहेत. अर्थात त्यासाठी फक्त त्यालाच दोष देउन चालणार नाही, एकतर वेगाने वाढणारी महागाई, बदलती जीवनशैली, नव्या पिढीला शहराचे असणारे आकर्षण असे बरेच पैलु आहेत. एकतर डोंगराळ प्रदेशामधे शेती बेभरवाशाची आणि उत्पन्नाचे ईतर साधने नाहीत. सहाजिकच हल्ली वाढत्या ट्रेकिंगच्या क्रेझमुळे या लोकांच्या हाती पैसे खुळखुळु लागलेत. अर्थात स्थानिकांना यातून उत्पन्न मिळत असेल तर स्वागतच करायला हवे. पण तिथे जाणार्‍या लोकांनीही काही भान ठेवले पाहिजे. शहारीतील समृध्दीमुळे गरम असलेल्या पैशाचा माज सह्याद्रीपरिसरात दाखवने टाळले पाहिजे. बरेच ट्रेकीग ग्रुप अक्षरशः व्यवसायिक कारणासाठी या लोकांना वाटेल तसे पैसे देतात आणि त्याचा त्रास नंतर जाणार्‍यांना होतो. यामुळे होणार्‍या आडवाआडवीचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे. त्यामुळे पैशापेक्षा कपडेलत्ते,औषधे अशी मदत करावी या मताचा मी आहे. असो. बदल हिच एक कायम रहाणारी गोष्ट आहे.
बाकी माडोशी काय त्याच परिसरातील अनेक गावे उठली आहेत. या गावांचे पुर्नवसनही केले गेले आहे. सदैव जंगलातील पायवाटा तुडवणार्‍या या लोकांना दुष्काळी प्रदेशात नेउन वसवले आहे, त्यांच्या हालाअपेष्टांची आपण कल्पनाच करु शकतो. नुकत्याच एका लग्नामुळे सदाशिवगडाच्या पायथ्याशी पुर्नवसन झालेल्या गावात जाण्याचा योग आला. घरे शहरासारखी आखीवरेखीव बांधलेली आहेत. जवळच शेतीवाडी शासनातर्फे दिली गेलेली आहे. घरासमोर डांबरी सडका आहेत, मात्र आजारी पडल्यास किमान सहा कि.मी. पायपीट ठरलेली. या आयुष्याची कल्पना करवत नाही. तेव्हा बदल चांगले कि वाईट याचे उत्तर नाही असे खेदाने म्हणावे असे वाटते.

स्वच्छंदी_मनोज's picture

27 Jul 2018 - 11:52 am | स्वच्छंदी_मनोज

चांगला प्रतीसाद. योग्य निरिक्षण आहे तुमचे. टाळी एका हाताने वाजत नाही.
गावात जेवणाचे, गाईडचे अवाच्या सवा देणारे आहेत म्हणून घेणारे आहेत किंवा व्हाईसएवर्सा..